प्रेम !!! ???

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
15 Feb 2016 - 8:20 pm

प्रेम दिवसाच्या निमित्ताने ही आठवण!

आपल्या प्रियतमेची मोजून ५३ वर्षे, सात महिने, एकरा दिवस आणि अकरा रात्री , निरंतर वाट पाहणारा प्रियकर खऱ्या जगात असतो कि नाही माहित नाही, पण Gabriel García Márquez च्या ‘Love in the Time of Cholera’ या सुमारे साडेतीनशे पृष्ठांच्या कादंबरीत तो परतपरत जगतामरता भेटत राहतो.

मूळ Spanish भाषेत लिहिलेली ही कादंबरी १९८५ मध्ये प्रसिद्ध झाली आणि १९८८ साली त्याचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला. यावर आधारित याच नावाचा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला.

तसे सरधोपट कथानक! किशोरवयीन फ्लोरेन्तिनो फार्मिनाच्या प्रेमात पडतो. बिचारा गरीब असतो.पण त्याचे प्रेम भारी असते. फार्मिनाही त्याच्यावर वेड्यासारखी प्रेम करते. पण [नेहमी प्रमाणे] तिचा व्यवहारी बाप हे सगळं थांबवतो आणि तिचे लग्न एका संपन्न, हुशार, आधुनिक विचारसरणीच्या, आपल्या पेशाशी कमालीची निष्ठा बाळगणाऱ्या डॉक्टरशी लावून देतो. फार्मिनाही, फ्लोरेन्तिनोचे प्रेम हे प्रेम नसून, एक तात्कालिक तीव्र भावना होती, असा तथाकथित पोक्त विचार करून, डॉक्टरशी लग्न करून , ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे' या चालीवर संसार करु लागते. मुले इ होऊन संसार मार्गीही लागतो. संसारातले टिपिकल चढउतार, प्रेम, द्वेष, असूया, राग, लोभ, कंटाळा, वैताग यातून ते ही जातात........ ही एक रटाळ परंतु जीवनातील वास्तवदर्शी बाजू!

.... पण या कादंबरीची जान असलेला फ्लोरेन्तिनो या प्रचंड कालखंडात काय काय करत राहतो, ते मुळातून वाचण्यासारखे. सर्वात आधी विपन्नावस्थेतून बाहेर येण्यासाठी पैसा कमावण्याचा प्रयत्न करतो. बऱ्यापैकी यशस्वीही होतो. पण त्यात रमत नाही. ती त्याची वृत्ती नाही.

या सगळ्या प्रवासात त्याला अनेक बायका भेटतात.[किती? ... गणती नाही. मी आधी मोजायचा प्रयत्न केला, नंतर सोडून दिला.] जवळ जवळ सगळ्या जणींशी शरीरसंबंध ! एकदोघींशी तर प्रेमसंबंधही जुळून येतात. या सगळ्या मनोशारीर संबंधातून प्रेमाचा, जगण्याचा एकेक पैलू उलगडून दाखवण्याचे लेखकाचे सामर्थ्य चकित करणारे आहे.
प्रेम – वासना! प्रेम – कंटाळा! प्रेम- काम [work या अर्थाने]! प्रेम – सुरक्षितता शोधण्याचा आटोकाट प्रयत्न!
प्रेम – केवळ गरज! प्रेम – चंद्रतारकांतील सार्थकनिरर्थकता! प्रेम – सगळ्याचा आधारनिराधार! प्रेम –सगळ्या जगण्यातला कडूगोडपणा! प्रेम – सगळा विधिनिषेध जंजाळ! यातले संबंध, नैतिक अनैतिकतेच्या भिंती ओलांडून आपल्याला पलीकडे पहायला लावतात! इथे आपण थांबतो. विचार करतो. परत पुढे वाचतो. इतक्या बायकांमध्येही तो फार्मिनाला शोधत असतो का, असा सरधोपट प्रश्न विचारण्याचे धाडस इथे होत नाही. त्याच्या साठी फार्मिना, नेमकी काय आहे, कोण आहे, याचा शोध कादंबरी संपल्यावरही आपण मनातल्या मनात घेत राहतो. वाचकाला मारून टाकण्याचे सामर्थ्य काही अगदी थोड्या पुस्तकात असते! ते या पुस्तकात आहे.

पुढे फार्मिनाचा डॉक्टर नवरा मरण पावतो........ आणि, आणि म्हातारा फ्लोरेन्तिनो, परत फार्मिनाच्या दाराशी तेच पहिले, किशोरवयीन प्रेम घेऊन उभा राहतो! आयुष्याची इतकी कडूगोड वर्षे रिचवून फ्लोरेन्तिनो परत आल्याचे जेव्हा फार्मिना सुरकुतल्या चेहऱ्याने पाहते, तेव्हा आधी नकार, मग मूक होकार, मग मान्यता, असा परत प्रेमाचा प्रवास सुरु होतो. दोघेही दूरच्या जलप्रवासाला निघतात. शरीरातला जोम, उत्साह संपलेला असतो, मनातली उर्मीही तशी निमालेली असते...... तरीही सुरकुतलेले हात हाती येतात, तेव्हा त्यांच्या मनात जे काही उमलून येते, तेच कदाचित प्रेम कि काय ते असावे!

या कादंबरीतील निवेदन, इतिहास, setting, कादंबरीचे शीर्षक हे सगळे परत स्वतंत्र लेखांचे विषय आहेत. ते परत कधीतरी. प्रेमदिवसाच्या निमित्ताने इतकेच. हे पुस्तक आंतरजालावर मोफत उपलब्ध आहे. तसेच याची ध्वनीमुद्रीत, आठेक तासांची आवृत्तीही तूनळी वर उपलब्ध आहे.

वावरवाङ्मयसाहित्यिकसमाजजीवनमानविचारप्रतिसादप्रतिक्रियाआस्वादमाध्यमवेधलेखप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

एक एकटा एकटाच's picture

15 Feb 2016 - 8:30 pm | एक एकटा एकटाच

चांगली तोंड ओळख करून दिलीत

कधी संधी मिळाली की नक्की वाचीन

छान ओळख शिव कन्या. विशेषत: लेखात पुस्तकाच्या / सिनेमाच्या शीर्षकाचे गुपित उघड केले नाहीत हे आवडले :) प्रेमाचे एक वेगळेच रूप दाखवण्यात कादंबरी लेखक यशस्वी झाला आहे.