अंधार क्षण - जेम्स ईगल्टन
तलसा, ओक्लाहोमा. मी माझ्या मोटेलमध्ये आलो आणि त्याच वेळी रेल्वे एंजिनाचा आवाज ऐकला. अगदी अमेरिकन आवाज. असंख्य हाॅलिवूड चित्रपटांमध्ये ऐकलेला. लोकांच्या सवयीचा. पण मला मात्र त्या आवाजाने अस्वस्थ केलं. तलसाला येण्याआधी मी जपानच्या जवळ असलेल्या ओकिनावा बेटावर चित्रीकरण केलं होतं. ओक्लाहोमामधले अनेक तरूण ओकिनावाच्या लढाईत जपान्यांशी लढले होते. जेम्स ईगल्टन, ज्याची मी पुढच्या दिवशी मुलाखत घेणार होतो, त्यांच्यातलाच एक. तलसा आणि ओकिनावा ही अगदी दोन ग्रहांवरची वाटावीत इतकी परस्परविरोधी ठिकाणं होती.
दुस-या दिवशी मी जेम्स ईगल्टनला जेव्हा भेटलो तेव्हा तो एखाद्या व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी वकिलासारखा दिसत होता आणि त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नव्हतं कारण प्रत्यक्षात तो एक वकीलच होता, तोही खानदानी. त्याच्या कुटुंबातील त्याच्या आधीच्या चार पिढ्यांमधले पुरूष आणि त्याचे स्वतःचे ३ मुलगे - हे सगळे वकील होते. त्याचे आजोबा १९व्या शतकाच्या शेवटी तलसामध्ये आले होते. तेव्हा ते एक लाकडी घरं आणि कच्चे रस्ते असणारं खेडं होतं. पुढे २० व्या शतकाच्या सुरूवातीला ओक्लाहोमामध्ये तेल सापडलं आणि या भागाची भरभराट सुरू झाली. जेम्स ईगल्टनचे आजोबा या सगळ्या परगण्याचे न्यायाधीश होते.
असं चाकोरीबध्द आयुष्य चाललेलं असताना अचानक जेम्सच्या आयुष्यात एक वादळ आलं. दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं पण अमेरिकन जनतेसाठी ते युरोपियन देशांचं आपापसातलं युद्ध होतं. जेव्हा जपानने पर्ल हार्बरवर बाँबहल्ला करुन अमेरिकेला युद्धात खेचलं तेव्हा मात्र अमेरिकन जनतेचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. अनेक अमेरिकन तरुण देशासाठी काहीतरी करण्याच्या इच्छेने सैन्यात भरती झाले. जेम्स ईगल्टनसाठी याचा अर्थ होता जपान्यांशी लढाई.
त्याने शाळेत असतानाच यू.एस. मरीन्समध्ये भरती व्हायचं ठरवलं होतं. मरीन्स या विशेष संरक्षण दलाला अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाएवढी जुनी परंपरा आहे. जेम्स शाळेत असताना कुस्तीमध्ये निपुण होता. आपली रग मरीन्ससारख्या सैन्यदलातच जिरु शकेल असं त्याला वाटलं. त्याने आमच्या मुलाखतीदरम्यान मला स्वतःचा एक फोटो दाखवला. कमरेपर्यंत उघडा, बलदंड, पिळदार स्नायू, डोक्यावर भरपूर केस आणि चेह-यावर एक उर्मट तरीही लोभस असं स्मितहास्य. माझ्यासमोर बसलेला, टक्कल पडलेला, काहीसा स्थूल असा वृद्ध माणूस आणि हा फोटोमधला, नजरेनं जगाला आव्हान देणारा तरुण हे दोघं एकच आहेत हे अविश्वसनीय वाटत होतं.
आपल्या कणखरपणाबद्दल जेम्सची इतकी खात्री होती की त्याने मरीन्सच्या रेडर्स नावाच्या युनिटमध्ये भरती होण्यासाठी अर्ज केला. रेडर्स हे ब्रिटिशांच्या एस्.ए.एस्. किंवा स्पेशल एअर सर्व्हिससारखे कमांडो होते आणि आपल्या कठोर प्रशिक्षणाबद्दल विख्यात असलेल्या मरीन्समध्ये त्यांचं प्रशिक्षण हे सर्वात कठीण होतं. प्रशांत महासागरातील न्यू कॅलिडोनिया या बेटावर हे प्रशिक्षण जेम्सने पूर्ण केलं आणि तो युद्धात उतरण्यासाठी तयार झाला. या प्रशिक्षणादरम्यान त्याने आपल्या शत्रूबद्दल एक विचार मनात पक्का केला होता आणि तो म्हणजे ' जपानी लोक हे अमानुष आहेत.' त्याने पुढे जो काही काळ महायुद्धाच्या प्रशांत महासागराच्या आघाडीवर काढला, तो पूर्ण काळ हा विचार त्याच्या मनात कायम होता आणि त्याच्या युद्धातल्या सगळ्या वर्तणुकीवर या विचाराचा पगडा होता.
जर्मन सैनिक रशियनांना कमअस्सल समजत असत. तसं त्यांच्या मनावर सतत बिंबवलं जात असे. जपानी सैनिकांवरही ' चिनी लोक हे कुत्र्यापेक्षाही खालच्या दर्जाचे आहेत ' अशा प्रचाराचा भडिमार होत असे. अमेरिकन सैनिकांच्या मनातही जपान्यांची अशीच प्रतिमा बनवली गेली होती. अमेरिकन नियतकालिके तर जपान्यांना बारीक डोळे असलेली माकडं याच रुपात दाखवत असत. त्यामुळे सैनिकांची विचारसरणी अशी झाली होती की आपला शत्रू हा कोणत्याही प्रकारे दयामाया दाखवण्याच्या लायकीचाच नाही.
पण जपान्यांच्या लायकीबद्दल ईगल्टन आणि त्याच्या सहका-यांचं काहीही मत असलं तरी ते किती कडवे आणि झुंजार योद्धे आहेत ते समजायला त्यांना वेळ लागला नाही.
एप्रिल १९४५. युरोपमधलं युद्ध जवळजवळ संपण्याच्या बेतात होतं आणि प्रशांत महासागरातील युद्धही आटपत आलं होतं. जर्मनी आणि जपान यांचा पराभव निश्चित होता. फक्त ' कधी ' हाच प्रश्न होता. त्या वेळी ईगल्टन आणि त्याचे रेडर्स युनिटमधले सहकारी ओकिनावा नावाच्या बेटावर जपानी सैनिकांशी लढत होते. ओकिनावाच्या या लढाईचा संपूर्ण महायुद्धातल्या अत्यंत अटीतटीच्या आणि उग्र लढायांमध्ये समावेश होतो. मरीन्स जेव्हा बेटावर उतरले, तेव्हा कुठल्याही प्रकारचा प्रतिकाराला त्यांना तोंड द्यावं लागलं नाही. किना-यावर एकही जपानी सैनिक दिसला नाही. त्यांना त्यावेळी असं वाटलं की जपान्यांनी ह्या बेटावरुन पलायन केलं आहे आणि दुस-या कुठल्यातरी जवळच्या बेटावर आसरा घेतलेला आहे. " आम्हाला आश्चर्य वाटलं की तोफा, बाँब, पिस्तुलं, मशीनगन - कशाचाही मारा आमच्यावर झाला नाही. फारच बरं वाटलं तेव्हा आम्हाला! " पण अमेरिकनांना हे कळायला वेळ लागला नाही की जपानी सैनिक बेटावरुन पळून गेलेले नाहीत तर त्यांनी आपली लढाईची पद्धत बदललेली आहे. किना-याऐवजी ते बेटावरच्या घनदाट जंगलात लपून बसले होते. त्यांनी अगदी काळजीपूर्वक जंगलातल्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करुन आपली प्रतिकार रेषा तयार केली होती आणि ते अमेरिकनांची वाट पाहात होते. जेव्हा अमेरिकन सैनिक त्यांच्या टप्प्यात आले, तेव्हा त्यांनी आग बरसवायला सुरुवात केली.
ही धुमश्चक्री एवढी तीव्र होती की त्याचा सैनिकांच्या मनोधैर्यावर परिणाम व्हायला लागला. त्यांना युद्धाचा मानसिक थकवा यायला सुरूवात झाली. ईगल्टनने त्या संदर्भात एक घटना सांगितली. ८ मरीन्सना रात्रीच्या अंधारात एक टेहळणी ठाणं उभारायचं होतं. हे ठाणं युनिटच्या प्रत्यक्ष ठिकाणापासून १०० मीटर दूर असणार होतं आणि रात्रीच्या वेळी जर जपानी हल्ला झाला तर त्याची पूर्वसूचना युनिटला मिळावी हा त्याचा हेतू होता. " त्या रात्री कुठलाही गोळीबार वगैरे झाला नाही. पण त्या ८ जणांवर एवढं दडपण आलं की त्यातल्या ७ जणांना मानसिक थकवा जाणवायला लागला. ते जवळजवळ दोन दिवस फक्त रडत होते. मरीन्समध्ये येताना घेतलेल्या सगळ्या कठोर प्रशिक्षणाचा त्यांना त्या दोन दिवसांसाठी विसर पडला होता. ज्याला हा त्रास झाला नाही तो याआधी न्यूयॉर्कमधे एका डेअरीत काम करत होता आणि शुद्ध रेम्याडोक्या होता. आपण कशासाठी इथे आलोय आणि काय करतोय हेच त्याला माहीत नव्हतं. कदाचित म्हणूनच त्याला काही त्रास झाला नाही. "
त्याला स्वत:लाही या मानसिक थकव्याचा त्रास झाला. " मला दृष्टीभ्रम व्हायला लागला. अस्तित्वात नसलेल्या गोष्टी दिसायला लागल्या. एकदा मला जपानी सैनिक आमच्यावर चालून येताना दिसले. पण प्रत्यक्षात कोणीच नव्हतं. पण मला त्यांचे चेहरे स्पष्टपणे दिसत होते. त्याआधी किंवा नंतर मला असा अनुभव कधीच नाही आला. इतर तुकड्यांना ज्या प्रमाणात विश्रांती दिली जायची, तेवढ्या प्रमाणात आम्हाला मिळाली नव्हती. त्यामुळेच आमच्या युनिटमध्ये असा मानसिक थकवा येण्याचं प्रमाण इतरांपेक्षा जास्त होतं. "
मला या वेळी आश्चर्य वाटलं कारण जेव्हा जेम्स ईगल्टन लढाईच्या तीव्रतेबद्दल बोलत होता तेव्हा एकाच वेळी तो जपान्यांना कडवे योद्धे समजत होता आणि अमानुषही. त्याने सांगितलेल्या एका प्रसंगावरून तर मला वाटलं की त्याला त्याच्या शत्रूविषयी चक्क आदर वाटत होता. ग्वाम बेटावरील लढाईत त्याने एका जपानी अधिका-याला एकट्याने २००-३०० मरीन्सवर चालून जाताना पाहिलं. कोणाच्या ध्यानीमनीही नसताना हा अधिकारी पूर्ण लष्करी गणवेषात एका गुहेतून हातात एक नंगी सामुराई तलवार घेऊन धावत आला आणि मरीन्सच्या गोळ्यांनी शरीराची चाळण होऊन मरण्याआधी त्याने जवळजवळ ७ सैनिकांना जखमी केलं. त्यातले ३ तर अत्यंत गंभीररीत्या जखमी झाले. नंतर जेव्हा अमेरिकनांनी त्याची मृत्यूनंतरची तपासणी केली तेव्हा त्यांना समजलं की तो आधीच खूप जखमी होता आणि तसाही रक्तस्त्राव होऊन मरण पावलाच असता. तशा परिस्थितीतही आपला देश आणि सम्राट यांच्यासाठी शत्रूवर हल्ला करण्याची हिंमत त्याच्यात होती.
ईगल्टनच्या मते अशी हिंमत हा एकप्रकारे जपान्यांच्या अमानुषतेचा पुरावा होता. म्हणजे त्याच्या मते त्यांचा सगळा कडवेपणा, कट्टरपणा, मृत्यूला तुच्छ लेखणं, शरणागतीऐवजी मरण पत्करणं ह्या सगळ्यांमागे एकच कारण होतं आणि ते म्हणजे जपानी अमानुष होते. पण जर त्यांनी सहजगत्या शरणागती पत्करली असती किंवा भित्रेपणा दाखवला असता, तरीही ईगल्टनसारख्या लोकांसाठी तो अमानुषतेचाच पुरावा ठरला असता.
एकदा जपान्यांना अमानुष म्हटल्यावर त्यांना मारणं हा मरीन्ससाठी युद्धाऐवजी शिकारीचा अनुभव होता. कदाचित त्यामुळेच बहुसंख्य मरीन्स मेलेल्या जपानी सैनिकांची एखादी वस्तू अमेरिकेला घेऊन जात. ईगल्टनच्या घराच्या भिंतीवर एक फाटलेला जपानी झेंडा फ्रेममध्ये लावलेला होता. अनेक अमेरिकन सैनिकांनी मेलेल्या जपानी सैनिकांचे सोन्याचे दात उपटून अमेरिकेत आणलेलंही मी पाहिलं आहे.
जिवंत जपानी सैनिकांशीही मरीन्स अशाच प्रकारे वागले. " आम्ही एकाही जपानी सैनिकाला युध्दकैदी म्हणून घेतलं नाही, " ईगल्टन मला शांतपणे म्हणाला, " कारण आम्ही त्यांना जिवंतच ठेवलं नाही. मी इतर कुठल्याही युनिटमध्ये युध्दकैदी पाहिलेच नाहीत. एकदा ३०-४० जपानी सैनिकांचा एक गट आम्हाला शरण आला होता. आम्ही त्याच क्षणी सगळ्यांना गोळ्या घातल्या. "
शरणागती पत्करणा-या शत्रुसैनिकांना ठार न मारणं हा आंतरराष्ट्रीय संकेत असला तरी मरीन्सनी त्याचं सर्रास उल्लंघन केलं.
माझ्यासमोर बसून शांतपणे माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणा-या जेम्स ईगल्टनला हे अर्थातच माहीत होतं पण त्याने मला मरीन्सनी असं करण्याची दोन कारणं सांगितली. पहिलं कारण सूड. " जपान्यांनीही अमेरिकन सैनिकांना ठार मारलंच की! उलट आम्ही त्यांच्या सैनिकांना सरळ ठार मारायचो पण त्यांनी मात्र आमच्या सैनिकांवर अत्याचार करूनच त्यांना ठार मारलं. त्याचा सूड घेणं आवश्यकच होतं."
दुसरं कारण म्हणजे, " याआधी बरेच वेळा असं झालं होतं की जपानी सैनिक शरण आले आणि अचानक त्यांनी आमच्या सैनिकांच्या जवळ जाऊन आपल्या कपड्यांमध्ये लपवलेल्या बाँबचा स्फोट घडवून आणला आणि स्वतःबरोबर आमच्या सैनिकांनाही ठार मारलं. माझा एक वरिष्ठ होता लेफ्टनंट जेम्स नावाचा. तो तर जपान्यांसाठी भामटे याशिवाय दुसरा शब्दच वापरायचा नाही. त्यानेच आम्हाला सांगितलं होतं की या हलकट लोकांना तुमच्या जवळ येऊ देऊ नका. यांचा काहीही भरोसा नाही! "
" जेव्हा तू स्वतः अशा शरण आलेल्या जपानी सैनिकांना गोळ्या घातल्यास, तेव्हा तुझ्या मनात नेमके काय विचार होते? " मी विचारलं.
" आम्ही फक्त स्वतःचं रक्षण करत होतो. "
" पण हे सर्व सैनिक नि:शस्त्र असायचे, बरोबर?"
"हो! "
मला त्याक्षणी जाणवलं की मी ज्या जर्मन सैनिकांच्या मुलाखती घेतल्या होत्या त्यांचे रशियनांबद्दलचे विचार आणि कृती अगदी असेच होते. हे सैनिक पूर्व आघाडीवर लढले होते आणि त्यांना निव्वळ सोविएत सैन्यच नाही तर प्रतिकारकांशीही लढावं लागलं होतं. या प्रतिकारकांमध्ये स्त्रियांचाही समावेश असे. दोन-तीन वेळा अशा प्रतिकारक स्त्रियांनी पकडलं गेल्यावर आपल्या स्कर्टमध्ये लपवलेल्या बाँबचा स्फोट घडवून आपले स्वत:चे आणि जर्मन सैनिकांचे प्राण घेतले होते. ह्या घटनांचा वापर जर्मन सैन्याने रशियन स्त्रिया आणि मुलं यांच्या बेछूट कत्तलीचं समर्थन म्हणून केला.
" रशियन मुलं पण धोकादायक होती. एखाद्याने आपल्या कपड्यांमध्ये बाँब किंवा इतर स्फोटकं लपवलेली असल्याची पुरेपूर शक्यता होती. तो धोका पत्करण्याऐवजी त्यांना गोळ्या घातलेल्या परवडल्या! " असं एका जर्मन सैनिकाने मला सांगितलं होतं.
जेम्स ईगल्टनने सांगितलेल्या एका प्रसंगामुळे मला हे समजलं की शरण आलेले सैनिक दगाफटका करू शकतात म्हणून त्यांना मारण्याचं समर्थन हा एक बनाव होता. खरी गोष्ट ही होती की हे युध्दकैदी घ्यायचेच नाहीत हे त्यांच्या युनिटचं धोरण होतं. ईगल्टनच्या सहका-यांच्या हातात एक जपानी सैनिक सापडला. ते त्याला घेऊन युनिटच्या कचेरीत गेले. त्यांना पाहून तिथल्या कॅप्टनचा पारा चढला, " नालायकांनो, आपल्या आजवरच्या लौकिकाला बट्टा लावलात! " तो संतापाने त्यांच्यावर ओरडला. इथे लौकिक अर्थातच एकही युध्दकैदी न घेण्याचा होता.
" ताबडतोब या कैद्याला बटालियन कचेरीत घेऊन जा. मी तुम्हाला ११.१५ ला भेटेन. " त्याने सांगितलं. त्यावेळी ११ वाजले होते आणि बटालियन कचेरी ५ मैल लांब होती. ते निमूटपणे त्या कैद्याला बाहेर घेऊन गेले आणि त्यांनी त्याला ठार मारलं.
इथे हेही सांगायला पाहिजे की अमेरिकन लष्कराच्या सगळ्याच दलांनी असं केलं नाही. एकट्या ओकिनावा बेटावरच हजारो जपानी सैनिक अमेरिकनांचे युध्दकैदी झाले. आज जर आपण या शरणागतीची वृत्तचित्रं पाहिली तर अमेरिकनांनी जपान्यांकडून ऐनवेळी दगाफटका होण्याचा धोका कसा टाळला ते आपल्याला समजतं. प्रत्यक्ष शरणागतीच्या आधी अमेरिकन सैन्य जपानी सैनिकांना पूर्णपणे विवस्त्र - फक्त एका अंतर्वस्त्राशिवाय - होण्याचा आदेश देत असे, आणि हे सैनिक नि:शस्त्र असल्याची खात्री झाल्यावरच त्यांची शरणागती स्वीकारण्यात येत असे.
ईगल्टनसाठी अर्थातच हे सगळं निरर्थक होतं. त्याच्या मनातली जपान्यांविषयीची घृणा इतकी तीव्र होती की आमच्या मुलाखतीच्या शेवटी त्याने स्पष्टपणे सांगितलं की अमेरिकेने दोन अणुबाँब टाकून जपानवर उपकारच केले कारण जर जपानने शरणागती पत्करली नसती तर अमेरिकेने जपानवर आक्रमण केलं असतं, " आणि मग त्यांचे हाल कुत्र्याने खाल्ले नसते. त्यांनी मारलेल्या एका अमेरिकन सैनिकाच्या बदल्यात आम्ही हजार जपान्यांना उडवलं असतं आणि आम्हाला काहीही फरक पडला नसता! "
आमची मुलाखत संपली. इतक्या स्पष्टपणे आपले विचार व्यक्त केल्याबद्दल मी जेम्स ईगल्टनचे आभार मानले आणि त्याच्या घरातून बाहेर आलो. स्वच्छ सूर्यप्रकाश सगळीकडे पसरला होता. समोर एका बागेत काही लहान मुलं आपल्या आईवडिलांबरोबर खेळत होती. त्याचा कोलाहल मला ऐकू येत होता. मी दुस-या बाजूला पाहिलं तर एक गृहिणी तिच्या गाडीतून बाजारातून विकत आणलेल्या वस्तू आपल्या घरात नेत होती.
आपल्या जवळ युद्धात नि:शस्त्र सैनिकांना थंडपणे गोळ्या घालणारा एक माणूस राहतो हे त्यांना माहीत असेल? आणि हे सगळं इतक्या वर्षांपूर्वी आणि इतक्या दूर घडलं त्यामुळे त्यांना काही फरक पडत असेल? की नसेल?
क्रमशः
प्रतिक्रिया
13 Nov 2014 - 4:18 pm | आनन्दा
ह्म्म.. खरेच खूप वेगळे आहे हे सगळे.
13 Nov 2014 - 4:18 pm | असंका
गोष्टी घडून गेल्या आहेत. घडून गेलेल्या गोष्टींवर कर्त्याने त्या वेळच्या लोकांच्या, फार मोठ्या कालावधीने मुलाखती घेतलेल्या आहेत. जे इतके जगले ते काहीतरी करून आपल्या कृत्यांना आधार शोधणारच.
मुलाखतींदरम्यान जे सांगितले गेले ते व्हॅलिडेट केले गेले का? म्हंजे घटनेच्या सत्यासत्यतेबाबत नाही. पण समजा एखादा माणूस म्हणाला की मी अगदी थंडपणे गोळ्या घातल्या...तर खरंच त्याने थंडपणे गोळ्या घातल्या असतील का? की मनातली घालमेल मुलाखत घेणार्यापासून लपवायचा प्रयत्न केलेला असेल? हे तपासले गेले आहे का?
13 Nov 2014 - 6:52 pm | बोका-ए-आझम
तुमचा प्रश्न एकदम योग्य आहे सीए भाऊ. या मालिकेतील दुसरा लेख - उपोद्घात - यात त्याचं उत्तर दिलेलं आहे.मी इथे त्याची लिंक देतोय.
http://www.misalpav.com/node/29038
दुसरा मुद्दा - गोळ्या थंडपणे घातल्या की अजून काही-गोळ्या घातल्या हे महत्वाचं आहे आणि ज्या व्यवसायांत जिवाशी संबंध असतो तिथे एक अलिप्तता ठेवावीच लागते. किंबहुना तशी अलिप्तता ठेवणाराच त्या व्यवसायात यशस्वी होऊ शकतो.
14 Nov 2014 - 7:59 pm | असंका
होय. तिथे होतेच. क्षमस्व.
14 Nov 2014 - 1:36 pm | एस
क्रौर्य हा मानवी स्वभावाचा - आणि अधिक व्यापकतेने पाहिल्यास समस्त सजीवसृष्टीचा - एक अविभाज्य भाग्य आहे. नीती-अनीती आणि वैधानिकतेचे त्याला दिलेले संरक्षण ह्या बाबी येतात त्या मुख्यत्त्वे मानवाच्या विचार करू शकण्याच्या पैलूतून. विचार करणे हे विवेकबुद्धीकडे टाकलेले पहिले पाऊल. कदाचित मानवी इतिहासातील सर्वच संघर्ष हे कुठेतरी या सामुहिक विवेकबुद्धीला तडे गेल्याने होत असावेत.
प्रस्तुत लेखकाचा हे पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश असा असावा की युद्ध अथवा संघर्षाच्या प्रसंगी ही मानवी विवेकबुद्धी कुठे आणि का तोकडी पडत असावी? ह्या प्रश्नाचा अतिशय मूलगामी स्तरावर जाऊन घेतलेला धाडसी धांडोळा म्हणजे हे लिखाण. तुम्ही त्याचे मराठीत भाषांतर करून या प्रयत्नांकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी आम्हांला देत आहात त्याबद्दल धन्यवाद!
मिपावरील असले लिखाण अंतर्मुख व्हावयास भाग पाडते.
15 Nov 2014 - 7:16 am | मुक्त विहारि
मिपावरीलच कशाला? हे असले लिखाण अंतर्मुख व्हावयास भाग पाडतेच पाडते.
14 Nov 2014 - 8:07 pm | हाडक्या
+१ .. अप्रतिम काम करीत आहात बोका भौ.. प्रतिसादांच्या संख्येवर नका जौ हो. इथे अनेक लोक फक्त वाचून सुन्न होऊन जात असतील.
15 Nov 2014 - 7:15 am | मुक्त विहारि
आवडला...
पुभाप्र.
लिखते रहो... हम वाचते रहेंगा
15 Nov 2014 - 7:55 pm | अजया
अस्वस्थ करणारे,विचारात पाडणारे लिखाण आणि तुमचा सुरेख अनुवाद यामुळे नेहेमीप्रमाणेच वाचनीय भाग.
पुलेशु.
15 Nov 2014 - 10:10 pm | मारवा
संस्कृतीची महावस्त्रे घातली तरी
सॅडिझम आत असतो च असतो दबा धरुन बसलेला
उफाळुन वर येतो संधी मिळताच कधी आपणच आश्चर्य चकित होतो आपल्यातलाच सॅडिझम बघुन.
बोका अतिशय मार्मिक लिखाणासाठी अनेक अनेक धन्यवाद !