बलबन का मकबरा
क़ुतुब मीनारपासून थोड्याच अंतरावर महरौली Archeological Park आहे. तिथे आडवाटेला , काटेरी झुडपांत अनेक भग्नावशेष विखुरलेले दिसतात. आपण त्यातून मार्ग काढत पुढे जावे.एका मकबर्याचे भग्नावशेष दिसतील. खचलेल्या भिंती दिसतील. भिंती कसल्या! दगडमातीचा निव्वळ रचलेला थर ! त्यावर दिलेला मुलामा पार उडालाय. कधीकाळी भिंतींना मुलामा दिलेला होता, त्यावर नक्षीकाम होते ह्याची साक्ष देणारा एक छोटासा तुकडा तेवढा एका भिंतीवर दिसेल. छत कधीचेच उडालेय. या चार भिंतींच्या आत, आकाशाच्या छताखाली , लाल वालुकाश्मात बांधलेली एक कबर दिसेल. कबरीचे काही दगड गायब झाले आहेत, काही मोडकळीस आलेले आहेत.