स्लेजिंग झिंदाबाद

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
23 Jul 2011 - 3:11 pm

अनेक वाईट गोष्टीची सुरुवात चांगाल्यातुन होते म्हणे. उदाहरणार्थ माफिया. माफिया सुरुवातीला शेतकर्यांची संघटना होती. असहाय्य, लुबाडल्या जाणार्या शेतकर्यांनी आपल्या बांधवांच्या हितरक्षणासाठी आणि संरक्षणासाठी सुरुवातीला हत्यार हातात घेतले आणि मग रक्ताची चटक लागलेल्या बाघाप्रमाणे हळुहळु ही प्रामाणिक संघटना गुन्हेगारीकडे वळली. मूळ उद्देश विसरला गेला आणि लोकांना लुटणे हा धर्म बनला. स्लेजिंगचे थोडेफार असेच झाले. सुरुवातीला हा खेळ खेळीमेळीच्या वातावरणातच पार पाडायचा. नंतर स्लेजिंगच्या राक्षसाने उग्र रुप धारण केले.

आंतरराष्ट्रीय राजकारणात उर्मटपणाचा सगळा ठेका अमेरिकेने घेतला आहे. तसा स्लेजिंगमध्ये क्रिकेटजगतात तो ठेका ऑस्ट्रेलिया कडे आहे. क्रिकेट स्लेजिंगमध्ये त्यांची जगन्मान्य आघाडी आहे. इतर देश जवळपासही पोचणार नाहीत. बहुधा बाळ जन्मल्यापासुन यौवनात पोचेपर्यंत भारतात जसे त्याच्यावर १८ संस्कार होतात तसे ऑस्ट्रेलियामध्ये बहुधा बालपणापासुन स्लेजिंगचे संस्कार होत असावेत. तसे आपले श्रीशांत (याच्या नुसत्या नावातच 'शांत'ता आहे) आणि सरदार देखील त्यांना तोडीस तोड आहेत. पण ऑस्ट्रेलियाची गोष्टच वेगळी ते केवळ इशारो इशारो मे किंवा निगाहो निगाहो मे समोरच्याचे मानसिक खच्चीकरण करता. त्यासाठी त्यांना तोड उचकटायची गरज नसते.

पण मुळात या कलेचे उद्गाते म्हणुन त्यांच्याकडे बोट दाखवता येणार नाही. त्याचे सगळे श्रेय ड्ब्ल्यु जी ग्रेस नामक एका दाढीवाल्या डॉ़क्टरकडे जाते. त्याचे तसे अनेक किस्से मशहूर आहेत. एका प्रदर्शनीय सामन्यात महाशय फलंदाजी करत होते. एका नवख्या गोलंदाजाने त्यांना पायचीत करुन वर अप्पील करण्याचे धारिष्ट्य दाखवले. ग्रेस महाशयांनी पंचांनी बोट वर करण्याआधीच शांतपणे निर्णय देउन टाकला: "नॉट आउट. गाढ्वा हे सगळे लोक माझी फलंदाजी बघण्यासाठी आले आहेत. तुझी गोलंदाजी बघण्यासाठी नाही.' एवढे बोलुन डॉक्टर शांतपणे परत खेळायला लागले. ग्रेस काकांची ही सवय बहुधा पंचांनादेखील माहिती असावी आणि त्यांना बाद ठरवण्यास ते पण घाबरायचे. त्यामुळे एका सामन्यात ४-५ वेळा पायचीत असुनही प्रत्येकवेळेस अपील केल्यावर ग्रेस अश्याकाही नजरेने पंचांकडे बघायचा की पंच प्रत्येकवेळेस त्याला नाबाद ठरवायचे. अखेर गोलंदाजाने त्याच्या २ यष्ट्या वाकवल्या. त्याही परिस्थितीत डॉक्टरांनी पंचाकडे बघितले पण बहुधा त्याला जनाची नाही तरी मनाची लाज वाटली असेल आणि त्याने बोट वरती केले. परंतु आता गोलंदाजाला राहवेना तो ओरडुन म्हणाला "डॉक्टर एवढ्यात चाललात? अजुन १ यष्टी उभी आहे" :)

नंतर मात्र स्लेजिंग खेळापेक्षा जास्त महत्वाचे होत गेले. ऑस्ट्रेलियाने तर त्याला आपला १२ वा गडी असल्याप्रमाणे आत्मसात केले. एखादाच रिच्रर्डस त्यांना भेटायचा जो त्यांच्या नाकावर टिच्चुन त्यांना सांगायचा की:

This is my island, my culture.
Don’t you be staring at me.
In my culture we just bowl

बाकी सगळे पालथ्या घड्यावर पाणी. तोंडाची वाफ दवडायला एव्हर रेडी. खासकरुन ऑस्ट्रेलियन्स तर फारच. "स्लेजिंग" शब्द मुळात ६०च्या दशकात अवतरला. स्लेजिंगचे जनक जरी ऑस्ट्रेलियन्स नसले तरी या शब्दाची व्युत्पत्ती ही ऑस्ट्रेलियाचीच क्रिकेटजगताला देणगी आहे. स्लेजिंग शब्द मुळात स्लेजहॅमर (घण किंवा मोठा हातोडा) या शब्दातुन जन्मला. घणाचे घाव घालुन जसे एखाद्या माणसाला कायमचे उठवता येते तसेच सतत बडबड करुन, त्याच्याकडे रागाने पाहुन, हातवारे करुन त्याला सतावता येते आणि हे असे सतत करणे म्हणजे शाब्दिक घणाचे घाव घालण्यासारखेच आहे.

विचार करा तुमच्या आजुबाजुला ११ जणा सतत बडबड करुन, अपमानकारक बोलुन, पाणउतारा करुन, चेष्टा करुन तुमचे मनोधैर्य खच्ची करायचा किंवा तुमचा आत्मविश्वास डळमळीत करायचा किंवा तुमचे लक्ष विचलीत करायचा प्रयत्न करतो आहे. तुम्ही वैतागणार नाही? अश्या परिस्थितीत समोरच्या संघाला नामोहरम करण्यासाठी एखादा जावेद मियांदादच हवा, मियांदाद अखंड गोलंदाजाशी गप्पा मारायचा त्याला टोमणे मारायचा आणि स्वतः शांतपणे धावा काढायचा. एरवी तो एकेरी धावांवर भर द्यायचा आणि मध्येच एखाद दुसरा चौकार / ष्टकार हाणायचा. भारताविरुद्धच्या एका सामन्यात मात्र दिलीप दोशीने त्याला चांगलाच जखडुन ठेवले होते. वैतागलेल्या मियांदादने दर दुसर्या चेंडुनंतर दोशीला त्याच्या हॉटेलचा रुमनंबर विचारायला सुरुवात केली. सुरुवातीला दोशीला कळेना काय चाललय ते. शेवटी त्याने चिडुन त्याला विचारले कशाला हवा आहे ते. मियांदाद शांतपणे म्ह्णाला "षटकार मारीन तेव्हा चेंडु थेट तुझ्या खोलीत गेला पाहिजे अशी माझी इच्छा आहे." एकाग्रता गमावलेल्या दोशीने अखेर पुढचाच चेंडु त्याला मारायला दिला आणि अपेक्षेप्रमाणे मियांदादने तो सीमेपार भिरकावला आणि वर तोंड करुन दोशीला म्हणाला "राँग एंड वरुन गोलंदाजी करत होतास रे तु नाहीतर खोलीतच पाठवला असता तुझ्या."

पण मियांदादचे स्लेजिंग ऑस्ट्रेलियन्स समोर अगदीच सदाशिव पेठी पुणेरी माणसाच्या टोमण्यांसमोर इतर भारतीयांच्या सात्विक संतापासारखे वाटेल. ग्लेन मॅक्ग्राथ जेव्हा गोलंदाजी करायचा तेव्हा समोरचा फलंदाज आधीच कमालीचा वैतागलेला असायचा. त्यात वर हा माणूस ठेवणीतले टोमणे मारायचा (हो हो. तेचे तेच. सदाशिव पेठेतले पॅटंटेड टोमणे शोभतील असे). त्याचा हा उर्मटपणा त्याला आयुष्यात कमालीचा उपयोगी पडायचा. अर्थात कधीकधी समोरचा माणूसही शेरास सव्वाशेर भेटायचा. श्रीलंका एकदा ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर असताना ग्लेन मेक्ग्राथ सनथ जयसुर्याला काळा माकड म्हटला होता (आणि आपला सरदार सायमंड्सला माकडतोंड्या म्हटला तेव्हा मात्र हेच ऑस्ट्रेलियन्स खवळले होते). दुसर्या एका सामन्यात ग्लेनने सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. त्याने रामनरेश सारवानला विचारले " काय मग ब्रायन लाराच्या *** चव कशी आहे?" भारतीय रक्तच ते. शांत थोडीच बसणार आहे. त्याने शांतपणे उत्तर दिले "मला नाही माहिती तुझ्या बायकोला विचार." हे ऐकल्यावर मात्र मॅक्ग्राथ खवळला. बोलायला जमते ऐकुन घ्यायला जमत नाही. दुसर्या एका सामन्यात झिंबाब्वेच्या एडो ब्रॅंड्सला त्याने आपल्या गोलंदाजीने जेरीस आणले होते. तरी ब्रॅंड्स आउट होइना. ते बघुन ग्लेन ने विचारले "बाबा रे तु एवढा जाड कसा?" एडो ब्रॅंड्स उत्तरला "कारण प्रत्येक वेळेस तुझ्या अनुपस्थितीत मी तुझ्या बायकोला भेटतो तेव्हा ती मला प्रेमाने बिस्कीट खायला देते".

मॅक्ग्रा, मर्व ह्युजेसचा खर्या अर्थाने वारसदार होता असे म्हणता येइल कारण मर्व ह्युजेस पण ऑस्ट्रेलियन होता, तो रिटायर होताना मॅक्ग्रा खेळायला लागला आणि मर्व स्लेजिंगमध्ये मॅक्ग्राचा बाप होता. एका सामन्यात त्याच्या बडबडीला कंटाळुन जावेद मियांदाद (मियांदादला जेरीस आणणारा गोलंदाज किती वैतागवाडी असेल विचार करा) " जाड्या बस कंडक्टर" म्हणाला. त्याच सामन्यात ह्युजेसने मियांदादचा बळी मिळवला आणि तो परतत असताना त्याला ओरडुन "टिकीट्स प्लीज" म्हणाला. दुसर्या एका सामन्यात त्याची रिचर्डसशी जुंपली. जगभरची स्लेजिंग कोळुन प्यायलेला दादा माणूस तो. त्याने मर्वला सलग ४ षटकार ठोकले. अखेर मर्वनेच हार मानली. भर मैदानात जाउन तो जोरात पादला (येस यु रेड इट राइट "पा द ला") आणि रिचर्डसला म्हणाला आता याला सीमेपार धाड. ही मात्रा मात्र अचुक लागू पडली. नाकातले केस जळाले असावेत म्हणुन रिचर्डस लवकर परतला. अर्थात या मर्व ह्युजेसलाही एक शेरास सव्वाशेर भेटलाच म्हणा. एकदा त्याची आणि इंग्लंडच्या रॉबिन स्मिथची जुंपली. तो स्मिथला म्हणाला "रॉबिन गड्या फलंदाजी कशाशी खातात तुला मुळीच झेपत नाही रे". स्मिथने पुढच्याच चेंडुवर चौकार मारला आणि त्याला म्हणाला " मर्व. आपल्या दोघांची जोडी झ्याक जमेल बघ. मला फलंदाजी कशाशी खाता कळत नाही आणि तुला गोलंदाजीचा गंध नाही"

मर्व ह्युजेस च्या विशेष प्राविण्यासह पास झालेल्या शिष्यांमध्ये दुसरा होता मॅक्ग्राचा साथीदार शेन वॉर्न. विचार करा. आधीच दोघेही सर्वोत्तम गोलंदाज होते. जेव्हा ऑस्ट्रेलियाला विकेट्स हव्या असायच्या तेव्हा हे दोघे २ बाजुंनी गोलंदाजी करायचे. आणि गोलंदाजी करताना असले शेलकी टोमणे मारायचे. वॉर्नने त्याच्या नैपुण्याचा तडाखा एकदा त्याच्या राष्ट्रीय संघातल्या त्याच्या शिवराळ सहकार्याला स्लेटरला दिला (द्रविडचा जमिनीला टेकलेला कॅच पकडल्याचा आव आणुन वर त्यालाच शिव्या घालणारा हाच तो महाभातो. फरक एवढाच की तो अंतर्देशीय स्पर्धेतील सामना होता. वॉर्न व्हिक्टोरिया कडुन खेळायचा आणि स्लेटर साउथ वेल्स कडुन. एका सामन्यात स्लेटर मैदानात आल्याआल्या व्हिक्टोरियाचा यष्टीरक्षक बॅरी स्लेटरला म्हणाला "बाबारे तु एखाद्या टाइमबॉम्ब सारखा दिसतो आहेस. कधीही फुटुन मैदानाबाहेर जाशील असे वाटतेय." त्यानंतर वॉर्न जेव्हा कधी गोलंदाजीला आला तेव्हा प्रत्येक चेंडुआधी तो "टिक" म्हणायचा आणि बॅरी "टॉक" म्हणायचा. हे टिकटोक थोडावेळ चालल्यानंतर अखेर स्लेटरचा संयम ढळला आणि त्याने वॉर्नला आपली विकेट बहाल केली. जाताना त्याने त्या दोघांना शिव्यांची शब्दशः लाखोली वाहिली. या दोघांनी मात्र शांतपणे हसत हसत "धडाडधूम" असा आवाज काढला. स्लेटरने अजुनच शिव्या घातल्या. दुसर्‍या एका सामन्यात मात्र वॉर्नने चुकीच्या माणसाशी पंगा घेतला. दक्षिण अफ्रिकेचा मॅकमिलन आठवत असेल कदाचित तुम्हाला. वॉर्न मॅकमिलन अगदीच किरकोळीत चकवत होता. त्याची हुर्यो उडवण्यासाठी वर तो त्याला प्रत्येक चेंडु आधी हा घे फ्लिपर, हा लेग स्पिन, हा गुगली असे म्हणुन चिडवत होता. (प्रत्येक बॉल तसाच पडत होता आणि मॅकमिलनचा वैताग टिपेला पोचत होता). मॅकमिलन मग मात्र त्याला म्हणाला "शेन, तुला लक्षात आहे ना की तु पुढच्या महिन्यात माझ्या देशात येतो आहेस. आमच्याकडे दरवर्षी शेकडो लोक बेपत्ता होतात. त्यातल्या काही लोकांना म्हणे शार्कला खायला घालतात. तु असाही जाड्या आहेस, गळाला लावायला बरा पडशील." मॅकमिलन हे अश्या काही अविर्भावात म्हणाला की आपला वॉर्नी होता त्याहुन जास्त पांढराफटक पडला आणि मग मॅकमिलन ने त्याला सीमेपार धाडण्यात यश मिळवले.

शेन वॉर्न स्वतः स्व्प्नात सचिनला पाहुन घाबरायचा तसाच दक्षिण अफ्रिकेचा डॅरील कलीनन शेन वॉर्नला घाबरायचा. इतका की तो त्याच्या स्व्प्नात येउन त्याला घाबरवायचा. त्याने त्यासाठी खास मानसोपचार घेतले. दुर्दैवाने ही गोष्ट वॉर्नीला कळाली. झाले. पुढच्या वेळेस मैदानात गाठ पडताच वॉर्नने त्याला टोमणा मारलाच "कली बाळा घाबरु नकोस. पाहिजे असल्यास तु माझ्या बेडवर झोपु शकतोस." त्यांची पुढची भेट तब्बल २ वर्षांनी झाली तेव्हा वॉर्नने त्याला परत खिजवले. त्याला बघितल्यावर शेलकी कुजकट कुत्सित हास्य करत तो म्हणाला " वा वा. भेटलास का परत. चला बरेच झाले. मी २ वर्षांपासुन तुझी वाट बघत होतो." कलीनन एव्हाना तयार झाला होता. वॉर्न च्या वाढलेल्या वजनाकडे बघत तो म्हणाला "ही २ वर्षे तु खाण्यातच घालवलेली दिसताहेत."

स्लेजिंगच्या या शर्यतीत स्टीव्ह वॉ देखील शेन वॉर्न आणि मॅक्ग्रापेक्षा काही कमी नव्हता. पण त्याला आपल्या पिटुकल्या पार्थव पटेलने चांगलेच जेरीस आणले होते. स्टेव्ह वॉ चा तो शेवटचा कसोटी सामना होता आणि पार्थिव पटेल यष्ट्या सांभाळत होता. पटेलने त्याला बडबड करुन आधीच जेरीस आणले होते. त्यावर त्याला अजुन खिजवण्यासाठी पटेल त्याला म्हणाला "कम ऑन स्टीव्ह टाटा करण्यापुर्वी तुझा तो फेमस स्वीप शॉट परत एकदा दाखव ना (आधीच्या सामन्यात वॉ तसाच आउट झाला होता). गप बसेल तो वॉ कुठला तो त्याला शांतपणे म्हणाला "बेट्या थोडा आदर दाखव. कारण मी जेव्हा टेस्ट डेब्यु केला तेव्हा तु अजुन दुपट्यात होतास." वॉ हे असले स्लेजिंग कोळुन प्याला होता त्यामुळे त्याने त्या इनिंग मध्ये तब्बल ८० धावा कुटल्या आणि पराभव टाळला. दुसर्‍या एका सामन्यात वॉ, हीली आणि पॉण्टिंगने मिळुन इंग्लंडच्या नासीर हुसैनचा असाच बकरा बनवला. नासीर फलंदाजीला आल्याआल्या वॉ ने पॉण्टींगला सांगितले त्याच्या अगदी नाकाखाली उभा रहा बरे रिकी. त्यावर आधी ठरल्याप्रमाणे हीली म्हणाला "असे कसे काय? हे म्हणजे ३ किलोमीटरच्या परिघात कुठेही उभा रहा सांगण्यासारखे आहे". नासीर यानंतर तिसर्‍या चेंडुवर परतला होता

हर्शेल गिब्स ने विश्वचषकात स्टीव वॉ चा झेल सोडल्यानंतर " ड्युड यु जस्ट ड्रॉप्ड द वर्ल्ड कप" म्हणल्याचे तर सगळ्यांनाच माहिती असेल. वॉला बहुधा या वाक्याची खुमखुमी चढली असावी. नंतर २००१ च्या कसोटीत सौरव गांगुलीने त्याचा एक अवघड झेल सोडल्यानंतरही तो त्याला हेच म्हणाला " ड्युड यु जस्ट ड्रॉप्ड द टेस्ट" गांगुलीच्या म्हणण्यानुसार हे सगळ्यांनी ऐकले आणि मग अजुन इर्ष्येने पेटुन उठुन भारताने तो सामना खेचुन आणला. हरभजनने लवकरच त्याला उडवला. जाताना एरवी आपल्या शांत स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या द्रविडने त्याला विचारले "Steve who have given away the Test match now.?"

स्लेजिंगच्या या युद्धातला त्या काळातला (म्हणजे रिकी पॉण्टिंग, स्टीव्ह वॉ, मॅक्ग्रा, वॉर्न, स्लेटर असे रथी महारथी स्लेजर्स संघात असतानाच्या काळातला) ऑस्ट्रेलियाचा अजुन एक सुनहरा शिलेदार होता इयान हिली. गिलख्रिस्ट संघात यायच्या आधीचा काळ म्हणतो आहे मी. हीलीची आणि रणतुंगाची काही स्पेशल खुन्नस होती बहुधा. पण तो रणतुंगाची नेहेमीच कुरापत काढायचा. अर्थात त्याने रणतुंगाला काही फारसा फरक पडायचा असे मात्र नाही. एका सामन्यात रणतुंगाने रनर मागितल्यावर हीलीने उघड उघड निराशा व्यक्त करत त्याला म्हटले " जाड्या, तु केवळ जाड आहेस म्हणुन तुला रनर मिळु शकतो असे तुला वाटतय का?" दुसर्‍या एका सामन्यात त्याने परत रणतुंगाची जाडी काढली. शेन वॉर्न रणतुंगाला पुढे येउन खेळण्यासाठी उचकवत होता आणि रणतुंगा त्याच्या अभिजात निर्विकारपणे क्रीझ न सोडता खेलत होता. शेवटी हीली वॉर्नला हताशपणे म्हणाला " बॉल वर मार्स चॉकोलेट बार लाव. तो खायच्या अमिषाने तरी हा पुढे येइल" हीलीच्या आक्रमकपणाला कंटाळुन शेवटी मात्र रणतुंगाने त्याच्या थोबाडीत मारेल असे उत्तर दिले. हीलीने खवचटपणे रणतुंगाला विचारले "पाय लटपटताहेत का रे समोर फास्ट बॉलर बघुन?" रणतुंगा शांतपणे म्हणाला "पाय लटपटताहेत खरे. तुझ्या बायकोबरोबर झोपुन बरेच श्रम झालेत."

ऑस्ट्रेलियन्सची ही स्लेजिंग अ‍ॅशेस मध्ये तर पार विकोपाला पोचायची. इंग्लंड म्हटल्यावर शिव्या घालणे ते स्वतःचा जन्मसिद्ध हक्क समजायचे. एका सामन्यात तर याचा कळस घातला गेला. इंग्लिश कर्णधार डग्लस जार्डिन आजतागायत सर्वात धुर्त कर्णधार समजला जातो. एका सामन्यात औसीज नी त्यालाच टार्गेट केले. कोणीतरी त्याला बास्टर्ड म्हटले. जार्डिनने ऑस्ट्रेलियन कर्णधार वुडफुल कडे तक्रार केली. वुडफुलने शांतपणे खेळाडुंकडे पाहुन विचारले "Which one of you bastards called this bastard, a bastard?" आता कर्णधारच असा निघाल्यावर कोण काय बोलणार? दुसर्‍या एका अ‍ॅशेस सामन्यात ऑस्ट्रेलियाचा रॉड मार्श आणि इंग्लंडचा इयान बॉथम यांच्यात जुंपली. मैदानात आल्याआल्या मार्शने बॉथमला विचारले "तुझी बायको आणि माझी मुले कशी आहेत रे इयान?" बॉथम शांतपणे उत्तरला "माझी बायको उत्तम आहेत. तुझी मुले मात्र मतिमंद निघाली."

या कुजकट ऑस्ट्रेलियन्सच्या मांदियाळीत मार्क वॉ मात्र नेहेमीच रिसीव्हिंग एण्ड ला असायचा. पण बडबड करायची खाज तर काही मिटायची नाही. मग (शाब्दिक) मार खायचा बिचारा. एका सामन्यात तो इंग्लंडच्या जेम्स ऑर्मोण्डला म्हणाला "बाबा रे तु इथे काय करतो आहेस? तु इंग्लंडच्या संघात स्थान मिळवण्याएवढा चांगला आहेस असे मला अजिबात नाही वाटत." ऑर्मोण्डने त्याच्याकडे तुच्छतापुर्वक बघत "शक्यता नाकारता येत नाही. पण मी किमान माझ्या घरात तरी सर्वोत्तम खेळाडु आहे हे मला माहिती आहे" असे म्हणुन मार्क वॉ स्टीव वॉ पुढे अगदीच फालतु आहे असे सुचित केले. भावाबरोबरची तुलना अजुन जास्त झोंबते म्हणे. मार्क ला न्युझीलंडच्या अ‍ॅडम परोरेनेही असेच किरकोळीत काढले होते. परोरे मैदानात आल्याआल्या मार्क वॉ त्याला म्हणाला "Oh, I remember you from a couple years ago in Australia. You were s**t then, you're f**king useless now." परोरेने वळुन त्याला उत्तर दिले ""Yeah, that's me. And when I was there you were going out with that old, ugly s**t. And now I hear you've married her, you dumb c**t!"

अर्थात हा परोरे स्वतःदेखील काही कमी उपद्रवी नव्हता. दक्षिण अफ्रिकेचा कलिनन शेन वॉर्नला किती घाबरतो हे त्याला माहिती होते त्यामुळे एकदा कलिनन फलंदाजीला आल्यावर ख्रिस हॅरीसच्या प्रत्येक चेंडुनंतर परोरे ओरडत होता " वेल बॉल्ड वॉर्नी" ;)

ऑस्ट्रेलियन्सला त्यांच्याच भाषेत मारणारे देखील त्यांना तसे बरेच भेटले. एका सामन्यात हीली यष्टीरक्षण करत होता. इंग्लंडचा माइक आथर्टन फलंदाजीला होता. एक चेंडु त्याच्या बॅटची कड घेऊन हीलीच्या हातात जाउन पडला, मात्र आर्थर्टन जागचा हाललाही नाही. वर अजुन बॉल लांबुन गेल्यामुळे निराश झाल्याचे नाटक केले. त्यामुळे गोंधळुन जाउन पंचांनी त्याला नाबाद ठरवले. हीली भडकला. तु पक्का चोरटा आणि लबाड आहेस असे म्हणाला त्याला. आर्थर्टन हसत हसतच त्याला म्हणाला " When in Rome.... dear boy" :P

अश्याच अजुन एका सामन्यात शेन वॅट्सन वारंवार केविन पीटर्सनला त्रास देत होता. पीटरसन शेवटी त्याला म्हणाला. "जाउ देत शेन मी तुझे बोलणे फारसे मनावर घेत नाही आह". तुझ्यावर कोणीच प्रेम करत नसल्यामुळे तुझ्या मनात थोडा कडवट पणा भरला आहे असे दिसते आहे." (नुकतेच शेन वॉट्सनला त्याच्या मैत्रिणीने कटवले होते)

ऑस्ट्रेलियन्सचे एवढे किस्से ऐकुन कदाचित ते मास्टर स्लेजर्स असल्याबद्दल एव्हाना तुमची खात्र पटली असावी. पण आधी सांगितल्याप्रमाणे या कलेचा जनक इंग्लंडचा डॉक्टर ग्रेस होता आणि या शाळेचा हेडमास्टरही दुसरा एक इंग्लिशपटु फ्रेड ट्रुमन होता. फ्रेड तसा बर्‍यापैकी आढ्यतेखोर म्हणुनच प्रसिद्ध होता. तो स्वत: एक उत्तम गोलंदाज होता. एका स्थानिक सामन्यात त्याने एका नवख्या फलंदाजाला एक उत्कृष्ट चेंडुवर चकवले. परत जाताना तो नवख फलंदाज बिचारा त्याला म्हणाला "छान चेंडु होता हं फ्रेड". फ्रेड मात्र कुजकटपणे त्याला म्हणाला "हो ना. आणि मी मात्र तो तुझ्यावर वाया घालवला." दुसर्‍या एका सामन्यात एक नवखा ऑस्ट्रेलियन मैदानात येत होता. फ्रेड सीमारेषेवरच उभा होता. फलंदाजाने आपल्यामगे येताना फाटक लावुन घेतले तसे फ्रेड त्याला म्हणाला "उगाच कष्ट घेतलेस बाळा. थोड्याच वेळात परत उघडायचेच आहे नाहीतरी तुला ते" फ्रेडने हा शाब्दिक मार केवळ फलंदाजांनाच दिला असे नाही. एका सामन्यात तो फलंदाजीला आला तेव्हा ऑस्ट्रेलियन्स त्याच्याभोवती अक्षरशः कडे करुन उभे राहिले. अगदी त्यांच्या सावल्या पीचवर पडाव्यात एवढ्या पुढे. त्यावर फ्रेड त्यांना म्हणाला "हरामखोरांनो मागे सरका. नाहितर मी बॅड लाइटचे अप्पील करेन". दुसर्‍या एका सामन्यात तर ट्रुमनने अंपायरलाच हिसका दाखवला. दोनदा अपील करुनही पंचांनी फलंदाजाला बाद दिले नाही. अखेर फ्रेडने यष्ट्या उडवल्या आणि अंपायरला म्हणाला "फारच क्लोज कॉल होता नाही?" अर्थात फ्रेड ट्रुमन फलंदाजांना त्रास देण्यासाठी स्लेजिंग करायचा असे न मानण्यास बराच वाव आहे. इंग्लिश माणसांची विनोद बुद्धी जेवढी चांगली असते तेवढेच ते खत्रुड पण असतात म्हणे. फ्रेड खर्‍या अर्थाने खत्रुड होता बहुधा. एकदा गावसकरने त्याला माधव मंत्र्यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या. माधव मंत्री एकेकाळी भारतीय संघात होते. नंतर भारतीय संघाचे व्यवस्थापक देखील होते आणि ते गावसकरचे मामा होते. त्यामुळे ते फ्रेडला खचित माहिती असणार. पंण फ्रेड ट्रुमन ने चेहेरा कोरा ठेवला. शेवटी गावसकरने त्याला आठवण करुन दिली की ज्या सामन्यात ट्रुमनमुळे भारताची ४ बाद ० अशी अवस्था झाली होती त्यात त्याच्या ४ बळींमध्ये एक माधव मंत्रा होते. ट्रुमन मग अजुनच खवचटपणे म्हणाला "मग असा माणूस माझ्या लक्षात न राहणे ओघानेच आले. नाही का?"

ट्रुमनची गादी पुढे बर्‍याच इंग्लिश खेळाडुंनी चालवली. त्यात एक अ‍ॅलन लॅम्ब होता. एका सामन्यात तो अ‍ॅलन डोनाल्डचा चेंडु ड्राइव्ह करण्यासाठी बराच प्रयत्न करत होता. पण काही जमत नव्हते. शेवटी डोनाल्ड त्याला म्हणाला "अ‍ॅलन ड्राइव्ह करण्याची एवढीच जर हौस असेल तर गाडी खरेदी कर". लॅम्बने पुढच्याच चेंडुवर स्क्वेयर ड्राइव्ह मारला आणि तो डोनाल्डला म्हणाला " जा पार्क करुन ये"

या इंग्लिश खेळाडुंचे सगळे ऋण इतरांनी मात्र सव्याज फेडले. एकदा इयान बॉथम पाकिस्तानहुन परतल्यावर म्हणाला होता "पाकिस्तान तुमच्या सासूला पाठवण्यासाठी योग्य जागा आहे" (खरे बोलला होता बिचारा) पण आमीर सोहैलने मात्र ते पक्के लक्षात ठेवले होते. ९२ च्या विश्वचषकात इंग्लंडला मारल्यावर तो बोथमला खवचटपणे म्हणाला "सासूलाच पाठवुन द्यायचे होते ना तुझ्या खेळायला. ती अशीही फारशी वाईट खेळली नसती"

याच आमीर सोहैलला त्याची बडबड खरे म्हणजे ९६ च्या विश्वचषकात नडली. २८७ धावांचा पाठलाग करताना आमिर सोहैल - सईद अन्वर द्वयीने भारतीयांच्या तोंडचे पाणी पळवले. ३२ चेंडुत ४८ धावा काढुन अन्वर परतला. पण सोहैलचा धडाका कायम होता. समोर वेंकटेश प्रसादसारखा गोलंदाज असेल तर क्या कहने. त्याने प्रसादला धुतला. एक चेंडु सीमापार धुडकवुन त्याने प्रसादला त्याची जागा दाखवली. आणि नंतर न भूतो न भविष्यति घटना घडली. एरवी ज्याच्या चेहेर्‍यावरची माशी कधी हलायची नाही अश्या प्रसादने पुढच्याच चेंडुवर सोहैलच्या यष्ट्या वाकवल्या आणि पॅविलियनकडे बोट दाखवुन तो चिन्नास्वामीवरच्या आनंदाने वेड्यापिश्या झालेल्या क्राउडसमोर सोहैलवर बरसला "Go home, you f****** bastard". शिव्या देणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे हे विसरुन तमाम भारतीयांनी त्या क्षणी बहुधा प्रसादला स्टँडिंग ओव्हेशन दिले असावे.

या प्रत्युत्तरे देण्याच्या खेळात रिचर्डस भलताच माहीर होता. एका काउंटी सामन्यात ग्रेग थॉमस नावाच्या गोलंदाजाने ३-४ वेळा रिचर्डसला चकवले. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होउन तो रिचर्ड्सला शिकवायला गेला "रिचर्ड्स तुला जर माहिती नसेल तर सांगतो. तो गोल, लाल आणि चकाकी असलेला आहे". पुढच्याच चेंडुवर रिचर्ड्सने चेंडु सीमारेषेपार भिरकावला आणि ग्रेगला तो म्हणाला "ग्रेग तुला माहिती आहे ना तो कसा दिसतो ते? जा शोधुन आण" असाच एका सामन्यात तो औसींच्या रेसिस्ट कमेंट्सला वैतागुन म्हणाला "I may be black. But I know who my parents are"

स्लेजिंगला सर्वात समर्थपणे उभे राहिलेला संघ म्हणजे मात्र भारताचे उदाहरण देता येइल. अगदी रवी शास्त्रीही तोडीस तोड बोलायचा. एका सामन्यात शास्त्रीने चेंडु तटवला तो मायकेल व्हीटनी (ऑस्ट्रेलियन) कडे गेला. व्हिटनी उगाचच शास्त्रीवर डाफरला "**** क्रीझ मध्ये परत जा नाहीतर यष्ट्यांबरोबर तुझे डोके पण फोडेन" शास्त्री त्याला शांतपणे म्हणाला " माइक तु जेवढी चांगली बडबड करतोस तेवढाच चांगला खेळलास तर बारावा गडी म्हणुन क्षेत्ररक्षण करावे लागणार नाही."

गावसकरनेही एका वेस्ट इंडियन गोलंदाजाला योग्य ते प्रत्त्युत्तर दिले होते. तो बिचारा गावसकर आउट होत नाही म्हणुन वैतागला होता आणि उगाच गावसकरला चिडवण्याचा प्रयत्न करत होता. गावसकर त्याला शांतपणे म्ह्णाला "Son, don't waste time sledging at me. I have been sledged at more often than you have taken a piss". नंतर गावसकरने एक झक्कास शतक ठोकले.

सचिनने जेव्हा पदार्पण केले तेव्हा तो गावसकरच्याचा पावलावर पाउल ठेउन पुढे निघाला होता. पण बिचारा पहिल्या सामन्यात बदकाबरोबर परतला. दुसर्‍या प्रदर्शनीय सामन्यात मात्र मुश्ताक अहमदच्या एका ष्टकात त्याने २ चौक्कर मारले. त्यावर अब्दुल कादीर त्याला म्हणाला. कशाला उगाच त्रास घेतो आहेस. आता मी गोलंदाजी करणार आहे. १६ वर्षाचा पोरगा तो. दादा माणसासमोर काय बोलणार. काहीच बोलला नाही. मात्र अब्दुल कादीरच्या त्या षटकातल्या गोलंदाजीचे पृथक्करण होते ६,०,४,६,६,६ (४ षटकार आणि एक चौकार). नंतर एकदा शोएबनेही असाच सचिनशी पंगा घेतला. खरे म्हणजे तो सेहवाग ला डिवचत होता. शोएब असाच सेहवागला बाउन्सर टाकुन उचकावत होता. सिक्स मार म्हणत होता. सेहवाग शेवटी वैतागला तो त्याला म्हणाला "वोह देख सामने तेरा बाप खडा है (म्हणजे सचिन) उसको बोल." शोएबच तो. कोणाला उचकावायचे एवढी अक्कल असली असती तर ४ वर्षे संघाबाहेर बसला नसता. त्याने सचिनलादेखील तसाच चेंडु टाकला आणि बिचार्‍याला सीमेपार पळावे लागले. असो. सेहवाग त्याल उचकावत म्हणाला "अब बकबक मत कर. बेटा आखीर बेटा होता है और बाप बाप होता है." सचिनला बॅटिंगचे धडे द्यायचे प्रयत्न करणार्‍या मॅक्ग्राला सचिनने असेच बॅटने तुडवले होते.

क्रिकेटला ही अशी दैदीप्यमान आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. आताशा सगळेच खेळाडु त्याला सरावलेले आहेत. मध्ये एका मुलाखतीत गंभीरला औसीजच्या स्लेजिंगबद्दल विचारले असता तो म्हणाला "हा खेळाचाच एक भाग आहे. सगळ्यांनाच शेवटी जिंकायचे असते." एकुण स्लेजिंग हे खेळाचा एक भाग झाले आहे आणि जिंकण्यासाठी स्लेजिंग करणे लोकांना आता चुकीचे वाटत नाही. जस्टिन लँगरसारखे ऑस्ट्रेलियन खेळाडु तर स्लेजिंग कमी झाल्यापासुन चांगलेच नाराज झाले आहेत. स्लेजिंग पर्सनल झाल्याचे माझ्या मते फक्त एक उदाहरण आहे असे तो म्हणतो. म्हणजे सरवार - मॅक्ग्रा किस्सा. (मग बोथम - मार्श आणि परोरे - वॉ काय होते?). त्यामुळे खेळकर वातावरणासाठी स्लेजिंग पाहिजे असे त्याचे मत आहे. खरी गोम अशी आहे की ऑस्ट्रेलियाच्या स्लेजिंगवर बरीच बोंबाबोंब झाल्यामुळे सी ए बी ने सगळ्या खेळाडुंना स्लेजिंग न करण्याबद्दल सक्त ताकीद दिली आहे. आणि स्लेजिंग हेच मुख्य असत्र असलेल्या ऑस्ट्रेलियाची कामगिरी त्यानंतर कमालीची खालावलेली आहे. असे दुसरे तिसरे कोणी नाही तर ए सी ए चे पौल मार्श स्वतः म्हणतात.

क्रिकेट कधीकाळी "जेण्टलमेन्स गेम" होता. ऑस्ट्रेलियाच्या कृपेने आजा तो तसा राहिलेला नाही आणि स्लेजिंग आता यावच्चंद्रदिवाकरौ राहणार आहे. सो लेट्स एन्जोय इट.

संस्कृतीविनोदइतिहाससाहित्यिकसमाजजीवनमानक्रीडामौजमजाप्रकटनविचारसद्भावनालेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

गणपा's picture

23 Jul 2011 - 3:15 pm | गणपा

क आणि ड आणि क.

माझीही शॅम्पेन's picture

23 Jul 2011 - 11:38 pm | माझीही शॅम्पेन

क आणि ड आणि क

+१ :)

प्रीत-मोहर's picture

23 Jul 2011 - 3:31 pm | प्रीत-मोहर

गणपाशी सहमत.....

पैसा's picture

23 Jul 2011 - 3:55 pm | पैसा

आजकाल शाळेतल्या मुलांना क्रिकेटचे कोचिंग देताना पद्धतशीर स्लेजिंग कसे करावे याचेही शिक्षण देतात हे प्रत्यक्षात पाहिले आहे, त्यामुळे हा लेख क्रिकेटच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करायला हरकत नाही!

परिकथेतील राजकुमार's picture

23 Jul 2011 - 4:01 pm | परिकथेतील राजकुमार

संपूच नये असे वाटत होते राव.

सरवान - मॅग्राचा किस्सा तर अफलातून होता. त्या स्लेजिंगचा विंडिजच्या खेळाडूंनी इतका राग धरला होता की त्यांनी अक्षरश ऑस्ट्रेलीयाची पिसे काढत ती मॅच जिंकली. बहुदा सरवान त्या मॅचला १०३ का १०४ रन्स काढून आउट झाला. ४००+ रन्स त्यांची चेस केल्या.

आत्मशून्य's picture

23 Jul 2011 - 4:35 pm | आत्मशून्य

स्लेजिंगमधे विषेश प्राविण्य मिळवायला अ‍ॅरिझोना विद्यापीठात दाखल झाल्यावर देल्ही बेली बघायला देणे आवश्यक आहे.

-*वल्या

मदनबाण's picture

23 Jul 2011 - 4:51 pm | मदनबाण

अप्रतिम लेख... और भी आने दो. :)

विवेक मोडक's picture

23 Jul 2011 - 7:27 pm | विवेक मोडक

असं पण ऐकलंय की काही वर्षांपूर्वीची मुंबई रणजी टीम सुद्धा स्लेजिंग मधे उच्च दर्जाची होती. कोणी जाणकार यावर प्रकाश टाकु शकेल काय??

हे असं लिहलयत म्हणजे खरे क्रिकेटशौकीन दिसताहात.
आपले खेळाडू तोडीस तोड उत्तर देतात म्हणून बरे वाटले.;)
अवांतर: सदाशीवपेठेचे उल्लेख हे कोणत्या प्रकारात मोडतात?
नै, म्हणजे काये ना की तोडीस तोड उत्तर देता येतं पण संपादकांना आवडले नाही तर आमचा पत्ता कट व्हायचा....
;)

मृत्युन्जय's picture

23 Jul 2011 - 7:48 pm | मृत्युन्जय

नै, म्हणजे काये ना की तोडीस तोड उत्तर देता येतं पण संपादकांना आवडले नाही तर आमचा पत्ता कट व्हायचा....

घ्या. आम्ही असे ऐकले होते की तुम्ही पण संपादक आहे म्हणे.

मस्त लिहीलेत स्लेजिंगचे किस्से...
यावरुन मागे वाचलेल्या
चावटिका आणि क्रिकेटीका या लेखाची आठवण झाली...

पण गेल्यावर्षी एखादी महिला क्रिकेटच्या बाबतीत किती परिपक्व असू शकते तिचा सेन्स ऑफ ह्युमर थोडा चावटपणाकडे झुकणारा असला तरी किती योग्य वर्णन करणारा असू शकतो हे मी २००७च्या विश्वचषकाच्यावेळी वेस्ट इंडिजमध्ये पाहिले, खरं तर ऐकलं. एक वेगवान गोलंदाज एका फलंदाजाला सतत बीट करत होता. त्याला काय चाललंय ते कळत नव्हतं. मी प्रेस बॉक्समधून गंमत पहायला प्रेक्षकात येऊन बसलो होतो. इतक्यात एक जाडीजुडी बाई संपूर्ण अंग हलवत उठली आणि त्या गोलंदाजाला हाक मारून जोरात म्हणाली, "Enough of foreplay. Now we want some penetration." (तिचं वाक्य मी इंग्रजीतच ठेवलं कारण काही विनोद इंग्रजीतच चांगले वाटतात. मुख्य म्हणजे चावट वाटत नाहीत) मी हसून पडलो, त्या प्रक्रियेचं इतकं अचूक वर्णन सर नेव्हिल कार्डस हे आम्हा क्रिकेट लेखकांमधले डॉन ब्रॅडमनसुद्धा करू शकले नसते.

- द्वारकानाथ संझगिरी
लिंक

मृत्युन्जय's picture

23 Jul 2011 - 8:06 pm | मृत्युन्जय

धन्यवाद साहेब. छान लेखाची लिंक दिलीत

यकु's picture

23 Jul 2011 - 8:17 pm | यकु

धन्यवाद साहेब.

खतरनाक रे...
मस्तच लिहील आहेस

एकदम खुसखुशीत
द्वारकानाथ संझगिरींची शैली आठवून गेली एकदम

सारवान किस्सा मजबूत

५० फक्त's picture

23 Jul 2011 - 11:44 pm | ५० फक्त

मस्त रे मस्त वाढदिवसाची सगळ्यांना भेट का रे?

प्रभो's picture

24 Jul 2011 - 7:46 am | प्रभो

झकास लेख!!

स्वाती दिनेश's picture

24 Jul 2011 - 2:15 pm | स्वाती दिनेश

स्लेजिंग झक्कास!
काही किस्से वाचले होते पण सगळे एकत्रित वाचायला मजा आली..
स्वाती

भडकमकर मास्तर's picture

24 Jul 2011 - 2:51 pm | भडकमकर मास्तर

लेख मस्त आहे...
पूर्वी सर्व वर्णन इन्ग्रजीत वाचले होते..
विशिष्ट टिप्पणी सह वाचायला मजा आली...

काही भागाबद्दल मतप्रदर्शन केल्याशिवाय राहवत नाही...

स्लेजिंग पर्सनल झाल्याचे माझ्या मते फक्त एक उदाहरण आहे असे तो म्हणतो. म्हणजे सरवार - मॅक्ग्रा किस्सा. (मग बोथम - मार्श आणि परोरे - वॉ काय होते?).

बाकी उदाहरणात आणि यात थोडा फरक आहे... ग्लेन म्याग्राची बायको जेन ही ( बहुधा युटेरसच्या ) क्यान्सरने आजारी होती...

हर्षा भोगलेच्या मुलाखतीत त्याबद्दल तो बोलला होता... त्यावर जेन अ‍ॅन्ड ग्लेन नावाचे पुस्तकही लिहिले होते त्याने.. त्यांना हेल्दी मुलेही झाली.. पण ह प्रसंग घडला त्यावेळी ती जास्त आजारी होती ( आता ती जगात नाही ) आणि सर्वानचे उत्तर म्याग्राने पर्सनली घेतल्याने तो त्याच्या अंगावर धावून गेला होता..... अर्थात आपण सुरुवात केल्यावर उत्तर ऐकायचीही तयारी हवी हे खरे...

किसन शिंदे's picture

24 Jul 2011 - 4:10 pm | किसन शिंदे

मस्त स्लेजिंग केलिये.
यातले काही किस्से माहीती होते काही तुमच्यामूळे माहीत झाले.

झकास किस्से! मजा आली! आणखी एक बेस्स्स्स्स्स्स्स्ट किस्सा परवाच्याच अ‍ॅशेस मधला.. नॉन-स्ट्राईकर एण्डवर उभा असलेला मिचेल जॉन्सन बोलिंग साठी तयार असणार्‍या जेम्स अ‍ॅण्डरसनला उचकवायला म्हणतो "What are you chirping now mate? Not getting wickets?" लगेच अ‍ॅण्डरसन एक मस्त यॉर्कर मारून बेन हिल्फेनहाऊसचा त्रिफळा उडवतो. त्यानंतर मागं वळून जॉन्सनकडं पाहत त्यानं केलेलं त्याचं ते प्रसिद्ध 'स्ट्रेच्ड-आर्म्स' स्टाईल सेलिब्रेशन, तोंडावर बोट धरून "शट अप बिच" असं त्याला दिलेलं उत्तर आणि वर केव्हिन पीटरसननं हातात बॉल धरून जॉन्सनला उद्देशून केलेलं ते 'वँ*र' साईन! टॉप क्लास! हा दुवा

आनंदयात्री's picture

25 Jul 2011 - 4:21 am | आनंदयात्री

बेष्ट लेख. मजा आली वाचायला.

राजेश घासकडवी's picture

25 Jul 2011 - 6:20 am | राजेश घासकडवी

खेळातल्या नाट्याचा हा भाग खेळ चालू असताना आपल्याला नीट कळत नाही. ते गमतीदार किस्से सांगितल्याबद्दल धन्यवाद.

बाकी ऑस्ट्रेलियाला या बाबतीत आपल्या संघातल्यांनी प्रत्त्युत्तर दिल्यावर खूप बरं वाटलं होतं.

शाहिर's picture

25 Jul 2011 - 12:39 pm | शाहिर

२००३ च्या विश्व चषका मधे न्युझीलन्ड विरुद्ध भारताची अवस्था नाजुक झाली ..तेव्हा कैफ फलंदाजीला आला तेव्हा त्यांच्या खेलाडुने सांगितल (बहुधा ख्रिस हरीस) " I will send you back to pavilion"

कैफ उत्तरला : "I will send you back to new zealand"

आणि त्याने त्या सामन्यात छान खेळी केली ...

IND Vs NZ

प्रमोद्_पुणे's picture

25 Jul 2011 - 3:09 pm | प्रमोद्_पुणे

मस्तच रे.. एक नंबर..

अव्वल झालाय लेख !!!

काही अजुन मजेदार किस्से जे बहुधा मृत्युंजयाला माहिती असतील पण लेखात नाही आले.....

** विंडिज विरुद्ध खेळताना गावस्कर एके दिवशी पहिल्या क्रमांकावर येण्याच्या ऐवजी चव्थ्या क्रमांकावर खेळायला आला. पण अंशुमन गायकवाड अन वेंगसरकर बदकात घरी परतले होते, अन धावसंख्या होती ०/२. तेव्हा रिचर्ड्स गावस्करला म्हणाला, "Man, it doesn’t matter where you come in to bat, the score is still zero.”

** मर्व स्मिथला चेंडू फेकत असताना स्मिथकडुन एक चेंडु मिस झाला. तो म्हणाला, "अरेरे, तुला तर बॅटिंगही करता येत नाही," पुढच्या चेंडुला स्मिथने चौकार लगावला अन मर्वला म्हणाला, "आपल्या दोघांची जोडी खुप मस्त आहे. मला बॅटिंग करता नाही येत अन तुला बॉलिंग !! "

अजुनही आहेत पण टंकण्यासाठी वेळ लागतो आहे. पुन्हा कधीतरी किंवा इतरांना अपलोडवण्याची विनंती.

मेघवेडा's picture

26 Jul 2011 - 2:46 am | मेघवेडा

आणखी एक किस्सा - यंदाच्या अ‍ॅशेसमधलाच. पण हे ऑन फील्ड स्लेजिंग नसून 'बार्मी आर्मी'नं स्टॅण्ड्समध्ये बसून केलेलं स्लेजिंग होतं! मिचेल जॉन्सनला अख्खी सीरीजभर ते "He bowls to the left, he bowls to the right, That Mitchell Johnson, his bowling is shite!" असं गाऊन हिणवत राहिले. तेही मस्तपैकी लेफ्ट-राईट वेव्ह्ज करून!! आणि तो खरंच लेफ्ट-राईट-सेंटर भरकटलेला होता! एकदा तर तो बॅटिंगसाठी मैदानात उतरत असताना पब्लिकनं हे गाऊन त्याला नर्व्हस करून त्याची विकेट काढली होती. लंडन ईव्हनिंग स्टॅण्डर्ड मध्ये हेडलाईन होती "M. Johnson - Bowled Barmy Army - 0"

प्यारे१'s picture

26 Jul 2011 - 10:38 am | प्यारे१

मस्त लिहिलाय रे.

राजकारण, चित्रपट आणि क्रिकेट. चघळायचे विषय.