अंधार क्षण भाग ४ - सॅम्युएल विलेनबर्ग (लेख १६)

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
4 Dec 2014 - 8:59 am

अंधार क्षण - सॅम्युएल विलेनबर्ग

साल १९४२. मध्य युरोप.गोळीबार आणि बाँबस्फोट यांच्याशिवाय अजून एक आवाज त्यावेळी लोकांना ऐकू येत होता, तो म्हणजे आगगाड्यांचा.  असंख्य आगगाड्या लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात होत्या. पण या आगगाड्या नेहमीसारख्या नव्हत्या. त्यांमधून प्रवास करणारे लोक कधीच परत येणार नव्हते. या गाड्या लोकांना ऑशविट्झ, रॅव्हेन्सब्रुक, बेल्झेक, चेल्म्नो, सॉबिबॉर या आणि इतर मृत्युछावण्यांमध्ये घेऊन जात आणि अजून लोकांना तिथे घेऊन जाण्यासाठी  परत येत.

१९४२ च्या वसंतऋतूमध्ये सॅम्युएल विलेनबर्ग नावाचा १९ वर्षांचा ज्यू तरुण अशाच एका आगगाडीतून चालला होता. या वेळी नाझींनी ज्यूंच्या नरमेधाला अगदी योजनाबद्ध सुरुवात केलेली होती. एस्. एस्. चे सैनिक गावांमध्ये जाऊन ज्यू लोकांना घराबाहेर काढत आणि त्यांना अशा आगगाड्यांमध्ये कोंबून सरळ मृत्युछावण्यांमध्ये पाठवून देत. दक्षिण पोलंडमधील ओपतोव या खेड्यात सॅम्युएल राहात होता आणि त्याच्या गावातल्या जवळपास सगळ्याच ज्यूंना त्या गाडीमध्ये बसवण्यात आलं होतं.

आपलं काय होणार आहे हे प्रत्येकाला माहित होतं. नाझींच्या औद्योगिक स्तरावरच्या सामूहिक हत्यांच्या बातम्या त्यांच्या गावामध्येही लोकांनी ऐकलेल्या होत्या. जेव्हा जेव्हा एखादं स्टेशन येई तेव्हा गाडी धीमी होत असे. अशा वेळी स्टेशनवर उभे असणारे (प्रामुख्याने) कॅथाॅलिक पोलिश लोक ओरडत असत - " तुमचा आता साबण बनवला जाणार आहे!" (गॅस चेंबरमध्ये मारल्या जाणाऱ्या ज्यूंच्या शरीरातली चरबी  एस्. एस्.  जर्मन साबण कंपन्यांना विकत असे. हा  एस्. एस्. च्या उत्पन्नाचा एक प्रमुख स्रोत होता. ) तरीही आपण जिवंत राहू, आपल्याला गॅस चेंबरमध्ये पाठवलं जाणार नाही ही एक आशा लोकांच्या मनात असे. या आशेच्या जोरावरच लोक जिवंत राहात असत.

सॅम्युएल आणि त्याचे सहप्रवासी यांची रवानगी पोलंडची राजधानी वॉर्साच्या पूर्वेला असलेल्या  ट्रेब्लिंका नावाच्या मृत्युछावणीमध्ये झाली होती. या ठिकाणी ज्यूंना फक्त ठार मारण्यासाठीच आणलं जायचं. राइनहार्ड हायड्रिच हा अत्यंत खुनशी नाझी अधिकारी एस्. एस्. प्रमुख हेनरिख हिमलरचा उजवा हात होता.  मे १९४२ मध्ये झेकोस्लोव्हाक स्वातंत्र्यसैनिकांनी त्याची हत्या केली. त्याची स्मृती म्हणून एस्. एस्. ने ज्यूंच्या सामूहिक हत्येसाठी उभारल्या जाणाऱ्या सर्व यंत्रणेला ' ऑपरेशन राइनहार्ड ' हे नाव दिलं होतं. त्याच्याअंतर्गत उभारल्या गेलेल्या सर्व मृत्युछावण्यांमध्ये ट्रेब्लिंका ही सर्वात मोठी मृत्युछावणी होती - क्षेत्रफळाने नव्हे तर जेवढे लोक दररोज मारले जायचे त्यावरून. फक्त ६०० मीटर x ४०० मीटर एवढे क्षेत्रफळ असलेल्या या जागेत ८ लाख लोक मरण पावले. ऑपरेशन राइनहार्डमध्ये मरण पावलेल्या १६ लाख ज्यूंपैकी अर्धे इथेच मारले गेले. एवढी कमी जागा असल्यामुळे तिथे कैद्यांना आणलं की जास्तीत जास्त ३ तासांत त्यांना गॅस चेंबर्समध्ये नेलं जात असे. तिथलं रेल्वे स्थानक हेच मुळी मृत्युछावणीत होतं. 

पण ट्रेब्लिंकाची भयानकता ही निव्वळ तिथल्या मृतांच्या संख्येत नव्हती तर ज्या अलिप्ततेने नाझींनी ही सगळी प्रक्रिया एखाद्या कारखान्यासारखी योजनाबद्ध बनवली होती, ती  जास्त भयावह होती. १९४१ मध्ये रशियावर आक्रमण केल्यावर नाझींनी जिंकलेला सोविएत भूभाग ' ज्यू मुक्त ' करायला सुरुवात केली. एस्. एस्. ने या कामासाठी खास ' भरारी पथकं ' तयार केली होती (जर्मन भाषेत Einsatzgruppen). जर्मन सैन्याने एखादा भाग जिंकला की तिथल्या ज्यूंना ही पथकं गोळ्या घालून ठार मारत असत. हिमलरने जेव्हा ही सगळी प्रक्रिया पाहिली तेव्हा तिचा वेळखाऊपणा त्याच्या लक्षात आला. त्याशिवाय या पथकांच्या प्रमुखांनी ज्यूंना गोळ्या घालणा-यांच्या मानसिक स्थितीबद्दल हिमलरकडे तक्रार केली. त्यावर उत्तर म्हणून ट्रेब्लिंका आणि त्यासारख्या मृत्युछावण्या अस्तित्वात आल्या.
 
जानेवारी १९४२ मध्ये बर्लिनचं एक उपनगर वानसी येथे झालेल्या एका परिषदेत राइनहार्ड हायड्रिचने मृत्युछावण्या आणि गॅस चेंबर्सची कल्पना मांडली आणि हायड्रिचच्या  मृत्यूनंतर ती अंमलातही आणण्यात आली. 

ट्रेब्लिंकामध्ये १२-१५ जर्मन एस्.एस्. अधिकारी सर्व ' गोष्टींवर ' लक्ष ठेवत असत. त्यांच्या दिमतीला जवळजवळ १०० युक्रेनियन सैनिक होते आणि १००० ज्यू कैदीदेखील होते ज्यांना या सर्व सामूहिक हत्येच्या प्रक्रियेतली सर्वात घृणास्पद कामं करावी लागायची. कुठल्याही कामाला नकार देणं म्हणजे आपलं मरण ओढवून घेणंच होतं. 

ट्रेब्लिंका मृत्युछावणीचे दोन भाग होते: खालची छावणी, जिथे ज्यूंना गॅस चेंबर्ससाठी ' तयार ' केलं जात असे. त्यांच्या मालकीच्या वस्तू, अगदी अंगावरच्या कपड्यांपासून,  त्यांच्याकडून काढून घेतल्या जात आणि त्यांची डोकी भादरली जात (या केसांपासून बनवलेले टोप विकून एस्.एस्. पैसे मिळवत असे.)
दुसरा भाग म्हणजे वरची छावणी. इथे प्रत्यक्ष गॅस चेंबर्स आणि खुल्या शवदाहिन्या होत्या. हे दोनही भाग एका छोट्या बोगद्याने जोडलेले होते. दोन्हीही ठिकाणी - आॅशविट्झप्रमाणेच - सगळी कष्टाची कामं ही ज्यू कैद्यांना, ज्यांना सोन्डरकमांडो असं नाव होतं, करावी लागत. सर्वात भयावह कामं म्हणजे गॅस चेंबर्सच्या वापरानंतर आतली प्रेतं बाहेर आणणे आणि गॅस चेंबर्स साफ करणे. 

ह्या सोन्डरकमांडोंनाही काही महिन्यांनंतर याच गॅस चेंबर्समध्ये पाठवलं जात असे आणि नवीन कैदी त्यांची जागा घेत असत. हे सगळं जर्मन अधिका-यांच्या लहरीप्रमाणे होत असे.  त्यामुळे एखाद्या कैद्याची सोन्डरकमांडोमध्ये निवड होण्याची शक्यता फारच कमी असे तर ट्रेब्लिंकामध्ये आल्यापासून ३ तासांत गॅस चेंबरमध्ये जाण्याची शक्यता ९९% हूनही जास्त असे. 

पण सॅम्युएल विलेनबर्ग तिथे आल्यावर एक अघटित घडलं. त्या वेळेला तिकडे एकच गोंधळ उडाला होता. बावचळून गेलेल्या ज्यूंवर एस्.एस्. सैनिक लाठीमार करत होते. तेव्हा त्याने एका सोन्डरकमांडोचा आवाज ऐकला. तो त्यालाच बोलवत होता - " कुठून आलास तू?" सॅम्युएलने सांगितल्यावर तो म्हणाला, " तू गवंडीकाम करतोस आणि विटा रचू शकतोस असं सांग." 

सॅम्युएलने तसंच केलं. त्यामुळे एस्.एस्. पहारेक-यांनी त्याला गॅस चेंबरच्या रांगेतून बाहेर काढलं. त्या दिवशी त्याचं नशीब जोरावर होतं. जवळपास कुठेतरी बांधकामाच्या मजुरांची गरज होती. त्याच दिवशी त्या सोन्डरकमांडोकडे या नवीन आलेल्या ज्यूंच्या वस्तू ताब्यात घ्यायची जबाबदारी होती. त्याने सॅम्युएलचा जीव वाचवला. 

छावणीत आल्यावर सॅम्युएलने गवंडीकाम केलंच पण  त्याला सोन्डरकमांडो म्हणूनही काम करावं लागलं. ज्यूंचे कपडे, सामान, कागदपत्रं, दागिने, खाद्यपदार्थ - जे काही त्यांच्याकडून मिळेल ते सगळं जमा करणं आणि एस्.एस्.च्या ताब्यात देणं हे काम तो करत असे. कर्ट फ्रांझ हा तिथला एस्.एस्. अधिकारी होता. त्याचा चेहरा एखाद्या लहान मुलासारखा रेखीव असल्यामुळे त्याला ' बाहुला ' (पूर्व युरोपियन ज्यूंच्या यिडिश भाषेत Lalke) असं टोपणनाव होतं. प्रत्यक्षात मात्र तो अत्यंत हिंसक आणि खुनशी होता. बॅरी नावाच्या त्याच्या अवाढव्य सेंट बर्नार्ड कुत्र्याबरोबर तो फिरत असे आणि या दोघांचीही संपूर्ण छावणीत प्रचंड दहशत होती. बॅरी एक प्रशिक्षित कुत्रा होता. त्याला एखाद्या माणसावर सोडलं की तो त्याच्या गुप्तांगाचा आणि पार्श्वभागाचा लचका तोडत असे. त्यामुळे तो माणूस वेदनेने तळमळत आपले प्राण सोडत असे. आठवड्यातून २-३ वेळा फ्रांझ बॅरीला कैद्यांवर सोडत असे आणि तेही जेव्हा त्याची लहर लागेल तेव्हा. एखाद्या कैद्याने त्याच्याकडे नुसतं पाहिलं एवढं क्षुल्लक कारणही त्याला पुरेसं होतं. 

सोन्डरकमांडो म्हणून काम करणा-या ज्यूंना अक्षरश: ढोरमेहनत करावी लागायची पण या शारीरिक त्रासापेक्षा जो दररोजचा मानसिक त्रास होता तो जास्त भयंकर होता. हजारो ज्यू - लहान मुलं, तान्ही मुलं, स्त्रिया - या सगळ्यांना डोकी भादरून गॅस चेंबरमध्ये जाताना दररोज पाहणं आणि नंतर त्यांची प्रेतं बाहेर काढून त्यांची विल्हेवाट लावणं हे किती क्लेशदायक असेल याची कल्पना कुणालाही येणार नाही. 

असंच काम करताना एक दिवस सॅम्युएलला स्वत:च्या बहिणीचा कोट इतर कपड्यांमध्ये दिसला. त्याच्यासाठी तो उन्मळून टाकणारा क्षण होता, " मी तो कोट ओळखला. माझ्या आईने हिरवी लोकर वापरून त्याच्या बाह्या वाढवल्या होत्या. त्याच्याच बाजूला तिचा स्कर्टही मला सापडला. त्यावेळी काय वाटलं हे सांगणं कठीण आहे. अचानक मला जोरात किंचाळावंसं वाटलं. पण ते शक्य नव्हतं. मी माझी किंकाळी आतल्या आत जिरवून टाकली. त्या रात्रभर मी रडत होतो. त्याआधी कधीच मी रडलो नव्हतो. त्याआधी एकदा एक  माझ्याएवढा मुलगा तिथे आला होता आणि रडत होता. तेव्हा मी त्याला म्हणालो होतो - ' इथे कोणीही रडत नाही. फक्त आपला संताप दाबून ठेवतात.' पण आता मी स्वतः रडत होतो. एक कारण होतं आपल्या जवळच्या कोणालातरी कायमचं गमावल्याचं दु:ख. दुसरं कारण म्हणजे आपण काही करु शकत नाही हे समजल्यावर येणारा वांझोटा संताप! "

फ्रांझ स्टँगल हा ट्रेब्लिंकाचा मुख्य अधिकारी (कमांडंट) होता. त्याला ज्यूंना ' फसवायचा ' छंद होता. त्याने ज्यूंना सुरक्षित वाटावं आणि त्यांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत गाफील राहावं म्हणून अनेक आभास तयार केले होते. ट्रेब्लिंकाच्या रेल्वे स्थानकावर पुढच्या गाड्यांचं वेळापत्रक लावलेलं असे, जेणेकरून ज्यूंना वाटावं की आपण इथून पुढे कुठेतरी जाणार आहोत. छावणीच्या प्रवेशद्वाराजवळ फुलांचे ताटवे होते. ' चला लवकर, तुमचं आंघोळीचं पाणी थंड होईल ' असं एस्.एस्. अधिकारी नवीन आलेल्या ज्यूंवर ओरडत असत. 

जे अपंग किंवा वृद्ध असत, त्यांच्यात खालच्या छावणीतून वरच्या छावणीत चालत जाण्याएवढीही ताकद नसे. अशा लोकांना इस्पितळात ' उपचारांसाठी ' नेत असत. हे इस्पितळ एका मोठ्या इमारतीत होतं. त्याच्यावर रेड क्राॅसचा ध्वज लावलेला होता आणि तारांचं कुंपण होतं. उपचारांसाठी आलेल्या लोकांना तिथे असलेल्या बाकांवर बसवत असत आणि एकेकाला आत बोलवत असत. पण दरवाज्यातून आत गेल्यावर त्यांना कळत असे की आतमध्ये फक्त मोठे खड्डे आहेत आणि त्यामध्ये आधी ' उपचारांसाठी ' आलेल्या लोकांची प्रेतं रचून ठेवलेली आहेत. या खड्डयांच्या बाजूला हत्यारबंद  एस्.एस्. सैनिक उभे असत. ते या लोकांच्या डोक्यात गोळी घालून प्रेत खड्ड्यात फेकून देत असत. " नाझींनी दुष्टपणाची आणि क्रौर्याची परिसीमा जगाला दाखवून दिली. कोणाच्या मनात असा विचार येईल की जी जागा इस्पितळ म्हणून दाखवली आहे तिथे प्रत्यक्षात अपंग आणि आजारी लोकांना ठार मारलं जात असेल."

सॅम्युएल आणि सोन्डरकमांडोमधले त्याचे इतर सहकारी याबद्दल चर्चा करत असत. इतक्या मोठ्या प्रमाणावर सामूहिक हत्या कशा काय होऊ शकतात? इतर देश त्याविरूद्ध जर्मनीला जाब का विचारत नाहीत? आणि नाझी ज्यूंची हत्या का करत आहेत? - हे आणि इतर अनेक प्रश्न लोक स्वतःला आणि इतरांना विचारत असत आणि आपापल्या परीने त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्नही करत असत. एका प्रकारे हा त्यांनी आजूबाजूच्या विषण्ण करणा-या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी शोधलेला उपाय होता. 

आपण मानवी संस्कृतीच्या इतिहासाकडे एक साधा दृष्टिक्षेप जरी टाकला तरी आपल्याला कळेल की माणूस नेहमीच आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचा अर्थ शोधायचा प्रयत्न करतो. धर्म आपल्याला एक दृष्टिकोन देतो, एखादं तत्वज्ञान किंवा विचारधारा यांना पूर्णपणे वाहून घेतलं तर आपल्याला दुसरं उत्तर मिळतं. पण सॅम्युएल विलेनबर्गच्या मते हे सगळे सिद्धांत तिथे जिवंत मरण भोगणा-या लोकांसाठी कुचकामी होते. त्याचे एक शिक्षक प्रा. मेरिंग हेही सोन्डरकमांडोमध्ये होते. त्यांनी या सगळ्या हालअपेष्टांचा संदर्भ ज्यू आणि त्यांच्यावर मध्ययुगीन आणि त्याही आधी झालेल्या अत्याचारांशी लावला होता. पण सॅम्युएलसाठी असे विचार काही कामाचे नव्हते. 

सॅम्युएलने अशा परिस्थितीत तग कसा धरला आणि आपली इच्छाशक्ती कशी टिकवून ठेवली ते ठरवणं कठीण आहे पण आॅगस्ट १९४३ मध्ये झालेल्या सोन्डरकमांडो उठावात तो सहभागी झाला आणि त्याने स्वतःची यशस्वीरीत्या सुटका करुन घेतली. पुढे तो पोलिश प्रतिकारक संघटनेत भरती झाला आणि युद्ध संपल्यावर पोलंडच्या सैन्यात त्याला लेफ्टनंट म्हणून कमिशन मिळालं. १९५० मध्ये तो आपल्या सगळ्या उर्वरित कुटुंबासह इझराईलला निघून गेला. 

हे सगळं घडू शकलं कारण सॅम्युएलकडे काही अनुकूल गोष्टीही होत्या. मुख्य म्हणजे त्याचं वय. तरूण असल्यामुळे आपलं आयुष्य जगण्याची ऊर्मी त्याच्यात होती. पुढे काय होणार याचा विचार न करता त्याने सगळं लक्ष आज काय होतं आहे यावर केंद्रित केलं. त्याशिवाय तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर होता. पण हेही तितकंच खरं आहे की सोन्डरकमांडोमध्ये काम करणा-या इतरांकडेही हे गुण होते पण तरीही ते टिकाव धरू शकले नाहीत. सॅम्युएल स्वतः याचं उत्तर ' नशीब ' असं देतो. - " मी जिवंत राहिलो म्हणून मला अपराधी वाटत नाही आणि आपण काही विशेष केलं असंही वाटत नाही. माझं तिथे गॅस चेंबरमध्ये जाण्यापासून वाचणं हा निव्वळ नशिबाचा भाग होता. पण असे असंख्य प्रसंग आले जेव्हा मी मरू शकलो असतो. ते झालं नाही कारण निव्वळ नशीब. "

सॅम्युएलचं म्हणणं खरंच आहे. नशीब हा मुद्दा मृत्युछावण्यांमधून बचावलेल्या सर्वांच्या बाबतीत सामायिक होताच. पण मी जेव्हा सॅम्युएल विलेनबर्गला ट्रेब्लिंकामध्येच या चित्रीकरणासाठी भेटलो तेव्हा मला त्याने परिस्थितीला कसं तोंड दिलं त्याबद्दल अजून एक मुद्दा मिळाला. मी त्याला म्हणालो की जेवढी कठीण सत्वपरीक्षा त्याला द्यायला लागली, तशी कुठल्याही  इतर माणसाला द्यावी लागली असेल असं मला वाटत नाही. 

" अजिबात नाही, " तो म्हणाला, " इतरांना माझ्यापेक्षा जास्त त्रास झाला. मी प्रत्यक्ष गॅस चेंबरमध्ये काम केलं नाही. ज्यांना ते करावं लागलं त्यांनी फार सहन केलं असं मी म्हणेन. वेळप्रसंगी त्यांनी प्रेतांना गॅस चेंबरमधून काढून जाळलं आहे. हे काम जर १० मिनिटांत झालं नाही तर त्यांना कदाचित त्याच गॅस चेंबरमध्ये शिक्षा म्हणून पाठवलं गेलं असतं. त्यांना भोगावं लागलेलं दु:ख आणि त्रास नक्कीच माझ्यापेक्षा जास्त होते. "

यावरून मला कळलं की ट्रेब्लिंकामध्ये त्याने हाच विचार केला की माझ्यासाठी ही गोष्ट वाईट आहे पण इतर लोकांना माझ्यापेक्षाही जास्त सहन करावं लागतंय. जर ते जास्त वाईट आणि घृणास्पद कामं करु शकतात तर मी का नाही करु शकणार? या विचाराने त्याने ट्रेब्लिंकाच्या खच्ची करणा-या अंधा-या वातावरणात एक प्रकाशाचा कवडसा आपल्यापुरता शोधून काढला आणि त्याच्या आधारानेच तिथला संपूर्ण काळ व्यतीत केला. 

क्रमशः

इतिहासभाषांतर

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

4 Dec 2014 - 10:32 am | मुक्त विहारि

धड वाचवत पण नाही आणि धड सोडवत पण नाही.

तुर्तास इतकेच

अत्रन्गि पाउस's picture

4 Dec 2014 - 2:52 pm | अत्रन्गि पाउस

++111111

मधुरा देशपांडे's picture

4 Dec 2014 - 4:12 pm | मधुरा देशपांडे

असह्य...भयानक.. :(

पिंपातला उंदीर's picture

4 Dec 2014 - 4:17 pm | पिंपातला उंदीर

मज्जा आहे हो तुमच्या लेखणीत बोका राव . आवडल पण म्हणवत नाही . अस्वस्थ झालो . नाझी प्रवृत्ती पासून देश जितका दूर तितका बरा

मुक्त विहारि's picture

4 Dec 2014 - 9:01 pm | मुक्त विहारि

....कुठल्या देशाबद्दल म्हणत आहात?

तुमच्या सारक्या जंटलमन लोकांना पण जणरल नॉलेझ म्हाइत नाय काय?

आज अगदीच वाचवत नाही.भयानक सर्व...त्रासदायक आहे हे वाचणे...सुन्न.

आपल्या लेखणीला आणि मानसिक कुवतीला सलाम!

बबन ताम्बे's picture

4 Dec 2014 - 4:48 pm | बबन ताम्बे

आपल्याकडे जसे भारत पाकीस्तान असे वैमनस्य आहे (फाळणीमुळे आणि त्यात झालेल्या अत्याचारांमुळे), किंवा जपान-चिन, तसे इस्त्राईल आणि जर्मनी मधे वितुष्ट आहे असे कधी वाचनात आले नाही. की आहे? ज्युंचा जर्मनांवर अजून राग आहे?

ज्युंचा जर्मनांवर अजून राग आहे?

नाही.

बोका-ए-आझम's picture

4 Dec 2014 - 5:39 pm | बोका-ए-आझम

नाही. राग आहे असं म्हणता येणार नाही. पण संबंध अगदी सौहार्दपूर्ण आहेत असंही नाही. इझराईल आणि पश्चिम जर्मनी यांच्या संबंधात थोडी तेढ १९७२ च्या म्युनिक आॅलिंपिकनंतर आली होती कारण ज्यू खेळाडू १९३६ च्या बर्लिन आॅलिंपिकनंतर प्रथमच जर्मन भूमीवर खेळायला उतरत होते, आणि पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी इझरेली खेळाडूंवर हल्ला केला. ओलिस म्हणून ठेवलेले सगळे इझरेली खेळाडू मारले गेले आणि इझराईल सरकारने पश्चिम जर्मन सरकारने हा प्रश्न नीट हाताळला नाही अशी टीका केली. पश्चिम जर्मनीत रेड ब्रिगेड नावाची अतिरेकी संघटना होती. त्यांनी PLO (Palestinian Liberation Organization ) ला आर्थिक मदत म्हणून जर्मनीत अपहरणाचे अनेक गुन्हे केले होते आणि हे पैसे PLO ने इझराईलविरुद्ध वापरले. त्यामुळेही त्यांच्यात थोडी तणातणी होती पण अगदी टोकाचं असं काही नाही.

प्रचेतस's picture

4 Dec 2014 - 5:03 pm | प्रचेतस

खिळवून ठेवणारी लेखनशैली. भयानक असूनही वाचनीय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Dec 2014 - 7:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

भयानक असला तरी हा इतिहास आहे आणि त्याबद्दल कुतुहल आहे. दु:खद आणि किंवा लाजिरवाणा इतिहास लपवून ठेवण्याची धडपड करण्यापेक्षा त्याला सामोरे गेले तर भविष्यात तश्या गोष्टींची पुनरुक्ती कशी टाळता येण्याची शक्यता वाढते. अर्थात, भविष्यातला एखादा कमकुवत क्षण माणसातला पशू दुसर्‍या एखाद्या नविन प्रकारे बाहेर काढणारच नाही असे नाही.

पुभाप्र.

अर्धवटराव's picture

4 Dec 2014 - 9:55 pm | अर्धवटराव

वर्तमानात देखील असली हत्याकांडं चालु असतील जगाच्या पाठिवर. वाचुन देखील मळमळायला होतय, प्रत्यक्ष्य काय परिस्थिती असेल :(

हवालदार's picture

4 Dec 2014 - 10:39 pm | हवालदार

सुभाषबाबू वाट चुकले होते हे कळते आणि आदर नाही म्हन्टले तरी थोडा कमी होतोच. :(

बोका-ए-आझम's picture

5 Dec 2014 - 1:04 am | बोका-ए-आझम

असहमत.एकतर मृत्युछावण्या नाझींनी गुप्त ठेवल्या होत्या. आॅशविट्झ, चेल्म्नो वगैरे मृत्युछावण्या रशियन सैन्याने मुक्त केल्या. ट्रेब्लिंकासारख्या छावण्या नाझींनी स्वत: नष्ट केल्या. बेल्झेकसारख्या छावण्या ब्रिटिशांनी मुक्त केल्या. सांगायचा मुद्दा हा की पाश्चात्त्य जगाने जरी मृत्युछावण्यांबद्दल ऐकलं असलं तरी प्रत्यक्ष पुरावे युद्धाच्या शेवटच्या काळात सापडले.
अजून एक म्हणजे सुभाषबाबूंनी जर्मनी आणि जपानशी मैत्री करण्याचं कारण म्हणजे हे दोघेही ब्रिटिशांचे शत्रू होते. सुभाषबाबूंनी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या चाणक्यनीतीचं पालन केलं, जे ब्रिटिशांनीही केलं - रशियाला जर्मनीविरुद्ध पाठिंबा देऊन.
त्यामुळे सुभाषबाबूंना वाट चुकलेले म्हणणं बरोबर होणार नाही.

हवालदार's picture

5 Dec 2014 - 3:25 am | हवालदार

तुम्हाला खरेच वाटते कि त्यांना माहिती नसेल? किंवा जपान्यांचे चिन्यान्वरील अत्यचार देखिल यांना माहिती नसतिल ? आणि तसेच जर असेल तरी चाणक्यनीती?

नशिबाने जपानने पर्लहार्बरवर हल्ला केला आणि त्याचवेळी रशियातील युध्द लाम्बले. जर या दोन्ही गोश्टी झाल्या नसत्यातर याच कथा काय स्वरूपत आल्या असत्या आणि भारतातही काय झाले असते हे पहाणे रोचक ठरले असते. गान्धीजीनी अनेक चुका केल्याच पण या वेळी मात्र योग्य निर्णय घेतला होता.

त्यामुळे अवान्तराबद्दल क्षमस्व

बोका-ए-आझम's picture

5 Dec 2014 - 10:10 am | बोका-ए-आझम

सुभाषबाबूंचा हेतू हा भारताचं स्वातंत्र्य होता. आणि अत्याचारांबद्दल बोलायचं तर दोस्त राष्ट्रे काही धुतल्या तांदळासारखी स्वच्छ नव्हती. सुभाषबाबुंसाठी भारताचं स्वतंत्र होणं इतकं महत्त्वाचं होतं की जर्मनी आणि जपान यांची मदत घ्यायला ते तयार झाले. त्यावरून त्यांची प्रखर स्वातंत्र्यनिष्ठाच दिसून येते. नाझी अत्याचार किंवा जपानी अत्याचार हे क्षम्य नाहीत पण त्याच न्यायाने ब्रिटीश साम्राज्य जे भारताचं शोषण करत होतं तेही बरोबर नव्हतं आणि सुभाषबाबू त्याविरुद्ध लढत होते. त्यांचा हेतू प्रामाणिक होता आणि त्यांनी साधनशुचिता सांभाळली नसेल पण युद्धजन्य परिस्थितीत ते बरोबर होते असं मला वाटतं.

टवाळ कार्टा's picture

5 Dec 2014 - 10:18 am | टवाळ कार्टा

दोस्त राष्ट्रे काही धुतल्या तांदळासारखी स्वच्छ नव्हती.

युध्धात फक्त जिंकणे महत्वाचे असते...तत्वे वगैरे चोचले जिंकल्यावर"च" करता येतात

हाडक्या's picture

5 Dec 2014 - 4:54 pm | हाडक्या

अगदी अगदी..

तत्वे वगैरे चोचले जिंकल्यावर"च"

अन्यथा तत्वे म्हणजे वांझोट्या संतापाची गळवे बनून राहतात.

पण हे म्हणजे घरात उन्दराच त्रास होतो म्हणुन बाहेरच्या जन्गलातून पुर्ण माहिती नसलेला साप आणण्यातला प्रकार होता. आणि तुम्ही भाषान्तरित केलेली प्रकरणे वाचता तो भयानक साप होता हे ही तितकेच खरे. असुदे बरेच अवान्तर झाले. नाहीतर धागा भलतिकडेच जायचा.

हाडक्या's picture

4 Dec 2014 - 10:46 pm | हाडक्या

यावरून मला कळलं की ट्रेब्लिंकामध्ये त्याने हाच विचार केला की माझ्यासाठी ही गोष्ट वाईट आहे पण इतर लोकांना माझ्यापेक्षाही जास्त सहन करावं लागतंय. जर ते जास्त वाईट आणि घृणास्पद कामं करु शकतात तर मी का नाही करु शकणार? या विचाराने त्याने ट्रेब्लिंकाच्या खच्ची करणा-या अंधा-या वातावरणात एक प्रकाशाचा कवडसा आपल्यापुरता शोधून काढला आणि त्याच्या आधारानेच तिथला संपूर्ण काळ व्यतीत केला.

बोक्या.. हे खरंच जबरी आहे. छळछावण्यांची अस्वस्थ करणारी खूप सारी वर्णने वाचली आहेत, पाहिली आहेत पण सोण्डरकमांडोज बद्दल हा प्रश्न नेहमीच राहील.

एक प्रकाशाचा कवडसा निदान आपल्यापुरता तरी शोधणे... मला वाटतं जीवनाच्या ओढीचं तत्त्वज्ञानच इथे व्यक्त झाले आहे.