एका गारुड्याची गोष्ट ६: नागपंचमी चे विदारक सत्य !

जॅक डनियल्स's picture
जॅक डनियल्स in जनातलं, मनातलं
11 Aug 2013 - 5:54 am

एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद !
एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला !
एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ !
एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे !
एका गारुड्याची गोष्ट ५: सापांची ओळख- नाग.

आधी मी नागाच्या बद्दल असलेल्या अंधश्रद्धा आणि माझे अनुभव याबद्दल लिहिणार होतो पण आजच (रविवारी ११ ऑगस्ट) नागपंचमी आहे. त्यानिमित्ताने हजारो नाग भारतभर क्रूर पणे पकडले जातील आणि त्यांना नंतर हालहाल करून मारले जाईल- त्या सगळ्या राजबिंड्या नागासाठी माझा श्रद्धांजली लेख !

नागपंचमीच्या पारंपारिक इस्टोरीमध्येच नागाचा संहार प्रत्येकाच्या मनावर लहानपणापासून बिंबवला जातो. "एक 'काळा' भुजंग नाग ,'काळ्या' डोहात राहत असतो, आणि त्याच्या 'काळ्या' विषाने ते पाणी विषारी होते, त्यामुळे माणसे-जनावरे 'काळी-निळी' होऊन मरतात आणि मग श्रीकृष्ण येऊन त्याला पायाखाली तुडवून मारून टाकतो."

या इस्टोरी मध्ये नागच का, कुत्रा-मांजर का नाही? कारण नागाने मनुष्यजातीला आदिम काळापासून टक्कर दिली आणि त्याने पाळीव व्हायचे नाकारले. तिकडेच त्याचे चुकले, त्याने मनुष्यजातीचा इगो दुखावला. सद्दाम,गडाफी पाळीव होत नाही म्हणल्यावर महासत्तेने आधी त्यांच्या मिडीया मधून त्यांच्या वर गरळ ओकली, मग त्यांच्या लोकांना फितूर केले आणि मग शेवटी त्यांचा खात्मा केला. तेच आपल्या पूर्वजांनी केले, नागाबद्दल अंधश्रद्धाने भरलेल्या गोष्टीलिहून त्याची निगेटिव्ह पब्लिसिटी केली आणि मग त्याने काम नाही झाले म्हणून दिसेल तिकडे ठेचला.

अश्या अनेक गैरसमजुतीतून आपल्याला लहानपाणी शिकवण मिळते की 'दिसला नाग की ठेचा'. तेच सगळे करत असतात, त्यात काही चुकीचे मला वाटत नाही,प्रत्येकाला स्वरक्षणाचा अधिकार देवाने दिला आहे.(माणूस फक्त तो कसापण वापरतो की गोष्ट वेगळी..)इकडे मिपावर किंवा सहकारनगरच्या इमारतीमध्ये बसून मला सर्पमित्राच्या गोष्टी करणे सोपे आहे, पण गरीब शेतकऱ्याचा किंवा आदिवासींचा विचार करून बघा, 'जमिनीवर झोपलेले कुटुंब- घरात कंदील- नागाचे अंधारातले फुत्कार'!

कोणेएकेकाळी, गावातल्या बायका शेतावरच्या वारूळावर जायच्या आणि नागाची पूजा करायच्या, त्याला दुध-बत्ताष्याचा नैवद्य दाखवायच्या (दुध तोंडात तुंबवायच्या नाहीत !). ही पद्धत चांगली होती, त्यानिमित्ताने लोकांना नागाबद्दल आदरभाव आणि निसर्गाबद्दल जाण निर्माण व्ह्यायची. आत्ताच्या काळची नागपंचमी म्हणजे सुवासिनी बायका नागाच्या तोंडात दुध तुंबवून त्याची उत्तरपूजा बांधतात.

हळूहळू गावाबाहेरची नागाची वारुळे बिल्डर च्या घशात गेली आणि मग त्याच्या जागी 'सन सिटया' उभ्या राहिल्या. मग आपल्या सुपीक-स्वार्थी मेंदूचा उपयोग करून, नागपंचमीला 'घरपोच नाग' सेवा चालू झाली. या सेवेचे एकमेव पुरवठादार म्हणजे 'धंदेवाईक गारुडी'! या धंदेवाईक गारुडींना 'नागाची-सापांची काही माहिती नसते, त्यांचा उद्देश म्हणजे नाग पंचमीच्या आधी २ महिने नाग पकडायचे किंवा खऱ्या गारुड्याकडून विकत घ्यायचे.( 'खरे गारुडी' - आपल्या नागला पोटच्या पोराप्रमाणे जपतो, त्याची काळजी घेतो. त्यांच्या कडे जे वडिलोपार्जित ज्ञान असते,ते कुठल्यापण सर्पतज्ञाला तोंडात बोटे घालायला लावेल. त्यांना नागांची निवासस्थाने माहित असतात, तसेच नागाने टाकलेली कात, जमिनीवरील नागाचा ठसा, वाकलेले गवत यावरून ते माग काढत जातात. नागला कसे खेळवायचे माहित असल्याने ते नागाचे हाल करत नाहीत.आत्ताच्या काळात खरे गारुडी पण पोटापाण्यासाठी धंदेवाईक गारुडी बनत आहेत.)

माणूस हा फार भित्रट प्राणी आहे, त्याच भीतीपाई, हे धंदेवाईक गारुडी नागाचेहालहाल करतात. शाळेतल्या मारामारी मध्ये ज्यांनी दातावर बुक्की खाल्ली असेल त्यांना डोक्यात चमकणाऱ्या ताऱ्यांची कल्पना असेल. इकडे तर बिचाऱ्या नागाचे सुरीने किंवा दगडाने आपटून दात तोडले जातात. ही तुनळी बघा म्हणजे समजेल खरा थंड रक्ताचा खुनी कोण आहे ते...
थंड रक्ताचा खुनी !

जे थोडे कुशल असतात ते नागाच्या विष ग्रंथी जाळतात. खिळ्यांच्या मध्ये टुबचे रबर लावून नागाचा जबडा फाकवून ठेवतात आणि मग विषाच्या पिशव्या काढून टाकतात, किंवा जाळून टाकतात. हा फोटो ब्राऊन स्नेक चा आहे पण याच पद्धतीने विषग्रंथी जाळल्या जातात.
विष ग्रंथी शस्त्रक्रिया.

आधीच्या भागात लिहिल्याप्रमाणे विष हे नागाच्या पाचकसंस्थेचा अविभाज्य घटक असते,तेच नसल्यामुळे नाग काही खाऊ शकत नाही आणि शेवटी मरण पत्करतो. आपण माणसे जगायची ५० वर्ष झाली तरी बॉडी मेंटेन करण्यासाठी लाख लफडी करतो मग त्यामध्ये वाघाच्या हाडाच्या औषधापासून ते आग्रावरून-प्रवास सगळे आले. आपला मेंदू मोठा म्हणजे आपण जास्त हुशार, जास्त शक्तिमान म्हणून आपण आल्या अकलेचा उपयोग नागाला हालहाल करून मारायला करतो. मांजर मारल्यावर सोन्याची मांजर काशीला अर्पण करायची असते हा जर नियम नागासाठी लागू केला तर $ चा भाव परत कमी होईल. ;)

ज्यांना ही क्रूर शस्त्रक्रिया जमत नाही ती माणसे दाभण घेऊन नागाचे तोंड शिवून टाकतात. या फोटो मध्ये बघा, टाके घालून तोंड शिवून टाकले आहे.

शिवलेले तोंड.

तोंड शिवलेला नाग.

करोडो वर्षापासून नाग या पृथ्वीवर आहे, अनेक आपत्तींना तोंड देउन, स्वतः मध्ये तसे अनुरूप बदल घडवून त्याने आपले अस्तिव टिकवून ठेवले आहे पण फक्त या माणूस या आपत्ती पुढे तो काही करू शकला नाही. "ग्रेट पावर कम्स विथ ग्रेट माजुरडानेस" या उक्तीप्रमाणे तोंड शिवलेला,विषाच्या ग्रंथी जाळलेल्या असाहाय्य नाग पुजेसाठी आणला जातो. 'त्याचे डोके काय दुधात बुडवतात, त्याच्या फण्यावर हळद-कुंकू काय वाहतात' इ. हे का फक्त तर आपली स्वतः ची भरभराट व्हावी.(कुठल्याही पूजेचे कानक्लुजन तेच असते फक्त एक्सपरीमेंट च्या पद्धती बदलतात!)करा ना पूजा, पण तुम्हाला त्यासाठी खऱ्या नागाचा बळी द्यायची काय गरज आहे, इतरवेळी दगडात देव शोधणारे आम्ही या नागाच्या वेळी फक्त माती खातो.

दुध !

दुध फुफ्फुसात गेलेला, शिवलेल्या जखमेवर कुंकू लावलेला नाग शेवटी माळरानावर सोडून दिला जातो. घारी, गरुड याच्याकडून त्यांचा मृत्यू झाला तर त्यांचे सुदैव नाही तर हळूहळू शक्ती कमी होत जाते आणि शेवटी या राजबिंड्या नागाचा मुंग्या लागून मृत्यू होतो.

नागपंचमीच्या आधी याची मोठी बाजारपेठ पश्चीम बंगाल आणि राजेस्थान मध्ये भरते त्यातून पूर्ण भारतामध्ये हजारो नाग दरवर्षी पाठवले जातात. तरी हल्ली सर्पोद्यान सारख्या संस्था जनजागृतीचे काम जोमाने करत आहेत, त्यामुळे नागपंचमी च्या दिवशी धंदेवाईक गारुड्यांचा धंदा थोडा कमी झाला आहे. तरी पण पण जो पर्यंत आपल्यावरचा अंधश्रद्धेचा प्रभाव कमी होणार नाही तो पर्यंत हे निष्पाप मृत्यू असेच चालू राहणार. तुम्ही विचार करा- तुम्ही नागपंचमीला खऱ्या नागाची पूजा केली तर तुम्ही त्यानिमित्ताने त्याच्या होणाऱ्या मृत्यूला तुम्हीच जवाबदार असता, खऱ्या नागाची डिमांड थांबली तर सप्लाय बंद पडेल.

"उल्का कोसळल्यामुळे डायनासोर नामशेष झाले तसे नागपंचमीमुळे नाग नामशेष न होवो", हीच नागपंचमीच्या निमित्ताने प्रार्थना !

(या लेखातले सर्व फोटो अंतरजालावरून घेतले आहेत.त्यांना कुठल्या पद्धतीने बदलण्यात आले नाही.)

संस्कृतीसमाजजीवनमानशिक्षणविचारअनुभवमतमाहिती

प्रतिक्रिया

विप्लव's picture

10 Aug 2016 - 10:58 pm | विप्लव

कसल भयानक आहे हे बापरे

अंतरा आनंद's picture

10 Aug 2016 - 11:02 pm | अंतरा आनंद

खूपच भयानक प्रकार आहे.
लक्षात आली नव्हती ही लेखमाला. आता सगळे भाग वाचते.

मयुरा गुप्ते's picture

11 Aug 2016 - 1:15 am | मयुरा गुप्ते

हि कुठली संस्कृती जोपासतात? एव्ह्ढ्या निर्दय पातळीवर उतरुन नक्कि काय साधते? विदारक, अमानुष आहे हे पण तरीही हे चालुच आहे.. कायद्याच्या बडग्यापेक्षा अंधश्रद्धाचा बडागा जास्त आहे.
खूप उद्वीग्न करणारं आहे सगळं.

--मयुरा

जॅक डनियल्स's picture

30 Aug 2016 - 7:56 am | जॅक डनियल्स

हो, पण आता थोडे थोडे कमी होत आहेत हे प्रकार. सोशल मिडियामुळे थोडी थोडी मदत होते आहे. महाराष्ट्र मध्ये कात्रज सर्पोद्यान सारख्या संस्था खूप चांगल्या काम करत आहेत त्यामुळे गाव-गावात कार्यकर्ते तयार झाले आहेत.

आज नागपंचमी,म्हणून धागा वर काढला