२०००
मागील भागात पाहिलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या कारणांनी तंत्रशिक्षणाचा हळूहळू दर्जा खालावत गेला. पण सगळं वाईटच आहे का? तर नाही. म्हणजे बऱ्याच अंशी चांगल्या संस्थांची गरज होती. पण चांगल्या चार- पाच आणि वाईट पन्नास असं झाल्यानं हे सगळे क्षेत्रच वाईट असा समज झाला. काय निवडावं लोकांना कळेनासं झालं. गावातलं कॉलेज - राहायचा खर्च नको व्हायला म्हणून जवळ प्रवेश घेतला तर स्पर्धेत मागे पडतो आणि पुण्यात जाउन घ्यावं तर अतिसुमार ठिकाणी मिळते आणि हे नंतर कळते! अशा पेचात ग्रामीण भागातली मुलं फ़सतात. पुण्यामुंबईत किंवा नागपूर औरंगाबाद इथं काही प्रमाणात चांगली कॉलेजेस झाली. त्यासाठी त्या विभागातला चांगला विद्यार्थीवर्गही कारणीभूत होता. क्याम्पसमधून किती मुले निवडली जातात हे संस्थांच्या यशाचे हल्लीचे मोजमाप आहे. त्यासाठी प्रशिक्षणावर काही प्रमाणात प्रयत्न आणि खर्चही करावा लागतो, याची बहुतांश संस्थांना जाणीव नाही. चांगल्या संस्थेत प्रवेश मिळत असेल तरच हल्ली इंजिनियरिंग करावे .
दोन हजार सालापर्यंत असं वाटलं की यांतला वाईट भाग आता संपला. संख्यात्मक वाढ थांबवून आता ही कॉलेजेस दर्जा वाढवतील. पण कसलं काय? अधोगती अशी सुरु झाली की ज्याचं नाव ते! एक साधी गोष्ट- पुरवठा अमर्याद वाढला आणि दर्जाकडे दुर्लक्ष्य झालं. काहीही करून इनटेक वाढवण्याच्या क्लुप्त्या शोधणे सुरु झाले. प्रथम आयटी क्षेत्राला दोन लाख इंजिनियर्स दरवर्षी लागतील असे अंदाज आणि समज पसरवला गेला. कुणीही इसम कुठेही अभियांत्रिकी पूर्ण करून आला की त्याला उज्जवल भवितव्य आहे असा काहीतरी समज झाला. अठरा वर्षाच्या प्रत्येकात एक अभियंता दिसू लागला- पालक आणि संस्थाचालक दोघांनाही!
२००५ नंतर फी वाढू लागली. त्याला कसलेच निकष नव्हते . त्यामुळे दर वर्षी वेगवेगळी फीवाढ केली तर लोक न्यायालयात दाद मागू लागले. दोन्ही बाजू सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्या. त्यावर असा निर्णय झाला की शिक्षण शुल्क समिती नेमून त्यांनी ठरवावे की कुठल्या संस्थेने किती फी आकारायची. यासाठी ती संस्था कुठल्या भागात आहे- ग्रामीण की शहरी, त्यांच्याकडे सुविधा काय, पुरेसा दर्जेदार शिक्षक वर्ग, मुलांना मिळणाऱ्या नोकऱ्या इ . बरेच निकष होते. या समितीत संस्थांनी आपले प्रतिनिधी घुसवले. ही समिती मग दरवर्षी फी निश्चिती करू लागली. मुलांचा काही फायदा होणारच नव्हता . जास्तीजास्त १०% फी वाढ दरसाल करता येईल - हा नियम '' दरवर्षी दहा टक्के शुल्क वाढेल '' असा वाचायचा !
बघता बघता १९९० ला आठ हजार असणारी फी आज ८०,००० दरवर्षी झाली आहे ! चौथ्या वर्षी ती सव्वा लाख पर्यंत जाऊ शकते - ती सुद्धा कसलाही 'अन्याय' न करता आणि हे न्यायालयाच्या आदेशानुसारच आहे. आज जसे विद्यार्थी पाठ फिरवू लागलेत तसे काहींनी आपणहून ती चाळीस हजारांपर्यंत खाली आणली आहे. मार्चमध्ये प्रस्ताव दाखल करून आतापर्यंत वेबसाईटवर किती फी असेल ते यायला हवे, पण खूप संस्थांनी ते अद्याप दिलेले नाही.
पुढे सरकारने मुलींना तीस टक्के राखीव जागा देण्याचा निर्णय घेऊन गिर्हाईके निश्चित केली. ग्रामीण भागात तुलनेने कमी असणाऱ्या मुली पण प्रवेश घेऊ लागल्या. फक्त मुलींची कॉलेजेस निघाली . ही विमेन्स कॉलेज काढणे यातही बेरकीपणा होता. कर्वे स्त्रीशिक्षण संस्था आणि एसेनडीटी हे सन्माननीय अपवाद . बाकीच्यांनी पुरेश्या मुली येत नसल्याचं कारण दाखवून ही मुलींची महाविद्यालये पुढे सामान्य प्रकारांत बदलून घेतली ! आपोआपच इनटेक दुप्पट. त्यावेळी संचालनालय असं नाही म्हणालं, '' की मुली येत नाहीत ना , मग बंद करा तो विभाग आणि फक्त तुमचं आधीचं कॉलेज चालू द्या '' अशा कामातच राजकीय मदत महत्वाची असते.
२००७
या काळात पालकांना पैसा हातात होता पण स्वतः पर्याय शोधून अन्य करियर ठरवता येत नसे. आपण नाही शिकलो- मुलाने तरी शिकावे अशा काहीतरी कल्पनेतून खूप पालक परवडत नसतानाही मुलांना इंजिनियर करू लागले. त्यांच्यासमोर आधीची मुले असत - जी चांगली नोकरी नसेल तरीही वीस- पंचवीस हजार पगार घेत होती , त्यांना घ्यायला आणि आणून सोडायला कंपनीची गाडी घरी येई . दीर्घ भवितव्याचा विचार ते करू शकत नव्हते किंवा शिक्षण आणि कामाचा संबंध नाही हे दिसत असूनही पैशापुढे तो विचार मागे पडत असे . अशा प्रकारचं जॉब मार्केट अनिश्चितआणि जोखिमिने भरलेलं आहे . पण सगळ्यांनाच तोही जॉब नशिबात नव्हता. मग तेव्हापासून बेकार इंजिनियर्स अन्य पडेल ती कामे करू लागले. परवडत नसताना घर घेऊन हप्त्याच्या ओझ्याखाली दबू लागले, आणि घरांच्या किमती वाढत गेल्याने अजून नवे लोक लोभामुळे घर घेऊ लागले. २००८-०९ मध्ये या शतकातल्या आतापर्यंतच्या सर्वाधिक संख्येने लोकांना नारळ देण्यात आला . ज्यांनी घरे घेतली होती ते आणखी अडचणीत आले .
याही अडचणीच्या काळात शिक्षण क्षेत्राला काही पडलेलं नव्हतं . तशा परिस्थितीतही इनटेक वाढवायसाठी संस्थांनी काय नाही केलं? उद्योगक्षेत्राला भरपूर अभियंते पुढे पाहिजेत आणि त्यासाठी पायाभूत सुविधांचा आग्रह नको- बंधने कमी अश्या मागण्या मान्य झाल्या. कारण संस्था त्यांच्याच तर होत्या! प्रथमच शिफ्ट मध्ये कॉलेज चालवायला परवानगी दिली. म्हणजे सकाळी ७ ते दुपारी एक वाजेपर्यंत पहिली पाळी आणि बारा ते सहा दुसरी झाला इनटेक दुप्पट? इमारत - लायब्ररी - वर्ग- प्रयोगशाळा- क्रीडांगण इतकंच काय, शिक्षक पण तेच! काहीही न करता फायदा दुप्पट ! डिप्लोमा प्रमाणेच बी. एस्सी. झालेल्यांना थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश सुरु झाला. कोणत्याही प्रकाराने दुसऱ्या वर्षात भारती सुरु झाली कारण पहिल्या वर्षी नापासच इतके जण होतात. त्यामुळे बाजारात डिप्लोमा झालेले इंजिनियर्स दिसेनासे झाले!
असा हा प्रवाह वाढत असताना अन्य कायदेशीर बंधने पाळणे आवश्यक होते. त्यामुळे इनटेक वाढताना पन्नास टक्के मागास जातीचे उमेदवार त्या प्रमाणात कुठून आणणार? आणले तरी त्यांच्या फीमध्ये सवलत कशी देणार? इथे सरकार मदतीला आले आणि ठरलं : त्यांची फी सरकारच भरेल! मग काय! प्रश्नच मिटला. पण प्रत्यक्षात राखीव जागांवर मुले न मिळाल्याने अजूनही त्या मोकळ्या रहातात. कारण मुळात गरज तेव्हढी मोठी नाहीच. आताच्या ६५,००० रिकाम्या जागांचा मोठा भाग राखीव प्रवर्गाचा आहे.
आणि एकूण प्रवेश घेणाऱ्या एक लाख मुलांपैकी पन्नास हजारांची खरे तर या शिक्षणाची पात्रताच नाही. त्यांना उगाच घोड्यावर बसवले जातेय .
JEE आणि PCM चे निम्मे- निम्मे गुण धरून सध्या पर्सेंटाईल नुसार प्रवेश देत आहेत. यामध्ये पंचवीसच्याही खाली पर्सेंटाईल असणार्यांनी का जावे? JEE चा सर्वात कमी गुण मिळवणारा बहाद्दर -८५ वर आहे ! उणे गुणपद्धतीचे बेसिक्स त्याला कळले नाहीत, त्यालाही प्रवेश मिळेल, पण जायचं नाही हे त्यानं ठरवावं लागेल ना? त्याला कुणी येऊ नको म्हणणारच नाही.
या सगळ्यातून काय झाले? पैसा पाहून गावोगावच्या सामान्य पैसेवाल्यांना महत्वाकांक्षा निर्माण झाली. तंत्रशिक्षणाशी संबंध नसला तरी - पहिली पायरी म्हणजे शाळा काढायची - पुढाऱ्याला हाताशी धरून ती वाढवायची. मग अकरावी-बारावी जोडून घेणे , पुढे संस्थेच्या नावात ''टेक्निकल एज्युकेशन'' हा शब्द घुसवणे. त्यासाठी लटपट खटपट करून दहा वर्षे शाळा चालवली की तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी, आय टी आय यापैकी काहीतरी किंवा सर्वच मिळावे म्हणून अर्ज करायचा. दूरदृष्टीने हाताशी धरलेला पुढारी आता आमदार असतो किंवा मोठा नक्कीच झालेला असतो. दिल्लीत वजन वापरून- सेटिंग करून अशा मंजुऱ्या मिळवता येऊ लागल्या. आणि सुमार दर्ज्याच्या संस्था बहुसंख्य झाल्या .
या तथाकथित शैक्षणिक क्रांतीचे इतर दुष्परिणाम असे झाले :
१. अभियांत्रिकी शिक्षक पदव्युत्तर शिकलेले असावेत असा नियम असल्याने आणि तसे पदव्युत्तर मिळत नसल्याने हे अभ्यासक्रम- जे पूर्वी फक्त शासकीय महाविद्यालये चालवीत, ती आता तळागाळातली महाविद्यालये चालवू लागली. २००० मध्ये राज्यात एकूण पाचशेच्या खाली असणारी प्रवेशक्षमता आता पाच हजाराकडे चालली आहे! लोकांना संधी मिळू नये असं म्हणायचं नाहीय, पण त्यांना शिकवणारे ''डॉक्टर'' झालेले लोक नाहीत. म्हणून आतां '' पी हेच डी '' चं पीक उगवलं ! सगळ्या विद्यापीठात असे डॉक्टरेच्छुक बेसुमार वाढले. त्यांना मार्गदर्शन कोण करणार? जाउदे झालं!
आज घडीला असे हजारभर ''पिकून तयार '' अन पाचेक हजार कच्चे म्हणजे भावी डॉक्टर्स आहेत असं समजलं. त्यामुळे पीहेचडी च्या शाळा चालवताना पदव्युत्तरला शिकवायला त्यांना वेळच कुठेय? आणखी गम्मत म्हणजे बाहेर पडणारे असंख्य पदव्युत्तर वाले डॉक्टर होण्याच्या रांगेत उभे राहातायत. काहीतरी भयाण चुकतंय हे खरंच ! कुठल्याही ठिकाणी प्रवेश घेतला म्हणजे त्याला पास करूनच सोडलं पाहिजे अशी जबाबदारी संस्थांना वाटतेय. प्रवेश घेतल्यापासून पाच वर्षांत डॉक्टरेट नाही मिळाल्यास विद्यार्थी '' अन्याय-अन्याय'' असा कांगावा करून राहिलेत. आरशात बघणं सगळ्यांनी सोडलंय!
असे बिनशिक्षकाचे आणि स्वबळावर पास होऊन बाहेर पडणारे विद्यार्थी म्हणजे आजचे एकलव्यच म्हणायचे !
२. अभियांत्रिकी डिग्री-डिप्लोमा- आय टी आय यांचे प्रमाण उद्योगांना पूरक म्हणजे १:३:८ असे हवे असे अ.भा. तंत्रशिक्षण समितीचे निर्देश आहेत. हा समतोल पूर्णपणे बिघडला. ज्यांनी कामगार व्हायचे तेही अभियंते बनून नोकरीअभावी नुसते बसून राहिले आणि तिकडे 'आय टी आय 'ला जाणारे कमी राहिले. प्रशिक्षित कामगार मिळेनासे झाले. ते ''मेक इन इंडिया'' जर होणारच असेल तर हा सर्वात मोठा अडथळा आहे!
प्रवेशक्षमता वाढवण्याच्या नादात डिप्लोमा करून आलेल्यांना सरसकट म्हणजे मेरीट न पहाता दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळू लागला. त्यामुळे शॉप फ्लोअरला मधल्या फळीचे अभियंते मिळेनासे झाले. ते सगळेच डिग्रीला जाऊ लागले . सर्विस इंडस्ट्रीला दुरुस्त्या आणि मेंटेनन्स करणारे- फिरतीची नोकरी करणारे किंवा टेक्निशियन्स मिळेनासे झाले. ती उणीव परप्रांतीय अशिक्षित मुलांनी भरून काढली , खरंतर मराठी मुलांची संधी हिरावली गेली आणि त्यांना कळलंच नाही! आतां मोबाईल दुरुस्ती, टॉवरवर काम करणारे, एटीएम , यूपीएस किंवा अगदी घरातला पाण्याचा फिल्टर दुरुस्त करणारेही परप्रांतीय आलेत.
या असमतोलाची अधिक सविस्तर आकडेवारी आपण अंतिम भागात पहाणार आहोत.
३ क्लासेसचा समांतर उद्योग उभा राहिला. आज अशी स्थिती आहे की ''कॉलेज काय मिळेल हो, पण अमुक तमुक सरांचा मेकॅनिक्सचा क्लास आधी बुक करा! नायतर बॅचेस फुल होतील'' असे सल्ले ऐकायला येतात . हे अशामुळे की चांगले शिक्षक न मिळाल्याने विशिष्ठ विषयात नापासांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे क्लास लावून ते यश आधी पक्के केले जाते. गावात क्लास नसतो ,त्यासाठी सर्वांना शहरात प्रवेश घ्यायचा असतो. शिक्षकच चांगले असते तर ही वेळ आलीच नसती.
पंचवीस वर्षांपूर्वीच परिस्थिती अशी होती की एका प्रसिध्द गणिताच्या क्लासला (M3) प्रवेश घेताना सांगितले जाई की या बॅचला साठजण झाले आता तुला उभे रहावे लागेल. म्हणजे ६० च्या वर येणाऱ्याला क्लासची तीच वेळ पाहिजे असेल तर सगळे सेमिस्टर उभे राहून शिकायचे ! तरीही मुले तिथेच प्रवेश घेत. आता आज काय परिस्थिती आहे कोणास ठाऊक.
एका अंदाजानुसार महाराष्ट्रात इंजिनियरिंग क्लासेसची वार्षिक उलाढाल किमान पांचशे कोटी रुपयांची असावी.
४. इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं विद्यापीठाला आता कठीण जात आहे. प्रथम वर्षाच्या परीक्षा ऑन- लाईन करणं हा याचाच पुरावा आहे. कल्पना चांगली वाटली तरी तशी ती नाही. सध्याचं मूल्यमापन वरवर होतंय आणि दर्जाशी तडजोड होतेय हे नक्की. पहिल्या वर्षाची परीक्षा झाली, पण पुढच्या वर्षी हे सगळे दुसऱ्या वर्षात जाणारच. व्यवस्था वाढवताना याचा विचार आणि नियोजन झालं नाही.
५. विभागीय असमतोल आता प्रचंड वाढला आहे. पदव्युत्तर शिक्षणाच्या संस्था या वर्षीच्या ताज्या आकडेवारीनुसार ७६% पुणे आणि मुंबई विद्यापीठ विभागात आहेत!
शिक्षण झाल्यावर नोकरीसाठी ठराविक दोन तीन गावातच संधी असतात, मुंबईत जागेचा प्रश्न आहे, म्हणून पुण्यात दरवर्षी वीसेक हजार तरुण नोकरी शोधत येतात. आधी इथल्याच तीस हजार मुलांचा प्रश्न असतो. पण नोकरी नाही मिळाली तर काही कोर्सेस करू - शिवाय जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा ती इथेच मिळणार अशी खात्री असते. म्हणून सगळे इथेच जमतात. हा असमतोल येत्या दोन दशकांत तरी कमी होणार नाही !
अशाच दहाबारा गोष्टी लगेच आठवतात पण सध्या इतकंच.
कांही सकारात्मक विचार:
आधी म्हटल्याप्रमाणे सर्व कॉलेजेस वाईट नाहीत, पण चांगली शोधायला कठीण जावीत इतका गोंधळ आहे . एकदोन तर सरकारी कॉलेजच्या बरोबरीने पुढे जातायत मुले आणि प्राध्यापक दोन्ही चांगले असणे ही त्यांची शक्ती आहे. व्यवस्था खराब असली तरी त्यातून आपल्याला काही चांगलं करता येईल का? हा विचार आपण करावा .
प्राध्यापकांनी संशोधन करून स्वतःला अपडेटवत रहावे असा संकेत आहे. त्याची सर्रास चेष्टा उडवली जाते. तसं वातावरण तिथे खासगी महाविद्यालयात नसतंच. पण अशा परिस्थितीत सुद्धा असे प्राध्यापक माहीत आहेत की ज्यांनी पेटंट घेतले, इतकेच नाही, तर परदेशात काही कोटींना विकलेही आहे - तेही याच खासगी महाविद्यालयात काम करताना. असे असून त्यांनी नोकरीही सोडलेली नाही. काम पुढे चालू!
असं उदाहरण सरकारी संस्थेत नाही हे त्याहून विशेष, जिथे नोकरीची निश्चिती आणि चांगल्या सुविधा- सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. तिकडे त्यांचे वेगळेच राजकारण खेळणे चालू असते. अनेक कॉलेजेस उद्योगांना डिझाईनमध्ये मदत करून पैसे कमवू लागली आहेत. पण अशी उदाहरणे फारच कमी आहेत.
हे संशोधन आणि इंडस्ट्री पार्टनरशिप मोठ्या प्रमाणात व्हायला हवे असेल तर त्यांना जगात काय चालू आहे ते कळायला हवे. आपण बाहेरील अनुभवी लोकांनी येऊन काही काळ तिथे शिकवायला जायला हवे.
दर विकांताला किंवा अगदी आपल्याला येतो तो विषय, मुद्दा किंवा आपण काम केलंय तो विषय- एक धडा जरी तिथे जाउन शिकवला, तरी उपयोग होईल . किंवा आपल्या कंपनीतल्या प्रोजेक्टमध्ये छोटा भाग त्यांना करायला दिला तर ते आनंदाने करतात. तुमची वाटच पहात असतात ते! त्या अर्थाने काही चांगली कॉलेजेस आहेत असं नक्की म्हणता येईल.
यांसाठी इथले कुणीही मिपाकर- अगदी अनिवासी सुद्धा भारतात आल्यावर एखादा दिवस एखादा टॉपिक शिकवू इच्छित असेल तर मी चांगल्या कॉलेजात तशी व्यवस्था करू शकतो. शेवटी हा आपल्या समाजाचाच एक भाग आहे, बऱ्या वाईट गोष्टींसह आपण स्वीकारून जमेल तितकी मदत नवीन मुलांना करू शकतो. त्यात मोठा आनंद असतो. (मी हे सर्व करत असतो बरंका ! ) त्यांच्या काही विद्यार्थ्यांकडे चांगली बौद्धिक क्षमता आहे. आपण ती वाढवायला मदत करूयात. संस्थांच्या असे संपर्कात रहाण्याने मला काही चांगले टीम मेम्बर्सही मिळाले आहेत ...!
( क्रमश: )
प्रतिक्रिया
14 Jul 2015 - 7:09 pm | एस
चला, किंचिततरी काहीतरी सकारात्मक आहे हे वाचून चांगलं वाटलं.
पुभाप्र.
14 Jul 2015 - 7:21 pm | चैतन्य ईन्या
+१ सूचना खरच चांगली आहे
14 Jul 2015 - 7:12 pm | टवाळ कार्टा
वस्तुस्थिती
14 Jul 2015 - 7:16 pm | सौंदाळा
हा भागही आवडला.
मुलींना ३०% आरक्षणाचा निकष आमच्या वेळी पहिल्यांदा आला होता. त्यामुळे झाले काय की मेकॅनिकलला १२० पैकी ३६ जागा मुलींना राखीव झाल्या. मेकॅनिकलला मुली फारशा येत नसल्यामुळे या जागा बर्याच रिक्त राहील्या आणि अत्यंत कमी मार्क असलेल्या मुलींनापण मेकॅनिकलला मेरीट सीट (??) मिळाली. सीओईपीला ९६% (पीसीएम) खुला वर्ग मुले आणि ७५/८०% खुला वर्ग मुली असा प्रकार होता. डी.वाय्.पाटील, एस्.एस्.पी.एम्.एस वगैरे ठिकाणी ५०-६०% असलेल्या मुली मेकॅनिकलला. सगळाच मुर्खाचा बाजार (खरोखर मेकॅनिकल इंजिनियरिंग करण्यासाठी या शाखेत आलेल्या मुली नगण्य होत्या)
14 Jul 2015 - 7:21 pm | सौंदाळा
अजुन एक आठवणीतली गोष्ट,
पहिल्या वर्षाला आम्हाला एका सरांनी विचारले होते तुम्ही मेकॅनिकलला का प्रवेश घेतला, तर बर्याच विद्यार्थ्यांचे (मुले/मुली) उत्तर होते काँप्युटरला प्रवेश मिळाला नाही म्हणुन. सरांचा चेहरा अजुन आठवतोय
14 Jul 2015 - 7:31 pm | उगा काहितरीच
विदारक आहे पण सत्य आहे , सकारात्मक भाग अगदीच थोडा आहे . यावर काही उपाय आहेत का ?
-अशाच परिस्थितीतुन "पासआऊट" पण सध्या बेरोजगार असलेला विद्यार्थी :'(
14 Jul 2015 - 7:37 pm | यशोधरा
वाचते आहे.. खरोखर पैशाला पासरी इंजिनिअर्स असे काहीसे चित्र होते अगदी हल्ली हल्लीपर्यंत. आताशी जरा कुठे इंजिनिअरींगची क्रेझ कमी झालेली पहायला मिळते आहे.
14 Jul 2015 - 8:23 pm | भीमराव
आजुन येक
येथे प्रोजेक्ट विकत मिळतील...
असल्या पाट्या आजकाल गल्ली बोळात सुद्धा दिसतात. मिनी प्रोजेक्ट/ फायनल प्रोजेक्ट रिपोर्ट सकट विकत...
भारीय का नाय. काय काय मास्तर तर स्वता सजेस्ट करतात इथुन घेतलास तर प्राईझ परवडेल, यांच्याकडे नविन मॉडेल आलेत,
सगळच भारी म्हन्जे तेरी बी चुप मेरी बी चुप.
तुमी बोलायच नाय मास्तर ला नॉलेज काय नाय मास्तर बी को ऑपरेट करनार
14 Jul 2015 - 8:34 pm | चैतन्य ईन्या
नुसते इंजिनियर नाही तर एम ई वाले पण प्रोजेक्ट विकत घेतात. आमच्या घराच्या शेजारी एकजण पेयिंग गेस्ट ठेवतो. त्याच्याकडे असलेले निम्मे लोक आधी इंजिनियर झाले. मग कुठे काही मिळत नाही म्हणून एम.ई झाले आणि ते चांगले २-४ वर्ष करत होते. मग प्रोजेक्ट होत नाही म्हणून २५००० ते ४५००० देतात. मग हेच लोक प्रोफेसर म्हणून लागतात. अतिशय व्हिशस सर्कल आहे. अजून एक तर लई भारी होता. त्याने नोकरी करून फुल टाईम एम.ई केले. पुढे मग असेच फुल टाईम एम. बी. ए पण केले. असे जर का होत असेल तर काय ते कॉलेजेस.
14 Jul 2015 - 8:37 pm | सुबोध खरे
परिस्थिती गंभीर आहे. प्रत्यक्ष कारखान्यात इंजिनियर ७-८००० रुपये पगारावर येण्यास उपलब्ध आहेत. परंतु त्यांना प्रात्यक्षिकच काय सैद्धांतिक किंवा तात्विक( THEORETICAL) ज्ञान सुद्धा यथा तथा असते. सहा महीने त्यांना प्रशिक्षण द्यावे कि ते सर्व सोडून जायला तयार असतात. अशा परिस्थिती मुळे लहान उद्योजक अशा लोकांना नोकरीवर ठेवण्यास तयार नसतात. आज परिस्थिती अशी आहे कि चांगला इंजिनियर २० हजारावर ठेवायचा आणी चार पाच वर्षांनी तो सोडून जाईल हे गृहीत धरून पुढची तजवीज करून ठेवायची असे माझ्या माहितीतील अनेक उद्योजक सांगतात शिवाय धंद्यातील गुपिते त्यांना शिकवण्यास ते तयार होत नाहीत.
मागच्या वर्षी पुण्यातील दोन लोकप्रिय इंजिनियरिंग कॉलेजात मेक्यानिकल साठी MANAGEMENT कोट्यासाठी विचारले असता १७ लाख रुपये रोख( विना पावती) मागितले.फी वेगळी ती एक लाख रुपयेच्या आसपास वर्षाला.राहण्या ज्खाण्याचा खर्च वेगळा. मी त्यांना विचारले येथे प्याकेज किती मिळते तर ३-४ लाख रुपये (वर्षाचे) असे सांगितले. मी त्याला म्हणालो साहेब चार वर्षे मुलाला घरी बसवले तरीही स्वस्त पडेल. तो अवाक झाला!!
मुलाला स्वतःच्या गुणवत्तेवर मुंबईतच प्रवेश मिळाला त्यामुळे तो आणी मी आनंदात आहोत.
जाता जाता -- सतरा लाख रुपयांचे (आणी वर्षाचे तीन चार लाख रुपये होस्टेल आणी इतर खर्च मिळून) व्याजासकट चार वर्षात किती होतील हा हिशेब करतोय. तेवढे पैसे मुलाला धंद्यासाठी देईन म्हणतो.
15 Jul 2015 - 7:30 pm | अभिजित - १
१७ लाख डोनेशन ?? कारण जागा भरल्या नाहीत तर सरकार आहे ना . मागास वर्गीय लोकाची फ़ी भरायला. त्य मुले संस्था चालकांचे पोट बर्या पैकी भरते आणि मग सामान्य लोकावर हे माज दाखवायला मोकळे. मुळात सरकारी संस्थेत राखीव जागा ठेवणे हे बास आहे. पण सगळे राष्ट्रवादी / कोन्ग्रेस संस्था चालक यांनी हा नवीन कायदा काढला . आपले पोट भरायला. भाजप सरकार पण हा कायदा काढेल असे वाटत नाही. भाजीवाला नाही का स्वस्तात भाजी विकणार नाही. वेळ आली तर फेकेन . तसेच हे. फक्त तो स्वत च्या पैशावर माज करतो. तर हे लोक जनतेच्या खिशातून पैसे काढून जनतेला माज दाखवतात. फडणवीस पण शेतकरी लोकांना कर्जमाफी लगेच नाकारतात. ती नाकारायला पाहिजेच. पण या संस्था चालकांचा रमणा बंद करत नाहीत. आणि दुसरीकडे राज्ज्य्वर इतके लाख कोटी कर्ज आहे म्हणून सांगतात.
14 Jul 2015 - 8:41 pm | अजया
वाचते आहे.पुभाप्र.
15 Jul 2015 - 9:30 am | पगला गजोधर
हे मात्र अतिशय खरे.
नोकरीच्या पहिल्या वर्षी शिव्या शाप घेत कामाच्या थपेड्याने जेवढे शिकवलं, त्याच्या १०% सुद्धा एकूण/टोटल शैक्षणिक वर्षांमध्ये शिकवत नाही.
कळावे
स्वबळावर शिकून व पास होऊन, स्वबळावरच यशस्वीपणे अर्थार्जन व जॉबसॅटीसफ़क्शन मिळवलेला प. ग.
15 Jul 2015 - 11:19 am | सुबोध खरे
प ग साहेब
दुसरी गोष्ट स्वबळावर शिकण्यास दुप्पट तरी जास्त कष्ट पडतात. जर उत्तम शिक्षक असेल तर गोष्टी फार सोप्या होतात आणि कमी कष्टात जास्त शिकणे होते.
स्वबळावर शिकण्यात एक मोठा धोका असतो तो म्हणजे एखादे कौशल्य आपण जर चुकीच्या तर्हेने शिकलात तर आयुष्यभर तीच चुकीची पद्धत बरोबर म्हणून चालविली जाते. जे लोक दुराग्रही असतात ते पुढेही सुधारत नाहीत आणि काही कालावधी नंतर लोकांचा अहं इतका मोठा होतो कि त्यांना तुम्ही चुकीच्या गोष्टी करत आहात हे सांगणेही कठीण होते. हि उदाहरणे वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर दिसतात.
15 Jul 2015 - 12:57 pm | पगला गजोधर
आणि तुम्ही म्हणता तसे, उत्तम शिक्षक की जे सहजी, रेड्याच्याही (माझ्यासारख्या) तोंडून अवघड विद्या वदवून घेतील, फार-फार दुर्मिळ असतात हो.
असा एकजरी गुरु (भलेही तो एखादीच सेमिस्टर व एखाद्याच विषयाला जरी मिळाला तरी भले.)
15 Jul 2015 - 10:11 am | सुनील
अगदी डिट्टेल चीरफाड चालली आहे! उत्तम.
१०+२ चा शैक्षणिक आकृतीबंध स्वीकारण्यामागचा उद्देश हाच होता. त्यासाठी गरज होती ती ITI वा तत्सम व्यवसायाभिमुख प्रशिक्षणसंस्थांचे जाळे तालुकापातळीपर्यंत पोचवायची. जेणेकरून दहावीनंतर अनेकजण त्याचा लाभ घेऊन विविध रोजगाराला लागतील. त्याखालोखाल डिप्लोमा आणि फार कमी डिग्री.
परंतु झाले उलटेच. ७५ साली हा नवा आकृतीबंध आला आणि ८० च्या दशकात खासगी कॉलेजेस निघाली.
आज भारत हा पदवीधारक बनवणारा जगातील सर्वात मोठा कारखानदार आहे!
15 Jul 2015 - 10:14 am | धर्मराजमुटके
दुर्दैव असे की या कारखान्यातून नोकरी करण्यास नालायक उमेदवार जास्त प्रमाणात बाहेर पडतात तेव्हा धंदा करु शकणारे किती उमेदवार बाहेर पडत असतील याची कल्पनाच न केलेली बरी.
15 Jul 2015 - 10:50 am | नाखु
उपयुक्त माहिती पुलेप्र
कार्कून
15 Jul 2015 - 11:06 am | स्वीत स्वाति
आज सर्वात जास्त बेरोजगारी अभियांत्रिकी क्षेत्रात असून
एम ई झालेले १०-१२ हजारावर अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरी करण्यास तयार आणि त्यापैकी किती तरी जण पीएचडी करणारे ….
भयानक परिस्थिती आहे .
15 Jul 2015 - 11:33 am | आदूबाळ
छान - दखलपात्र - लेख.
15 Jul 2015 - 11:37 am | झकासराव
अतिशय खोलात जाउन केलेले विश्लेषण.
उत्तम लेख आहे. :)
मी डिप्लोमाला होतो तेव्हा कॉलेजेस कमी होते आणि फी देखील तुलनेने कमीच होती.
मग ती वाढता वाढता वाढे होत गेली. सरकारी धोरण अनाकलनीय होते.
आता आलेले गावोगावी शिफ्ट मध्ये सुरु असणारे आणि कॉलेजचे पिक पाहता त्याचा फायदा कोणाला झाला हे कळणे सोप्पे आहे. स्ट्रेटेजी आणि फ्युचर फोरकास्टिन्ग गेल तेल लावत. पैसा ओढायचा हेच धोरण.
15 Jul 2015 - 1:44 pm | टवाळ कार्टा
इतक्या इंजिनीअर झालेल्यांमध्ये बेसिक पक्के असणारे १०% पेक्षा कमी असतात
15 Jul 2015 - 1:47 pm | पद्मावति
हाही भाग माहितीपूर्ण. पु.भा.प्र.आहेच.
15 Jul 2015 - 7:02 pm | चैत्रबन
तुम्ही सकारात्मकतेने पुढे टाकलेले एक पाऊल आवडले..
15 Jul 2015 - 7:06 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर, प्रामाणिक विश्लेषण असलेली मालिका !
८० च्या दशकात आपल्या पक्षातल्या पित्त्यांना व राजकीय विरोधकांना; आणि मात्तब्बर विरोधी पक्षियांना खूष ठेवण्यासाठी बी एड कॉलेजांची खिरापत देण्याने सुरुवात झाली. हे राजकीय मॉडेल फारच यशस्वी झाल्याने त्यात एम बी ए, इंजिनियरिंग आणि मेडिकल कॉलेजेसची भर पडत गेली. "लोकांत व्यावसायीक आणि पदव्युत्तर शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक पायर्या" असे त्यांची भलावण करण्यात आली. लोकांनाही ते सोईचे वाटत गेले. त्या शिक्षणासाठी लाखो रुपये अवैध (डॉनेशन, इ) मार्गांनी गोळा करत, शिक्षणाचा बाजार करत, अनेक शिक्षणसम्राट राजकारणी तयार झाले. आपल्या मुलांना शिक्षणाची संधी निर्माण होऊन त्याचे भवितव्य सुधारेल या आशेपायी (आणि अर्थात या सगळ्या राकारणात आपल्याला काही करता येणार नाही या अगतिकतेने) सामान्य पालकांनी शिक्षण क्षेत्रातल्या अनेक भ्रष्ट वस्तूस्थितींकडॅ डोळेझाक करून केवळ आपल्या पाल्याच्या होऊ शकत असलेल्या फायद्याच्या कल्पनेकडेच लक्ष देणे सोईस्कररित्या स्विकारले.
या सगळ्यांत ८०च्या दशकातली मेकॅनिकल इंजिनियरिंग बूम, नव्वदीपासून ते २००८ पर्यंतची आयटीची बूम यांनी मोठे योगदान केले आहे. आता २००८ च्या मंदीनंतर लोक ताळ्यावर येत आहेत आणि भूछत्रासारख्या उगवलेल्या बर्याच कॉलेजातल्या जागा रिकाम्या राहत असल्याचे वर्तमानपत्रांतही छापून येऊ लागले आहे.
मात्र, दूरगामी विचार करून कौशल्यांची आवश्यकता आणि ते योग्य प्रमाणात योग्य वेळी उपलब्ध होईल या साठी कधीच नियोजन अथवा उपाययोगना झाली आहे... ना कधी पूर्वी आणि ना आता. या बाबतीत "आनंदी आनंड गडे, इकडे तिकडे चोहीकडे." हेच चपखल आहे !
15 Jul 2015 - 7:59 pm | चैतन्य ईन्या
नेमके विवेचन. माझे मत आहे कि पोलिसी मेकिंग करणाऱ्यांना पुढचे बघायची इच्छा नाहीये किंवा तेवढी क्षमताच नाहीये. त्यामुळे आपल्याला निवडणूक कशी जिंकता येईल इतपतच धोरणे होतात. खूप मोठा विचार धोरण आखणेच होत नाहीये. दुसरे म्हणजे इतकी लोकसंख्या आहे कि सगळ्यांनाच एकाच पद्धतीचे शिक्षण उपयोगाचे नाहीये आणि जास्त उद्योजक निर्माण झाले पाहिजेत हे समजत नाहीये. जेंव्हा कळते तेंव्हा खूप वेळ गेलेला असतो. टीनपाट कॉलेजेस, घावूक पद्धतीने मार्क देणे हे अतिशय घातक आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि ठराविक ठिकाणी दर्जा कमी करू चालणार नाही हे मान्यच होत नाहीये. त्यापेक्षा जास्त चांगली सरकारी शाळा आणि कॉलेजेस चालू झाली पाहिजेत. उलट सर्व सरकारी संस्थांची अवस्था बिकट करून ठेवली आहे. दुसर्याला त्रास देणे हेच काम आहे. त्यातच एक आनंद आहे. पण विशेष कोणी बोलूच शकत नाही. सतत जाती पातीचे राजकारण मध्ये. त्यापेक्ष जास्त दर्जाची कॉलेजेस काढणे. ज्यांना मिळू शकत नाहीये त्या घटकांसाठी विशेष संस्था काढून प्रयत्न करणे सोडून आहे तिथेच जागा तयार करायच्या म्हणजे सगळ्यांची खाली बसायचे असा काहीसा विचित्र उद्योग चालु आहे. असो. सध्यातरी चित्र कठीण आहे.
15 Jul 2015 - 8:03 pm | स्वाती२
दोन्ही लेख आवडले.
15 Jul 2015 - 8:24 pm | पैसा
काल परवाच बातमी वाचली की राखीव जागा न भरल्यामुळे प्रवेशपरीक्षेत ६% मार्क्स मिळवणार्या मुलांनाही आय आय टी मध्ये प्रवेश देण्यात येईल. याच आय आय ट्यांनी राखीव जागा ठेवायला निकराचा विरोध केला होता याची आठवण झाली. आणि विरोधाभास म्हणजे ओपन क्याटेगरीचे अनेक हुशार विद्यार्थी आय आय टी प्रवेशासाठी आशाळभूतपणे वाट बघत रहातात, काहीजण दोन दोन वेळाही परीक्षेला बसतात. एक वर्ष वाया घालवूनही प्रयत्न करतात. त्यांना या शिल्लक राहिलेल्या राखीव जागा देता येत नाहीत. आय आय टी च्या जागा अशा रिकाम्या ठेवणे हा एकूण बुद्धिमत्तेचा अपव्यय आहे.
शिवाय बोर्ड परीक्षांमधे पोपटपंची करून मिळवलेल्या मार्कांना एन आय टी आंणि आय आय टी प्रवेशाला वेटेज देणे हा तर अव्वल दर्जाचा मूर्खपणा आहे. म्हणजे वेगळ्या पद्धतीने विचार करू शकणारे खरे बुद्धिमान विद्यार्थी निवडण्याचा आय आय टीज चा जो उद्देश होता त्याला तिलांजली दिली गेली आहे.
15 Jul 2015 - 9:36 pm | चतुरंग
खाजगी कॉलेजेस मध्येच कशाला, सरकारी आणि अगदी आयायटीज मध्ये सुद्धा खालावलेला आहे! खाजगी कोचिंग क्लासेसचे फुटलेले पेव हे याला प्रामुख्याने जबाबदार आहे. कसेही करुन परीक्षा 'क्रॅक' करणे जमवायचे. परीक्षेचे तंत्र एकदा जमले की सुमार दर्जाचे विद्यार्थी सुद्धा चाळणीतून 'यशस्वीपणे' पुढे सरकतात. अगदी आठवीपासून डोक्यावर आयायटीचे भूत घेऊन कोचिंग कोंबले जाते आणि त्यातले बरेचसे विद्यार्थी तिथे जाईपर्यंत बर्नआउट झालेले असतात. काही जे मुळात चांगले असतात त्यांची नवीन काही शिकण्याची आणि विषयाची मूलतत्त्वे समजून घेण्याची कुवत परीक्षापद्धतीने संपुष्टात आलेली असते. सुदैवी सुमार हे मुळातच फारसे मोटिवेटेड नसल्याने त्यांना तिथे अॅडमिशन मिळाली यातच ते खूष असतात! राहता राहिले साधारण २० % विद्यार्थी जे खर्या अर्थाने त्याचा लाभ घेऊ शकतात.
या लिंक वरचा लेख वाचा.
http://www.business-standard.com/article/opinion/is-the-quality-of-iit-s...
एकुणात मास स्केलवरती कोणतीही गोष्ट तयार व्हायला सुरुवात झाली की दर्जा घसरतोच हे निर्विवाद सत्य आहे.
मध्यंतरी नारायण मूर्तींनी सुद्धा आयाय्टीज च्या दर्जावरती ताशेरे ओढलेले होते.
http://timesofindia.indiatimes.com/india/Poor-quality-of-students-enteri...