अंधार क्षण - आॅस्कर ग्रोएनिंग (लेख ४)
माझ्या कामामुळे मी अनेक प्रकारच्या लोकांना भेटलो, अजूनही भेटतो. एक गोष्ट मी अगदी खात्रीलायक रीत्या सांगू शकतो की लोकांविषयी तुमच्या मनात असलेले विचार आणि प्रत्यक्ष तुम्हाला भेटणारा माणूस यांच्यात फार क्वचित काही साधर्म्य असतं. उदाहरणार्थ समजा मी तुम्हाला अशी पार्श्वभूमी दिली की - ह्या माणसाने नाझींची कुप्रसिद्ध मृत्युछावणी आॅशविट्झमध्ये काम केलेलं आहे, लहानपणापासून तो नाझींचा समर्थक होता, युद्ध चालू झाल्यावर तो एस्.एस्. मध्ये दाखल झाला आणि नंतर त्याने आॅशविट्झमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या वांशिक कत्तलीत भाग घेतला - कशा प्रकारचा माणूस तुमच्या डोळ्यांपुढे येईल? मी पैज लावून सांगू शकतो की तो आॅस्कर ग्रोएनिंगसारखा नसेल.
ग्रोएनिंग मला भेटलेल्या सर्वात शांत लोकांपैकी एक असेल. त्याला जाड भिंगांचा चष्मा होता आणि त्याची एकंदर वागणूक ही सौम्यपणाचीच होती. युद्धानंतर तो एका काच कारखान्यात व्यवस्थापक म्हणून काम करत होता. आणि मला असं अजिबात वाटत नाही की आॅशविट्झमध्ये त्याने केलेल्या कामामुळे त्याला काही पश्चात्ताप होत होता. मी जेव्हा त्याला हँबर्ग, जर्मनी येथे भेटलो तेव्हा मला तो माझ्या एका आयुष्यभर बँकेत काम केलेल्या काकांसारखाच वाटला. नंतर मला कळलं की हा योगायोग नव्हता. युद्धापूर्वी ग्रोएनिंग एका बँकेतच काम करत होता. माझ्या काकांप्रमाणेच तो एकदम सरळमार्गी, व्यवस्थित, उच्च मध्यमवर्गीय व्यक्तिमत्वाचा होता. इतर कुठल्याही मध्यमवर्गीय माणसाप्रमाणेच समाजात प्रतिष्ठा मिळावी अशी त्याचीही इच्छा होती. पण त्याच्या जडणघडणीच्या वर्षांमधला समाज हा नाझी पक्षाच्या अंमलाखाली आणि नाझी कल्पनांमुळे भारलेला होता. या समाजाच्या चांगल्या-वाईटाच्या कल्पना आणि एकंदरीत जीवनविषयक मूल्यं त्या वेळच्या प्रचलित मूल्यांपेक्षा फार वेगळी होती. पण एक गोष्ट खरी होती. पहिल्या महायुद्धातला पराभव, व्हर्सायच्या तहातल्या अपमानास्पद अटी आणि नंतर जागतिक महामंदी यांनी पिचलेल्या जर्मन लोकांना नाझी पक्ष हा आशेचा किरण वाटत होता. ग्रोएनिंगही त्याला अपवाद नव्हता.
युद्ध जेव्हा सुरु झालं तेव्हा तो १८ वर्षांचा होता. त्याचे आजोबा पहिल्या महायुद्धात जर्मन घोडदळात होते. त्यांच्याकडून ऐकलेल्या युद्धकथांमुळे त्यालाही जर्मन सैन्याच्या एखाद्या विशेष विभागात काम करायची इच्छा होती. त्यामुळे दृष्टिदोष असूनही त्याने एस्. एस्. कडे अर्ज पाठवला. तो मंजूरही झाला आणि त्याला दक्षिण जर्मनीत प्रशासकीय कामासाठी पाठवण्यात आलं. नंतर, १९४२ मध्ये त्याची बदली झाली. या ठिकाणाचं नाव त्याने कधीच त्यापूर्वी ऐकलं नव्हतं - ते पोलंडमधलं ओस्विसिम नावाचं गाव होतं, ज्याचं नाझींनी पोलंड जिंकल्यावर नवीन नामकरण केलं होतं - आॅशविट्झ. तिथल्या श्रमछावणीत त्याची बदली झाली होती.
जरी आॅशविट्झ हे नाव ग्रोएनिंगने पहिल्यांदाच ऐकलं असलं तरी जर्मनीत श्रमछावण्या आणि छळछावण्या आहेत हे त्याला माहीत होतं. " देशाच्या शत्रूंना तिथे ठेवलं जातं असं आम्हाला सांगितलं जायचं."
दक्षिण पोलंडमध्ये सोला नदीच्या तीरावर आॅशविट्झ वसलेलं होतं. जेव्हा ग्रोएनिंगचं तिथे आगमन झालं तेव्हा त्याला नेहमीपेक्षा काहीही वेगळं असं तिथे जाणवलं नाही. त्याची नेमणूक ही अर्थविभागात झाली होती. तिथे आॅशविट्झमध्ये आलेल्या कैद्यांकडून जप्त केलेल्या रोख रकमेचा हिशेब ठेवणं हे त्याचं मुख्य काम होतं. हे कैदी शिक्षा भोगून झाल्यावर जेव्हा परत जातील तेव्हा ती रक्कम ते परत नेतील अशी त्याची समजूत होती. त्यामुळे जेव्हा त्याला कळलं की हे कैदी परत जाणार नाहीत आणि त्यांचे पैसे त्यांना परत मिळणार नाहीत तेव्हा त्याला धक्काच बसला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आॅशविट्झ ही साधीसुधी, युद्धकैद्यांसाठी बांधलेली श्रमछावणी नाही. त्याला हे कसं सांगण्यात आलं त्यावरुन आपल्याला नाझींचा ज्यूंकडे पाहण्याचा दृष्टिकोन कळतो. त्याला तिथल्या एका एस्.एस्. अधिका-याने सांगितलं की तिथे येणा-या ज्यूंपैकी जे कोणी कष्टाची कामं करण्यासाठी सक्षम नव्हते त्यांची संख्या ' घटवण्यासाठी ' त्यांची ' विल्हेवाट ' लावली जाते. जेव्हा त्याने विल्हेवाट लावणं म्हणजे नक्की काय याचा अर्थ विचारला तेव्हा त्याला त्याचा खरा अर्थ - सामूहिक हत्या - सांगण्यात आला. त्याच्या स्वतःच्या म्हणण्यानुसार त्याने असा विचार केलाच नव्हता. पण मग नंतर त्याने नवीनच आलेल्या एका ज्यूंच्या गटाच्या निमित्ताने सगळी प्रक्रिया पाहिली - आल्यावर लगेचच या ज्यूंची वैद्यकीय तपासणी केली गेली आणि त्यांच्यातले जे काम करण्यालायक होते त्यांना बाजूला काढण्यात आलं आणि उरलेल्यांना - ज्यांच्यात वृद्ध आणि मुलं बहुसंख्य होती - सरळ गॅस चेंबरमध्ये मरण्यासाठी पाठवण्यात आलं. त्यावेळी त्याला सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला.
" फार मोठा धक्का होता हा ", ग्रोएनिंग म्हणाला, " पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या - १९३३ साली नाझींना सत्ता मिळाली पण त्याच्या आधीपासून जर्मनीत ज्यूविरोधी प्रचार चालू होता. पहिल्या महायुद्धातला पराभव, व्हर्सायचा अपमानकारक तह, नंतरची जागतिक मंदी या सगळ्या गोष्टींचं खापर नाझी ' आंतरराष्ट्रीय ज्यू षड्यंत्रावर ' फोडत होते. याच प्रचारात असंही सांगण्यात येत होतं की ज्यू व्यापारी आणि अर्थ पुरवठादारांनी जर्मन साम्राज्याचा विश्वासघात करुन पाठीत खंजीर खुपसला. नंतर रशियातील साम्यवादी क्रांतीसाठीही ज्यूंनाच जबाबदार धरण्यात येत होतं. जे जे काही जर्मनीत वाईट होतं किंवा घडत होतं त्यामागे ज्यूंचा हात आहे असा पद्धतशीर प्रचार केल्यामुळे सर्वत्र ज्यूंविषयी शत्रुत्वाचीच भावना होती. त्यामुळे आॅशविट्झमध्ये ज्यूंना गॅस चेंबरमध्ये जाताना बघून माझ्या मनात हाच विचार होता की हे आमचे शत्रू आहेत आणि आम्ही आमच्या शत्रूला जर नष्ट करत असू तर त्यात काय चुकीचं आहे?"
हे कोणीही मान्य करेल की नाझींच्या अपप्रचारावर एक सिद्धांत म्हणून विश्वास ठेवणं आणि प्रत्यक्ष त्याप्रमाणे ज्यूंच्या वंशसंहारात सहभागी होणं या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि हे ग्रोएनिंगने कसं केलं ते समजून घेणं महत्त्वाचं आहे.
आॅशविट्झ ही काही नाझींनी उभारलेली एकमेव मृत्युछावणी नव्हती. तिच्यासारख्या किमान १२ मृत्युछावण्या होत्या पण तरीही आॅशविट्झला एवढी प्रसिद्धी मिळण्याचं कारण म्हणजे एक तर वंशसंहाराचं प्रमाण आणि दुसरं म्हणजे एखाद्या कारखान्यासारखी नियमबद्ध निवड प्रक्रिया. जेव्हा ज्यूंचा एखादा गट तिथे यायचा, तेव्हा सर्वप्रथम त्यांची वैद्यकीय तपासणी व्हायची. त्यातून धट्टेकट्टे लोक - स्त्रिया आणि पुरूष - वेगळे काढले जात. वृद्ध, अपंग आणि लहान मुलं यांना सरळ गॅस चेंबरमध्ये पाठवण्यात येई. लहान मुलांमध्ये जर जुळी मुलं असतील किंवा निळे डोळे आणि सोनेरी केस अशी ' आर्यन ' दिसणारी मुलं असतील तर त्यांना वेगळं काढलं जात असे. आर्यन दिसणा-या मुलांना जर्मन कुटुंबांमध्ये पाठवलं जात असे - पुढची पिढीसुध्दा तशीच निपजावी म्हणून. जुळी मुलं ही डाॅ. जोसेफ मेंगेलेच्या जीवशास्त्रीय आणि वंशशास्त्रीय प्रयोगांसाठी पाठवली जात. आणि हे सगळं अत्यंत काटेकोरपणे, आखून दिलेल्या नियमांनुसारच होत असे. त्यामुळेच नाझींना तिथे दररोज सरासरी ३००० माणसं मारता आली अणि त्यांच्या मृतदेहांची विल्हेवाटही लावता आली.
ग्रोएनिंगने जेव्हा एस्.एस्. ची ही सगळी ' निवडप्रक्रिया ' पाहिली, त्याने तडकाफडकी आपल्या वरिष्ठांकडे तक्रार केली आणि आपली बदली करण्याची मागणी केली, जी तितक्याच तातडीने फेटाळण्यात आली. पण त्याची तक्रार होती कशाबद्दल? ती सामूहिक हत्यांबद्दल नव्हती, तर ज्या प्रकारे ही सगळी प्रक्रिया आणि यंत्रणा काम करत होती, त्याबद्दल होती. त्याचं म्हणणं असं होतं की जर एवढ्या सगळ्या लोकांना तुम्हाला मारायचंय तर निदान अशा प्रकारे मारा की त्या प्रक्रियेशी सरळ संबंध नसणा-या लोकांना त्याचा त्रास होणार नाही.
त्याचा परिणाम म्हणून आॅशविट्झमध्ये एस्. एस्.च्या खूपच कमी सदस्यांनी वंशसंहाराच्या कामात प्रत्यक्ष सहभाग घेतला. आॅशविट्झमध्ये तीन मुख्य छावण्या होत्या. पहिल्या छावणीत सगळी प्रशासकीय कामे होत असत.
एस्.एस्. अधिका-यांची निवासस्थानंपण तिथेच होती. दुसरी बिर्केनाऊ, जी मृत्युछावणी होती. इथे गॅस चेंबर - शवदाहिनी अशा चार जोड्या होत्या. दररोज जवळजवळ ५००० लोकांना मारण्याची क्षमता असलेल्या या जोड्यांची देखरेख करण्यासाठी फक्त एक डझन एस्.एस्. कर्मचारी होते. तिसरी मोनोविट्झ ही श्रमछावणी होती. बिर्केनाऊमध्ये गॅस चेंबर्स साफ करणे, त्यांचा ' वापर ' झाल्यावर प्रेतांना बाहेर काढणे, त्यांचं मलमूत्र साफ करणे आणि त्यांना जाळणे ही कामं काही कैद्यांनाच करावी लागत. त्यांना ' सोन्डरकमांडो ' असं म्हणत. जर त्यांनी कुठलंही काम करायला नकार दिला तर त्यांचीही रवानगी त्याच गॅस चेंबरमध्ये होत असे. तसंही सोन्डरकमांडो म्हणून काम करणारा कैदी आपलं आजचं मरण उद्यावर ढकलत असे कारण नाझींना या हत्याकांडाचे कोणीही साक्षीदार नको होते.
अर्थविभागात काम करणा-या ग्रोएनिंगचा किंवा त्याच्यासारख्या इतर लोकांचा या सगळ्या गोष्टींशी क्वचितच संबंध येत असे. बिर्केनाऊ आणि आॅशविट्झ मुख्य छावणी यांच्यात २.५-३ किलोमीटर अंतर होतं त्यामुळे शारीरिक, मानसिक आणि भावनिक - तिन्ही प्रकारे ग्रोएनिंग तिथल्या वंशसंहारापासून दूर होता. मुख्य छावणीत नाट्यगृह, चित्रपटगृह, क्लब अशा सोयी होत्या आणि ग्रोएनिंग त्यात अगदी आवडीने आणि हिरीरीने भाग घेत असे. आणि तिथल्या लोकांविषयी त्याच्या मनात मैत्रीपूर्ण विचार होते. " आम्ही युद्धाच्या छायेत राहात होतो, त्यामुळे तिथे काही जणांशी झालेली माझी मैत्री अजूनही टिकून आहे."
आॅशविट्झच्या या अशा रचनेमुळे ग्रोएनिंगने स्वतःला २-३ किलोमीटर अंतरावर होत असलेल्या भीषण संहारापासून दूर ठेवलं. " माणसांमध्ये हा एक गुण असतोच, " तो म्हणाला, " ते आनंददायक आणि दु:खदायक गोष्टी अशा प्रकारे अलग करतात की त्यामुळे त्यांना त्रास होत नाही. "
पण जोपर्यंत तुम्ही वस्तुस्थितीकडे पाठ फिरवलेली असते तोपर्यंतच हे बचावतंत्र तुम्ही वापरु शकता. ग्रोएनिंगने हे शेवटी मान्य केलं की जर त्याने गॅस चेंबरमध्ये जाणारे ज्यू जर दररोज पाहिले असते तर तो वेडा झाला असता, " मला जर कोणी निवड करायला सांगितली तर मी एखाद्या जिवंत माणसावर हातबाँब फेकण्यापेक्षा एखाद्या भिंतीच्या दुस-या बाजूला हातबाँब फेकेन. " , तो म्हणाला.
माझ्या दुस-या महायुद्धावर बनवलेल्या वृत्तचित्रांसाठी मी दोन्ही बाजूंच्या सैनिकांना भेटलो आहे. त्यामधल्या बहुसंख्य लोकांप्रमाणेच ग्रोएनिंग स्वकेंद्रीत होता - ' प्रत्येकजण शेवटी स्वत:चा विचार करतो. कितीतरी जण युद्धात मरण पावले, जखमी झाले, अपंग झाले. आणि हे ज्यूंच्याच नाही, इतर लोकांच्या बाबतीतही झालं. जर मी या सगळ्याचा विचार करत बसलो तर मी एक मिनिटभरही जिवंत राहू शकणार नाही.
नंतर ग्रोएनिंगने सगळ्या नाझींच्या ' जिव्हाळ्याच्या ' विषयाला हात घातला- नाझीप्रणित ज्यू वंशसंहार आणि दोस्तराष्ट्रांनी युद्धाच्या उत्तरार्धात जर्मनीवर केलेले बाँबहल्ले यांची तुलना. त्याच्याच शब्दांत सांगायचं तर - ' त्यांनी (दोस्तराष्ट्रांनी) जर्मनीवर कसे नृशंस बाँबहल्ले केले आणि निःशस्त्र स्त्रिया आणि मुलांची कत्तल केली ते आम्ही पाहिलेलं आहे. आमच्या मनात त्या वेळी हाच विचार आला की ह्या युद्धात दोन्हीही बाजूंनी सैनिकांपेक्षा एकमेकांच्या नागरिकांना लक्ष्य केलं.' इतर नाझींचे विचार अगदी तंतोतंत असेच होते. आॅशविट्झचा प्रमुख एस्. एस्. अधिकारी रुडाॅल्फ होएसने तर स्वतःची तुलना शत्रूच्या शहरातील स्त्रिया आणि मुलं यांच्यावर बाँबहल्ला करण्याचा आदेश मिळालेल्या एखाद्या बाँबर विमानाच्या वैमानिकाशी केली होती. नाझींचं असं म्हणणं होतं की एस्.एस्. ने आॅशविट्झ, बेल्सेन, साॅबिबाॅर, चेल्मनो, ट्रेब्लिंका यासारख्या मृत्युछावण्यांमध्ये ज्यांचा लढाईशी काहीही संबंध नव्हता अशा ज्यू आणि इतर अनेक लोकांची सामूहिक हत्या करणं आणि दोस्तराष्ट्रांनी जर्मन शहरांवर बाँबफेक करुन जर्मन नागरिकांना ठार मारणं या दोन्ही तशा बघितल्या तर सारख्याच गोष्टी आहेत. आणि दोस्तांनी जर्मन नागरिकांवर जाणूनबुजून हल्ला केला हे तर खरं आहेच. युद्धाच्या अंतकाळात एखादं शहर किती कमीत कमी वेळात आणि कमीतकमी संसाधनं वापरुन नष्ट करता येईलहा निकष वापरुन दोस्तांनी वर्झबर्गसारखं प्राचीन शहर समूळ नष्ट केलं.
पण असं जरी असलं आणि या दोन्हीही कृत्यांमुळे असहाय्य सामान्य नागरिकांनाच होरपळावं लागलं असलं तरी या दोन्हीमध्ये काही मूलभूत फरक आहेत. जर्मन आणि जपानी शहरांवरचे बाँबहल्ले हा लोकशाहीवादी देशांनी लोकशाहीविरोधी देशांच्या राक्षसी साम्राज्यकांक्षेपासून आपला बचाव करण्यासाठी अनुसरलेला मार्ग होता. त्यांनी कुठल्याही विशिष्ट जर्मन किंवा जपानी जनसमुदायावर हल्ला केला नव्हता आणि अशा कुठल्याही जनसमुदायाचा संपूर्ण विनाश हा हेतू तर त्यामागे अजिबातच नव्हता. पण ज्यूंची सामूहिक हत्या हा नाझींच्या युरोपसाठी असलेल्या त्यांच्या योजनेचा एक भाग होता, ज्यात हिटलरने त्याच्या आत्मचरित्रात मांडलेल्या Lebensraum किंवा जर्मन वंशाला पूर्व युरोपमध्ये वंशविस्तारासाठी जागा उपलब्ध करुन देणं या संकल्पनेचा संदर्भ होता. जर जर्मनीने युद्ध जिंकलं असतं तर नव्या उत्साहाने नाझींनी जगातल्या उरलेल्या ज्यूंचंही शिरकाण केलं असतं. दोस्तांनी जप्त केलेल्या नाझी कागदपत्रांनुसार सोविएत रशियावर विजय मिळवल्यानंतर तिथे जर्मन वसाहती स्थापन करणे आणि रशियनांना गुलाम बनवून त्यांची उपासमार करुन त्यांना नष्ट करणे अशी योजना होती. नाझींसाठी शत्रूचा सर्वंकष विनाश हा युद्ध थांबवण्याचा मार्ग नव्हता तर युद्ध हे शत्रूच्या विनाशाचं साधन होतं. आणि अजून एक - जर्मनी आणि जपान शरणागती पत्करून आपल्या नागरिकांचा संहार एका क्षणात थांबवू शकले असते पण ज्यूंनी काहीही केलं असतं तरी नाझींनी त्यांचा संहार केलाच असता.
आज अशी चर्चा करणं म्हणजे अर्थातच सैद्धांतिक कीस काढणं आहे कारण ड्रेस्डेन, हँबर्ग, टोकीयो, ओसाका - इथल्या बाँबहल्ल्यात मरण पावलेल्या अश्राप मुलांना आणि स्त्रियांना आता काहीच फरक पडत नाही. पण आपण हे विसरता कामा नये की ज्या क्षणी जर्मनी आणि जपान शरण आले, त्या क्षणी दोस्तांनी बाँबहल्ले थांबवले. पण जर नाझींनी युद्ध जिंकलं असतं तर ज्यूंचा नरमेध थांबला नसता!
आॅशविट्झमध्ये काम करणा-या आणि त्यामुळे तिथल्या संहारात भागीदार असणा-या ग्रोएनिंगसारख्या लोकांना दोस्त राष्ट्रांचे बाँबहल्ले नैतिकदृष्ट्या फारच सोयीचे होते. त्यामुळे त्यांचा अपराधगंड कमी होत होता. ग्रोएनिंगने तर पूर्णपणे शहामृगी वृत्तीनेच तिथले दिवस व्यतीत केले. त्याचा ज्यू विरोध हा पूर्णपणे भावनारहित होता. नाझींसाठी ज्यू म्हणजे एक राष्ट्रीय आपत्ती होते. १९३४ मध्येच नाझी नियतकालिक Der Sturmer चा संपादक ज्युलिअस स्ट्रायशरने जाहीर केलं होतं - ' ज्यू हे आमचं दुर्भाग्य आहे ! ' ग्रोएनिंगलाही हे तत्वत: मान्य होतं, " पण याचा अर्थ असा नाही की रस्त्यावर फिरणा-या एखाद्या ज्यूला मी झोडपून काढेन."
पण या मनोवृत्तीमुळे ग्रोएनिंगची ज्यूंकडे बघण्याची दृष्टी ही अत्यंत थंड आणि अलिप्त होती. त्यामुळे कुठल्याही ज्यू हत्याकांडाचं तो शांतपणे स्पष्टीकरण देत होता आणि समर्थनही करत होता. मी त्यामुळे काहीसा उद्विग्न झालो आणि त्याला नाझींनी आॅशविट्झमध्ये २,००,००० ज्यू मुलांना मारलं, त्याचं काय कारण होतं असं विचारलं तेव्हा त्याने हे उत्तर दिलं -' त्या मुलांशी आमचं काहीच शत्रुत्व नव्हतं पण शेवटी त्यांच्यात ज्यू रक्त होतं. जर त्यांना जिवंत सोडलं असतं तर मोठं झाल्यावर हीच मुलं आमच्यासाठी धोकादायक बनली असती. त्यापेक्षा त्यांना मारणं आणि हा धोका टाळणं हा उपाय बरोबर नाही का?'
आमच्या मुलाखतीच्या शेवटी ग्रोएनिंग जे बोलला त्याने बर्फाळ थंड पाण्याचा एक ओघळ माझ्या मनातून सरसरत गेला - " मला मी आॅशविट्झमध्ये होतो आणि अप्रत्यक्षरित्या ज्यूंच्या हत्याकांडाचा एक भाग होतो, याबद्दल अजिबात लाज वगैरे वाटत नाही. अपराधी वाटण्याचा तर प्रश्नच नाही. नाझींच्या ज्यूविरोधी प्रचारावर मी त्या वेळी विश्वास ठेवला आणि त्यामुळे मी आॅशविट्झमध्ये काम केलं. पण अशा गोष्टी होतात. त्याबद्दल मला वाईट वाटतं पण अपराधी? छे! शक्यच नाही!"
क्रमश:
प्रतिक्रिया
16 Oct 2014 - 12:26 pm | एस
शेवटचा परिच्छेद विचार करण्याजोगा आहे.
16 Oct 2014 - 5:43 pm | मधुरा देशपांडे
अस्वस्थ करणारे आहे हे सगळे. डाखाऊचा काँसंट्रेशन कँप किंवा बर्लिन येथील काही संग्रहालये अशा ठिकाणांची अंगावर शहारे आणणारी भेट आठ्वते असे काही वाचले की.
स्वॅप्स यांच्याप्रमाणेच म्हणते - वाचनीय आणि विचार करण्याजोगा लेख.
16 Oct 2014 - 7:35 pm | मुक्त विहारि
आवडला...
16 Oct 2014 - 7:49 pm | पैसा
नको वाटतंय वाचायला सगळं. :(
17 Oct 2014 - 8:12 am | अजया
सुरेख अनुवाद करताय.मुळातलं मराठीच आहे असं वाटतंय.पुभाशु.
17 Oct 2014 - 8:28 am | बोका-ए-आझम
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!
17 Oct 2014 - 10:14 am | खटपट्या
बापरे !! कसं भोगलं असेल त्या लोकांनी...
17 Oct 2014 - 10:34 am | पिंपातला उंदीर
अप्रतिम.
24 Sep 2015 - 3:45 pm | स्नेहनिल
सर्वच भयानक :(
24 Sep 2015 - 4:50 pm | सानिकास्वप्निल
सुन्न करणारं आहे हे सगळं :(
24 Sep 2015 - 8:16 pm | पद्मावति
....अगदी हेच वाटतय.