अंधार क्षण भाग २ - व्लादिमीर कँटोव्हस्की (लेख ८)

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
6 Nov 2014 - 9:18 am

अंधार क्षण - व्लादिमीर कँटोव्हस्की

साल १९४३. कडक रशियन हिवाळा. व्लादिमीर कँटोव्हस्की नावाचा २० वर्षांचा रेड आर्मीतला सैनिक सोविएत तटबंदीच्या मागे उभा होता आणि समोरच्या दाट झाडीकडे पाहात होता. झाडीत काही जर्मन सैनिक होते पण नक्की किती ते रशियनांना  माहित नव्हतं. कँटोव्हस्की ५४ व्या गुन्हेगार तुकडीत होता. त्याला माहीत होतं की आता कुठल्याही क्षणी आपल्याला त्या झाडीच्या दिशेने जायचा आदेश मिळेल आणि लढाईद्वारे टेहळणी करावी लागेल. तो आणि त्याचे सहकारी  जर्मन सैन्यरेषेच्या दिशेने जातील आणि जर्मन सैनिकांचं लक्ष वेधून घेतील. जर्मन सैन्य ज्या पद्धतीने आणि ज्या प्रमाणात त्यांच्यावर गोळीबार करेल, त्यावरून मागे थांबलेल्या अधिका-यांना जर्मन सैनिकांची संख्या कळेल आणि तेवढ्या प्रमाणात रशियन सैन्य पाठवलं जाईल.

आपण मरण्याची शक्यता ही जवळजवळ १००% आहे याची कँटोव्हस्कीला जाणीव होती. त्याच्या
ब-याच सहका-यांसाठी युद्धाचा पहिला दिवस हाच शेवटचा दिवस होता - युद्धाचाही आणि आयुष्याचाही. हे माहीत असूनही कँटोव्हस्कीने हा मार्ग निवडला होता.

प्रत्येक माणसाचं व्यक्तिमत्व हे त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीवर आणि काळावर अवलंबून असतं. या काळात घडणा-या घटना त्या व्यक्तिमत्वाला आकार देतात. पण कँटोव्हस्कीसारखे थोडे लोक या घटनांचा स्वतःचं व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी उपयोग करुन घेतात.

१९२३ मध्ये व्लादिमीर कँटोव्हस्कीचा जन्म झाला. ही पिढी एका अर्थाने शापित होती असं म्हणायला हरकत नाही कारण नाझी परचक्र तर सोडाच, स्वतःच्या देशाच्या सरकारनेही त्यांचा प्रचंड छळ केला. १९३० च्या दशकात कम्युनिस्ट पक्षावरची आपली पकड घट्ट करण्यासाठी स्टॅलिनने त्याच्या विरोधकांची धरपकड करुन त्यांच्यावर वाटेल त्या आरोपाखाली खटले भरले. या खटल्यांमधून एकही आरोपी निर्दोष सुटला नाही. एकतर त्यांना सायबेरियातल्या छळछावण्यांमध्ये पाठवलं गेलं किंवा मग ते ' नाहीसे ' झाले. या दमनसत्रात सामान्य लोकही भरडले गेले. चेका (नंतर एन्. के.व्ही.डी.) या गुप्त पोलिस संघटनेला स्टॅलिनने लोकांवर मोकाट सोडलं होतं. त्यांच्या कचाट्यात एकदा एखादा माणूस सापडला, की त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं काही खरं नसे. एखाद्या माणसाने १० वर्षांपूर्वी वर्तमानपत्रात स्टॅलिनच्या विरोधात काहीतरी लिहिलं होतं एवढं क्षुल्लक कारणही राजद्रोहाच्या खटल्यासाठी पुरेसं होतं. अशा लोकांवर क्रांतीचे शत्रू , प्रतिक्रांतीवादी, भांडवलदारांचा पाळीव भाडोत्री कुत्रा असे हास्यास्पद पण गंभीर आरोप ठेवले जात. खटला हा पण एक देखावाच असे. बरेच वेळा आरोपीचा न्यायालयातला कबुलीजबाब हा सरकारी वकिलानेच त्याला लिहून दिलेला असे. आरोप ' सिद्ध ' झाल्यावर आरोपीला पुनर्शिक्षण या नावाखाली सायबेरियातल्या श्रमछावण्यांमध्ये पाठवलं जाई. या श्रमछावण्यांना ' गुलाग ' असं नाव होतं.

१९३८ मध्ये व्लादिमीरच्या आईवडिलांना अटक झाली आणि त्यांना अशाच कुठल्यातरी गुलागमध्ये पाठवण्यात आलं. त्याचे वडील लाटव्हियन होते, अस्सल रशियन नव्हते आणि त्यामुळे त्यांची अटक एकप्रकारे अटळ होती. स्टॅलिन आपल्या प्रचारकी भाषणांत सोविएत युनियनचा उल्लेख स्वातंत्र्य, समानता आणि विश्वबंधुत्व यांची भूमी असा जरी करत असला तरी दुस-या महायुद्धाआधी सोविएत युनियनचा अर्थ सामान्य नागरिकांसाठी भीती, भूक आणि दु:ख हाच होता. कँटोव्हस्कीच्या मते, " स्टॅलिनची राजवट ही कम्युनिस्ट नव्हती ; जो कम्युनिझम आम्हाला अभिप्रेत होता तशी तर मुळीच नव्हती. ती कामगारांची हुकूमशाही नसून कामगारांवर लादलेली अत्यंत क्रूर अशी दडपशाही होती! "

आणि दुष्काळात तेरावा महिना यावा तसं १९४१ मध्ये व्लादिमीर १८ वर्षांचा असताना  नाझींनी सोविएत युनियनवर आक्रमण केलं. नाझींसाठी हे युद्ध म्हणजे निव्वळ दोन देशांमधला नाही तर दोन विचारसरणींमधला टोकाचा संघर्ष होता, ज्याचा शेवट दोघांपैकी एकाच्या विनाशानेच होणार होता.

पण जेव्हा नाझी आक्रमण सुरू झालं तेव्हा व्लादिमीर आघाडीवर लढत नव्हता तर सोविएत राजवटीवर टीका केल्यामुळे राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरूंगात होता. काही आठवड्यांपूर्वीच त्याने आणि त्याच्या काही मित्रांनी त्यांच्या इतिहासाच्या शिक्षकांच्या अटकेचा निषेध केला होता. ह्या शिक्षकांना स्टॅलिनविरुद्ध अयोग्य शब्द वापरल्याच्या कथित आरोपावरुन अटक करण्यात आली होती. व्लादिमीर आणि त्याच्या मित्रांनी आपल्या शिक्षकांच्या अटकेवर टीका करणारी पत्रकं छापली आणि ती लोकांमध्ये वाटायला सुरूवात केली. त्याचा काही परिणाम होईल असं त्याला वाटलं नाही. पण एन्.के.व्ही.डी. च्या गुप्त पोलिसांना तसं वाटत नव्हतं. त्यांनी लगेचच त्याला अटक केली. त्याला ओम्स्क तुरूंगात पाठवण्यात आलं. इथे परिस्थिती अत्यंत बिकट होती. ९ जण राहतील एवढ्या कोठडीत ६० जणांना कोंबलं होतं. दिवसातून फक्त दोनदा शारीरिक स्वच्छतेसाठी बाहेर जाता येई. बाकीचा वेळ कोठडीतच काढावा लागे. व्यायाम, मोकळी हवा वगैरे काही नाही. फक्त कोठडीचं उदासवाणं वातावरण. अशा वातावरणात लोकांना संसर्गजन्य रोग होत असत पण त्यांचा काहीही इलाज केला जात नसे. पुढे त्याच्यावर खटला चालवण्यात आला आणि त्याला १० वर्षांची शिक्षा झाली आणि गुलागमध्ये पाठवण्यात आलं. पण त्याच्या नशिबाने इथे एक कलाटणी घेतली. त्याचं कारण होतं युद्ध.

सोविएत युनियनची सर्वत्र पीछेहाट होत होती. सप्टेंबर १९४१ मध्ये युक्रेनची राजधानी कीव्ह जर्मन सैन्याच्या हातात पडली. त्यावेळी जर्मन सैन्याने तब्बल ६ लाख रशियन सैनिकांना कोंडीत पकडलं आणि कैद केलं. पुढच्याच महिन्यात व्याझमा आणि ब्रियान्स्क या दोन्हीही लढायांमध्ये कीव्हची पुनरावृत्ती झाली. ६ लाख रशियन सैनिक परत जर्मनांचे कैदी झाले. व्याझमापासून माॅस्को जेमतेम १५० मैलांवर होतं आणि  जर्मन सैन्याला आता पुढचा मार्ग स्वच्छ दिसत होता.
स्टॅलिन आणि त्याचं युद्धसल्लागार मंडळ, ज्याला स्टाव्हका असं नाव होतं,  यांची पाचावर धारण बसली होती. स्टॅलिनने पोलंडच्या लढाईत जर्मन विद्युद्वेगी युद्ध किंवा ब्लिट्झक्रीगचा तडाखा पाहिला होता. जर्मन सैन्य माॅस्कोमध्ये घुसलं तर आपलं काही खरं नाही हे त्याने मनोमन ओळखलं होतं. जर्मन सैन्याशी लढण्यासाठी त्याने काही कठोर निर्णय घेतले. सायबेरियामधून ताज्या दमाच्या तुकड्या आघाडीवर दाखल झाल्या आणि माघार घेणा-या रशियन सैनिकांना त्याक्षणी गोळ्या घालण्यासाठी काही खास तुकड्या मुख्य रशियन प्रतिकाररेषेच्या मागे तैनात करण्यात आल्या. पण केवळ एवढंच पुरेसं नव्हतं. स्टॅलिनच्या सुपीक डोक्यात त्यावेळी एक विचार आला - तुरूंगातल्या कैद्यांचा युद्धासाठी वापर करायचा!

सोविएत अधिका-यांनी गुलागमध्ये जाऊन कैद्यांची सैन्यभरती सुरु केली. ही सैन्यभरती ऐच्छिक होती. पण हे कैदी कुठल्याही सामान्य तुकडीत पाठवले जाणार नव्हते. त्यांच्यावरची जबाबदारी अत्यंत धोकादायक होती. या तुकड्यांना रशियन भाषेत ' श्ट्राफबॅटी ' असं नाव होतं ज्याचा अर्थ होतो ' गुन्हेगार तुकडी. ' या तुकड्यांमधले बहुसंख्य लोक राजकीय कैदी होते. काही सामान्य गुन्हेगार होते. कुठल्याही लढाईत या तुकडीतल्या सैनिकांना पुढे पाठवलं जाई. जर शत्रूने रस्त्यात भूसुरुंग पेरले असतील तर या तुकड्यांमधल्या सैनिकांना त्यांच्यावरून जाऊन, आपला जीव गमावून मागून येणा-या मुख्य सैन्यासाठी रस्ता मोकळा करावा लागत असे. जवळजवळ ४,४०,००० सोविएत नागरिक या तुकड्यांचे सदस्य होते. युद्ध संपण्याच्या वेळी त्यातले जेमतेम १००० उरले असतील.

कँटोव्हस्कीने अशाच एका तुकडीसाठी नाव नोंदवलं. त्यावेळी त्याला हे माहीत होतं की अशा कामगिरीतून जिवंत वाचण्याची एकमेव शक्यता म्हणजे तो जर युद्धात प्राणांतिक जखमी झाला तर. स्टॅलिनच्या भाषेत सांगायचं तर - तुमची पापं तुमच्या रक्तानेच धुवून निघतील. पण तो तरीही भरती झाला कारण तो देशभक्त होता आणि देशासाठी काहीतरी करण्याची त्याची इच्छा होती. एकदा हा निर्णय घेतल्यावर मग त्याने त्यावर विचार केला नाही ," तो माझा स्वभावच नाही. आणि माझ्यासाठी ही एक संधी होती. मी यातून वाचण्याची थोडीफार का होईना पण शक्यता होती. २०० मधले १० जरी वाचले तरी याचा अर्थ तुम्हाला संधी होती. " गुलागमधून बाहेर पडल्यावर त्याचं आयुष्यही थोडंफार सुसह्य झालं ," जरी आमच्या तुकडीत सगळे गुलागमधलेच लोक होते आणि लष्कराच्या शिस्तीत आम्हाला राहावं लागत होतं तरी आजूबाजूला काटेरी तारांचं कुंपण नव्हतं. शिस्त होती पण ती सगळ्यांना सारखी होती आणि तुरूंग नसल्यामुळे वातावरण उदास नव्हतं. आणि थोड्या प्रमाणात का होईना, स्वातंत्र्य होतं. मला जर कोणी आयुष्य आणि स्वातंत्र्य यांच्यात निवड करायला सांगितली तर मी स्वातंत्र्याचीच निवड करीन. ओम्स्क तुरूंगात भिंतींना पडलेल्या भेगांमधून आम्हाला आकाश दिसायचं. इथे आम्ही पाहिजे तेवढा वेळ आकाशाकडे बघू शकत होतो."

१९४३ मध्ये व्लादिमीरची ५४ वी गुन्हेगार तुकडी लेनिनग्राडच्या दक्षिणेला डेम्यान्स्क नावाच्या शहराजवळ होती. समोर दाट झाडी होती, ज्यात जर्मन सैनिक लपून बसलेले असण्याची शक्यता होती. त्याला आणि त्याच्या सहका-यांना पुढे जायचा आदेश मिळाला. त्यावेळी एक-एक पाऊल पुढे जात असताना त्याच्या मनात काय विचार होते? " अशा वेळी देशभक्तीचे विचार नक्कीच मनात आले नाहीत. तुमच्या सगळ्या जाणीवा अशावेळी बोथट होतात. जे होणार आहे ते अटळ आहे असं वाटतं. तुमचा मृत्यू शत्रूच्या एका गोळीने होऊ शकतो पण ती पहिली की विसावी, तुम्हाला माहीत नसतं, अगदी रशियन रौलेटच्या खेळासारखं! ज्याक्षणी आम्ही त्या झाडीच्या जवळ पोचलो, जर्मनांनी गोळीबाराला सुरूवात केली. आमचे २-३ अधिकारी " पुढे चला, थांबू नका " असं ओरडत होते. जर्मनांकडे मशीनगन्स होत्या. आम्हाला मागे ५ रणगाड्यांचं संरक्षण होतं. हे उघड होतं की आमच्या अधिका-यांना त्यांच्याकडे काही रणगाडाविरोधी शस्त्रं आहेत का ते बघायचं होतं. जर्मन्स झाडीच्या आडोशाने, जवळपास ४०० मीटर एवढ्या अंतरावरून गोळीबार करत होते. आमचे रणगाडे जेमतेम ६० मीटर पुढे आले असतील - नसतील आणि जर्मनांनी ते सगळे निकामी केले. आम्हाला ' पुढे चला ' सांगणारे अधिकारीही त्यांच्या गोळीबाराला बळी पडले. "
अजून  १०० मीटर पुढे आल्यावर आपला शेवट कुठल्या गोळीने होणार आहे हे व्लादिमीरला कळलं. त्याच्या खांद्यांमध्ये आणि दंडांत गोळ्या घुसल्या आणि त्या वेदना सहन न होऊन तो खाली कोसळला. पण वेदनांनी तळमळत असताना आणि रक्तबंबाळ अवस्थेत असतानाही त्याच्या मनात आपण जगू की मरू असे विचार नव्हते. उलट त्याला चिंता या गोष्टीची वाटत होती की आपल्याला पुरेशा जखमा झाल्या आहेत की नाही, कारण या गुन्हेगार तुकडीतल्या सदस्यांनी जर आगेकूच केली नाही तर त्यांचे अधिकारी त्यांना सरळ गोळ्या घालत असत. जर एखादा सैनिक खरोखरच फार गंभीररीत्या जखमी असेल तर तो त्यातून सुटत असे. त्याच्या सुदैवाने त्याला जेव्हा रशियन सैन्यतळावर परत आणण्यात आलं तेव्हा डाॅक्टरांनी त्याच्या जखमा या गंभीर असल्याचं सांगितलं आणि त्याचा जीव वाचला. पण त्याच्या तुकडीतले बहुतेक सगळे जण जर्मन गोळीबाराचे बळी ठरले.

त्याच्यावर शस्त्रक्रिया करुन डाॅक्टरांनी त्याचा जीव वाचवला पण  त्याच्यासाठी युद्ध तिथेच संपलं. १९४४ मध्ये तो पूर्ण बरा झाल्यावर त्याला परत गुलागमध्ये राहिलेली शिक्षा पूर्ण करण्यासाठी पाठवण्यात आलं. आता युद्धाचं पारडं फिरलं होतं. पूर्वेकडून रशियन  आणि पश्चिमेकडून अमेरिकन, ब्रिटिश आणि फ्रेंच सेना जर्मनीत घुसल्या होत्या आणि स्टॅलिनला गुन्हेगार तुकड्यांची गरज नव्हती.

७ वर्षांनी १९५१ मध्ये त्याची सुटका झाली. पण दुर्दैवाने त्याची पाठ अजूनही सोडली नव्हती. त्याच्या नावावर लागलेल्या तुरूंगवासाच्या कलंकामुळे त्याला चांगली नोकरी मिळायला पुष्कळ अडचणी आल्या आणि कमी पगारावर काम करावं लागलं.

पुढे स्टॅलिनच्या मृत्यूनंतर क्रुश्चेव्ह सत्तेवर आला. त्याने स्टॅलिनच्या काळातल्या अन्याय आणि अत्याचारांचा पाढा वाचून स्टॅलिनवाद सोविएत युनियनमधून कायमचा हद्दपार करण्याचा प्रयत्न केला. गुलागमधून सुटका झालेल्या लोकांना त्यांची हकीकत सांगण्याची परवानगी मिळाली. " त्यावेळी मी स्टॅलिनने केलं ते न्याय्य होतं की अन्याय्य होतं असा वाद घालत बसलो नाही, " व्लादिमीर म्हणाला, " त्याचं वर्णन एकाच शब्दात करता येईल - राक्षस. त्याची सगळी राजवट फक्त भीती आणि दहशत यावर आधारलेली होती. "

१९९० च्या दशकाच्या शेवटी मी व्लादिमीर कँटोव्हस्कीची मुलाखत घेतली. तेव्हा तो माॅस्कोच्या एका उपनगरात एका छोट्याशा फ्लॅटमध्ये राहात होता. फ्लॅट जरी स्वच्छ असला तरी त्यात काही जास्त वस्तू नव्हत्या. एक विरलेला गालिचा, काही लाकडी खुर्च्या, एक डुगडुगतं टेबल, पोपडे उडालेल्या भिंती, वर्तमानपत्रांतून कापलेली काही चित्रं. आख्ख्या इमारतीत शिळ्या, कुजलेल्या कोबीचा वास सगळीकडे भरून राहिला होता. घुशी आणि झुरळांचा मुक्त संचार होता. पण त्याने या कशाचीही तक्रार न करता अत्यंत शांत, निर्विकार आवाजात आपली  कथा आम्हाला सांगितली. एकदाही त्याच्या आवाजात स्वतःच्या दुर्दैवाविषयी किंवा अकारण सहन करायला लागलेल्या अन्यायाविषयी कडवटपणाची झाक मला जाणवली नाही.

आपल्या शिक्षकांच्या अटकेचा निषेध केल्याबद्दल  पश्चात्ताप होतो का असं मी त्याला विचारलं, कारण शेवटी त्यातून मिळालं काय? त्याच्या शिक्षकांचा जीव तर गेलाच आणि त्याचं आयुष्य कायमचं विस्कटलं गेलं. केवळ त्या एका गोष्टीमुळे.

त्याने थोडावेळ विचार केला आणि मग तो म्हणाला, " अजिबात नाही. त्यावेळी आम्हाला आमच्या देशात तोंड उघडायचं स्वातंत्र्य नव्हतं पण मी ते केलं. मी त्यामुळे कणखर बनलो. त्या एका गोष्टीने मला आयुष्यभराचा स्वाभिमान दिला! "

क्रमशः

इतिहासभाषांतर

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

6 Nov 2014 - 10:39 am | मृत्युन्जय

सगळ्या भागांमध्ये हा भाग सर्वात करुण आणी तितकाच स्फुर्तिदायकही वाटला. धैर्याची कसोटी सर्वात जास्त इथेच लागली असावी असे वाटते.

एक विनंती
संदर्भ सुची पुरवली तर म्हणजे या वरील लेखा संदर्भात कुठल्या पुस्तकांच वाचन तुम्ही केल ते लेखक प्रकाशकाच्या नावासहीत दिल्यास थोड अधिक खोलात जाण्याचा आनंद उपभोगता येइल.
प्लिज...

एस's picture

7 Nov 2014 - 12:20 am | एस

पहिला भाग वाचा.

बोकासाहेब, आधीच्या भागांची लिन्क देत जा. लेख नेहमीप्रमाणेच वाचनीय.

बोका-ए-आझम's picture

7 Nov 2014 - 7:54 am | बोका-ए-आझम

मारवाशेठ, तुमच्या खरडवहीत सूची जोडली आहे.

एस's picture

7 Nov 2014 - 12:29 am | एस

सोवियेत रशियात दडपशाही आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी कळसास पोहोचली असली तरी (पोलादी पडदा हे टोपण नाव आठवा.) एक गोष्ट मात्र होती. तिथे टपालसेवा विनामूल्य असे आणि तत्कालीन रशियातील एखादाच असा माणूस असेल ज्याने 'प्रिय कॉम्रेड स्तालिन' अशी सुरुवात करून त्या क्रूरकर्म्याला आयुष्यात एकदाही पत्र पाठवलेले नसेल.

पुढे जेव्हा पेरेस्त्रोइका आणि ग्लासनोस्त चा जमाना आला तेव्हा आख्खा देश ढवळून निघाला.

दुर्दैवाने आजचा रशियाही थोडाफार तसाच आहे. लोकशाहीची आपल्या मर्जीने व्याख्या करणारा...

बोका-ए-आझम's picture

7 Nov 2014 - 8:03 am | बोका-ए-आझम

जेव्हा १९७५ मध्ये आणीबाणी लागू करण्यात आली तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर इंदिरा गांधींवर प्रचंड टीका झाली होती पण सोविएत रशियाने पाठिंबा दिला होता. आपल्या पंचवार्षिक योजना या स्टॅलिनच्या पंचवार्षिक योजनांवरच आधारित होत्या. जेव्हा रशियाने १९५६ मध्ये हंगेरीत आणि १९६८ मध्येा झेकोस्लोव्हाकियामध्ये रणगाडे घुसवले तेव्हा अनुक्रमे नेहरू आणि इंदिरा गांधी तटस्थ राहिले होते. जर तुम्ही बघितलंत तर आपलं आर्थिक उदारीकरण आणि सोविएत युनियनचं पतन ह्या गोष्टी एकाच वर्षी झाल्या आहेत. आपली हक्काची बाजारपेठ बंद झाल्यावर उदारीकरण अापल्यासाठी अपरिहार्य झालं होतं.

अजया's picture

7 Nov 2014 - 12:48 pm | अजया

अत्यंत वाचनीय लेख.अात्तापर्यंतचा सर्वात आवडलेला(आवडलेला तरी कसं म्हणावं या लेखांना,त्यांची पार्श्वभूमी बघता)तुम्हाला आता या अनुवादाची लय सापडली आहे,असं वाटलं हा भाग वाचुन.
पुभाप्र.

मुक्त विहारि's picture

8 Nov 2014 - 1:29 am | मुक्त विहारि

आवडला..

मधुरा देशपांडे's picture

8 Nov 2014 - 1:55 am | मधुरा देशपांडे

उत्तम लेख.
पुभाप्र.

नया है वह's picture

17 Dec 2015 - 6:59 pm | नया है वह

मला जर कोणी आयुष्य आणि स्वातंत्र्य यांच्यात निवड करायला सांगितली तर मी स्वातंत्र्याचीच निवड करीन. ओम्स्क तुरूंगात भिंतींना पडलेल्या भेगांमधून आम्हाला आकाश दिसायचं. इथे आम्ही पाहिजे तेवढा वेळ आकाशाकडे बघू शकत होतो

हे आवडलं!