अंधार क्षण भाग १ - सामूहिक हत्या (लेख २)

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
9 Oct 2014 - 8:02 am

अंधार क्षण भाग १ - सामूहिक हत्या

दुस-या महायुद्धात सहा कोटींहून जास्त लोक मारले गेले - आजवरच्या सर्व संघर्षांमध्ये सर्वात जास्त. हे शक्य होण्यामागचं एक मुख्य कारण म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा माणसांना मारण्यासाठी झालेला वापर. या भागात एकूण तीन मुलाखती आहेत. त्यावरुन तुमच्या हे लक्षात येईलच की विसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात माणसं मारणं हे  अगदीच सहजसुलभ झालं होतं - तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने आणि मानसशास्त्रीय दृष्टीनेही. आॅस्कर ग्रोएनिंग आणि पाॅल माँटगोमेरी - ज्यांच्या मुलाखती या भागात आहेत - या दोघांनीही तंत्रज्ञानामुळे आपण कसे स्वतःला आपल्या बळींपासून वेगळे ठेवू शकलो त्याचं वर्णन केलं आहे.

मुलाखतींधला हा भाग खूपच क्लेशदायक आहे कारण माणूस किती सहजपणे दुस-याचा जीव घेऊ शकतो हे आपल्याला कळतं. जरा विचार करा - तुमचा परमशत्रू, साता जन्माचा दावेदार - फक्त एक बटन दाबून तुम्ही नष्ट करु शकाल. कुठलीही अप्रिय आठवण नाही, कुठलीही विषण्णता नाही, ना खंत ना खेद. तुम्हाला कदाचित असं वाटेल की तुम्ही कोणाला मारलंच नाही. पाॅल माँटगोमेरीने अत्यंत समर्पक शब्दांत त्याचं वर्णन केलंय - व्हिडिओ गेम.

या सर्व अत्याधुनिक तंत्राने निव्वळ माणसं मारणं सोपं केलेलं नाही तर गुन्हा आणि त्याचं उत्तरदायित्व यांच्याविषयी मूलभूत प्रश्नही उपस्थित केलेले आहेत.

या भागातल्या तीन व्यक्तींपैकी पेट्रास झोलिओंका हा सरळसरळ दोषी होता कारण त्याने हातात बंदूक घेऊन आपल्यासमोर उभ्या लोकांवर गोळ्या झाडल्या होत्या. त्यामुळेच त्याला युद्धानंतर वीस वर्षांची शिक्षा झाली. पण आॅस्कर ग्रोएनिंगचं काय? तो नाझींची कुप्रसिद्ध मृत्युछावणी आॅशविट्झमध्ये एक व्यवस्थापक होता. जरी त्याने प्रत्यक्षात कोणालाही ठार मारलं नाही तरी मृत्यूचा कारखाना असलेल्या आॅशविट्झमध्ये ज्यूंच्या नरमेधाला त्याने थोडा तरी हातभार लावला होता.

शुत्झ स्टाफेल (एस्. एस्.) या नाझी संघटनेकडे नाझी राजवटीतल्या सर्व छळछावण्या आणि मृत्युछावण्यांची जबाबदारी होती. युद्धानंतर विजेत्या दोस्तराष्ट्रांनी नाझी पक्ष आणि त्याच्याशी संबंधित सर्व संघटना - एस्.एस्., गेस्टापो, हिटलर यूथ आणि  इतर अनेक - या गुन्हेगारी संघटना असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे या संघटनांचं निव्वळ सदस्यत्व हाही गुन्हा होता. तरीही ग्रोएनिंगसह जवळजवळ ८५% शुत्झ स्टाफेल सदस्यांना - जे आॅशविट्झमध्ये काम करत होते - कुठलीही शिक्षा झाली नाही, अगदी एक दिवसाचाही तुरुंगवास भोगावा लागला नाही कारण प्रत्येक विजेत्या राष्ट्रातल्या न्यायमंडळांनी असं ठरवलं की आॅशविट्झमधल्या बहुतांश एस्.एस्. सदस्यांनी स्वतः व्यक्तिगतरीत्या कुणाचीही हत्या केलेली नाही. या हत्या तंत्रज्ञानामुळे झालेल्या आहेत आणि तुम्ही गॅस चेंबरवर खटला कसा भरणार? हे ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतो - जर उद्या एखाद्या राजवटीने असं तंत्रज्ञान विकसित केलं की ज्यामुळे मानवी सहभागाशिवाय तुम्हाला शत्रूच्या असंख्य नागरिकांना ठार मारता येईल, तर काय कोणीच त्याला जबाबदार असणार नाही?

यानंतरचा महत्वाचा प्रश्न म्हणजे कोण दोषी आणि कोण निर्दोष हे ठरवण्याचा. नाझींनी आणि अनेक दोस्तराष्ट्रांमधल्या नागरिकांनीसुद्धा असा मुद्दा मांडला आहे की नाझींनी गॅस चेंबरमध्ये लोकांची विषारी वायूने हत्या करणं आणि दोस्तराष्ट्रांच्या हवाईदलांनी बाँबफेक करुन जर्मन आणि जपानी नागरिकांना मारणं यात तसा काहीच फरक नाही. ग्रोएनिंगनेही हा मुद्दा आपल्या मुलाखतीत उपस्थित केला आहे. आता नाझींनी ज्या लोकांना गॅस चेंबर्समध्ये मारलं ते सर्वजण नाझींनी आपल्या राक्षसी महत्वाकांक्षेपायी जगावर लादलेल्या युद्धाचे बळी होते आणि दोस्तराष्ट्रांनी जर्मनी आणि जपानवर केलेले बाँबहल्ले हे आक्रमणाचा नाही तर प्रतिकाराचा भाग होते हे जरी कितीही खरं असलं तरी ह्या मुद्द्याने उपस्थित केलेला प्रश्न महत्वाचा आहे आणि मी ग्रोएनिंगच्या मुलाखतीच्या शेवटी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे.

या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर शोधणं सोपं नाही पण हे प्रश्न मूलभूत स्वरूपाचे आहेत आणि कुठलंही युद्ध हे कितपत वैध आणि नैतिक आहे हे ठरवण्यासाठी ही उत्तरं शोधणंही आवश्यक आहे.

पाॅल माँटगोमेरी

कधी कधी मला असं वाटतं की माझ्याएवढं कोणीही सामूहिक मारेक-यांना भेटलेलं नाही किंवा त्यांच्यावर लिहिलेलंही नाही. या गोष्टीचा मला अजिबात अभिमान नाही आणि मी हे ठरवून केलेलं नाही. पण हेही तितकंच खरं आहे की त्यामुळे मला मानवी स्वभावाचं बरंच अवलोकन करता आलं आणि माझ्या लक्षात आलेली एक आश्चर्यकारक बाब अशी आहे की या सामूहिक मारेक-यांपैकी बहुसंख्य लोकांना आपल्या कृत्याचा कुठल्याही प्रकारे पश्चाताप होत नाही किंवा खंतही वाटत नाही. पाॅल माँटगोमेरी हा अशा माणसांपैकी एक.

१९९९ साली त्याच्या रँचवर मी त्याची मुलाखत घेतली. अत्यंत निसर्गरम्य वातावरणात त्याचं घर होतं. हिरव्यागार कुरणांना छेदत जाणा-या एका  रस्त्यावरून आम्ही त्याच्या घरी पोचलो. गेल्या अनेक वर्षांपासून तो आणि त्याची पत्नी तिथे राहात होते आणि घर मुला-नातवंडांनी आणि नातेवाईकांनी भरलेलं होतं. घरातलं वातावरण अत्यंत प्रसन्न होतं. खुद्द पाॅल माँटगोमेरीही अशाच वातावरणात वाढला. अशा माणसाने हजारो लोकांची हत्या केली असेल असा विचारही कोणी मनात आणू शकणार नाही.

पण हे खरं आहे. दुस-या महायुद्धात पाॅल अमेरिकन वायुदलात होता. जपानने पर्ल हार्बर या अमेरिकन नाविक तळावर ७ डिसेंबर १९४१ या दिवशी आकस्मिक हल्ला केला आणि युद्धाला ख-या अर्थाने जागतिक बनवलं. पर्ल हार्बरनंतर लगेचच पाॅल वायुदलात दाखल झाला आणि युद्धाचा पूर्ण काळ पर्ल हार्बरचा ' विश्वासघात ' ह्या एकाच विचाराने तो पछाडलेला होता. " हा जपान्यांचा भ्याडपणा होता," तो मला म्हणाला, "त्यांनी अमेरिकन मालमत्तेचं नुकसान केलंच पण आमच्या सैनिकांचेही काही कारण नसताना प्राण घेतले. माझ्या ओळखीचे काही जण पर्ल हार्बरच्या  हल्ल्यात मृत्यूमुखी पडले आणि त्यांचा सूड घेणं ही मला माझी नैतिक जबाबदारी वाटत होती."

अमेरिकेविरुद्ध रीतसर युद्ध न पुकारता पर्ल हार्बरवर बाँबहल्ला करणं ही जपानची घोडचूक होती. जगातल्या कुठल्याही देशात अशा हल्ल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली असतीच पण अमेरिकेत त्याला अजून एक बाजू होती. न्याय आणि समान संधीच्या ज्या अमेरिकन कल्पना होत्या, त्याला या हल्ल्यामुळे तडा गेला. असंख्य अमेरिकन लोकांच्या मते हा जपानी हल्ला म्हणजे पाठीत खंजीर खुपसण्यापेक्षाही घृणास्पद होता. त्यामुळे पाॅल माँटगोमेरी आणि त्याचे अनेक देशबांधव जपानचा सूड उगवणे या एकाच हेतूने लष्करात दाखल झाले. पाॅलला स्वतःला वैमानिक बनायचं होतंच आणि त्याचं सूड उगवण्याचं साधन होतं  चार इंजिनं असलेलं बोइंग बी 29 सुपरफोर्ट्रेस, दुस-या महायुद्धातलं सर्वात मोठं आणि सर्वात जास्त बाँबहल्ल्यांध्ये सहभागी असलेलं विमान.

सुरूवातीला तो वैमानिक म्हणून प्रशिक्षण घेत होता पण नंतर गरजेपेक्षा जास्त वैमानिक असल्यामुळे तो रेडिओ आॅपरेटर म्हणून प्रशिक्षण घ्यायला लागला. बी 29 विमानांसाठी वायुदलाचा तळ प्रशांत महासागरातील टिनियन नावाच्या एका बेटावर होता. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर, पाॅल तिकडे दाखल झाला.
वैमानिकाला त्याचं लक्ष्य शोधण्यासाठी मदत करणं आणि बाँब पाहिजे त्या ठिकाणी पडावेत म्हणून बाँबफेक्यांना मदत करणं या त्याच्या मुख्य जबाबदा-या होत्या. आयुष्यातला पहिला हल्ला त्याने जपानच्या योकोहामा बंदरातल्या तेलशुद्धीकरण केंद्रांवर केला होता - ' बाँबफेक करुन झाल्यावर मी जेव्हा विमानातून खाली पाहिलं तेव्हा ते संपूर्ण तेलशुद्धीकरण केंद्र धडाधडा जळत होतं. ते आगीचे लोळ पाहिले आणि मला काहीतरी केल्याचं समाधान वाटलं.'

यानंतर त्याने ओसाकामधल्या मित्सुबिशी कारखान्यासारख्या अनेक औद्योगिक केंद्रांवर बाँबहल्ले केले. पण अमेरिकन वायुदलाच्या जबरदस्त ताकदीमुळे अगदी थोड्या काळातच अशी परिस्थिती आली की नष्ट करायला जपानकडे काहीच औद्योगिक लक्ष्य उरलं नाही.

वायुदलाने आपलं लक्ष आता नागरी वस्त्यांवर केंद्रित करायचं ठरवलं. महायुद्धातल्या अनेक विवादास्पद निर्णयांपैकी हा एक निर्णय होता - ' आम्हाला असं वाटलं की नुसतं जपान्यांच्या युद्ध करण्याच्या क्षमतेचंच नव्हे तर त्यांच्या युद्ध करण्याच्या इच्छेचंही खच्चीकरण झालं पाहिजे. त्यामुळे मग आम्ही जपानच्या शहरांवर हल्ले करायला सुरूवात केली.
टोकियो, नागोया, ओसाका ह्या शहरांपासून आम्ही सुरुवात केली आणि जे होतं नव्हतं ते सगळं जमीनदोस्त करुन टाकलं. पूर्ण विनाश. '

अग्निशामक दलाच्या तुकड्यांना आग विझवण्याच्या कामातून उसंत मिळू नये म्हणून अमेरिकन वायुदलाने वेगवेगळ्या वेळी स्फोट होणारे बाँब टाकले. अशा बाँबची, खरं सांगायचं तर, काही गरज नव्हती कारण जपानी लष्कराकडे अमेरिकन हल्ल्यांना तोंड देण्याची ताकदच उरलेली नव्हती. ना त्यांच्याकडे विमानविरोधी तोफा होत्या ना लढाऊ विमाने. त्यामुळे अमेरिकन विमानांना  बेछूट बाँबफेक करायला मोकळं रान मिळालं. पाॅल मला म्हणाला की आपलं विमान पाडलं जाऊन आपण मृत्यूमुखी पडू किंवा जपानचे युध्दकैदी बनू अशी भीती अमेरिकन वैमानिकांना कधीच वाटली नाही. जे कोणी या अग्निसंहारातून वाचले त्यांनी आगीचे लोळ आकाशातून कोसळत आहेत आणि लोक आगीने वेढले गेले आहेत अशी वर्णनं केली आहेत. जपानी लोकांची लाकूड आणि कागदाच्या लगद्यापासून बनवलेली घरं अशा परिस्थितीत टिकणं शक्यच नव्हतं. त्यामुळे कितीतरी लोक आपल्या घरांबरोबर जळून राख झाले. ९-१० मार्च, १९४५ या दोन दिवशी टोकियोवर अमेरिकन विमानांनी जो सतत बाँबवर्षाव केला त्यात एक लाख जपानी नागरिक ठार झाले - हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबाँब फेकल्यावर ताबडतोब जेवढे लोक ठार झाले, त्यापेक्षा हा आकडा जास्त आहे.  (या दोन्ही ठिकाणी अनेक लोक हे नंतर मुख्यतः  किरणोत्सर्जनामुळे झालेल्या कर्करोगाने मरण पावले.)

"स्पष्टपणे सांगायचं तर मला याविषयी अजिबात वाईट वगैरे वाटत नाही," पाॅल माँटगोमेरी म्हणाला,
" मी त्या वेळी २१ वर्षांचा होतो आणि मला युद्ध लवकरात लवकर संपवून घरी जायचं होतं. आणि  माझ्या वरिष्ठांनी मला काही शहरांवर बाँब फेकायला सांगितले, मी फेकले. आता तिथे लहान मुलं आणि स्त्रिया होत्या. असणारच. पण मला जी जबाबदारी युद्धाचा एक भाग म्हणून सोपवण्यात आली होती ती मी पार पाडली. "

पाॅल माँटगोमेरीचे हे शब्द ऐकल्यावर एखाद्याला तो एकतर बथ्थड रेम्याडोक्या किंवा अत्यंत क्रूर असा माणूस वाटेल पण मी त्याचं जे काही निरीक्षण केलं त्यावरून मी सांगू शकतो की तो दोन्हीही नाही . माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तो विचारपूर्वक देत होता. आपण इतक्या लोकांच्या, ते पण प्रामुख्याने  स्त्रिया आणि मुलांच्या हत्येत सहभागी झालो होतो हे स्वीकारणं त्याला बहुधा कठीण जात असावं. तो एका अवाढव्य वायुदलाचा एक भाग असलेल्या बाँबफेकी विमानातल्या तुकडीमधला एक सैनिक होता. दुस-या शब्दांत सांगायचं तर त्याचा या सगळ्या संहाराशी व्यक्तिगत संबंध नव्हता. नंतर त्यानेच आपली अलिप्तता शब्दांकित केली, " मी एखादी बंदूक किंवा संगीन घेऊन युद्ध करायला जात नव्हतो. जर मी एखाद्या शत्रुसैनिकाच्या पोटात संगीन खुपसून त्याला ठार मारलं असतं तर कदाचित मला नंतर मानसिक त्रास झाला असता पण जेव्हा तुम्ही आकाशात, एवढ्या अंतरावर असता आणि तुम्ही आणि तुमचं लक्ष्य या दोघांनीही एकमेकांना पाहिलेलं नसतं तेव्हा तुम्हाला असा काही त्रास होत नाही. हातघाईची लढाई आणि ही अशी लढाई यात हाच तर फरक आहे. मी केली ती लढाई एखाद्या व्हिडिओ गेमसारखीच आहे. "

मला वाटतं, आपण स्वतः आणि आपण मारलेले लोक यांच्यात असं 'अंतर ' ठेवल्यामुळेच पाॅलसारखा मानसिक दृष्ट्या नाॅर्मल माणूस स्त्रिया आणि मुलांच्या हत्याकांडात सहभागी होऊ शकला. आपल्या पूर्वजांसाठी एखाद्याला दगडी किंवा लाकडी हत्याराने समोरासमोर मारणं जितकं कठीण होतं तितकंच पाॅल आणि त्याच्यासारख्यांसाठी असंख्य लोकांना एकाच वेळी मारणं सोपं आहे.

शत्रूला मारणं इतकं सोपं असल्यामुळे असेल कदाचित पण अमेरिकन बाँबफेकी तुकड्यांमधले सर्वचजण जपानवर सूड उगवल्याच्या भावनेने संतुष्ट होते. युद्धाला सुरूवात अमेरिकेने केली नव्हती, जपानकडे असलेली कुठलीही संपत्ती अमेरिकनांना नको होती आणि तरीही युद्ध त्यांच्यावर लादलं गेलं होतं त्यामुळे आपल्याला लढायलाच पाहिजे असं प्रत्येकाचं म्हणणं होतं.  पर्ल हार्बरवर बाँब टाकून जपानने बीज पेरलं होतं. त्यातून आता जे उगवेल त्याची जबाबदारीही जपानचीच असेल ही भावना जवळपास प्रत्येक अमेरिकन सैनिकाची आणि अधिका-यांचीही होती. शिवाय, आपण वांशिक दृष्टीने कमअस्सल दर्जाच्या लोकांशी लढतो आहोत अशी अनेक अमेरिकन सैनिकांची समजूत होती. अमेरिकन वृत्तपत्रांमध्ये आणि नियतकालिकांमध्ये जपान्यांचा उल्लेख सरसकट ' माकडं ' असाच होत होता. पण पाॅलने मात्र वर्णद्वेषाची शक्यताच उडवून लावली. " माझ्या एका मुलाने जपानी मुलीशी लग्न केलंय. ती हवाईची आहे आणि त्याच्या आयुष्यात आलेली सर्वात सुंदर गोष्ट आहे. माझं जपानी किंवा जर्मन लोकांशी अजिबात वैर नाही. त्या वेळी जपानी आणि जर्मन सैन्याने आमच्यावर जे युद्ध लादलं होतं त्याच्याशी माझं शत्रुत्व होतं आणि मला युद्ध संपवून लवकरात लवकर घरी जायचं होतं. आणि जर शहरांवर बाँब टाकून ते लवकर संपत असेल तर माझी त्याला काहीही हरकत नव्हती. "

एका अशा ' कामगिरी ' च्या वेळी मात्र ही परिस्थिती थोडीशी बदलली. जपान हा बेटांनी बनलेला देश आहे, ज्यातलं हाॅन्शू हे सर्वात मोठं बेट आहे. क्युरे हे शहर या बेटाच्या नैऋत्य किना-यावर आहे. पाॅलवर याच शहराला बेचिराख करण्याची कामगिरी होती. त्याचं विमान या कामगिरीवर गेलेल्या ताफ्यातलं शेवटचं विमान होतं. खाली क्युरे शहर जळत होतं आणि पाॅलचं विमान नेहमीपेक्षा ब-याच कमी उंचीवर होतं - " आम्ही इतक्या कमी उंचीवर होतो आणि आग एवढी भयंकर होती की खाली जळणा-या वस्तूंचे वास आम्हाला वरपर्यंत येत होते. घरांच्या तुळया आणि इतर लाकडी सामान आगीने तडकत होतं आणि मला वाटतं मानवी मांस आणि मलमूत्र एकत्रित जळत असल्याचा अत्यंत घाणेरडा वास यायला लागला. मला त्याक्षणी भडभडून आलं."
"त्यावेळी तुला काय वाटलं?" मी विचारलं.
" नाही माहीत. सहानुभूती नक्कीच नाही वाटली. मी त्यावेळी तरुण होतो आणि मला अशा कामगि-यांचा ब-यापैकी अनुभवही होता. त्यामुळे मला काहीच वाटलं नाही. "

पाॅलने कितीही जरी म्हटलं तरी त्याच्यावर या घटनेचा परिणाम झाला होता हे निश्चित. एक तर ही घटना इतक्या वर्षांनंतर त्याला स्पष्टपणे आठवत होती. आणि माझ्यासमोर त्याचं वर्णन करताना कुठेतरी त्याच्या अलिप्ततेला तडा जात होता. त्याच्या डोळ्यांनी, कानांनी आणि  नाकाने त्याच्या मनाला दिलेला संदेश - या सगळ्याला तो जबाबदार असल्याचा - दडपण्याचा तो प्रयत्न करत होता पण ते त्याला जमत नव्हतं.

असं काहीतरी होईल ही शक्यता अमेरिकन सैन्यदलांनी विचारात घेतली होतीच. त्यामुळे जेव्हा हा सगळा ताफा टिनियन बेटावरच्या तळावर परतला, तेव्हा तिथल्या सार्जंटने प्रत्येक विमानातल्या प्रत्येकाला जर कुठली गोष्ट ताबडतोब दिली असेल तर एक ग्लास एकदम कडक दारू. " मी पीत नाही असं मी सार्जंटला सांगितलं," पाॅल म्हणाला, " त्यावर तो म्हणाला ' तरीसुद्धा पी.' वरिष्ठांचा आदेश म्हणून मी तो ग्लास रिकामा केला. आणि त्यानंतर मी लगेचच झोपी गेलो. तसंही सार्जंटने सांगितलं होतंच - तुला रात्री शांत झोप लागावी आणि कुठलीही वाईट स्वप्नं पडू नयेत म्हणून पी. आणि तसंच झालं. ती माझ्या आयुष्यातली पहिली आणि शेवटची वेळ असेल मी दारूला हात लावायची."
या सर्व बाँबफेकी दलांच्या मानसिक आरोग्यासाठी अमेरिकन सैन्याचे विशेष मानसोपचारतज्ज्ञ रात्री  त्यांच्या तळावर चक्कर मारत असत - सर्वजण शांत झोपले आहेत की नाहीत हे बघायला.
" त्यांनी आम्हाला नंतर हे सांगितलं की अशा कामगिरीनंतर ताबडतोब गाढ झोपी जाणं अत्यंत आवश्यक आहे. जागे राहिलात तर आपल्या हातून घडून गेलेल्या गोष्टींचा विचार कराल आणि मग तुम्हाला त्रास होईल. आणि त्यांचं म्हणणं खरं होतं. मी जेव्हा जागा झालो तेव्हा एकदम ताजातवाना होतो आणि मेलेल्या जपानी लोकांबद्दल मला कुठलीही सहानुभूती वाटत नव्हती."

एखाद्याला हे उद्गार कठोर वाटतील पण मी पैज लावू शकतो की जर आज कोणी पाॅल माँटगोमेरीला भेटला तर त्याला हा माणूस आवडेलच. जेव्हा आम्ही परत निघालो तेव्हा त्याने आमच्या कुटुंबियांसाठी खास घरी बनवलेले पदार्थ आणि भेटवस्तू दिल्या. परत जात असताना माझ्या मनात हा विरोधाभास राहून राहून येत होता - एक कुटुंबवत्सल, प्रेमळ माणूस; ज्याने युद्धात शत्रूची हजारो माणसं थंडपणे मारली!

क्रमश:

इतिहासभाषांतर

प्रतिक्रिया

वाचतेय. युद्धात भाग घेणार्‍या सैनिकांच्या मनःस्वास्थ्याचे व्यवस्थापन हा नवाच भाग या निमित्ताने लक्षात आला. तेव्हा नसली, तरी आज ही अभ्यासाची स्वतंत्र शाखा आहे का?

बोका-ए-आझम's picture

9 Oct 2014 - 8:58 am | बोका-ए-आझम

मला वाटतं आहे. Conflict Management आणि Post-Traumatic Stress Disorder या मानसशास्त्रीय उपशाखांमध्ये याचा अभ्यास केला जातो पण मला त्याची तांत्रिक माहिती नाही.

मन मनास उमगत नाही हेच खरं.छान लिहिताय.पुलेशु.

मधुरा देशपांडे's picture

9 Oct 2014 - 2:50 pm | मधुरा देशपांडे

असेच म्हणते.

खटपट्या's picture

9 Oct 2014 - 10:51 am | खटपट्या

खूप चांगलं लिहिलंय.

अजून येवूद्या

एस's picture

9 Oct 2014 - 12:35 pm | एस

वाचनखूण साठवली आहे. सविस्तर प्रतिसाद नंतर देईनच.

प्रसाद१९७१'s picture

9 Oct 2014 - 2:40 pm | प्रसाद१९७१

यानंतरचा महत्वाचा प्रश्न म्हणजे कोण दोषी आणि कोण निर्दोष हे ठरवण्याचा. नाझींनी आणि अनेक दोस्तराष्ट्रांमधल्या नागरिकांनीसुद्धा असा मुद्दा मांडला आहे की नाझींनी गॅस चेंबरमध्ये लोकांची विषारी वायूने हत्या करणं आणि दोस्तराष्ट्रांच्या हवाईदलांनी बाँबफेक करुन जर्मन आणि जपानी नागरिकांना मारणं यात तसा काहीच फरक नाही.

माझ्या मते नागरीकांना पकडुन, फक्त मारण्याच्या दृष्टीने एकत्र जववुन मारणे ( युद्ध चालू असो वा नसो ) आणि युद्धा शत्रु ला हरवण्यासाठी त्याच्या प्रदेशा वर बाँब टाकणे ह्यात मुलभुत फरक आहे.

इनिगोय's picture

9 Oct 2014 - 3:50 pm | इनिगोय

काही अंशी सहमत. काही अंशी असहमत.

आपल्या हातून मरणा-या माणसांना समोर पाहूनसुद्धा त्यांचा जीव घेणारा निर्ढावलेला, म्हणून अधिक क्रूर.. असं ग्रेडेशन करणं शक्य आहे?

आणि हेच उलट बाजूने बघायचं, तर समोरासमोर होणा-या हल्ल्यात बचावाची माफक, पुसट का होईना संधी मिळू शकते. बाँबफेकीत हे अजिबातच शक्य नाही.

प्रसाद१९७१'s picture

9 Oct 2014 - 4:04 pm | प्रसाद१९७१

पण बाँब फेक युद्ध चालू असताना केली जाते. तेंव्हा जी लोक मरतात ती शत्रु असतात. जी माणसे मरत आहेत बॉम्बफेकीत त्यांना युद्ध बंद कराण्यासाठी त्यांच्या सरकारवर दबाव आणु शकतात. त्याच वेळी त्या मरणार्‍या माणसांच्या देशाची विमाने सुद्धा दुसरीकडे बाँब टाकत असतात.

पण ज्या लोकांनी काही ही गुन्हा, देशद्रोह केलेला नाही, त्यांना फक्त मारण्यासाठीच पकडणे आणी मग मारणे हे फारच हीडीस आहे.

बोका-ए-आझम's picture

9 Oct 2014 - 4:28 pm | बोका-ए-आझम

तोच प्रश्न आहे. या भागातली जी शेवटची मुलाखत आहे - आ‌ॅस्कर ग्रोएनिंगची - त्यात या प्रश्नाकडे बघण्याचा वेगळाच दृष्टिकोन दिलेला आहे. त्यावर तुमची प्रतिक्रिया वाचायला आवडेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Oct 2014 - 7:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

युद्धात सामील असलेल्या देशाची, सामान्य नागरिकांची आणि सैनिकांची मन:स्थिती हा मोठा अभ्यासाचा विषय आहे. केवळ सैनिकच नाही तर सर्वसामान्य नागरिकही युद्धकाळात (युद्धभूमीपासून हजारो किलोमीटर दूर असूनही आणि आयुष्यात कधिही शस्त्र धरलेले नसले तरीही) नेहमीपेक्षा वेगळ्या मन:स्थितीत असतो.

भारत-पाकिस्तान युद्धे किंवा अगदी थोड्या काळापूर्वीच झालेल्या कारगिल युद्धाच्या वेळेस सामान्य भारतीय नागरिकांच्या मनांत पाकिस्तानबद्दल व पाकिस्तानी सैनिकांबद्दल काय विचार होते हे आठवल्यास त्या मन:स्थितीची काहीशी कल्पना येऊ शकेल.

सैनिकांच्या मनात शत्रूविषयी यापेक्षा जास्त तीव्र भावना व मानसिक तयारी असते, तसे असणे गरजेचे असते आणि ती तशी असावी यासाठी हेतूपुर्र्सर प्रयत्न केले जातात... कारण शत्रू समोर असताना व्दिधा मनःस्थितीत न जाता जो पहिला हल्ला करू शकतो तोच जिवंत राहण्याची जास्त शक्यता असते... विचार करताना झालेला क्षणभराचा विलंब जीवन की मरण हे ठरवतो.

दिवाणखान्यात बसून कितीही थोर विचार करता येत असला तरी युद्धभूमीवर एकच सत्य असते:

No bastard ever won a war by dying for his country. He won it by making the other poor dumb bastard die for his country.
:George S. Patton

युद्धातल्या गोष्टी या वरच्या एकुलत्या एका सत्यावर आधारीत असतात आणि तश्याच घडून येतात... मग युद्धानंतर झालेल्या विश्लेषणांत (किंबहुना चिरफाडीत) त्या सर्व गोष्टी नैतिक, सुसंगत अथवा योग्य वाटतीलच असे नाही.

कोण लेकाचा म्हणतोय की हे जग सर्वकाळ सारासार विवेकाने चालते ?!... युद्धातून जगला-वाचलात आणि युद्ध जिंकलात तरच सारासार विवेक करायला जराशी फुरसत मिळण्याची आशा असते !!! :(

अमित खोजे's picture

9 Oct 2014 - 8:55 pm | अमित खोजे

बॉबी देओलच्या 'टँगो चार्ली' पिक्चर मधील अजय देवगण चे वाक्य आठवले. ते काहीसे असे होते.
प्रत्यक्ष युद्धामध्ये देशप्रेम वगैरे सगळे बाजूला राहते. जेव्हा तुम्हाला जाणीव होते कि आपण जर समोरच्याला मारले नाही तर तो आपल्याला मारून टाकेल तेव्हा सारासार विचार करण्याची ताकत नष्ट होते आणि तुम्ही फक्त मारत सुटता.

बोका-ए-आझम: प्रत्यक्ष या लोकांना तुम्ही जाउन भेटलात! तुम्ही केलेल्या या अभ्यासाबद्दल तुमचे अभिनंदन. युद्धाचा अभ्यास करणे तेवढे सोपे नसते. जेते इतिहास लिहितात हे जरी खरे असले तरीही त्यांनाही त्यांची बाजू असतेच.

बोका-ए-आझम's picture

9 Oct 2014 - 9:39 pm | बोका-ए-आझम

अमित खोजे,थोडा गैरसमज झालाय. मी फक्त अनुवाद केलाय.मूळ लेखक लाॅरेन्स रीज आहे. त्याचं हे सगळं संशोधन आहे.

आताच्या काळात तर ड्रोन्समुळे माणसांना मारणं म्हणजे खर्‍या अर्थाने विडियोगेम खेळण्यासारखं झालंय.

मुक्त विहारि's picture

10 Oct 2014 - 12:41 am | मुक्त विहारि

आवडला....

बोका-ए-आझम's picture

10 Oct 2014 - 9:09 am | बोका-ए-आझम

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद आणि लोभ असावा ही विनंती!

सानिकास्वप्निल's picture

10 Oct 2014 - 12:31 pm | सानिकास्वप्निल

वाचतेय!

स्पार्टाकस's picture

10 Oct 2014 - 11:08 pm | स्पार्टाकस

बाँबफेक करणार्‍या सैनिकाची तत्क्षणी असलेली मानसिकता ही शत्रूचा संहार करण्याची असते. अशावेळी मारला जाणारा हा माणूस न राहता त्याचा शत्रू असतो. परंतु युद्धानंतर मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करताना मात्रं अनेकदा हा नृशंस संहार ठरतो. बहुतेकदा सैनिकांवर याचा परिणाम होत नाही, कारण मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून त्यांची पूर्वतयारी केलेली असते.

दुसर्‍या महायुद्धात जपानवर अणुबाँब टाकण्यासाठी मार्गदर्शन करणार्‍या विमानाचा वैमानिक मात्रं अणुबाँबचे परिणाम पाहिल्यावर मानसिकरित्या उध्वस्त झाला. मिळणारं पेन्शनही त्याने नाकारलं आणि तो क्षुल्लक चोर्‍या करुन तुरुंगात जाऊ लागला. या चोर्‍यांमागची त्याची मानसिकता ही तुरुंगात जाऊन स्वत:ला शिक्षा करुन घेण्याची होती!

हा वैमानिक नागासाकीवर अणुबाँब टाकणा-या विमानाचा असेल कारण हिरोशिमावर बाँब टाकणारे तिघेही - पाॅल टिबेटस्, थाॅमस फेरेबी आणि थिओडोर व्हॅन कर्क - अमेरिकन वायुदलातून मोठ्या हुद्द्यांवरुन निवृत्त झाले आणि प्रत्येकाने हिरोशिमाचं समर्थन केलं. टिबेटस् तर १९७५ मध्ये झालेल्या हिरोशिमा वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होता आणि त्याने आपण कसा बाँब टाकला याचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं, ज्यामुळे अमेरिकन सरकारला जपानची माफीही मागावी लागली होती.

स्पार्टाकस's picture

11 Oct 2014 - 8:33 pm | स्पार्टाकस

बोक्या,
हिरोशिमावर किंवा नागासाकीवर बाँब टाकणारा नाही, हिरोशिमाचा मार्ग दर्शवणारा - एस्कॉर्ट - वैमानिक होता.
त्याचे नाव क्लॉद एडर्ली.