मागिल सर्व भागः- भाग-१ .. भाग-२ .. भाग-३ .. भाग-४ .. भाग-५ .. भाग-६ .. भाग-७ .. भाग-८ .. भाग-९ .. भाग-१० .. भाग-११ .. भाग-१२..भाग-१३..भाग-१४..भाग-१५..भाग-१६ .. भाग- १७ (मंगलाष्टक स्पेशल) भाग- १८ भाग- १९ भाग- २० भाग- २१ भाग- २२
आणि मग सुरुवात झाली.., ती आमच्या (पाठ-शालीन जीवनातल्या ;) ) स्वयंपाकातल्या रंगी चढा ओढीच्या कुस्त्यांची! अध्ययनपाठातल्या हेव्यादाव्यांचा राग काढायचा जंगी आखाडाच तो! ( :D )
पुढे चालू....
==============================
सकाळी ६ ची वेळ आहे.. कोणी विहिरीवरुन स्नान करून येता येता केळीची पाने कापून आणत आहे. कोणी अंगंणात बसून संध्येच्याच आसना वर, खवणी टाकून नारळ खवायला बसलेला आहे.. काकूही आज सुट्टी मिळाल्यामुळे.. पडवीतल्या उंबरठ्यावर निवांत चहा पित ,आमची गंमत बघत आहे. आणि मधुनच वाडीत कोयती घेऊन चाल्लेल्या सदाशिवदादाला - "अरे सदाशिवा... किश्यानी पैज मारलेलन ना..,आज केळफुलाची भाजी करतो(च!) म्हणून..मग त्याच्या अंगावर पाणी मारून उठव आधी त्या ढोर-झोप्याला!" असे आवाज देत अज्जुन खुश होते आहे...
हे आमच्या अनाध्यायाच्या दिवशीचं अगदी नेहमीचं चित्र..मग ड्युटीवर कोणताही संघ असो. म्हणजे पात्र बदलली तरी चित्र हेच! कारण आमच्यातल्या हेव्यादाव्यांचा परिणाम झालाच तर स्वयंपाक अधिक चांगला करण्यावर व्हायचा! (गुरुजि मिष्किलपणे याला- "विद्यार्थ्यांच्या भांडणात काकूचा लाभ!" असं म्हणायचे. ( :D ) ) यातली आमची टीम म्हणजे याज्ञिकांची आणि त्यांची अर्थातच-उरलेली...( ;) )म्हणजे वैदिकांची! आणि याची काव्यगतीनीच वासलात लावायची, तर..
आंम्ही विद्यावान..आणि ते विद्वान!
आंम्ही ब्याट..ते श्टंपं!
आंम्ही विहिर ते पंप!
आंम्ही कामगार ते संप!
म्हणजे एकंदर धरणीकंपच सगळा! =))
असो! हे केवळ भांडणाला भांडण नसे. कारण हा फरक मानवजातीतला मूलभूत फरक आहे. जे सामान्यांना जमतं ते,विद्वानांना जमत नाही. आणि विद्वानांना जे जमतं, तिथे सामान्यांचं मन-रमत नाही. हा त्यातला इत्यर्थ! आमची टीम या कामावर असली की मग आमचा लिडर म्हणजे किश्या,हा आदल्या दिवशी संध्याकाळ पासून आम्हाला दुसर्या दिवशीच्या युद्धाच्या सुपार्या-वाटायचा. त्याच बरोबर... आपली खेळी उलटवायला.., तिकडच्या गोटात काय 'हालं-चाली' चालल्या आहेत,याची खबर काढण्याच्या कामावरही कुणाला तरी लावायचा. मग दुसर्या दिवशी सकाळपासून आम्ही त्यांच्यातलं कोण कोण आज हादडायच्या इराद्यानी तयार -रहातय याचा अंदाज घ्यायचो.किश्या मला नेहमीप्रमाणे भाजी चिरायला,नारळ खवायला-लावायचा. आणि बाकिच्यांना इतर कामात गुंतवून स्वतः मेन चुलिवर असायचा. मग वांगं आणी हिरव्या टोमॅटोची कढिपत्ता लपवून-लावलेली आमटी...वेलदोडा आणि हलक्याश्या मिठ-पाण्यात मुरलेले गाजराचे बारीक तुकडे टाकून केलेला पुलावासारखा भात... हळद/मिठ लावलेली कोबिची पानं-पोह्याच्या दोन पापडांच्यामधे टाकून,ते पाण्यानी चिकटवून केलेला-कोबिफ्राय पापड...असले वेगळेच पदार्थ करण्याची...त्याची प्रायोगिक साधना सुरु व्हायची. या दरम्यान तो प्रचंड मौन पाळायचा..म्हणजे खाणाखुणा करूनंही बोललेलं त्याला चालायचं नाही. याचा फायदा उठवायला तिकडच्या गोटातून कुणी स्वयंपाकघराच्या दिशेनी यायला लागला..की तो माणूस येण्याआधी इकडे आत खबर लागलेली असायची . आणि तो आल्यावर किश्याच नेमका इंटरव्हल करून,त्याला चाहा मारत बसलेला दिसायचा. मग पंगतीला वाढपाच्या वेळी,त्याच माणसाच्या वाटीतली आमटि .. नेमकी खारट-कशी व्हायची हे कुण्णालाही कळायचं नाही. ( =)) )
तसा त्यांच्यातला एक फितुर (जयंराम! ;) ) ,नेहमी आंम्हाला सामिल असायचाच. पण कधिकधि सदाशिव दादा त्याला पळस्प्यातून आणलेल्या शिट्टीच्या गोळ्या देऊन- परत त्यांच्याकडेच वळवत असे. मग ही मूव्ह - गेलेली कळल्यावर आंम्ही भल्या पहाटे सदाशिवदादाच्या कपड्याच्या बादलीत, तळाला...कोकम टाकून त्याचा बदला घ्यायचो. मग दुपारी कपडे धुताना.. त्याचा सगळीकडे चित्रविचित्र रंग पसरलेला त्याला दिसायचा. आणि आमच्यावर संशय घ्यावा..तर आंम्हीच गुपचूप बादली,आंघोळीच्या गरम-पाण्याच्या चुल्हाण्या पलिकडील कोकमाच्या झाडाखाली आधिच नेऊन ठेवलेली! म्हणजे हातात बॉम्ब आहे,पण फेकता येत नाही..( =)))))) )अशी सदाशिव दादाची परिस्थिती व्हायची!
तरिही सदाशिवदादाच्या (तिखट स्व-भावाप्रमाणे..) , त्यानी केलेल्या खोबर्याच्या चटणीचेहि आंम्ही फ्यान होतो. बारिक तुकडे केलेला नारळ,आदल्या दिवशी देठं मोडून..भिजत टाकलेल्या सुक्या लाल मिरच्या, सक्काळीच जाऊन समुद्रावरून आणलेलं उपाशी-मिठ ( हे काकूनी त्या मिठाला दिलेलं खास नाव!) आणि अजुन एक/दोन गोष्टी एकत्र करून, तो स्वतः पाट्या वरवंट्यानी ते असं रगडून वाटायचा, कि आजुबाजुला आंम्ही उभं राहून त्या वाटणाचा येणारा मंद-धूंद वास घेत राहायचो. मग मला डोळा मारून तो विचारायचा, "काय आत्मू... उद्या पळापळ होइल की नै मग? अंssss???" मी मग चिडून त्यातली थोडी कच्ची चटणी तशीच खाऊन दाखवायचो. आणि वर पुन्हा त्याला - "आज सुद्धा नाही होणार!" असा उलट दगड मारायचो. मग तो ही मनमुराद हसून... मला - हल....मेल्या!!! करायचा. पण नंतर सदाशिवदादा त्या चटणीला परत वरनं कसलीशी चरचरीत कडक फोडणी अशी द्यायचा,की त्या वासानी आमचेच काय..पलिकडल्या गोठ्यातल्या गाईचे कानंही उभे रहायचे. काकू तर ठसका लागून ओरडायचीच, "अरे सदा-शिवा!...आज काय जाळायला घेतलयस रेssssss!!!?" ( =)) ) मग काकू त्या चटणीत थोडं आणखि खोबरं टाकून ती चटणी नॉर्मल ला आणायची. पण मूळात ती तिखट असायची ती असायचीच! म्हणजे खाल्यानंतर माणुस एकदम फुल टॉस झाला पाहिजे. अगदी डोक्याचे केस आकाशाच्या दिशेनी उभे राहून! ..अशीच ती असायची. पण ही चटणी सोडली तर बाकि ह्या वैदिकांचा स्वयंपाक.. म्हणजे साधारण जमलेला भात्,ओशाळून एकत्र-आलेली आमटी आणि आळूचं (खरच झालेलं..) फदफदं! आणि केल्याच कधी कुणी तर (काकूच्याच सल्ल्यानी..) फक्त पानग्या.येव्हढाच असायचा. यापल्याड ते उडी मारु शकत नसत. त्यांच्यातल्या काहिजणांच्या तर स्वयंपाक करताना देखिल काल झालेल्या पाठांतराच्या आवृत्या चाललेल्या असायच्या. त्या गुरुजिंच्या कानावर गेल्या ,की मग गुरुजि हळूच, "आज आमटीला अमक्या आध्यायाचा वास येणार हो...!" असं म्हणून हसायचे.
इकडे आमचं आंगण्यात ब्याट्बॉल तुफ्फान रंगात आलेलं असायचं. आणि गुरुजि मग आमच्याकडे मोर्चा वळवायचे,आणि त्यांची ती सुप्रसिद्ध एक ओव्हर टाकायला यायचे. कधीकधी मी ब्याटिंगला असलो..कि मग त्यांची ती स्पिन बॉलिंग ओळखून मी चेंडू न तटवता नुसताच पायानी आडवायचो,आणि लगेच बॅट्नी मारल्यासरखं करायचो. मग माझी विकेट मिळाली नाही,की गुरुजि बॉल टाकून "हत..हत... हा आत्मू मेला ड्यांबिस आहे. आता मला गोदाताईच्या घरी जाऊन टि.व्हि.वर म्याच बघून तो एलबिडब्ल्यू'चा नियम-हिते आणायला पाहिजे" असं म्हणून चिडचिडायचे! त्यातच मग दुपारची जेवणे व्हायची आणि मग जरा लवंडून झालं. की आंम्ही सगळे जण पत्ते खेळायला नायतर शिनूमातली गाणी म्हणायला निवांत मागे वाडीत जायचो. आणि इकडे वैदिकंही खेळायला लागायचे...काय? तर मंत्रांच्या-भेंड्या..! पण त्यातंही गुरुजि आणि हेमंतादादाच्या चढा-ओढीची गंमत असायची. कारण हेमंता दादाला एकावेळी त्याच अक्षराचे दहा मंत्र अठवत असायचे, आणि गुरुजि त्याला सहजपणे अजून मंत्र-मारून पळवायचे. ओटीवर हा खेळ सुरु असायचा,आणि काकू मग "कसले ते मेले मंत्र ,नी ती म्हणायची यांची जुनाट तंत्र!" ( =)) ) असा नामी टोला मारून..मागे आमच्यात वाडीत यायची. मग आंम्हाला मुलांना ...ए चला रे आता आपण बंद्रावर जाऊ. असं म्हणून आमच्या आनंदाला अजुन एक वाट तयार करून द्यायची. कारण समुद्रावर जायला तशी गुरुजिंची कायमच बंदी असे. पण काकूनी काढलेल्या अध्यादेशापुढे ते फक्त , "तू आहेस ना त्यांच्याबरोबर..मग ठिक आहे." असा उलटा उपादेश देऊन परवानगी द्यायचे. त्यामुळे काकूच्या या मुक्त'पत्रावर आंम्ही समुद्रावर जाऊन नुसता म्हणजे नुसता राडा करायचो.
एकतर दुपारी ४ ते ६ हि वेळ. त्यात पौर्णिमेसारखा दिवस असल्यानंतर.. त्या पुढे-येऊन खचणार्या वाळूत, खेळायला प्रचंड मज्जा यायची. एकमेकाला गोळे करून 'बदकविण्या' पासून ते मला आणि सुर्याला (फक्त मुंडकं बाहेर श्टाइल) जमिनित-गाडून घेण्यापर्यंत धुमाकुळ चालायचा. मला त्यात गाडलं कि सुर्या हरामखोर कुठनं तरी एक काटकी आणून मला ती शिग्रेट सारखी ओढायला लावायचा. मग मी त्याला गाडल्यावर ,बारिक खेकडा पकडून...(सुर्याला हे कळून तो उठायच्या आत) त्याच्या योग्य-जागी सोडून द्यायचो. ( =)))))) ) पण काकूला हा चावट्पणा कळलेला असायचा. मग ती मला आणि सुर्याला तिथेच रडवेलं होईपर्यंत आंगठे धरून उभं करायची. आणि माझा जास्तीच राग आलेला असला,तर पाण्यात भिजून आलेल्या जयरामला, वर..माझ्या बुडावर तसाच नंगू उभा करायची.बाकिची मुलं दुष्ट्पणानी..जयरामला कडेनी श्शूश्शूश्शूश्शूश्शू..... असा आवाज काढून तो लिक होतो का? याची वाट पहात मजा लुटायची. काकूलाही मग प्रचंड हसू यायचं . आणि मग ती जयरामच्या कुल्यावर चापटी मारून..."चल...हो मेल्या खाली..." असं म्हणून एकंदरीतच त्याला माझ्या-वरून उतरवायची.
मी या अधिक शिक्षेनी हिरमुसून विहिरीवरनं अंघोळ करून पाय आपटत आपटतच.. वाडीतून घराकडे जायचो. गुरुजि लांबूनच बघत असायचे आणि आल्या आल्या मला, " काय??? काकूसरकार'नी रिमांड-वर घेतलन वाट्टं!" असं म्हणून ते ही मिष्किल हसायचे. आणि मला पुन्हा, "आरे आत्म्या..आता पुढील आषाढीस पंधरावं वर्ष लागेल ना रे तुला...मग बास की आता हा द्वाडपणा!" असं समजवायचे. पण मी मात्र त्या जयराम-शिक्षेनी जास्त चिडलेला आणि काकूवर रुसलेलाच असायचो. पुढे त्याच फुरफुरण्यात रात्रीचं जेवणंही व्हायचं आणि मी कंबरेला रग लागल्यामुळे आणखि तस्साच स्फुंदत हातरुणात जायचो. काकू हे सगळं एका बाजूनी सावकाश नजरेनी टिपत असायची . आणि मग माझ्या जवळ येऊन मला सोन्या..राजा करत माझ्या कंबरेला कसलं तरी मलम लावायची. पण तरिही मी झोपायचो नाहीच. मग सखाराम काकाकडून मिळालेल्या टिपनुसार,काकू माझ्या डोक्यावरून हात फिरवत केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर.. हे गाणं म्हणायला घ्यायची. आणि मग, माझं रडं थांबलं कधी? आणि मी झोपलो कधी? हे मला सकाळी उठेपर्यंत कळायचं नाही.
याला कारण म्हणजे काकूची जन्मजात असलेली आर्त गायनी कळा. वास्तविक त्या गाण्याच्या भावार्थाचा आणि माझ्या त्या अवस्थेचा खरोखर काहिच संबंध नसायचा. पण शाळेत आलेलं मूल,म्हणजे कित्तीही राग आला तरी ते आपलं! ही काकूची धारणा होती. त्यामुळे मला काकू आईपेक्षा कधिच वेगळी वाटली नाही. माझी आई काकूइतकी कोपिष्ट नव्हती. पण दोघिंचा लळाजिव्हाळा एकाच जातकूळीचा होता... आर्ततेच्या! त्यामुळे काकूलाहि काहि दुखलं खुपलं की तीच्या नुसत्या, "आईं गं...पाय गेले गं माझे आज!" या वाक्यापैकि कुठल्याही पहिल्या शब्दाला.. मी, सदाशिवदादाच्या आधी तिच्या पायांशी उभा असायचो. सदाशिवदादा आणि काकूचं फारसं पटत नसलं,तरी त्यांच्यात असा कुठला अत्यंतिक दुरावाही नव्हता. पण तरिही मी पाठशाळेत अगदी आल्यादिवसापासून काकूला लहानमुला सारखा जो बिलगलो,तो पाठशाळा सुटेपर्यंत. मग मी कधी आजारी पडलेला असलो.. कि तिचं स्वयंपाकात लक्षही लागायचं नाही. आणि मग ती गुरुजिंपाशी, "काय या कार्ट्यानी माया लावलीये हो, मला इकडे भात सुद्धा टाकता येत नाही." असं म्हणून रडायला लागायची. मग गुरुजि तिला, "अगो...पण म्हणून रात्रंदिवस का त्याच्या हाथरुणाशी बसून रहाणार आहेस??? अगं थंडीताप आहे तो.. तिनाच्या ऐवजी आठवड्यात जाइल...पण जाइल नक्की! इतकी कसली हळवी होत्येस त्यात?" असं म्हणून समजूत घालायचे.
मातृत्व हा गुण आहे की मूल्य? याचं उत्तर आजंही माझ्यापाशी नाही. पण तो मायाममतेचा एक असा समान धागा आहे,की ज्याला जन्मदातृत्वाचे पाश कध्धिही अडवू शकत नाहीत.. हे मात्र खरं! आपण देवकी आणि यशोदा ह्या अवस्था फक्त महापुरुषांच्या बाबतीतच का पाहाव्या? माझ्या मते त्या अत्यंत सार्वत्रिक, सहज आणि मूलभूत आहेत. फक्त त्या कुणाला लाभतील,हा मात्र त्या (अगम्य) नशिबाचाच भाग आहे..
=======================================
क्रमशः ....
प्रतिक्रिया
21 Jan 2015 - 3:40 pm | जेपी
आवडल...
21 Jan 2015 - 3:51 pm | प्रचेतस
जबरी अनुभवविश्व आहे.
21 Jan 2015 - 4:00 pm | टवाळ कार्टा
जबरी
21 Jan 2015 - 4:04 pm | प्रमोद देर्देकर
आवडला. शेवटचा परिच्छेद लाजवाब.
21 Jan 2015 - 4:42 pm | हाडक्या
+१
शेवटचा परिच्छेद मस्तच.. :)
21 Jan 2015 - 5:11 pm | शिद
+२
21 Jan 2015 - 4:13 pm | आदूबाळ
नेहेमीप्रमाणे झक्कास!
21 Jan 2015 - 4:27 pm | राजाभाउ
पुढचा भाग लगेच टाकल्या बद्दल धन्यवाद.
मस्त आहे हा भागसुध्दा. भावुक करुन टाकलत गुरुजी.
21 Jan 2015 - 5:07 pm | पदम
खूप आवडल.
21 Jan 2015 - 5:10 pm | कपिलमुनी
भावस्पर्शी
21 Jan 2015 - 6:49 pm | रेवती
छान लिहिलयत.
21 Jan 2015 - 6:54 pm | सुबोध खरे
वा हाही भाग उत्तम
21 Jan 2015 - 8:51 pm | अजया
खूप आवडला हा भाग.
21 Jan 2015 - 9:26 pm | उगा काहितरीच
आत्मुदा , गुरूकुल सुरू झाल्यानंतर विशेष आवडु लागली मालिका !
21 Jan 2015 - 9:54 pm | खटपट्या
हेच म्हणतो..
पुस्तक व्हायलाच पाहीजे...
22 Jan 2015 - 1:27 pm | बॅटमॅन
अगदी असेच म्हणतो. फारच सुंदर लेखन आहे. गुरुकुलाचे अध्याय सर्वांत जास्ती आवडले.
22 Jan 2015 - 1:43 pm | अत्रुप्त आत्मा
धन्यवाद रे ब्याटुका. :)
21 Jan 2015 - 11:30 pm | मुक्त विहारि
कथा उत्तरोत्तर खुलत जात आहे...
22 Jan 2015 - 1:15 am | डॉ सुहास म्हात्रे
लेखमाला अगदी रंगत चालली आहे ! पुभाप्र.
22 Jan 2015 - 4:27 am | निनाद
खूप सुंदर वाक्य!
सगळ्या लेखनात अगदी डोळ्यासमोर चित्रं उभं केलत.
हे लिखाण काकू आणि गुरुजींनाही वाचायला मिळेल अशी आशा करतो.
22 Jan 2015 - 5:32 am | खटपट्या
मी पण तेच बोलतोय. काकू आणी गुरुजींचा एखादा फोटो बघायला मिळाला असता तर खूप बरे वाटले असते. (त्यांची परवानगी असेल तर)
22 Jan 2015 - 5:01 am | कंजूस
अगदी सांदिपनींच्या आश्रमात पोहोचलंवत. पेंद्या कोण ?
22 Jan 2015 - 8:09 am | अत्रुप्त आत्मा
@हे लिखाण काकू आणि गुरुजींनाही वाचायला मिळेल अशी आशा करतो.
@मी पण तेच बोलतोय. काकू आणी गुरुजींचा एखादा फोटो बघायला मिळाला असता तर खूप बरे वाटले असते. (त्यांची परवानगी असेल तर) >> आपल्या भावनांना मी (फ़क्त) आदरपूर्वक नमस्कार करू शकतो. कारण हे सगळेच लेखन काल्पनिक स्वरुपाचे आहे. आणि याला असलेला वास्तवाचा आधार ,हा कोणत्याही एका पाठशाळेचा अगर अध्यापकांचा नाही. भारतातल्या अनेक पाठशाळा (विद्यार्थ्यांसह) कमीअधिक फ़रकानि अश्याच स्वरुपाच्या आहेत. हां ... आता यातले गुरूजी आणि काकू या दोन व्यक्तिरेखा म्हणजे मी माझ्या पुरोहित मित्रांकडुन आजवर ऐकलेल्या त्यांच्या (अश्याच गुरुजि व काकुच्या ) स्वभावाचं मिश्रण आहेत. शिवाय काही गोष्टी ह्या मी त्यात,माझ्या भावाविश्वातुन आणल्या/ उतरवलेल्या आहेत. :)
याखेरीज माझ्या खय्रा शिक्षण काळात मला जे ३ गुरूजी लाभले,त्यातल्या कुणाचाच स्वभाव ह्या-बंडुगुरुजिंसारखा नव्हता. तिघांमधले १ तर छडिनि भरपूर प्रसाद देणारेहि होते. आणि यांच्यापैकी कुणाच्याही सौ. (काकू)पाठशाळेशि/विद्यार्थ्यांशि जोडलेल्या नव्हत्या. असणं शक्यही नव्हतं. कारण माझ्या या दोन्ही पाठशाळा (वेदांत विद्यापीठ,अहमदनगर आणि पुणे वेदपाठशाळा,तांबडि जोगेश्वरी जवळचि,पुणे.) स्वयंसेवी संस्थांच्या मार्फ़त चालाविलेल्या होत्या(आहेत). त्यामुळे तेथील गुरूजी ,हे पाठशाळां मधे,फ़क्त शिकविण्या पुरते येत असत.(असतात) त्यांच आमच(विद्यार्थ्यांचं) नातं भावात्मक पातळिवर चांगलच होतं(आहे ही) विशेषत: पुणे वेदपाठ शाळेतले वे.मू.धुंडिराज लेले गुरूजी ..हे तर कमालीचे विद्यार्थिप्रिय गुरूजी होते. पण तरीही मी सदर लेखामालेतिल रंगविलेल्या गुरुजि काकू व पाठशाळेचं चित्र हे कोकण प्रांतातल्या पाठशाळांचं मिश्रण आहे.
आपणा सर्व जणांच्या भावपूर्ण प्रतिसादांना पुन्हा एकवार नमस्कार. __/\__
===========================[
@अगदी सांदिपनींच्या आश्रमात पोहोचलंवत. पेंद्या कोण ?>>> :-D मूळात यात कोणीही -कृष्णच नाही. :-D
===========================
22 Jan 2015 - 8:22 am | प्रचेतस
सांदीपनी आश्रमात पेंद्या नसून सुदामा होता.
22 Jan 2015 - 9:10 am | जुइ
आवडले!!
22 Jan 2015 - 1:35 pm | यशोधरा
हे लै लै भारी. :)
22 Jan 2015 - 1:46 pm | एस
पुलं आठवले! मस्त!
22 Jan 2015 - 2:32 pm | स्पा
एकदम जबराट... मस्त वाटतंय वाचायला
पाउस पडत असताना रात्री मस्त गोधडी लपेटून आजीच्या कोकणातल्या गोष्टी ऐकत बसायचो, आणि मग कधी डोळा लागायचा समजायचंच नाही, अगदी तसचं वाटतंय आत्ता
:)
22 Jan 2015 - 2:40 pm | कोमल
एक नंबर गुर्जी.. मस्तचं..
22 Jan 2015 - 3:48 pm | पैसा
कथेला रंग भरतोय मस्तपैकी! लिहा तब्बेतीत!