कविता
आयुष्य
निर्णय चुकतात, चुकू द्यावे
श्रेय हुकतात, हुकू द्यावे
जगता जगता आयुष्याकडून
जुगारातले दान घ्यावे.
बंध सुटतात,सुटू द्यावे
माणसं तुटतात, तुटू द्यावे
जगता जगता नात्याकडून
आपुलकीचे फुल घ्यावे.
मार्ग चुकतात, चुकू द्यावे
रस्ते सरतात, सरु द्यावे
चालता चालता रस्त्याकडून
सावलीचे दान घ्यावे.
प्रश्न पडतात, पडू द्यावे
उत्तरं चुकतात,चुकू द्यावे
सोडवता सोडवता उत्तराकडून
ज्ञानाचे कण घ्यावे.
ध्येय हुकतात, हुकू द्यावे
अनुभव मुकतात, मुकू द्यावे
जगता जगता अनुभवाकडून
स्वत्वाचे भान घ्यावे.
खेळीया शब्दांचा
कसे स्मरतात शब्द त्यांना नित्य कवीता बांधती
त्याच वाटा, त्याच लाटा, तोच चंद्रमा अन् त्याच चांदराती
शिशिर तोच ,वसंत तोच,तेच क्षितिज, भुवरी टेकले
उगवती अन् मावळती तीच,अंबरात तेच रंग पेरले
गुंजारव तोच, तोच मधुप, तीच राधा बावरी
तोच कृष्ण सावळा, तरी नित्य वेगळे कवन यावरी
‐------------------------------------------------
भरतीचा रौद्र रूप,परतीचा अंतरंग दावतो
कर्कटांनी रेखाटलेला किनारा नित्य नवा भासतो
कधी पूर्ण चंद्र,कधी चंद्रकोर कधी लखलखत्या चांदण्या
घन तमीचा शुक्र तारा, प्रेरणा कवन बाधंण्या
'बाट्या' (पुणेकर झालेल्या इंदोरकराची व्यथा)
पेर्णा १:
पेर्णा २.
( काटा रुते कुणाला )
'बाट्या' हव्यात मजला
ऐकीत नाही कोणी
मिळतील का पुण्यात
ठावे कुणास नाही
विसरू कशी आता मी
इंदोरची ती बाटी
पुणे-तेथ कायुणे
भलतीच बात खोटी
स्वगृही करू पहातो
रुजतो अनर्थ तेथे
भार्या पुणेकरिण ती
हा दैवयोग आहे
सांगू कशी कुणाला
कळ आतल्या जिवाची
बाट्या न खात जगणे
मज शाप हाचि आहे
ना.धों.महानोर
पद्मश्री ना.धों.महानोर. मराठी साहित्यातील मोठं नाव. कविता, कादंबरी, नाटक, कथा. असे सर्वच वाड्मय प्रकार त्यांनी हाताळले. शिकत असताना गांधारी कादंबरी अभ्यासाला होती. ना.धों.महानोरांची ही पहिली ओळख. मग रानातल्या कविता, अजिंठा हे दीर्घ काव्य अनेकदा वाचून काढले आहे. पुढे, पावसाळी कवितांनीही वेड लावलं. शेती-मातीच्या कविता त्यांच्या वाचनात आल्या. जैत रे जैत, सर्जा, विदूषक, दोघी या चित्रपटातली गाणी कायम ओठावर रेंगाळत राहीली. आमच्या महाविद्यालया पासून त्यांचं पळसखेडा हे गाव जवळच आहे. अजिंठा डोंगर रांगा आणि जंगल सर्व हिरवेगार वनराईचा परिसर. 'मी जगतो तेच लिहितो' असे मानणारे कवी.
राधा..
राधे !!!
एकेकाळी उभ्या गोकुळाला
वेड लावणाऱ्या या बासरीला कधीतरी
तुझे ओठ लावून बघ ना...
तेव्हा तुझं तुलाचं कळेल की
त्या बासरीच्या अवीट सुरांमध्ये
माझ्या स्पंदनांची कर्तबगारी नव्हतीचं कधी...
तुझ्या-माझ्यातील दुष्कीर्त नात्याला
सांभाळताना तुझ्या स्वतःशीच चाललेल्या
अविरत झगड्यातून बाहेर पडणारे
अस्वस्थ उमाळेचं तिची ऊर्जा होती...
आप्त-स्वकीयांना फसवून,
साऱ्या जगाच्या नजरा चुकवून,
रोजंच केवढं मोठं दिव्य करून,
माझ्या वेड्या ओढीनं यायचीस तू ...
इलाज नाही
कविवर्य विंदा करंदीकर यांची माफी मागून......
गर्भात वेदनेच्या रुजवू नकोस काही
उसळू दे वेदनांना त्याला इलाज नाही.
उसने घेवून बीज पेरु नकोस काही
मातीत खोट आहे त्याला इलाज नाही.
सद्भाव माणसांचा आणि स्वप्ने सुखाची
विषवल्लीनी वेढली त्याला इलाज नाही.
बोल ते फुकाचे आणि आदर्श देवाघरचे
नजरेत विखार आहे त्याला इलाज नाही.
------- अभय बापट
२९/०७/२०२३
निरोपाच्या क्षणी . . …
निरोपाच्या क्षणी . . …
निरोपाच्या क्षणी अश्रू डोळ्यातील चटका लावून गेले,
मन कातर, हळवे हळवे करून गेले.
म्हणालो, “वेडे, ह्या जन्मी जरी जमले नाही तरी पुढच्या जन्मी नक्कीच जमवू.
हातात हात घालून चालू,
एकच कॉफी मागवून, ऊष्टी ऊष्टी पिवू,
चंद्राच्या साक्षीने बिलगून वाळूत पाऊल खुणा ऊमटवू,
पावसात भिजू, ऊन्हात तापू.
मिठीत एकमेकांच्या जगाला विसरू टाकू.
कर जरा कंट्रोल...! :-)
किती ते मेसेज लिहितो अन् मला छळतोस तू
कर जरा कंट्रोल बाबा का उगा जळतोस तू
मित्र मज असले जरी पैशास येथे पासरी
तुज नको कसलीच चिंता तू मला सर्वोपरी
राग का यावा तुला हे गूढ मजला नाकळे
लिस्टातला तो एकजण, नाही कुणी रे आगळे
फक्त कॉफीचे निमंत्रण एक मी स्वीकारले
चार घटका हास्य, गप्पा यामधे वाहावले
ठेवला मी फोन होता मूक सारा वेळ तो
एवढीशी चूक झाली, मजवरी का उखडतो
नाहि जमला घ्यायला रे फोन तव तेथे मला
बिल कुणी भरणार माझे, मित्र जर रागावला?
शंका नको घेऊ जरा तू निखळ मैत्री ही असे
माझिया डीपीवरी तो फक्त 'लाईक' देतसे
स्वप्नजा!
बऱ्याच दिवसांनी एक रोमँटिक कविता झाली!! :-)
कोण तू, माझी कुणी आहेस का?
स्वप्नजा.. जागेपणी आहेस का?
त्या सुगंधाचाच दरवळ आज.. अजुनी..
ब्रह्मकमळाची सखी आहेस का?
चाल नुपुरांची किती अलवार.. नाजुक!
चालुनी येते खरी आहेस का?
राग छेडी तार हृदयाचीच माझ्या..
अजुनी तू "रागा"वली आहेस का?
काल मज दिसलीस तू होती म्हणूनी..
आज वाटे, तू उद्या आहेस का?
---
का तुझा मी शोध घेतो पण, निरंतर?
सर्वस्व माझे व्यापुनी आहेस का?
राघव
[१९ जुलै २३]