अंधार क्षण भाग ३ - वंश
वंश आणि त्याच्या अनुषंगाने येणारे इतर सांस्कृतिक मुद्दे दुस-या महायुद्धात फार महत्त्वाचे होते. या भागात ज्या ४ जणांच्या मुलाखती आहेत ते सर्वजण - २ जपानी, १ अमेरिकन आणि १ जर्मन - या युद्धात सैनिक म्हणून लढले आहेत. यांच्या मुलाखती जरी इथे एकाच भागात असल्या तरी मी त्या वेगवेगळ्या ठिकाणी (स्पष्टपणे सांगायचं तर तीन वेगवेगळ्या खंडांमध्ये) आणि वेगवेगळ्या काळात घेतलेल्या आहेत. असं जरी असलं तरी या सर्व लोकांचं एका बाबतीत एकमत होतं की त्यांचे शत्रू हे ' त्यांच्यासारखे ' किंवा त्यांच्या ' बरोबरीचे ' नव्हते. मसायो एनोमोटो आणि हाजिमे कोंडो या दोन्ही जपानी सैनिकांचं असं मानणं होतं की ज्या चिनी सैनिकांविरुद्ध ते लढले ते जनावरांपेक्षाही खालच्या दर्जाचे होते. जर्मन सैनिक वुल्फगांग हाॅर्नचंही रशियन सैनिकांविषयी हेच मत होतं आणि अमेरिकन जेम्स ईगल्टनलाही जपानी सैनिकांविषयी असंच म्हणायचं होतं.
फक्त हे चार सैनिकच नव्हे तर दुस-या महायुद्धात लढलेल्या बहुसंख्य सैनिकांचा या गोष्टीवर दृढ विश्वास होता की आपला शत्रू हा आपल्यापेक्षा खालच्या दर्जाचा आहे. जर्मन रशियनांना, ब्रिटिश आणि अमेरिकन जपान्यांना, जपानी चिन्यांना वांशिक दृष्ट्या कमी लेखत. आपण आपल्यासारख्या माणसांना नाही तर अशा जनावरांना मारतोय ज्यांना माणसासारख्या भावना वगैरे असण्याचा प्रश्नच नाही असा विचार केल्यावर युद्ध आणि करमणुकीसाठी केलेली शिकार यात फरक राहात नाही आणि अपराधीपणाची बोचणीही लागत नाही. हेच कदाचित शत्रूला वांशिक दृष्ट्या कमी लेखण्याचं कारण असावं.
मला असं प्रकर्षाने वाटण्याचं कारण म्हणजे एका जर्मन सेनाधिका-याची मी घेतलेली मुलाखत. हा अधिकारी पँझर या जर्मन सैन्याच्या विशेष तुकडीमध्ये होता. आधी तो पूर्व आघाडीवर रशियनांविरुद्ध लढला आणि नंतर पश्चिम आघाडीवर अमेरिकन आणि ब्रिटिश संयुक्त सैन्याविरुद्ध लढला. पूर्व आघाडीवर त्याने आणि त्याच्या सैनिकांनी एकही रशियन युद्धकैदी जिवंत ठेवला नव्हता, पण पश्चिम आघाडीवर अमेरिकनांशी लढताना मात्र सगळे युद्धाचे आंतरराष्ट्रीय नियम व्यवस्थित पाळले होते. त्यांच्या मनात आपल्या शत्रूविषयी जे विचार होते त्याचाच हा परिणाम होता.
वेगवेगळ्या खंडांमध्ये आणि देशांमध्ये लढलेल्या सैनिकांमध्ये आपल्या शत्रूकडे पाहण्याचा दृष्टिकोन जरी ब-यापैकी सारखा असला तरी लोकशाही असलेले देश आणि हुकूमशाही किंवा राजेशाही असलेले देश यांच्या सैनिकांमध्ये मला फरक जाणवला आणि सर्वात वैशिष्ट्यपूर्ण जर कोण असतील तर जर्मन सैनिक. मी भेटलेल्या आणि मुलाखत घेतलेल्या कोणत्याही जर्मन सैनिकाने, अधिका-याने किंवा सेनानीने ' मी फक्त मला दिलेला आदेश पाळत होतो ' असं म्हटलंच नाही. बहुतेकांनी ' त्या वेळी मला जे योग्य वाटलं ते मी केलं ' अशीच प्रतिक्रिया दिली. शिवाय कोणालाही आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या केलेल्या अत्याचारांविषयी कोणत्याही प्रकारचा पश्चात्ताप वाटत नव्हता.
पण जरी सांस्कृतिक, वांशिक आणि राजकीय भेद असले तरी या भागातल्या सैनिकांना जोडणारा एक समान धागा म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूला आपल्या बरोबरीचा एक माणूस समजत नाही, तेव्हा तुम्ही कुठल्या पातळीपर्यंत जाऊ शकता, ते या चौघांवरुन आपल्याला समजतं.
क्रमशः..
प्रतिक्रिया
10 Nov 2014 - 9:21 am | मुक्त विहारि
कारण,
काहीतरी अपुर्ण आहे, असे वाटत आहे.
10 Nov 2014 - 9:34 am | बोका-ए-आझम
हो. बरोबर. आत्ता तुम्ही लक्षात आणून दिल्यावर समजलं. धन्यवाद!
10 Nov 2014 - 11:04 am | मुक्त विहारि
तुम्ही लिहीत असलेल्या विषयचा आवाकाच इतका प्रचंड आहे, की इतक्या लवकर हा विषय संपेल असे वाटत नाही.
10 Nov 2014 - 11:50 am | अत्रन्गि पाउस
अभ्यास आणि अत्यंत संतुलित मांडणी ....
मनापासून शुभेच्छा ...
10 Nov 2014 - 12:40 pm | एस
कदाचित विषयाबद्दल असणार्या उत्सुकतेमुळे वाटत असेल.
10 Nov 2014 - 2:31 pm | बोका-ए-आझम
माझा अभ्यास काहीच नाही. मूळ लेखक लाॅरेन्स रीजचं या विषयावर प्रचंड काम आहे. मी फक्त अनुवाद केलाय. ही भाग ३ ची प्रस्तावना अाहे. पूर्ण भाग बरेच मोठे आहेत.
10 Nov 2014 - 7:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
हे लेखन केवळ मुलाखती नसून खूपच खोलवरचा शास्त्रिय विचार करून केलेल दिसतेय. हळू हळू मनाची जबरदस्त पकड घेईल याची चुणूक दिसू लागलीय.
धन्यवाद हे लेखन आमच्यापर्यंत आणल्याबद्दल !
10 Nov 2014 - 8:37 pm | रामदास
एक्क्याला अनुमोदन.
11 Nov 2014 - 4:09 pm | मारवा
अनेक धन्यवाद या लेखासाठी !
11 Nov 2014 - 4:16 pm | अजया
वाचते अाहे.वरील सर्वांशी सहमत!
11 Nov 2014 - 4:50 pm | असंका
आपण फारच सारांशाने लिहित आहात का? आपले सर्व लेख अगदी पकड घेत असतानाच संपल्यासारखे वाटले.
(बाकी आपण फार भावूक वर्णने अजिबात केलेली नाहीत. हा मुद्दाम घेतलेला निर्णय आहे का? कसेही असले तरी त्याबद्द्ल धन्यवाद...एरवी मी ढसाढसा रडलो आहे यासंबंधीची इतर माहिती वाचून!)