कालबाह्य बी.बी.रॉय आणि त्याची बायको!
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. म्हणजे जेव्हा आम्ही अकरावीला इलेक्ट्रोनिक्स शाखेत प्रवेश घेतला तेव्हाची. तीस वर्षे होऊन गेली . अख्ख्या होल पश्चिम महाराष्ट्रात दोनच ठिकाणी अकरावीला इलेक्ट्रोनिक्स सुरु झालं होतं. इलेक्ट्रोनिक्स म्हणजे काय ते कुणालाच माहीत नव्हतं पण काय तरी हुच्च आहे इतकंच कळत होतं. मग काय, मिळतोय प्रवेश म्हटल्यावर घेऊन टाकला!
अगदी सुरुवातीला एक आठवडा भौतिक शास्त्राची उजळणी झाली अन मग मुख्य विषय सुरु झाला. सुरुवातीलाच काम्पोनंटस ची ओळख वगैरे झाली. मग सरांनी शिकवले रेझिस्टन्स (रोधक) आणि त्याचे कलर कोड्स! हा भाग फारच मनोरंजक होता. आधी रंग ओळीने लिहायला सांगत.