जगण्यातल्या रोजनिशीतल्या घडामोडी
1.व्यवस्था
ही शहर तुम्हाला अशीच चालवाचीयत तर तस सांगा, लोकांना जेरीस आणून आपण मात्र सुशेगाद जगायचं, आपल्या सोयीच्या गोष्टीसाठी सगळे नियम धाब्यावर बसवायचे, निवडणुका, प्रकाशन सोहळे, जय्यत तयारीने होणारे खाजगी समारंभ यासाठी कुठे असते सोशल डिस्टसिंग. लोकांना दररोज करावा लागणारा सार्वजनिक बस वाहतुकीचा प्रवास हा सध्या "आज कूछ तुफानी करते है " या कॅटेगरीतला. त्यातही वशिलेबाजी करत किंवा मग कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी खास अत्यावश्यक सेवेतल्या लोकांशी संगनमत करून खोटी ओळखपत्र बनवून आणि त्या आधारावर रेल्वेचे पास उपलब्ध करून देण्यासारख्या गोष्टी हल्ली सर्रास निदर्शनास येतात. ‘ज्याची’ सरकार त्यांच्या कार्यालयात आयडी बनवून देण्याच्या कामासाठी माणसं आहेत आणि या सा-या व्यवस्थेला लोकशाही या गोंडस नावाखाली चालवू दिलं जात, सामान्यजणाच्या एकूण जीवनमानाबदल इथल्या कुठल्याही राजकीय पक्षाला घेणं-देणं उरलेलं नाही, फक्त ते जर आपल्या राजकीय अजेंडयाखाली येणार असेल तर मात्र थोडया प्रमाणात का होईना आवाज उठवायचा, बाकी एकूण वागणं हे “एकाच माळेचे मणी” या प्रकारातलं.
ओला-उबेर दुस-या मिनिटाला उपलब्ध व्हायच्या काळात, बसस्टॉपवर उभं राहायल्यावर पुढची बस केव्हा येईल यांचा कोणताही मागमूस नाही, सांगायला ‘बस प्रवास’ नावाचं अँप आहे पण ते असून नसल्यासारखं, मुंबईच्या पालकमंत्र्यांना टिविट केल्यानंतरही ढिम्म प्रतिसाद. बसची तातकळत वाट बघत उभं राहिल्यावरही पाऊण-पाऊण तास बस येत नाहीत, ज्या येतात त्या प्रवाशांनी इतक्या भरुलेल्या असतात की कोरोना विषाणूही त्यात मावणारं नाही, तश्यातच इंच इंच लढू या धर्तीवर बसच्या शेवटच्या पायरीच्या शेवटच्या समापणाला पायाचे टोकच मावेल एवढया जागेवर उभं राहत! ख-या अर्थाने ‘रामभरोसे’ लोक प्रवास करतायत, यात रामाच्या मंदिरासाठीच्या निधी जमवण्याचा कार्यक्रमही यांच काळात चालू आहे, पत्रक वाटून त्यावर अयोध्येतल्या बॅकचे अंकाऊट डिटेल्स दिलेत, थोडे क्यूआर कोड, यूपीआय आयडी देखील बनवायला पाहिजे होते, ग्रांऊड रिअल्टी काय आणि भूतकाळात रमणं काय? अस्मिता जपण्यासाठी आधी त्याचं अस्तित्व टिकवण्याएवढी तरी व्यवस्था बनवाणारे..... नतद्र्ष्टयांनो!!
**********
2.इन्कम टॅक्स डिपार्टमेंट
लोकांना अपेक्षा कसली खात्री होती, विश्वास होता की केंद्र सरकार डयू डेट म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख नक्की वाढवेल, साधारण डिसेंबर तेवीस पासून खूप सा-या ऑफिससमध्ये वर्षाअखेरच्या सुटटयांचे वेध लागतात, यावर्षी कोविडने दिलेल्या दणक्यापाई खूप लोकांची रेगुलर पर्यटनवारी हुकली होती त्यामुळे आता बरेच नियम शिथिल झाल्यावर नेहमीच्या कामापासून फारकत घेत चारएक दिवसाची का होईना ट्रिप करुन येत तेवढाच हवापालट आणि पुन्हा नव्याने ताज्या दमाने काम करण्यास आवश्यक ऊर्जा, थोडीफार विश्रांती यासाठीच नियोजन खूप सा-याजणांच्या डोक्यात घोळत होतं. खरं म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्नची रेग्लुर डयू डेट असते साधारण जुलै महिन्याची एकतीस तारीख, जी सरकार मुदत वाढवत साधारण एक महिना पुढे करते असा नेहमीचा अंदाज होता, पण यंदा कोविडमुळे सरकारने ही अंतिम मुदत यावेळी पार एकतीस डिसेंबर केली, पण आता ही अंतिम तारीख ही कमी पडत असल्याची चिन्ह दिसू लागली होती याला कारण अर्थातच एकूणच कोविडपायी बारगळलेल्या नियोजनातून सावरत इन्कम टॅक्स रिटर्नचा डेटा गोळा करायला लोकांना वेळ लागला आणि याशिवाय “आहे ना डिसेंबर एकतीस करु सावकाश” असं पार ऑक्टोबरपासून म्हणण्या-याची काय कमी नव्हती, त्यामुळें जसा डिसेंबर जवळ आला तसा या डेटा आणून देणा-यांची संख्या वाढत गेली आणि या सगळ्या फायलिंगच्या कामावर उदरनिर्वाह करणा-या सीए आणि अन्य व्यावसायिकांच्या कार्यालयात कामासाठीचे तास वाढू लागले, सकाळ सातपासून अगदी रात्री एकपर्यंत डयूटी करण्याच्या मानसिकतेतून जाव लागण्याच्या तयारीसाठी कर्मचाऱ्यांनी मन तयार केली, या अधिकच्या कामातून जर सुटका होण्याचा मार्ग कोणता दिसत असेल तर तो म्हणजे सरकारने ही अंतिम तारखेची मुदत वाढवली तर, बरं आता पार सत्तावीस डिसेंबर उजाडला तरी अंतिम तारीख वाढवण्याची कोणतीही हालचाल व बातमी येत नसल्याचं पाहून या क्षेत्रात काम करणारी लोक काहीशी हवालदिल झाली. आज नाही झाली तर उदया होईल, लोक हातावर हात मारुन पैजा लावायला तयार झाली, “अरे नक्की डयू डेट इक्सेटन होणार, अरे करावीच लागेल, अजून लोकल कुठे सुरु झाल्यात सगळ्यासाठी, कामावर स्टाफ कुठे येतो हंडरेन्ट परसेट, वर्क फ्रॉम होमला लिमिटेशन आहेत, अजून वॅक्सीनचे डोस ही लोकांना दिले जात नाहीयत” या सारख्या वार्ता सुरु झाल्या, थोडक्यात लोकांना विश्वास होता की इतका कोविडचा माहौल आहे त्यामुळे केंद्रसरकार नक्कीच अंतिम मुदत पार मार्च एकतीसपर्यंत वाढवेल.
हल्ली न्यूजच्या अगोदर न्यूज माहित करुन घेण्याचा मार्ग म्हणजे टिवीटर, इन्कम टॅक्सच्या टिवीटर हॅन्डल त्या डिसेंबरच्या शेवटच्या आठवडयात प्रत्येक दिवशी मागच्या दिवसापर्यंत किती इन्कम टॅक्स रिटर्न फायल झाले त्याचं स्टाटिस्टिक टाकत होतं, आणि त्या टिविटला रिप्लाय म्हणून लोक सरकारकडे इन्कम टॅक्स फायलिंगची डयू डेट वाढवण्याचा तगादा लावत होती, याव्यतिरिक्त सीए लोकाची संस्था आयसीएआय व अन्य लोकांचा पाठपुरवठाही चालू होता, काही लोकांनी न्यायालयातही धाव घेतली, या सा-या प्रयत्नाने एकूण परिवर्तन काय होतं तेच पाहणं बाकी होतं.
मुळात लोकांना एक सवय झालीय की करु सावकाश आहे ना डयू डेट अजून, या सगळ्यांचा परिणाम शेवटच्या दिवशी जास्तीच्या फायलिगपायी होणा-या ऑनलाईन झुबडीमुळे इन्कम टॅक्सचा सर्व्हर स्लो किंवा क्रॅश होणा-याचे प्रकार होतात, या सगळ्यात रिटर्न न भरला गेला तर… तर मग अधिकचा दंड म्हणजेच फाईन भरावा लागणार होता, तसे ही आता सरकारला पैसे हवेच आहेत. पण आता लोकांची धाकधूक वाढतच चाललीय की सरकार घोषणा का करत नाही म्हणजे आम्ही तश्या त-हेने प्लॅनिग तरी करायला मोकळे, या काळात आतल्या गोटातल्या बातम्या पुरवणं ही चालू असतं, त्यातून आलेल्या खबरीतून कळालं की डयू डेट नक्की पुढे ढकली जाणारं… पण किती दिवसांसाठी…. तर लोकांना एक अंदाज होता की कोविडची पार्श्वभूमी लक्षात घेत किमान एक महिनातरी वाढवेल… लोकांना आता निर्माला सीतारामान काय डिसिजन घेतात त्यांची उत्सुकता होती. आणि एकदाचं डिक्लेर झालं, फक्त दहा दिवस….कहर उडला… अर्थमंत्री महिला असून देखील अगदी आई-बहिणीवरुन शिव्या देण्याचे प्रकार घडू लागले. त्याला कारणंच तशी होती. दहा दिवसात! हे इतकं सगळं पटापट करत वेळेआधी सगळे इनकम टॅक्स रिर्टन फाईल करणं अशक्यप्राय गोष्ट होती, आपण आपला डिसिजन घ्यायचा, बाकी मरु देत, जनतेला सोडून दयायचं वा-यावर, संघटना असूनदेखील सुशिक्षित लोकांसोबत असा अन्याय होत असेल तर अशिक्षित व असंघटित लोकांचं काय? सत्ता असल्यावर माणसं काहीही करु शकतात यांचा आणखी एक दाखला म्हणजे हे प्रकरण. आता एकदा का डयू डेट डिक्लेर झाली त्यानंतर मग त्या हिशोबाने नियोजन करत जितके रिर्ट्न्स वेळेवर फाईल होतील तेवढे करायचे असा एकच त्यातल्या त्यात मार्ग काढला गेला. त्यातही काही जणानां आशा होती की ही दहा दिवसांनी वाढवलेली डयू डेट पण नंतर वाढवली जाईल. पण निव्वळ दहा दिवस हा खरचं मोठा धक्का होता, ‘ते तुमचं तुम्ही बघा’ यातलाच प्रकार केंद्र सरकारने केला होता.
एकतर ऑफिसमध्ये उशीरापर्यंत थांबा, त्यात रेल्वेचा पर्याय उपलब्ध नाही, सरकार आम्हाला म्हणत तुम्हाला कोविडने मरु देणार नाही पण असं जगायला लावू जे नरकयातनेपेक्षा कमी नसेल असं म्हणायची वेळ येऊन ठेपली होती. स्त्री-पुरुष असा भेद न पाळता लोक सर्रास निर्मला सीतारामण यांना शिव्या घालत होते.
मग भराभर काम करायच्या नादात चुका होण्याची शक्यता जास्त असते याशिवाय डोकं था-यावर ठेवत तब्येत सांभाळत हे सगळं करणं तितकचं गरजेचं असतं. तरी थोडी का होईना अंधुकशी आशा होती की अजून दहा दिवसाची मुदत वाढ वाढेल, या क्षेत्रातील लोक पेटून उठले होते पण आलेला निर्णय स्वीकारण्यावाचून पर्याय नव्हता. पुढच्या दोन दिवसातच लोक “आता काही डयू डेट वाढत नाही” असं पार साक्षात्कार झाल्यासारखे बोलत होते, आता सीतारामण यांची तुलना इंदिरा गांधीसोबतसुदधा केली जात होती. त्या दहा दिवसात या ऑफिसातून जे काही काम करण्याचं प्रेशर होतं त्याला तोड नव्हती.
याशिवाय जीएसटीचं काही वेगळचं सुरु आहे, त्यांच्या ही डयू डेट एकामागोमाग एक, एकेकाळी अरुण जेटली सांगत होते की तुम्हाला सीएची गरजच नाही लागणार इतका सिंपल टॅक्स आहे, पण आता हे अधिकच प्रंचड डोईजड होत चाललयं, प्रत्येक दिवशी काही ना काही नवीन त्यात येतचं आहे आणि मग अश्या कामाला “प्रोफेशनल” माणसांची मदत घेतल्याशिवाय पर्याय उरत नाही, मग त्यासाठीचा खर्च तुमची “प्रॉडक्ट कॉस्ट” वाढवते.
आता या सगळ्या कारभारावर येत्या सव्वीस फेब्रुवारीला मोर्चा आहे, बघू काय होतं ते.
**********
3.कृष्णविवर
हल्ली तसे रात्रीचे साडेआठ-नऊ वाजतातच ऑफिसमधून निघायला, त्यात मग घरी जाण्यासाठी बसस्टॉपवर आल्यावर वेळेवर बस भेटेल का नाही यांची धाकधूक होत राहते, काम म्हणजे पाठीवर ओझ नसलं तरी डोक्याला मात्र किंचितसा का होईना ताण येतोच, अशावेळी एकदाची पटकन बस भेटावी आणि प्रवास सुरु व्हावा असं वाटतं, या बसची वाट बघण्याच्या काळात कानात घातलेल्या एअरफोनवर हल्ली अच्युत गोडबोले यांच्या ‘किमयागार’ या पुस्तकातल्या कृष्णविवर या प्रकरणाविषयी ऐकणं चालू होतं, हल्ली बसप्रवासाला एसटी बसचा पण हातभार आहे, या एसटी बसला जाण्यासाठी आणि येण्यासाठी एकच दरवाजा, तर बेस्ट बसला आत प्रवेश करण्यासाठी एक मागचा आणि निघण्यासाठी पुढचा दुसरा असे दोन दरवाजे असतात. रात्रीच्या वेळचे बेस्ट बसच्या आतले दिवे हे अगदी सफेद लख्ख प्रकाश असणारे या उलट एसटी बसच्या आतमध्ये पिवळ्या रंगाचे दिवे, ज्यांचा प्रकाश काहीसा फिकट, बसच्या आतलं वातावरण अधिकच अंधारमय करणारं. अशातच जर कामाचा ताण जास्त असेल तर मग डोकं लवकरात लवकर बसमध्ये टेकल्या टेकल्या डोळ्यावर झापड आणू पाहत आणि त्यात जर एसटी बस असली की मग बसल्या मिनिटा-दोन मिनिटाच्या आत झोप लागायला सुरवात. आजपण डोक्याला ताण होताच, कानातले एअरफोन ब्लॅकहोलच्या स्वरुपाचं अगदी सोप स्वरुप ऐकण्यात दंग होतं, आणि एसटीच आली, प्रवासी तुरळक होते, मनासारखी विंडो सीट भेटली, आल्याबरोबर तिकीट काढल्यामुळे पुढचा जवळ जवळ पाऊण तास कोणताही डिर्स्ट्बनस नव्हता. आता पुढच्या एखादया सेंकदात आपण गारद होत झोपेच्या स्वाधीन होणार हे मनात होतचं, त्याचवेळी कानाकडून मेंदूकडे मात्र त्या ‘कृष्णविवर’ या संकल्पनेच्या संदर्भात तिथे टाईम नावाचा प्रकारचं नसतो, तिथे प्रकाश ही जाऊ शकत नाही, तिथं ग्रह गिळले जातात यांची वर्णननं चालू होती, हे सगळं मेदूंला रिचवणं बहुतेक कठीण जात होतं, काहीतरी नवीन खादय मिळालं म्हणून मेंदू जागा राहू पाहत होता आणि शेवटी मगाशी म्हणालो तसचं झालं, झोप जोरदार सुरु झाली, किमान पंचेचाळीस मिनिट निंवात त्यामुळे ‘सुशेगादीपणा’ अगोदरच आकार आणि वस्तुमानासकट त्या झोपेला प्राप्त झाला. रस्त्यावरचा एखादा खडडा ती निश्चित वाटणारी झोप खोडून काढत होता पण पिवळसर प्रकाश उघड डोळा परत मिटवत होता. एकाएकी मी त्या स्वतःकडे ओढू पाहणा-या कृष्णविवरापाशी असल्याचा भास होऊ लागला, कानातलं म्हणणं आता फक्त त्या एअरफोन मधून आवाज येण्याइतपतच होतं, डोक्यात काहीच शिरत नव्हतं, त्या ब्लॅक होल्सचा आता प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा तो प्रकार होता. स्वप्न ही तुम्हाला पराकोटीच्या जगात घेवून दाखवण्याचं माध्यम असतात का? जी कल्पना आहे तिचा भास होतो हे वास्तव आहे, तर मग प्रत्येक त-हेचं जग असलं पाहिजे या संकल्पेनेला मन अधिक दुजोरा देवू लागत. प्रत्येक कण हा तंरग सुदधा असतो अश्या सारख्या संकल्पना, तुम्ही एकाच वेळी जिवंत आणि मेलेले सुदधा आहात यासारख्या Schrodinger's Cat सारख्या थेअरी मनात घर करु लागतात. वास्तव आणि भ्रम यांच्यामध्ये तुमचा मेंदू आणि मन घुटमळू लागत. शाश्वत आणि माया यांची जोड घालणारं काही आहे का? तुम्ही जाणीवेसकट इथे आहात ही एकच खूण म्हणजे तुम्ही जिंवत आहात का?
हया ब्लॅक होल प्रकरणा अगोदर वाटायचं शून्य असं काही नसतंच, सगळ्याचं अस्तित्व असतं फक्त त्यांचा फॉर्म बदलत असतो, पण आता वाटू लागलं की शून्यदेखील असतो. काहीच नसलेला शून्य, म्हणजे शून्याचं देखील अस्तित्व आहे. डोकं गरगरायला लागतं, हे असले विचार मनात का येतात असं वाटू लागतं, हा जास्तीचा विचार सोडायला हवं, सोपं सोपं असणारचं वाचायला हवं, बघायला हवं. मग स्टोरीटेल बंद करुन फेसबुकवर नकळत जातो, त्यात साला हा फेसबुकचा अल्गोरिदम एक विडिओ बघितला की लगेच तसलाच दुसरा विडिओ हजीर. डोळ्यापुढे आलेली झोप रिचवत रिचवत इच्छित स्थानक येण्याच्या दोन स्टॉपआधी काहीशी आटपून, एकूण शरीराला जाग करत त्या भरलेल्या एसटीतून वाटत काढत स्टॉप आला की बाहेर पडतो.
**********
4.वृत्तपत्र
नोकरी शोधण्याच्या सत्रातलं अजून एक साधन म्हणजे वृत्तपत्रात येणा-या जॉबस कॅल्सिफाइड, जाहिराती. त्यातही ही बुधवारच्या इंग्रजी वर्तमानपत्रातल्या अंकात खूप सा-या जाहिरात असतात. त्यामुळे तो ‘पेपर’ विकत घेण्यासाठी रस्त्यावरच्या एका पेपरस्टॉवर गेलो, “एक मुंबई मिरर दया” समोरुन उत्तर आलं, “अरे मुंबई मिरर तर बंद झाला”, “हया, बंद कसा होईल, हा काहीही सांगतोय, टाईम्स ग्रुपचा भाग आहे, वेडे झालेत का बंद करायला” मनातल्या मनात आलेली ही पहिली प्रतिक्रिया, मग निमूटपणे दुसरं एक इंग्रजी वृत्तपत्र घेतलं आणि तिथून निघतानाच, मोबाईलवर ‘मुंबई मिरर’ गुगल केलं आणि त्यात न्यूजवर क्लिक कर, त्यांची न्यूज झालीयं का चेक केलं आणि माहिती मिळाली, तो स्टॉलवाला खरं सांगत होता, मुंबई मिरर खरचं बंद झाला होता. कोविडच्या काळात झालेल्या नुकसानामुळे ते आता साप्ताहिक या प्रकारात प्रकाशित करण्याचा त्यांनी निर्णय घेतला, हे वृत्तपत्र बंद होत असल्यामुळे दुख होत असल्याचं ही त्यात नमूद करण्यात आलं होतं, काही मान्यवराच्या प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या. ते सगळं वाचल्यावर कुणीतरी ओळखीचं मुलूख सोडून गेल्याचं ऐकून कसं वाटत तसं वाटत होतं, शहरात घडण्या-या बारीक-सारीक गोष्टीचा उहापोह त्यात असायचा, राहत असलेल्या ठिकाणी नाक्यानाक्यावर मोफत वृत्तपत्र वाचनालय असल्यामुळे बेकारीच्या काळात रोजचा बराच वेळ सगळी वृत्तपत्र वाचण्यात जाई, 'त्या' वयात या मुंबई मिररमधल्या 'त्या' एका पानावरच्या ठराविक कोप-यात येणा-या तश्या प्रश्न-उत्तरांची अधिकची उत्सुकता असायची, महेद्र वत्स नावाचे सेक्सएक्सपर्ट नावाचे गृहस्थ हे सदर सादर करतात हे नंतर कळालं, त्यांची नेटफिलिक्सवर ‘Ask Sexpert’ नावाची डॉकमेन्टुरीदेखील आहे, त्याचं ही या 28 डिसेंबरला निधन झालं.
**********
5.रेल्वेप्रवास
आता ब-याचश्या प्रतिक्षेनंतर सर्वसामान्यासाठी लोकल ट्रेन सुरु झाल्या, पण त्यांच्या वेळ्या या तुघलकी निर्णयासारख्या, पहिल्या लोकलपासून सकाळी सातवाजेपर्यंत आणि दुपारी बारा ते चार आणि मग रात्री नऊ ते थेट शेवटची लोकल. या वेळा फक्त दुस-या आणि तिस-या पाळीवर कामावर जाणा-या माणसांच्या उपयोगाच्या. जो की सर्व सामान्य चाकरमानी हा नऊ ते पाच यात वावरणारा. एखादया माणसाच्या शरीरातल्या रक्तवाहिन्या रोखून धराव्या तशी सध्या मुंबई शहराची व्यवस्था झालीय, आता टी.व्हीवर दाखवत असलेल्या लोकांच्या प्रतिक्रियावरुन नाराजी स्पष्ट दिसत होती, मागच्या मार्चपासून माझा ट्रेन प्रवास बंदच झाला होता, रोजच्या बेभरवशी बसप्रवासाचा वैताग आला होता, राज्य सरकार या सर्वसामान्यासाठी सुरु केलेल्या रेल्वेप्रवासाचा आढावा घेत नियम शिथिल करण्याविषयी येत्या काळात ठरवणारं होती. सुरवातीला तिकीट कांऊटरवर दुपारी दिलेल्या वेळयाशिवाय अन्य वेळेला सर्वसामान्यासाठी तिकीट दिली जात नव्हती हा पहिल्या दिवशीचा अनुभव, रेल्वेच्या ‘यूटीएस’ अँपवरदेखील या दिलेल्या वेळेतच तिकीट भेटत होती, मागच्यावर्षी काढलेल्या पासला मुदतवाढही तिथंच तिकीटकांऊटरवर करुन दिली जात होती. म्हणजे जर पास काढायचा असेल आणि तुम्ही जर सर्वसामान्य असाल तर या वेळेशिवाय जाण्यात काही अर्थ नव्हता. मग म्हटलं एक महिन्याचा रेल्वेचा पास तरी काढून घेवू, त्यासाठी असाच कामावर लेट जात, वेळ काढून दुपारी पावणेबाराच्या सुमारास रेल्वेस्टेशनपाशी गेलो, अर्थातच तिथे असलेले दोन तिकीटकांऊटर, एक रेल्वेस्टेशनच्या सुरवातीला आणि एक रेल्वेस्टेशनाच्या शेवटी, पैकी एक बंद होतं, तर दुस-यापाशी मात्र रांग लागली होती. रांगेत वेळ काढायचा नसेल तर मोबाईलवर तिकीट काढायची का अँपवरुन? त्यातही दोन पर्याय, एक, तिकीट बुक करायची आणि तिथल्या वेंडिग मशीनवर प्रिंट घ्यायची, आणि दुसरा मोबाईल तिकीट, हयासाठी मोबाईल सतत प्रवासात तुमच्यासोबत हवा, तो त्यावेळी चालू हवा जेव्हा तिकीटचेकर येईल तेव्हा. म्हटलं पहिला प्रकार निवडू, बघितलं तर तिथे वेंडिग मशीन सगळ्या बंद, राहू का रांगेत. बारा वाजले होते, तितक्यात तिथं असलेले रेल्वेस्टाफ बोलू लागला ”दुसरं तिकीटकांऊटरही सुरु झालयं”, मग पुन्हा तिथं गेलो, पास काढला आणि कितीतरी दिवसांनी रेल्वेस्थानकात आणि थोडयावेळाने रेल्वेत पाऊल टाकलं.
कामावरुन सुटलो, आता संध्याकाळचे सात वाजले होते, जावं का रेल्वेने?, मोडावा का नियम?, तिकीट चेक केली तर टीसीने उगाच दंड बसेल, च्यायला हे सरकार स्वतःला पाहिजे तसं वागत आणि मग आपणच का ठेका घेतलाय नियम पाळायचा, ट्रेनमध्ये तितकीशी गर्दी देखील नाही आणि प्रवासाचा वेळही वाचतो, काय करावं? शेवटी हिमंत करत रेल्वेस्थानकात शिरलो, चौकस नजर ठेवत कुठे टीसी तर नाही ना यांची शहानिशा केली, कारण जर टीसीने पकडला तर तो नक्की आयडी म्हणजे ओळखपत्र मागेल जे फक्त अत्यावश्यक सेवेत काम करण्या-या दिल जातं. मग दंड भरला तर मग ‘येरे माझ्या मागल्या’ करत बसने प्रवास करावा लागणार होता. काय करावं जावं का नको? रेल्वे एक नंबर फलाटावर लागलीच होती, थोडीशी हिमंत दटवली आणि शिरलो, आतमध्ये प्रत्येकी एका सीटनंतर “इथे बसू नका” असे लिहलेले कागदी पोस्टर चिटकवले होते, लोक त्यावरही बसत होते, कोरोनाशी लढण्याविषयीची टयूनही ट्रेनमध्ये चालू होती, काही लोक आपले आयडी गळ्यात घालून प्रवास करत होते, महिला प्रवाश्यांची संख्या जनरल डब्यात जो इतर वेळी पुरुष प्रवासांनी भरलेला असतो तिथे आता लक्षणीय दिसत होती. तृतीयपंथीयचा वावरही नेहमी सारखाच मोकळा आणि अफाट होता, रेल्वेत सामान विकणे सारख्या गोष्टीही सहज होत होत्या, रेल्वेस्टेशनापाशी भिकारी दिसत होते, मास्क आणि अन्य तत्सम वस्तूही रेल्वेस्थानकापाशी विकल्या जात होत्या, विक्रेता स्वतःच्या तोंडाला मास्क न लावता हे सगळं करत होते हे विशेष, आणि त्यातही विशेष म्हणजे पोलीसच्या व्हॅनच्या बाजूला हे प्रकार होत होते. पूर्वी बसप्रवासात एखादया किरकोळ माणसं बसची वाट बघत असलेल्या नाक्यावर हमखास भिकारी बसलेले दिसायचे हल्ली ते रेल्वेस्थानका नजीक दिसतात. ही माणसं एखादया महापुरुषाच्या पुतळ्यासमोरच दिसली की मग हाच भारत अभिप्रेत होता का इतक्या वर्षानंतर हया महापुरुषांना असा प्रश्न पडताो, हया पुतळ्याऐवजी हया माणसांवर खर्च करायला पाहिजे असंही वाटू लागतं. आता या सगळ्या भिका-यांना गोळा करुन चेबूंरला नेत “भिकारीमुक्त मुंबई” बनवण्याचा उददेश असल्याचं बातम्यातून सांगितलं जात होतं.
आता दोन दिवस तसाच रोज जाता-येता रेल्वेने प्रवास सुरु केला, धीर आता अधिक चेपला होता, पहिल्यासारखं काळीज धडधडणं बंद झालं होत. कोणी नसतं टीसी वैगेरे असं मन आतल्या आत बोलू लागलं, सगळं काही आश्वासक वाटू लागलं, रेल्वेतून बाहेर पाऊल टाकलं की लगेच जास्त टगळ-मगळ न करता पटकन बाहेर पाडायचं हा आता शिरस्ता झाला होता, पाहिल्या त्या बसप्रवासापेक्षा हा निश्चितच सुखकर प्रवास होता, आता रेल्वेस्थानकात शिरताना पहिल्यासारखी टीसी ची भीती उरली नव्हती, असे साधारण आठ दिवस गेले, कोणीही टिकीट चेक करणारा भेटत नव्हता. सरकारने मुददाम असं नियिम शिथिल केलं की काय असं वाटू लागलं, कारण अगदी सकाळी नऊच्या वेळेस आणि संध्याकाळी सहाच्यावेळेस किमान टीसी असतील अशी अपेक्षा होती पण तस काही होतं नव्हतं आणि ते माझ्यासारख्या सामान्य प्रवाश्यासाठी अगदी पथ्यावर पडत होतं. पण याच काळात टीव्हीवर बातम्यामध्ये कोरोनाचा मुंबईतला आकडा चाळीस टक्क्याने वाढल्याचा दिसत होता, हल्ली बातम्या युटयूबवर, फेसबुकवर बघायला मजा येते कारण त्यांच्या खालच्या कंमेट वाचायला मिळतात आणि एकूण जनमत कोणत्या बाजूने विचार करत हे कळतं. हया अश्या वाढलेल्या पेशंटच्या संख्येने सरकार आता लॉकडाऊन करण्याच्या विचारात असल्याच्या बातम्या झळकू लागल्यावर त्यांच्या खालच्या कमेंट या “सरकारने आम्हाला दरमहा पैसे दयावे मग बसतो आम्ही घरी” सारख्या होत्या.
आता तर कोणत्याही वेळी तिकीट खिडकीवर तिकीट मिळत होती आयडी वैगेरे काही विचारत नव्हते, शेवटी सरकारला ही रेव्हन्यू दिसत असेल, अजून काय? म्हणजे काय तर जर तिकीट भेटेते तर माणूस केव्हाही प्रवास करणारं ना! पण त्यातही गोम होती, तिकीट कांऊटरवर तिकीट देतील पण समजा उदया तुम्हाला टीसीने ठराविक वेळेव्यतिरिक्त प्रवास केल्यावर आयडी विचारला आणि त्याने तुमच्याकडून दंड वसूल केला तर त्याला तिकीट कांऊटरवरचा माणूस जबाबदार नव्हता असं बजावून सांगितल जात होत तिकीट कांऊटरवर, पण या प्रकाराकडे लोकांनी तिथं कांऊटरवर हुज्ज्त घालणं सोडून देत “काय होईल ते होईल बघू नंतर, विदाऊट तिकीट तर प्रवास करत नाही ना” हा अटिटयूट ठेवला. हे सगळं मी सांगताये ते मध्य रेल्वेच्या अख्त्यारितलं, इतर ठिकाणी म्हणजे पश्चिम आणि हार्बरवर असं काही होतं असेल यांची काही माहित नाही, भारतात राहण्याचे काही फायदे असतात इथं सगळे नियम कागदावर असतात आणि ते कधी कधी पाळले जातात, बाकी इतर वेळी सगळं सोयीचंच केले जात नियमाच्याआड. पण…
पण आज ट्रेनने सकाळी प्रवास करत असताना टीसी चक्क ट्रेनमध्ये अवतरला, पण आतून भिती वाटायला पाहिजे होती तसं काही एक वाटत नव्हतं, कारण त्या डब्यात प्रवास करण्या सगळ्याकडे कुठे आयडी असणार होते, अजून तो टीसी माझ्यापर्यंत पोचला नव्हता, पण तितक्या वेळात कळालं की ते देखील फक्त तिकीट किंवा पास चेक करत होते, एक जण सापडला ज्यांच्याजवळ तिकीट नव्हतं आणि तितक्यात रेल्वेस्थानकही येत होतं, मग त्याला घेत तो टीसी निघाला. रेल्वे पास काढत असल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. म्हणजे सामान्य माणूस मध्य रेल्वेवर कोणत्याही वेळी तिकीट काढून फिरु शकत होता फक्त ते ‘ऑफिशली’ तसं सांगू शकत नव्हते इतकचं.
*****:समाप्त******
–लेखनवाला
( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online, must be shared in totality . )
प्रतिक्रिया
21 Feb 2021 - 11:16 am | मुक्त विहारि
असामान्य अडचणी चांगल्या सांगीतल्या आहेत....
ह्या अडचणींतून मी आणि माझे कुटुंबियांचै, सुदैवाने सुटलो, पण काही लोकांचे जीवन मात्र खडतर झाले आहे ....
रेल्वेच्या बाबतीत सांगायचे तर, लोकलला आता, खाजगीकरणा शिवाय पर्याय नाही.फुकट्यांचे प्रमाण कमी करण्याचा, तो एक मार्ग आहे.
21 Feb 2021 - 3:47 pm | धर्मराजमुटके
सध्या बरेच मुंबईकर या त्रासातूनच जात असल्यामुळे व्यथा मनाला भिडल्या. सर्वसामान्य माणूस इतका हताश आहे की त्याला आता कोणाला दोष सुद्धा द्यावासा वाटत नाही. जो तो आपापल्या वकुबाप्रमाणे यातून मार्ग काढतो आहे. "माझे कुटुंब माझी जबाबदारी !"
22 Feb 2021 - 9:47 am | मुक्त विहारि
मीच जबाबदार...
शिवसेना म्हणजे, ढकलंपंची
22 Feb 2021 - 8:41 am | ज्ञानोबाचे पैजार
आजूबाजूला जे घडते आहे, दिसते आहे ते तसेच प्रांजळ पणे लिहिले आहे, यातले काही प्रत्यक्ष अनुभवलेले असल्याने कदाचित लेख मनाला भावला आणि एका दमातच वाचून झाला.
पैजारबुवा,
22 Feb 2021 - 10:43 am | सुबोध खरे
बाकी ठीक आहे
पण आयकर रिटर्न जुलै मध्ये भरायचा डिसेंबर पर्यंत भरला नाही आणि परत मुदत वाढ करून हवी आहे आणि यासाठी आंदोलन करणार आहेत हे अजिबात पटले नाही.
जर आपण कर योग्यपणे भरला असेल तर आपल्याला दंड कशाला लागेल?
आणि उशीर केला असेल तर दंड लागणार असेल तर तो निमूटपणे भरलाच पाहिजे.
क्रेडिट कार्डाचे पैसे भरायला एक दिवस उशीर झाला तरी सज्जड दंड बसतो तो दंड गपचूप भरतात
आपल्या हलगर्जीपणाचं खापर सरकार वर फोडणाऱ्या या वृत्तीचीच तिडीक आहे.
22 Feb 2021 - 11:07 am | मुक्त विहारि
आपल्या हलगर्जीपणाचं खापर सरकार वर फोडणाऱ्या या वृत्तीचीच तिडीक आहे.
सहमत आहे