बरेच दिवस मित्रांकडून 'अल्लाह के बंदे' ह्या चित्रपटाविषयी ऐकत होतो. "नसिरुद्दिन शहा आणि अतुल कुलकर्णीनी काय बाप काम केलंय राव" पासून "भिकार पिक्चर आहे, नसिरुद्दिन शहाला वाया घालवलंय" पर्यंतच्या कॉमेंट्स अधे मध्ये कानावर येतच होत्या, पण 'स्वतः बघायचा आणि मगच मत ठरवायचे' हा आमचा दंडक असल्याने शेवटी काल अल्लाह च्या बंद्यांचे दर्शन घ्यायचे निश्चित केले.
नसिरुद्दिन शहा, अतुल कुलकर्णी, सुहासिनी मुळे, विक्रम गोखले, झाकीर हुसेन अशी रंगमंचावर आणि पडद्यावर बाप असलेली स्टारकास्ट आणि त्यांच्या जोडीला शर्मन जोशी, रुखसार, सक्षम देशपांडे आणि स्वतः फारुक कबीर अशी फौज. चित्रपटाकडून अपेक्षा नक्कीच वाढलेल्या होत्या. ह्या चित्रपटात हिरोच्या भूमिकेत चमकण्याबरोबरच फारुक कबीर ह्याने ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन सुद्धा केलेले आहे.
मोठ्या अपेक्षेने चित्रपट बघायला बसलो खरा पण खरे सांगायचे तर पदरात (का शर्टात? ) निराशाच पडली. अतुल कुलकर्णीचा आणि थोडाफार झाकीर हुसेनचा अपवाद सोडल्यास इतर दिग्गजांना अक्षरशः वाया घालवलेले आहे. विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळे सारख्या ताकदीच्या कलाकारांची भूमिका तुकड्यातुकड्याने जोडली तरी ५ मिनिटांच्या वर भरणार नाही. सक्षम कुलकर्णीला देखील म्हणावे तसा वाव नाही. सगळ्यात वाईट वाटले ते नसिरुद्दिन शहा ह्यांना बालसुधार गृहाच्या जेलरच्या भूमिकेत बघून. एकही धड आणि पूर्णं दोन वाक्यांचा संवाद नाही, बोलका चेहरा हे त्यांचे जे प्रभावी अस्त्र आहे त्याचा कणभर देखील वापर करून घेतलेला नाही आणि सगळ्यात संतापाचे म्हणजे त्यांना दिलेला गेट अप आणि त्यांना भूमिका साकारताना एका पायाने लंगडत चालत असल्याचे दाखवणे. नसिर ह्यांची हि भूमिका अगदी तंतोतंत 'दिवार' ह्या अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारच्या चित्रपटातील पाकिस्तान तुरुंगाच्या जेलर असलेल्या 'के के' ह्या भूमिकेशी मिळतीजुळती आहे. मिळतीजुळती कसली? आपण 'के के' लाच पाहत आहोत असे वाटत राहते.
असो...
तर आता मूळ कथेकडे वळू. विजय आणि याकुब हे मुंबईच्या सगळ्यात मोठ्या 'भुलभुलय्या' झोपडपट्टीत राहणारे दोघे अगदी जवळचे मित्र, सख्खे भाऊच म्हणाना. आई वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर अनाथ याकुबला शेजारच्या सुहासिनी मुळेने वाढवलेले असते. तिचाच मुलगा म्हणजे विजय. शाळेच्या नावाखाली घराबाहेर पडणे आणि चरस विकून पैसा कमावणे हे ह्यांचे काम. बालगुन्हेगारी आणि झोपडपट्टीतले दारिद्र्य हा विषय ह्या चित्रपटाचा अग्रभागी असताना देखील हे दोन्ही विषय म्हणावे तसे प्रेक्षकांच्या समोर येत नाहीत. रादर ह्या प्रश्नांच्या नेमक्या गाभ्यापर्यंत घेऊन जाण्यात हा चित्रपट अपयशी ठरला आहे. एका मिनिटासाठी दाखवलेले पायरेटेड सिडी, विषारी दारू, चरस, लोकांची विक्री हे धंदे म्हणजे झोपडपट्टीचे गुन्हेगारी विश्व नाही आणि 'भाई इसने अपुनका माल लिया वापस नही देता' म्हणणारी पोरे दाखवणे म्हणजे बालगुन्हेगारी न्हवे.
तर ह्या दोघा जय-विरुची आई सुहासिनी मुळे फारच आजारी पडते तिच्या उपचारांवरचा खर्च वाढतच असतो. अशातच पैसा म्हणजेच ह्या भुलभुलय्यातील ताकद आहे हा साक्षाक्तार झालेले विजय आणि याकुब आता मोठा हात मारायचा ठरवतात. त्यासाठी ते भुलभुलय्याच्या दादाचे सहहाय घेतात. आपल्याच वयाच्या चार/पाच मुलांना घेऊन हे दोघेही भरदुपारी एका सोनाराचे दुकान लुटतात आणि मोठा डल्ला मारतात. वचन दिल्याप्रमाणे दादा आपला हिस्सा न देत सगळाच माल घशात घालतोय हे पाहून दोघांचे रक्त खवळते, त्यातच दादा याकुबवर हात उचलतो आणि संतापाच्या भरात दादाच्याच बंदुकीतून विजय दादावर गोळी झाडतो. जखमी दादाला रस्त्यात सोडून दोघेही मालासकट पळ काढतात. इकडे दादाची जागा घ्यायचे स्वप्ने पाहणारा त्याचा उजवा हात ह्या संधीचा फायदा घेऊन दादाची हत्या करतो आणि आळ विजय आणि याकुबवर ढकलतो.
चोरी, खून, हाफ मर्डर अशा अनेक गुन्ह्यांची एकत्र शिक्षा म्हणून त्या दोघांनाही बाल सुधारगृहात पाठवले जाते. बाल सुधारगृहात फक्त १७ वर्षापर्यंतचे गुन्हेगार राहू शकत असताना इथे मात्र चक्क २०-२२ वर्षाची मुले आरामात राहतं असतात आणि 'के टी' नावाच्या एका त्यांच्याच वयाच्या बायल्याच्या हाताखाली टोळी देखील चालवत असतात. जी सुधारगृहात चरस विकून मुबलक पैसा कमावत असते. ह्या सगळ्याला आशीर्वाद असतो तो सुधारगृहाच्या वॉर्डनचा म्हणजेच नसिरुद्दिन शहाचा.
भुलभुलय्याच्या तालमीत तयार झालेले याकुब आणि विजय सुधारगृहात स्वस्तात चरस विकायला सुरुवात करतात आणि इथेच संघर्षाची ठिणगी पेटते. केलेल्या कृत्याचे फळ म्हणून इतर मोठ्या मुलांकडून मार तर मिळतोच वर नसिरुद्दिनच्या आशीर्वादाने त्यांना अनैसर्गिक अत्याचाराला देखील सामोरे जावे लागते. ह्यातच सुहासिनी मुळे मरण पावते. एकमेकांना सावरत दिवस ढकलणारे याकुब आणि विजय योग्य संधी मिळताच त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या 'के टी' चा खून करतात. खुनामुळे खळबळ माजल्याने एक कमिशन नियुक्त केले जाते, ज्यात खुनी कोण आहे हे कळत नाही पण इतर अवैध धंदे उघड झाल्याने वॉर्डनं नसिरुद्दिन शहाची मात्र हकालपट्टी होते. एक दिवशी सुधारगृहातून बाहेर पडून भुलभुलय्याचे बेताज बादशहा बनण्याचे स्वप्न पाहणारे याकुब आणि विजय आता सुधारगृहाचे भाई बनतात.
काही वर्षात (म्हणजे वयाच्या २४ व्या वर्षी) दोघेही सुधारगॄहातून बाहेर पडतात आणि उराशी जपलेले स्वप्न साकारायला पुन्हा भुलभुलय्यात हजर होतात. जुना मित्र रमेश (झाकीर हुसेन) च्या सहहायाने ते भुलभुलय्यामधील लहानग्या मुलांची एक टोळी तयार करतात आणि आपल्या काळ्या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवतात. घरी दोन वेळ जेवणाचे वांदे असणाऱ्या पण हातात चित्रकलेची जादू असलेल्या सक्षम देशपांडे सारख्या कोवळ्या मुलांच्या ह्या टोळीत समावेश असतो. ह्या सर्वाची माहिती मिळाल्यावर भुलभुलय्यामध्ये एक छोटीशी शाळा चालवणारा आदर्श शिक्षक अश्विन परांजपे (अतुल कुलकर्णी) ह्याच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला म्हणावे तसे यश येत नाही. अतुल कुलकर्णीच्या पत्नीच्या भूमिकेत बऱ्याच दिवसांनंतर होणारे रुखसारचे दर्शन मन प्रसन्न करणारे. इथून पुढे सुरू होतो तो भुलभुलय्याच्या काळ्या साम्राज्यावर पकड घेण्याचा खेळ... आणि एका तद्दन गल्लाभरू चित्रपटाच्या दृष्टीने चित्रपटाची वाटचाल सुरू होते.
ह्यानंतर विजयच्या आयुष्यात संध्या (अंजना सुखानी) चे आगमन, हल्ल्याला प्रत्युत्तर देताना विजयच्याच गोळीमुळे सक्षम देशपांडेचा मृत्यू आणि त्यामुळे अंतर्बाह्य पालटलेला विजय अशा नेहमीच्या रस्त्याने गाडी निघते. चित्रपटाचा शेवट तर निव्वळ बकवास!!
विजय च्या भूमिकेत शर्मन जोशी बराच चांगला अभिनय करून गेला आहे. कमावलेले शरीर बरे दिसत असले तरी सतत गंजीफ्रॉकावर वावरायचे नसते हे कळले असते तर अजून बरे झाले असते. चित्रपटाच्या शेवटी शेवटी काही दृश्यात त्याची खोटी दाढी इतकी विनोदी दिसते की फिस्सकन हसून फुटते. याकुबच्या भूमिकेत स्वतः दिग्दर्शक फारुक कबीर आहे. हा याकुब, हा याकुब कमी आणि येडा याकुब जास्ती वाटतो. गँगस्टर म्हणजे केस वेडे वाकडे वाढवलेला, विकृत हसणारा, बंदूक तिरकी तुरकी करत गोळ्या मारणारा नसतो हे ह्यांना कधी कळणार? चित्रपटाचे पार्श्वसंगीत आणि त्या जोडीचे समूहगान तर असह्य ह्या सदरात मोडणारे. अक्षरशः विनाकारण जागोजागी ह्या कानठळ्या बसवणाऱ्या संगीताचा वापर का केला आहे ते लक्षात येत नाही.
तात्पर्य काय तर 'दिखावेपे मत जाओ अपनी अकल लगाओ. '
प्रतिक्रिया
4 Dec 2010 - 2:02 pm | रन्गराव
city of god ( http://www.imdb.com/title/tt0317248/ ) ची भारतीय आवृती आहे अस वाटल समीक्षा वाचून. मूळ चित्रपट लै भारी होता.
4 Dec 2010 - 2:43 pm | चिंतामणी
सल्ल्याबद्दल धन्यवाद.
सावध केल्यामुळे पैसे खर्च होणार नाहीत ब-याच जणांचे.
4 Dec 2010 - 2:56 pm | गवि
thanks.
Was about to go.
4 Dec 2010 - 4:11 pm | विसुनाना
-म्हणजे 'आधुनिकोत्तरोत्तर' आहे तर.
4 Dec 2010 - 4:21 pm | दिपक
डाउनलोडवणारच होतो.. बॅण्डविड्थ आणि वेळ वाचविलास रे परा...
परिक्षण मात्र चोक्कस !!
4 Dec 2010 - 5:17 pm | सन्जोप राव
या रविवारी हा चित्रपट बघावा की काय असा विचार सुरु होता. पैसे वाचवल्याबद्दल धन्यवाद.
4 Dec 2010 - 5:20 pm | स्पंदना
धन्स हो बाबा. आजिबात नाही फिरकणार तिकड.
4 Dec 2010 - 5:51 pm | अवलिया
नाही बघणार !
6 Dec 2010 - 1:07 pm | टारझन
तसा ही हिंदी चित्रपट चित्रपटगृहात जाउन पहाणं म्हनजे एक जुगारंच !!
मस्त परिक्षण !
4 Dec 2010 - 5:57 pm | श्रावण मोडक
"दिखावेपे मत जाओ अपनी अकल लगाओ..." येस्स...
4 Dec 2010 - 7:11 pm | कानडाऊ योगेशु
परिक्षण छान.
आजकाल थेटरात पिक्चर कवचितच पाहतो.
परीक्षण वाचुन चॅनेलवर पाहायचे का नाही ते ठरवतो.
नव्या दिवार मधे अक्षय खन्ना आहे.
5 Dec 2010 - 5:35 am | यकु
असं कसं झालं बुवा, नसरूद्दीन तर निवडक भूमिका करण्यासाठी प्रसिध्द आहेत.
चलो ये भी ठीक.
6 Dec 2010 - 11:18 am | परिकथेतील राजकुमार
तेच लक्षात येत नाहीये. अक्षरशः एखाद्या कलाकाराला वाया घालवणे म्हणजे काय असते ते ही भुमिका बघुन लक्षात येते.
7 Dec 2010 - 11:08 pm | एक
मिडीयम आहे. अॅक्टर चं नाही. तुम्ही चेहर्यावर लाख चांगले एक्स्प्रेशन /रिअॅक्शन द्याल हो पण कॅमेरामन ने क्लोजप मधे नीट टिपलेच नाहीत किंवा एडिटर ने तो सीन नीट टायमींग ने जोडलाच नाही तर काय करणार?
याच्या उलटं उदाहरण "वेन्सडे" मधे परवा बघितलं. लाँग शॉट मधे जिमी शेरगील तुरूंगाच्या बाहेर बाह्या सावरत येताना दिसतो आणि दुसर्या मिडशॉट मधे आतला कैदी मुततो. हे २ शॉट इतके छान जोडले आहेत की त्यामुळे जिमी शेरगील चं कॅरेक्टर एस्टॅब्लिश होतं. आणि हे करण्यात शेरगिल ला कसलाही जादा अभिनय करावा लागला नाही.
म्हणून नाटकात रिएक्शन ला आणि टायमिंग ला महत्त्व येतं आणि जास्त अवघड ठरतं. नाटक अॅक्टरचं मिडीयम आहे.
तात्पर्य, दोष नसिरूद्दीनचा नाही..किंवा त्याच्या भुमिकेच्या निवडीचा नाही. त्याला डिरेक्टरची कुवत जाणता नाही आली हा दोष असू शकतो.
6 Dec 2010 - 11:26 am | गवि
बादवे..काल फस गये ओबामा पाहिला. जरा जरा मजा आली. तेरे बिन लादेन अजून बरा होता असं वाटलं.
ष्टोरीलाईन चांगली असूनही कुठेतरी माशी शिंकते आणि कुठे ते आम्हाला कळत नाही. पराभाऊ, तुमच्या लेखात शब्दात बरोबर पकडता तुम्ही या गोष्टी.
6 Dec 2010 - 12:28 pm | स्वाती दिनेश
कलाकारांची नावे बघून शिनूमा बघावा असे वाटत होते. परा, तुझ्या ह्या परिक्षणामुळे तो विचार बदलतो आहे.
स्वाती
6 Dec 2010 - 2:52 pm | टारझन
आज परा ने हा लेख लिहिला नसता तर किति तरी लोकांचे पैसे आणि वेळ वाया गेले असते ... त्याच्या मुळेच आज थोडेफार लोक वेळ आणि पैसा बचावुन आहेत. :)
6 Dec 2010 - 3:33 pm | विजुभाऊ
परा महा महा मानव आहे.
( ताल चित्रपतातल्या अक्षय खन्नाच्या भूमिकेचे नाव " मानव " होते. हीरॉईन ने प्रेम करावे अशा कोणत्याच क्वालिटी त्यात नव्हता. तरिसुद्धा त्याच्यावर ती का प्रेम करते हे कधीच कळत नाही )
6 Dec 2010 - 10:24 pm | राजेश घासकडवी
इतक्या लोकांना पैसे खर्च करण्यापासून परावृत्त करणाऱ्या परा-वृत्ताचा (की प्रवृत्तीचा?) निषेध. लोकांनी भुक्कड खर्च केले नाहीत तर इकॉनॉमी वाढणार कशी?
7 Dec 2010 - 2:17 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
जळजळ पोहोचली.
परा परीक्षण आवडलं. तसेही मी पिच्चर पहात नाहीच, काय फरक पडतो?
7 Dec 2010 - 12:21 am | अविनाशकुलकर्णी
अल्ला के बंदे व ब्रेक के बाद ...असा पर्याय असेल तर कोणता बघु?...
बरेच दिवसात पिक्चर पाहिला नाहि..
7 Dec 2010 - 1:13 pm | इंटरनेटस्नेही
ब्रेक के बाद बघा.. मस्त आहे!
आय लव्ह दिपीका!
7 Dec 2010 - 1:18 pm | इंटरनेटस्नेही
चांगले चित्रपट परीक्षण. आमचे आणि आमच्या मैत्रीणीचे १००० रुपये वाचवल्याबद्दल परासाहेबांचे मनापासुन आभार.
हे थोर समाजकार्य करत राहण्यासाठी देव त्यांना अशीच शक्ती व सहनशीलता देत राहो.
7 Dec 2010 - 1:20 pm | sneharani
छान परिक्षण!
7 Dec 2010 - 3:28 pm | अविनाशकुलकर्णी
धन्य वाद ....ई स्नेहि....
चला मग..पिक्चर पाहु..नंतर चपटी..मग दुर्गा बिर्याणी...जमल तर प.रा. ला पण आपल्यात खेचु
7 Dec 2010 - 3:34 pm | इंटरनेटस्नेही
परा साहेबांना भेटायला फार पुण्याई लागते म्हणतात!
8 Dec 2010 - 8:09 am | फारएन्ड
पाहिल्याबद्दल आणि येथे लिहील्याबद्दल :) बघायला हरकत नाही असे दिसते :)
8 Dec 2010 - 8:27 am | निनाद मुक्काम प...
हा सिनेमा पाहण्याचा विलक्षण मोह झाला होता .तो आता टाळता येईल .बाकी नामांकित इंग्रजी व हिंदी व काही मराठी समीक्षकांनी तर ह्याला ४ तारे दिले होते (ते बिचारे पगारी नोकर /फुकट मिळणाऱ्या मदिरा व चकण्याचे इमान राहून खरडतात .पण परखड मते लिहिणारा एकच असतो .(त्याला समीक्षक म्हणून कुठल्या
ही नियतकालिकात व पेपरात काम मिळत नाही .) पण तो सिने रसिकांच्या दुवा घेतो .
लगे रहो.