नाळ
प्रश्न सुटता सुटता
माय उत्तरांची व्याली
प्रसवल्या उत्तरांच्या
प्रश्नचिन्ह शोभे भाळी
ललाटीचे लेकरांच्या
वाचुनिया फुंदे माय,
"प्रश्न घेऊनी जन्मल्या
उत्तरांचे करू काय?"
प्रश्नांकित उत्तरांची
गाठ घडोघडी पडे
एक सोडविण्याआधी
नवा प्रश्न ठाके पुढे
अनादि नि अनंत ही
श्रेढी प्रश्न उत्तरांची
चिरंतनाशी जोडीते
नाळ क्षणभंगुराची