gajhal

कोवळे काही ऋतू...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
26 Mar 2018 - 5:13 pm

कोवळे काही ऋतू अंगावरुन गेले...
मोहराने रान सारे बावरुन गेले!

लालिमा चढला कसा शब्दांस आज माझ्या?
गीत माझे कोणत्या ओठावरुन गेले!

राहिले आहेत काटे सोबतीस,बाकी
पाकळ्यांचे झुंड या देठावरुन गेले!

हे कसे आले अचानक या नदीस भरते?
दोन तृष्णे'चे बळी काठावरुन गेले!

वेदनेवर वासना जेथे उभार घेते
शब्द माझे आज त्या कोठ्यावरुन गेले!

—सत्यजित

gajhalमराठी गझलशांतरसकवितागझल

(बार हो)

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जे न देखे रवी...
22 Mar 2018 - 10:23 am

प्रेरणा : यारहो ...

दादाश्रींची विनम्र माफी मागुन ..... अर्ज़ किया है ....

ह्या उन्हाचा जोर आहे वाढलेला यारहो
शोधुया नजदीक साधा एक बियर बार हो

ड्रॉट ज्या त्या ब्रॅन्ड्ची तिथलीच बॉटल चांगली
पण अता चालेल काही फक्त असु दे गार हो

मागवा चकली चना अन हाफ चीकन तंदुरी
कावळ्यांना भूक आहे लागलेली फार हो

ती म्हणाली सोड तू जमणार नाही आपले
दावले "जमवून" मग "ठरवून" वारंवार हो

एकदा केसांस वेडे मोकळे सोडून बघ
नेत्रसुख असती गडे हे झाकले उभार* हो

gajhalअनर्थशास्त्रअभय-गझलआता मला वाटते भितीकाहीच्या काही कवितागरम पाण्याचे कुंडजिलबीफ्री स्टाइलविराणीशृंगारस्वरकाफियाहझलशांतरसविडंबनगझल

जसे छाटले मी मला येत गेले,धुमारे पुन्हा!

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
7 Feb 2018 - 2:33 am

जसे छाटले मी मला येत गेले,धुमारे पुन्हा
कळू लागले जीवनाचे फिरंगी,इशारे पुन्हा!

कुण्या डोंगरी एक पणती सुखाने,जळू लागली
तमाच्या तमेचे तिला येत गेले,पुकारे पुन्हा!

कळ्या वेचल्या काल माझ्या करांनी,गुन्हा जाहला
फुलू लागले श्वास-श्वासांत माझ्या,निखारे पुन्हा!

पुन्हा लेखणीला नवा बाज चढला,लिहू लागलो
तुला पाहिले अन् जुने स्वप्न झाले,कुंवारे पुन्हा!

तुझी लाट झालो तसे वाटले की विरावे अता
कुण्या वादळाने नको दाखवाया किनारे पुन्हा!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलशांतरसकवितागझल

(तरही) या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला!

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
18 Jan 2018 - 2:00 pm

(मौसम तरही का छाया है, तो गुस्ताखी माफ! पण तरहीच्या ओळीसाठी विशाल व क्रांतीताईंचे आभार,तसेच अगंतूकपणे तरही लिहिल्याबद्दल क्षमस्व!)

सूर्य मावळता कधीही व्हायचे नव्हते मला
या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला!

पावले वळली कितीदा त्याच त्या वळणावरी
ज्या जुन्या शहरात पुन्न्हा जायचे नव्हते मला!

आजही डोळ्यांत माझ्या धुंद ही आली कशी?
मी पुन्हा प्यालो..खरेतर, प्यायचे नव्हते मला!

वेळ नाही,काळ नाही,ना ऋतूंना लाजही
थेंब-थेंबाला विचारा,न्हायचे नव्हते मला!

भावनांना भाव नव्हता मैफलींमध्ध्ये तुझ्या
गात आलो गीत मी,जे गायचे नव्हते मला!

gajhalgazalमराठी गझलशांतरसकवितागझल

तुझ्या नाजूक ओठांनी...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
9 Jan 2018 - 9:55 pm

अवेळी मोहरावे तू.. ऋतूंना साद घालावी
तुझ्या नाजूक ओठांनी कळ्यांची चुंबने घ्यावी!

फुले वेचून मी सारी तुझ्या हातात देताना
तुझ्या अलवार स्पर्शांनी मला आलिंगने द्यावी!

कपाळी चंद्र कोरावा,चुड्याने चांदणे ल्यावे
तुझा शृंगार होताना,गुलाबी रात्र जागावी!

जरासा तोल ढळला की मला बाहूंत घ्यावे तू
तुझ्या आरक्त डोळ्यांची शराबी धुंद मी प्यावी!

सुगंधी स्पंदने अपुली उराशी खोल लपवू,ये...
फुलांचे देह शिणले की, धुक्याची शाल ओढावी!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलशृंगारकविताप्रेमकाव्यगझल

जपमाळ

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in जे न देखे रवी...
17 Nov 2017 - 8:14 pm

हेही बरेच आहे,
तेही बरेच होते,
आपापल्या परीने,
सारे खरेच होते

मोजून पाप माझे
जपमाळ ओवलेली,
मोक्षास गाठण्याला,
तितके पुरेचं होते,

आयुष्य तारकांचे
मोजीत रात्र होती
मोहक असे मनाला
भूलवीत बरेच होते

खाणीत नांदण्याचा
कोळश्यास शाप आहे
नसते ठिसूळ तुकडे
तर तेही हिरेच होते

सरणास भेटताना
गेली नजर मागे
चेहरे ओळखीचे
हसरे सारेच होते
-शैलेंद्र

gajhalकवितागझल

मनातल्या मनात मी...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
6 Nov 2017 - 11:14 pm

मनातल्या मनात मी तुलाच गुणगुणायचे
अशीच मी,कधीतरी.. तुझ्यासवे जगायचे!

तुटून तारका क्षणात आसमंत लांघते
उगाच रात्र-रात्र मी नभात चमचमायचे!

गुलाब-पाकळ्यांतुनी तुझी गझल घुमायची
उरात लाख मोगरे सुरात घमघमायचे!

कुठून ऊब एवढी मिळायची मला तरी?
तुझे फुलासमान शब्द ओठ पांघरायचे!

पहाट कोवळ्या उन्हात अंग वाळवायची
जशी सुरेल भैरवीच भूप आळवायचे!

असून ठाव नेमकी कुठे असेल डायरी
पुन्हा पुन्हा उगाच मी कपाट आवरायचे!

अशीच मी,कधीतरी.. तुझ्यासवे जगायचे...

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलकवितागझल

सख्या, कसे? कुठून रोज, आणतोस चांदणे?

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
4 Oct 2017 - 3:36 pm

हळूच सोडतोस केस..माळतोस चांदणे...
सख्या, कसे? कुठून रोज, आणतोस चांदणे?

अधीर ओठ साधतात मौनही कसे तुझे?
किती अरे, उरात खोल पेरतोस चांदणे!

बनून स्वप्न चोरतोस झोप रोजचीच तू...
विचारताच, चोर कोण? सांगतोस..चांदणे!

उनाड चंद्रमा बनून हिंडतोस रात्रभर
पहाट-वेळचे, टिपूर मागतोस चांदणे!

नभात लक्ष तारका उधाणतात कैकदा
मिठीत केवढे कसून घुसळतोस चांदणे!

मधाळ चांद, वितळतो..रसाळ रात वाहते...
असे कुण्या सुरांत रे! पुकारतोस चांदणे!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलशृंगारकवितागझल

मी माझे तारांगण सादर करतो

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
25 Sep 2017 - 9:46 am

कोण कुठे कोणाचा आदर करतो
पाठीवरती वार बिरादर करतो

प्याद्याला आदेश रणाचा देतो
नि तिथुनी घुमजाव बहादर करतो

गाभाऱ्याला सोडत नाही क्षणभर
देवाचे रक्षण जमगादर करतो

तुला न बाधो शिशिर येथला म्हणुनी
मी अवघ्या देहाची चादर करतो

आळ नको घेऊ, झाडाझडती घे
(मी माझे तारांगण सादर करतो)

देव दयाळू आहे कळल्यापासुन
रोज नवे कन्फेशन फादर करतो

डॉ. सुनील अहिरराव

gajhalहे ठिकाणकवितागझल

मांडतो आहे नव्याने...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
16 Aug 2017 - 5:39 pm

चाललो शहराकडे मी..गाव सांभाळून घे
मांडतो आहे नव्याने..डाव सांभाळून घे!

सवय झाली एकदा की क्षीण होते वेदना
लागतो जो जो जिव्हारी..घाव सांभाळून घे!

जीव तुटतो त्या क्षणीही याद मी येईल पण
तू उखाणे घेत असता,नाव सांभाळून घे!

वेगळ्या वाटा तुझ्या अन् वेगळ्या माझ्या सही
टाळ तू प्रत्येक काटा..धाव सांभाळून घे!

काजळाची रेघसुद्धा वाटते आहे गझल
तू तुझ्या नजरेत माझे भाव सांभाळून घे!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलकवितागझल