अंधार-क्षण - उपोद्घात (लेख १)

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
6 Oct 2014 - 12:51 pm

अंधारक्षण - उपोद्घात
नाझींनी निःशस्त्र बायका आणि लहान मुलांवर गोळ्या कशा झाडल्या असतील? जपानी सैनिकांनी एवढ्या भयावह प्रमाणावर बलात्कार आणि हत्या कशा केल्या? नाझी मृत्युछावणीत लोक नक्की कशाच्या आधारावर जिवंत राहिले असतील?
जवळजवळ २० वर्षे मी ह्या आणि अशाच काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचसाठी मी दुस-या महायुद्धात या ना त्या प्रकारे  सहभागी असलेल्या शंभराहून अधिक लोकांना भेटलो. मला अत्याचार करणा-या लोकांना भेटण्यात आणि त्यांचं तर्कशास्त्र जाणून घेण्यात जास्त रस होता.
या माझ्या कामानिमित्त मी जपान, बाल्टिक देश, पोलंड, अमेरिका, जर्मनी, बोर्निओ, इटली आणि चीन अशा वेगवेगळ्या देशांत गेलो. बलात्कारी, खुनी - अगदी नरमांस खाल्लेल्या लोकांनाही भेटलो. धीरोदात्तपणे पराभवाला सामोरे गेलेल्या सैनिकांना भेटलो, आॅशविट्झसारख्या मृत्युछावणीतून जीव वाचवून आलेल्यांना भेटलो - लहान अर्भकांना थंडपणे गोळ्या घालणा-यालाही भेटलो. ही प्रत्येक भेट आम्ही चित्रित आणि ध्वनिमुद्रित केली. यातला बराचसा भाग मी माझ्या वृत्तचित्रांसाठी आणि पुस्तकांसाठी वापरला पण अजूनही बराच भाग शिल्लक होता. शेवटी मी ही सगळी जमवलेली माहिती परत एकदा तपासून बघितली आणि ३५ लोकांवर लिहायचं ठरवलं.
या ३५ लोकांचं आयुष्य तुम्हा-आम्हा सर्वांपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. जेव्हा मी या लोकांच्या मुलाखती घेतल्या तेव्हा नाही पण आत्ता परत त्याच्यावर काम करताना एक प्रश्न माझ्या मनात पुन्हा पुन्हा येत होता - अशीच परिस्थिती जर माझ्यावर आली असती तर मी काय केलं असतं? अर्थातच मी किंवा कोणीही या प्रश्नाचं समाधानकारकपणे उत्तर देऊ शकत नाही. जर असे प्रसंग माझ्यावर आले असते तर मी आज जसा आहे त्यापेक्षा खूपच वेगळा झालो असतो, कारण एक व्यक्ती म्हणून आपल्या जडणघडणीत आजूबाजूच्या घटना आणि काळाचा खूप मोठा सहभाग असतो.
असं जरी असलं तरी भूतकाळातलं जग हे आजच्या जगापेक्षा फार वेगळं नाही. कदाचित काही गोष्टी वेगळ्या असतील कारण परिस्थिती वेगळी होती, माणसं तीच होती. मानवी मनाची संरचना गेल्या हजार वर्षांत बदललेली नाही.  त्यामुळे या पुस्तकातली माणसं ही असामान्य वगैरे अजिबात नाहीत. ती तुम्हा-आम्हा सारखीच सामान्य आहेत -  आपले वडील, आजोबा आणि  पणजोबा यांच्यासारखीच.
जेव्हा आम्ही या दुस-या महायुद्धातल्या साक्षीदारांना भेटलो आणि चित्रीकरण केलं तेव्हा दोन गोष्टींचा विचार आम्हाला करावा लागला - पहिली म्हणजे त्यांनी सांगितलेली कुठलीही कहाणी ही कितपत खरी आहे? तर कुठल्याही मुलाखतीआधी त्या व्यक्तीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सखोल संशोधन केलेलं आहे - युद्धाशी संबंधित असंख्य दस्तऐवज दोस्तराष्ट्रांनी जर्मनी आणि जपानच्या पराभवाच्या वेळी हस्तगत केले. यातले बरेचसे दस्तऐवज युद्धगुन्हेगारांच्या खटल्यांमध्ये वापरले गेले आहेत. अशा अनेक कागदपत्रांचा वापर करुन आम्ही या साक्षीदारांच्या कथनाची सत्यता आणि सुसंगती पडताळून पाहिली आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे एवढ्या वर्षांनंतर कुठल्याही साक्षीदाराला भूतकाळ किती स्पष्टपणे आठवण्याची शक्यता आहे? माझा अनुभव असा आहे की जर एखाद्या घटनेने त्या माणसाच्या किंवा त्याच्या कुटुंबियांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणला असेल तर कितीही काळ जरी लोटला तरी त्या घटनेचा किंवा त्यातल्या बारीकसारीक तपशीलांचा विसर त्याला पडणार नाही. मला कदाचित मी गेल्या आठवड्यात काय खाल्लं ते नाही आठवणार पण ३० वर्षांपूर्वी प्रदीर्घ आजाराने झालेला माझ्या आईचा मृत्यू अगदी तपशीलवार आठवेल.
अजून एक. या कथा प्रातिनिधिक नाहीत. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा फक्त त्याचा किंवा तिचा स्वतःचा आहे.
मी या पुस्तकाची सात भागांत विभागणी केली आहे.या ३५ जणांमधले काही जण एकापेक्षा जास्त गटांमध्ये येऊ शकतात. पण त्यांच्या एकंदर अनुभवावरुन मी त्यांना कोणत्या गटात ठेवायचं तो निर्णय घेतला आहे.
हिंसा ही इतर प्राण्यांप्रमाणे माणसाचीही मूळ प्रवृत्ती आहे हे या कथांमधून अधोरेखित होतंच पण भोवतालची परिस्थिती माणसाला स्वतःलाच ओळखू न येण्याइतका कसा बदलवते, तेही समजतं. या लोकांना भेटल्यावर माझ्या जगाविषयीच्या आणि युद्धाविषयीच्या दृष्टिकोनात खूपच बदल घडून आला. मला आशा आहे की वाचकांच्या मनातही असाच बदल होईल.

क्रमश:

इतिहासभाषांतर

प्रतिक्रिया

हां भाग थोड़ा मोठा हवा होता अशी अपेक्षा होती.

अत्रन्गि पाउस's picture

6 Oct 2014 - 12:59 pm | अत्रन्गि पाउस

हेच म्हन्तोय

पुभाप्र.लवकर टाका पुढचा भाग!

बोका-ए-आझम's picture

6 Oct 2014 - 1:31 pm | बोका-ए-आझम

प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! पुढील भाग गुरूवारी uploadकरेन.

बोका भाउ ;शीर्षकातील स्पेस च्या अभावामुळे थोडा गोंधळ झाला.
अंधारक्षण हे मी अंधा रक्षण असे वाचले. ते योग्य अर्थासाठी " अंधार क्षण" असे लिहायला हवे होते.
"अंधा रक्षण " अशा अडनिड्या नावामुळे अगोदरचे लेख सोडून दिले होते . ते वाचतो.
अवांतरः ती सर्व लेखांची नावे सं मं कडून दुरुस्त करता आली तर बघता का जरा.

+१ मी सुद्धा!

मी स्वत:च लहानभाग लिहित असतो त्यामुळे मोठे भाग लिहा असे सांगण्याचा नैतिक अधिकार मला नाही आहे, तरी पुढील भाग मोठे असावेत अशी आशा करतो :)

माम्लेदारचा पन्खा's picture

6 Oct 2014 - 5:21 pm | माम्लेदारचा पन्खा

हम बैठे है पढने के लिये...

दादा दोन परिच्छेदात एक ओळ सोडलीत तर वाचायला सोप्पं पडेल.

बोका-ए-आझम's picture

6 Oct 2014 - 11:39 pm | बोका-ए-आझम

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पुढचा भाग, जो या गुरूवारी येतोय, त्यात ह्या दोन्ही दुरूस्त्या असतील.

मधुरा देशपांडे's picture

6 Oct 2014 - 11:55 pm | मधुरा देशपांडे

पुढच्या भागाची वाट बघतेय. कदाचित पुढच्या भागांमध्ये उत्तर असेल याचे, पण महायुद्ध या विषयावर शक्यतोवर बोलणे टाळले जाते असे ऐकुन आहे. त्यामुळे ज्या लोकांना तुम्ही भेटलात, ते लोक या मुलाखतीला किंवा संभाषणाला कसे तयार झाले याविषयी किंवा तुम्ही हे लोक कसे निवडलेत याविषयी अधिक वाचायला आवडेल.

बोका-ए-आझम's picture

7 Oct 2014 - 12:03 pm | बोका-ए-आझम

हा लाॅरेन्स रीज या वृत्तचित्रकार आणि लेखकाच्या Their Darkest Hour या पुस्तकाचा स्वैर अनुवाद आहे. त्याने मूळ पुस्तकात हे लोक कसे निवडले त्यावर अगदीच कमी लिहिलंय.

दशानन's picture

7 Oct 2014 - 10:09 pm | दशानन

Their Darkest Hour - २००८ चे प्रकाशन आहे, "पुस्तकाचा स्वैर अनुवाद" करा, हरकत नाही पण त्या लेखकाला म्हणजे "लाॅरेन्स रीज" किंवा प्रकाशकाला एक इमेल करा व याबद्दल कल्पना द्या, त्यात स्पष्टपणे नमूद करा की पूर्ण पुस्तक रुपांतरीत करत नाही आहात, तसेच तुम्ही यातून आर्थिक लाभ घेणार नाही आहात व तुमचा उद्देश फक्त स्थानिक भाषेत या पुस्तकातील माहिती वाचकांना थोडक्यात मिळावी येवढाच उद्देश आहे.

* वरील प्रोसेस केली असेल तर माझा प्रतिसाद काढून टाकला तरी चालेल. पण एका चांगल्या उद्देशाने केलेल्या लेखामुळे कोणालाच त्रास होऊ नये अशी अपेक्षा असल्याने हा प्रतिसाद देत आहे.

बोका-ए-आझम's picture

8 Oct 2014 - 12:54 am | बोका-ए-आझम

ही खबरदारी आधीच घेतलेली आहे. सूचनेबद्दल धन्यवाद!

मुक्त विहारि's picture

7 Oct 2014 - 12:24 am | मुक्त विहारि

पुभाप्र

पहाटवारा's picture

7 Oct 2014 - 6:53 am | पहाटवारा

ऊत्तम सुरुवात .. ऊत्सुकता वाढली आहे !
The Reader सारखा चित्रपट पाहिल्यावर, नाझी सैनिकांमधील सर्व-सामान्य कुवतीचे लोकहि कसे आपसूक ओढले गेले असावेत असा विचार तरळून गेला होता. पण एकंदरीतच सर्वच 'जेनोसाईड' (मराठी शब्द ??) घटनांच्या चित्रिकरणामधे कर्त्यांच्या क्रुत्यांचा अन त्याविरुद्ध आवाज ऊठवलेल्या किंवा हिकमतीने त्यातून शक्य-तोवर मार्ग काढलेल्या घटनांचा भाग जास्तकरुन असतो. त्यामुळे संशोधनात्मक अशा या लेखनाची ओळख तुम्हि करुन देताहात ते पाहून ऊत्सुकता निर्माण झाली आहे.
-पहाटवारा

एस's picture

7 Oct 2014 - 5:47 pm | एस

'जेनोसाईड' = वंशविच्छेद.

बोका-ए-आझम's picture

7 Oct 2014 - 6:31 pm | बोका-ए-आझम

वंशसंहार हा माझ्या मते जास्त समर्पक शब्द होईल. वंशविच्छेद हा नैसर्गिक कारणांनीही होऊ शकतो उदाहरणार्थ दुष्काळ, पण वंशसंहार ही मानवी करतोच असू शकते.

वंशविच्छेद हाच शब्द मी जेवढी मराठी पुस्तके वाचली आहेत किंवा तत्सम लिखाण पाहिले आहे त्यात वापरला गेला आहे. बहुधा दहावीचे इतिहासाचे पुस्तक असल्यास हा शब्द त्यात सापडेल. अर्थात, यात प्रचलित असणं हा मुद्दा जास्त आहे. वंशसंहार की वंशविच्छेद यात जो जास्त समर्पक किंवा चपखल वाटेल तो वापरावा.

या कथा प्रातिनिधिक नाहीत. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा फक्त त्याचा किंवा तिचा स्वतःचा आहे. >>>> हे वाक्य खूप महत्त्वाचं..!

या भाषांतरात खूप अस्वस्थ करणारे तपशील असणार आहेत, तरीही तुम्ही हे करताय, हे विशेष वाटलं. पुलेशु.

बोका-ए-आझम's picture

7 Oct 2014 - 12:05 pm | बोका-ए-आझम

प्रतिसादाबद्दल आणि उत्तेजनाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार!

प्रमोद देर्देकर's picture

7 Oct 2014 - 3:00 pm | प्रमोद देर्देकर

जेव्हा नाझी भस्मासुराचा उदयास्त हे पुस्तक वाचले तेव्हा पासुन हिटलर , २ रे महायुध्दविषयी हाती लागतील ती पुस्तके वाचायचा सपाटा लावला. मृत्यु छावणीतुन पळालेल्या कैद्यां विषयी जास्त वाचायला आवडेल जसे LONG WALK लेखक SLA VOMIR RAVIZ, DESERTOR, I MUST GO अशी पुस्तके.

तेव्हा पुढिल भागाच्या प्रतिक्षेत.

भिंगरी's picture

7 Oct 2014 - 3:12 pm | भिंगरी

प्रत्येक व्यक्तीरेखेची.

पैसा's picture

7 Oct 2014 - 4:46 pm | पैसा

उत्सुकता वाढवणारे लिखाण. लिहा पटापट!