कलाईगनर

चैतन्य गौरान्गप्रभु's picture
चैतन्य गौरान्गप्रभु in जनातलं, मनातलं
11 May 2012 - 9:44 pm

राजकिय स्थीत्यंतरांचा, किंवा सत्तापालटाचा दांडगा अनुभव असलेलं एकमेव राज्य म्हणजे तामिळनाडू! कधी घवघवीत यशाची शिखरे तर कधी अत्यंत लाजिरवाणे पराभव ही येथील नेत्यांची नियती आहे. दक्षीण किनार्र्यावरच्या या वादळी परिस्थीतीत आपल्या द्रविड मुन्नेत्र कझगम (डिएमके) पक्षाची नाव नेटाने रेटणारे तामीळ राजकारणाचे भिष्म पितामह म्हणजे 'कलाईगनर' मुथुवेल करूणानिधी!

डोळ्यावरचा काळा चष्मा, शुभ्र वस्त्रांवर शोभुन दिसणारी पिवळी शाल, आणि कुठल्याही परिस्थीतीत चेहर्र्यावर कायम ठेवलेलं स्मीतहास्य -- एव्हाना ही करूणानिधींची राजकारणातली छवी बनलेली आहे. मात्र 'कलाईगनर' अर्थात 'कलेचा स्वामी' हे सन्मानाचं बिरूद केवळ राजकारण करून प्राप्त होत नाही. आठ दशकांच्या सक्रिय राजकिय कारकिर्दीबरोबरच करूणानिधींनी आपली कला आणि साहित्य क्षेत्रातली कारकिर्दही जागती आणि वाढती ठेवलेली आहे.

एका दृष्टीक्षेपात बघायचं झाल्यास करूणानिधींनी आजवर शंभराहून अधीक पुस्तकं लिहिली आहेत. यात ललित, कवीता, कथा, कादंबर्र्यांबरोबरच भाषाशास्त्रावरील पुस्तकांचादेखील समावेश आहे. त्यांनी लिहलेल्या नाटकांची संख्या नऊहून अधीक आहे, आणि आजही तामिळनाडूमध्ये या नाटकांचे प्रयोग तुफान गर्दी खेचतात. करूणानिधींनी आजवर ७५ सुपरहिट तामिळ चित्रपटांच्या पटकथा लिहलेल्या आहेत. पटकथालेखनासाठी त्यांना आजवर शेकडो पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. एकाच वेळी राजकारण आणि सिनेमात यशस्वी होणे हे करूणानिधी यांचे वैषिष्ट्य आश्चर्यकारक वाटू शकते. मात्र तामिळ राजकारणात तशी परंपराच आहे. करूणानिधिंचे राजकिय गुरू अन्नादूराई, ज्यांनी द्रमुक पक्षाची स्थापना केली, ते सुद्धा एक उत्तम पटकथालेखक होते. अन्नादूराईंच्या जिवनकालात करूणानिधिंचे सहकारी असणारे आणि त्यांच्या मृत्युनंतर नेतृत्त्वसंघर्षातून अन्नाद्रमुक (ए आय ए डि एम के) ची स्थापना करणारे एम जी रामस्वामी (एमजिआर) हे तामिळ चित्रपटांचे सुपरस्टार होते. सध्या अन्नाद्रमुक च्या अध्यक्षा असलेल्या जे जयललीता यांनी देखील रूपेरी पडद्यावर एक काळ गाजवला आहे.

मुळात तामिळ सिनेमा आणि तामीळ राजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ईथे प्रत्येक नेता अभिनेता बनु शकतो आणि, आणि अभिनेता नेता बनु शकतो. करूणानिधींचं कलाक्षेत्रातलं कर्तृत्त्व केवळ सिनेमाच्या पटकथा लिहण्या पुरतं मर्यादित असतं, तर त्यांना 'कलाईगनर' हे नामाभिधान खचितच प्राप्त झालं असतं. तामिळ भाषा, संस्कृती, आणि तामिळ अस्मीता या विषयावरील करूणानिधींचा व्यासंग त्यांना ईतर नेत्या-अभिनेत्यांपासून वेगळ्या, उच्चासनावर नेऊन ठेवतो.
करूणानिधींचा जन्म झाला तो एसाईवेल्लार या समाजामध्ये. 'एसाई' म्हणजे संगित आणि 'वेल्लार' म्हणजे संवर्धक. कला आणि संगिताचे संवर्धक असलेल्या या लोकांनी कोणे एके काळी 'भरतनाट्यम'चा शोध लावला होता, असं म्हणतात. करूणानिधिंकडे कलेचा वारसा असा शेकडो पिढ्यांपासून चालत आलेला आहे. जात-धर्म किंवा देव या गोष्टी आता मात्र करूणानिधी मानत नाहित. त्यांच्या नावातील एम. म्हणजे मुथुवेल हे त्यांच्या वडिलांचे नाव आहे. आपल्या परिवाराचे 'मारन' हे पारंपारिक आडणावही ते लावत नाहीत. विद्रोही द्रविड विचारांचा हा परिणाम आहे. या विचारांची कास त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी जेष्ट तामिळ नेते अलगिरस्वामी यांचे प्रभावी भाषण ऐकल्यावर धरली.

'द्रविड संस्कृती ही पुरातन काळापासून अस्त्तीत्त्वात होती. आर्यांनी आक्रमण करून द्रविडिय सभ्यतेची कुचंबणा केली. हिंदू धर्मातील कर्मकांड, ब्राम्हणांचा वाढता प्रभाव, आणि धार्मिक विधिंतील फोलपणा यामुळे पुरोगामी अशी द्रविड सभ्यता मागे पडत गेली. त्यामुळे आता अस्त्तीत्त्व टिकवायचे असेल तर ब्राम्हणांचे, आर्यांचे, पर्यायाने उत्तर भारतीयांचे वर्चस्व झुगारून द्यावे लागेल, असा सुरवातीच्या काळातील द्रविड विचार तरूण करूणानिधींवर प्रभाव पाडून गेला. हिंदीविरोधी आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला आणि त्यांची राजकिय कारकिर्दही सुरू झाली. तरूणांची एक संघटना निर्माण करून त्यांनी द्रविड विचाराचा प्रसार करण्याचे कार्य आरंभले. त्यांच्यातील सर्जनशिल लेखक मात्र शांत बसला नाही. एक हस्तलिखित वृत्तपत्र त्यांनी याच काळात सुरू केले. या वृत्तपत्रात त्यांनी 'द्राविडनाडू' (द्रविड राष्ट्र) नावाचा एक अग्रलेख लिहला होता. द्रमुकचे नेते अन्नादूराई यांच्या वाचनात हा लेख आला आणि त्यांनी या तरूण संपादकाला भेटायला बोलावले. करूणानिधींनी पहिल्या भेटितच अन्नादूराईंवर अशी काही छाप सोडली, की पुढे हेच हस्तलिखित वृत्तपत्र 'मुरासोली' हे त्यांच्या पक्षाचे विचारपत्र म्हणुन नावारूपाला आले.

अन्नादूराईंच्या माध्यमातून त्यांना चित्रपटासाठी पटकथा लिहण्याची संधी प्राप्त झाली. राजकुमारी या चित्रपटासाठी त्यांनी पहिल्यांदा लेखणी हाती घेतली, आणि या निमित्ताने त्यांची भेट एम जी रामास्वामी या सुपरस्टारशी झाली. पुढे अन्नादूराई-करूणानिधी-रामास्वामी हे त्रीकूटच तामिळनाडूचे भाग्यविधाते बनले. आज करूणानिधिंचा डिएमके आणि रामास्वामिंनी स्थापन केलेला जयललीतांचा एआयएडिएमके या दोनच पक्षांभोवती तामिळनाडूमध्ये सत्ताकेन्द्र फिरते आहे.
करूणानिधिंनी आपल्या विद्रोही विचारांना आपल्या लेखणिच्या माध्यतातून व्यासपिठ मिळवून दिलं. त्यांनी लिहलेला 'परासक्ती' हा सिनेमा १९५२ साली प्रदर्शित झाला. ब्राम्हणवादावर सोडलेलं हे टिकास्त्र सनातनवाद्यांच्या पचनी पडणारं नव्हतं. मात्र करूणानिधिंनी माघार घेतली नाही. शेवटी चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यामुळे तामिळनाडूमध्ये क्रांती झाली. पुढे अस्पृश्यता, बालविवाह या विषयावरील 'पानम' आणि जमिनदारी आणि महिलांवरिल अत्याचार या विषयांवरील 'थंगरत्नम' हे चित्रपट आले, आणि करूणानिधींची 'समाजसुधारक सिनेमावाला' अशी प्रतिमा तयार झाली. त्यांची नाटकं चित्रपटांच्या पटकथेपेक्षाही अधीक जहाल विचारांनी ओतप्रोत असायची. त्यामुळे अनेकदा ते वादाच्या भोवर्र्यातही अडकले.

मात्र आदर्शवादाविना केलेली कलोपासना म्हणजे छपराविना बांधलेलं घर आहे, असं स्पष्ट मत असलेल्या करूणानिधंनी आजवर आपली कलानिर्मिती द्रविड आदर्शांची जपणुक करतच सुरू ठेवली आहे. मुख्यमंत्रीपदाबरोबरच तामिळनाडुचं सांस्कृतीक खातं, आणि तामिळ भाषेच्या विकासासाठी बनवलेलं खातं त्यांनी स्वतःकडे ठेवलं आहे. पहिल्या जागतिक अभिजात तामिळ संमेलनाचा 'मेगा शो' कोइम्बतूर येथे नुकताच धडाक्यात पार पडला तो करूणानिधिंच्या पुढाकारानेच. देशविदेशातील विद्वज्जन व सामान्यांच्या अलोट गर्दीत हे पाच दिवसीय संमेलन पडले. शहाऐंशी वर्षाचे करुणानिधीं या संमेलनाला सलग पाच दिवस हजर होते. चर्चासत्रातील त्यांचा सक्रिय सहभाग आणि तामिळ भाषा साहित्यातील उत्कृष्ट संशोधकासाठी स्वत:च्या वैयक्तिक निधीतून त्यांनी निर्माण केलेला रोख दहा लाख रुपयांचा पुरस्कार ही त्यांच्यामधील सृजनशिल सहित्यिक आजही तरूण असल्याची पावतीच म्हणावी लागेल.

या बरोबरच कलाईगनर यांची कथा-पटकथा असलेला ७५ वा चित्रपट 'ईल्यानग्यान' हा सुद्धा याच दरम्यान प्रदर्शित झाला. नागपूरमध्ये या चित्रपटाची चमु आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने आली होती. "आजवर करूणानिधिंचा एकही चित्रपट प्लॉप गेला नाही. त्यांच्या लेखणित जादू आहे!" असं त्यांचे दिग्दर्शक क्रिष्णा यांनी अभिमानानं सांगितलं. विषेश म्हणजे १९५७ साली आपली पहिली विधानसभा निवडणुक जिंकणार्र्या करूणानिधीना आजवर निवडणुकीत कधीच पराजय पहावा लागलेला नाही. यावरून राजकारण आणि कलाक्षेत्रात ते अपराजित आहेत, हेच सिद्ध होते.

वैयक्तिक जीवनाच्या स्क्रीन प्लेमधे मात्र त्यांनी तीन विवाहांचा क्लायमॅक्स घडवला. तामिळनाडूतील राजकारणालाही घराणेशाहीचा शाप आहे. त्यातल्या त्यात करूणानिधिंच्या तीन परिवारांची अपत्ये, आणि त्यांचे पुतणे हे सर्व सत्तेतील आपल्या वाट्यासाठी भांडतांना दिसतात. स्पेक्ट्रम घोटाळ्यामुळे त्यांच्या पक्षातील गृहकलह चव्हाट्यावर आले. "पक्ष हाच आपला परिवार आहे', असं म्हणणार्र्या करुणानिधींसाठी हे गृहकलह काही नवीन नाहीत. भारतामध्ये राजकारण नावाच्या चिखलात हात घालणार्र्या प्रत्येकाचेच हात खराब होतात. या हातांकडे बघत आपल्या आयुष्यातली रसिकता गमावून बसणारे अनेक नेतेमंडळी आहेत. मात्र त्यातच गुरफटून न राहता साहित्य आणि कलाक्षेत्रातली आपली वाटचाल गांभिर्याने सुरू ठेवत आपल्या आयुष्याचा हा प्राणवायूचा स्त्रोत सतत जागता ठेवल्यामुळेच करूणानिधी वयाच्या सत्यांशिव्या वर्षीही सस्मीत सक्रिय राहू शकतात. करूणानिधींच्या काळ्या चष्म्याच्या समोर राजकारण आणि भ्रष्टाचाराचं तांडव सुरू असलं तरीही या चष्म्याआड तामिळी स्वप्नांची एक दुनिया वसते आणि ही दुनिया खुपच मनोहारी आहे

कलानृत्यसंगीतकथासंस्कृतीनाट्यधर्मगझलवाङ्मयसाहित्यिकसमाजजीवनमानशुभेच्छा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

11 May 2012 - 10:04 pm | मुक्त विहारि

फार छान...

पुण्याचे वटवाघूळ's picture

11 May 2012 - 10:17 pm | पुण्याचे वटवाघूळ

करूणानिधींविषयी फारसे मत चांगले नसले तरी लेख लिहिण्याची शैली नक्कीच आवडली.

एक सुधारणा: अण्णा द्रमुकचे संस्थापक एम.जी.रामचन्द्रन (एम.जी.आर) होते रामस्वामी नव्हे.

अर्धवटराव's picture

12 May 2012 - 12:45 am | अर्धवटराव

.

अर्धवटराव

JAGOMOHANPYARE's picture

12 May 2012 - 1:08 am | JAGOMOHANPYARE

छान

रणजित चितळे's picture

12 May 2012 - 10:56 am | रणजित चितळे

करुणानिधींबद्दल काही महिती अगोदर होती. आपण त्याच्यात भर घातलीत. लेख फार छान.

राजघराणं's picture

12 May 2012 - 1:13 pm | राजघराणं

सुंदर लेख

एलटीटीई च्या दहशतवाद्यांना शिक्षा देऊ नका असे म्हणणारे हेच ना ते ? देशाच्या माजी पंतप्रधानाला मारण्यात ज्यांचा हात आहे त्याला माफ करा असे हे म्हणतात आणि त्या माणसाचा उदोउदो करणारा लेख तुम्ही लिहिता. श्रीलंका सरकार च्या विरोधात सरकारला भूमिका घ्यायला लावणारे हेच ना. वरचा लेख म्हणजे एकांगी लेख कसा असतो त्याचे बेस्ट उदाहरण आहे.

रणजित चितळे's picture

12 May 2012 - 1:48 pm | रणजित चितळे

साहेब मला नाही वाटत त्यांनी डिएमके चा उदो उदो केला आहे. काय आहे ते सांगितले आहे (मी करुणानिधीचा चाहता नाही). अजून एक गोष्ट ज्या माजी पंतप्रधानाला मारण्यात ज्यांचा हात आहे त्याला माफ करा असे म्हणणारी हा पक्ष आज त्याच पक्षाला जोरदार पाठिंबा देताना व माजी पंतप्रधानांचा पक्ष तो पाठिंबा घेताना आपण सगळे पाहात आहोत. हे तर सगळ्यांना माहितच आहे पण ते हिंदी द्वेष्टे, एथीस्ट आहेत हे सगळ्यांना ह्या लेखानी कळाले.

त्याबद्दलची अनेक कारणे वरील काही प्रतीसादात आलीच आहे.

परन्तु लेख खूप छान आहे. त्यांच्या हिंदीव्देशाबद्दलसुद्धा थोडे लिहायला हवे होत. (बाकी व्देशांबद्दल मोघम का होइना उल्लेख आहेच.)