माझी पार्श्वभूमी :
१) शाखेत गेला नाही तर रात्री जेवेण नाही अशा गल्लीत, वाड्यात, वातावरणात जन्म आणि बालपण.
२) वयाच्या नवव्या वर्षापासून शाखेत. नंतर महाविद्यालयात व्यावसाईक शिक्षण घेताना वसतिगृहात रहाताना कॅम्पस वर शाखा सुरु केली. नियमित चाळीस तरुणांची शाखा चालवली.
३) संघ योजनेतून परिवारातल्या एका संघटनेची मोठी जबाबदारी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी दिली गेली. सुरुवातीला जिल्हा स्तरावर नेतृत्व करून त्या जिल्ह्यात नसलेलं काम उभे केलं आणि दीड वर्षात प्रांतस्तरीय ( राज्यस्तरीय ) जबाबदारी आली, नंतर राष्ट्रीय.
४) स्थानिक, जिल्हा, प्रांत आणि राष्ट्रीय स्तरावरील बैठका, आतल्या गोटातल्या बैठका, अभ्यासवर्ग, चिंतन शिबिरे, बौद्धिके यांना नियमित अपेक्षित आणि उपस्थिती.
५) स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील अधिकारी आणि नेते यांच्याशी परिचय मैत्री संवाद पत्रव्यवहार वगैरे .
६) सध्या संघ आणि परिवारापासून लांब. राम मंदिर हे आंदोलन अनावश्यक असून देशाचा घात करणारे आहे असा सुरुवाती पासून राष्ट्रीय अधिका-याशी मतभेद होता. बाबरी उध्वस्त करण्याने देशाचे अपरिमित नुकसान झाले अशी भावना- जे सत्य आहे. संघाची ती अत्यंत क्रूर- केवळ-राजकीय खेळी होती. काम करत असताना बरेच न पटणारे मुद्दे येत होते. पण सगळे आपल्याला वाटते ते तसेच व्हावे असे नव्हे - असे स्वत:ला समजावत पुढे गेलो …. राम मंदिर हे कधीच राष्ट्रीय आंदोलन नव्हते आणि नाही. या देशातल्या समस्त हिंदूंची ती भावना नव्हे - काही लोकांची असेल.
सद्य विषय : अलीकडे संघ अधिका-यांनी हिंदुनी तीन मुले होऊ द्यावीत अशी व्यक्त केलेली विधाने. संघाने भारता मध्ये आधीच एक दुभंग निर्माण केलाय - हिंदू आणि अन्य असा. त्या दुभंगला खत पाणी घालण्यासाठी अशी विधाने आणि आचरण संघ करत असतो. लव्ह जिहाद वगैरे.दुभंग हे राष्ट्रीय पाप आहे. सामान्य स्वयंसेवकांच्या डोक्यात, मनात, रक्तात हा भेद इतका पक्का रुजलाय की त्यांना आपण करू तीच देशभक्ती, आपण करू तेच सामाजिक काम आणि आपले सामाजिक प्रकल्प हेच फक्त देश पुढे ढकलण्याचे इंधन आहे - असा पक्का समज आहे. या विषयावर त्यांना अन्य कांही ऐकणे सोसवतच नाही.
अन्य महत्वाचे : या देशाला संघाची / संघ कामाची आवश्यकताच नाही. संघ या देशाच्या प्रगती मधला एक मोठा अडसर आहे.- कारण संघाकडून प्रस्थापित राजकीय व्यवस्थे मध्ये दोष आहेत हे संमोहन पद्धतीने पटवून देऊन समांतर व्यवस्था उभी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. वास्तविक आवश्यकता आहे ती लोकशिक्षणातून प्रस्थापित व्यवस्थे मध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या प्रयत्नाची. समांतर व्यवस्थेमधले संघाचे सामाजिक, राजकीय ( भाजप ), शैक्षणिक, आर्थिक प्रकल्प हे तद्दन सत्ता केन्द्री, मनुष्य केन्द्री आणि बहुतांशी आतबट्ट्यातले आहेत. ज्या सामाजिक प्रकल्पांचा मुखवटा धारण करून संघ आपला ढोल बडवतो त्या सामाजिक प्रकल्पांचे वेगवेळ्या निकषांवर ऑडीट केल्यास सत्य समोर येऊ शकते.
संघाची शक्ती : प्रत्यक्ष काम न करणारे, कट्ट्यावर बसून मत व्यक्त करणारे, कधीतरी उत्सवाला जाणारे, एखाद्या संघ प्रकल्पाला भेट देऊन आलेले म्हणजे वरवरचे लोक ही आणि हीच संघाची पहिली मोठी शक्ती आहे. या सर्वांचा संघ हा लिळा चरीत्रातल्या आंधळे आणि हत्ती यांच्या कथे सारखा आहे. कुणा शेपूट, कुणाला सोंड हे अवयवच हत्ती आहे असे वाटते. संघाची दुसरी शक्ती संघाचे अत्यंत भाबडे, फार विचार न करू शकणारे पण पोपटपंची करणारे कार्यकर्ते / स्वयंसेवक आहेत. ही जनता प्रेमाचा संसर्ग झालेल्या टीनेजर सारखी असते. स्वत:चा एकवेळ "एक दुजे के लिये " होऊ देतील पण काही ऐकून घेणार नाहीत. अशी जनता आसाराम बापूंच्या कळपात पण असते आणि अन्य ब-याच ठिकाणी. संघाची तिसरी शक्ती आहे ते प्रत्यक्ष संघात आणि संपूर्ण संघ परिवारात असणारी भोंदू मंडळी किंवा सत्ता केंद्रे. प्रचंड मोठ्यावर भोंदुगिरी येथे चालते. ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे, ज्यांच्या बौद्धीकांनी आपण आपले घरदार सोडून राष्ट्राय स्वाहा करायला निघालो आहोत त्याचे पाय मातीचे आहेत हे भाबड्या जमातीला कधीच कळत नाही. भाजपच नव्हे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक प्रकल्पांमध्ये ही सत्ता केंद्रे आहेत, भोंदुगिरी आहे आणि विचारद्रोही लोक आहेत.
भारतीय समाज एकसंधच असावा अशी माझी प्रामाणिक तळमळ आहे. हिंदू आणि मुसलमान या केवळ राजकीय स्वार्थासाठी पाडलेल्या रेषा आहेत - विशेषत: १९४७ नंतर. त्या पुसल्या जाऊ शकतात आणि त्या पुसल्या पाहिजेत. ४७ च्या आधीच्या जखमा वखवखत आणि भळभळत ठेवल्या जातात, मुद्दाम - त्या मागे स्वार्थ आहे, कपट आहे आणि देशाचे अतोनात नुकसान आहे.
प्रतिक्रिया
6 Nov 2013 - 11:38 pm | चेतनकुलकर्णी_85
तुम्ही तेच "उद्दाम " का हो?
7 Nov 2013 - 1:20 pm | उद्दाम
खाकी चड्डी घालून बघा म्हणजे समजेल.
7 Nov 2013 - 4:38 pm | अनिरुद्ध प
आपण नेहमीच पीतवस्त्र परिधान करता का?
7 Nov 2013 - 6:41 pm | खटासि खट
ऑ ????? *crazy*
*bomb* @=
इतकं झालं ?
*drinks* *DRINK* :drink:
आणि आम्ही झोपलो होतो का काय ? *SCRATCH*
*DIABLO*
7 Nov 2013 - 6:45 pm | संपादक मंडळ
या धाग्यावर आता कोणतीही विधायक चर्चा न होता फक्त उखाळ्यापाखाळ्या काढणे सुरू झाल्याने वाचनमात्र करत आहोत.