अंधार क्षण - पेट्रास झोलिओंका
२२ जून, १९४१ या दिवशी नाझी जर्मनीने सोविएत रशियाविरुद्ध आपल्या महत्वाकांक्षी 'आॅपरेशन बार्बारोसा ' ची सुरूवात केली आणि जगातली आजवरची सर्वात मोठी युद्ध आघाडी - पूर्व आघाडी उघडली गेली. जगातल्या सर्वात भीषण लढाईला सुरुवात झाली. त्यावेळी जवळजवळ सगळा पश्चिम युरोप हिटलरच्या पायाशी लोळण घेत होता. दोनच शत्रू जिंकायचे राहिले होते - ब्रिटन आणि रशिया. सुरूवातीला हिटलरने हवाई सामर्थ्याच्या जोरावर ब्रिटन जिंकायचा प्रयत्न केला पण ते जमत नाही हे कळल्यावर त्याने आपलं लक्ष पूर्वेकडच्या सोविएत रशियाकडे वळवलं. आता त्याला नुसताच सोविएत भूभाग जिंकायचा नव्हता, तर तो 'ज्यू-मुक्त ' करायचा होता. जर्मन सैन्याने एखादं सोविएत शहर किंवा गाव जिंकलं की पाठोपाठ एस्. एस्. च्या खास तुकड्या तो भाग ताब्यात घेत आणि तिथल्या सर्व ज्यूंची गठडी वळण्यात येई. अजूनपर्यंत ज्यूंना सरसकट मृत्युछावणीत पाठवणं सुरु झालं नव्हतं. त्यामुळे स्थानिक लोकांची मदत घेऊन एस्. एस्. तो भाग ' ज्यू-मुक्त ' करत असे.
त्या वर्षीच्या उन्हाळ्यात आणि शरदऋतूत २४ वर्षांच्या पेट्रास झोलिओंकाने एका अत्यंत हिडीस आणि भयानक गुन्ह्यात भाग घेतला - ज्यू पुरूष, स्त्रिया आणि लहान मुलं यांची हत्या.
सेव्हन्थ फोर्ट, काउनास, लिथुआनिया - या ठिकाणी १९९० च्या दशकाच्या मध्यावर मी त्याची मुलाखत घेतली. याच ठिकाणी साधारण ५० वर्षांपूर्वी नाझींनी ज्यूंची बेछूट कत्तल केली होती. आज तिथे लिथुआनियन सैन्याचा मोठा तळ आहे.
त्याच्याकडे आमच्यासाठी जेमतेम एक तास होता. त्याची पत्नी बाजारात खरेदीसाठी गेली होती आणि ती परत आल्यावर दोघेही त्यांच्या खेडेगावातल्या घरी जाणार होते. आमचं नशीब जोरावर होतं कारण तो आम्हाला मुलाखत द्यायला कसाबसा तयार झाला होता.
नक्की कोणत्या कारणांमुळे तो ज्यूंचं शिरकाण करायला तयार झाला हे तर मला जाणून घ्यायचं होतंच पण प्रत्यक्ष गोळ्या झाडताना त्याच्या मनात काय विचार होते, तेही समजून घ्यायची इच्छा होती.
लिथुआनियामध्ये ज्यू विरोध ही काही नवी गोष्ट नव्हती. एक कारण म्हणजे बहुसंख्य ज्यू हे इतर नागरिकांपेक्षा सुखवस्तू होते त्यामुळे मत्सर हा एक मुद्दा होताच. नाझी आक्रमणाच्या एक वर्ष आधी झालेल्या एका घटनेने लिथुआनियन नागरिकांच्या मनातला ज्यू विरोध विद्वेषात बदलला. १९४० मध्ये धाकदपटशा दाखवून स्टॅलिनच्या रेड आर्मीने लिथुआनिया, लाटव्हिया आणि एस्टोनिया हे तीनही बाल्टिक देश आपल्या टाचेखाली आणले. हे करताना या देशांमधल्या नागरिकांवर त्यांनी अनन्वित अत्याचार केले. या अत्याचारी सोविएत
अधिका-यांपैकी काही जण ज्यू होते. त्यामुळे सोविएत रशिया ज्यू-धार्जिणा असल्याचा गैरसमज बाल्टिक राष्ट्रांत पसरला. " जेव्हा रशियन सैन्य आणि नंतर त्यांचं बाहुलं असलेलं सरकार इथे आलं तेव्हा त्याविरूद्ध देशात प्रचंड असंतोष आणि संताप होता," झोलिओंका म्हणाला, " त्यावेळी बरेच ज्यू त्या सरकारमध्ये मोठ्या अधिकाराच्या पदांवर होते. पोलिसांमध्येही बरेच ज्यू होते. त्यांनी अनेक क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक आणि शिवाय शिक्षक आणि प्राध्यापकांचाही छळ केला. "
१९४१ मध्ये जेव्हा नाझी आक्रमणाला सुरुवात झाली तेव्हा सर्वप्रथम बाल्टिक देश त्यांच्या ताब्यात गेले. नाझींना ज्यूंना संपवायचंच होतं. सर्वात पहिले ज्यू पुरूष आणि नंतर स्त्रिया आणि मुलं असा त्यांचा क्रम होता.
जर्मन एस्. एस्. आणि झोलिओंकासारखे त्यांचे हस्तक ज्यूंना त्यांच्या घरांमधून बाहेर काढून शहरापासून दूर - एखाद्या खेडेगावात घेऊन जात. तिथे आधीच मोठे खड्डे खणून ठेवलेले असत. आपल्याला नक्की कशासाठी नेलं जात आहे हे बहुसंख्य ज्यूंना माहित असे. आपले पैसे नाझींच्या हाती लागू नयेत म्हणून बरेचसे लोक ते पैसे रस्त्यात फेकून देत असत. एकदा का ते खड्ड्यांच्या ठिकाणी पोचले की त्यांना आपले सर्व कपडे काढण्याचा आदेश देण्यात येई. बरेचजण अशा वेळी आपल्याजवळचे उरलेसुरले पैसे, दागिने, वगैरे तिथे जमा झालेल्या ' प्रेक्षकांकडे ' फेकत असत. नंतर त्यांना खड्ड्यांच्या कडेला उभं करून गोळ्या घालत आणि खड्डा प्रेतांनी पूर्ण भरला की मग त्यावर माती लोटून तो बुजवत असत. मग पुढच्या लोकांसाठी नवीन खड्डे खणत असत.
झोलिओंकाने सांगितलं की त्याने आणि त्याच्या सहका-यांनी अनेक वेळा ज्यूंना त्यांच्या घरातून किंवा त्यांच्या
' खास ' वसाहतींमधून (ज्यू घेट्टो) बाहेर काढलं, खड्ड्यांपर्यंत नेलं, त्यांना त्यांचे कपडे काढण्याचा आदेश दिला आणि नंतर त्यांना गोळ्या घातल्या.
" आम्हाला माहीत होतं की जर तुम्ही ज्यू असलात तर तुम्ही मरणारच. त्यामुळे आम्ही अजिबात वेळ न घालवता त्यांना गोळ्या घालून मोकळे व्हायचो. कधीतरी मरताना मुद्दाम आम्हाला चिडवण्यासाठी ज्यूसुद्धा ओरडायचे -स्टॅलिन चिरायू होवो! "
दारू आणि सामूहिक हत्या यांचा जवळचा संबंध मला इथे पण दिसला. हे सगळं काम - ज्यूंना बाहेर काढणं, त्यांना खड्ड्यांपर्यंत नेणं आणि नंतर त्यांना ठार मारणं - करत असताना आणि त्याच्या नंतरही झोलिओंका आणि त्याचे सहकारी पिऊन तर्र असत.
" दारू प्यायल्यावर प्रत्येक माणूस शूर असतो. आमचं दिवसभराचं ' काम ' आटपून जेव्हा आम्ही आमच्या लिथुआनियन सैन्यतळावर परत जायचो तेव्हा आम्हाला ते पाहिजे तेवढी व्होडका पिऊ द्यायचे. पिण्याचं एक कारण हेही होतं की मग आपण कोणाला कसं मारलं हे आठवायचं नाही आणि त्याचा त्रासही व्हायचा नाही."
इथे एक गोष्ट सांगायला पाहिजे की झोलिओंकावर कुणीही, अगदी नाझींनी सुद्धा, ज्यूंना मारायची सक्ती किंवा जबरदस्ती केली नव्हती. तो आणि त्याचे सहकारी हे स्वतःहून यात सहभागी झाले होते. आणि आज, या हत्याकांडाला ५० वर्षे उलटून गेल्यानंतर आणि ज्यूंबद्दलच्या जागतिक सहानुभूतीच्या लाटेनंतर तो आता आपला ज्यू द्वेष मोजूनमापून व्यक्त करतो.
" माझ्या सहका-यांपैकी बरेच लोक असं म्हणायचे की ज्यूंची हीच लायकी आहे. त्यांनीही आमचा छळ केलेला आहे. अत्यंत स्वार्थी असतात ज्यू. त्यामुळे त्यांना मारणं हेच बरोबर आहे. "
पण त्याने आपला व्यक्तिगत ज्यू द्वेष लपवण्याचा आणि सहका-यांवर जबाबदारी ढकलायचा कितीही प्रयत्न केला, तरी त्यात तो पूर्ण यशस्वी झाला नाही. दोन-तीन वेळा त्याच्या ख-या भावना बाहेर आल्याच. त्याने स्वतःचं वर्णन ' खरा देशभक्त लिथुआनियन ' असं केलं आणि हे ठासून सांगितलं की त्याने कधीच इतर देशबांधवांवर गोळ्या चालवल्या नाहीत, मारलं तर फक्त ज्यूंना. (त्याने मारलेले ज्यू हे त्याच्याच देशातले, लिथुआनियातले होते. पण त्याच्या बोलण्यात या गोष्टीचा उल्लेख कधीच आला नाही.) जर ज्यू नसलेल्या लिथुआनियन लोकांवर गोळ्या झाडाव्या लागल्या असत्या तर - या प्रश्नावर त्याने ताबडतोब उत्तर दिलं - अजिबात नाही. तो पुढे असंही म्हणाला की एक चिंता त्याच्या मनात सतत असायची की त्याला निर्दोष, निरपराधी लोकांवर गोळ्या चालवायला तर सांगणार नाहीत? इथे निरपराधी किंवा निर्दोष म्हणजे जे ज्यू नाहीत ते. त्याच्या लेखी ज्यू पुरूष किंवा स्त्रिया तर सोडा, लहान मुलंही निर्दोष किंवा निरपराधी नव्हती.
हा ज्यू विद्वेष हे झोलिओंका आणि त्याच्या सहका-यांच्या या हत्याकांडातील सहभागाचं एक कारण होतं. दुसरं कारण म्हणजे हाव. " जर्मन्स तर ज्यूंकडे असलेली प्रत्येक सोन्याची वस्तू काढून घ्यायचे. अगदी तोंडातले दातसुद्धा सोडायचे नाहीत. हातातली घड्याळं, अंगठ्या, गळ्यातल्या चेन्स वगैरे सगळं काढून घ्यायचे. आमच्या एका वाॅरंट आॅफिसरकडे अशा वस्तूंनी भरलेली एक मोठी बॅग होती." आपण स्वतः मात्र ज्यूंची कुठलीच वस्तू घेतली नाही असं त्याने ठासून सांगितलं. एस्.एस्. प्रमुख हेनरिख हिमलरने असा स्पष्ट आदेश दिला होता की ज्यूंच्या हत्याकांडातून ज्या काही वस्तू मिळतील त्यावर फक्त नाझी राजवटीचाच हक्क आहे. पण असं असतानाही अनेक एस्.एस्. अधिकारी आणि त्यांचे हस्तक मेलेल्या ज्यूंच्या संपत्तीने आपली तुंबडी भरत होते.
आमची मुलाखत जेव्हा संपत आली तेव्हा झोलिओंकाच्या बोलण्यावरुन मला त्याने या हत्याकांडातील का भाग घेतला या संदर्भातले दोन धागेदोरे मिळाले. एक म्हणजे त्याच्या मनात ही ' उत्सुकता ' होती की आपण जेव्हा एखाद्या माणसावर बंदूक रोखून चाप ओढतो तेव्हा नक्की काय होतं. उत्सुकता हे माणसाच्या प्रगतीचं मूळ कारण आहे हे सर्वमान्य आहे पण ते अधोगतीचंही कारण होऊ शकतं, कारण उत्सुकता ही नेहमीच सकारात्मक नसते, ती नकारात्मकही असू शकते. एका लहान मुलांचीही निर्ममतेने हत्या करणा-या मारेक-याने तसं करण्याचं कारण उत्सुकता असावं हे मात्र मला अनपेक्षित होतं!
दुसरं म्हणजे तरुण वय. बोलण्याच्या ओघात तो असं म्हणाला की - ' तारुण्यात लोक अनेक चुका आणि मूर्खासारख्या गोष्टी करतात.' हे लक्षात घेणं आवश्यक आहे की जेव्हा या केस पांढरे झालेल्या, तुमच्या-माझ्या आजोबांसारख्या दिसणा-या माणसाने ज्यूंची हत्या केली तेव्हा तो ऐन विशीतला तरूण होता. आजही हेच सत्य आहे की संपूर्ण जगात बहुसंख्य हिंसक गुन्हे हे १८ ते २५ या वयोगटातल्या लोकांकडूनच होतात. झोलिओंकाही त्याच वयोगटातील होता.
मुलाखत संपली तेव्हा आम्हाला कळलं की लिथुआनियन सैन्यातल्या अधिका-यांसाठी झोलिओंका म्हणजे आदराचा विषय आणि स्फूर्तिस्थान आहे. लिथुआनियन सैन्यानेच ह्या मुलाखतीसाठी सगळी जुळवाजुळव केली होती. झोलिओंका आपल्या पत्नीसोबत जात असताना त्याच्या पाठमो-या आकृतीकडे बघत एक विशीतलाच सैन्याधिकारी मला म्हणाला, " तुम्ही पत्रकार आहात पण तुम्हाला मूळ मुद्दाच कळलेला नाही. आम्ही ज्यूंचं काय केलं तो प्रश्नच येत नाही. प्रश्न हा आहे की ज्यूंनी हे आमचं काय केलं?"
क्रमश:
प्रतिक्रिया
13 Oct 2014 - 8:11 am | मुक्त विहारि
माहिती मिळत आहे...
13 Oct 2014 - 8:54 am | खटपट्या
हेच म्हणतो !!
13 Oct 2014 - 1:41 pm | इनिगोय
खरोखरच.. ज्यूंनी यांचं एवढं काय नुकसान केलं होतं?
13 Oct 2014 - 1:55 pm | एस
तत्कालीन युरोपात असलेल्या सार्वत्रिक ज्यू-विरोधाची पार्श्वभूमी लक्षात घेतल्याशिवाय अगदी हिटलरच्याही युद्धखोरीचे विश्लेषण करता येणे पूर्णांशाने शक्य नाही. ज्यूंचा जितका छळ नाझींनी दुसर्या महायुद्धाच्या दरम्यान केला तसाच छळ रशियातही होत असे.
13 Oct 2014 - 1:51 pm | मधुरा देशपांडे
वाचायला क्लेषदायक आहे हे सगळं. छान लिहित आहात. पुभाप्र
13 Oct 2014 - 3:00 pm | बोका-ए-आझम
झार (रशियन सम्राट) पहिला अलेक्झांडर याच्या काळात रशियामध्ये ज्यूंवर सामूहिक हल्ले, जाळपोळ, लुटालूट असे प्रकार झाले. त्यांना Pogroms असं नाव आहे. नाझींचं वैशिष्ट्य हे की याआधी कुठल्याही देशाच्या सरकारने ज्यूंची कत्तल हे आपलं अधिकृत धोरण बनवलं नव्हतं, जे नाझींनी केलं.
13 Oct 2014 - 3:07 pm | बोका-ए-आझम
ज्यू द्वेषाची परंपरा युरोपमध्ये फार जुनी आहे. शेक्सपिअरनेही त्याचा The Merchant of Venice मधला खलनायक शायलाॅक हा ज्यूच रंगवलेला आहे. आपल्या इथल्या मारवाड्यांसारखे ज्यू हे व्यापारात हुशार होते आणि निर्वासित म्हणून जरी ते कुठे गेले तरी ते व्यापारात आपला जम बसवत. हे एक कारण आहे, त्यांच्यावर लोकांचा राग असण्याचं.
13 Oct 2014 - 3:20 pm | एस
हिटलरने माइन काम्फ या आत्मचरित्रात ज्यूंचे वर्णन हे विधिनिषेध नसणारे, प्रसंगी स्त्रियांचाही व्यापार करणारे असे केले आहे. काळाबाजार करून नफा कमवण्यात ज्यू व्यापार्यांचा हात कुणी धरू शकत नसे असे तत्कालीन साहित्यातील ज्यूंचे उल्लेख पाहिले की दिसते.
13 Oct 2014 - 4:03 pm | बोका-ए-आझम
पण जे खरोखरच गब्बर ज्यू होते त्यांच्याकडून नाझींनी खंडणी उकळली आणि त्यांना जर्मनी सोडून जाऊ दिलं. जे मारले गेले ते मध्यमवर्गीय, पांढरपेशा ज्यू. पोलंड हा ज्यू संस्कृतीचं केंद्र होता. तिथले ६०% हून अधिक ज्यू नाझींनी मारले.
13 Oct 2014 - 4:03 pm | बोका-ए-आझम
पण जे खरोखरच गब्बर ज्यू होते त्यांच्याकडून नाझींनी खंडणी उकळली आणि त्यांना जर्मनी सोडून जाऊ दिलं. जे मारले गेले ते मध्यमवर्गीय, पांढरपेशा ज्यू. पोलंड हा ज्यू संस्कृतीचं केंद्र होता. तिथले ६०% हून अधिक ज्यू नाझींनी मारले.
15 Oct 2014 - 12:35 am | पैसा
भयानक आहे सगळं! निखळ विद्वेषालाही काही तात्विक आधार आहे अशा भ्रमात हे लोक कसे राहू शकतात? :(