"दादा, तुमची ही कविता जरा समजून सांगाल का. म्हणजे, हे निसर्गचित्रण आहे का यात काही रूपकात्मक शृंगार दडला आहे जो मला नेमका दिसत नाहीये." आणि मग त्यांनी पुढे जे काही त्या कवितेतल्या चित्रणाबद्दल सांगीतले ते ऐकून/समजून माझ्या लक्षात आले की, आपण अजून कविता बुद्रूकलाही जाऊन पोचलो नाहिये, कविता खुर्द हे गाव तर लांबच!
कविता होती, "जाळीवरती वाळत लुगडे, उभा हसे जरतारी काठ...." आणि कवि अर्थातच, महाराष्ट्राचे 'शेतकवी', कवि ना. धो. महानोर!
रविवार दि. १०/४/२०१६ रोजी त्यांच्या राहत्या घरी म्हणजे अजिंठ्याच्या जवळ पळसखेड्याला त्यांना भेटायचा सुवर्णयोग आला होता.
भेटतील का नाही? भेटतील तर कुठे? कसे? बोलतील का? किती वेळ देतील? वगैरे प्रश्न घेऊन मी आणि माझा सख्खा मित्र, जळगाव - औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या वाकोद गावावरून आत शिरलो. साधं गाव, साधी माणस आणि गावात मुख्य गावापासून तीनेक किलोमीटर अंतरावर मळ्यातलं साधंच घर!
दुपारच्या रणरणत्या उन्हात आम्ही बिनअकली पोरं त्यांची झोपमोड करायला गेलेलो. त्यांच्या माणसाने आम्हाला बसवून घेतले व त्यांना उठवण्यासाठी गेला. आधीच भेटायचे निश्चीत केल्यामुळेच जरा हिंमत करून बसून राहिलो. दुसऱ्याच मिनीटाला महानोर दादा त्यांच्या खोलीतून अर्धवट झोपेने जड झालेले डोळे आणि अंग, पायांवर सावरीत आमच्याकडे आले. त्यांच्या चालण्यात थकवा जाणवत होता पण त्याचवेळी आम्हांला पाहून आम्हांला भेटण्याचा, आमच्याशी बोलण्याचा उत्साहही दिसत होता.
पुढचे दोन तास आम्ही कविता, गाणी, राजकारण, समाजकारण, शेती, शिक्षण अशा वेगवेगळ्या विषयांवर स्वैर झुलत राहिलो. सुरूवातीचा औपचारिकपणा काही क्षणातच कुठल्या कुठे पळून गेला होता. पुढे, "अरे मग काय सांगतोय तुला!" "यातच खरी गंमत आहे रे" अशा त्यांच्या वाक्यांनी जणू जुन्या सलोख्याचा ओलावा तिथे निर्माण केला. त्यांच्या आठवणींचा, अनुभवांचा आणि विचारांचा खजिना त्यांनी माझ्यासमोर ओतला. त्यातून काय आणि किती वेचू असं मला झालं होतं! आज मी आधीपेक्षा आणखी श्रीमंत झालोय हे उघडपणे, ताठ मानेन सांगू शकतो! अर्थात, ही श्रीमंती पैशांची खचितच नव्हे!
माझ्या कविता नीट वाचताना त्यांना न्याहाळत असताना मला जाणवलं की दादांच्या चेहऱ्यावर आनंद पसरलेला आहे. मध्येच एक भुवई जराशी वर जाऊन कुठल्यातरी शब्दाला दाद देत होती. ओठांचे हलके स्मित मला सुखावून जात होते. कविता वाचून त्यांनी अभिप्राय दिला की, "संदीप, उत्तम लिहिले आहेस! कुठेही उणीव काढायला तू जागा ठेवली नाहीस. आवडले! नाहीतर, आणखीही येतात, कवितांच भेंडोळ घेऊन. पण ते उलगडतानाच सांडून जात आणि केरसुणीनेच झाडून सुपल्यातून बाहेर टाकून द्यावं लागतं!" यावर ते मनमोकळे हसले, मीही रोखून धरलेला श्वास सोडत थोडा निवांत होऊन हसलो. माझ्या कवितांमध्ये अनुभवाची व्याप्ती वाढविण्याचा अमोल सल्ला त्यांनी मला दिला. त्याचबरोबर, लोकांसमोर येण्यासाठीच मार्गदर्शनही केलं.
त्यांना वयापरत्वे एका डोळ्याने नीट दिसत नाही. पण, विचारातली सकारात्मकता पहा, अगदी दुर्मिळ! ते म्हणतात, "चला, एक डोळा ना आहे ना अजून टिकून, त्यावर चाल्लंय ना काम, मग तेवढं पुरे! बिचाऱ्याने(डोळा) दिलीच ना इतकी वर्ष साथ." इतक्या सहजपणे सांगत होते ते हे की जणू एखाद्या मुलाचा पेन हरवलाय आणि तो म्हणतोय चला पेन्सिल तर आहे ना अभ्यासापुरती, तिच्यावरच भागवूया! परिस्थितीने गांजलेली, निरूपाय, हताश झालेली अनेक माणसं आजूबाजूला आहेत. त्यातले बहुतांश धैर्य गमावून रडत असतात पण दादांसारखी माणसं त्यांच्या विचारातली सकारात्मक उर्जा मुक्तहस्त आपल्यालाही वाटत असतात.
त्यांचा पहिला काव्यसंग्रह "रानतल्या कविता", त्याच्याबद्दल ते पहिल्या प्रेमासारखं बोलले. पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाल्यावरही आपले पाय जमिनीवरच ठेवून नेटाने त्यांनी अतिशय साधारण परिस्थिती असतानाही कवितेची साधना सुरूच ठेवली. पुरस्कार मिळाला तरी एका दिवसांत जादूची कांडी फिरल्याप्रमाणे त्यांच्या जीवनात साऱ्या सुख-समृद्धीने उडी नाही मारली. त्यासाठी त्यांनी शेतीतले परिश्रम आणि कविता ह्या दोन्ही गोष्टी अविरत चालू ठेवल्या. आणि दोन्हीकडे यशस्वी मळा फुलवला. एकीकडे 'पिकांचा' आणि दुसरीकडे 'शब्दांचा!'
समृद्ध जीवनाबद्दलची त्यांची व्याख्या साधी-सरळ सोपी आहे. जे आवडत-जमत ते करावं, कोण काय म्हणत याची पर्वा केल्याशिवाय, चालत रहाव-चालत रहाव न थांबता. मग लोकं सोबत येत राहतात. भेटत राहतात, ऋणानुबंध निर्माण करतात आणि ह्या सगळ्या प्रवासाच्या गोल चक्रातून समृद्ध जीवनाचे सुंदर मातीचे मडके आकार घेत राहते. मातीचे यासाठी की, त्याला निरंतर जपावेही लागते. तुम्ही कुठेही दुर्लक्ष करून, गाफील राहून चालत नाही. नाहीतर त्या सुंदरतेला गालबोट लावणारे एखादे छिद्र त्या मडक्याला पडू शकते. अशा त्यांच्या समृद्ध जीवनाच्या विचारांतून त्यांनी मलाही समृद्ध केले.
त्यांच्या जीवनाचे अनेक पट त्यांनी उलगडून माझ्यासमोर ठेवले. त्यांना भेटलेले पुरस्कार त्यांनी आम्हांला स्वत: सोबत येत दाखवले. पद्मश्री पुरस्कार नेमका दिसतो कसा हे मी नीट पाहून घेतले. (कधी मिळालाच तर फसलो जाऊ नये म्हणून कदाचित!)अनेक जुने फोटो, जुनी माणस आणि मराठी मनाला अभिमान वाटेल असे क्षण छायाचित्रातून पाहताना विलक्षण गहिवरून येत होतं. पुलंचा दुर्मिळ फोटो पाहताना तर मला वेड लागेल का काय असंच वाटत होत. त्यांना न विचारता नको म्हणून आणि पहिल्याच भेटीत उतू जाईल इतका अतिउत्साह नको म्हणून त्या अनमोल ठेव्यांचे फोटो मी माझ्या कॅमेरात घेतले नाहीत. पण परत जाईन तेव्हा नक्की त्यांना विचारून घेईन.
पाय निघत नव्हता पण पुण्याचा परतीचा प्रवास लांबचा होता आणि मला ड्रायव्हिंग करायचे होते म्हणून नाईलाजाने आम्हीच भेट आटोपती घेत दादांचा आशीर्वाद घेत त्यांचा निरोप घेतला. "पुन्हा परत या!" अशा आपुलकीच्या शब्दांनी परतीच्या प्रवासासाठी जणू शिदोरीच मिळाली. पुढे औरंगाबादला आल्यावर प्रा. डॉ. दिलीप बिरूटे सरांना फोन लावला तर त्यांच्या सुदैवाने ते औरंगाबादेत नव्हते. ;) त्यांना त्रास देण्याची नामी संधी हुकली! ;)
"चला, साहित्यक्षेत्रातून कार्यक्षेत्रात परत जाऊया" ह्या मित्राच्या वास्तववादी बोलण्याने भानावर येत आमच्या गाडीने पुण्याच्या दिशेने वेग घेतला.
पुराव्यादाखल हा फोटो! ;)
दुर्दैवाने अजिंठ्याला थांबलो नाही पण तिथेच काढलेले हे काही फोटो!
अजिंठ्याकडे जाणारा रस्ता
अजिंठा पर्यटक केंद्र
घाटरस्ता
झाडामागून हळूच सटकणारा सूर्य ;)
औरंगाबादपुरता तरी, माझे नाव सर्वदूर पसरविण्याचा प्रश्न मिटलेला आहे! ;) (खरं, ज्यांच्या नावाने हा चौक आहे, त्या "सावित्रीबाई चांदणे" यांच्याबद्दल आपल्याला काहीच माहित असू नये हे वाटून मला प्रचंड खेदही झाला!)
- संदीप चांदणे (१३/०४/२०१६)
प्रतिक्रिया
13 Apr 2016 - 6:27 pm | शान्तिप्रिय
सुंदर व्रुत्तांत.
मस्त फोटो.
13 Apr 2016 - 6:47 pm | उगा काहितरीच
असेच म्हणतो.
13 Apr 2016 - 6:38 pm | प्रचेतस
अप्रतिम लिहिले आहेस.
मनाहोरांशी माझा परिचय फक्त 'जैत रे जैत' च्या गाण्यांइतकाच. खूप छान वाटले त्यांच्याशी तुझ्याकरवी भेट झाल्यामुळे.
13 Apr 2016 - 6:38 pm | यशोधरा
मस्त लेख, अभिनंदन आणि शुभेच्छा!
13 Apr 2016 - 6:39 pm | जगप्रवासी
खूप लकी आहात.
असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याच्या भांगात बिंदिचा गुल्लाल
13 Apr 2016 - 7:01 pm | स्पा
लकी आहात
13 Apr 2016 - 7:24 pm | पैसा
खूप छान लिहिलंस! महानोर आता वयानुसार थकलेले वाटले.
13 Apr 2016 - 7:32 pm | सूड
भारी!!
13 Apr 2016 - 7:33 pm | योगेश सैतवाल
ना धो म्हणतात "आयुष्यात कुठे थांबायचं ते समजल पाहिजे...नाहीतर अति उत्साह फजिता करतो"
इतके सगळे कमावल्यावर अलिप्त होऊन जगता आले तरच समाधान मिळेल...... जसे ना. धो. त्या छोट्याश्या खेड्यात आरामात शेती करताय....दुपारची वाम्कुम्शी....गप्पा......निवांत आयुष्य.....
बहुदा आपण ते विसरलोय........
13 Apr 2016 - 7:36 pm | चांदणे संदीप
क्रेक्ट है जी! :)
13 Apr 2016 - 7:40 pm | चांदणे संदीप
रच्याकने...मिपाकर्स....हाच तो माझा सख्खा मित्र! योगेश सैतवाल
योगेश - मिपाकर्स...
मिपाकर्स - योगेश...
(हे गुथ्थि श्टाईल वाचावे! :) )
13 Apr 2016 - 10:48 pm | अभ्या..
म्हणजे दोन पालथे हात इकडे, एक झोका तिकडं या सटाईलने ना ?
एनी वे मस्त भेट कवीराजाची, त्यांचे आशीर्वाद हायेतच आमच्याकडून तुला आगामी साहित्य कारकीर्दीला खूप शुभेच्छा.
13 Apr 2016 - 11:07 pm | चांदणे संदीप
पण तुमच्या शुभेच्छा पाठीशी असल्यावर बाकी काही नको!
___/\___
Sandy
13 Apr 2016 - 11:07 pm | चांदणे संदीप
पण तुमच्या शुभेच्छा पाठीशी असल्यावर बाकी काही नको!
___/\___
Sandy
13 Apr 2016 - 7:38 pm | उल्का
खूप छान लिहिले आहे. 'जाळीवरती..' कवितेविषयी काय म्हणाले ते सान्गाल का? ऊत्सुकता आहे.
14 Apr 2016 - 10:31 am | चांदणे संदीप
माझ्या शब्दातून तुम्ही कवितेबद्दल ऐकणे म्हणजे शहाळ्याच पाणी कुठल्यातरी मल्टीनॅशनल कंपनीच्या कॅनमधून पिणे! असो.
थोडासा प्रयत्न करतो...
***********************************************************************************************************************
मूळ कविता :
एक पोट्रेट आहे...
आडोशाला थांबलेली एक तरूण स्त्री, एक झाड, जाळीवरती वाळायला टाकलेले लुगडे आणि निळेशार, पाऊस भुरभुरवणारे आभाळ इ. त्या चित्रात ठळकपणे दिसत आहेत.
चित्राचा भाग संपला... आता त्यात घडून गेलेली कथा आणि चालू असलेला प्रसंग म्हणजे...
दाट झाडीतल्या वनात ती एकटीच रोजच्याप्रमाणे कामासाठी आली, पण अचानक आलेल्या मुसळधार पावसाने तिला चिंब भिजवून टाकले. पाऊस तर लबाड लगेच तिची त्रेधा उडवून गेला पण तिला आता स्वत:ला कोरडे करणे आले. इथेच तो अवखळ क्षण आतापर्यन्तच्या आयुष्यात कधीही न आलेला, अनपेक्षितपणे, आज तिच्यासमोर येऊन उभा राहिला.
लुगडे काढून जाळीवर वाळत घातल्यावर ते वाळत असताना तिला तिथल्या तिच्या एकटेपणाची जाणीव झाली आणि तिचे पहिल्यांदाच स्वत:च्या यौवनाकडे लक्ष गेले. त्या लुगड्याचा सुंदर काठही आता तिच्याकडेच पाहतोय, ती गर्द राई सुद्धा थबकून गेलीये! आता मात्र ती अवघडलीये - 'तारूण्यसुलभ लज्जा' या अर्थाने. ती विलक्षण मोहरून गेलीये... त्यात एकटेपणामुळे त्या क्षणाचा परिणाम कित्येक पटीने तीव्र होऊन तो तिला वेगळ्याच, आतापर्यंत न अनुभवलेल्या भावविश्वात घेऊन जात आहे!
झाडातून मघाशी झालेल्या पावसाचे पाणी हळुहळू निथळत आहे. लुगडे वार्याबरोबर झुळूझुळू करीत सुकत आहे. नभात निळीजान्भळी झिम्मड सुरूच आहे!
हे एक पोट्रेट आहे!
***********************************************************************************************************************
अतिशय अवघड असा विषय निवडून कुठेही त्यात बटबटीतपणा येणार नाही याची काळजी घेत आणि कविता शब्दबंबाळ न करता, कमीत कमी शब्दाची पेरणी करून महानोरदादांनी फक्त कमाल केली आहे! ___/\___
हे ऐकले तेव्हा फक्त व्वा...व्वा... एवढेच माझ्या तोंडून निघू शकले होते!
या माझ्या वरच्या लिहिण्यातूनही जर अजून तुमच्यापर्यंत किंवा दुसर्या कुणापर्यंत ही कविता पोचत नसेल, तर ते फक्त माझ्या शब्दांचे अपयश असेल.
धन्यवाद,
Sandy
19 Apr 2016 - 8:26 pm | उल्का
धन्यवाद!
मी प्रथमच वाचली ही कविता. कवितेचे रसग्रहण वाचल्यावर कविता एका नव्या रुपात उलगडते.
निदान मला तरी तसे वाटते.
एखादा सुंदर सुंदर कवितांचा रसग्रहणाचा धागा काढावा. आवडेल वाचायला. :)
13 Apr 2016 - 7:54 pm | जव्हेरगंज
लै भारी ओ संदीपराव !!!
जांभुळ पिकल्या झाडाखालून जाऊन आला म्हणा की !!!
13 Apr 2016 - 7:59 pm | चांदणे संदीप
येक्झ्याटली!
13 Apr 2016 - 8:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्वा... वृत्तांत आवडला. आपल्या कवितेला एक उर्जा मिळेल असे वाटते.
आपल्या कवितेचं लवकरच पुस्तक येईल, असे वाटते. शुभेच्छा. :)
पळसखेड्याला त्यांच्या शेतात गेलेलो. त्यांच्या शेतात सिताफळाचं नाव लताफळ आहे. :)
-दिलीप बिरुटे
-दिलीप बिरुटे
14 Apr 2016 - 9:40 am | चांदणे संदीप
ह्याच श्रेय सगळ फक्त तुम्हाला! :)
ह्या दगडाला पैलू पाडण्यासाठीचा आवश्यक एक घाव तुम्ही घातला आणि एक महानोरदादांकडून मी पाडून घेतला.... तरीही मी अजून दगडच आहे!
ह्याच्यातून महानोरदादांची शेतीतली काव्यात्मक कल्पकता दिसून येते!
असाच लोभ असू द्यावा. ___/\___
धन्यवाद,
Sandy
13 Apr 2016 - 8:16 pm | रातराणी
सही!
14 Apr 2016 - 9:49 am | सुनील
कुणी नेमाड्यांना भेटायला शिमल्यापर्यंत जातय तर तुम्ही वाट वाकडी करून महानोरांना भेटायला गेलात!
वृत्तांत आवडला!
14 Apr 2016 - 11:49 am | बोका-ए-आझम
नभ उतरू आलं सारखी कविता महानोरच लिहू जाणे! भाग्यवान आहात!
14 Apr 2016 - 12:58 pm | नाखु
रानफुलाची सफर घडवली...
स्वगतः हे चांदणे अम्हाला कधी भेटणार कुणास ठावुक.
संमेलनात चुकामुक झालेला नाखु
14 Apr 2016 - 10:50 pm | चांदणे संदीप
एक हाक द्या फक्त... चिंचवडात कुठे म्हणाल तिथे हजर होतो. :)
14 Apr 2016 - 11:19 pm | अभ्या..
नाखुकाका हे सॅन्डीबाबा एक लंबरचा जेम्स बॉन्ड हाय.
पुण्यात बसून मला सोलापुरात टिपले ह्या माणसाने. फोन नंबर नसताना हुडकून काढले. कदाचित हा सीआयए, मोसाद, रॉ बी कायतरी करणारा इसम आहे. स्सांभाळून.
15 Apr 2016 - 10:30 am | चांदणे संदीप
बास का दादानु!! आपल्या माणसांची खबरबात नाय ठेवायची तर कुणाची ठेवायची?
आता, नाखुकाकांच्या घराचे फाटक उघडून आत जाणारच होतो...पण थांबतो.... ;)
15 Apr 2016 - 10:31 am | नाखु
घरात घेण्यासाठी आम्ही तत्पर असतो...
आभाळाखालचा नाखु
15 Apr 2016 - 10:33 am | प्रचेतस
म्या पण यीवू का?
15 Apr 2016 - 11:36 am | नाखु
माणसांना आमंत्रण द्यायची पद्धत नश्शे !
15 Apr 2016 - 12:27 am | डॉ सुहास म्हात्रे
आयुष्यात काळजीपूर्वक जपून ठेवावे असे हे भाग्यवान क्षण ! ते लेखनातही सुंदर उतरले आहेत. भाग्यवान आहात !
15 Apr 2016 - 12:48 pm | ज्ञानोबाचे पैजार
महानोरांची भेट घेतलीत आणि त्याचा वृतांत आमच्या साठी आवर्जून लिहिलात या करता शतश: धन्यवाद.
महानोरांना बर्याच दिवसांपूर्वी कुठल्याशा टेलिव्हिजन वरच्या कार्यक्रमात पाहिले होते. त्या मानाने आता ते बरेच थकलेले दिसत आहेत.
सूर्यनारायणा नित नेमानं उगवा
अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा
ही त्यांच्या अनेक आवडलेल्या कवितांपैकी एक आवडती कविता.
तुम्हाला त्यांनी त्यांची एखादी नवी कविता ऐकवली असेल तर ती देखिल लिहा ना इथे.
पैजारबुवा,
15 Apr 2016 - 2:48 pm | चांदणे संदीप
पैजारबुवा धन्यवाद,
गप्पाच्या ओघात दादांनी त्यांच्या स्वत:च्या तसेच इतर अनेक नामवंत कवींच्या ओळी आमच्यासाठी गुणगुणल्या. कुठली एक कविता पूर्ण अशी म्हणून दाखवली नाही, अपवाद फक्त "जाळीवरती वाळत लुगडे" या कवितेचा.
निवांत वेळ मिळाला की, त्या वेळच्या गप्पांच्या संदर्भासहित टाकतो! :)
धन्यवाद,
Sandy
15 Apr 2016 - 8:50 pm | शलभ
खूपच सुंदर अनुभव. :)
15 Apr 2016 - 9:09 pm | विजय पुरोहित
SANDY...
मस्तच रे अनुभव...
29 Apr 2016 - 8:45 am | अभिजीत अवलिया
उत्तम अनुभव सन्दीप भाऊ.