वसाहत ते महाबलाढ्य राष्ट्र - २

श्रीरंग_जोशी's picture
श्रीरंग_जोशी in जनातलं, मनातलं
21 Sep 2012 - 10:59 am

यापूर्वीचा भाग -

नोव्हेंबर १६२० - जॉन रॉल्फच्या आगमनाच्या १० वर्षांनंतर जेम्सटाउनच्या उत्तरेला स्थलांतरीतांचा एक नवा गट दाखल झाला. हे ठिकाण जेम्सटाउन वसाहतीपासून ४५० मैल उत्तरेला होते. या लोकांचा प्रवास इंग्लंडमधील प्लिमथ बंदरातून सुरू झाला असल्याने त्यांनी या जागेलाही प्लिमथ नाव दिले. जेम्सटाउनच्या रहिवाशांपेक्षा हे लोक बरेच वेगळे होते. ते वृत्तीने फार धार्मिक होते परंतु इंग्लंडमधील तत्कालीन धार्मिक व्यवस्थेमध्ये ते समाधानी नव्हते. या प्रवासासाठी त्यांनी वापरलेल्या जहाजाचे नाव होते मेफ्लॉवर.अटलांटिक महासागर पार करून नव्या भूमीकडे मार्गक्रमण करण्यामागची मूळ प्रेरणा म्हणजे इंग्लंडमधील जाचक धार्मिक बंधनांपासून मुक्ती मिळवणे. यामुळेच या लोकांना पिल्ग्रिम्स असे संबोधले जाते. त्यांच्यापैकी एक - २४ वर्षीय एडवर्ड विन्स्लो. एडवर्ड व्यवसायाने एक प्रशिक्षणार्थी लेखनिक होता जो धार्मिक लेखन करीत असे. ऐन हिवाळ्यात समुद्रकिनाऱ्याजवळील जागेत नव्या वसाहतीच्या उभारणीचे काम सुरू झाले. थंडीचे दिवस असल्याने मुक्कामासाठी जहाजाचाच वापर केला जात होता. नव्या रहिवाशांच्या दुर्दैवाने त्यांचे आगमन त्या काळातल्या एका खरतड अश्या हिवाळ्यात झाले. सुरुवातीच्या काळात जरी मेफ्लॉवर जहाजावर मुक्कामाची सोय होती तरी मुळातर हे जहाज आकारमानाने लहान होते व त्यावरील सोयी सुविधाही अपुऱ्याच होत्या. नव्या रहिवाशांपैकी व जहाजांवरील खलाशांपैकी अनेक लोक रोगग्रस्त झाले व त्यापैकी बरेच मृत्युमुखी पडले.

प्लिमथ, इंग्लंड येथून निघताना मेफ्लॉवर जहाज

प्लिमथ, इंग्लंड येथून निघताना मेफ्लॉवर जहाज

मेफ्लॉवर जहाज अटलांटिक महासागरात

एप्रिल १६२१ मध्ये नव्या रहिवाशांना वसाहतीवर सोडून मेफ्लॉवर जहाज इंग्लंडला परतले. त्यावेळी वसाहतीच्या उभारणीचे काम पूर्ण व्हायचे होते. स्थलांतरीतांची एकूण १९ कुटुंबे व पाळीव प्राणी ज्यांत शेळ्या, कोंबड्या व कुत्र्यांचा समावेश होता. त्यांच्याजवळील इतर साधन सामग्री म्हणजे चरखे, खुर्च्या, धार्मिक ग्रंथ, बंदुका इत्यादी.वसाहत उभारून झाल्यावर व हिवाळ्याचा जोर ओसरल्यावर नव्या रहिवाशांनी तेथील जमिनीवर लागवड करणे सुरू केले. पण त्यांच्या दुर्दैवाने समुद्रकिनाऱ्याशेजारील जमीन लागवडीसाठी अजिबातच उपयुक्त नव्हती. प्रतिकूल परिस्थितीमुळे पुढच्या काही महिन्यांत आणखी बरेच रहिवासी दगावले. विल्यम ब्रॅडफर्ड हा वसाहतीचा प्रमुख होता. एक वेळ तर अशी आली की अंगमेहनतीची कामे करण्यायोग्य केवळ ६ रहिवासी होते. मरण पावणाऱ्यांना पुरणे हि आणखी एक नित्यनेमाने करावी लागणारी कामगिरी होती.एडवर्ड विन्स्लोची पत्नी देखील मरण पावणाऱ्यांपैकी एक होती. काही महिन्यांनी एडवर्डने वसाहतीतील सुझाना व्हाईट या विधवेशी विवाह केला. तिचा पतीही वसाहतीवरच दगावला होता. भविष्यात या दांपत्याला ५ मुले झाली. आजच्या काळातील जवळ जवळ १०% अमेरिकन्सच्या वंशावळीची श्रूंखला मेफ्लॉवर जहाजावरून आलेल्या रहिवाशांपर्यंत पोचते.
एडवर्ड विन्स्लोएडवर्ड विन्स्लोया भागात पोचणारे मेफ्लॉवर हे पहिलेच जहाज नव्हते. ५ वर्षांअगोदर एका दुसऱ्या जहाजाद्वारे काही युरोपियन लोक तेथे पोचले होते ज्यापैकी बहुतांश प्लेगने पीडित होते. अन त्या लोकांमुळेच तेथील स्थानिक नेटिव्ह्जनांही प्लेगची बाधा होवून असंख्य लोक मृत्युमुखी पडले. वाचलेले नेटिव्हज किनारपट्टीचा प्रदेश सोडून अंतर्गत भागात निघून गेले. हे स्थानिक लोक Pokanoket जमातीचे होते. प्लिमथ वसाहतीची उभारणी झाल्यावर ते पुन्हा या भूभागाकडे परत आले व नव्या रहिवाशांशी त्यांची गाठ पडली.नव्या रहिवाशांच्या सुदैवाने हे स्थानिक लोक आक्रमक नव्हते. त्यामुळे त्यांच्यात मैत्री निर्माण होवून नव्या रहिवाशांना बरीच मदत होते. जसे तेथील जमिनीमध्ये लागवड करण्याच्या परिणामकारक पद्धती त्यांना कळल्या. उदा. मासळीचा वापर खत म्हणून करणे.पण या स्थानिकांना या मदतीच्या बदल्यात काही वेगळेच हवे होतो. प्रतिस्पर्धी जमातीच्या टोळ्यांचा काटा काढण्यासाठी त्यांना नव्या रहिवाशांची मदत हवी होती. अन त्यामागचे कारण म्हणजे रहिवाशांकडे असलेल्या बंदुका. पारंपरिक शस्त्रे वापरून दोन्ही बाजूंचे नुकसान होत असे त्यांमुळे बंदुकांच्या जोरावर त्यांना आपले पारडे जड करायचे होते.धार्मिक पगडा असलेल्या या रहिवाशांना लढाई वगैरेचा फारसा अनुभव नव्हता. शिकारीसाठी व स्वसंरक्षणासाठी ते बंदुका ठेवत. पण नव्या भूमीवर जम बसवायचा असेल तर अश्या तडजोडी करणे ओघाने आलेच. १४ ऑगस्ट १६२१ च्या मध्यरात्री प्रतिस्पर्धी जमातीच्या वसाहतीवर अचानक हल्ला केला गेला. बंदुकीच्या गोळ्यांनी प्रथमच आघात झाल्याने त्या जमातीच्या लोकांना काही कळलेच नाही की हा नेमका काय प्रकार आहे?त्यामुळे या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नव्हते. त्यामुळे काही मेले व इतर जीव वाचवून पळून गेले. अन त्या भूभागात पिल्ग्रिम्स व Pokanoket यांच्या युतीच्या वर्चस्वाला आव्हान देणारे कुणीच उरले नाही. या मैत्रीचा दोन्ही बाजूंना बराच लाभ झाला पण दीर्घकालीन लाभ मात्र नव्या रहिवाशांचाच झाला.

प्लिमथ वसाहतीचा नकाशा नकाशात पिवळ्या रंगाने दर्शविलेला भूभाग म्हणजे तत्कालीन प्लिमथ वसाहत. उत्तरेला आजचे बोस्टन शहर आहे.

१६२१ च्या हिवाळ्याच्या सुरुवातीला हे यश साजरे करण्यासाठी एका मेजवानीचे आयोजन करण्यात आले ज्यातून थँक्सगिव्हिंगच्या परंपरेची सुरुवात झाली जी आजतागायत थँक्सगिव्हिंग डे (नोव्हेंबर महिन्यातील चौथा गुरुवार) सुरू आहे.

पिल्ग्रिम्संनी Pokanoket ना दिलेली मेजवानीपिल्ग्रिम्संनी Pokanoket ना दिलेली मेजवानी. उजव्या कोपऱ्यात एडवर्ड विन्स्लो

या स्थिर व भयमुक्त वातावरणामुळे उत्तर अमेरिकेमध्ये समृद्धीचे नवे पर्व सुरू झाले. जेम्सटाउन व प्लिमथ हि या समृद्धीची केंद्रे होती. या समृद्धीच्या वार्ता युरोपात पोचून नव्या स्थलांतरीतांचा ओघ अमेरिकेकडे सुरू झाला. स्थलांतर करणाऱ्या प्रत्येकाची वैयक्तिक कारणे वेगळी असली तरी अमेरिकन भूमीवर असलेल्या प्रगतीच्या संधी हे त्यामागे असलेले सर्वात मोठे आकर्षण.काहीच वर्षात प्लिमथ व जेम्सटाउन सारख्या ११ नव्या वसाहती अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर स्थापन झाल्या. जेम्सटाउन कडून दक्षिणेकडे शेतीव्यवसाय जोमाने पसरत गेला. इंग्रजांखेरीज आयरिश, जर्मन स्वीडिश लोकही मोठ्या संख्येने दिसू लागले. या सर्वांखेरीज डच स्थलांतरीतांनी अमेरिकन भूमीवर व्यापाराला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांचे केंद्र होते हडसन नदीच्या मुखाजवळील बेट ज्याला आज सर्व जग न्यूयॉर्क या नावाने ओळखते.वर्षामागून वर्षे गेली अन प्रगतीची नवी दारे उघडत गेली. अमेरिकन भूमीवरील नैसर्गिक संसाधने व तेथे नव्याने बनत असलेले मोकळे सामाजिक वातावरण यांसारख्या घटकांमुळे स्थलांतरीतांची आर्थिक व वैयक्तिक प्रगती होऊ लागली. युरोपात राहणाऱ्या त्यांच्या भाऊबंदांपेक्षा त्यांचे जीवनमान मोठे होऊ लागले व शारीरिक तंदुरुस्तीच्या बाबतीतही बरीच प्रगती होऊ लागली. सुरुवातीच्या काळात हे लोक आपली युरोपियन ओळख सांगत पण प्रत्येक पिढीगणिक ती ओळख मागे पडू लागली व अमेरिकन अस्मिता जन्म घेऊ लागली.अवांतर -

  • इंग्लिश स्थलांतरितांच्या मोठ्या संख्येमुळे व नव्या भूमीवर जम बसविण्यात त्यांनी मिळवलेल्या यशामूळे अमेरिकेच्या इशान्य भागातील सहा राज्यांच्या समुहाला न्यू इंग्लंड म्हणून ओळखले जाते.
  • एकूण १३ वसाहती त्या काळात स्थापन झाल्या. अमेरिकेच्या राष्ट्रध्वजावरील १३ आडव्या पट्ट्या हे या १३ वसाहतींचे प्रतिक आहे. तसेच कोपऱ्यातल्या चौकोनातील ५० तारे हे ५० राज्यांचे प्रतिक आहेत.

सर्व चित्रे जालावरून साभार.स्रोत - हिस्टरी वाहिनीवरील 'अमेरिका - द स्टोरी ऑफ अस' मालिका, विकिपीडिया व जालावर उपलब्ध असलेली माहिती.क्रमशः

भूगोललेखभाषांतर

प्रतिक्रिया

इरसाल's picture

21 Sep 2012 - 11:10 am | इरसाल

माहितीत योग्य ती भर पडत आहे.

अक्षया's picture

21 Sep 2012 - 11:44 am | अक्षया

हा भाग सुद्धा छान! माहितीपुर्ण आहे.. :)

मन१'s picture

21 Sep 2012 - 12:06 pm | मन१

सुरेख सुंदर मांडणी.
नवा विषय.
लेख आवडला.

स्वप्निल घायाळ's picture

21 Sep 2012 - 12:13 pm | स्वप्निल घायाळ

मस्त लेख आहे !! बरीच नवीन माहीती कळली..

प्रचेतस's picture

21 Sep 2012 - 12:33 pm | प्रचेतस

छान लिहिताय श्रीरंगराव.
माहिती आवडली.

मी_आहे_ना's picture

21 Sep 2012 - 2:43 pm | मी_आहे_ना

जोशीबुवा, हा भागही छान, पु.भा.प्र.
(ते ५० तार्‍यांचे माहिती होते, पण १३ आडव्या पट्ट्यांबद्दल हे वाचूनच कळले, धन्यवाद)

तिमा's picture

21 Sep 2012 - 3:20 pm | तिमा

असेच म्हणतो, त्या तेरा आडव्या पट्ट्यांबद्दल माहित नव्हते. छान होतीये लेखमाला, बुकमार्क करण्यासारखी.

मोहनराव's picture

21 Sep 2012 - 4:01 pm | मोहनराव

मस्त लेखमाला.

जयनीत's picture

21 Sep 2012 - 7:59 pm | जयनीत

नियमीत पणे येउ द्या. नक्कीच वाचणार.

फारएन्ड's picture

22 Sep 2012 - 1:24 am | फारएन्ड

हा ही भाग आवडला

पैसा's picture

23 Sep 2012 - 10:53 pm | पैसा

पुढचा भाग कधी?

बापू मामा's picture

25 Sep 2012 - 10:46 pm | बापू मामा

मांडणी एकदम रोचक

श्रीरंग_जोशी's picture

26 Sep 2012 - 1:59 am | श्रीरंग_जोशी

सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

गेले काही दिवस गणेशोत्सवात व्यग्र होतो त्यामुळे जरा वेळ लागतोय पण लौकरच पुढचा भाग प्रकाशित करण्याचा प्रयत्न करेन.

स्पा's picture

27 Sep 2012 - 3:31 pm | स्पा

मस्त लिहीतोयेस रे