कै. मुरलीधर शिंगोटे आणि नाडी ग्रंथ भविष्य

Primary tabs

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
7 Aug 2020 - 8:06 pm

1

कै. मुरलीधर शिंगोटे आणि नाडी ग्रंथ भविष्य

आज श्री मुरलीधर शिंगोटे यांच्या निधनाची बातमी वाचली आणि काही स्मृती जाग्रृत झाल्या. तो १९९६च्या मे महिना असावा. मला तांबरमहूनश्रीनगरच्या हवाईतळावर कामाला रुजु होऊन २ महिने झाले असावेत. त्या काळातील रजेच्या दरम्यान मी मुंबईच्या फोर्ट विभागातून फिरत होतो. दुपारची वेळ. घामाच्या धारा लागल्या म्हणून व्हीटीच्या स्टेशन बाहेरील थंडगार पेय विक्रेत्याला खट्टामीठा बनवायला सांगून फुटपाथवर विकायला आलेल्या काही सांज दैनिकांकडे माझे लक्ष दिले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कुठल्याशा पत्रकांतील लेखनावरून दिलेल्या ८ रकान्याच्या बातमीकडे माझे लक्ष गेले. तो होता आपला वार्ताहरचा अंक. काहीतरी भडक लिहून विक्री वाढवायच्या लंगोटीपत्रकारितेच्या अशा तंत्रांमुळे मी प्रथम दर्शनी दुर्लक्ष केले. थंडपेयाचा आस्वाद घेता घेता तो अंक चाळला. संपादकीयातील लेखावर धावती नजर टाकून त्यातील शब्द कोड्याच्या पानावर जावे म्हणून लेख वाचायला लागलो. अंनिसला खरपुस भाषेत फैलावर घेणारा तो एक अग्रलेख होता. तेंव्हा त्यातील तडाखेबंद भाषेत, दाभोळकरांच्या कुठल्याशा वक्तव्यावर अग्रलेखातून केलेल्या चिरफाडीने त्यांना अक्षरशः उघडे पाडले होते. युक्तिवाद बिनतोड होता. प्रा. अद्वयानंद गळतगे सरांच्या शिवाय नाडी ग्रंथांच्या अदभूततेच्या बाजूने व अंनिसच्या खोट्या व कांगावखोर लेखनाविरुद्ध लिहिणारे त्याकाळात कोणी नव्हते. त्यांच्या लेखनाच्या तोडीचे या संपादकीयातील लेखन वाचून मला मुरलीधर शिंगोटे यांचा संपादक म्हणून एकदम आदर वाटला. या व्यक्तीला भेटायची इच्छा जागृत झाली. निदान त्यांना नाडी भविष्यावरील लेखनातून अंनिसने नाडी ग्रंथांचा अनुभव न घेता केलेला विपर्यास त्यांच्या कानावर घालावा असे वाटून मी लालबागमधील त्या पत्यावर पोहोचलो. एका गच्चीवजा भागात अस्ताव्यस्त पडलेल्या दैनंदिन पेपर्सचे गठ्ठे, बराचसा रद्दीचा कचरा यावरून मी योग्य ठिकाणी पोचल्याचे लक्षात आले. एका काम करणाऱ्याला ‘मुरलीधर शिंगोटेंना भेटायचे आहे’. म्हटल्यावर, ‘ते काय’ म्हणून एका शिडशिडीत उंच व्यक्ती कडे बोट दाखवले. डोक्यावर पांढरी गांधी टोपी, झब्बा, चुरगाळलेली विजार असा वेशातील व्यक्तीने मला विचारले, ‘मीच शिंगोटे, काय काम आहे?’ मनात मला निराशा वाटली. असा माणूस संपादकीयातील पल्लेदार लेखन करेल का? असा उगीचच विचार डोकावला. मी ओळखपत्र हातात देत म्हटले की आपल्या आजच्या अंकातील संपादकीय वाचून आपण कोण? म्हणून पहायला आलोय. ‘अस्स होय!’ म्हणून त्यांनी एका खोलीकडे बोट दाखवून म्हटले, ‘ते आमच्या भाऊने लिहिलेय. मी नाही!’
आणि आपल्या कामात ते गढले. मी खोलीत गेलो. एक घामट चेहऱ्याचे, चष्मेवाले ग्रहस्थ म्हणाले, ‘हो, तो लेख मीच लिहिला आहे’. ते होते भाऊ तोरसेकर!... त्यांचे अभिनंदन करायला, माझ्यासारख्या हवाईदलातील व्यक्तीने दुरून कुतुहलाने मुद्दाम भेटायला आलेल्या जागृत वाचकाला त्यांचे ते लेखन आवडल्याचे बोल ऐकून फारसा आनंदी चेहरा न करता म्हणाले, ‘अंनिसचे विचार मला पटत नाहीत तेंव्हा मी त्यावर लिहितो’. मी नाडी भविष्य नावाचे पुस्तक लिहिल्यावर त्यातील ‘चमत्कार’ शब्दाने आकृष्ठ होऊन माझ्यावर टीका करायचे सत्र *दाभोळकरांच्या चेल्यांनी सुरू केले आहे. याची माहिती आपल्याला नसेल तर ती द्यावी म्हणून आपल्याला भेटायला आलो आहे. म्हटल्यावर ‘बर’ म्हणून उरलेला गार चहा संपवत म्हणाले, ‘मी लेखन करत आहे. त्यात व्यत्यय आलेला मला आवडत नाही. माफ करा’. म्हणून पेन सरसावून ते लिहायला गढले!
‘काय म्हणतात आमचे भाऊ? असे विचारत मुरलीधर शिंगोटे मला आपले काम करत विचारते झाले. ते पानाचा ले आऊट आपल्या पद्धतीने लावत असताना माझ्याकडे न बघता बोलत होते. दुपारचा सार्वजनिक चहा आल्यावर, ‘घ्या’ म्हणून त्यांनी सवड काढून मला बोलते केले.
‘अस्सं’? , ‘मला माहित नाही!’, ‘ते काय असत?’ म्हणून नाडी भविष्याच्या विषयात कुतुहल दाखवले.
‘अरे तिच्या!’, ‘बर, ते का म्हणतात नाही म्हणून?” उत्सुकता दाखवून पुढे म्हणाले, ‘पुस्तक आहे तुमचे?’ मी हातात एक प्रत ठेवली. त्यांनी त्याची पाने किती, प्रकाशक कोण वगैर पाहून म्हटले हे पुस्तक छापून काढू का ? मला समजावत ते म्हणाले, ‘यातला मजकूर रोज थोडा थोडा करून छापू का मी?’
मी थोडा चक्रावून गेलो! कारण अशी छापून काढायची शक्कल असू शकते यावर मी कधी विचार देखील केला नव्हता! ‘बघा, ठरवा मग कळवा’. म्हणून ती प्रत त्यांनी माझ्या हातात परत देत म्हटले. पटकन ठरवून मी म्हटले, ‘हो चालेल छापा’. ‘तुमच्या पेपरचे सर्क्यूलेशन किती?’ ते म्हणाले, ‘दोन्ही रेल्वेच्या बुकस्टॉलवर आणि उपनगरातले किरकोळ विकणाऱ्यांकडून ते वाचले जाते. मीच वितरक आहे’. चहा संपला. ‘अरे ती बातमी खाली घे. एक मोठी जागा सोड बर का, त्यांनी माझे पुस्तक पुन्हा हातात घेत अंदाजाने जागापण ठरवली होती!
ती माझी त्यांची भेट! नंतर मला श्रीनगरला मुंबईच्या विविध भागातून लोकांची पत्रे यायला लागली. ‘तुमचे लेख वाचून उत्सुकता लागली आहे’. काहींनी ‘सगळी थापेबाजी वाटते बुवा’, ‘असे अंगठ्याच्या ठशावरून कोणी भविष्य सांगणे शक्य नाही!’. अशी उलट सुलट मते व्यक्त करणारी पोस्ट कार्डे, आंतरदेशीय अधूनमधून येत राहिली. ते धारावाहिक प्रकाशन केंव्हा छापून संपले ते कळले नाही. मानधनाबद्दल प्रश्नच नव्हता. पण माझ्या अंदाजाने विरार ते चर्चगेट, कसारा, कल्याण, कर्जत ते व्हीटी संपूर्ण लोकलच्या पट्ट्यात ‘नाडी भविष्य’ म्हणून काही असते याची तोंड ओळख जरूर झाली असावी.
मधे बरीच वर्षे लोटली. तोवर मी पुण्यात पोस्टींगला आलो होतो. एकदा अप्पा बळवंत चौकातील खरेंच्या पेपर एजन्सी दुकानात बोलत असताना त्यांच्या नोकरांपैकी कोणी माझे नाव ऐकून खऱ्यांना म्हणाले, ‘अहो ते नाडी भविष्याच्या पुस्तकाचे काही गठ्ठे माळ्यावर आहेत ते त्यांना परत करा’. मला आश्चर्य वाटले.
सप्टेंबर १९९४ मधे या पुस्तकाच्या ५००० कॉपीज पैकी ४५०० कॉपीज खऱ्यांनी आपल्या टेंपोतून विकायला नेल्या होत्या. त्याचे विक्रीचे पैसे ड्राफ्टने रीतसर पाठवले होते. आता या प्रती कुठल्या? व किती? ते पाहून कळवतो दोन दिवसात म्हणून ते म्हणाले.
मला थोडा धक्का बसला होता. आता इतक्या प्रती मी नेणार कशा? व ठेवणार कुठे? तिथून बाहेर पडलो, पायी चालता चालता प्रभात टॉकीज जवळ थबकलो. तिथे शिंगोटे यांचे एक ऑफिस होते. कोणी नातेवाईक ते चालवत होता. त्याला विचारले की मुरलीधरजी सध्या कुठे असतात वगैरे त्यावेळी मनांत या उरलेल्या प्रतींबद्दल काही नव्हते. ते फोनवरून बोलले. इतक्या वर्षांनी देखील ते म्हणाले, ‘हो आठवतेय, तुम्ही मला भेटला होतात वगैरे, आता नविन काही लिहिलेय का?’ वगैरे. मी सहज बोलून गेलो, ‘ हो आता नाडी भविष्यावर इंग्रजी, हिंदी, गुजराथीत पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. वगैरे….’
मी सहज त्यांना म्हटले की अशा काही जुन्या आवृत्तीच्या प्रती आहेत त्यांचे वितरण कसे करावे याची काळजी आहे. ‘हो का? मग द्या की पाठवून जितक्या जातील तेवढ्या विकू.’ असे म्हणून त्यांनी त्यांच्या मॅनेजर नातलगाला सांगून त्या जवळजवळ ७ शे प्रती दिल्या, ज्या मी नंतर खरेंकडून रिक्षात घालून त्यांच्याकडे पाठवल्या. नंतर त्या त्यांच्या पद्धतीने विकल्या गेल्या. मी कधी किती पैसे झाले वगैरे विचाराच्या फंदात पडलो नाही. माझ्यासाठी त्या कोणाच्या तरी हाती वाचायला मिळाल्या याचे समाधान जास्त होते. पुढे जंगली महाराज रस्त्यावर पुण्यानगरीचे ऑफिसात मी त्यांना भेटले होतो. आता ते सफारी पोषाखात भेटले. मी त्यांना त्यांच्या तमिळ पेपरातील डीटीपीचे काम करणाऱ्या टायपिस्ट लोकांकडून नाडी ग्रंथांवर आम्ही तयार केलेल्या डेटा बँक प्रोग्राममधील डेटा टाईप करून हवा आहे. त्यासाठी मदत मागितली. ते म्हणाले, ‘आमच्या तमिळवाल्या संपादकांशी बोला. मी सांगितले आहे काम करायला म्हणून सांगा’. अर्थात मी तसे केले पण त्यातले तमिळ टायपिंग साध्या टायपिंग प्रमाणे नसल्याने अनेकांनी जसा नकार दिला तसेच झाले. असो. नंतर एकदा सहज फोनवरून बोललो होतो. तेंव्हा ते जुन्नरकडे गावात जास्त वेळ असतात असे कळले. मग पुन्हा भेट झाली नाही...
------

प्रतिपक्ष वरून भाऊ तोरसेकरांनी अक्षरशत्रू संपादक या शीर्षकाने त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला म्हणून मला ही स्मृती श्रद्धांजली लिहायला प्रेरणा मिळाली.

*तेंव्हा डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी नाडी भविष्यावरून मला लक्ष्य करून काही लेख प्रकाशित केले होते.

व्यक्तिचित्रप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभव

प्रतिक्रिया

Jayant Naik's picture

7 Aug 2020 - 10:05 pm | Jayant Naik

ते शिंगोटे अगदी डोळ्यासमोर उभे राहिले. मस्त लिखाण.

शाम भागवत's picture

7 Aug 2020 - 11:15 pm | शाम भागवत

शिंगोटे यांचेबद्दल भाऊंचा हा लेख
–———————————————

सोमवार, ३० जुलै, २०१२
नशा जरूर असावी पण कशी असावी?

खरे सांगायचे तर गुटखाबंदीच्या निमित्ताने व्यसन या विषयावर मी इतके लेख सलग लिहू शकेन की नाही; याची मला शंका होती. कारण तो विषय सुद्धा माझ्या डोक्यात नव्हता. पण गुटखाबंदीची घोषणा झाली आणि ‘पुण्यनगरी’चे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांचा मला फ़ोन आला. त्यांनी आग्रहच धरला, की मी व्यसनासंबंधाने लिहावे. मी आधी त्यांचा आग्रह फ़ेटाळून लावला होता. कारण मलाच त्या विषयाचे फ़ारसे आकर्षण नव्हते. मी त्याबद्दल मुद्दाम असा विचार केला नव्हता, की त्याचा अगत्याने अभ्यासही केला नव्हता. पण मुरलीशेठ हा भयंकर हट्टी माणुस आहे. त्यांच्या डोक्यात एक विषय घुसला, मग ते त्याचा पिच्छा सोडत नाहीत. त्यामुळेच त्यांनी व्यसन विषयासाठी माझीही पाठ सोडली नाही. शेवटी मी दोनतीन लेख लिहायचे मान्य केले. पण त्याचा इतका विस्तार होईल व तेही लेख वाचकांना इतके आवडतील याची मी तरी अपेक्षा अजिबात केली नव्हती. पण पहिल्या लेखानंतरच जे फ़ोन आले तेव्हा मीही थक्क झालो. मला मुरलीधर शिंगोटे या प्राण्याचे खरेच कौतुक वाटले. स्वत: लेख किंवा बातमी लिहू न शकणार्‍या या माणसाला वाचकाची भूक कशी कळते, हे गेल्या अठरा वर्षात मला न उलगडलेले कोडेच आहे. कारण त्यांच्या वृत्तपत्र व्यवसायाची सुरूवात झाली, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. आम्ही सोबतच तो प्रयोग सुरू केला होता.

१९९४ सालात मुरलीशेठ हा फ़क्त वृत्तपत्र विक्रेता होता. त्यापुर्वी त्यांनी तीन दशके वृत्तपत्र विक्रीत घालवली होती. ‘नवाकाळ’ लाखो लोकांपर्यंत पोहोचविण्याचे श्रेय जेवढे निळूभाऊ खाडीलकर यांच्या सिद्धहस्त लेखणीला आहे, तेवढेच मुरलीशेठ शिंगोटे या वाचकभक्त विक्रेत्याला सुद्धा आहे. कारण नवाकाळचे दिवस वाईट होते तेव्हापासून शिंगोटे यांनी त्याच्या विक्रीची जबाबदारी पत्करली होती. जेवढा निळूभाऊंचा आपल्या लेखणीवर विश्वास होता, तेवढाच मुरली शिंगोटे यांचा आपल्या विक्री-वितरण क्षमतेवर विश्वास होता. त्यातूनच नवाकाळ लाखाच्या आकड्यात जाऊन पोहोचला. नुसता लाखच नव्हेतर पाचसात लाखाचा पल्लाही ओलांडू शकला. मात्र त्या्मागची शिंगोटे यांची तपस्या वृत्तपत्र विक्रेते व व्यावसायिक; यांच्यापलिकडे कोणालाच फ़ारशी कल्पना नव्हती. मग एके दिवशी कालनिर्णय पंचांगकर्ते जयंतराव साळगावकर यांनी मराठी दैनिक काढण्याचा निर्णय घेतला. त्याच्याही वितरणाचे काम शिंगोटे यांनी मित्राच्या मदतीने स्विकारले. पण ते निळूभाऊंना पचले नाही. त्यांनी अचानक शिंगोटे यांच्याकडून नवाकाळच्या वितरणाचे काम काढून घेतले. त्यामुळे शिंगोटे कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांच्याकडे दरम्यान वितरणाचे काम करणारी सव्वा दोनशे कामगाराची फ़ौज तयार झाली होती. एकेदिवशी अचानक त्या सर्वांसाठी काम उरले नाही. मग करायचे काय? त्यांना कामावरून काढून टाकायचे काय? मुरलीशेठ शिंगोटे यांना ते पटत नव्हते. पण करायचे काय? एका दिवसात तेवढ्या मोठ्या वितरणाचे काम अन्यत्र मिळणार नव्हते. तर या माणसाने चक्क स्वत:च नवे वृत्तपत्र काढण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याला स्वत:ला लिहिता येत नव्हते, की विश्वासातला कोणी सहकारी नव्हता. पण आपल्याला ज्यांनी वितरणाचा बादशहा बनवले त्या सव्वा दोनशे कामगारांना वार्‍यावर सोडून द्यायची त्याची तयारी नव्हती. म्हणुन त्यांनी स्वत:च नवे वृत्तपत्र काढून ते लाखाच्या संख्येने चालविण्याचा धाडसी निर्णय घेतला. व्यवहारी भाषेत सांगायचे तर तो शुद्ध मुर्खपणा होता. कारण असे नवे वृत्तपत्र काढून कित्येक लाख व को्टी रुपये बु्डवणारे अनेक दिवाळखोर लोकांनी बघितले होते. पण या माणसाला समजावणार कोण?

१ मे १९९४ रोजी नवाकाळचे वितरण हातून गेले आणि त्याच दिवसापासून शिंगोटे यांनी ‘मुंबई चौफ़ेर’ नावाचे छोटेखानी सांजदैनिक मुंबईत सुरू केले. तेव्हा त्या माणसाच्या मुर्खपणाला हसणार्‍यात मीसुद्धा एक होतो. तसा त्यांचा आणि माझा परिचय नव्हता. पण आमचा एक समान मित्र होता अशोक शिंदे. त्यानेच मला आग्रह केला, की मुरलीला मदत कर. मीही गंमत म्हणुन त्यांच्या मदतीला गेलो. मात्र नवाकाळशी टक्कर घेण्याची किंवा लाखात वृत्तपत्र खपवण्याची शिंगोटे यांची स्वप्ने, मलाही पोरकट वाटत होती. कारण वृत्तपत्र म्हणजे लाखो रुपयाचा चुराडा करणारा जुगार असेच त्याचे अर्थशास्त्र आहे व होते. पण विक्रीवर अगाध श्रद्धा आणि वृत्तपत्र विक्रीची झिंग चढलेल्या मुरलीशेठला कोणी समजावू शकत नव्हता. त्यातून पैसे किती मिळणार किंवा कमाई किती होणार, यापेक्षा पेपर खपला पाहिजे आणि विकला गेला पाहिजे; याचीच या माणसाला भयंकर नशा होती. आणि आरंभीच्या काळात मुंबई चौफ़ेर खपू सुद्धा लागला. पण वृत्तपत्र हा असा धंदा आहे ,की खप वाढतो तसा तोटा वाढत जातो. उत्पादन खर्च आणि विक्रीतुन मिळणारा पैसा यांचे गणित न जमणारे असते. त्यातली दरी जाहिरातीच्या कमाईतून भरून काढावी लागते. पण तेव्हा तरी शिंगोटे नामक नशाबाजाला त्याची फ़िकीर नव्हती. आपणही लाखो खपाचे दैनिक काढले व चालवले. हे दाखवण्याची झिंग त्यांना चढलेली होती. मुंबई चौफ़ेरच्या यशाने ती नशा थोडी कमी होईल, अशी माझी अपेक्षा होती. पण हा माणूस कुठे थांबायला तयार होता? त्यांनी अवघ्या सहा महिन्यात सकाळचे मोठे चार पानी दैनिक काढायचा पवित्रा घेतला. त्याच वर्षी म्हणजे १९९४ च्या विजयादशमीपासून ‘आपला वार्ताहर’ नावाचे दैनिक त्यांनी सुरू केले.

वृत्तपत्र काढणे हे आजवर भांडवलदार किंवा तत्पुर्वी यशस्वी लेखक संपादकांनी केलेले धाडस होते. पण एका विक्रेत्याने वृत्तपत्र काढून यशस्वी करणे, हा खरेच चमत्कार होता. आज त्या माणसाने कुठलीही भांडवली ताकद पाठीशी नसताना सहा दैनिकांचा पसारा उभा केलेला आहे. मराठीप्रमाणेच हिंदी व तामी्ळ व कानडी भाषेतील दैनिकेही त्यांच्या ताफ़्यात आहेत. हे सर्व त्यांनी का करावे? पैसा मिळवण्यासाठी, पैसा कमावून चैन-ऐष करण्यासाठी, असे मी तरी नक्कीच म्हणू शकत नाही. कारण मी त्या माणसाला अठरा वर्षे ओळखतो. जेवढा पैसा मिळवला तो पुन्हा त्याच वृत्तपत्राच्या व्यवसायात त्याने गुंतवला आणि त्याच व्यवसायाचा व्याप वाढवत नेला आहे. पण त्या माणसाची नशा काही आटोक्यात येताना दिसत नाही. मी त्याला भूक म्हणत नाही. ती शिंगोटे नामक मा्णसाची नशाच आहे. जसा नशाबाज माणुस कितीही नशा झाली म्हणुन समाधानी होत नाही, तर पुढले पल्ले गाठायला आसुसलेला असतो, तसाच हा मुरलीशेठ शिंगोटे नामक माणूस वृत्तपत्र नावाच्या व्यसनाने पछाडलेला आहे. कोणाला माझ्या या भाषेचे वा उपमेचे आश्चर्य वाटेल. व्यवसाय किंवा धंद्याला व्यसन का म्हणावे? तर शिंगोटे तसाच झिंग चढलेला माणुस आहे. पण त्याच्या या नशेने किती चांगले काम केले आहे बघा. त्याच्या या नशेने किमान तीनचार हजार लोकांना थेट रोजगार मिळवून दिला आहे. त्याशिवाय त्याच्याशी संबंधीत आणखी काही लोकांना उदरनिर्वाहाचे साधन दिले आहे. या माणसाला अशी नशा नसती किंवा वृत्तपत्र विकण्याची इतकी उत्कट झिंग नसती, तर या लोकांचे कल्याण झाले असते काय?

गेल्या वर्षभरात हे दैनंदिन सदर लिहितांना मला ज्यांचे फ़ोन आले व ज्यांनी माझ्या सडेतोड लिखाणाबद्दल माझे कौतुक केले, त्यांना मी स्पष्टच सांगत आलो, की कौतुक करायचे तर मुरलीशेठ शिंगोटे यांचे करा. कारण मी आयुष्यभर असेच लिहित आलो. पण जेवढे लेखन स्वातंत्र्य किंवा अविष्कार स्वातंत्र्य मी शिंगोटे यांच्या वृत्तपत्रातून उपभोगू शकलो, तेवढे क्वचितच अन्यत्र मला मिळू शकले असेल. आज एकूणच माध्यमांवर भांडवलदारी विळखा घट्ट झाला असताना खर्‍या अर्थाने स्वतंत्र वृत्तीने स्वयंभू पत्रकारिता चालवण्याचे श्रेय एकट्या शिंगोटे यांना द्यावे लागेल. कारण आज स्वयंभू वृत्तपत्रे संपली आहेत आणि खरेच वाचक वा जनतेच्या हिताची जपणूक करणारी पत्रकारिता लयास चालली आहे. अशावेळी भांडवलदारीला शरण न गेलेले माध्यम म्हणुन शिंगोटे हा बुरूज बनून ठामपणे उभा राहिला आहे. त्याचे कारण वृत्तपत्र खपवायची त्याची नशा हेच आहे. या माणसाला वृत्तपत्र खपवण्याची नशा नसती तर आज एवढेही स्व्यंभू वृत्तपत्र शिल्लक राहिले नसते. म्हणुनच मी त्याच्या या नशेचे स्वागत करतो. नशा असावी तर अशी. झिंग जरूर असावी, पण अशी. ज्या नशेने किंवा झिंग असण्याने लोकांचे नुकसान होत नाही तर भलेच होते. शेवटी नशा किंवा झिंग म्हणजे तरी काय असते? जगापेक्षा वेगळे काही करून दाखवण्याची अनिवार इच्छा हीच नशा असते. ज्यातून आपले वेगळेपण दिसेल, असे काही करण्याची ओढ म्हणजे झिंग असते. कर्तृत्व, पुरूषार्थ म्हणुन जगाचे लक्ष वेधले जाण्याची इच्छा म्हणजेच नशा असते. मित्रांनो नशा जरूर करा, पण कर्तृत्व गाजवण्याची नशा असावी, नशा शिंगो्टेसारखी असावी. जी शून्यातून विश्व निर्माण करण्याचा चमत्कार घडवून दाखवते. ( क्रमश:)
भाग ( ३४१ ) ३०/७/१२
द्वारा पोस्ट केलेले bhau torsekar येथे ८:३३ म.उ.

शशिकांत ओक's picture

8 Aug 2020 - 9:29 am | शशिकांत ओक

कर्तृत्व गाजवायची नशा असावी...
तोरसेकरांच्या तोंडचे वाक्य उद्बोधक आहे.

शाम भागवत's picture

7 Aug 2020 - 11:23 pm | शाम भागवत

आणखी हे थोडेसे.
————————

आजकालच्या बहुतांश माध्यमांनी तथाकथित पुरोगामी मुखवटे चढवले असल्याने आणि त्यातूनच खोटेपणा चालला असल्याने, तिथेच त्याविषयी प्रतिवाद शक्यच नाही. किंबहूना मी तसेच लिहीतो वा बोलतो, म्हणून या प्रस्थापित माध्यमातला मी एकमेव बहिष्कृत पत्रकार आहे. सहाजिकच जो कोणी माझी मते व लिखाण छापायला तयार असेल, तिथे मी लिहीतो. मात्र मला जे मांडायचे आहे, त्याबाबतीत मी अजिबात तडजोड करत नाही. म्हणून मग भाऊला बहिष्कृत केला, की त्याच्या भूमिका जगापुढे जाण्याचीच शक्यता संपून जाते. तेवढी सज्जता अशा सेक्युलर लोकांनी केली असल्याने, त्यांना माझ्या लिखाणाची कधी दखल घेण्य़ाची गरज भासली नाही. किंवा त्याचा प्रतिवादही करायचे प्रयोजन उरलेले नव्हते. महाराष्ट्रात जी मराठी माध्यमे आहेत, त्याचाच लाचार असलेल्या वाचकाला मग दुसरी बाजू समजण्याचा धोकाच उरलेला नव्हता. सहाजिकच भाऊने कितीही आटापिटा करून वेगळे मुद्दे उपस्थित केल्याने, कोणा सेक्युलर पत्रकार बुद्धीमंताला त्याची फ़िकीर नव्हती. हे जे कोणी सेक्युलर शहाणे आहेत, त्यांचाच सर्वत्र बोलबाला होता. कारण माध्यमे त्यांच्या कब्जात होती आणि माझ्यापाशी असलेल्या दुर्बळ छपाई साधनांनी हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचणे मलाही अशक्य होते. मग अशा खोटारड्यांनी मारलेल्या थापाच विद्वत्ता म्हणून लोकांच्या गळी मारल्या जात असल्यास नवल नव्हते.

अर्थात हाती पडणारे वर्तमानपत्र किंवा पुस्तकासहीत वाहिन्यांवरील पोपटपंची, लोकांना मान्य होती किंवा पटत होती, असे अजिबात नाही. सामान्य माणुस कितीही अडाणी असला तरी त्याच्यापाशी सारासार बुद्धी असते आणि सूर्याला चंद्र म्हणून त्याच्या गळी मारता येत नाही. म्हणूनच वाचकाच्याही मनात शेकडो शंका होत्या. पण त्याचे उत्तर वा खुलासे त्याला मिळत नव्हते. अशा खोटारडेपणाची लक्तरे मी भले काढत असलो, तरी खेड्यापाड्यापर्यंत, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यापर्यंत जाऊन पोहोचण्याचे कुठलेही साधन माझ्यापाशी नव्हते. पण तशी दुसरी बाजू ऐकायला मिळाली वा कोणी दाखवली, तर सामान्य वाचकाला ती हवीच होती. पण प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रातील अशा ढुढ्ढाचार्यांच्या विरोधात काही छापायची हिंमत कोणी करायची? कुठलाही छोटा संपादक वा व्यावसायिक संपादक तेवढी हिंमत करूच शकत नव्हता. ज्याला एकाचवेळी अशा मठाधीशांच्या मक्तेदारीला आव्हान देऊन त्यांच्यातच नांदायचे आहे, त्याच्यासाठी भाऊच्या बंडखोरीला प्रसिद्धी देणे अशक्यप्राय होते. २००९ च्या सुमारास तशी हिंमत एका माणसाने दाखवली आणि सुदैवाने तो बुद्धीमान संपादक-मालक नव्हता. मात्र वॄत्तपत्र खपले पाहिजे आणि वाचकाने विकत घेतले पहिजे, अशी ज्याची अढळ श्रद्धा आहे, असा तो माणुस होता मुरलीधर शिंगोटे.

दिर्घकाळ अथक मेहनत घेऊन त्यांनी ‘पुण्यनगरी’ हे दैनिक महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात नेलेले होते. पैशाच्या थैल्या व काळापैसा ओतून पुरोगामी थोतांड रद्दीच्या भावात लोकांना विकून लाखोचे खप मिरवणार्‍यांना या एका विक्रेता संपादकाने खरे आव्हान उभे केले. काही कारणास्तव जिथे ‘पुण्यनगरी’ची पहिली आवृत्ती काढली, त्या पुण्यात तिचा जम बसवता आलेला नव्हता. म्हणून त्यांनी माझ्या मदतीची मागणी केली. अर्थात शिंगोटे माझा स्वभाव ओळखून असल्याने त्यांना माझ्या अटी मान्य कराव्या लागल्या. मला हवे ते आणि माझ्या भूमिकेनुसारच मी लिहीणार असल्याचे, त्यांना आधीच बजावून सांगितले होते. त्यांनी ते मान्य केले. पेपर खपला पाहिजे इतकीच त्यांची अट होती. अर्थात त्यांच्या चालू असलेल्या वृत्तपत्राचे कुठलेही स्वरूप मी बदलाणार नव्हतो, की त्यात ढवळाढवळ करणार नव्हतो. माझा दैनंदिन लेख ‘पुण्यनगरी’ छापायचा इतकेच ठरले होते. त्यात कुठला विषय असेल वा कसा मांडलेला असेल, त्याविषयी हस्तक्षेप होणार नव्हता. त्यामुळे मी २००९ सालात पुण्याच्या आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ असे दैनंदिन सदर सुरू केले. माझ्या स्वभाव व भूमिकेनुसार त्यात परखड सडेतोड लिखाण करताना आपोआप प्रस्थापित माध्यमे व नावाजलेल्या संपादकांचे वाभडे मी काढू लागलो.

पहिले काही दिवस पुण्याच्या आवृत्तीत प्रसिद्ध होणारा माझा दैनंदिन लेख हळुहळू ‘पुण्यनगरी’च्या अन्य जिल्हा आवृत्तीमध्येही प्रकाशित होऊ लागला आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळू लागला. त्यात माझा मोबाईल नंबर छापलेला असल्याने प्रतिसाद थेट फ़ोनवरूनच मिळू लागला. पण त्याचे एक खास वैशिष्ट्य होते. ह्या खेड्यापाड्यात पसरलेल्या मराठी वाचकासाठी ‘उलटतपासणी’ हा सुखद धक्का होता. ज्यांच्या विद्वत्तेविषयी वाचकाच्या मनात शेकडो शंका होत्या आणि त्या सेक्युलर खोटेपणावर राग होता, त्याला ‘उलटतपासणी’तून दिलासा मिळू लागला होता. आमच्या मनातले लिहीता, खुपच सडेतोड, अशा प्रतिक्रिया होत्याच. पण हा कोण भाऊ तोरसेकर अकस्मात उपटला आणि सगळ्या संपादकांना थेट भादरू लागला; असा अचंबाही वाचकांच्या प्रतिक्रियेमध्ये होता. मी मागली चार दशके पत्रकार असल्याचे या नव्याने भेटणार्‍या वाचकाला अजिबात नव्हते. आणि असा कोणी अकस्मात भंपक बुद्धीवाद्यांना झोडपू लागल्याचा आनंद त्या वाचकाला लपवता येत नव्हता. बघता बघता ‘पुण्यनगरी’च्या प्रत्येक जिल्हा आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ अपरिहार्य होऊन गेली आणि त्यातून भाऊ तोरसेकरला प्रथमच महाराष्ट्रातला वाचक ओळखू लागला. त्यामुळे प्रथमच मोकाट सेक्युलर माध्यमांच्या भंपकपणा व खोटारडेपणाला जाहिर सवाल केले जाऊ लागले. त्यात जे कोणी वागळे, केतकर वा अन्य संपादक लोकांची दिशाभूल करत होते, त्याला खुलेआम आव्हान मिळत असल्याने वाचक कमालीचा सुखावला होता. मजेची गोष्ट म्हणजे सुखवस्तु व उच्चभ्रू वर्गामध्ये शिंगोटे यांच्या ‘पुण्यनगरी’ दैनिकाला फ़ारशी मान्यता नव्हती. पण ‘उलटतपासणी’ने तसाही वाचक त्याकडे ओढला जाऊ लागला. अगदी काही कॉलेज विद्यार्थीही वाचक म्हणून मला फ़ोन करून बोलायचे. त्यातल्याच काहींनी मला इंटरनेटवर लिहीण्याचा आग्रह अनेकदा केला. पण दोन इंजिनियरींगचे विद्यार्थी कमालीचे हट्टी निघाले. त्यांनी पत्ता घेऊन थेट घरी येऊन मला हे तंत्रच शिकवले.

गेल्या साडेचार दशकात नेहमी शाईच्या पेनने लिहायची सवय आणि तेही एकहाती विषय लिहून पुर्ण करण्याचा स्वभाव. त्यामुळे संगणाकवर टाईप करताना जो संथपणा अनुभवाला येईल, तितक्या गतीने आपण लिहू शकणार नाही, असा माझा विपरीत आत्मविश्वास होता. म्हणून त्या मुलांना मी नकार देत होतो. पण त्यांचा आग्रहही मला तितकाच महत्वाचा वाटला. त्यांचे मत असे होते, की छापलेला लेख स्कॅन करून मित्रांना पाठवायला खुप कटकटी आहेत, उलट इंटरनेटवर ब्लॉग स्वरूपात लेख टाकला तर जगात कुठूनही वाचला जाईल आणि लाखो लोकांना ते वाचायची संधी मिळू शकेल. तेवढेच नाही, ज्याला आवडला, तो आणखी आपल्या मित्रांपर्यंत पुढे पाठवू शकेल. म्हणून थोडे कष्ट व सराव करून मी इंटरनेटचे माध्यम वापरलेच पाहिजे. दोन दिवस त्या मुलांनी ठाण मांडून मला या गोष्टी शिकवल्या. तसा मी संगणक आधीपासून वापरत होतो आणि हाताशी लॅपटॉपही होता. पण मराठीत थेट टाईप करण्याचा विचारही कधी मनाला शिवला नाही. या मुलांनी ब्लॉग व फ़ेसबुकशी ओळख करून दिली आणि बरहा पॅड डाऊनलोड करून सोप्या मराठी टायपींगचे प्रशिक्षण दिले. पुढले सहासात दिवस मोकळा वेळ मिळाला, मग टायपींगचा सराव केला. तोपर्यंत थेट लेख टाईप करायचे धाडस काही मला झाले नाही. कारण जितक्या गतीने डोक्यात विचार चालू असतो, तितक्या गतीने लेखनाचा स्वभाव. चारदोन ओळी वा वाक्ये खरडून कुथत बसणे मला जमत नाही. म्हणूनच वेगाने टाईप करणे साधण्यापर्यंत हातानेच लेख लिहायचे आणि सहासात तास अखंड टायपींगचा सराव करत राहिलो. पंधरा दिवसांनी मला नेहमीच्या दीडपट वेळात लेख लिहू शकतो, असा आत्मविश्वास आला. तोपर्यंत त्या मुलांनी सुचवले तसे चारसात ओळींचे-वाक्यांचे काहीबाही लिहून फ़ेसबुकवर टाकत होतो. मात्र ब्लॉग म्हणजे संपुर्ण लांबीचा लेख लिहून ब्लॉग चालवणे शक्य झालेले नव्हते. रोजचे लेखनाचे काम संपले, मग हा सराव चालू राहिला. त्यानंतरच ‘पुण्यनगरी’ची उलटतपासणी व अन्य वृत्तपत्रिय लिखाणासाठी टायपींग सुरू केले. एकदा ते साधले, तेव्हाच ‘उलटतपासणी’ हा ब्लॉग रितसर सुरू झाला. २०१२ च्या पुर्वार्धात फ़ेब्रुवारी अखेरीस ‘पुण्यनगरी’चा लेख ‘उलटतपासणी’ या ब्लॉगवर नित्यनेमाने टाकू लागलो. फ़ेसबुकमार्फ़त त्याचा प्रसारही सुरू झाला. एका बाजूला फ़ेसबुक मित्रयादी वाढत होती आणि त्यावर लेखाचा दुवा टाकल्याने ब्लॉगची लोकप्रियता वाढत गेली. (क्रमश:)

Posted by bhau torsekar at 8:41 AM

यातून काॅपी पेस्ट
Sunday, September 27, 2015
कोण कुठला भाऊ तोरसेकर? (पुर्वार्ध)

आमच्याकडे पेपर म्हटले की नवाकाळ असा तो काळ होता. पेपर स्टॉलवर गेलो की एक रुपया पुढे करुन "एक नवाकाळ द्या" म्हणणे सवयीचे झाले होते. मटा आणि लोकसत्ता लोकांच्या गावीही नसायचे. आणि एक दिवस स्टॉलवर "वार्ताहर" नावाचा एक नवाच पेपर दिसू लागला. कागदाचा दर्जा नवाकाळच्या तुलनेत एकदम सो सो होता. तरीही लोक तो पेपर चाळू लागले, नवाकाळपेक्षा काहीतरी वेगळेपणा जाणवत होता. आणि हळूहळू नवाकाळची जागा वार्ताहरने घेतली.

पुढे रत्नागिरी टाईम्स आणि त्याची रायगड आवृत्ती रायगड टाईम्स स्टॉलवर लागेपर्यंत वार्ताहर अखंड वाचत होतो. रायगड टाईम्स आला आणि वार्ताहरचे वाचन बंद झाले.

मित्रांनो,
वरील धाग्यातील भाऊ तोरसेकरांचे प्रवचन असलेली लिंक कोणी बहुतेक उघडून पाहिलेली दिसत नाही! कारण मी आज सहज उघडली तर भलताच पुर्वीचा माझ्या लेखनाचा धागा उघडला!
'काय होतास तू काय झालास तू!'
असो.
आपणापैकी कोणी तोरसेकरांची ती क्लिप पाहिली नसेल तर मग ती सादर करेन.