✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जोगवा

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Tue, 02/08/2011 - 14:50  ·  लेख
लेख
बिका किंवा मकी ह्या दोघांपैकी कुणा एकाच्या कृपेने मध्ये 'जोगवा' हा चित्रपट मिळाला होता. चित्रपटाची जोरदार चर्चा चालू असल्याने लगेचच तो बघायला घेतला. काही कारणाने चित्रपट अर्ध्याच्या पुढे बघू शकलो नाही आणि राहिला तो राहूनच गेला. मात्र त्या अर्ध्या चित्रपटाने देखील प्रचंड हुरहुर लावून ठेवलेली होती. शेवटी परवा स्टार प्रवाहमुळे हा संपूर्ण चित्रपट बघण्याचा योग आला. चित्रपटाची कथा खरेतर थोडी हटके सदरात मोडणारी. आपल्या आजूबाजूला दिसणार्‍या जोगतिणी आणि जोगत्यांच्या आयुष्याची हि कथा. ह्यातल्या जोगतिणी आपल्या बर्‍यापैकी परिचयाच्या पण जोगते सहसा शहरात तरी कमी आढळणारे. हा चित्रपट ह्या पंथाच्या रुढी, चालींवर प्रकाश टाकणारा, त्यांच्या वेदना समाजापुढे मांडणारा म्हणून मनावर ठसतो. दु:खांचे, वेदनांचे अवडंबर न माजवता, अनाठायी मेलोड्रामा न ओतता सहजसोपे पणाने सादर केलेले प्रसंग आपली छाप सोडून जातात. उपेंद्र लिमये, किशोर कदम, मुक्ता बर्वे, विनय आपटे, अदिती देशपांडे, प्रिया बेर्डे, चिन्मय मंडलेकर अशी तगडी स्टार कास्ट लाभलेला हा चित्रपट प्रत्येक अंगाने सुबक ठरला आहे. मग तो अभिनय असो, अजय अतुल ह्यांचे कौतुकास्पद आणि अनुरूप संगीत असो, श्रेया - हरिहरन ह्यांच्या आवाजाचा गोडवा असो किंवा राजीव पाटील ह्यांचे दिग्दर्शन असो. कर्नाटकातल्या एका छोट्या गावातील हि कथा. डोक्यात जट सापडल्याने यल्लम्माआईची भक्त असलेली अक्कुबाई सुलु (मुक्ता बर्वे)ला देवी यल्लमाच्या पायावर वाहण्याचा सल्ला देते. अर्थात आता ती जोगतीण बनणार असते. तर इकडे लघवीतुन रक्त जात असणारा तायप्पा (उपेंद्र लिमये) अशाच अंधश्रद्धेमुळे जोगत्या बनवला जातो. खरेतर हि ह्या दोघांच्या आयुष्याची कहाणी, पण हि कहाणी ह्या दोघांबरोबरच हा पंथ, ह्या पंथात आलेल्या / ढकलले गेलेल्या लोकांच्या आयुष्याचा दुर्दैवी फेरा, त्यांचे जगणे ह्या सगळ्यावरच प्रकाश टाकतो. ह्या चित्रपटाची कथा कथा खरेतर चार ओळीत मांडता येईल, पण तिला दिग्दर्शकाने लेखकाच्या मदतीने अतिशय छान फुलवून आपल्या समोर मांडली आहे. ह्यातील कित्येक प्रसंग अतिशय हळुवार पणे चित्रित केले आहेत त्याची दाद द्यायला हवीच. यल्लमाच्या डोंगरावर एका बाजूला सुलुचे आणि दुसर्‍या बाजूला तायप्पाचे लावले जात असणारे लग्न, मैत्रिणीच्या लग्नात तिला हळद लावली जात असताना आपण मात्र आता देवाच्या पायी वाहिली जाणार ह्या विचारात गुरफटलेली सुलु, जोगत्या बनल्यावर साडीच्या आत विजार घालून निदान स्वतःपुरते आपले पुरुषत्व जपण्याचा उपेंद्र लिमयेने केलेला प्रयत्न.. असे काही प्रसंग मनात घर करून बसतात. जोगतीण बनलेली सुलु कायमची जोगत्यांच्या मेळ्यात राहायला जाते. अल्लड सुलु मेळ्यात नवीनंच दाखल झालेल्या झांजेवाल्याच्या प्रेमात गुरफटते तर इकडे तायप्पा सुलुत गुंतत जातो. ऐनवेळी सुलुच्या होणार्‍या बाळाचे पितॄत्व नाकारून तो पळून जातो आणि सुलु कोसळून पडते. सुलुचा गर्भ पाडला जातो. अशा अवस्थेत तायप्पा सुलुला आधार देतो. सुलु कोसळून पडलेली असताना इकडे तायप्पा देखील जीवनाची वेगळीच लढाई लढत असतो. त्याच्यावर लादले गेलेले स्त्रीत्व आणि त्यामुळे त्याच्या मनाचा होणार कोंडमारा तो कुठे मोकळा देखील करू शकत नसतो. अनेक वादाच्या प्रसंगात त्याचे उफाळून येणारे पुरुषीपण आणि त्यापासून त्याला मागे खेचत त्याच्या वडिलांपासून (विनय आपटे) सर्वांनीच त्याला आता त्याच्या जोगत्या होण्याची आणि पुरुषत्व सोडल्याची वेळोवेळी करून दिलेली जाणीव काळजाला घरे पाडते. विशेष उल्लेख करावा लागेल तो किशोर कदम ह्यांनी साकारलेल्या यमन्या ह्या जोगत्याचा. सर्वांची काळजी घेणारा, सर्वांना सांभाळून घेणारा यमन्या आतून मात्र पूर्ण पोखरला गेलेला आहे. दारूच्या आहारी गेलेला आहे. पुरुषत्व सोडून जाणे म्हणजे काय हे यमन्याने पुरेपूर अनुभवलेले आहे. एका प्रसंगात तो नदीवर उघडा अंघोळ करत असतो आणि काही मुले त्याच्याकडे बघत असतात. त्यावेळी तो उपेंद्र लिमयेला म्हणतो "माझ्या उघड्या अंगाकडे पुरुषाने असे बघितले की मनाला कसे हळुवार वाटते" तेव्हा अंगावर सरसरून काटा येतो. जोगत्या झाल्याझाल्या आलेल्या अनुभवांची, पुरुषांकडून मिळालेल्या अनैसर्गिक वागणुकीची कथा जेव्हा यमन्या विझलेल्या डोळ्यांनी सांगतो तेव्हा आपण अंतर्बाह्य हादरतो. ह्या कथा आपण ह्याआधी ऐकलेल्या असतात देखील पण किशोर कदमकडुन ते ऐकताना जणू त्यांनी तो अनुभव प्रत्यक्षात घेतलाच आहे असे वाटत राहते आणि ते काळजाला अधिक भिडते. पुढे सुलु आणि तायप्पा मनाने आणि शरीराने देखील एकमेकांच्या जवळ येतात. पंथातील काही गोष्टी त्यांना अविचारी वाटत असतानाच गावातले मास्तर ह्या पंथातील अंधश्रद्धा, रुढी ह्या विषयी आवाज उठवायला सुरुवात करतात. एकमेकांच्यात गुंतलेले सुलु आणि तायप्पा पंथ सोडण्याचा आणि संसार करण्याचा निर्णय घेतात आणि संपूर्ण गाव त्यांच्या विरोधात पेटून उठतो. पुढे काय होते ते पडद्यावरच अनुभवण्याजोगे... उपेंद्र दाते, किशोर कदम, मुक्ता बर्वे ह्यांच्या जोडीलाच विनय आपटे, अदिती देशपांडे ह्यांची देखील अभिनयाची आघाडी उत्तम सांभाळली आहे. देवीवर नितांत श्रद्धा ठेवणारी, वेळेला मेळ्यातल्या जोगतिणींच्या हक्कासाठी पंचायती समोर उभी राहणारी पंथाच्या मेळ्याची प्रमुख अदिती देशपांडे ह्यांनी उत्तम साकारली आहे. तर जोगत्या झालेल्या पोराच्या बापाच्या भूमिकेत विनय आपटे त्यांच्या वाट्याला आलेले बरेच प्रसंग खाऊन जातात. स्वतःच्या घरी जोगवा मागायला आलेल्या उपेंद्र लिमयेला पाहून ते जेव्हा हातातली दोरी रागारागाने गुंडाळत त्याच्या नावाने शिव्या देतात तो प्रसंग तर एकदम खासच. उपेंद्र लिमये आणि मुक्ता बर्वे त्यांच्या भूमिका अक्षरशः जगले आहेत येवढे सांगितले तरी पुरे. ह्या सगळ्याला छानसे कोंदण लाभले आहे ते अजय अतुल ह्यांच्या संगीताचे आणि हरिहरन, श्रेया ह्यांच्या गोड गळ्याचे. 'जीव रंगला' आणि 'ललाटी भंडार' हि गाणी अविस्मरणीयच. एकुणं काय तर पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा जोगवा एकदा नक्की अनुभवण्याजोगा.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17099 वाचन

💬 प्रतिसाद (64)

प्रतिक्रिया

दोन्ही सिनेमांचा काहीएक संबंध

रेवती
Wed, 02/09/2011 - 19:04 नवीन
दोन्ही सिनेमांचा काहीएक संबंध नाही. मी यादीतील नावं सांगितली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

सुंदर परिक्षण

गुंडोपंत
Wed, 02/09/2011 - 03:52 नवीन
नितांत सुंदर चित्रपटाचे मनाला भिडणारे परिक्षण. छानच लिहिले आहेस परा! तू खरा प्रिंट चा माणूस आहेस!
  • Log in or register to post comments

छान परिक्षण. मीही शेवटचा भाग

सेरेपी
Wed, 02/09/2011 - 04:36 नवीन
छान परिक्षण. मीही शेवटचा भाग पाहीला नाहीए, साईटवर उपलब्ध नव्हता. (गुंडोपंत - मी रहाते तिथे मराठी चित्रपट प्रदर्शित केले जात नाहीत, त्यामुळे आं.जा. वरच पहावा लागला...तुम्ही मलाही ओरडायच्या आधीच सांगते :P )
  • Log in or register to post comments

पण

गुंडोपंत
Wed, 02/09/2011 - 07:20 नवीन
कारण सांगितलेत तरी चित्रपट चोरण्याचा हक्क मात्र मिळत नाही! तुम्ही ज्या गावात राहता तेथे एक तरी भारतीय किराण्याचे दुकान असेल? त्या दुकानात सतत विचारणा केलीत तर तो दुकानदार नक्कीच मराठी चित्रपटांच्या तबकड्या आणू लागेल. त्याहीपेक्षा, आंतरजालावर मायबोली खरेदी आहे, तसेच रसिक साहित्य आहे. यांना विनंती करा. जर चित्रपट तबकडीवर आला असेल तर ते तुम्हाला घरपोच तबकडी पाठवतील. त्या उपर हा घ्या शैलेश नांदूरकरचा संपर्कः RASIK SAHITYA PVT.LTD 683 Budhwar Peth, Appa Balawant Chowk, PUNE-411002 Maharashtra INDIA Office: +91-20-24451129 पत्र टाका, फिरवा फोन - चित्रपट मागवून घ्या, सोबत चार चांगली पुस्तकेही मागवा.* या शिवाय मोझरबेयर आणि इंडिया टाइम्स आहेतच. माझ्या सारख्या घाटी आणि मूर्ख माणसाला चोरी करू नये हे कळते, आणि तुम्ही लोक खुशाल आपली मराठी सारखी चोरटी स्थळे चालू देता? त्यावर चित्रपट पाहता? सामाजिक बहिष्कार का नाही टाकला जात असल्या ठिकाणी? सगळ्यांनीच चित्रपट चोर्‍या केल्या तर मराठी चित्रपट कशाला आणि कसे बनावेत? आजच ठरवा की मी आंतरजालावर असल्या ठिकाणी जाणारच नाही - मी मराठी आहे आणि मी मराठीच चित्रपटांची चोरी करणार नाही! ---------- * माझा यांच्याशी कोणताही आर्थिक, व्यवहारिक वगैरे संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सेरेपी

'हक्क' वगैरे असुदेत, वर

सेरेपी
Wed, 02/09/2011 - 08:47 नवीन
'हक्क' वगैरे असुदेत, वर पुपेंनी म्हटलंय ते खरंय. आणि तुमचं म्हणणं तत्वतः योग्य असलं, तरी ---> मी मराठी आहे आणि मी मराठीच चित्रपटांची चोरी करणार नाही!---> हे काही पटलं नाही. फक्त मराठीच का? बाकीचे चित्रपट पहावेत का असे? असो. माझ्याकडून हा विषय इथे संपला, कारण इतक्या चांगल्या धाग्यावर मला (अधिक) अवांतर करायचं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत

बापरे!

प्रियाली
Wed, 02/09/2011 - 06:03 नवीन
वाचून अंगावर काटा उभा राहिला. सुरेख परीक्षण केलं आहेस परा.
  • Log in or register to post comments

दुर्दैवी जोगवा.

अभिज्ञ
Wed, 02/09/2011 - 06:57 नवीन
खुपच छान परिक्षण. जोगवा प्रथम पाहिल्यावर खरेच असे वाटले कि हा चित्रपट ऑस्करला का गेला नाही? अन तसेच "फॅक्टरी" पाहिल्यावर देखील असेच वाटले की हा "टुकार" चित्रपट ऑस्करला का गेला? जोगवा ,ऑस्करच्या शर्यतीत खरे तर हाच चित्रपट जावयाचा होता.नक्किच पुरस्कार मिळाला असता. परंतु तिथे गेला तो "हरिश्चंद्राची फॅक्टरी". परिक्षकांना म्हणे जोगवाची चित्रफित वेळेवर मिळालीच नाही. त्यामुळे बाजी मारली "फॅक्टरी" ने.खरेखोटे देवजाणे. असो, उपेंद्र लिमये,मुक्ता बर्वे अन किशोर कदम यांचा अभिनय लाजवाबच. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

मी पाहिलाय. खूप आवडला होता हा

प्राजु
Wed, 02/09/2011 - 07:07 नवीन
मी पाहिलाय. खूप आवडला होता हा सिनेमा. मात्र पुढे दोन दिवस यमन्या, सुलू आणि तायाप्पा जात नव्व्हते डोक्यातून. प्रचंड प्रभावी आहे चित्रपट.
  • Log in or register to post comments

जोगवा उपेद्र लिमये आणि मुक्ता

घाशीराम कोतवाल १.२
Wed, 02/09/2011 - 07:50 नवीन
जोगवा उपेद्र लिमये आणि मुक्ता बर्वे ह्याच्या चित्रपट कारकीर्दितील माईलस्टोन आहे असे मी म्हणेन सिम्प्ली ग्रेट झक्कास
  • Log in or register to post comments

छान

नितिन थत्ते
Wed, 02/09/2011 - 08:44 नवीन
चित्रपटाची सुंदर ओळख. मूळ पुस्तक वाचलेले होते. तेही तितकेच हृदयस्पर्शी आहे. चित्रपट पाहिलेला नाही. जोगतीण होणे (करणे) म्हणजे प्रत्यक्षात वेश्याव्यवसायात* ढकलणे असल्याचे सुलूला तिचा फायदा घ्यायचा प्रयत्न करणार्‍या आप्ताकडूनच कळते. *जो स्वतःहून केला नाही त्याला व्यवसाय का म्हणायचे हाही प्रश्नच आहे.
  • Log in or register to post comments

लेख आणि प्रतिसाद वाचून पिच्चर

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 02/09/2011 - 11:09 नवीन
लेख आणि प्रतिसाद वाचून पिच्चर बघावासा वाटत आहे. पिच्चर मिळवून पाहीन.
  • Log in or register to post comments

अप्रतिम परिक्षण... उच्च

बिपिन कार्यकर्ते
Wed, 02/09/2011 - 12:40 नवीन
अप्रतिम परिक्षण... उच्च चित्रपटाचे. बघणार हा चित्रपट.
  • Log in or register to post comments

झकास

दिपक
Wed, 02/09/2011 - 13:29 नवीन
झकास परिक्षण परा. चित्रपट अप्रतिम आहे ह्यात शंकाच नाही.
  • Log in or register to post comments

भारी परीक्षण... धन्यवद परा...

भडकमकर मास्तर
Wed, 02/09/2011 - 16:54 नवीन
भारी परीक्षण... धन्यवद परा...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा