अंधार क्षण भाग ४ - कैद
मानवी समूहांनी जेव्हा एकमेकांशी लढायला सुरूवात केली तेव्हापासून युद्धकैदी ही संकल्पना आहे. दुस-या महायुद्धाआधी युद्धकैदी हे शत्रूचे सैनिक असायचे. शत्रूच्या नागरिकांना कैद करणं हे दुस-या महायुद्धातच सुरू झालं. . याआधीच्या किंवा नंतरच्या दुसऱ्या कुठल्याही संघर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिकांना कैद केलं गेलं नाही. एवढंच नाही तर या लोकांना ज्या प्रकारे कैद केलं गेलं त्यातही पराकोटीची विविधता आपल्याला दिसून येते. या भागात ज्या ९ कथा आहेत त्यांत हा मुद्दा आला आहेच. लोकांनी या परिस्थितीला कसं तोंड दिलं तेही आपल्याला यावरुन कळतं.
लोकांना वेगवेगळ्या प्रकारे कैद केलं गेलं असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा ' कैद ' किंवा बंदिवास या संकल्पनेकडे वेगळ्या प्रकारे बघण्याची गरज आहे हे खरंतर मला लोकांना सांगायचं आहे. इथे ज्यांच्या कथा आहेत त्यांच्यापैकी काहीजण रुढार्थाने तुरूंगात नसतील कारण त्यांच्याभोवती चार भिंती नव्हत्या पण त्यांचा बंदिवास हा तितकाच घुसमटवणारा होता.
जेव्हा आपण ' कैदी ' हा शब्द वापरतो तेव्हा आपल्याला असे लोक अभिप्रेत असतात, ज्यांनी काहीतरी गुन्हा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे आणि त्यामुळे त्यांना अटक झालेली आहे किंवा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे त्यांना शिक्षा झालेली आहे आणि काही एका काळासाठी त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं गेलं आहे आणि जर अशा दोन लोकांनी सारख्या स्वरुपाचा गुन्हा केला असेल तर त्यांना शिक्षा पण साधारणपणे सारखीच असेल. पण अनेक देशांनी या संकल्पनेत बदल केले, उदाहरणार्थ जर्मनांनी त्यांच्या कैद्यांना नाझीवादाच्या सिद्धांतांप्रमाणे वागणूक दिली. सोविएत युद्धकैद्यांचे जेवढे हाल केले गेले तेवढे अत्याचार ब्रिटिश कैद्यांवर झाले नाहीत. ३० लाखांहून अधिक सोविएत युद्धकैदी नाझींच्या छळछावण्यांत, श्रमछावण्यांत आणि मृत्युछावण्यांत मारले गेले. पण ज्यूंच्या नशिबात जो बंदिवास होता त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. नाझींनी ज्यूंसाठी जवळपास प्रत्येक मोठ्या शहरांत बंदिस्त वसाहती बनवल्या होत्या. जेमतेम ४००-४५० लोक मुश्किलीने राहू शकतील अशा ठिकाणी १०००-१५०० एवढे लोक कोंबलेले असत. दोन खोल्यांच्या घरात ८ ते १० कुटुंबं एकत्र राहात असत. या वसाहतींचं नाव होतं ' घेट्टो.' त्यात राहाणं म्हणजे तुरुंगवासच होता कारण लोकांच्या हालचालींवर आणि व्यवहारांवर कडक निर्बंध होते आणि घेट्टोंच्या बाहेर पोलिसांचा सतत पहारा असे. याशिवाय आॅशविट्झ, साॅबिबाॅर, ट्रेब्लिंका, चेल्मनो, रॅव्हेन्सब्रुक यांच्यासारख्या मृत्युछावण्या होत्याच. आणि नाझींसाठी या दोन्हीही तात्पुरत्या गोष्टी होत्या. एखादा ज्यू घेट्टोमध्ये २-३ वर्षे राहिला काय किंवा मृत्युछावणीत अर्धा-पाऊण तास राहिला काय, शेवटी त्याला मरायचंच आहे अशी नाझींची धारणा होती. असा बंदिवास हा एकमेवाद्वितीय होता.
दुस-या महायुद्धाने बंदिवासाचा इतिहास पूर्णपणे बदलून टाकला कारण सामूहिकरीत्या अनेक लोक - तरुण, वृद्ध, स्त्रिया, लहान मुलं - अचानकपणे कैदी झाले. कोणीही, कधीही आणि कुठेही कैद होऊ शकत होता. आणि मी ज्या मुलाखती घेतल्या त्यावरून एक गोष्ट मला समजली की या परिस्थितीला सामोरं जाण्याचं तंत्र हे प्रत्येकाने स्वतःसाठी वेगवेगळं शोधून काढलं होतं. काही जण वर्तमानात जगले, काहींनी भविष्याचा विचार केला पण प्रत्येकाने आपल्या बंदिवासांतल्या दिवसांना आपल्या मनाला ताळ्यावर ठेवून तोंड दिलं.
क्रमशः
प्रतिक्रिया
27 Nov 2014 - 9:16 am | स्पार्टाकस
बंदीवासापेक्षाही जोसेफ मेंगल सारख्या नाझी डॉक्टरांनी जे अमानवी प्रयोग केले, ते जास्तं अघोरी होते.
27 Nov 2014 - 9:48 am | मुक्त विहारि
सहमत...
27 Nov 2014 - 10:27 am | बोका-ए-आझम
अमानुषपणा श्रेणीबद्ध कसा करणार? ज्यूंवर झालेले सगळेच अत्याचार - घेट्टो, बाबी यार आणि रंबुला यासारखी हत्याकांडं, डाॅक्टरांचे प्रयोग, गॅस चेंबर - यात काय जास्त अमानुष आणि काय कमी अशी श्रेणी लावणं हे चुकीचं आहे असं माझं मत आहे. कायद्याच्या दृष्टीने गुन्हा म्हणून त्यांची तीव्रता कमी-जास्त असेल कारण शिक्षा ही गुन्ह्याच्या स्वरुपावर अवलंबून असावी हे कायद्याचं तत्व आहे पण माणुसकीच्या दृष्टिकोनातून कुठल्याही निरपराध, निःशस्त्र जनसमूहाला वांशिक कारणांवरून छळणे - शारिरीक आणि मानसिक - हे सारखेच अमानुष आहे.
27 Nov 2014 - 12:29 pm | एस
सहमत आहे.
27 Nov 2014 - 4:44 pm | अजया
सहमत.शेवटी सगळ्याच माणसातला पशूपणा सिध्द करणार्या निर्घृण पध्दतीने केलेल्या कृती.त्यात काय कमी काय जास्त.
27 Nov 2014 - 9:52 am | मुक्त विहारि
पुभाप्र.
बाद्वे,
शत्रू सैनिकांना बंदी बनवण्याची प्रथा फार पुर्वी-पासूनच आहे. मध्यंतरी "हेमांगी के" ह्यांनी एका लेखमालेत ह्याचा उल्लेख केला होता. (आमच्या मेंदूतल्या हार्ड-डिस्क मध्ये इतपतच माहिती साठवल्या गेली. बहूतक "आस्तेक" नावांच्या लेखमालेत असावी.कुणीतरी प्रकाश टाकला तर बरे.)
28 Nov 2014 - 9:25 pm | सस्नेह
या सगळ्या विकृतींचा अभ्यास करताना मनाची काय अवस्था झाली असेल ?
29 Nov 2014 - 12:44 am | बोका-ए-आझम
असं पुस्तक लिहून ते अनुभव सगळ्या जगाबरोबर वाटणं हे मला वाटतं लेखकाने मनाच्या विषण्ण अवस्थेतून बाहेर येण्यासाठीच केलं असेल. डायरी लिहिणं ही आजही अनेक मानसिक उपचारांमधली एक पायरी किंवा प्रक्रिया असतेच.