एका गारुड्याची गोष्ट ६: नागपंचमी चे विदारक सत्य !

जॅक डनियल्स's picture
जॅक डनियल्स in जनातलं, मनातलं
11 Aug 2013 - 5:54 am

एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद !
एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला !
एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ !
एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे !
एका गारुड्याची गोष्ट ५: सापांची ओळख- नाग.

आधी मी नागाच्या बद्दल असलेल्या अंधश्रद्धा आणि माझे अनुभव याबद्दल लिहिणार होतो पण आजच (रविवारी ११ ऑगस्ट) नागपंचमी आहे. त्यानिमित्ताने हजारो नाग भारतभर क्रूर पणे पकडले जातील आणि त्यांना नंतर हालहाल करून मारले जाईल- त्या सगळ्या राजबिंड्या नागासाठी माझा श्रद्धांजली लेख !

नागपंचमीच्या पारंपारिक इस्टोरीमध्येच नागाचा संहार प्रत्येकाच्या मनावर लहानपणापासून बिंबवला जातो. "एक 'काळा' भुजंग नाग ,'काळ्या' डोहात राहत असतो, आणि त्याच्या 'काळ्या' विषाने ते पाणी विषारी होते, त्यामुळे माणसे-जनावरे 'काळी-निळी' होऊन मरतात आणि मग श्रीकृष्ण येऊन त्याला पायाखाली तुडवून मारून टाकतो."

या इस्टोरी मध्ये नागच का, कुत्रा-मांजर का नाही? कारण नागाने मनुष्यजातीला आदिम काळापासून टक्कर दिली आणि त्याने पाळीव व्हायचे नाकारले. तिकडेच त्याचे चुकले, त्याने मनुष्यजातीचा इगो दुखावला. सद्दाम,गडाफी पाळीव होत नाही म्हणल्यावर महासत्तेने आधी त्यांच्या मिडीया मधून त्यांच्या वर गरळ ओकली, मग त्यांच्या लोकांना फितूर केले आणि मग शेवटी त्यांचा खात्मा केला. तेच आपल्या पूर्वजांनी केले, नागाबद्दल अंधश्रद्धाने भरलेल्या गोष्टीलिहून त्याची निगेटिव्ह पब्लिसिटी केली आणि मग त्याने काम नाही झाले म्हणून दिसेल तिकडे ठेचला.

अश्या अनेक गैरसमजुतीतून आपल्याला लहानपाणी शिकवण मिळते की 'दिसला नाग की ठेचा'. तेच सगळे करत असतात, त्यात काही चुकीचे मला वाटत नाही,प्रत्येकाला स्वरक्षणाचा अधिकार देवाने दिला आहे.(माणूस फक्त तो कसापण वापरतो की गोष्ट वेगळी..)इकडे मिपावर किंवा सहकारनगरच्या इमारतीमध्ये बसून मला सर्पमित्राच्या गोष्टी करणे सोपे आहे, पण गरीब शेतकऱ्याचा किंवा आदिवासींचा विचार करून बघा, 'जमिनीवर झोपलेले कुटुंब- घरात कंदील- नागाचे अंधारातले फुत्कार'!

कोणेएकेकाळी, गावातल्या बायका शेतावरच्या वारूळावर जायच्या आणि नागाची पूजा करायच्या, त्याला दुध-बत्ताष्याचा नैवद्य दाखवायच्या (दुध तोंडात तुंबवायच्या नाहीत !). ही पद्धत चांगली होती, त्यानिमित्ताने लोकांना नागाबद्दल आदरभाव आणि निसर्गाबद्दल जाण निर्माण व्ह्यायची. आत्ताच्या काळची नागपंचमी म्हणजे सुवासिनी बायका नागाच्या तोंडात दुध तुंबवून त्याची उत्तरपूजा बांधतात.

हळूहळू गावाबाहेरची नागाची वारुळे बिल्डर च्या घशात गेली आणि मग त्याच्या जागी 'सन सिटया' उभ्या राहिल्या. मग आपल्या सुपीक-स्वार्थी मेंदूचा उपयोग करून, नागपंचमीला 'घरपोच नाग' सेवा चालू झाली. या सेवेचे एकमेव पुरवठादार म्हणजे 'धंदेवाईक गारुडी'! या धंदेवाईक गारुडींना 'नागाची-सापांची काही माहिती नसते, त्यांचा उद्देश म्हणजे नाग पंचमीच्या आधी २ महिने नाग पकडायचे किंवा खऱ्या गारुड्याकडून विकत घ्यायचे.( 'खरे गारुडी' - आपल्या नागला पोटच्या पोराप्रमाणे जपतो, त्याची काळजी घेतो. त्यांच्या कडे जे वडिलोपार्जित ज्ञान असते,ते कुठल्यापण सर्पतज्ञाला तोंडात बोटे घालायला लावेल. त्यांना नागांची निवासस्थाने माहित असतात, तसेच नागाने टाकलेली कात, जमिनीवरील नागाचा ठसा, वाकलेले गवत यावरून ते माग काढत जातात. नागला कसे खेळवायचे माहित असल्याने ते नागाचे हाल करत नाहीत.आत्ताच्या काळात खरे गारुडी पण पोटापाण्यासाठी धंदेवाईक गारुडी बनत आहेत.)

माणूस हा फार भित्रट प्राणी आहे, त्याच भीतीपाई, हे धंदेवाईक गारुडी नागाचेहालहाल करतात. शाळेतल्या मारामारी मध्ये ज्यांनी दातावर बुक्की खाल्ली असेल त्यांना डोक्यात चमकणाऱ्या ताऱ्यांची कल्पना असेल. इकडे तर बिचाऱ्या नागाचे सुरीने किंवा दगडाने आपटून दात तोडले जातात. ही तुनळी बघा म्हणजे समजेल खरा थंड रक्ताचा खुनी कोण आहे ते...
थंड रक्ताचा खुनी !

जे थोडे कुशल असतात ते नागाच्या विष ग्रंथी जाळतात. खिळ्यांच्या मध्ये टुबचे रबर लावून नागाचा जबडा फाकवून ठेवतात आणि मग विषाच्या पिशव्या काढून टाकतात, किंवा जाळून टाकतात. हा फोटो ब्राऊन स्नेक चा आहे पण याच पद्धतीने विषग्रंथी जाळल्या जातात.
विष ग्रंथी शस्त्रक्रिया.

आधीच्या भागात लिहिल्याप्रमाणे विष हे नागाच्या पाचकसंस्थेचा अविभाज्य घटक असते,तेच नसल्यामुळे नाग काही खाऊ शकत नाही आणि शेवटी मरण पत्करतो. आपण माणसे जगायची ५० वर्ष झाली तरी बॉडी मेंटेन करण्यासाठी लाख लफडी करतो मग त्यामध्ये वाघाच्या हाडाच्या औषधापासून ते आग्रावरून-प्रवास सगळे आले. आपला मेंदू मोठा म्हणजे आपण जास्त हुशार, जास्त शक्तिमान म्हणून आपण आल्या अकलेचा उपयोग नागाला हालहाल करून मारायला करतो. मांजर मारल्यावर सोन्याची मांजर काशीला अर्पण करायची असते हा जर नियम नागासाठी लागू केला तर $ चा भाव परत कमी होईल. ;)

ज्यांना ही क्रूर शस्त्रक्रिया जमत नाही ती माणसे दाभण घेऊन नागाचे तोंड शिवून टाकतात. या फोटो मध्ये बघा, टाके घालून तोंड शिवून टाकले आहे.

शिवलेले तोंड.

तोंड शिवलेला नाग.

करोडो वर्षापासून नाग या पृथ्वीवर आहे, अनेक आपत्तींना तोंड देउन, स्वतः मध्ये तसे अनुरूप बदल घडवून त्याने आपले अस्तिव टिकवून ठेवले आहे पण फक्त या माणूस या आपत्ती पुढे तो काही करू शकला नाही. "ग्रेट पावर कम्स विथ ग्रेट माजुरडानेस" या उक्तीप्रमाणे तोंड शिवलेला,विषाच्या ग्रंथी जाळलेल्या असाहाय्य नाग पुजेसाठी आणला जातो. 'त्याचे डोके काय दुधात बुडवतात, त्याच्या फण्यावर हळद-कुंकू काय वाहतात' इ. हे का फक्त तर आपली स्वतः ची भरभराट व्हावी.(कुठल्याही पूजेचे कानक्लुजन तेच असते फक्त एक्सपरीमेंट च्या पद्धती बदलतात!)करा ना पूजा, पण तुम्हाला त्यासाठी खऱ्या नागाचा बळी द्यायची काय गरज आहे, इतरवेळी दगडात देव शोधणारे आम्ही या नागाच्या वेळी फक्त माती खातो.

दुध !

दुध फुफ्फुसात गेलेला, शिवलेल्या जखमेवर कुंकू लावलेला नाग शेवटी माळरानावर सोडून दिला जातो. घारी, गरुड याच्याकडून त्यांचा मृत्यू झाला तर त्यांचे सुदैव नाही तर हळूहळू शक्ती कमी होत जाते आणि शेवटी या राजबिंड्या नागाचा मुंग्या लागून मृत्यू होतो.

नागपंचमीच्या आधी याची मोठी बाजारपेठ पश्चीम बंगाल आणि राजेस्थान मध्ये भरते त्यातून पूर्ण भारतामध्ये हजारो नाग दरवर्षी पाठवले जातात. तरी हल्ली सर्पोद्यान सारख्या संस्था जनजागृतीचे काम जोमाने करत आहेत, त्यामुळे नागपंचमी च्या दिवशी धंदेवाईक गारुड्यांचा धंदा थोडा कमी झाला आहे. तरी पण पण जो पर्यंत आपल्यावरचा अंधश्रद्धेचा प्रभाव कमी होणार नाही तो पर्यंत हे निष्पाप मृत्यू असेच चालू राहणार. तुम्ही विचार करा- तुम्ही नागपंचमीला खऱ्या नागाची पूजा केली तर तुम्ही त्यानिमित्ताने त्याच्या होणाऱ्या मृत्यूला तुम्हीच जवाबदार असता, खऱ्या नागाची डिमांड थांबली तर सप्लाय बंद पडेल.

"उल्का कोसळल्यामुळे डायनासोर नामशेष झाले तसे नागपंचमीमुळे नाग नामशेष न होवो", हीच नागपंचमीच्या निमित्ताने प्रार्थना !

(या लेखातले सर्व फोटो अंतरजालावरून घेतले आहेत.त्यांना कुठल्या पद्धतीने बदलण्यात आले नाही.)

संस्कृतीसमाजजीवनमानशिक्षणविचारअनुभवमतमाहिती

प्रतिक्रिया

प्रीत-मोहर's picture

11 Aug 2013 - 7:22 am | प्रीत-मोहर

पाहवत नाहीये या फोटोजकडे. :(

जॅक डनियल्स's picture

11 Aug 2013 - 7:48 am | जॅक डनियल्स

तोच उद्देश होता माझा !

पैसा's picture

11 Aug 2013 - 9:15 am | पैसा

भयंकर प्रकार आहे. कोणत्याही प्राण्याचा असा छळ फक्त माणूसच करू शकतो. ही कसली मानवी संस्कृती? असल्या एकापेक्षा एक क्रूर प्रथा राजस्थानात असल्याचं ऐकायला मिळतं याच्यामागे काय मेख आहे? मग ते सती असो, की जोहार असो की स्त्री भ्रूणहत्या असो. माणसावर अत्याचार करणारे प्राण्यांना असे छळतात यात काय नवल!

कोकणातले लोक सापांबरोबर रहायला शिकलेले असतात. बहुतेक लोकांच्या परसात एखादा मोठा नाग वावरत असतो. त्याला ते जागेचा राखणदार मानतात. आधेली तर कुत्र्या मांजरांसारखी जिकडे तिकडे दिसतात. इकडे नागपंचमीला जिवंत नागाची नव्हे तर पाटावर चंदनाचा नाग काढून त्याची पूजा करतात, शेतातले उंदीर खाणारे साप हे माणसाचे खरे मित्र आहेत हे सगळ्यांना समजेल तो सुदिन.

यशोधरा's picture

11 Aug 2013 - 9:27 am | यशोधरा

अतिशय क्रूरपणा आहे! :(

अर्धवटराव's picture

11 Aug 2013 - 9:29 am | अर्धवटराव

अरे किती हाल त्या बिचार्‍या नागाचे :(
मला वाटत होतं कि आजकाल हे गारुड्यांचे खेळ बंद झाले असतील...

मागे एकदा थायलंड का कुठल्या देशात अजगराची कातडी सोलतानाचे फोटो बघितले होते... भयानक आहे हे सगळं.

या प्राण्यांच्या पंचम्या कधी सरतील कोण जाणे.

अर्धवटराव

जॅक डनियल्स's picture

11 Aug 2013 - 10:20 am | जॅक डनियल्स

अजगराला खिळ्याने ठोकून भिंतीला ठेवतात आणि पायातला मोजा काढवा तशी त्याची कातडी सोलतात. जर मेलेला अजगर वापरला तर कातडीचा तजेलदारपणा नाहीसा होतो.
याची खूप करोडो $ ची बाजारपेठ आहे.

यशोधरा's picture

11 Aug 2013 - 10:30 am | यशोधरा

!! :(

प्रचेतस's picture

11 Aug 2013 - 9:32 am | प्रचेतस

भीषण आहे.

किसन शिंदे's picture

11 Aug 2013 - 9:48 am | किसन शिंदे

भयानक आहे हि सगळी माहिती.

माजुरडानेस

हा शब्द आवडला.

इतरवेळी दगडात देव शोधणारे आम्ही या नागाच्या वेळी फक्त माती खातो

सहमत!
याआधीचा भागही अतिशय आवडला. प्रतिक्रियांत म्हटल्याप्रमाणे माहितीपूर्ण तरीही बोजड न होणारा.

मिहिर's picture

13 Aug 2013 - 12:18 pm | मिहिर

माहितीपूर्ण तरीही बोजड न होणारा.

सहमत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Aug 2013 - 10:36 am | डॉ सुहास म्हात्रे

खर्‍या तळमळीने लिहीलेला सुंदर लेख... आज नागपंचमीला इतर कुणाला होवो न होवो तुम्हाला नागराज नक्कीच प्रसन्न होणार !

शिल्पा ब's picture

11 Aug 2013 - 11:16 am | शिल्पा ब

मी असेच आवाहन ऐकुन नागपंचमीच्या दिवशी त्यांना वाचविणार्या संस्थांना फोन केलेले आहेत.

नागाचे तोंड फाकवून त्यात दूध कोंबणारे लोक बघितलेत . जमेल तेव्हा थांबवलंय पण .

पण . हे . तोंड शिवलेला पहिल्यांदाच पहिला .
ज्याने कुणी हे केलं . त्याचं तोंड शिवलं पाहिजे असं . ओल्या वेताचे फटके भर चौकात द्यायला हवेत . तेही चेहऱ्यावर . . भो साले . .

आदूबाळ's picture

11 Aug 2013 - 12:10 pm | आदूबाळ

जेडी, क्या बात!

वेळोवेळी हे तुझ्याकडून (आणि मेधावीकडून) ऐकलं, पण लिखित स्वरूपात, फोटोंसहित - अंगावर आलं. :(

--
अवांतरः
विषयाच्या गांभीर्यामुळे कोपरखळ्या लक्षात येणार नाहीत असं वाटून घेऊ नकोस. विशेषतः सन सिटीची. ;)

जॅक डनियल्स's picture

11 Aug 2013 - 11:10 pm | जॅक डनियल्स

अरे सन सिटीच्या जागी खरच २-३ मोठी वारुळे होती, तो रस्ता आमराईतून बायपास ला जायचा, खूप सही जागा होती ती. एक विहीर पण होती, २-३ बाभळीची झाडे आणि -चार दोन वड होते.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Aug 2013 - 11:30 pm | अत्रुप्त आत्मा

@खरच २-३ मोठी वारुळे होती, तो रस्ता आमराईतून बायपास ला जायचा, खूप सही जागा होती ती. एक विहीर पण होती, २-३ बाभळीची झाडे आणि -चार दोन वड होते. >>> येस...येस..येस..! हमन्ये भी १२ साल पहिल्ये वो वारूळ देखा है। तेंव्हा चरवड चौकातून मागे,नदी कडेनी जातांना दिसायची वारुळे..! आंम्ही तिकडे(हाय वे च्या नदीपुलाखाली आणी बाजुला) दर्भ काढायला जायचो! तेंव्हा मला सिनियर असलेले एक आमचे गुरुजी मला सांगायचे,की ऊंच वाढलेल्या दर्भाच्या गंजीत शिरण्यापूर्वी आधी काठीनी लांबून दर्भ हलवावे. दर्भ-मुळं अत्यंत थंड असल्याने सर्प तिथे विसाव्याला येतात...!

अत्रुप्त आत्मा's picture

11 Aug 2013 - 11:35 pm | अत्रुप्त आत्मा

@जॅक डनियल्स>>> येक विचारायचं र्‍हायलं... आमच्या सिंव्हगड कॉलेज रस्त्यावर,महादेव नगर बस स्टॉप जवळचा एक चहा टपरीवाला,(मूळचा गारुडी) आता कात्रज सर्पोद्याना तर्फे सर्पमित्र झालेला आहे. तुंम्ही त्याला ओळखता का हो? :)

त्यानी मला एकदा नागाचं पिल्लू पकडलेलं दाखवलं होतं..छोट्टस्सं...तजेलदार! पण तरीपण मला भ्या वाटलं!

जॅक डनियल्स's picture

11 Aug 2013 - 11:51 pm | जॅक डनियल्स

मला साध्यातरी माहिती नाही, मी ६ वर्षापूर्वी पुणे सोडले. पण तो चहावाला सर्पोद्यानचे काम करत असेल तर चांगलेच आहे.

आदूबाळ's picture

11 Aug 2013 - 11:31 pm | आदूबाळ

जेड्स, आपल्या (!) आमराईला तोडून तिथे एक ४० मजली इमारत उभी रहाणार आहे. तुझा प्वॉईंट परत परत सिद्ध होतोय...

जॅक डनियल्स's picture

11 Aug 2013 - 11:49 pm | जॅक डनियल्स

आपली राई गेली कधीच ...साले २००० साली आपल्याकडे क्यामेरे नव्हते, त्यात तरी तिला बंदिस्त करून ठेवली असती. ते जांभळाचे झाड अजून आठवते मला, त्याखाली मला रोझी ची गोष्ट सांगितली होती...;)

आदूबाळ's picture

12 Aug 2013 - 12:06 am | आदूबाळ

रोझीची गोष्ट :)) :))

मोदक's picture

12 Aug 2013 - 12:49 am | मोदक

सन ऑर्बीट, सन सिटी, सन पॅराडाईज, सन सॅटेलाईट या क्रमाने त्या सनसनाटी भागातून "सरळ" बायपास कडे जाताना आजही एक विहीर दिसते. एक जुनाट पडके दिसावे असे घर आहे आणि त्याच्या बाजूला तुम्ही म्हणताय तशीच झाडेपण आहेत.

येथे "सरळ" या शब्दाला विशेष महत्त्व आहे.. कारण डांबरी रस्त्याने गेल्यास विहीर व झाडे दिसणार नाहीत.

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Aug 2013 - 12:14 pm | बिपिन कार्यकर्ते

RIP!

जेपी's picture

11 Aug 2013 - 12:40 pm | जेपी

*****

मोदक's picture

11 Aug 2013 - 12:54 pm | मोदक

:-(

अप्पा जोगळेकर's picture

11 Aug 2013 - 12:56 pm | अप्पा जोगळेकर

क्रूरपणा.

स्पंदना's picture

11 Aug 2013 - 1:26 pm | स्पंदना

आम्ही आपला कुंभाराने आणुन दिलेला मातीचा नागच पुजतो. ते जीवंत नागाच फॅड तुमच्या शहरातुन, सुखवस्तु पैशाची चरबी चढलेल्या लोकांच आहे.
काय भयंकर फोटो आहेत! ती दुध ओतणारी बाई तर...शब्द नाहीत माझ्याकडे.

'खरे गारुडी' नागपंचमीच्या अगोदर नागाला बिळातून अलगद बाहेर काढतात त्याला उंदीर खायला घालतात आणि त्यानंतर तो सुस्त झाल्यावर त्याचे पकडीने दात उपटून काढतात आणि तसाच त्याचा खेळ केला जातो. नागपंचमी नंतर ते त्या नागाला आपल्या मूळ बिळात सोडून देतात. एक दोन महिन्यात नागाचे दात परत येतात थंड रक्ताचा प्राणी असल्याने नागाला दोन महिने न खाता राहता येतं. त्यामुळे ते नाग त्यांना पुढच्या वर्षी परत पकडता येतात. एक खरा गारुडी नाग चावल्यामुळे ससून रुग्णालयात भरती झालेला मी पाहिला होता नागाचे दात काढत असताना त्याच्या हातातून नाग सुटला आणि त्याला चावला होता. तशा स्थितीत हि त्याने त्या नागाचे दात काढले. दुर्दैवाने त्याल फार उशीर झाला होता आणि ससून मध्ये उपचार सुरु केल्यावरही तो गारुडी दगावला.

जॅक डनियल्स's picture

11 Aug 2013 - 8:01 pm | जॅक डनियल्स

बरोबर आहे तुमचे.
खूप वेळा गारुड्याकडे उपचार नसतो, मग बोटाला खाली साप चावला तर लगेचच जीव वाचवायला बोटच मुळापासून कापून टाकतात. पण काही झाला तरी सापाची-नागाची खूप काळजी घेतात.

खरयं, मुंबई सारख्या शहरात आजकाल हा प्रकार फार कमी झाला आहे. माझ्या लहानपणी नाक्या-नाक्यावर हे प्रकार मी पहायचो. सर्पमित्रांच्या प्रयत्नामुळे लोकांना काही प्रमाणात तरी आता समज आली आहे आणि या प्रकाराला काही प्रमाणात आळा बसला आहे, असे वाटते. पण अजूनही "साप डूख धरतो" असा एक गैरसमज असल्याने या प्राण्याचा बळी जातो. याला कारणीभूत तुम्ही म्हणता तसंच बर्‍याच कथा, इतकंच काय चित्रपटही (लहानपणी पाहिलेला भुजंग हा मराठी चित्रपट फुसटसा आठवतो) कारणीभूत असावेत, असे वाटते.

जॅक डनियल्स's picture

11 Aug 2013 - 8:10 pm | जॅक डनियल्स

या वरती पुढच्या लेखात लिहिणार आहे, अंधश्रद्धा हा खूप मोठा प्रोब्लेम आहे.

मोहनराव's picture

11 Aug 2013 - 5:45 pm | मोहनराव

निर्दयीपणाचा कळस!!!

आनन्दिता's picture

11 Aug 2013 - 6:38 pm | आनन्दिता

रडूच आलं:(

चाफा's picture

11 Aug 2013 - 6:54 pm | चाफा

भयाण.. दात, विषग्रंथी काढलेलं माहिताय पण जे तोंड शिवलेलं पाहून काटा आला अंगावर..
आमच्याकडे गारूडी नाग घेऊन येऊच शकत नाहीत, गारूडी `आत' आणि नाग `दवाखान्यात' आख्खं मंडळ कार्यरत आहे यासाठी, लोकांचंही प्रचंड सहकार्य मिळतं.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Aug 2013 - 6:56 pm | अत्रुप्त आत्मा

हा ही लेख अवडलाच!

नाग किंवा सरपटणार्‍या जनावरांची मला भितीच वाटते..! लहानपणी आम्ही नागपंचलीला गारूडी यायला लागले,की त्यांच्या मागे//मागे हिंडायचो. ते नाग पहाण्यासाठीच...त्यात हे शिवलेलं तोंड'ही काही वेळा पाहिलय. पण दात काढून टाकतात,हे माहीत नव्हतं.आणी नंतर नागाचा असा वाइट अंत होतो,हे कळल्यावर तर खुपच वाइट वाटलं...! :(

बॅटमॅन's picture

11 Aug 2013 - 9:06 pm | बॅटमॅन

:( :(

अवघड आहे :(

या निमित्ताने एक विचारायचं होतं, सांगली जिल्ह्यात बत्तीस शिराळा इथे लै प्रस्थ असतं नागपंचमीचं, तिथेही असे प्रकार लै चालत असतील. तूर्त कितपत कमी झालेत? निर्बंध आहेत असे ऐकून आहे पण बाकी माहिती नाही.

जॅक डनियल्स's picture

11 Aug 2013 - 9:22 pm | जॅक डनियल्स

तिथे माझ्या माहितीप्रमाणे असे प्रकार जास्त चालत नाहीत. मला कधी तिकडे जायची संधी मिळाली नाही पण जे काय माहित आहे ते सांगतो,
आपल्या कडे जशी गणपती मंडळे असतात तशी तिकडे नाग मंडळे असतात, म्हणजे मंडळाचे कार्यकर्ते, त्याचे अध्यक्ष असतात. नागपंचमीच्या ४-५ दिवस आधी ते वारुळातून नाग पकडून आणून माठात ठेवतात, आणि त्याची काळजी घेतात. दात इ. काढत नाही किंवा त्याचे हाल पण करत नाहीत. हे नाग हाताळणारे असतात त्यांना या सगळ्याची माहिती असते, लुंग्या-सुंग्या कोणी ही कामे करत नाही. नाग पंचमीला नागाची गावातून मिरवणूक काढतात, तिकडे सगळ्यात मोठा नाग, जास्त फणा काढणारा नाग यांच्या स्पर्धा भरतात.बायका दुरून पूजा करतात,दुध वैगैरे तोंडात कोंबत नाहीत. शेवटी नागपंचमी संपल्यावर त्यांना जंगलात सोडून देण्यात येते.
ही तुनळी बघा.

नाग मंडळे असतात आणि स्पर्धा भरतात हे माहिती आहे. पेप्रात लै वेळेस त्याबद्दल वाचलेय. काही हौशी मित्रांनी सापांबरोबर फटूपण काढलेले पाहिले आहेत.

पण सापांचे हाल केले जात नाहीत हे खरंच चांगले आहे खूप. धन्यवाद माहितीकरिता. वाचून बरे वाटले.

जेडी ची माहिती बर्‍यापैकी बरोबर आहे. नागांचे हाल होतच नाहीत यावर शंका आहे.

शिराळ्यात त्यावेळी तुफान गर्दी असते. जत्रेसारखा माहोल असतो. एक तर शिराळा म्हणजे सांगली जिल्ह्यातील कोकणाची सुरूवात + पाऊस त्यामुळे त्या छोट्याश्या गावावर बराच ताण पडतो.

मात्र २००२ ते २००६ च्या दरम्यान काही वर्षे नाग मिरवणूकीचे सोज्वळ स्वरूप नाहीसे होवून बारबाला वगैरे नाचवण्याचे फॅड आले होते - सद्यस्थिती माहिती नाही. एका जिल्हा कलेक्टरांनी फर्मान काढून बैलगाड्या शर्यतींप्रमाणे नागमंडळांवर नागाचे खेळ करण्यास बंदी घातली होती. त्याबद्दल हायकोर्टापर्यंत दंगा झाला होता.

अनेक गारूडी वाड्यांवरती जिवंत नाग घेवून येतात. पूजा, दक्षिणा वगैरे प्रकार होतात.

हवे तितके नाग गळ्यात घालून फोटो काढण्याची सुविधा असते. अत्यंत ओंगळवाणा प्रकार असतो तो.

धमाल मुलगा's picture

12 Aug 2013 - 9:00 pm | धमाल मुलगा

शिराळ्याला माझ्या मावशीचं सासर. तिकडे नागपंचमीनिमित्त एकदा जायचा योग आला होता. बहुतेक २००२ किंवा २००३ साल असावं. आदल्यादिवशी पोहोचल्याबरोबर मागच्या वाड्यातल्या शर्‍याशी मैत्री झाली अन त्यांच्या मंडळाचा कार्यकर्ता म्हणून बोंबलत हिंडलो. साप-नागांचे काय हाल होत असतील वगैरे विचार डोक्यात काही आले नाहीत खरं.
आम्ही गेल्या गेल्या, स्वागतासाठी शर्‍यानं एक धामण आणली होती. मग ती रितसर गळ्यात घालून फोटोसेशन झालं. त्यात त्या धामणीनं अंमळ विळखा घालण्याचा प्रयत्न केल्यावर संत्यानं, "थांब हिला जरा वरची हवा दावतो" असं म्हणून शेपटाकडं पकडून हवेत गरगरवलं...मग ती धामण निवांत पडली. मणकेच ढिले झाल्यावर आणखी काय होईल?

ह्यांच्या मंडळाची नागिण होती. तिला मडक्यातून घरोघरी पूजेसाठी नेणं चालू होतं. पण पूजा म्हणजे, नागिण उंबर्‍याशी, अन पूजा करणार्‍या बायाबापड्या धा फूट आतमध्ये...सगळं लांबूनच. हेऽऽ असा फणा काढून फुत्कारत होती नागिण!
एका घरात पूजेसाठी मडक्यातून तिला बाहेर काढलं अन हाताळणार्‍या पोराच्या हातून तिचं शेपूट सुटलं....सळसळत गेली ती खोलीतल्या अडगळीत! सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं. तेव्हा मला कळालं की हे नाग-नागिण वारुळातून शोधून काढून डायरेक्ट पूजेसाठी आणले जातात. दात वगैरे न काढता. पुढे बर्‍याच प्रयत्नांनी त्या नागिणीला परत पकडलं खरं, पण सापडली नसती तर काय लफडं झालं असतं ह्याचा विचार करुनच माझी टरकली.

नंतर, जत्रेत हिंडताना जागोजागी फोटोचे स्टॉल्स, अन तिथं गळ्यात साप घालून फोटो काढून घेण्याची झुंबड. संध्याकाळच्या सुमाराला त्या फोटोस्टॉलच्या आसपास कैक धामणी पडल्या होत्या...सायकल रिपेअरवाल्याच्या दुकानासमोर फाटक्या ट्युबा पडलेल्या असतात तशा.
त्यावर्षी डिस्कव्हरीवाले आले होते शिराळ्याची स्टोरी कव्हर करायला. आणि ते वर्ष म्हणे जिवंत नाग वापरण्याचं शेवटचं वर्ष होतं, त्यानंतर बंदी येणार होती. पुढचं खरंखोटं ठाऊक नाही खरं.

हवे तितके नाग गळ्यात घालून फोटो काढण्याची सुविधा असते. अत्यंत ओंगळवाणा प्रकार असतो तो.

साप जातात जिवानिशी हे खरं आहे. पण त्यात नक्की ओंगळवाणं काय आहे ते नाय कळ्ळं. तसं असतं तर इतके लोक कसेकाय गेले असते फोटो काढून घ्यायला? (मुद्दा साप्/नाग गळ्यात घालून फोटो काढावे की नाही, त्याने त्या प्राण्यांना काय अपाय होतो हा नसून ओंगळवाणेपण काय असावे हा आहे.)

मी पाहिलेला प्रकार असा होता..

फोटोग्राफर एका पोत्यातून छोट्या छोट्या प्लॅस्टीक पिशव्यांची पुडकी काढत होता. (मटणाला वापरतात तशा काळ्या कॅरीबॅग) त्या पोत्यात अशा कित्येक कॅरीबॅग खच्चून भरलेल्या. धामण, मण्यार, नाग वगैरे प्राणी हवे तितके. नागाला फणा काढतो म्हणून आणि मण्यारीला पट्टे पट्टे असल्याने विशेष भाव. लग्नात हार घातल्याच्या थाटात फोटोग्राफर एकेका गळ्यात चार पाच वेटोळी अडकवायचा. भेदरलेले पब्लीक आणखी भेदरायचे. "हां ऽ ऽ हालू नका, डोळे झाकलेत, हसा वो जरा" अशी सूचनांची सरबत्ती करून एकदाचा फोटो निघायचा. रोल वाला फोटो.

नंतर त्याच लहान कॅरीबॅगमध्ये सापांची वेटोळी करून घट्ट गाठ मारायची आणि त्या पुडक्याला पोत्यात "फेकायचे". पुढचे गिर्‍हाईक आले की पुन्हा त्या सापांचे हाल सुरू..

एखादा साप गळ्यात घालून काढलेला फोटो वेगळा आणि हे असले प्रकार वेगळे - म्हणून तो प्रकार मला ओंगळवाणा वाटला.

(गळ्यात एखादी सोन्याची चेन घालणे आणि गळ्यात सोन्याचे साखळदंड घालणे यातला फरक - तोच!) ;-)

धमाल मुलगा's picture

12 Aug 2013 - 11:26 pm | धमाल मुलगा

अच्छा अच्छा! आता कळलं.

जॅक डनियल्स's picture

12 Aug 2013 - 11:32 pm | जॅक डनियल्स

माझ्या माहिती प्रमाणे मण्यार असणे शक्य नाही. धामण असायची जास्त शक्यता आहे. लोकांना साप ओळखता येत नाही त्यामुळे ही लोक खूप गैरफायदा घेतात. मण्यार ला सर्प मित्र पण खूप घाबरून असतात आणि त्याच्याशी खेळ करायला जास्त करून जात नाहीत. तिचा काहीच अंदाज देता नाही आणि विष नागापेक्षा जास्त जहाल असते. जे काही सर्प मित्रांचे मृत्यू होतात ते जास्त करून मण्यार चावल्यानंतर होतात.

मोदक's picture

13 Aug 2013 - 12:20 am | मोदक

ह्योच का मण्यार..?

.

कॉमन क्रेट..?

आम्हाला कात्रज ते सिंहगड च्या ट्रेक दरम्यान कात्रज बोगद्यावरच आरामात पहुडलेला दिसला होता, तो हाच फटू..

एकदा बालगंधर्वला आपला सूड मण्यारीचे पिल्लू तुडवत होता. सोबत बुवा पण होते!

मला शिराळ्याला मण्यार पाहिल्याचे नक्की आठवत आहे - नागासारखेच हाल करत असावेत :-(

जॅक डनियल्स's picture

13 Aug 2013 - 12:33 am | जॅक डनियल्स

हाच तो मण्यार ! मग असेल खरच मण्यार तिकडे. फोटोतल्या लोकांना कल्पना पण येणार नाही की त्यांचा तो फोटो शेवटचा ठरू शकतो. अज्ञानात सुख असते तेच खरे !

फोटो लैच भारी आहे! च्यायला माझी उंदीर पाहून पळापळ होते. हा असला फोटो काढायचं स्वप्नात सुद्धा येऊ शकत नाही!

सूड's picture

13 Aug 2013 - 1:34 am | सूड

एकदा बालगंधर्वला आपला सूड मण्यारीचे पिल्लू तुडवत होता

पिल्लू पायात आलं असं म्हणायचंय का?

पायाची आणि पिल्लाची थोडक्यात भेट होत होती.. वाचली.

असे म्हणायचे होते.

सुबोध खरे's picture

13 Aug 2013 - 10:21 am | सुबोध खरे

मण्यारीचे विष नागापेक्षा जास्त प्रभावी असल्यामुळे थोड्याशाच विषाने मृत्यू येऊ शकतो. त्यातून माण्यारीचे विष हे मुख्यत मज्जासंस्थेवर परिणाम करते त्यामुळे माणसाला चावल्यावर फारशा वेदना होत नाहीत उलट तो भाग बधिर होतो त्यामुळे कित्येकदा मण्यार चावली आहे हे त्या माणसाला कळत नाही( काहीतरी किडा चावला आहे असे वाटून त्याकडे दुर्लक्ष होते) आणि थोड्या वेळाने माणूस बेशुद्ध होतो त्यानंतरहि नक्की कारण न कळल्याने उपचारास उशीर होऊन माणूस दगावतो. त्यामुळेच भारतात मण्यार आणि घोणस यांच्या विषबाधेमुळे होणारे मृत्यू नागाच्या विषबाधे मुळे होणार्या मृत्युच्या कितीतरी पट जास्त आहेत. खरं तर नाग बर्याच वेळेस सावधानतेचा इशारा देण्यासाठी चावतो त्यामुळे नागाच्या दंश नंतर मृत्यूचे प्रमाण ६ टक्के ते २ टक्के ( वेगवेगळ्या अभ्यासकांची सांख्यिकी) इतकेच असते
प्रसिद्ध सर्पतज्ञ रोम्युलस व्हाइटेकर यांच्या अभ्यासाप्रमाणे नाग दंशानंतर उपचार मिळून माणूस वाचण्याची शक्यता ९५ टक्के इतकी असते तर मण्यारीच्या बाबतीत ती केवळ २० ते ३० टक्के असते.
मण्यारीला कोकणात कांडार/ कान्डोर म्हणतात. लहानपणी आजोळी ( नागाव-अलिबाग येथे ) ऐकलेल्या अनेक (भीतीदायक) अख्यायिका मध्ये सूर्य कांडार (यात दुसर्या दिवशीचा सूर्य उगवायच्या आत माणूस मरतो) आणि चंद्र कांडार (यात चंद्र उगवेपर्यंत माणूस मरतो) असे ऐकले होते.
(कांडार म्हणजे मण्यार हे मला डॉक्टर हिम्मत राव बावस्कर यांच्या कडून कळले.)

जॅक डनियल्स's picture

13 Aug 2013 - 7:51 pm | जॅक डनियल्स

बरोबर आहे, त्यामुळेच सर्पमित्रांचा आणि संशोधकांचा मृत्यू होतो. ते हाताळत असताना खूप वेळा दात लागला हे कळत नाही आणि जेंव्हा कळते तेंव्हा अर्ध्या गौऱ्या मसणात गेलेल्या असतात.

आजच इथल्या दैनिकात बनावट सर्प मित्रांवर बातमी आहे. हे सर्पमित्र चक्क सापांच्या/विषाच्या तस्करीत पण गुंतलेले आहेत म्हणे. अवघड आहे सारं :(

जॅक डनियल्स's picture

11 Aug 2013 - 10:19 pm | जॅक डनियल्स

हे प्रकार हल्ली खूप वाढले आहेत. दिस्कोवरी प्रेरित सर्पमित्र गल्लोगल्ली कुत्र्याच्या छत्र्यांसारखे उगवले आहेत.त्यांना फक्त थोडी माहिती असते आणि फेसबुक चा अल्बम भरायला साप पकडतात. या सर्पामित्रांमुळे जेवढे सापांचे हाल होत आहेत तेवढी बाकीची लोकं पण करत नाहीत, कारण साधारण पणे लोकं सापांना मारतात किंवा पळून जातात, त्यांना घरी अन्न-पाण्याशिवाय उपाशी ठेवत नाही. आपला १९७२ चा वन्यजीव कायद्या मध्ये पळवाटा शोधून हे सर्पमित्र लोकं वन्यसृष्टीची वाट लावत राहतात.
आत्ता हे विषाचे वाचून तर वाईट वाटले, यांना फक्त एखादा कोब्रा किंवा मण्यारच धडा शिकवू शकते.

सूड's picture

12 Aug 2013 - 4:58 am | सूड

कहर आहे !!

पिशी अबोली's picture

12 Aug 2013 - 9:33 am | पिशी अबोली

:(

धमाल मुलगा's picture

12 Aug 2013 - 11:27 pm | धमाल मुलगा

त्या नागानं फणा वळवून एक फ्रेंच किस घेतला म्हणजे मग कळेल!

मोदक's picture

13 Aug 2013 - 12:29 am | मोदक

Untamed and Uncut नावाची डिस्कवरी / नॅट जिओची एक सिरीज आहे.. तूनळीवर त्याचे व्हिडीओज मिळतील.

हे असे लै उत्साही प्राणीमित्रमंडळ प्राण्यांच्या लै जवळ गेल्यावर प्राण्यांनी आणखी जवळ करून डायरेक यमाच्या जवळ कसे पोचवले / यमाचे दर्शन घडवले याचा आँखो देखा हाल आहे!!

जॅक डनियल्स's picture

13 Aug 2013 - 7:59 pm | जॅक डनियल्स

हो कसे किडे करायचे नाही हे त्याचे खरे उदिष्ट आहे, पण ते बघूनच काहींनी अपघात करून घेतले आहे. लोकं जो पर्यंत त्या परिस्थितीतून स्वतः जात नाहीत तो पर्यंत त्यांना अक्कल येत नाही, हा माझा अनुभव आहे.
बाहेरच्या देशात अपघात झाल्यावर हेलिकॉप्टर पासून सगळ्या सोई उपलब्ध असतात, विमा असतो त्यामुळे जीव आणि $ पण वाचतात. पण आपल्या कडे असा अपघात झाला तर हॉस्पिटल पर्यंत पोहोचेपर्यंत सर्पमित्र खूप वेळा दगावतो.

भडकमकर मास्तर's picture

13 Aug 2013 - 1:52 pm | भडकमकर मास्तर

बारीक झालेला टार्‍या तर नव्हे हा?

मदनबाण's picture

12 Aug 2013 - 12:12 pm | मदनबाण

फार वाईट वाटले... :(
नागांच्या मोठ्या हिंसेची कथा आपल्या इतिहासात सुद्धा दिसुन येते..
राजा परिक्षिताचा पुत्र जनमेजय ह्याला आपल्या पित्याच्या मॄत्यु ने भयंकर दु:ख झाले... { परिक्षिताने कलिला त्याने मागितल्या प्रमाणेच सुवर्ण हे ५वे स्थान दिले होते. परंतु याच सुवर्ण स्थानाचा उपयोग करुन त्याने परिक्षितावर प्रभाव टाकला कारण त्याने ( परिक्षिताने) धारण केलेला मुकुट सुद्धा सुवर्णाचाच होता.कलिग्रस्त झालेला राजा एकदा वनात भटकला असताना भूक आणि तहानलेल्या परिक्षित एका ऋषिंच्या आश्रमात शिरले,समाधिस्थ ऋषिं कडुन त्यानी पिण्यास पाणी मागितले...समाधित असल्याने ऋषिंना राजा तिथे असल्याचे समजले नाही परंतु कलिग्रस्त राजास मात्र हे आपला अपमान करत आहे असे वाटले... तेव्हा रागाने त्यांनी तिथेच पडलेला एक मेलेला साप त्यांच्या गळ्यात टांगला आणि परत निघुन आला. थोड्या वेळाने जेव्हा ऋषिं पुत्र तिथे आला तेव्हा त्यानी हा प्रकार पाहिला.
तेव्हा त्या दिवसापासुन ७ व्या दिवशी साप {तक्षक} चावुन राजाचा मॄत्यु होईल असा शाप दिला, त्या प्रमाणेच राजा परिक्षिताचा मॄत्यु झाला.}
या गोष्टीचा बदला घेण्यासाठी जनमेजयाने सर्पसत्र करण्यास सुरुवात केली, ज्याच्या यज्ञात अनेक सापांचा आणि नागांचा बळी दिला गेला.

मला वाटतं पुराणातल्या त्या सर्पसत्राचा संबंध नाग या सरिसृपाशी नसून तो नाग नावाच्या एका खास हेर जमातीबद्दल आहे, परिक्षीत माझ्या आठवणीप्रमाणे कुठल्यातरी राक्षसकुळाचा राजा होता, आणि त्याच्या राज्यात हे हेर प्रचंड प्रमाणात विखूरलेले होते. तक्षक हा त्यांचा प्रमुख असावा.. थोडक्यात तर या कथेचा मनासारखा अर्थ बदलत ती `सापांचा बळी' पर्यंत पोहोचलीय. संदर्भ देण्यासाठी नेमकं काय वाचलेय तेच आठवत नाही म्ह्णून शक्य नाही.
जेडी च्या मुळ लेखातली कालियामर्दन वाली गोष्ट ही सुध्दा कुठल्यातरी गंधर्वाला दिलेल्या शापाशी निगडीत आहे. आपले पुर्वज जरी नागाला घाबरत असले तरी त्यांचा नायनाट करण्याऐवजी त्यांना देवत्व देण्याचा शहाणपणा करून आपल्या पिढ्यांना त्यांच्यापासून लांब ठेवण्याच्या पक्षातले असावेत, (नागपंचमीचा दिवस सण म्हणून त्यामुळेच साजरा होत असावा) पण पुढे हा ही शहाणपणा गेला असावा..

रामपुरी's picture

13 Aug 2013 - 3:32 am | रामपुरी

मला आजपर्यंत वाटत होता की "हा" परिक्षीत म्हणजे अभिमन्यूचा "तो" कॄष्णाने जिवंत केलेला मुलगा परिक्षीत...

मला आजपर्यंत वाटत होता की "हा" परिक्षीत म्हणजे अभिमन्यूचा "तो" कॄष्णाने जिवंत केलेला मुलगा परिक्षीत
हो तोच तो.
परीक्षित
जनमेजय
जनमेजय

माझंच काहीतरी कफ्युजन झालं, बहूदा प्रल्हादाच्या वंशातही एक परिक्षीत होता, त्यामुळे असेल. पण नाग ही जमात असल्याचं वाचुन मला आगदीच `संजय सिंघानीया' झाल्यासारखं नाही वाटलं :)

विवेकपटाईत's picture

15 Jul 2015 - 7:40 pm | विवेकपटाईत

कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला (त्याची पूजा केली)चा अर्थ गोवर्धन पर्वतावर वृक्षारोपण केले,गोवर्धन पर्वत आणि इतर ब्रजभूमीत पसरलेल्या पर्वतांच्या पायथ्याशी कृष्णाने ९९ तीर्थांची स्थापना (९९ सरोवरांची) स्थापना केली. या पावसाचे पाणी सरोवरांमध्ये एकत्र केले. गुर-ढोर जे यमुनेच्या पाण्यावरच जगत होते आणि यमुनेच्या किनार्यांवरच सर्व घाण करत होते. तेथून दूर गेले. नदीकाठावर कुंजवनाची निर्मिती केली.
यमुना स्वच्छ झाली, कालिया नाग पळून गेला. या कार्यांमुळे इंद्राच्या कोप (अकाल आणि बाढ दोन्हीपासून ब्रज भूमीची रक्षा झाली.

अनिता ठाकूर's picture

12 Aug 2013 - 12:41 pm | अनिता ठाकूर

वर आणि हा विधिहि करायची पद्धत आहेच.नाग मुद्दाम मारला तर, चुकून मारला गेला तर, दुसऱ्याने मारताना आपण पाहिले तरीही नागाचे श्राद्ध, ह्या विधिद्वारे केले जाते.

झकासराव's picture

12 Aug 2013 - 1:31 pm | झकासराव

:(

आमच्याकडे कोल्हापुरात कुम्भारीण मावशी घेउन यायच्या मातीचा नाग. (तो मात्र पाच फड्याचा असायचा)
त्याचीच पुजा.
नागपंचमी झाल्यावर तो मातीचा नाग तुळशीच्या कुन्डीत विरघळुन जायचा.

अवांतर : कुम्भारीण मावचींची टिपीकल आरोळी "नागुबं घ्या नागुबं" अजुन लक्षात आहे.

जॅक डनियल्स's picture

12 Aug 2013 - 8:23 pm | जॅक डनियल्स

नागुबं घ्या नागुबं !!

मस्त वाक्य आहे.

चिगो's picture

12 Aug 2013 - 6:57 pm | चिगो

:-(

पिलीयन रायडर's picture

12 Aug 2013 - 7:07 pm | पिलीयन रायडर

सुंदर लेख...फार मनापासुन लिहीला आहे...
माझ्या मित्रमंडळी मध्ये शेअर करत आहे..

धमाल मुलगा's picture

12 Aug 2013 - 8:43 pm | धमाल मुलगा

अवघड आहे!
तोंड शिवलेला नाग पाहून तर फार वाईट वाटलं. :(

तिमा's picture

12 Aug 2013 - 9:54 pm | तिमा

मनुष्य हा जगातला सर्वात क्रूर आणि दगाबाज प्राणी आहे. आणि त्याच्याच कृत्यांनी त्याचा सर्वनाश अटळ आहे.

नाग पुजा करणार्‍या प्रत्येक व्यक्तीला दाखवावा असा लेख!

वाटाड्या...'s picture

13 Aug 2013 - 12:12 am | वाटाड्या...

नाग, साप आणि काय न काय...
आपल्याला ह्या प्राणीसमुदायाबद्दल फार काही माहीती नाही पण एकुण हे प्रकरण लै डेंजर आहे...त्यातल्या त्यात आपला संबंध फक्त...ए मी साप नी तु नाग..आता मला म्हण सापड्या....क्या पीजे पाशीच सुरु होऊन तीथेच थांबतं.

लेख मालीका छान...

- (फुस्स)वाटया..

रामपुरी's picture

13 Aug 2013 - 3:35 am | रामपुरी

छायाचित्रे हापिसातून दिसत नसल्याचा पहिल्यांदाच आनंद झाला आहे.

च्यायला कसली कसली ढकलपत्र पाठवतो , हे किती महत्चाचे आहे !
मला मेल कराल का ? (आणि ती पी डि एफ इथे देखील अनेकांना हवी असणार आहे!)
रच्याकने , फोटु दिसत नाहीत पण त्यामुळे लेख वाचू शकलो !
मला एक कळत नाही ,निसर्गाला सोबत घेऊन विस्तारलेल्या भारतीय संस्कृतीत ही क्र्र प्रथा काय म्हणून आली असेल?

बॅटमॅन's picture

13 Aug 2013 - 3:36 pm | बॅटमॅन

निसर्गाला सोबत घेऊन विस्तारलेल्या भारतीय संस्कृतीत ही क्र्र प्रथा काय म्हणून आली असेल?

अहो मूळ उद्देश कसाही असला तरी त्याची वाट लागणे हे सर्वत्रच दिसते, जातीव्यवस्था, सतीप्रथा, लहान मुलींची हत्या, इ.इ. प्रथाही अशाच डिव्हेलप झाल्या ना.

क्रूरतेबद्दलच बोलायचे झाले तर यज्ञात पशुबळीही देतच होते पूर्वी. अजूनही कितीतरी जत्रांत बोकड इ. बळी देतातच.

रेवती's picture

14 Aug 2013 - 7:59 pm | रेवती

vaiT prakar aahe. vachavat nahi.

प्यारे१'s picture

16 Aug 2013 - 11:54 pm | प्यारे१

दुष्ट नीचपणा आहे हा :(

पुणे : वाइल्ड लाइफ कायद्यातील तरतुदींना अनुसरून सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथे जिवंत नागांची पूजा करण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. परिणामी खंडित झालेली नागपंचमी साजरी करण्याची येथील अनेक वर्षांची परंपरा पूर्ववत करण्याकरिता या कायद्यामध्येच बदल करू, अशी ग्वाही केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी दिली.

दुवा

जंटलमन (डॉ०) जॅक - आता परत या.

चतुरंग's picture

7 Aug 2016 - 7:30 am | चतुरंग

काय भीषण प्रकार आहेत!! :(
निसर्गाचाच एक भाग म्हणून स्वतःला आपण का बघू शकत नाही हे खरंच समजत नाही.
हे असले प्रकार समोर आले की आपल्या तथाकथित "प्रगतीची" लाज वाटायला लागते! :(
छे, माणसाइतका क्रूर,कृतघ्न आणि अक्कलशून्य प्राणी दुसरा नसेल!

स्वीट टॉकर's picture

7 Aug 2016 - 4:17 pm | स्वीट टॉकर

बरं झालं चतुरंगनी हा लेख पुन्हा वर काढला. सगळे लेख वाचून काढले. 'वाया' गेलेल्या वर्षाचा इतका सुंदर उपयोग फारच कमी लोकांना करता येतो.
सापांवर होणार्या अन्यायाबद्दल काय बोलावे? मनुष्याचं क्रौर्य, अप्पलपोटेपणा आणि मूर्खपणाबद्दल जितकं लिहावं तितकं कमीच आहे.

पाटीलभाऊ's picture

7 Aug 2016 - 4:46 pm | पाटीलभाऊ

अरेरे...फार वाईट हाल. किळसवाणा प्रकार आहे हा.

माझीही शॅम्पेन's picture

7 Aug 2016 - 10:26 pm | माझीही शॅम्पेन

प्रत्येक नाग पंचमीच्या १ आठवडा अगोदर हा लेख वर आला पाहिजे अशी व्यवस्था केली पाहिजे , रचाक ने हळू हळू हे प्रकार कमी होत आहेत असं वाटत

प्रत्येक नाग पंचमीच्या १ आठवडा अगोदर हा लेख वर आला पाहिजे अशी व्यवस्था केली पाहिजे >>

सहमत.

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Aug 2016 - 5:00 am | कैलासवासी सोन्याबापु

अरे इतका सुंदर लेखमाला प्रकार आजवर मिस झाला ज्याचं दुःख वाटले!! पण आता ठीक आहे, पुढले भाग येणार आहेत काय?

vikrammadhav's picture

10 Aug 2016 - 10:37 pm | vikrammadhav

13 भाग आहेत .. मी पण आजच पहिले आणि वाचायला सुरुवात केली ...खूप सोप्या भाषेत माहिती दिलीय !!!