आभाळाच्या सावलीत जमिनीच्या पोटातून झरणारी माया पित शांत पहुडली होती सगळी
कुणा दोन अनोळखी हातांनी ओंजळीत मावतील तेव्हढी उचलून नेली कच्ची बच्ची
एकमेकांची ओळख घट्ट धरून मुठीत एका अनोळखी वर्तुळावर जावून पडली सारी
सुरु झाला खेळ तशी, कधी भिजत, कधी थिजत शोधत राहिली हरवलेली जमिन
फिरत राहिली काळचक्रावर भोवळ येईस्तोवर
काही घडली,काही मोडली
दोन हात तिम्बत राहिले त्यांना
मनाजोगता आकार येईपर्यंत
भाजून काढताना, हात कुणालातरी सांगत होते
'तावून सुलाखून निघाल्यावरच पक्की होतात मनं…
वाजवून बघावीत एकदा , आणि नेभळट वाटली तर मांडूच नयेत बाजारात.'