बिका किंवा मकी ह्या दोघांपैकी कुणा एकाच्या कृपेने मध्ये 'जोगवा' हा चित्रपट मिळाला होता. चित्रपटाची जोरदार चर्चा चालू असल्याने लगेचच तो बघायला घेतला. काही कारणाने चित्रपट अर्ध्याच्या पुढे बघू शकलो नाही आणि राहिला तो राहूनच गेला. मात्र त्या अर्ध्या चित्रपटाने देखील प्रचंड हुरहुर लावून ठेवलेली होती. शेवटी परवा स्टार प्रवाहमुळे हा संपूर्ण चित्रपट बघण्याचा योग आला.
चित्रपटाची कथा खरेतर थोडी हटके सदरात मोडणारी. आपल्या आजूबाजूला दिसणार्या जोगतिणी आणि जोगत्यांच्या आयुष्याची हि कथा. ह्यातल्या जोगतिणी आपल्या बर्यापैकी परिचयाच्या पण जोगते सहसा शहरात तरी कमी आढळणारे. हा चित्रपट ह्या पंथाच्या रुढी, चालींवर प्रकाश टाकणारा, त्यांच्या वेदना समाजापुढे मांडणारा म्हणून मनावर ठसतो. दु:खांचे, वेदनांचे अवडंबर न माजवता, अनाठायी मेलोड्रामा न ओतता सहजसोपे पणाने सादर केलेले प्रसंग आपली छाप सोडून जातात. उपेंद्र लिमये, किशोर कदम, मुक्ता बर्वे, विनय आपटे, अदिती देशपांडे, प्रिया बेर्डे, चिन्मय मंडलेकर अशी तगडी स्टार कास्ट लाभलेला हा चित्रपट प्रत्येक अंगाने सुबक ठरला आहे. मग तो अभिनय असो, अजय अतुल ह्यांचे कौतुकास्पद आणि अनुरूप संगीत असो, श्रेया - हरिहरन ह्यांच्या आवाजाचा गोडवा असो किंवा राजीव पाटील ह्यांचे दिग्दर्शन असो.
कर्नाटकातल्या एका छोट्या गावातील हि कथा. डोक्यात जट सापडल्याने यल्लम्माआईची भक्त असलेली अक्कुबाई सुलु (मुक्ता बर्वे)ला देवी यल्लमाच्या पायावर वाहण्याचा सल्ला देते. अर्थात आता ती जोगतीण बनणार असते. तर इकडे लघवीतुन रक्त जात असणारा तायप्पा (उपेंद्र लिमये) अशाच अंधश्रद्धेमुळे जोगत्या बनवला जातो. खरेतर हि ह्या दोघांच्या आयुष्याची कहाणी, पण हि कहाणी ह्या दोघांबरोबरच हा पंथ, ह्या पंथात आलेल्या / ढकलले गेलेल्या लोकांच्या आयुष्याचा दुर्दैवी फेरा, त्यांचे जगणे ह्या सगळ्यावरच प्रकाश टाकतो.
ह्या चित्रपटाची कथा कथा खरेतर चार ओळीत मांडता येईल, पण तिला दिग्दर्शकाने लेखकाच्या मदतीने अतिशय छान फुलवून आपल्या समोर मांडली आहे. ह्यातील कित्येक प्रसंग अतिशय हळुवार पणे चित्रित केले आहेत त्याची दाद द्यायला हवीच. यल्लमाच्या डोंगरावर एका बाजूला सुलुचे आणि दुसर्या बाजूला तायप्पाचे लावले जात असणारे लग्न, मैत्रिणीच्या लग्नात तिला हळद लावली जात असताना आपण मात्र आता देवाच्या पायी वाहिली जाणार ह्या विचारात गुरफटलेली सुलु, जोगत्या बनल्यावर साडीच्या आत विजार घालून निदान स्वतःपुरते आपले पुरुषत्व जपण्याचा उपेंद्र लिमयेने केलेला प्रयत्न.. असे काही प्रसंग मनात घर करून बसतात.
जोगतीण बनलेली सुलु कायमची जोगत्यांच्या मेळ्यात राहायला जाते. अल्लड सुलु मेळ्यात नवीनंच दाखल झालेल्या झांजेवाल्याच्या प्रेमात गुरफटते तर इकडे तायप्पा सुलुत गुंतत जातो. ऐनवेळी सुलुच्या होणार्या बाळाचे पितॄत्व नाकारून तो पळून जातो आणि सुलु कोसळून पडते. सुलुचा गर्भ पाडला जातो. अशा अवस्थेत तायप्पा सुलुला आधार देतो. सुलु कोसळून पडलेली असताना इकडे तायप्पा देखील जीवनाची वेगळीच लढाई लढत असतो. त्याच्यावर लादले गेलेले स्त्रीत्व आणि त्यामुळे त्याच्या मनाचा होणार कोंडमारा तो कुठे मोकळा देखील करू शकत नसतो. अनेक वादाच्या प्रसंगात त्याचे उफाळून येणारे पुरुषीपण आणि त्यापासून त्याला मागे खेचत त्याच्या वडिलांपासून (विनय आपटे) सर्वांनीच त्याला आता त्याच्या जोगत्या होण्याची आणि पुरुषत्व सोडल्याची वेळोवेळी करून दिलेली जाणीव काळजाला घरे पाडते.
विशेष उल्लेख करावा लागेल तो किशोर कदम ह्यांनी साकारलेल्या यमन्या ह्या जोगत्याचा. सर्वांची काळजी घेणारा, सर्वांना सांभाळून घेणारा यमन्या आतून मात्र पूर्ण पोखरला गेलेला आहे. दारूच्या आहारी गेलेला आहे. पुरुषत्व सोडून जाणे म्हणजे काय हे यमन्याने पुरेपूर अनुभवलेले आहे. एका प्रसंगात तो नदीवर उघडा अंघोळ करत असतो आणि काही मुले त्याच्याकडे बघत असतात. त्यावेळी तो उपेंद्र लिमयेला म्हणतो "माझ्या उघड्या अंगाकडे पुरुषाने असे बघितले की मनाला कसे हळुवार वाटते" तेव्हा अंगावर सरसरून काटा येतो. जोगत्या झाल्याझाल्या आलेल्या अनुभवांची, पुरुषांकडून मिळालेल्या अनैसर्गिक वागणुकीची कथा जेव्हा यमन्या विझलेल्या डोळ्यांनी सांगतो तेव्हा आपण अंतर्बाह्य हादरतो. ह्या कथा आपण ह्याआधी ऐकलेल्या असतात देखील पण किशोर कदमकडुन ते ऐकताना जणू त्यांनी तो अनुभव प्रत्यक्षात घेतलाच आहे असे वाटत राहते आणि ते काळजाला अधिक भिडते.
पुढे सुलु आणि तायप्पा मनाने आणि शरीराने देखील एकमेकांच्या जवळ येतात. पंथातील काही गोष्टी त्यांना अविचारी वाटत असतानाच गावातले मास्तर ह्या पंथातील अंधश्रद्धा, रुढी ह्या विषयी आवाज उठवायला सुरुवात करतात. एकमेकांच्यात गुंतलेले सुलु आणि तायप्पा पंथ सोडण्याचा आणि संसार करण्याचा निर्णय घेतात आणि संपूर्ण गाव त्यांच्या विरोधात पेटून उठतो. पुढे काय होते ते पडद्यावरच अनुभवण्याजोगे...
उपेंद्र दाते, किशोर कदम, मुक्ता बर्वे ह्यांच्या जोडीलाच विनय आपटे, अदिती देशपांडे ह्यांची देखील अभिनयाची आघाडी उत्तम सांभाळली आहे. देवीवर नितांत श्रद्धा ठेवणारी, वेळेला मेळ्यातल्या जोगतिणींच्या हक्कासाठी पंचायती समोर उभी राहणारी पंथाच्या मेळ्याची प्रमुख अदिती देशपांडे ह्यांनी उत्तम साकारली आहे. तर जोगत्या झालेल्या पोराच्या बापाच्या भूमिकेत विनय आपटे त्यांच्या वाट्याला आलेले बरेच प्रसंग खाऊन जातात. स्वतःच्या घरी जोगवा मागायला आलेल्या उपेंद्र लिमयेला पाहून ते जेव्हा हातातली दोरी रागारागाने गुंडाळत त्याच्या नावाने शिव्या देतात तो प्रसंग तर एकदम खासच.
उपेंद्र लिमये आणि मुक्ता बर्वे त्यांच्या भूमिका अक्षरशः जगले आहेत येवढे सांगितले तरी पुरे. ह्या सगळ्याला छानसे कोंदण लाभले आहे ते अजय अतुल ह्यांच्या संगीताचे आणि हरिहरन, श्रेया ह्यांच्या गोड गळ्याचे. 'जीव रंगला' आणि 'ललाटी भंडार' हि गाणी अविस्मरणीयच.
एकुणं काय तर पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा जोगवा एकदा नक्की अनुभवण्याजोगा.
प्रतिक्रिया
8 Feb 2011 - 2:53 pm | माझीही शॅम्पेन
एकदम सहमत , सुंदर परीक्षण !!!
8 Feb 2011 - 2:54 pm | अवलिया
सुरेख परिक्षण.
8 Feb 2011 - 3:03 pm | टारझन
जोगवा खरंच वास्तवदर्शी चित्रपट आहे .. णो वंडर त्याचं परिक्षण सुंदर होणार ..
बाकी थोर परिक्षक , अंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिटीक्स , चित्रपट क्षेत्रातले जाणकार , आपल्या कॉलेज जिवणात प्रायोगिक णाट्यभुमी गाजवलेले , अनेक चित्रपटांना स्क्रिप्ट पुरवलेले परंतु एकदाही नाव न आलेले , संध्यानंद साठी नियमित आंबट बातम्या पुरवणारे , तसेच मिसळपाव ह्या फेमस साईट वरचे सन्मानिय आणि फेमस , न्यायाधिश संपादक श्री श्री छोटाबाबु डॉण राव ह्यांचे ह्या चित्रपटावर बहुमुल्य असे दोन शब्द वाचण्यास उत्सुक ..
- टारझन
8 Feb 2011 - 4:48 pm | छोटा डॉन
???
काय रे टारबा, काय झाले तुला एकदम ?
असो, परिक्षण सुंदरच लिहले आहे.
चित्रपट अजुन पाहिला नाही, सुंदर असेल असे वाटते.
मात्र आवर्जुन उल्लेख करायचा तो गाण्यांचा, गाणी फारच अप्रतिम आहेत.
- छोटा डॉन
8 Feb 2011 - 3:00 pm | स्पा
असेच म्हण्तो
8 Feb 2011 - 3:04 pm | गणपा
शेवटची १० मिनिटे पहायचा राहुन गेलाय..
१-२ दिवसांपुर्वीच एका मराठी वाहिनीवर लागला होता म्हणे.
माझ्या पुरता तरी हे अजुन सस्पेंसच आहे :)
8 Feb 2011 - 4:00 pm | sneharani
माझापण शेवट पहायचा राहिलाय!
म्हणून सस्पेंसच!
बाकी परिक्षण मस्तच! :)
8 Feb 2011 - 3:04 pm | llपुण्याचे पेशवेll
सुरेख परीक्षण. माझ्याकडे जी टॉरेंट होती त्यात शेवट नव्हता. त्यामुळे त्या चित्रपटाचा शेवट माहीत नाही. पण जेवढी पाहीली तेवढी कथा देखील छान आहे. किशोर कदम यांनी केलेली भूमिका तर भयानक वास्तव अगदी उघडे करून सांगते. त्यातले ८व्या वर्षापासून घेतलेले जोगतेपण. आणि त्यामुळे गावातून जाताना बांधाबांधावर साडी वर करायला लागणं. आणि आता त्याच्याशिवाय जगता येत नाही असं सांगणं काळजाची पाणी पाणी करतं. सर्रर्रर्रकन काटा आणतं अंगावर.
9 Feb 2011 - 4:01 am | गुंडोपंत
माझ्याकडे जी टॉरेंट होती त्यात शेवट नव्हता.
पुपे तू सुद्धा?
मराठी चित्रपट तू चक्क चोरलेस?
लाज नाही वाटत वर असे लिहायला?
असे कसे काय आणि का केले तू?
एक मराठी चित्रपटाची तबकडी विकत का नाही घेतलीस?
तुझे काम चोरले जाते तेव्हा कसे वाटते तुला?
कांचन आणि मितानचे लेख चोरले गेल्यावर इतक्या जणांनी प्रतिसाद दिले. पण चित्रपट चोरी झाल्यावर एकानेही तोंड उघडू नये?
वाईट वाटते आहे.
मात्र हे चित्रपट तू योग्य तो मोबदला देऊन घेतले असल्यास हा प्रतिसाद बाद समजावा.
9 Feb 2011 - 8:27 am | llपुण्याचे पेशवेll
नाही हो.
मी नेहेमी टॉरंटवरून शिनेमे नाही बघत. (२००७ मधे ) जेव्हा या सिनेमाबद्दल कळले तेव्हा मी अमेरीकेत होतो आणि आसपास मराठी सिनेमे लागतात का नाही ते माहीत नव्हते. भारतात असतो तर नक्की थेटरातच पाहीला असता. मी मराठी सिनेमे थेटरातच बघतो. त्याचे २ फायदे. (१) सिनेमा बघितल्याचा आनंद (२) थेटरात येणार्या मराठी प्रेक्षकांची संख्या १ ने वाढणे.
पण जर बाहेरच्या देशात असेन तर सिनेमा डाऊनलोड करून बघण्यात मला काहीही चूक वाटत नाही कारण डीव्हीडी ऑर्डर करून ती शिप करून घेण्यात समस्या होत्या.
कांचन आणि मितानचे लेख चोरले गेल्यावर इतक्या जणांनी प्रतिसाद दिले. पण चित्रपट चोरी झाल्यावर एकानेही तोंड उघडू नये?
वाईट वाटते आहे.
तुलना पटली नाही. कारण मी जोगवा सिनेमा चोरून माझ्या नावावर नाही खपवला.
8 Feb 2011 - 3:05 pm | नगरीनिरंजन
छान परीक्षण!
मला हा चित्रपट पाहायचा आहे पण धाडस होत नाहीये. असलं काही पाहिलं की पुन्हा डोळ्यांवर कातडं ओढून घ्यायला फार कष्ट पडतात.
8 Feb 2011 - 3:25 pm | मुलूखावेगळी
+१
परीक्षण छान
8 Feb 2011 - 3:09 pm | स्वैर परी
'जोगवा' हा माझ्या साठी एक अविस्मरणीय अनुभव होता!
प्रत्येक कलाकाराने केलेले काम अगदी वाखाणण्याजोगे! उपेन्द्र आणि मुक्ता यांचा अभिनय म्हणजे पर्वणीच!
चित्रपटची कथा देखील उल्लेखनीय तथा वेगळी. पटकथा दखील उत्क्रुष्ट!
संगीत - अतिसुंदर!
चित्रपट पाहिल्यानंतर एकच स्थिती होते! भारावलेली!
8 Feb 2011 - 3:15 pm | प्रचेतस
नटरंग, जोगवा हे दोघेही बघितलेत. नटरंगच्या झगमगाटापेक्षा जोगवा खूपच वास्तवदर्शी आहे.
जोगवा पार्ट-२ पण येतोय असे ऐकले आहे.
8 Feb 2011 - 3:17 pm | टारझन
णटरंग एक तद्दन बकवास , गल्लाभरु .. बळेच स्ट्रगल दाखवलेला पाणचट सिणेमा आहे , असे जाता जाता णमुद करावेसे वाटते. जोगवा एणि टाईम बेस
- टल्ली
8 Feb 2011 - 3:19 pm | llपुण्याचे पेशवेll
अशमत. णटरंग देखील एक उत्तम चित्रपट आहे.
8 Feb 2011 - 3:24 pm | स्वैर परी
नटरंग सिनेमा पाहिला नाहिये! परंतु ते झी च प्रॉडक्ट असल्याने त्याची अपेक्षित हवा केली गेली, आणि अतुल कुलकर्णी सारखा कलावंत असल्यावर, तितकेसे पुरस्कार हि मिळाले! परंतु जोगवा खरेच 'अनी टाईम बेस्ट' असाच आहे!
8 Feb 2011 - 3:27 pm | अवलिया
पुपे आणि टार्या दोघेही माझे मित्र असल्याने कन्फर्मिटी कुणाला द्यावी हे समजत नाही.
ए.. तुम्ही दोघे नीट काय ते ठरवुन सांगा बरे एक काय ते... तोवर मी अप्सरा आली ऐकतो.
8 Feb 2011 - 3:46 pm | गणपा
हृदय हेलावले. ;)
8 Feb 2011 - 3:25 pm | गणेशा
हा एकच अलीकडील उत्कृष्ट चित्रपट माझा पाहिचा राहिलाय .
नकेके पाहयचा आहे , म्हणुन येथे परिक्षन वाचले नाही.
पाहुन झाल्यावर नक्की वाचेनच ..
आठवण करुन दिल्यामुळे धन्यवाद
8 Feb 2011 - 4:02 pm | मस्त कलंदर
कृपा माझीच बर्कां!!!
पराच्या चित्रपटाबद्दलच्या मतांशी सहमत. सांगली भाग कर्नाटकाच्या थोडा जवळ असल्याने आजूबाजूला आणि घरची देवी रेणुका असल्याने घरीही काही कार्यानिमित्त या जोगतीणींना पाहिलंय. पराने काही प्रसंग उल्लेखले आहेतच, जे पाहताना अंगावर शहारा येतो, वाईटही वाटतं. चित्रपटात सहसा नाट्यमयता आणण्यासाठी थोडा रंजित/अतिरंजितपणा आणला जातो, पण मला गांवी ऐकलेल्या काही गोष्टींवरून इथं तसं केल्याचं वाटत नाही.
पण केसांची जट झाल्यास जोगतीण बनावंच लागतं असं नसावं. माझ्या घरासमोर राहणार्या आजींची कमरेपर्यंत लांब जाडजूड जट आहे. पण त्यांचा चांगला नातवंड-परतवंडांसह संसार अगदी व्यवस्थित चालू आहे.
आणि हो, गाण्यांच्या बाबतीत बोलायचं तर 'लल्लाटी भंडार...' आमचं फेव्हरिट आहे... :-)
यानिमित्ताने एक आठवण इथे लिहितेयः
एकदा मैत्रिणीच्या घरी गेले तेव्हा कळालं की आमच्या घरी येणारी जोगतीण तिच्या घराशेजारी राहाते. आणि तिला त्यांच्या जोगतिणी-जोगत्यांच्या गटाने वाळीत टाकलंय. त्याचं कारण होतं की जतच्या कुठल्या ब्राह्मण* कुटुंबाने मुलं होत नाही म्हणून रेणुकादेवीला नवस केला होता आणि तो फेडण्यासाठी त्यांनी पहिलं अपत्य (त्यांना मुलगी झाली होती) देवीला सोडलं होतं. एका चांगल्या घरातल्या मुलीला असं देवदासी होताना पाहून आमच्या जोगतीणीनं तिला लहानपणापासूनच घरी ठेवून घेतलं होतं आणि मोठी झाल्यावर तिला सून करून घेतलं. मुलगाही काही दिव्य नव्हता, नुसता गावभर उंडारायचा आणि आईसोबत जोगवा मागायला जायचा. पण देवदासी होण्यापेक्षा तिला एक कायमचा आधार तर मिळाला होता. तिला त्यासाठी खूप झगडावं लागलं. एकदोन वर्षांत तिने लोकांकडून मदत मागून मुलाला एक दुकान टाकून दिलं पण सुनेला देवदासी/ जोगतीण करायला ठाम नकार दिला.
* हा जातीवाचक उल्लेख नाही. पण नंतर ती बाई मैत्रिणीच्या आईशी बोलतानाही आम्ही ऐकलं होतं. तिच्याच मतानुसार ती मुलगी उच्चजातीतली असल्याने अशी नासली जाऊ नये म्हणूनच तिने तिला जे योग्य वाटले ते केलं. मी तिला विचारलं, "जर ती मुलगी या तुमच्याच जातीतली असती तर?" यावर "असल्या जर-तर गोष्टींचा काही उपयोग नसतो. तेव्हा जे वाटलं ते केलं" हे तिचं उत्तर होतं.
8 Feb 2011 - 4:07 pm | टारझन
सुपर लाईक !
9 Feb 2011 - 9:46 am | आळश्यांचा राजा
छान प्रतिसाद! आठवण (सांगण्याची पद्धत) आवडली.
8 Feb 2011 - 4:29 pm | ऋषिकेश
मागे राष्ट्रीय पुरस्कार विजेते मराठी चित्रपट एका पाठोपाठ डाऊनलोडवले होते त्यात हा आला.. बघितल्यावर प्रचंड आवडला हे सांगायला नकोच!
यातील पात्र डोक्यात इतकी फिट्ट बसतात की आठवडाभर 'हँगोव्हर' तसाच तर रहातोच; शिवाय कधी एखादा जोगत्या/जोगतीण रस्त्यात दिसली की आधी या चित्रपटाची आठवण येते.
9 Feb 2011 - 3:58 am | गुंडोपंत
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मराठी चित्रपट एका पाठोपाठ डाऊनलोडवले होते ऋष्या तुझ्याकडून ही पएक्षा अजिबात नव्हती!
मराठी चित्रपट तू चक्क चोरलेस?
लाज नाही वाटत वर असे लिहायला?
असे कसे काय आणि का केले तू?
एक मराठी चित्रपटाची तबकडी विकत का नाही घेतलीस?
तुझे काम चोरले जाते तेव्हा कसे वाटते तुला?
मितानचे लेख चोरले गेल्यावर गळे काढणारे आपण,
मराठी भाषेकडे; आपल्या आईच्या घरीच चोरी करतो?
वाईट वाटते आहे.
मात्र हे चित्रपट तू योग्य तो मोबदला देऊन घेतले असल्यास हा प्रतिसाद बाद समजावा. इतकेच नाही तर कडक भाषेतील प्रतिसादाबद्दल माफीही द्यावी!
9 Feb 2011 - 10:57 am | टारझन
ओये गुंड्या ..
मी पण चित्रपट चोरतो रे .. :) आणि जोगवाच नाही .. तर लै मराठी पिच्चर चोरलेत .. :) एवढं वाईट वाटुन नको घेऊस .. सरळ जीव देऊन टाक बघु :)
- टारोपंत
9 Feb 2011 - 11:26 am | गुंडोपंत
तुमचा प्रश्न. तुम्ही आयटी मध्ये आहात असे मला वाटते. कोणत्याही जालावरील उलाढालीची जालावर नोंद असते आणि ती कायदेशीर कारणासाठी संबंधितांना मिळू शकते याची जाणीव असेल अशी आशा आहे.
असो,
जीव देण्याच्या आपल्या जिव्हाळ्याच्या सल्ल्याबद्दल आभार. प्रयत्न करून पाहतो. वाचल्यावर पोलिसांनी विचारले तर तुम्ही उद्युक्त केले हे सांगण्यास चुकणार नाही.
9 Feb 2011 - 11:30 am | टारझन
आता कसा बॉ आमचा प्रश्न झाला ? वर तर स्वतःचा प्रश्न असल्यासारखं वाईट वाटत होतं तुम्हाला ? :)
हो तर .. माहित नाही का ? भारताचं परराष्ट्र धोरण , टॅक्स पॉलिसीज , कसाबची फाशी , ओबामांचे निर्णय एवढंच नव्हे तर कांद्याचे भाव देखील मिसळपाव च्या चर्चा वाचुनंच ठरतात :)
बिल्कुल बिल्कुल चुकु णका .. प्रयत्न नाही , यशस्वी प्रयत्न करा .. ;) आणि पोलिसांना सांगा , टार्या म्हणे जीव दे म्हणुन जीव दिला :)
जीव देण्या आधी फेसबुक स्टेटस मधे सुद्धा टाका .. तेवढंच माझं नाव टिव्ही वर .. काही नाही टिआरपी वधारेल हो :)
- येडोपंत
8 Feb 2011 - 4:35 pm | विनायक प्रभू
परिक्षण
8 Feb 2011 - 4:43 pm | प्राजक्ता पवार
सुरेख परिक्षण .
8 Feb 2011 - 4:47 pm | असुर
परा, परिक्षण वाचून पहावासा वाटलाय चित्रपट, पण अजिबात पाहणार नाही! ननि म्हणाला तसंच, चित्रपट पाहून डोक्याला कायमचा भुंगा लागण्यापेक्षा न पाहणेच योग्य! यातली गाणीच इतकी छळतात, तेव्हढंच पुरे आहे!
परिक्षणासाठी तुला फुल्ल मार्क्स!!!
--असुर
8 Feb 2011 - 6:07 pm | सहज
असेच म्हणतो.
9 Feb 2011 - 12:27 pm | प्यारे१
असेच म्हणतो.
बाकी मुक्ता बर्वे आणि उपेंद्र लिमये मस्त अॅक्टिंग करतात यात नवीन काही नाही.
8 Feb 2011 - 4:51 pm | स्वाती दिनेश
सुन्न करणारा अनुभव आहे जोगवा म्हणजे!
स्वाती
9 Feb 2011 - 9:17 am | चिंतामणी
मी दोन चार वेळा तुकड्या तुकड्यात हा सिनेमा पाहीला आहे. पुर्ण बघु शकलो नाही.
8 Feb 2011 - 4:57 pm | इन्द्र्राज पवार
श्री.प.रा....
~ चित्रपट मी पाहिलेला नाही....पण तो उत्कृष्ट असेल हे तुमच्या परिक्षणावरून समजतेच, शिवाय विविध अशी ५ राष्ट्रीय पारितोषिके मिळाली म्हणजे शासन दरबाराकडूनही योग्यतेची मोहोर उमटली आहे असे मानले पाहिजे....[तसा प्रघातच आहे म्हणा...].
कोल्हापूर जवळ असलेल्या कर्नाटकातील निपाणी आणि सौंदत्ती येथील यल्लूआईच्या जोगत्यांच्या काही कहाण्या मी [आणि माझ्या मित्रांनी] प्रत्यक्ष पाहिल्या आहेत. निपाणीच्या देवचंद कॉलेजमधील एक प्राध्यापक सुभाष जोशी आणि गारगोटीचे आनंद वास्कर (आता कै.) यानी सीमाभागातील 'जोगते' आणि 'जोगतिणी' यांच्या संदर्भात केलेले 'फिल्ड वर्क' पाहिल्यानंतर तसेच राजन गवस यांची 'चौंडकं' [जोगत्यांचे जोगवा मागतेवेळी सोबत असलेले एक चर्मवाद्य...जे उपेन्द्र लिमयेच्या हातात वरील गाण्यात दिसते] ही जोगत्यांच्या आयुष्यावर बेतलेली कादंबरी वाचल्यानंतर 'देवीमुळे' कपाळभोग आलेल्या या लोकांचे (स्त्री-पुरुष) आयुष्य प्रखरतेने समजते....[चित्रपट डॉ.राजन गवस आणि चारूता सागर...दोघेही याच भागातील लेखक....यांच्याच कथेकर आधारित आहे.]
पण....तुम्ही वर दिलेली 'ललाटी भंडार' [जोगते उद्विग्नेतेने 'लल्लाट' उल्लेख करतात....जसे 'कपाळ' चे केव्हातरी वैतागात 'काय सांगायचे आत्ता त्याला...कप्पाळ?" असे होते.] या गाण्याची लिंक पाहिली आणि त्यावरून अभ्यासू 'दिग्दर्शना' बद्दल काही शंका निर्माण होते. हे अशासाठी म्हणत आहे की, 'लल्लाटी भंडार' हा यल्लमा आईची भाकणूक दर्शविणारा एक नृत्य आविष्कार आहे. यल्लमाला मानणार्या/पूजणार्या कोल्हापूर आणि सीमाप्रांतिय भागातील कुटुंबात मुलाच्या लग्नानंतर दोन दिवसानंतर 'जागर-गोंधळ' नावाचा एक भक्तीभावाचा घरगुती कार्यक्रम आयोजित केला जातो, त्यावेळी जोगता आणि त्याचा संघ नवरदेवाच्या दारापुढील अंगणात मध्यरात्रीच्या पुढेही होणारा कार्यक्रम सादर करतात....त्यावेळी चौंडके आणि चाळ यांच्या साथीने म्हटली जाणारी देवगाणी जमलेले लोक (देवीच्या नावे अगदी हात जोडून) तन्मयतेने आणि भक्तीभावाने ऐकतात....उधळला जाणारा भंडारा आपल्या अंगावर पडावा [जो देवीचा आशीर्वाद समजण्यात येतो...] यासाठी उत्सुक असतात....हे मुद्दाम कुणी करत नाही...तो अधूनमधून त्या चौंडक्यातून उपस्थितांवर उधळला जातोच.
'जोगवा' चित्रपटातील 'ते' गाणेही याच मुशीतील आहे....पण दिग्दर्शकाने चित्रीकरण करताना मात्र या भक्तीप्रदर्शानाला चक्क 'तमाशाच्या फडाचे' रूप दिले आहे. उपेन्द्र जीव तोडून गात आहे आणि बाकीच्या मुरळ्या [जोगतिणी] देहभान हरपून नाचत आहेत...हे एकवेळ ठीक मानू या...पण त्या तालावर दाखविल्या गेलेल्या ज्या क्लिपिंग्ज आहेत त्या पाहून मस्तक संतापाने भरून गेले. जमलेल्यापैकी तरूण वर्ग घाणेरङे अंगविक्षेप करून 'हाय...मर गया...' सदृश्य [जणू काय तिथे सुरेखा पुणेकर आल्या आहेत आणि पिंजरातील 'दिसला गं बाई दिसला..' वर डान्स करीत आहेत]. एका जोगत्याची 'लल्लाटी भंडार....' ही देवीप्रती फिर्याद आहे आणि त्याला थर्ड रेट तमाशाचा रंग देऊन दिग्दर्शकाने त्यामागील भावनेचा सणसणीत अपमानच केला आहे.
पटकथा लिहिणारे एक पाटील आहेत आणि दिग्दर्शन करणारेही एक पाटीलच आहेत....थोडक्यात शक्यता अशीही आहे की दोघेही (मूळ कथाकारांप्रमाणेच) पश्चिम महाराष्ट्रातील असणार....असे असेल तर वरील गाण्यातील ती चूक केवळ अक्षम्य आहे.
इन्द्रा
8 Feb 2011 - 5:15 pm | मस्त कलंदर
मी हा शब्द आठवत होते. चौंडकं आठवला होता पण खात्री नव्हती. मी आताच हे 'लल्लाटी...' गाणं पुन्हा पाहिलं. एक अभिनेता म्हणून उपेंद्र मला आवडतो, पण हे चौंडकं वाजवायचा त्याने बिल्कुल होमवर्क केला नाहीय असं दिसतंय. एक तर तो नुसताच चौंडक्यात हात घालून ते वाजवल्याचा अविर्भाव करत आहे. पण मी पाहिलेल्या (आणि इंद्राने उल्लेखलेल्या) जागर-गोंधळात त्याच्या चौंडकं धरलेल्या हातात टोकाला घुंगरू बांधलेला एक दंडुका आहे, त्या दंडुक्याने चौंडक्याच्या पोकळ बाजूकडून पलिकडच्या चर्मावर आघात करून वाजवले जाते. या गाण्यात उपेंद्रने तो दंडुका शेवटपर्यंत नुसताच धरून ठेवला आहे.
तू चित्रपट पाहिला नाहीस इंद्रा. हा अंगविक्षेप करणारा मुलगा गावातल्या धेंडाचा आणि बहुधा मुक्तावर लाईन मारणारा मुलगा आहे. या जोगत्यांची देवीची आराधनाच चाललीय, पण तो मुलगा इतका नतद्र्ष्ट की तो आधी जिच्यावर लाईन मारायचा आता ती देवीची जोगतीण झाली तरी त्रास देणं सोडत नाही, उलट हक्कच समजतो अशा धर्तीवर हे दाखवलंय. जोगत्यांना समाजाकडून त्रास कसा होतो हे दाखवणं हा त्याला असं दाखवण्यामागचा हेतू आहे...
8 Feb 2011 - 5:29 pm | परिकथेतील राजकुमार
धन्स ग मके.
मी हेच टंकायला आलो होतो :)
8 Feb 2011 - 8:22 pm | इन्द्र्राज पवार
"....जोगत्यांना समाजाकडून त्रास कसा होतो हे दाखवणं हा त्याला असं दाखवण्यामागचा हेतू आहे....."
~ मके....वाचला तुझा खुलासा....पण नाही गं पटत माझ्या मनाला ते बेअकली चित्रण !
हे विनातक्रार मान्य की जोगत्यांना समाजाकडून त्रास होत असतो...पण ते हट्टाने दाखविण्यासाठी दिग्दर्शकाने रेणुका (यल्लमा) देवीच्या गोंधळ प्रथेचा वापर करणे मला साफ नामंजूर आहे. मी हे अशासाठी म्हणत आहे की निपाणी, कागल, मुरगूड, इचलकरंजी आणि खुद्द कोल्हापूर या भागात होणारे असले [उपेन्द्रने सादर केलेले] जागराचे कार्यक्रम आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहेत....काही प्रसंगी पाहुण्यांच्या घरी आयोजित केले असता अखेरपर्यंत (चक्क कोंबडा आरवायची वेळ होईतोपर्यन्त) थांबलो आहोत. पण तू तसेच प.रा. म्हणतात तसा कुठेही एखादा 'आगाऊ नतद्रष्ट लायनर पंजा' हिडिसपणे आविर्भाव करीत बसलेला असत नाही.....बसूच शकत नाही.
देवीच्या कार्यक्रमाला घरातील तसेच गल्लीतील झाडून सारे ज्येष्ठ मंडळी (अगदी आजोबा-पणजोबापासून ते नवरदेवाच्या आईवडिलांपर्यंत) देवीला शेवटची नम्र भाकणूक होईतोपर्यंत मांड्या ठोकून बसलेली असतात, ही सत्य परिस्थिती आहे...मग अशा प्रसंगी तिथे एखादी कथानकातील 'मुक्ता बर्वे' असलीच तरी तिच्यावर एरव्ही जीव टाकणारा अगदी गब्बरसिंगचा बाप जरी असला तरी तो सभ्यतेची मर्यादा ओलांडणार नाही......गाण्यात दाखविले गेलेले हावभाव कुणी केलेच तर तो तिथल्या तिथे जोडेच खाईल...यात तिळमात्र शंका नाही.
तेव्हा तू म्हणतेस तसे दिग्दर्शकास अभिव्यक्तीचे 'स्वातंत्र्य' असले "....परी तो जागा चुकलासी" असेच मी म्हणेन.
इन्द्रा
9 Feb 2011 - 9:44 am | आळश्यांचा राजा
(बहुश्रुत) इंद्रा बरोबर म्हणतोय.
पण दिग्दर्शकाच्याही मर्यादा असणारच. त्याला काय दाखवायचंय ते अंडरप्ले करुन दाखवता आलं नसतं असं वाटलं असण्याची शक्यता आहेच.
9 Feb 2011 - 10:50 am | स्पंदना
चर्म वाद्या बद्दल अनील अवचटांच्या पुस्तकात वाचल, अन जे वाचल त्यान अक्षरशः अंगावर काटा आला. त्यांनी म्हंटलय की जेन्व्हा परशुरामाने क्षत्रिय वध आरंभला तेन्व्हा कोणत्यातरी चौल की अश्याच काही वंशाचा पुरा निपा:त केल्यावर , त्या वंशाच्या स्त्रीया रडत भेकत परशुरामाला शरण आल्या. आमचे सारे पुरुष तु वधल्या वर आम्ही आता कसे जगावे या त्यांच्या प्रश्नाला उत्तर म्हणुन परशुरामाने त्या रण भुमीवर पडलेल्या पुरुषांच्या कवटीत , त्यांचीच आतडी जोडुन हे चर्म वाद्य तयार केले अन हे वाजवत भिक मागत पोट भरा असा आदेश दिला. अस हे चौंडक!!
पराभाउ अतिशय सुन्दर शैलीतील परिक्षण , मी प्राध्यापक बन्ने यांच्या बरोबर थोडे दिवस जोगतीणीन साठी जे हात माग चालवले जातात तेथे मदत करायला होते. सगळ च उलगडल अस नाही म्हणता येणार, पण थोड फार माहिती आहे. सगळ्यात वाईट उत्तर..... गरीबी म्हणुन देवीला वाहुन पैसे मिळावेत या अपेक्षेने आई वडीलांनी या मार्गाला लावले....
9 Feb 2011 - 11:43 am | आळश्यांचा राजा
कुठल्या काळात, कुठल्या भागात आणि कशामुळे ही आख्यायिका निघाली असावी याचा विचार करतोय. संस्कृतीकरणाचा (संस्कृतायझेशन) तर हा भाग नसावा? म्हणजे, आम्ही भिकारी नसून, मूळचे राजवंशातले, पण (तथाकथित उच्चवर्णीय जेत्यांच्या) अत्याचारांमुळे असे भिकेला लागलो असं सांगण्याचा एक प्रयत्न?
(जस्ट एक अॅकॅडमिक अवांतर. अजून काही नाही.)
8 Feb 2011 - 5:03 pm | तिमा
परा,
चांगले परीक्षण. कारण चित्रपट पहाताना मनाला ज्या यातना झाल्या तेवढ्याच हे परीक्षण वाचताना झाल्या. चित्रपट उत्कृष्ट असला तरी परत पहाण्याची मानसिक ताकद नाही.
8 Feb 2011 - 6:58 pm | सखी
अगदी हेच म्हणणार होते.
चांगले परीक्षण आणि चित्रपट, सगळ्यांची कामेही अप्रतिम पण परत पहाण्याची मानसिक ताकद नाही.
8 Feb 2011 - 6:18 pm | स्वाती२
सुरेख परिक्षण!
मी शाळेत असताना एका मुलीला जट आली होती. कोकणात या प्रथेचा फारसा प्रभाव नसल्याने तिचे सगळे केस कापुन टाकले होते. काही काळ विग वापरायची. मग पुन्हा छान केस वाढले. कुणालाच त्याचे काही विशेष वाटले नव्हते.
9 Feb 2011 - 5:34 pm | मी ऋचा
जट आली म्हण्जे काय?? त्याने काय होतं? आणि मग देवीला वाहाण्याशी त्याचा काय संबंध असतो?
8 Feb 2011 - 6:21 pm | धमाल मुलगा
हा सिनेमा संपुर्ण पाहणं मलातरी अशक्य झालं. फारच अंगावर येतो. विशेषतः किशोर कदमचा अभिनय....
तो नदीवर आंघोळीचा सीन तर अशक्य आहे. अलिकडं किशोर कदम आणि उपेंद्र आंघोळीला नदीत उतरलेले असतात आणि पलीकडं मोठ्या खडकावर बसून पोरं त्यांना छेडत असतात तेव्हाचा किशोरकदमचा डाय्लॉग ऐकताना अंगावर काटाच येतो. :(
तायप्पाची तगमग आणि त्याला यमन्यानं समजावणं, सांभाळणं ही भट्टी अप्रतिम जमली आहे.
मिष्टर प.रा. चित्रपटाचे रसग्रहण उत्तमच हेवेसांनल.
8 Feb 2011 - 8:09 pm | अप्पा जोगळेकर
मस्त परीक्षण. हँगओव्हर उतरता उतरत नाही जे १००% खरंय. 'कमलने मला मिठी मारली पण मला काहीच करता आलं नाही' हे वाक्य किशोर कदमने ज्या आर्ततेने म्हट्लंय त्याला तोड नाही. त्याचा तो आक्रोश काळीज चिरत जातो. उपेंद्र लिमये आणि मुक्ता बर्वेचा अभिनय सुद्धा सहीच.
8 Feb 2011 - 8:20 pm | रेवती
परिक्षण आवडलं.
अजून चित्रपट पाहिला नाही पण झेपेल असेही वाटत नाही.
स्लमडॉग आणि जोगवा न बघण्याच्या यादीत आहेत ....सध्यातरी.
9 Feb 2011 - 9:20 am | चिंतामणी
स्लमडॉग आणि जोगवा न बघण्याच्या यादीत आहेत ....
दोन्ही सिनेमात काय साम्य दिसले (न बघण्यासाठी) हे जरा समाजावुन सांगीतलेत तर बरे होइल.
9 Feb 2011 - 7:04 pm | रेवती
दोन्ही सिनेमांचा काहीएक संबंध नाही.
मी यादीतील नावं सांगितली.
9 Feb 2011 - 3:52 am | गुंडोपंत
नितांत सुंदर चित्रपटाचे मनाला भिडणारे परिक्षण. छानच लिहिले आहेस परा!
तू खरा प्रिंट चा माणूस आहेस!
9 Feb 2011 - 4:36 am | सेरेपी
छान परिक्षण. मीही शेवटचा भाग पाहीला नाहीए, साईटवर उपलब्ध नव्हता.
(गुंडोपंत - मी रहाते तिथे मराठी चित्रपट प्रदर्शित केले जात नाहीत, त्यामुळे आं.जा. वरच पहावा लागला...तुम्ही मलाही ओरडायच्या आधीच सांगते :P )
9 Feb 2011 - 7:20 am | गुंडोपंत
कारण सांगितलेत तरी चित्रपट चोरण्याचा हक्क मात्र मिळत नाही!
तुम्ही ज्या गावात राहता तेथे एक तरी भारतीय किराण्याचे दुकान असेल?
त्या दुकानात सतत विचारणा केलीत तर तो दुकानदार नक्कीच मराठी चित्रपटांच्या तबकड्या आणू लागेल.
त्याहीपेक्षा, आंतरजालावर मायबोली खरेदी आहे, तसेच रसिक साहित्य आहे. यांना विनंती करा. जर चित्रपट तबकडीवर आला असेल तर ते तुम्हाला घरपोच तबकडी पाठवतील.
त्या उपर हा घ्या शैलेश नांदूरकरचा संपर्कः
RASIK SAHITYA PVT.LTD
683 Budhwar Peth,
Appa Balawant Chowk,
PUNE-411002
Maharashtra
INDIA
Office: +91-20-24451129
पत्र टाका, फिरवा फोन - चित्रपट मागवून घ्या, सोबत चार चांगली पुस्तकेही मागवा.*
या शिवाय मोझरबेयर आणि इंडिया टाइम्स आहेतच.
माझ्या सारख्या घाटी आणि मूर्ख माणसाला चोरी करू नये हे कळते, आणि तुम्ही लोक खुशाल आपली मराठी सारखी चोरटी स्थळे चालू देता? त्यावर चित्रपट पाहता? सामाजिक बहिष्कार का नाही टाकला जात असल्या ठिकाणी?
सगळ्यांनीच चित्रपट चोर्या केल्या तर मराठी चित्रपट कशाला आणि कसे बनावेत?
आजच ठरवा की मी आंतरजालावर असल्या ठिकाणी जाणारच नाही - मी मराठी आहे आणि मी मराठीच चित्रपटांची चोरी करणार नाही!
----------
* माझा यांच्याशी कोणताही आर्थिक, व्यवहारिक वगैरे संबंध नाही.
9 Feb 2011 - 8:47 am | सेरेपी
'हक्क' वगैरे असुदेत, वर पुपेंनी म्हटलंय ते खरंय. आणि तुमचं म्हणणं तत्वतः योग्य असलं, तरी ---> मी मराठी आहे आणि मी मराठीच चित्रपटांची चोरी करणार नाही!---> हे काही पटलं नाही. फक्त मराठीच का? बाकीचे चित्रपट पहावेत का असे?
असो. माझ्याकडून हा विषय इथे संपला, कारण इतक्या चांगल्या धाग्यावर मला (अधिक) अवांतर करायचं नाही.
9 Feb 2011 - 6:03 am | प्रियाली
वाचून अंगावर काटा उभा राहिला. सुरेख परीक्षण केलं आहेस परा.
9 Feb 2011 - 6:57 am | अभिज्ञ
खुपच छान परिक्षण.
जोगवा प्रथम पाहिल्यावर खरेच असे वाटले कि हा चित्रपट ऑस्करला का गेला नाही?
अन तसेच "फॅक्टरी" पाहिल्यावर देखील असेच वाटले की हा "टुकार" चित्रपट ऑस्करला का गेला?
जोगवा ,ऑस्करच्या शर्यतीत खरे तर हाच चित्रपट जावयाचा होता.नक्किच पुरस्कार मिळाला असता.
परंतु तिथे गेला तो "हरिश्चंद्राची फॅक्टरी". परिक्षकांना म्हणे जोगवाची चित्रफित वेळेवर मिळालीच नाही.
त्यामुळे बाजी मारली "फॅक्टरी" ने.खरेखोटे देवजाणे.
असो,
उपेंद्र लिमये,मुक्ता बर्वे अन किशोर कदम यांचा अभिनय लाजवाबच.
अभिज्ञ.
9 Feb 2011 - 7:07 am | प्राजु
मी पाहिलाय. खूप आवडला होता हा सिनेमा. मात्र पुढे दोन दिवस यमन्या, सुलू आणि तायाप्पा जात नव्व्हते डोक्यातून.
प्रचंड प्रभावी आहे चित्रपट.
9 Feb 2011 - 7:50 am | घाशीराम कोतवाल १.२
जोगवा उपेद्र लिमये आणि मुक्ता बर्वे ह्याच्या चित्रपट कारकीर्दितील माईलस्टोन आहे असे मी म्हणेन
सिम्प्ली ग्रेट झक्कास
9 Feb 2011 - 8:44 am | नितिन थत्ते
चित्रपटाची सुंदर ओळख.
मूळ पुस्तक वाचलेले होते. तेही तितकेच हृदयस्पर्शी आहे. चित्रपट पाहिलेला नाही.
जोगतीण होणे (करणे) म्हणजे प्रत्यक्षात वेश्याव्यवसायात* ढकलणे असल्याचे सुलूला तिचा फायदा घ्यायचा प्रयत्न करणार्या आप्ताकडूनच कळते.
*जो स्वतःहून केला नाही त्याला व्यवसाय का म्हणायचे हाही प्रश्नच आहे.
9 Feb 2011 - 11:09 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
लेख आणि प्रतिसाद वाचून पिच्चर बघावासा वाटत आहे. पिच्चर मिळवून पाहीन.
9 Feb 2011 - 12:40 pm | बिपिन कार्यकर्ते
अप्रतिम परिक्षण... उच्च चित्रपटाचे. बघणार हा चित्रपट.
9 Feb 2011 - 1:29 pm | दिपक
झकास परिक्षण परा. चित्रपट अप्रतिम आहे ह्यात शंकाच नाही.
9 Feb 2011 - 4:54 pm | भडकमकर मास्तर
भारी परीक्षण...
धन्यवद परा...