Please, Look After Mom!

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
20 Sep 2016 - 10:49 pm

Please, Look After Mom ही Kyung-sook Shin या कोरियन लेखिकेची कादंबरी नुकतीच वाचनात आली. कादंबरीच्या नावातच तिचा कथा विषय, आई, ठळकपणे सूचित होतो.

खरंतर आई या विषयावर विपुल लेखन झालेले आहे. पण ही कादंबरी मनात रेंगाळत राहते, ती तिच्यातले सखोल तपशील,निवेदनशैली आणि कथनातील कमालीच्या प्रांजळपणामुळे !

कादंबरी सुरु होते तीच मुळी वाचकाचे चित्त जखडून ठेवणाऱ्या, 'स्टेशनवर आई हरवली' या वाक्याने!
[इथे Albert Camus च्या 'The Outsider' मधील Mother died today या प्रसिद्ध ओळीची आठवण आल्याशिवाय रहात नाही!]

६९ वर्षांची आई हरवणे हा मनाला हुरहूर लावणारा धागा लेखिकेने कादंबरीच्या शेवटा पर्यंत असा काही विणला आहे कि, उत्सुक मनाने वाचक वाचतच राहतो आणि नकळतपणे आई सापडावी, मगच मी पुस्तक खाली ठेवेन.... असे वाटायला लावण्याइतकी कमालीची अस्वस्थता ही कादंबरी निर्माण करते.

मुले तिचा शोध घ्यायला सुरुवात करतात, आणि नकळत त्यांचा स्वतःचाच शोध चालू होतो. मुलांना आपल्या आईची लहान सहान आठवण येत राहते. तिने आपल्यासाठी काय काय केले याच्या इतक्या नेमक्या आठवणी लेखिकेने टिपल्या आहेत कि, ज्यांना आईचा सहवास लाभलाय, त्या प्रत्येकाला कमी जास्त फरकाने आपल्याच आईविषयी लिहिलेय असे वाटावे! काही काही आठवणी तर अगदी ऱ्हदयाला हात घालणाऱ्या..... जिने कधीही स्वतः च्या गावची वेस ओलांडली नाही, जिला लिहिता वाचता येत नाही, सदा दारिद्र्य आणि काबाडकष्ट यातच जिचा संघर्ष चालू आहे, ती आई आपल्या मुलाचा महाविद्यालयातला प्रवेश रद्द होऊ नये म्हणून, शाळेतून दाखला घेऊन, टाकोटाक रेल्वेने एकटीच सेऊल गाठते, अनोळख्या माणसाला पत्ता दाखवत मुलाची रूम शोधून मध्यरात्रीच्या भयाण थंडीत प्लास्टिकच्या तुटलेल्या चपलांनी मुलासमोर हातात सर्टिफिकेट घेऊन उभी राहते, तेव्हा मुला बरोबरच वाचकाच्या डोळ्यातही पाणी उभारल्याशिवाय रहात नाही!

आईला बाहेरच्या जगात शोधता शोधता मुलांचा अंतर्मनातला प्रवास चालू होतो! आई इतकी गृहीत असते, कि ती लक्षातही येत नाही! ती हरवते, आणि तिचा आठव वाचकां सहित सर्वांनाच सैरभैर करतो. ती सापडावी, बस्स म्हणजे मग ती म्हणेल ते सगळं सगळं करू असा एक desperate विचारही प्रत्येकाच्या मनात! ते सगळं मुळातून वाचण्यासारखं.

कादंबरीतील कथनशैली खास! यात you या द्वितीय पुरुषवाचक point of view ने निवेदन केले आहे. असे कथन बर्यापैकी दुर्मिळ [माझ्या वाचन परिघापुरतेचे मत!] आणि असे लिहिणे बऱ्यापैकी अवघड! पण लेखिकेने ते इतक्या सहजतेने लिहिलेय कि वाटावं, you म्हणजे आपणच!
कादंबरीचा शेवटचा भाग पारलौकिकतेकडे झुकलेला! केवळ अप्रतिम. हे ही स्वतः वाचून अनुभवण्याची गोष्ट! हा भाग वाचताना Rhapsody in August या कुरासोवाच्या चित्रपटाचा शेवट हटकून आठवतोच आठवतो!

कोणत्याही उत्तम कलाकृतीत त्या त्या कालप्रवाहाची, बदलांची उत्तम नोंद असते. या ही कादंबरीत बदलत्या कोरियाच्या नोंदी अत्यंत तरलपणे उतरल्या आहेत.

एकंदर, संग्रही असावी इतकी ही सुंदर, हळवी पण सशक्त कादंबरी.

शिवकन्या

वाङ्मयसाहित्यिकसमाजजीवनमानभूगोलप्रकटनविचारप्रतिसादप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखप्रतिभा

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

20 Sep 2016 - 10:58 pm | जव्हेरगंज

छान ओळख!

मराठीत असेल तर वाचावी म्हणतो!

शिव कन्या's picture

20 Sep 2016 - 11:18 pm | शिव कन्या

मराठीत आणण्यासाठी हात शिवशिवताहेत!
पण नव्या पुस्तकाचे copy right च्या कटकटी फार!

खुप सुंदर ओळख करून दिलीय तुम्ही. बघा ना प्रयत्न करून. जमल्यास आणाच मराठीत.

छान परिचय, थोडासा त्रोटक वाटला पण.

आई इतकी गृहीत असते, कि ती लक्षातही येत नाही! >> हे मात्र खरं :(

शिव कन्या's picture

20 Sep 2016 - 11:17 pm | शिव कन्या

सगळंच चांगलंचुंगलं!
आणि काय लिहावं? या विचारात एवढंच लिहीता आलं.

रातराणी's picture

20 Sep 2016 - 11:12 pm | रातराणी

उत्तम परिचय!

बोका-ए-आझम's picture

21 Sep 2016 - 2:04 am | बोका-ए-आझम

ये तो वाचनाच पडेंगा!

ही कादंबरी मिळावायचा प्रयत्न करते. आवडली पुस्तक ओळख.

एस's picture

21 Sep 2016 - 8:10 am | एस

सुंदर परिचय.

आवडला पुस्तक परिचय.पुस्तक मिळवणे आले!

स्वीट टॉकर's picture

21 Sep 2016 - 1:02 pm | स्वीट टॉकर

तुम्ही चांगलीच उत्सुकता निर्माण केली आहेत.

सुबक ठेंगणी's picture

21 Sep 2016 - 3:30 pm | सुबक ठेंगणी

वाचावीच लागेल.