अंधार क्षण - पीटर ली
ऐतिहासिक घटना समजून घेण्यातलं एक आव्हान म्हणजे भूतकाळ आणि आपण स्वतः यांची सांगड घालणं किंवा स्वतःची भूतकाळात कल्पना करणं. आपल्याला अशा जगाचा विचार करायला लागेल जिथे आज आपण ज्या गोष्टी गृहीत धरतो - इंटरनेट, विमानप्रवास, मोबाइल फोन - त्या तर नव्हत्याच पण लोकांची मूल्यव्यवस्थादेखील पूर्णपणे वेगळी होती. जर माझ्या आईवडिलांच्या पिढीचा विचार केला तर ही पिढी दुस-या महायुद्धाच्या वेळी तरूण होती आणि सूर्य न मावळणारं ब्रिटिश साम्राज्य अनुभवणारी शेवटची पिढी होती. आता ब्रिटिश साम्राज्यवादी जरी नाझींएवढे कट्टर वंशवादी नसले तरी गो-या लोकांना, विशेषतः ब्रिटिशांना, इतरांपेक्षा जास्त समजतं हा वंशश्रेष्ठत्वाचा आणि चुकीच्या पायावर आधारलेला विचार या साम्राज्याचा पाया होता. कुठल्याही इतर वसाहतवादी साम्राज्यांप्रमाणे ब्रिटिश साम्राज्यानेही वसाहतींच्या आर्थिक शोषणातून आणि स्थानिक लोकांच्या पिळवणुकीतून आपली उन्नती साधली आणि हे साम्राज्य अस्ताला जाणं ही विसाव्या शतकातल्या ज्या काही चांगल्या घटना आहेत, त्यापैकी एक आहे यात अजिबात शंका नाही.
असं जरी असलं तरी संयम, संघभावना, विनोदबुध्दी, कष्टाळूपणा, जगाच्या पाठीवर कुठेही समरस होण्याची वृत्ती, स्थानिक चालीरीतींबद्दल आदर यांसारखी काही मूल्यं, जी ब्रिटिश साम्राज्याशी निगडित होती, आणि कदाचित ज्यांना लोक आज जुनाट म्हणून हिणवतील, त्यांचं एक आगळं वैशिष्ट्य होतं. मी जेव्हा पीटर ली नावाच्या नखशिखांत युद्धपूर्व ब्रिटिश माणसाला भेटलो, तेव्हा हा विचार माझ्या मनात आला.उत्तर इंग्लंडमधल्या कामगारवर्गातून आलेल्या पीटर लीच्या ब्रिटिश मूल्यव्यवस्थेवरच्या निष्ठेमुळेच तो जपानी सैन्याच्या कैदेत तग धरून राहू शकला.
दुसरं महायुद्ध सुरु होण्याच्या काही महिने आधी पीटर ली राॅयल एअरफोर्समध्ये भरती झाला. प्रशिक्षणानंतर त्याची नियुक्ती पूर्व आशियामध्ये झाली. १९४१ च्या डिसेंबरमध्ये जपानने पर्ल हार्बरवर हल्ला करुन अमेरिकेला आणि पाठोपाठ ब्रिटनलाही युद्धात ओढलं आणि १९४२ मध्ये हाँगकाँग, मलाया, डच ईस्ट इंडीज, इंडोचायना, फिलिपाईन्स आणि पापुआ न्यूगिनी एवढा भूभाग आपल्या ताब्यात आणला. त्याच दरम्यान पीटर ली जपानी सैन्याच्या हातात सापडला. त्याला आणि त्याच्या सहका-यांना प्रथम जावा बेटावरच्या तुरूंगात ठेवलं गेलं. नंतर तिथून त्यांची रवानगी सिंगापूरच्या चांगी तुरूंगात झाली आणि शेवटी उत्तर बोर्निओमध्ये जेसलटन नावाच्या ठिकाणी त्यांना आणण्यात आलं आणि त्यांच्या सत्वपरीक्षेला सुरूवात झाली, " जे अन्न जपानी लोकांनी आम्हाला दिलं त्याचा दर्जा अत्यंत वाईट होता. जो तांदूळ आम्हाला ते द्यायचे तो अत्यंत निकृष्ट होता. आम्हा ८०० लोकांपैकी ५० जण पहिल्या ६ महिन्यांतच अन्नविषबाधेने मरण पावले. "
१९४३ च्या वसंतऋतूत जपान्यांनी या ब्रिटिश कैद्यांना जेसलटनमधून हलवून बोर्निओच्या ईशान्य टोकावरच्या संदाकान इथे आणलं. त्यांच्यातल्या अनेकांचा आयुष्याचा प्रवास इथेच संपुष्टात येणार होता. पण संदाकान जेसलटनपेक्षा बरं होतं. मुख्य म्हणजे इथे कैद्यांच्या जेवणात किंचित सुधारणा होती. भाताच्या जोडीला मासे मिळत होते. इथल्या कोठड्याही थोड्या मोठ्या होत्या. पण लीच्या म्हणण्याप्रमाणे, " संदाकानमध्ये आल्यावर आमचे बरेच लोक मरण पावले कारण जेसलटनमध्ये त्यांची तब्येत पूर्णपणे ढासळली होती. मी दररोज या आजारी लोकांना भेटायला जायचो. त्यांच्यातल्या अनेक जणांना मी सिंगापूरमध्ये पाहिलेलं होतं. तिथे एकदम दणदणीत, तरणेबांड जवान आणि इथे बेरीबेरी, स्कर्व्ही, काॅलरा यांनी एकतर ते हाडांचे सापळे झाले होते किंवा त्यांची प्लीहा सुजल्यामुळे पोट प्रचंड मोठं झालं होतं आणि हातापायांच्या काड्या. अशा मरणाची वाट पाहात असलेल्या लोकांकडे मला बघवत नव्हतं पण तरीही मी दररोज त्यांना भेटायला जायचो. "
जपान्यांनी या कैद्यांना संदाकानला नेण्याचं कारण म्हणजे तिथे त्यांना लढाऊ विमानांसाठी धावपट्टी हवी होती आणि ह्या कैद्यांकडून ते ती बांधून घेणार होते. त्यावेळी तिकडे प्रचंड कडक उन्हाळा होता. या मुलाखतीसाठी मी जेव्हा संदाकानला गेलो, तेव्हा मी तो उन्हाळा प्रत्यक्ष अनुभवला आणि मला त्याचा त्रास झाला. मी या कैद्यांप्रमाणे कुपोषित नव्हतो किंवा मला भर उन्हात पाठीवर वजन घेऊनही जायचं नव्हतं. तरीही फक्त अर्ध्या तासात माझा घसा तहानेने कोरडा पडला.
" तिथली मुख्य कामं म्हणजे जमीन खणणं आणि ती माती दुस-या ठिकाणी हलवणं," पीटर म्हणाला, "आमच्या मदतीला कुठलीही यंत्रसामग्री, अगदी कुदळ-फावडं अशी हत्यारंही नव्हती. सगळं काम माणसांनाच करावं लागत होतं."
जर या कैद्यांनी सांगितलेलं काम वेळेत पूर्ण केलं नाही तर त्यांच्यावर देखरेख करणारे जपानी सैनिक त्यांना वाटेल तसं मारत असत. हे काम करणारे खास मारकुटे सैनिक असत. " तुम्ही सामान्य सैनिक असा किंवा कोणी अधिकारी, त्यांना काही फरक पडत नव्हता. तुम्हाला प्रत्येक जपानी सैनिकाचं ऐकावं लागायचं. जर तुम्ही तसं केलं नाही तर त्या सैनिकाचा त्यावेळी जो मूड असेल त्याप्रमाणे तुम्हाला एक थप्पड किंवा लाठीमार अशी कुठलीही शिक्षा मिळत असे. एकदा एका ब्रिटिश अधिका-याने जपानी सैनिक दुस-या एका सैनिकाला मारत असताना मध्यस्थी करायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी त्यालाच लाथाबुक्क्यांनी तुडवला. पीटर लीच्याच शब्दांत सांगायचं तर, " जपान्यांनी त्यांच्या युद्धकैद्यांना दिलेल्या वागणुकीचं राक्षसी आणि असंस्कृत असंच वर्णन करता येईल. "
मग या सगळ्या वातावरणात तो कसा तग धरून राहू शकला? " अशा वेळी राग येणं ही अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे. पण तुम्ही जर जपान्यांचे युद्धकैदी असाल, तर त्या रागाचा काहीही फायदा नाही कारण त्याचं पर्यवसान शेवटी तुम्ही मार खाण्यातच होणार आहे. अशा वेळी शांत राहणं आणि परिस्थितीला सहन करणं हा एकच पर्याय उरतो. "
माझ्यासमोर बसून हे सगळं मला सांगत असणारा हा माणूस एखाद्या शिक्षकासारखा दिसत होता. त्याने संदाकानच्या तळपत्या उन्हात मातीची घमेली वाहिली असतील अशी कल्पनाही कुणी करणार नाही. पण तीही वस्तुस्थिती आहे. तिरस्कार आणि राग या भावनांवर, ज्या तिथल्या वातावरणात अगदी सहजसुलभ होत्या, त्याने स्वयंशिस्तीने विजय मिळवला.
अजून एका गोष्टीबद्दल मला त्याचं कौतुक वाटलं, ते म्हणजे त्याने कधीही आपल्या परिस्थितीबद्दल सहानुभूती मिळवण्याचा किंवा त्याचं भांडवल करण्याचा प्रयत्न केला नाही ," तशी मन:स्थिती तुम्हाला अधिकाधिक निराशावादी बनवते. त्यापेक्षा सकारात्मक विचार करा. स्वतःचं शरीर आणि मन या दोघांनाही कामात गुंतवून ठेवा आणि स्वतःच्या परिस्थितीबद्दल कधीही वाईट वाटून घेऊ नका किंवा स्वतःला कमनशिबी समजू नका. "
पीटर लीच्या मते, " वर्तमानकाळात जगणं कधीही चांगलं. भविष्यकाळाचा विचार करत बसलं तर तुम्ही उगाचच स्वप्नरंजन करत बसता आणि भूतकाळ तुम्हाला उदास करतो. जर तुम्ही भूतकाळाची आणि वर्तमानकाळाची सतत तुलना करत भूतकाळ किती चांगला होता हे उगाळत राहिलात तर तुम्हालाच त्याचा त्रास होईल. " आणि हे नुसतं बोलून तो थांबला नाही तर त्याने ते आचरणातही आणलं आणि तुरूंगातही अनेक सकारात्मक गोष्टी शोधून काढल्या, " अनेक अधिका-यांकडे पुस्तकं होती आणि त्याला जपान्यांनी आडकाठी केली नव्हती. त्यामुळे जरा वेळ मिळाला की आम्ही वाचत असू. " त्याने तशा वातावरणात आपली विनोदबुध्दीही शाबूत ठेवली, " एकदा एका जपानी पहारेक-याने मला बोलावलं. मला वाटलं की बहुतेक त्याला कोणावर तरी हात साफ करायची हुक्की आलेली दिसते. तुम्हाला कुठल्या कारणांमुळे मार खावा लागेल ह्याचे काही निश्चित नियम नव्हते. मी गेलो. तेव्हा तो एकदम प्रयत्नपूर्वक बोललेल्या इंग्लिशमध्ये मला म्हणाला ' Easto is Easto, Westo is Westo. No bloody mixo.' त्याला त्याचा अर्थ माहीत नव्हता हे उघड होतं. नंतर मला कळलं की माझ्याच एका सहका-याने त्याला हे मला सांगायला सांगितलं होतं. "
संदाकानविषयी मी त्याआधी जे काही ऐकलं होतं किंवा वाचलं होतं आणि स्वतः तिथे जे काही पाहिलं ते आणि पीटर लीची हकीगत यामध्ये बरीच तफावत होती. मी ऐकलेल्या छळवणुकीच्या आणि अत्याचारांच्या कथा आणि जे मी त्याच्याकडून ऐकलं - या दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या गोष्टी असाव्यात इतका त्यामध्ये फरक होता. संदाकानमध्ये आता एक मोठं वस्तुसंग्रहालय आहे, त्यात एक झोपडी आहे. एखाद्या कैद्याचं पूर्णपणे खच्चीकरण करायचं असेल तेव्हा जपानी सैनिक त्याला त्या झोपडीत बांधून ठेवत असत. त्या झोपडीत जागा अगदीच कमी होती त्यामुळे कैदी नीट हालचालही करू शकत नसे. त्याला अन्नपाणीही देत नसत आणि फक्त मारहाण करण्यासाठी दिवसातून दोन वेळा बाहेर काढत असत. बाकी सगळा वेळ तो त्या अंधा-या झोपडीत खितपत पडलेला असे.
पीटर लीने या सगळ्या गोष्टी नाकारल्या असं नाही पण त्याने त्यांच्याकडे अवाजवी लक्ष देऊन आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ दिला नाही , " त्याने फक्त निराशाच पदरी पडली असती. त्यापेक्षा कुठल्यातरी सकारात्मक गोष्टीवर लक्ष देणं चांगलं. " असं त्याचं मत होतं.
आॅगस्ट १९४३ मध्ये जपान्यांनी या सगळ्या कैद्यांना एक आश्चर्याचा धक्का दिला, " आम्हाला अचानक आमचं सामान वगैरे आवरून तयार राहायला सांगण्यात आलं. आमच्यातल्या फक्त १० अधिका-यांना त्यांनी तिथे ठेवलं. " हे हलवले गेलेले लोक अधिकारी होते, सामान्य सैनिक नव्हते. त्यावरून एक अंदाज बांधता येतो की एक खबरदारी म्हणून जपान्यांनी या लोकांना हलवलं, कारण त्याच सुमारास संदाकानमधल्या ब्रिटिश आणि इतर युद्धकैद्यांनी एक उठावाचा प्रयत्न केला होता. जर पुढे असं काही झालं तर सैनिकांचं नेतृत्व करणारं कोणीही तिथे असू नये हा जपान्यांचा हेतू असावा. पीटरला तिथून जाण्याची इच्छा नव्हती, " मी तिथे माझ्या सैनिकांबरोबर राहाण्यासाठी काय वाट्टेल ते केलं असतं. मला कुटुंबापासून ताटातूट झाल्यावर होईल तसंच दु:ख झालं. "
पण एकप्रकारे पीटर तिथून गेला हे त्याच्यासाठी चांगलंच झालं कारण जर तो तिथे राहिला असता तर नक्कीच मरण पावला असता. तिथे त्यावेळी २५०० कैदी होते - १८०० आॅस्ट्रेलियन आणि ७०० ब्रिटिश. जपान्यांनी सर्वप्रथम त्यांचं जेवण कमी केलं. नंतर, जानेवारी १९४५ मध्ये या खंगलेल्या कैद्यांना त्यांनी चालवत जेसलटनला परत आणलं. उपासमार, कडक उन्हाळा आणि इतर कष्टांमुळे कुठलाच कैदी वाचला नाही. फक्त ६ आॅस्ट्रेलियन, जे जेसलटनला परत जाताना जंगलात पळून गेले, ते वाचले. सर्वच्यासर्व ७०० ब्रिटिश कैदी मरण पावले.
आता जेव्हा आपण त्याबद्दल विचार करतो तेव्हा हे होणं अटळ होतं हे आपल्या लक्षात येतं. जपानी सैन्याच्या मनोवृत्तीमुळेच हे सर्व लोक मारले गेले. युद्धकैद्यांविषयी जपान्यांच्या मनात प्रचंड तिरस्कार होता. जपानी संस्कृतीमध्ये शरणागतीपेक्षा मरण पत्करणं, वेळप्रसंगी आत्महत्या (हाराकिरी) करणं ह्या गोष्टीला अतिशय महत्त्व होतं आणि अजूनही आहे. हे युद्धकैदी ब्रिटिश आणि आॅस्ट्रेलियन होते त्यामुळे ते काही काळ जिवंत तरी राहिले. चिनी असते तर त्यांचं काय झालं असतं याची कल्पनाही न केलेली बरी. त्याशिवाय जपानी सैन्यात, शासनयंत्रणेत आणि नागरिकांमध्येही त्या वेळी एक प्रकारचा अतिरेकी राष्ट्रवाद होता. देशप्रेमाच्या नावावर लोक कुठलाही अत्याचार करायला तयार होते, मग ते चिनी स्त्रियांवरचे बलात्कार असो किंवा युद्धकैद्यांना गुरांसारखं राबवून घेणं असो. या अशा युद्धज्वर डोक्यात गेलेल्या लोकांकडून संदाकानसारख्या गोष्टी घडल्या यात नवल नाही.
पीटर लीचं यावर काय म्हणणं आहे असं जेव्हा मी त्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला, " वेगवेगळ्या देशांमध्ये, वंशांमध्ये आणि संस्कृतींमध्ये लोकांची विचारसरणी आणि विचार करण्याची पद्धत हे वेगवेगळे असतात. जीवनविषयक मूल्यंही वेगवेगळी असतात. त्यामुळे जे तुम्हाला बरोबर वाटतं ते त्यांच्या दृष्टीने बरोबर असेलच असं नाही. "
युद्ध संपल्यावर पीटर लीने ब्रिटिश सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वसाहतीविषयक खात्यात काम केलं. जेव्हा मी त्याला भेटलो तेव्हा अर्थातच ब्रिटिश साम्राज्य हे इतिहासजमा झालं होतं. हाँगकाँगवर चीनचा ताबा प्रस्थापित झाला होता आणि त्यामुळे साम्राज्याचा शेवटचा चिराही ढासळला होता. पण मला हेही जाणवलं की जी मूल्यं ब्रिटिश साम्राज्यामुळे त्याला आत्मसात करायला मिळाली, त्या आज जुनाट वाटणा-या मूल्यांमुळे त्याचा मनाचा समतोल टिकून राहिला आणि कैदेतले अत्याचार तो सहन करू शकला.
क्रमशः
प्रतिक्रिया
8 Dec 2014 - 8:54 am | प्रचेतस
खूपच जबरदस्त लेखमाला आहे ही.
8 Dec 2014 - 2:35 pm | एस
हे मूळ पुस्तक वाचणार आहे. कितीतरी गोष्टी मुळापासून बदलवून टाकणारं लेखन.
8 Dec 2014 - 3:10 pm | असंका
ही मुल्य जुनी म्हणायची असतील तर यांच्या ऐवजी आलेली नवीन कालानुरूप मुल्य कुठली असावीत!
बाकी लेख नेहेमीप्रमाणेच अप्रतिम. लेखकाचे कष्ट वादातीत आहेतच, पण उत्कृष्त भाषांतर होण्यासाठी आपण घेत असलेले कष्टही जाणवत आहेत.
8 Dec 2014 - 7:15 pm | अजया
सुरेख चालली आहे लेखमालिका.तुमचे भाषेवरचे प्रभुत्व वादातित आहे.कारण हे पुस्तक पूर्वी चाळले आहे.त्याचे भाषांतर करणे हे औघड काम,त्यातही कमालीचे सातत्य ठेवुन करताय.त्याबद्दल तुमचे आभार आणि अभिनंदन.
8 Dec 2014 - 7:57 pm | मधुरा देशपांडे
अप्रतिम लेखन. पुभाप्र.
9 Dec 2014 - 6:59 am | मुक्त विहारि
ह्या कथेतले आवडलेले वाक्य....
"पीटर लीने या सगळ्या गोष्टी नाकारल्या असं नाही पण त्याने त्यांच्याकडे अवाजवी लक्ष देऊन आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ दिला नाही , " त्याने फक्त निराशाच पदरी पडली असती. त्यापेक्षा कुठल्यातरी सकारात्मक गोष्टीवर लक्ष देणं चांगलं. " असं त्याचं मत होतं."
किंबहूना हेच सत्य....