अंड्याचे फंडे ६ - शॉपिंग मॉल

साळसकर's picture
साळसकर in जनातलं, मनातलं
21 Apr 2013 - 3:06 pm

अंड्याने तिसर्‍यांदा पलटून पाहिले. अन खात्री केली की ती पुतळाबाईच आहे. फसलोच जरा, पण अंड्याची फसायची ही काही पहिलीच वेळ नव्हती. बरेचदा असे होते ना, मोठमोठ्या मॉलमध्ये फिरताना, कृत्रिम चेहर्‍यांच्या गर्दीमध्ये, एखादा टवटवीत चेहरा उठून दिसावा. आपला चेहरा हरखून यावा, पण निरखून पाहता तो कपड्यांचे प्रदर्शन मांडण्याकरता उभारलेला मानवी पुतळा निघावा. एखाद्या मेनकेचा असल्यास एवढा कमनीय बांधा निर्जीव असल्याची हळहळ वाटावी अन मदनाचा निघाल्यास पुतळादेखील आपल्यापेक्षा रुबाबदार दिसतो कसा याची जळजळ वाटावी.

थोड्यावेळासाठी का होईना त्या अत्याधुनिक अन फॅशनेबल वस्त्रांनी सजलेल्या मॉडर्न मेनकेला जिंवत कल्पले आणि तिथून निघणार इतक्यात दादाची हाक ऐकू आली. अरे हो, दादा इथे कसा काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल नाही.. तर दादाच नाही वहिनी देखील सोबतीला होत्या. अंड्याच्या दादा वहिनींची दर दुसर्‍या महिन्याला ‘अन्न-वस्त्र-निवारा’ पैकी ‘वस्त्र’ या गरजेची पुर्तता करण्यासाठी जोडीने अश्या मॉल्सची भटकंती चालूच असते. हा अंड्या त्यांना, खरे तर दादालाच सोबत करायला म्हणून त्यांच्याबरोबर फिरतो, पण स्वतासाठी म्हणून काही घेत नाही. कारण अंड्याचा सरळ हिशोब आहे, कपडेखरेदी नेहमी फुरसतीने वेळ काढूनच करावी, घाईगडबडीचा हा खेळ नाही. जसे एखादी कार घेताना, घर घेताना आपण सावधगिरी बाळगतो तेवढाच चोखंदळपणा कपडे घेताना दाखवा. भले तुमच्याकडे कितीही पैसा उतू का जात असेना, वा पैश्याची तंगी का असेना, निव्वळ लज्जानिवारणाला काहीतरी घ्यायचेय म्हणून घेऊ नका राव. तुमचे कपडे हेच तुमच्या व्यक्तीमत्वाचे फर्स्ट इम्प्रेशन असते आणि या धावपळीच्या युगात जिथे पहिल्या नजरेतच लोकांना शॉर्टलिस्ट केले जाते तिथे समोरच्याने तुम्हाला दुसरा चान्स दिलाच नाही तर तेच लास्ट इंप्रेशन होऊ शकते.

.....तर दादाची हाक म्हणजे नक्कीच वहिनींचे काही सिलेक्टेड कपडे घेऊन ट्रायल रूमच्या दिशेने प्रस्थान झाले असणार. अन दादा आता सुटलो एकदाचे म्हणत मला बोलावत असणार. बिचारा तो तरी काय करणार, बायकोच्या बरोबरीने खरेदीला जावे तरी त्रास अन न जावे तर खिश्याला धोका. शेवटी आपण उच्च मध्यमवर्गीयांना आर्थिक फटका पडण्यापेक्षा दगदगीचा फेरफटका केव्हाही परवडला. वहिनी जेव्हा ट्रायल घेण्यासाठी म्हणून पाचपन्नास कपडे निवडतात, तेव्हा कुठे दादाची या वहिनी कपडेवाहिनी’च्या माध्यमातून सुटका होते. अर्थात, हे ही नसे थोडके, कारण अश्या बरेच जोड्या आजूबाजुला दिसतात ज्यात "ती" ट्रायल घ्यायला आत गेली असताना "त्या"ला बाहेर उभे राहावे लागते. मग ती एकेक कपडे बदलून बाहेर येत त्याला दाखवणार अन तिचा तो लांबूनच कसे दिसते हे सांगणार. वरवर पाहता हे सोपे वाटले तरी फार जोखमीचे काम असते राव. तिचे ते दहाबारा कपड्यांमध्ये दिसणारे वेगवेगळे रूपडे लक्षात ठेवून नंतर मग कश्यात ती छान दिसते अन कश्यात ध्यान दिसते हे त्याला सांगायचे असते. त्यातही त्याची आणि तिची मतं जुळली तर ठिक, अन्यथा परत वादाला आमंत्रण आहेच.

हे सारे पाहता, या लेडीज ट्रायलरूममध्ये आरसे नसतात का राव, असा प्रश्न अंड्याला नेहमीच पडतो. खरे तर कित्येकदा तिला समजलेच नसते की तिला आपल्या आवडीचे कपडे घ्यायचे आहेत का त्याच्या.. कि या आधी आपल्या आवडीचे कपडे घालणार्‍या तिला आता त्याला आवडतील असे कपडे घालायचे असतात, हे तीच जाणे..

मागे अंड्याने अशीच एक जोडी पाहिली होती, ज्यात तिचा तो चक्क दोन्ही हातांची बोटे वापरून प्रत्येक ड्रेसला दहापैकी गुण देत होता. कोणाचे काय तर कोणाचे काय, पण आमच्या दादाने यातून सुटका मिळवली ती अशी, की वहिनी ट्रायल रूमच्या बाहेर यायची पण या महाशयांचे ध्यान कुठेतरी भलतीकडेच. तिथे त्या सर्वांसमोर शुकशुक करण्याचीही सोय नसल्याने शेवटी वहिनीनेच त्याला आपल्याबरोबर ट्रायलरूमकडे न्यायचा नाद सोडला.

......बाकी कोणी काही म्हणा, मुलींची हि ट्रायल घ्यायची सवय केव्हाही चांगलीच, जी मुलांमध्ये तुलनेने कमीच आढळते. अंड्या मात्र कोणताही कपडा ट्राय केल्याशिवाय घेत नाही. भले एखादे शर्ट हॅंगरवर चांगले का दिसत असेना, ते घातल्यावर तुम्ही स्वत: हॅंगर दिसू शकता. पॅंट बाबत म्हणाल तर तिच्या लांबी रुंदी अन फिटींगला अनन्यसाधारण महत्व आहे. एखादे पादत्राण खरेदीच्या वेळी निव्वळ चालून बघणे पुरेसे असते पण पॅंट घेताना मात्र चालून बसून उठून, वेगवेगळ्या पोजिशन अन वेगवेगळ्या अ‍ॅंगलने न्याहाळल्याशिवाय ती कधीच घेऊ नये. अंड्या तर साधा रुमाल घेतानाही त्याच्या चार प्रकारे घड्या घालून बघतो आणि मगच काय ते ठरवतो.

आता विषय निघालाच आहे, तर खरेदीसाठी आणखी ही काही टिप्स देईन म्हणतो हा अंड्या तुम्हाला.
पहिली म्हणजे दादावहिनीच्याच अनुभवावरून, जेव्हा स्वत:साठी म्हणून कपडेखरेदी करायची असेल तेव्हा चुकूनही बायको, प्रेयसी किंवा खास मैत्रीण असे नाजूक नातेसंबंध राखून असणारी कोणतीही स्त्री बरोबर नेऊ नका. बहीण असल्यास हरकत नाही, कारण ती कधीही आपल्या वैयक्तिक आवडीत ढवळाढवळ न करता जमल्यास प्रामाणिक मतच देते.
दुसरे म्हणजे अमुक तमुक रंगाचाच कपडा घ्यायचा आहे असे कधीही ठरवून जाऊ नका, एकवेळ अमुकतमुक रंगाचा कपडा घ्यायचाच नाही असे ठरवून गेल्यास हरकत नाही.
एखाद्या दुकानात जाऊन तिथे टेबलवर ढिगारा करून बघण्यापेक्षा दूरवरून फिरता फिरता सहज शोकेस किंवा हॅंगरला लटकवलेल्या कपड्यांवर नजर टाका, जे त्या कपड्यांच्या भाऊगर्दीतही पटकन नजरेत भरेल तेच आपल्या आवडीचे.
दुकानदाराला त्याचे मत स्वत:हून कधीही विचारू नका. तो स्वताहून जी बडबड करतोय त्यावर तर कधीच डोळे झाकून विश्वास ठेऊ नका. बरेचदा त्यांना न खपणारा माल कोणाच्या तरी गळ्यात मारायचा असतो म्हणून ते चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगले बोलतात. बरेचदा असे दुकानदार आपला विश्वास जिंकण्यासाठी म्हणून मुद्दामहून स्वत:च आपल्याकडचे एखादे कापड खराब प्रतीचे आहे असे सांगतात. अश्यावेळी गहिवरून न जाता शांत डोक्याने त्यामागचा त्यांचा डाव लक्षात घ्या.

या दुकानदारांच्या बडबडीवरून आठवले, यांना टाळण्यासाठीच म्हणून हल्ली मॉलमध्ये शांतपणे कपडे न्याहाळत फिरणे बरे वाटते. खरे तर यातूनच विंडो शॉपिंगची कल्पना पुढे आली असावी. शिरलोयच दुकानात तर घेतलेच पाहिजे असे काही दडपण नसले की कसे जरा खुलून खरेदीचा आनंद लुटता येतो नाही. पण कधी कधी हे सुख हिराऊन घ्यायला ही कोणीतरी कडमडतोच. आजचेच घ्या ना. दादावहिनीला एकटे सोडून अंड्या स्वत:च्याच धुंदीत रॅकवर ठेवलेले कपडे वरखाली करत, पाश्चात्य संगीताच्या मंद तालावर सहज ठेका धरलेली आपली पावले नाचवत असताना अचानक पाठीमागून आवाज आला, "मे आय हेल्प यू सर?". वळून पाहिले तर टापटीप गणवेषातील एक सेल्समन हुकुम मेरे आकाच्या आविर्भावात उभा. पटकन काय बोलून त्याला कटवावे हे थोडावेळ न समजल्याने भांबवायलाच झाले. माझ्या याच अवस्थेचा फायदा घेऊन मग त्याने मोठमोठ्या ब्रॅंडची नावे घेत आणखी एक-दोन ईंग्लिश वाक्ये झाडली. उत्तरादाखल अंड्याने ईंग्लिशमध्ये एखादे वाक्य उच्चारले अन जे नेहमी होते तेच झाले. त्याने स्वत: मराठी सुरू केले. कोण म्हणते की मराठी मुलांना नोकर्‍या नाहीत, समोरची नोकरदार मुले मराठी आहेत हे आपल्यालाच ओळखता येत नाही एवढेच. बरे तो होताही इतका स्मार्ट की त्याच्यासमोर अंड्यालाच दबल्यासारखे वाटले. थोडावेळ मग आपण काय बघायला आलोय हेच न सुचल्यासारखे झाले. बरे आता त्याच्याच मॉलमध्ये येऊन त्यालाच "जा बाबा आता" कसे बोलायचे हे देखील अंड्याला समजत नव्हते. खरी पंचाईत अशी झाली होती की अंड्याला सवय आहे, प्रत्येक आवडलेल्या कपड्याची किंमत लागलीच चेक करायची, अन नेमके हेच त्याच्यासमोर करायला संकोच वाटत होता. या प्राईज टॅगवरून आठवले जेव्हा एखाद्या आवडलेल्या पण महागड्या वाटणार्‍या कपड्याच्या किंमतीचा लेबल पटकन सापडत नाही तेव्हा या अंड्याची जरा धांदलच उडते. मग जवळच्या एखाद्या तश्याच कपड्याची किंमत बघून अंदाज लावायचा प्रयत्न केला जातो पण जवळपास दिसणार्‍या एखाद्या फिरत्या विक्रेत्याला विचारायला किंचित संकोचच वाटतो. अश्यावेळी होते काय तर एखादी वस्तू आपल्याला आवडली आहे हे आपल्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत असते मात्र तोच चेहरा किंमत खिश्याला परवडत नसल्याचे आपल्याही नकळत कबूल करत असतो. चेहर्‍यावरचे हे भाव लपवणे देखील एक कलाच असते राव.

कलेवरून आठवले, शॉपिंग हे एक शास्त्र असेल तर बार्गेनिंग एक कलाच म्हणायला हवी, जी मला जराही अवगत नाही. त्यामुळेच मला मॉलमध्ये शंभरेक रुपये जादा खर्च करून का होईना, फिक्सड रेट मध्ये खरेदी करणे परवडते. किमान फिक्सड लिमिटमध्येच फसवलो गेलोय याचे समाधान मिळते. अन्यथा पाचशे रुपयांचा पट्टा समोरच्याला चारशेला मागावा आणि त्याने काहीही घासाघीस न करता हसत हसत देऊन टाकावा, की मग आपल्याला नक्की किती रुपयांचा गंडा पडलाय याच हुरहुरीत रात्र निघावी अन प्रत्येकवेळी तो पट्टा घालताना, तू नक्की कितीचा आहेस रे? हे त्यालाच विचारावेसे वाटत राहावे.

बाकी या फिक्सड रेटमध्येही मग कधीतरी सेल लागतो आणि एकावर एक किंवा दोनावर तीन फ्री देणे या लोकांना कसे परवडते हे अंड्याला आजवर न उलगडलेले कोडे.

खरे तर या कमीपणा वाटणे वगैरे भावना आपल्याच मनात निपजत असतात, पण या मोठमोठ्या शॉपिंग मॉल्समधील काही चाणाक्ष सेल्समन मात्र आपले गिर्‍हाईक अचूक ओळखण्यात तरबेज असतात. समोरचा माणूस फाटका असला तरी त्याला हे त्याची जाणीव करून देत नाहीत. महागड्यातील महागड्या वस्तू देखील असे काही बिनदिक्कतपणे दाखवतात की त्यांच्या या अश्या वागण्याने आपल्यालाच आतून कुठेतरी सुखावल्यासारखे होते, की राव याने आपल्याला एवढ्या महागड्या वस्तू वापरणारा हाय प्रोफाईल माणूस समजले. असेही काही लोक असतात ज्यांना कमीपणा वाटतो की महाग आहे, परवडत नाही, असले कारण सांगून नकार देणे. तर असे मिशिला तूप लावत फिरणार्‍यांना देखील हे विक्रेते पटकन हेरतात. यांची काही ठरलेली शब्दफेक म्हणजे, ये कपडा पहनोगे ना साहब तो एकदम रिच (श्रीमंत) लगोगे, चार लोग पूछेंगे कहासे लिया.. हा बघा भाऊ एकदम ईंग्लिश कलर (हा नक्की कुठून आला देव जाणे), भले कापड देशी खादीचे का असेना, कलर ईंग्लिश आहे ना, तर मग झालं.. ईंग्लिश अन इंपोर्टेड म्हटलं की सारेच भारी.. ५० रुपयांची कॉफीही मग स्वस्तच वाटते.

तर कधी या उलट ही अनुभव येतात. मागे अश्याच एका कपड्यांच्या दुकानात हा अंड्या गेला होता. तिथे रॅकवरचे एक शर्ट आवडले. मी ते दाखवा म्हणून विनंती केली, तर ते महाग आहे, अमुक तमुक किंमतीचे आहे, थोडक्यात तुम्हाला परवडणारे नाहिये अशी थोबाडीत मारल्यासारखी समोरून प्रतिक्रिया आली. खरे तर त्याने जी किंमत सांगितले होती ती तशी थोडीफार माझ्या बजेटच्या वरच होती, नाही असे नाही. पण मी दुखावलोच जरा. बरोबरचा माझा मित्र तर दुकानमालकाच्या कानावर घालणार होता हे, पण मीच त्याला थांबवले. तरी पुर्ण विनम्रतेने त्या विक्रेत्याला सांगावेसे वाटले, की बाबा रे, तू आहे तिथेच राहणार, यापेक्षा जास्त प्रगती नाही करू शकणार.

असो, का कुणाचे वाईट चिंता. पण आता त्या पाठीमागे उभ्या असलेल्या सेल्समनला कटवण्यापेक्षा अंड्याने स्वताच तिथून काढता पाय घेणे उचित समजले. शर्ट-पॅंट पुन्हा कधी तरी बघू म्हणत टीशर्ट कुठे मिळतील हे त्यालाच विचारून तिथून निघालो. हो हो, हे त्यांनाच विचारणे गरजेचे असते हां. एखादा पत्ता शोधताना आपण रस्त्यावरच्या कोणालाही विचारतो तसे इथे चालत नाही. इथे मॉलमध्ये तुम्ही असे कोणालाही विचारल्यास त्या समोरच्या व्यक्तीला आपण सेल्समन आहोत की काय या विचाराने अपमानित झाल्यासारखे वाटते, कित्येक लोकं चिडतातही. भले मग एखाद्याची मिळकत त्या सेल्समनपेक्षा कमी का असेना, भले मग ते सेल्समन त्या लोकांपेक्षा कैकपटीने स्मार्ट का असेनात. कोणत्या कामाला छोटे समजू नका असे वरवर जरी आपण बोलत असलो तरी कोणी आपल्याला गैरसमजाने का होईना सेल्समन समजले तर कित्येकांना याचा रागच येतो. बाकी हॉटेलमध्ये एखाद्याला चुकून वेटर समजणे हा तर त्यापेक्षा डेंजर प्रकार राव. पण त्यावर पुन्हा कधीतरी..

तर, टी-शर्ट विभाग हा मॉलच्या दुसर्‍या मजल्यावर आहे असे समजताच जवळच पार्क केलेली कांदाबटाट्याच्या झोळीसारखी बास्केटबॅग उचलून अंड्याने त्या दिशेने कूच केली. अरे देवा, पण जसे त्या मजल्यावर प्रवेश केला तसे दोनचार सेंट विकणारे बाटल्या फुसफुसवतच अंगावर आले. त्यांना कसेबसे टाळले तसे घड्याळ, गॉगल विकणारे सामोरे आले. त्यांना पटकन टाळणे जमले नाही म्हणून किंमतींवर सहज नजर टाकली अन अंड्या चक्रावूनच गेला. वाटले त्या विक्रेत्याला हातातले घड्याळ दाखवावे आणि स्पष्टच सांगावे, बाबा हे बघ, मी या बजेटमध्ये घालतो. यातच असेल तर दाखव किंवा ते ही नको दाखवूस, अजून दोन वर्षे मी हेच चालवणार आहे. आमच्यात कपड्यांसारखे चार-चार घड्याळ बाळगायची पद्धत (खरे तर ऐपत) नाही आहे रे.

अर्थातच, त्यालाही पाठीमागे सोडून अंड्याने आता इथे तिथे लक्ष न देता जे घ्यायची शक्यता आहे अश्या टी-शर्टवरच लक्ष केंद्रीत केले. वर्तुळाकार स्टॅंडला लटकावलेल्या एकेका टी-शर्टला हातानेच स्पर्शून स्टॅंड बाय स्टॅंड पुढे जात असता मी कधी लेडीज सेक्शनमध्ये शिरलो हे माझे मलाच समजले नाही. तिथलेही टी-शर्ट की टॉप काय ते आम्हा मुलांच्या कपड्यांपेक्षा दिसायला फारसे वेगळे असे नसल्याने अंड्या ते चाळून बघत असतानाच तेथील एक सेल्सगर्ल पटकन पुढे येऊन म्हणाली, "सर, ये लेडीज के लिये है" ... "ऑं" ... "सर ये लेडीज सेक्शन है, जेन्टस के लिये उस तरफ...." अंड्याला एकदम खजील झाल्यासारखं वाटले. आजूबाजुला नजर भिरभिरवली तर खरंच की, इतर स्टॅंडसना मुलींचेच ड्रेसेस लटकवले होते. समोर अजूनही ती मुलगी माझ्याकडे बघत, स्मितहास्य करत उभी होती. जवळपासच्या चार प्रश्नार्थक नजराही, "कुठून कुठून येतात ही असली लोक?" अश्या मुद्रेने माझ्याकडे लागल्या होत्या. प्रसंगावधान राखून मी उत्तरलो, "हो हो तर, पता है मुझे. मै अपने गर्लफ्रेंड के लिये ही देख रहा था..." बस्स एवढे बोलून अंड्या तिथून सटकला ते पुन्हा मागे वळून काही पाहिले नाही. कारण अंड्या कुठल्याही अ‍ॅंगलने गर्लफ्रेंडधारी वाटत नसल्याने थाप पचणे जरा अवघडच होते. तसेच तेथील टी-शर्ट अंगाला लाऊन समोरच्या आरश्यात न्याहाळताना त्यांनी मला पाहिलेले. परीणामी पाठून दोन चार फिदीफिदी हसल्याचे आवाज ऐकू येत होते, पण अंड्या मात्र त्याकडे लक्ष न देता फिरत्या जिन्यावरून पटपट पाऊले टाकत उतरत होता...

- अंड्या उर्फ आनंद

--------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------

अंड्याचे फंडे १ - रायटर अंड्या - http://misalpav.com/node/24341
अंड्याचे फंडे २ - फर्स्ट क्लास - http://misalpav.com/node/24353
अंड्याचे फंडे ३ - छंद - http://misalpav.com/node/24356
अंड्याचे फंडे ४ - फेक आनंद - http://misalpav.com/node/24372
अंड्याचे फंडे ५ - शर्यत - http://misalpav.com/node/24449

--------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------

समाजजीवनमानराहणीमौजमजाप्रकटनविचारप्रतिसादआस्वादलेखअनुभवसल्लामाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

प्राईस टॅग बघायला लाज कसली? आणि कशाला? आपण आपल्याच ४ दिडक्या टाकून विकत घेणार ना? बिन्धास्त बघायची किंम्मत! नसली तर मुद्दाम नेऊन विचारायची सेल्समधल्या व्यक्तीला. :)

तसेच तेथील टी-शर्ट अंगाला लाऊन समोरच्या आरश्यात न्याहाळताना त्यांनी मला पाहिलेले. परीणामी पाठून दोन चार फिदीफिदी हसल्याचे आवाज ऐकू येत होते

समानतेका जमाना है, असं नाय का सांगितलंत? :P

होतं हो.. माझ्यासारख्या गरीब बावळट अन भोळ्याभाबड्या अंड्याशी असंच सारं होतं :(

लॉरी टांगटूंगकर's picture

21 Apr 2013 - 11:34 pm | लॉरी टांगटूंगकर

झकास निरीक्षणे सगळीच!!! अन् जवळपास सगळं माझ्याबाबतीत पण घडलेलंय.
सेल्समन अन् वेटर समजणे पण तसं सामान्य आहे हे वाचून आनंद वाटला, म्हणजे मी लोकांना समाजत नाही पण लोकं मला समजतात :) .
सेल्समन लोकं बाकी खरंच डेंजर. जर का इलेक्ट्रॉनिक्स शो रूम असेल तर मग त्यांना येणार नाहीत असे प्रश्न विचारता येतात म्हणजे ते गप्प होतात. मी तर आता सेल्समनला बाबारे मला काहीही घ्यायचं नाहीये, मी विंडो शॉपिंग करायला आलोय असं सरळ सांगून टाकतो, बऱ्याचदा ते परवडतं.

साळसकर's picture

22 Apr 2013 - 12:24 pm | साळसकर

हाईला... असे सरळ विंडो शॉपिंगच करायला आलोय हे सांगितल तर चालतं ??

लॉरी टांगटूंगकर's picture

22 Apr 2013 - 2:04 pm | लॉरी टांगटूंगकर

परवा एमजी रोड वर बोसच्या दुकानात घुसलेलो. हेडफोन बघणं चालू असताना सेल्समन आली अन् बडबडायला लागली. म्हणलं मी सिरीअस कस्टमर नाहीये, नुस्त बघायला आलोय. तुझा वेळ घालवू नको तर काय जीवघेणं हसली राव...

साळसकर's picture

22 Apr 2013 - 3:23 pm | साळसकर

जीवघेणं हसली ... राव सहिये. ;)
आमच्या नशीबात एक सेल्सगर्ल आली ती पण पोपट करून गेली.. :(

अगदी बरोबर.. मी पण हेच करते. मला नॉर्मल शॉपिंग पेक्षा विंडो शॉपिंग जास्त आवडते. सेल्समनला सरळ सांगायचे, मी फक्त बघतीये.. काही लागले तर तुला विचारेल. ;) :D

ह्म्म.. मलाही असंच करायला हवं.. मान्सिकता बदलायला हवी.. मला तर घ्यायचे नसताना जेव्हा अशी विंडो शॉपिंग करतो तेव्हा लांबवरचा सेल्समन सुद्धा लोचटपणे माझ्यावरच नजर ठेऊन आहे असे वाटते.. :(

अजया's picture

22 Apr 2013 - 5:08 pm | अजया

लिहित रहा. मजा येते तुझे फन्डे वाचायला.

मन१'s picture

22 Apr 2013 - 5:11 pm | मन१

अंड्याचे फंडे आवडताहेत.
फक्त दरवेळीच प्रतिसाद देणं जमतं असं नाही.
ही इतरही सर्व अंकांची पोच समजावी.

साळसकर's picture

22 Apr 2013 - 9:55 pm | साळसकर

धन्यवाद हो,
अन प्रतिसादाच बोलाल तर या मराठी आंतरजाळावर इतके लिहिले जाते की सारे वाचायला वेळ नसतो, प्रतिसाद देणे अंड्याला तरी कुठे जमते सगळीकडे..

पैसा's picture

22 Apr 2013 - 6:29 pm | पैसा

आवडले!

शिल्पा ब's picture

22 Apr 2013 - 10:15 pm | शिल्पा ब

आवडेश. एक्दम खुसखुशीत.
कधीकधी हे सेल्समन/ सेल्सगर्ल/ सेल्सबॉय/ सेल्सआजी अन अजुन जे काय असेल ते लोकं स्वत: ची विकतोय तीच वस्तु घ्यायची ऐपत नसेल तरी जशी काय रोजच वापरतो अशा पद्धतीने बोलतात त्याची गंमत वाटते...कधी वैताग येतो किंवा अगदी काही प्रसंगी किवसुद्धा येते.

राघवेंद्र's picture

23 Apr 2013 - 1:55 am | राघवेंद्र

मित्रा, सर्व भाग एकदमच वाचले. मस्त जमले आहेत. लिहित राहा.

राघवेंद्र

साळसकर's picture

23 Apr 2013 - 4:01 pm | साळसकर

हायला सर्व एकदम माझे मलाच नाही जमणार वाचायला..
बाकी सर्व भागांबद्दल मग एकदमच थॅक्सड राघवदा.. :)

मी-सौरभ's picture

24 Apr 2013 - 7:46 pm | मी-सौरभ

आंद्या : लिखानात मज्जा हाय तुझ्या...
जरा लेखाचं फोर्मॅट्टींग करायचा यत्न करा अजुण मस्त वाटेल वाचायला...

फॉर्मेटींग म्हणजे? नक्की काय?

प्रतिसाद अन सूचनेबद्दल धन्यवाद.

दिव्यश्री's picture

25 Apr 2013 - 3:53 pm | दिव्यश्री

आवडले.......:)
आमच्याकडे मात्र मी ट्रायल रूम बाहेर उभी राहूण आमच्या प्यान्ट्वाल्याना दहापेकी गुण देते....;):D