कविता

फुंकर

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
14 Nov 2013 - 3:31 pm

वय जवळ करी मज दूर पळे तरुणाई
मन आठवते लागते आळवू अंगाई
क्रमल्या वाटा पाडियले पथ पण तरी वाटते अस्थाई
स्थानक का कोठे अवघडले हरवली दशा नि दिशा दाही

किंचित थोडे संचित काही फ़ुंकर घाली शमवी लाही
शैशव दूजे नकळत देई स्पर्शाविण ऊर्जा या देही
शोधीत सुखे परतून पुन्हा नव जुने बालपण येई
विसरून जीर्णपण जन्माचे मउ कुशीत घेई आई

………………… अज्ञात

अद्भुतरसकविता

भूकंप....!

psajid's picture
psajid in जे न देखे रवी...
13 Nov 2013 - 11:14 am

आज खूप दिसांनी
पुन्हा त्या वास्तूत आलु,
पडक्या पांढरीच्या इटा बघून
काळूखात त्या हरवून गेलू !!

माती सारता हातांनी
डोळं उघडं निर्जीव धूड,
नवलाईत सगळं डोळं
वासं झोपल्याचं त्यात गूढ !!

वाटतंय राहून राहून मना
माती कृतघ्न नसावी झाली,
आखीरपर्यंत आसंल थरथरली
जरी शेजाऱ्यांनी मान ढाळली !!

या मातीतच वलावा उभारा
त्यावर निर्धास्त सोडला पसारा,
दोन चिमुकली फळे संसारा
झोपली गार ओढून ढिगारा !!

करुणकविता

आठवण

वडापाव's picture
वडापाव in जे न देखे रवी...
13 Nov 2013 - 12:19 am

छोट्याशा या जगात माझ्या
तू खूप मोठी कामगिरी केलीस
मी जरा थोडं अजून जगावं
म्हणून स्वतः झिजुन झिजुन मेलीस

माझा हट्ट पुरवत आलीस नेहमी
सगळी कामं पाठी टाकून
सलगी केलीस माझ्याशी तू
विश्वास ठेवलास डोळे झाकून

ऐश-आरामात जगायची सवय होती,
शून्य विकास फक्त विलास
वाईट दिवस आल्यावर बिथरलो
तेव्हा फक्त तूच आधार दिलास

भावनिक ब्लॅकमेल करुन मी तुझ्याकडून
घेतलं स्वतःला आंजारून गोंजारून
तू दिलेला मैत्रीचा हात पकडून
चान्सही मारला प्रेमाचा मी चोरून

कविताप्रेमकाव्य

झुंजु मुंजू

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
12 Nov 2013 - 9:52 am

मेघांस कांही रुपेरी किनारी
तळी त्याच काळ्या कपारी कपारी
जणू कातळाचे भले अंग ओले
तया जोजवी भास्कराची सवारी

तमा ना जगाची भरे रोज मेळा
सावळ्या कतारी सकाळी सकाळी
क्षितीजी पहाट झुंजु मुंजू हिवाळी
सरी पावसाच्या आता,….
दूरच्या आभाळी …….

……………… अज्ञात

अद्भुतरसकविता

भाकरीचा चंद्र ....

psajid's picture
psajid in जे न देखे रवी...
11 Nov 2013 - 12:21 pm

गरवेलाच छप्पर
चिखलाच खापर,
शमवावी तहान त्यांनी
पिऊन मळकं पाणी ......

व्यापारी दुनिया
व्यावहारिक माया,
न्याहळतोय जरी तो
उघडेना आपली वाणी ......

जगण्याला काय
मोल हिथं नाय,
सावकाराचा भार
डोई व्याजाची गोणी ......

जन्माचा वैताग
भाकरीचा चंद्र माग,
देतील प्रसाद कधीतरी
अन हिरावतील कंठमणी ......

लढेन म्हणतोय विरुध्द
पण साथ नाही शुद्ध,
रस्ता दाखवतील सगळेच
पण संगे चालेना कोणी ......

श्री. साजीद यासीन पठाण

करुणकविता

अव्यक्तांच्या समिधा

सांजसंध्या's picture
सांजसंध्या in जे न देखे रवी...
10 Nov 2013 - 7:30 pm

आज ना उद्या
वटवृक्षांची जोडी..आपोआप ढासळेल, उन्मळून पडेल..
तग धरून उभारलेली
अंग चोरून वाळलेली
आज ना उद्या
घाव बसतील कु-हाडीचे.. फांदीफांदीवरती
काही शिल्लक उरणार नाही, जमिनीवरती
पण एकमेकांत गुंतलेल्या पारंब्या
तुटता तुटणार नाहीत..
नाग-नागिणीसारख्या मिठ्या
सुटता सुटणार नाहीत
खोल खोल गेलेल्या..एकमेकांत गुंतलेल्या
कितीही खणलं तरी पुरून उरतील..
तुझ्या माझ्या वेदनांसारख्या !!
जगाच्या अंतापर्यंत खणत राहीलं तरी
अव्यक्ताचा गुंता सुटायचा नाही..
शेजारी उगवूनही जपलेल्या
विरहाची माती व्हायची नाही

कवितामुक्तक

प्रवास

भारी समर्थ's picture
भारी समर्थ in जे न देखे रवी...
10 Nov 2013 - 12:28 am

धुक्यात अंधुक दिसते वाट
कठिण अशक्य प्रचंड घाट
परि न टेकुनी किंचीत पाठ
एकच बांध तु निश्चयगाठ
चालत रहा रे चालत रहा

रविकिरणांची घेऊन साथ
अडेल तेथे घालून लाथ
फुलात शोधुन न्यारी बात
फळे यशाची चाखीत खात
चालत रहा रे चालत रहा

इथे प्रवासी तु न एकटा
नवे सवंगडी, नविन वाटा
गाठलेस जरी अपुल्या ध्येया
नवशिखरे तु चढुनी जाया
चालत रहा रे चालत रहा

कविता

"वेडी"

अमेय६३७७'s picture
अमेय६३७७ in जे न देखे रवी...
9 Nov 2013 - 11:01 am

येताजाता शिव्या सारख्या
गाड्यांवरती दगड मारते
जरतारीच्या आवेशाने
लक्तर दैवी ती सावरते

केस पांढरे - जटाच भारी
मिचमिच डोळे लुकलुकताना
तोंड चालते हातांसोबत
तारस्वराने ओरडताना

येणारा अन् जाणाराही
वाट वाकडी दुरून करतो
मधमाश्यांच्या मोहोळाशी
कोण कशाला उगाच भिडतो?

हसते वेडी सदा मुखाने
आनंदी परि कधी न दिसते
मूल पाहुनी कुणी गोजिरे
तळमळताना अश्रू पुसते

स्थळकाळाशी तुटले नाते
एकच आठव गतकाळाचे
रहदारीने ठोकरलेल्या
शिशुदेहाच्या कलेवराचे

कविता

कल्पिते

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
8 Nov 2013 - 7:15 pm

कोण कल्पिते कथा मनी जळी स्थळी
अंग जाळिते व्यथा उजाडते कळी
जाणिवा उण्याच का बुडून त्यात पोकळी
वंचना किती कशा दिशा न एक मोकळी

कोष्टकेच जुंपली व्यापली कुळी
झुंझली अनंग रोम रोम पाकळी
अंतरी उदंड कंड बंड कोश वादळी
थांग छिन्न बंद मुका ओहटी तळी

का कुणी कुणास जोजवावे उरी
अकारणे कशास आठवावे तरी
व्याध वेध घेत धाव धावतो परी
मिळेल जे मिळूनही रितीच टोकरी

……………… अज्ञात

अद्भुतरसकविता

अस्तित्वाच्या पल्याड..

आनंदमयी's picture
आनंदमयी in जे न देखे रवी...
7 Nov 2013 - 2:49 pm

अस्तित्वाच्या पल्याड कोठे संथ
नदीच्या पैलतिरावर,
जललहरींसह वाहत गेली दूर तिथे
स्वप्नांची घागर...

त्या तीरावर गोकुळनगरी
कान्हाची बेधुंद बासरी
पाहुन लोभस रूप तयाचे, मनही झाले
निळसर निळसर

सर्वार्थाने देह लाजला
पाहताच तो रोखुन मजला
नाजुक कटिकमलावर बसला रुतुन
तयाच्या नजरेचा शर

हळूच जवळी आला कान्हा
छेडित नाजुक अधरफुलाना
भान हरपले जेव्हा मजला स्पर्शुन
गेला तो मुरलीधर

हलवुन मजला गेला वारा
उधळुनी सुंदर स्वप्नफुलोरा
विरून गेले रूप सावळे
आणिक मागे उरली हुरहुर

©अदिती शरद जोशी

शृंगारकविताप्रेमकाव्य