अंधार क्षण - मारिया प्लेटोनाउ
जानेवारी १९९१ मध्ये ' अ ब्रिटिश बिट्रेयल ' (ब्रिटिशांनी केलेला विश्वासघात) हे वृत्तचित्र बीबीसीवरुन प्रसारित झालं. या वृत्तचित्राचा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता मी होतो आणि मला त्याच्यामुळे बराच त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागला. ब्रिटनमधल्या काँझर्व्हेटिव्ह पक्षाचे ज्येष्ठ नेते लाॅर्ड आल्डिंग्टन यांनी या वृत्तचित्राच्या प्रसारणालाच आक्षेप घेतला. एवढंच नाही तर त्यांनी बीबीसीच्या अध्यक्षांकडे याबाबत रीतसर लेखी तक्रार दाखल केली. ह्या तक्रारीची दखल बीबीसीच्या अंतरिम धोरण ठरवणा-या विभागाने घेतली आणि प्रदीर्घ चर्चेनंतर लाॅर्ड आल्डिंग्टन यांनी घेतलेले सगळे आक्षेप आणि आरोप रद्दबातल करण्यात आले. आल्डिंग्टननी या निर्णयाविरोधात अपील केलं. अगदी सर्वोच्च पातळीवर - बीबीसीच्या नियामक मंडळाकडे हे प्रकरण गेलं. त्यांनीही सगळे आरोप फेटाळून लावले. पण नंतर बराच काळ लाॅर्ड आल्डिंग्टन माझ्या आणि या वृत्तचित्राच्या विरोधात न्यायालयात जातील अशी एक अफवा माझा पिच्छा पुरवत होती.
लाॅर्ड आल्डिंग्टन आणि त्यांना पाठिंबा देणा-या लोकांना, ज्यांच्यामध्ये केवळ राजकारणीच नाहीत तर ब्रिटिश समाजातल्या अनेक प्रतिष्ठित लोकांचा समावेश होता, नक्की कशाचा राग आला होता? जेव्हा त्यांनी माझ्याविरूध्द तक्रार केली तेव्हा बीबीसीने माझ्या वृत्तचित्रासाठी वापरलेली सर्व माहिती, साक्षीदार आणि मी काढलेले निष्कर्ष यांची शहानिशा केली होती. त्यांना त्यात कुठल्याही प्रकारची चूक आढळली नव्हती.
मला स्वतःला असं वाटतं की एवढ्या सगळ्या लोकांच्या रागाचं आणि माझ्याविषयीच्या तिरस्काराचं एकच कारण आहे आणि ते म्हणजे मी सांगितलेली गोष्ट पूर्णपणे खरी आहे आणि कटू सत्य कोणालाही आवडत नाही. इथे सत्यपरिस्थिती ही होती की ब्रिटिशांनी ज्या हेतूपायी युद्ध केलं त्याच हेतूंना युद्ध संपल्यावर त्यांनी हरताळ फासला.
अनेक लोकांसाठी दुसरं महायुद्ध हे एक नैतिक युद्ध आहे. चांगल्याचा आणि वाईटाचा संघर्ष - जिथे ब्रिटिश, अमेरिकन, फ्रेंच आणि रशियन हे नायक होते, सद्गुणी होते, त्यांचे हेतूही चांगले होते; जर्मन, जपानी आणि इटालियन हे खलनायक होते, दुर्गुणी होते आणि त्यांचे हेतू वाईट आणि राक्षसी होते. ब्रिटिश साम्राज्य जरी महायुद्धामुळे संपुष्टात आलं असलं तरी ब्रिटिशांना त्यांच्या लोकशाही आणि स्वातंत्र्य यांच्यावरच्या निष्ठेचा, काही काळ संपूर्ण युरोपमध्ये नाझीवादासमोर एकटं उभं राहण्याचा आणि नंतर युद्धोत्तर जर्मनीचं यशस्वी पुनर्वसन केल्याचा अभिमान होता. या सगळ्यात कुणी जर मिठाचा खडा टाकला, जर कुणी एखादा प्रसंग दाखवून दिला की जेव्हा ' चांगले ' लोक जसं वागायला हवं होतं तसे वागले नाहीत तर या अभिमानाला धक्का लागला असता. असा एक प्रसंग म्हणजे ब्रिटिश सैन्याने ४२,००० कोसॅक सैनिकांना रशियन सैन्याकडे हस्तांतरित करण्याचा. या सगळ्या प्रसंगाच्या आधी, दरम्यान आणि नंतर अशा अनेक घटना घडल्या ज्या कोणालाही अस्वस्थ करतील.
या सर्व घटनांमधला विरोधाभास म्हणजे युरोपमधलं युद्ध संपल्यावर ह्या घटना घडल्या, जेव्हा लोक असं समजत होते की आता यापेक्षा वाईट असं काही आपल्याला पहावं लागणार नाही.
७ मे १९४५ या दिवशी जर्मन सेनानी कायटेल आणि जोड्ल यांनी रीम्स इथे शरणागतीच्या कागदावर सही केली आणि युरोपातलं युद्ध संपुष्टात आलं. ८ मे १९४५ पासून संपूर्ण युरोपात युद्धबंदी अंमलात आली. याच दिवशी ब्रिटिश कोअर 5 च्या सैनिकांचं दक्षिण आॅस्ट्रियाच्या कॅरिंथिया प्रांतात आगमन झालं. युद्धबंदीमुळे हा संपूर्ण भाग शांत होता पण ही शांतता भंग व्हायला वेळ लागला नाही आणि त्याचं कारण म्हणजे निर्वासितांचे लोंढे. हजारो निर्वासित स्वतःला रशियन सैन्यापासून वाचवण्यासाठी कॅरिंथियामध्ये येत होते. या निर्वासितांमध्ये अनेक सैनिक आणि लष्करी अधिका-यांचाही समावेश होता. बरेचजण आपल्या कुटुंबासोबत होते. ते युद्धात रशियनांविरुद्ध लढले होते पण त्यांना रशियनांना शरण जाण्याची इच्छा नव्हती. पण ते ब्रिटिशांसमोर शरणागती पत्करायला तयार होते, किंबहुना आतुर होते हे वर्णन जास्त बरोबर आहे. या लोकांमध्ये सर्वात जास्त भरणा हा कोसॅक सैनिकांचा होता. या सैनिकांनी जर्मनांच्या बाजूने युगोस्लाव्हियामध्ये टिटोच्या प्रतिकारकांशी झुंज दिली होती. जोसिप ब्राॅझ उर्फ टिटोचे प्रतिकारक अत्यंत कडवे आणि निष्ठुर म्हणून प्रसिद्ध होते. कोसॅक आणि त्यांच्यामधल्या लढाया या महायुद्धातल्या अत्यंत अटीतटीच्या आणि कुठलाही विधिनिषेध नसलेल्या संघर्षांपैकी एक समजल्या जातात.
या कोसॅक सैनिकांबरोबर आलेल्या इतर निर्वासितांमध्ये किशोरवयीन मारिया प्लेटोनाउ आणि तिच्या आईचा समावेश होता. या सर्व निर्वासितांसाठी ब्रिटिश सैन्याने ठिकठिकाणी छावण्या उभारल्या होत्या. मारिया आणि तिची आई ५००० इतर लोकांबरोबर पेगेट्झ या ठिकाणच्या छावणीत होत्या. ब्रिटिशांनी त्यांची शरणागती स्वीकारल्यामुळे हे सर्व लोक अत्यंत आनंदात होते.
" माझं ब्रिटिशांबद्दल अत्यंत चांगलं मत होतं. मी आणि माझी आई, आम्हा दोघींनाही वाचनाची आवड होती आणि शेक्सपिअर आणि डिकन्स यांचं साहित्य वाचतच मी मोठी झाले. त्यामुळे ब्रिटनविषयी माझ्या मनात एक आपुलकीची भावना होती. ब्रिटिश लोक अत्यंत न्यायप्रिय आहेत असा माझा विश्वास होता. " त्यामुळे ब्रिटिशांकडून आपल्याला चांगलीच वागणूक मिळेल याची त्यांना खात्री होती.
१९९० मध्ये मी मारियाला या मुलाखतीसाठी तिच्या कॅनडामधल्या घरी भेटलो तेव्हा या आठवणीने तिला पुन्हा एकदा भरून आलं. जरी तांत्रिक दृष्ट्या हे कोसॅक सैनिक ब्रिटिशांचे कैदी होते, तरी आपण लवकरच स्वतंत्र होऊ असं त्यांना वाटत होतं.
ब्रिटिश सैनिक आणि अधिकारीही या कैद्यांशी व्यवस्थित मिळूनमिसळून वागत होते. कुठेही कुठल्याही प्रकारची कटुता किंवा अविश्वासाचं वातावरण नव्हतं. पण हे लवकरच बदलणार होतं. ब्रिटिश सरकारने या सगळ्या कैद्यांना सोविएत अधिका-यांच्या हवाली करण्याचं वचन स्टॅलिनला दिलं होतं - त्यांची जायची इच्छा असो वा नसो.
या कोसॅक सैनिकांपैकी बरेचजण हे सोविएत नागरिक होते हे खरं आहे पण जवळजवळ तेवढेच लोक हे सोविएत नागरिक नव्हते हेदेखील तितकंच खरं आहे. त्यांच्याकडे दुस-या देशांचं नागरिकत्व होतं किंवा त्यांची कागदपत्रं युद्धाच्या धामधुमीत हरवली होती. काही लोक युद्ध सुरु होताना वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या देशात होते आणि इतक्या वेळा विस्थापित झाले होते की त्यांचा मूळ देश आणि राष्ट्रीयत्व हे कागदावरच होतं. या सगळ्या लोकांच्या कागदपत्रांची आणि ते ज्या गोष्टी स्वतःबद्दल सांगत होते त्यांच्या छाननीची आणि तपासणीची यावेळी नितांत गरज होती, जेणेकरून सोविएत कोसॅक आणि इतर देशांचे नागरिक असलेले कोसॅक यांना वेगळं करता आलं असतं.
सोविएत नागरिक असलेल्यांच्या नशिबात काय आहे हे सांगायला कुणा ज्योतिष्याची गरज नव्हती. पुढे ब्रिटनचे पंतप्रधान झालेले हॅराॅल्ड मॅकमिलन त्यावेळी ब्रिटिश सैन्याचे राजकीय सल्लागार म्हणून याच भागात कार्यरत होते. त्यांनी आपल्या डायरीत अशी स्पष्ट नोंद केलेली आहे - ' या कोसॅक सैनिकांना स्टॅलिनच्या हस्तकांकडे सोपवणं म्हणजे त्यांच्यावर छळ, अत्याचार, गुलामगिरी आणि मृत्यू लादणं आहे, अजून काही नाही. '
असं असूनसुद्धा कोअर 5 च्या सैनिकांनी या कोसॅक सैनिकांना एकमेकांपासून वेगळं करण्याचा आणि जे सोविएत नागरिक नव्हते अशांना पुढच्या अत्याचारांपासून वाचवण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही.
कोअर 5 चे कमांडर होते लेफ्टनंट जनरल चार्ल्स काइटली आणि त्यांचे सहाय्यक म्हणून त्यावेळी ब्रिगेडियर टोबियस ' टोबी ' लो हे काम पाहात होते. पुढे सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर ते राजकारणात गेले, हाऊस आॅफ लाॅर्डस् चे सदस्य झाले आणि लाॅर्ड आल्डिंग्टन म्हणून जग आज त्यांना ओळखतं.
२५ मे १९४५ हा ब्रिगेडियर लो यांचा ३१वा वाढदिवस होता. त्याच्या ४ दिवस आधी, म्हणजे २१ मे १९४५ या दिवशी त्यांनी असा लेखी आदेश दिला की सरसकट सगळ्या कोसॅक सैनिकांना सोविएत अधिका-यांच्या हवाली करण्यात यावं, ते सोविएत नागरिक नसले तरीही. नंतर त्यांनी हा मुद्दा मांडला की त्यांच्या आदेशानुसार कोसॅक सैनिकांची सोविएत नागरिक आणि इतर अशी विभागणी होऊ शकली असती. त्यांच्या लेखी आदेशात अशी एक ओळ होती - ' Individual Cases will NOT be considered unless particularly pressed.
ब्रिगेडियर लो असं म्हणत होते की ' Unless particularly pressed ' याचा अर्थ हा आहे की विभागणी होऊ शकली असती पण वस्तुस्थिती ही आहे की ' Individual Cases will NOT be considered ' चा अर्थ पूर्णपणे त्याच्या विरूद्ध होतो. २२ मे १९४५ या दिवशी ब्रिगेडियर लो आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी ब्रिटनला निघून गेले. जाताना आपल्या एकाही सहाय्यकाला त्यांनी कोसॅक सैनिकांची विभागणी करण्याचा आदेश दिला नाही. याचा अर्थ सरसकट सगळ्या कोसॅक सैनिकांना सोविएत अधिका-यांच्या ताब्यात देण्यात येणार होतं.
या अन्याय्य आदेशामुळे ब्रिटिशांचा अजून एक फायदा झाला. आता त्यांना या कोसॅक सैनिकांना त्यांच्या नकळत त्यांच्या कुटुंबांपासून दूर नेऊन रशियनांच्या ताब्यात देता येणार होतं. त्यासाठी या सैनिकांचा विश्वास बसेल असा काहीतरी बनाव करण्याची गरज होती.
२८ मे या दिवशी या कोसॅक युद्धकैद्यांमधले जे अधिकारी होते त्यांना असं सांगण्यात आलं की त्यांचं पुढे काय होणार ते ठरवण्यासाठी एक औपचारिक भेट आयोजित केलेली आहे आणि त्यांची उपस्थिती अनिवार्य आहे. ब्रिटिशांनी त्यांना असंही सांगितलं होतं, नव्हे, वचन दिलं होतं की त्याच दिवशी संध्याकाळी या सगळ्या अधिका-यांना परत आणलं जाईल.
या बातमीने सर्व कोसॅक छावणीत उत्साहाचा संचार झाला. अधिका-यांनी आपल्या गणवेषांना इस्त्री केली, बूट चमकवले आणि पदकं स्वच्छ केली. दुस-या दिवशी मोठ्या अभिमानाने आणि आशेने हे सगळे अधिकारी गाडीत बसले.
निघण्याआधी मारियाचे काका तिला आणि तिच्या आईला भेटायला आले, " आणि मी त्यांना विचारलं, ' कुठे निघालात?' त्यांनीही सांगितलं, ' ब्रिटिशांनी आयोजित केलेल्या भेटीसाठी! ' ते पुढे असंही म्हणाले, ' ब्रिटिश अधिकारी संध्याकाळी परत येऊ असं म्हणाले आहेत म्हणजे आम्ही नक्कीच संध्याकाळी जेवणाच्या वेळेपर्यंत परत येऊ. आणि या भेटीत काय झालं ते सगळं मी तुम्हाला जेवताना सांगेन.' असं म्हणून ते गाडीत बसले. गाडी निघाली आणि त्यांनी आमच्याकडे बघून निरोपादाखल हात हलवला. त्यानंतर मी त्यांना कधीच पाहिलं नाही."
अशी कुठलीही भेट वगैरे आयोजित करण्यात आली नव्हती. हा ब्रिटिशांनी रचलेला बनाव होता. जवळजवळ १५०० अधिका-यांना ब्रिटिश सैन्य घेऊन गेलं. रात्री परत येण्याऐवजी त्यांना स्पिटाल इथल्या सैनिकी बराकींमध्ये स्थानबद्ध म्हणून ठेवण्यात आलं. दुस-या दिवशी सकाळी त्यांना सोविएत अधिका-यांच्या ताब्यात देण्यात येणार होतं. कुठूनतरी ही वस्तुस्थिती या कोसॅक अधिका-यांना समजली आणि मग तिकडे एकच गोंधळ माजला. ३ अधिका-यांनी तर आत्महत्या केली.
इकडे पेगेट्झ छावणीतही तीच परिस्थिती होती. संध्याकाळ झाली, रात्र झाली, मध्यरात्र झाली तरीही जेव्हा हे लोक परत आले नाहीत तेव्हा तिथेही एकच गोंधळ आणि आकांत माजला. तिथल्या लोकांनाही खरी परिस्थिती आणि भविष्याची जाणीव झाली.
१ जूनच्या सकाळी ब्रिटनच्या हायलँडर्स डिव्हिजनचे सैनिक छावणीत आले. त्यांना छावणीमधल्या सर्वांना सोविएत अधिका-यांच्या हातात सोपवण्याचे आदेश होते. जे सोविएत नागरिक नव्हते आणि त्यामुळे ज्यांना सोविएत अधिका-यांच्या हातात सोपवलं जायला नको होतं, त्यांना सोविएत नागरिकांपासून वेगळं करण्याची कुठलीही योजना या सैनिकांकडे नव्हती.
या हायलँडर्स डिव्हिजनचा एक अधिकारी मेजर रस्टी डेव्हिस याने आपल्या डायरीत त्या दिवसाची अशी नोंद केलेली आहे - ' एकच हलकल्लोळ माजला होता. आमचे सैनिक हाताला येईल त्या लहान मुलाला, म्हाता-या माणसाला, बाईला बखोट धरून खेचत होते आणि रशियनांनी आणलेल्या ट्रक्समध्ये टाकत होते. आयांपासून वेगळी झालेली मुलं आणि त्यांचे आईवडिल यांच्या रडण्याचे आवाज सगळीकडे ऐकू येत होते. काही लोक तर स्वतःला रशियन सैनिकांच्या संगिनींवर झोकून आत्महत्या करायचा प्रयत्न करत होते. काहीजणांनी आमच्या सैनिकांच्या बंदुका खेचून स्वतःवर गोळी झाडून घ्यायचे प्रयत्न केले. एक कोसॅक या सगळ्या गोंधळात पुढे धावला, त्याने एका ब्रिटिश सैनिकाची बंदूक हिसकावून घेतली आणि कुणाला काही कळायच्या आत दुस-या एका कोसॅक सैनिकाच्या डोक्याच्या चिंधड्या उडवल्या आणि नंतर त्याच बंदुकीने स्वतःच्या शरीराचीही चाळण केली. '
मारियालाही एक असाच प्रसंग आठवत होता. एक वृद्ध माणूस, जवळजवळ सत्तरीचा, गुडघे टेकून ब्रिटिश सैनिकांसमोर त्यांची वाट अडवून बसला होता आणि त्यांचे पाय पकडून त्यांची विनवणी करत होता, " मला त्यांच्याकडे पाठवू नका. कृपा करुन मला रशियनांच्या ताब्यात देऊ नका! " आणि ते तितक्याच थंडपणे आपल्या रायफलींच्या दस्त्यांनी त्याला मारत होते. त्यांनी त्याला आधी हातांवर मारलं, नंतर पायांवर आणि जेव्हा तो कोसळला तेव्हा डोक्यावर. त्यांचे चेहरे निर्विकार होते. शेवटी त्याचा चेहरा पूर्णपणे रक्तबंबाळ झाला आणि तो बेशुद्ध पडला. त्यांनी तितक्याच निर्विकारपणे त्याला उचललं, रशियनांच्या ट्रकमध्ये टाकलं, आणि ते पुढच्या माणसाकडे वळले.
ब्रिटिश सैन्याच्या इतिहासातला हा एक काळा दिवस होता. या दिवशी किती लोक मरण पावले ते अज्ञात आहे. तिथे हजर असलेले मारियासारखे लोक १००-२०० म्हणतात. ब्रिटिश सैन्य आणि सरकार काहीच म्हणत नाही.
मेजर रस्टी डेव्हिसला हे बघणं अशक्य झालं आणि त्याने सगळे नियम झुगारून छावणीतल्या उरलेल्या लोकांची सोविएत नागरिक असलेले आणि नसलेले अशी विभागणी केली. मारिया आणि तिच्या आईकडे युगोस्लाव्ह कागदपत्रं होती. त्यामुळे त्या बचावल्या. डेव्हिसच्या प्रयत्नांमुळे बरेच लोक सोविएत कैदेत जाण्यापासून वाचले पण त्याने हस्तक्षेप करण्याआधी कितीतरी सोविएत नागरिक नसलेल्या कोसॅक सैनिकांना विनाकारण स्टॅलिनच्या पोलादी पडद्याआड जावं लागलं आणि फार थोडे लोक तिथून जिवंत बाहेर आले.
मारिया आणि तिच्यासारख्या इतर लोकांनी नंतर या अन्यायाविरूद्ध आवाज उठवला. त्यांचा एक आक्षेप
ब्रिटिशांनी ही सर्व परिस्थिती ज्या प्रकारे हाताळली त्यावरही होता. ज्यांना आदल्या दिवशी फसवून स्पिटालला नेण्यात आलं, त्या कोसॅक अधिका-यांना आपल्या प्रियजनांचा साधा निरोपही घेता आला नाही. त्यांचा अंत कसा झाला असेल ही टोचणी, ही वेदना त्यांच्या कुटुंबियांना आयुष्यभर लागून राहिली.
या सगळ्या प्रकरणात लाॅर्ड आल्डिंग्टन (तेव्हा ब्रिगेडियर लो) यांचा महत्वाचा सहभाग होता. सगळ्या कोसॅक युद्धकैद्यांना ' सोविएत नागरिक ' असं सरसकट ठरवणं आणि त्यांना रशियनांच्या ताब्यात देणं हे त्यांच्याच आदेशावरुन घडलं. मी त्यांना माझ्या संशोधनाच्या संदर्भात दोनदा भेटलो. पण त्यांनी मुलाखत द्यायला नकार दिला. मला त्यांनी असं का केलं हे जाणून घ्यायचं होतंच आणि नंतर जेव्हा ब्रिटिश सैन्याचा हा बेजबाबदारपणा आणि त्याचे परिणाम उघड झाले तेव्हा त्यांना काय वाटलं हेसुद्धा समजून घ्यायचं होतं.
त्यांनी जरी पूर्ण मुलाखत द्यायला नकार दिला असला तरी या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्यांच्या मते त्यांनी Individual Cases will not be considered unless particularly pressed असं आपल्या आदेशात स्पष्टपणे म्हटलं होतं आणि जेव्हा ही गोष्ट घडली तेव्हा ते तिथे नव्हते. त्यांच्या हाताखालच्या लोकांनी या आदेशाचा स्वतःला हवा तसा अर्थ लावला त्याला ते जबाबदार असू शकत नाहीत.
इतिहासकार निकोलाय टाॅलस्टाॅय आणि इतर अनेकांनी या घटनेबद्दल अनेक सिद्धांत मांडले आहेत. टाॅलस्टाॅयचं नाव विशेष करुन घ्यायलाच पाहिजे कारण त्याने केलेल्या संशोधनाच्या आधारावरच मी माझं वृत्तचित्र बनवलं. टाॅलस्टाॅयने या संपूर्ण घटनेसाठी लाॅर्ड आल्डिंग्टननाच दोषी मानलं आणि त्यांच्यावर नाझींपेक्षाही वाईट असल्याचा आणि रशियन हस्तक असण्याचा आरोप केला. आल्डिंग्टननीही त्याच्याविरूध्द बदनामीचा खटला भरला आणि जरी ते त्यात जिंकले असले तरी लोकांमधली त्यांची आणि ब्रिटिश सैन्याची प्रतिमा मलीन झालीच.
मला स्वतःला मात्र यात काही तथ्य आहे असं वाटत नाही. आल्डिंग्टननी असं करण्याचं कारण इतकं रंगीबेरंगी नसून अत्यंत गद्य आहे - त्यांना कोसॅक युद्धकैद्यांचा प्रश्न लवकरात लवकर निपटून टाकायचा होता. त्यांच्या हातात त्यावेळी अनेक कामं होती आणि या युद्धकैद्यांचं काय होतं यात त्यांना अजिबात रस नव्हता.
अलेक्झांडर कर्क हा त्या वेळी अमेरिकन सैन्याचा राजकीय सल्लागार होता. त्याने अमेरिकन सरकारच्या परराष्ट्र खात्याला पाठवलेल्या एका केबलवरुन ब्रिटिश अधिका-यांची ही मनोवृत्ती आपल्याला समजून येते. कर्कने ही केबल १४ मे १९४५ या दिवशी पाठवलेली आहे. त्यात त्याने ब्रिटिश सैन्याचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी जनरल राॅबर्टसन याने घेतलेल्या काही निर्णयांबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.- : जनरल राॅबर्टसन यांनी या मुद्दयावर (कोसॅक आणि युगोस्लाव्ह युद्धकैद्यांचं भविष्य) ब्रिटिश आणि अमेरिकन भूमिकांमध्ये एकवाक्यता नसल्याबद्दल खंत व्यक्त केली पण हेही सांगितलं की आत्ता त्यांच्याकडे बरीच कामं आहेत त्यामुळे किती युगोस्लाव्ह आणि कोसॅक युद्धकैद्यांना मरण्यासाठी रशियनांच्या ताब्यात द्यायचं हे ठरवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे घेण्याची त्यांची इच्छा नाही.
यातला ' जबाबदारी घेण्याची इच्छा नाही ' हा सर्वात महत्वाचा भाग. ब्रिटिश अधिका-यांची मनोवृत्ती त्यातून अगदी स्पष्टपणे दिसून येते. रशियनांच्या ताब्यात गेलेल्या युद्धकैद्यांचं - मग ते जर्मन असोत, रुमानियन असोत, युक्रेनियन असोत की कोसॅक असोत - काय होणार आहे हे बाकीच्या दोस्तराष्ट्रांना आणि त्यांच्या सेनानींना चांगलंच माहित होतं. एका सैन्यदलासमोर शरणागती पत्करल्यावर त्या सैनिकांची जबाबदारी त्या सैन्यदलाची हे सगळ्या दोस्तराष्ट्रांनी ठरवलं होतं. पण काही ब्रिटिश अधिका-यांनी निव्वळ जबाबदारी टाळण्यासाठी या धोरणाला हरताळ फासला.
मारिया प्लेटोनाउ आणि लाॅर्ड आल्डिंग्टन यांना भेटल्यावर मला माहीत असलेल्या एका गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं - निर्णय घेणारे आणि त्यांचे परिणाम सोसणारे हे वेगळे असतात. एखाद्या निर्णयामुळे लोकांची आयुष्यं उध्वस्त झाली तरी तो निर्णय घेणा-यांना फरक पडतोच असं नाही!
क्रमशः
प्रतिक्रिया
18 Dec 2014 - 8:11 am | मुक्त विहारि
निर्णय घेणारे आणि त्यांचे परिणाम सोसणारे हे वेगळे असतात.
एखाद्या निर्णयामुळे लोकांची आयुष्यं उध्वस्त झाली तरी तो निर्णय घेणा-यांना फरक पडतोच असं नाही!
मनाला वरील वाक्य एकदम भिडले.
18 Dec 2014 - 12:15 pm | असंका
या उच्च नैतिक मुल्यांमुळे एक समाज म्हणून ब्रिटीशांबद्दल आदर बाळगायलाच लागतो. (-जरी लेखातून अनेक वेळा लेखकाचे मत दिसले आहे की, ब्रिटीश असणे म्हणजे कुणी वेगळे असणे नाही!!)
18 Dec 2014 - 5:34 pm | एस
एक - निदान आपल्यामुळे असे होऊ नये म्हणून सद्सद्विवेकबुद्धीने निर्णय घेणे; इतरांची हानी टाळण्यासाठी.
दोन - आपल्या आजूबाजूला घेतल्या जाणार्या निर्णयांचा डोळे व कान उघडे ठेऊन माग ठेवणे; स्वतःची हानी टाळण्यासाठी
दोन्ही बाबींसाठी प्रचंड धैर्य आणि खंबीरपणाची गरज आहे. पुभाप्र. आणि ट्रॉट्स्की व स्तालिनकाळातील रशिया ह्या विषयावर एक स्वतंत्र लेख नक्कीच येऊ द्यात.
18 Dec 2014 - 5:38 pm | प्रचेतस
अतिशय सुरेख लेखमाला.
18 Dec 2014 - 7:57 pm | मधुरा देशपांडे
नेहमीप्रमाणेच वाचनीय लेख.
18 Dec 2014 - 8:09 pm | डॉ सुहास म्हात्रे
माणूस सारासारविवेक आणि नीतिमत्ता वापरून निर्णय घेण्याऐवजी तात्कालिक परिस्थितीत सर्वात सोईचा वाटणारा निर्णय घेतो... हे तत्व सार्वकालिक आहे, हे (परत एकदा) पटवून देणारा लेख ! क्रूर पण सत्य !!! :(
पुभाप्र.
20 Dec 2014 - 7:36 pm | अजया
वाचनीय मननीय चिंतनीय लेख.पुभाप्र.