जेंव्हा तुझ्या बुटांना ...

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in जनातलं, मनातलं
8 Apr 2009 - 2:37 am

लहानपणी अभ्यास केला नाही, पानातले सगळे विनातक्रार संपवले नाही, 'वेड्यासारखे' वागले की आई-बाबा यऽ यऽ बुकलायचे. स्वयंपाकाच्या ग्यासची हिरवी रबरी नळी, छडी, झाडू, कमरेचा पट्टा, लाटणे, सांडशी, कपडे वाळत घालायची काठी यांपैकी कशाकशाचाही काहीही उपयोग होत नाही, हे कळून चुकल्यावर चपलेने अगर बुटाने मार खाणे ठरलेले असायचे. "जोड्याने हाणले पाहिजे कार्ट्याला!"असे त्यांच्यापैकी एकानेही जरी म्हटले तरी त्याचा अर्थ आई-बाबा उभयतांनी हाणणे म्हणजे 'जोड्याने' हाणणे हाच होतो, अशी बालमनाची पक्की समजूत झालेली. सत्यनारायणाच्या पूजेला जसे मेहूण जेवते (जोडा जेवतो), तसाच प्रसाद 'जोड्याने' मिळायचा. त्यामुळे अगदी आजतागायत अभ्यास न करणार्‍या नतद्रष्ट लहानग्यांपासून ते अगदी अमेरिकेच्या अध्यक्षमहाशयांपर्यंत कोणालाही 'जोड्याने' हाणले पाहिजे असे कोणी म्हटले की हाणणार्‍या किमान दोन व्यक्ती तरी असाव्यात, असे चित्र आपसूकच उभे राहते. मात्र नजीकच्या भूतकाळात आमचा हा समज एका इराकी पत्रकाराने चुकीचा ठरवला. त्याने बुश महाशयांना चढवलेल्या बुटांच्या प्रसादावरून जोड्याने हाणणे म्हणजे एकाच व्यक्तीने दोन जोडे मारणे हा सुद्धा अर्थ होतो, हे सुद्धा मान्य करावे लागले. एका अर्थाला दुसर्‍या अर्थाची जोड (की जोडा) मिळाला.

काही संस्कृतींमध्ये जोडे फेकून मारणे हे उच्च प्रतीच्या, नीचपणे केलेल्या अपमानाचे व्यवच्छेदक लक्षण कसे काय असू शकते, हे बाकी आम्हांला अजून समजलेले नाही. पुण्यात कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त जोडे हाणायची जी संस्कृती विकसित झाली आहे, तिची लागण या बाकीच्या संस्कृतींना झाली नसावी. बाटा, लखानी किंवा तत्सम सिंधी-गुजराती चप्पल-बूट विक्रेत्यांचे धंदे पुण्यात नीटसे चालत नसल्याचे हेच एक मुख्य कारण असावे की तिथे जोडे हाणायचे असल्यास ते पायात घालावेच लागतात अशातला भाग नाही. तिथला मराठी माणूस जोडे हाणण्यात पटाईत असल्याने वडेवाले जोशी जरी एकमेवाद्वितीय असले, तरी जोडेवाले जोशी बरेच आहेत. चप्पलबुटांची खरी गरज पडते ती मुंबईत. तिथे कफ परेड, नेपिअन्सी रोड सारख्या उच्चभ्रू वस्त्यांमधली कुत्रीमांजरीही अगदी रिबिन् बिबिन् लावलेले डिजाइनर् शूज् घालून हिंडताना आम्ही पाहिली आहेत. वार्धक्याकडे झुकू लागलेल्यांसाठी किंवा नेमाने लाफ्टर् क्लबात, प्रभातफेरीला (मॉर्निंग् वॉक् !) जिम् मध्ये जाणार्‍यांसाठी स्पोर्ट्स शूज् ; कार्यालयात जाताना, लोकलमधून प्रवास करताना घालायचे चप्पल-बूट वेगळे नि मंगल कार्यालयात जातानाचे, प्रवासाला जातानाचे वेगळे; महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी आठवड्याला जो पोशाख घालायचा त्या प्रत्येक पोशाखामागे एक या दराने घालायचे चप्पल-बूट आणि सप्ताहाअंतीच्या स्नेहसंमेलनांसाठी, पार्ट्यांसाठी, ट्रेकिंग-हायकिंग साठीचे, लग्नमुंजीदी समारंभप्रसंगी घालायचे वेगळे बूट; असा सगळा जय्यत जामानिमा असतो. टाकून दिलेल्या चपला-बुटांचे पुनर्नवीकरण करायचे, पुनर्निर्माणाचे जे प्रकल्प धारावीसारख्या उद्योगजगतात आकाराला आले आहेत, त्यांच्या यशामागेही याच बहुरंगी बहुढंगी पादत्राणांचा फार मोठा हातगुण (की 'पाय'गुण) आहे.

पादत्राणे या शब्दांपासून तयार झालेल्या विशिष्ट शब्दचमत्कृतीची मजा बालसुलभवयात सगळ्यांनीच घेतलेली आहे, याबाबत दुमत नसावे. पण नेहमीची बस/ट्रेन पकडण्यासाठी धावताना अथवा ती चुकल्यावरची पायपीट करताना, शेजारी बसलेल्या किंवा उभे असलेल्या सहप्रवाशाच्या जड ब्यागेचा किंवा त्याच्या स्वतःच्या जडत्त्वाचा त्रास सहन करताना, टॅक्सी-रिक्षावाल्यांच्या संपासारख्या बिकट परिस्थितीत तंगडतोड करताना जी पायातले (पादण्यातले नव्हे! काढलेत ना दात लगेच?!) त्राण कायम ठेवतात ती पादत्राणे हा गर्भितार्थ केवळ अनुभवातूनच उलगडत जातो. पूर्वी वधुपित्यांची पादत्राणे त्यांच्यातले त्राण जिवंत ठेवण्याऐवजी काढून घेत असल्याचे ऐकायला मिळे. मात्र हल्ली ऑनलाइन् म्याट्रिमोनीज् चे दिवस आल्यापासून हे चित्र आजकालच्या वधूंसारखेच काहीसे बदलू लागले आहे. पादत्राणांचा उपयोग फोटोत दिसणारी आपली उंची वाढवण्यासाठी, कोणत्या पोशाखावर कोणते चप्पल-बूट म्याच् होतात हा 'ड्रेसिंग् सेन्स्' दाखविण्यासाठी, आणि झालेच तर लग्नानंतर नवरा व बायको यांच्यापैकी कोणाच्या पायात किती त्राण उरणार नि कुणाचे किती संपणार, हे दाखविण्यासाठी केला जाऊ लागला आहे. एकंदरीतच चप्पल-बुटांमधील फ्याशनसंबंधी कमी पर्याय उपलब्ध असल्याने हा प्रकार वरांपेक्षा वधूंच्या बाबतीतच जास्त होतो, असे आमचे निरीक्षण आहे. गर्दीत पर्स किंवा गळ्यातली सोनसाखळी चोरणारा भुरटा चोर, विनाकारण मागे लागणारा रोड् रोमिओ किंवा नवखा, अननुभवी प्रेमवीर यांना प्रसाद म्हणून चढवायलाही आजकालच्या मुली पादत्राणांचा वापर करू लागल्या आहेत. त्यामुळे आता 'जुळले मनामनाचे नाते तुझे नि माझे' या ऐवजी 'जुळले बुटाबुटाचे नाडे तुझे नि माझे'; 'फुलले रे क्षण माऽझे फुलले रे' ऐवजी 'झिजले रे बुट माऽझे झिजले रे' अशी मंगलगीते कधी ऐकायला मिळणार याचीच आम्ही वाट पाहत आहोत. अशा बहुपयोगी उपलब्धीचे महत्त्व पटल्यामुळेच सारसबागेतला गणपती, अरण्येश्वर, पर्वती अशा ठिकाणांहून पादत्राणांच्या चोर्‍यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचेही ऐकायला मिळते आहे.

आज भारताच्या माननीय गृहमंत्र्यांना बूट फेकून आपल्या इराकी मित्राचे अंधानुकरण करण्याचा चावटपणा एका शीख पत्रकाराने केल्याचे पाहण्यात आले. पण मुळातच शीख बाणा हा बुटासारखे तुच्छ हत्यार न वापरता लढवय्या वृत्तीने सीमेवर छातीचे कोट करून बंदुका चालवायचा (किंवा भारतात ट्रक नि अमेरिकेत-क्यानडात टॅक्सी चालवायचा) आहे. त्यामुळे इराकी पत्रकाराच्या बूट फेकण्यातला तो जोश या मा. पत्रकार सरदारजींच्या जोडा हाणण्यात दिसून आला नाही. आणि सदैव हसतमुख नि शांत असणारे आदरणीय गृहमंत्री सुरुवातीला जरी त्या अनपेक्षित प्रीतीसुमनांनी किंचित गांगरल्यासारखे वाटत असले, तरीसुद्धा पाडगावकरांच्या 'जेंव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा' च्या चालीवर 'जेंव्हा तुझ्या बुटांना उडवी दलेर माझा' असे काहीसे त्यांना सुचले असण्याची शक्यता त्यांच्या मिस्किल हसण्यावरून तरी अगदीच नाकारता यायची नाही.
============================================================================================================
प्रस्तुत लेखनातून निखळ करमणूक हाच एकमेव उद्देश आहे. जाणतेपणे कुणाच्याही धार्मिक, प्रादेशिक वगैरे प्रकारच्या भावना दुखावण्याचा दुष्ट हेतू मुळीच नाही, याची कृपया नोंद घ्यावी. अजाणतेपणे कुणी दुखावेले गेले असेल, तर उदार मनाने हा लेखनापराध पोटात घालावा, ही कळकळीची नम्र विनंती
============================================================================================================

समाजजीवनमानराहणीराजकारणमौजमजाप्रकटनविचारमतप्रतिसादमाध्यमवेधअनुभवप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

एक's picture

8 Apr 2009 - 3:25 am | एक

>> त्यामुळे इराकी पत्रकाराच्या बूट फेकण्यातला तो जोश या मा. पत्रकार सरदारजींच्या जोडा हाणण्यात दिसून आला नाही. >>

१०००% सहमत..
उत्साहाने व्हिडीओ बघितला पण प्रचंड निराशा झाली. अगदीच पेद्रु थ्रो होता.लहान मुलाला कॅच देताना सुद्धा यापेक्षा जोरात बॉल टाकतो आपण.

(लाश्ट बेन्चर्)बेसनलाडू

नाटक्या's picture

8 Apr 2009 - 3:38 am | नाटक्या

लगे रहो!! मस्त लिहीले आहेस...

- नाटक्या

धनंजय's picture

8 Apr 2009 - 6:23 am | धनंजय

असेच म्हणतो.

(लांबलचक
----------------------------
----------------------------
रेघांमुळे लेख पडद्यावर मावत नाही. त्या रेघा लहान केल्यास सोय होईल.)

बेसनलाडू's picture

8 Apr 2009 - 9:42 am | बेसनलाडू

टंकन हापिसच्या लॅपटॉपवर केले. त्याचे रेजोल्यूशन् नेहमीच्या पडद्यांपेक्षा जास्त असल्याने त्यानुसार लाम्बलचक ओळी काढल्या; ज्या त्या संगणकाच्या पडद्यावर त्यामानाने लांबलचक न वाटता व्यवस्थित दिसतात. मागे-पुढे, वर-खाली स्क्रॉलिंग करावे लागत नाही.
(तंत्रज्ञ)बेसनलाडू

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Apr 2009 - 10:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

एकदम जोरदार लिखाण, थ्रोच्यापेक्षा कायच्या काय जोरदार ...

आडवं स्क्रोल करण्याच्या प्रश्नावर उपायः आडव्या रेघा मारायच्या ऐवजी साधारण मध्यात तीन ऍस्ट्रीक्स काढले तर? पण तुमची निवड!!

अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

चतुरंग's picture

8 Apr 2009 - 6:03 am | चतुरंग

बेला, सुरेख लेख! आज बरेच दिवसांनी सूर लागलेला दिसतोय. :)
(अवांतर - तुझ्या माराच्या वर्णनावरुन लहानपणी पट्ट्याने मार खाल्लेला आठवला!)

चतुरंग

प्राजु's picture

8 Apr 2009 - 6:52 am | प्राजु

अतिशय हलका फुलका लेख खूप आवडला.
शाब्दिक कोट्याही उत्तम . :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

दशानन's picture

8 Apr 2009 - 7:27 am | दशानन

सहमत,

लेख मस्त जमला आहे.

नंदन's picture

8 Apr 2009 - 11:23 am | नंदन

आहे, उत्तम प्रासंगिक लेख.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रकाश घाटपांडे's picture

8 Apr 2009 - 9:40 am | प्रकाश घाटपांडे

अशा बहुपयोगी उपलब्धीचे महत्त्व पटल्यामुळेच सारसबागेतला गणपती, अरण्येश्वर, पर्वती अशा ठिकाणांहून पादत्राणांच्या चोर्‍यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचेही ऐकायला मिळते

आहे.
त्याच्याव काही ल्वॉक डोकॅलिटी लडवायचे. डावी चप्पल मंदिराच्या डाव्या कोपर्‍यात आन उजवी उजव्या कोपर्‍यात. चोराला यका चप्प्लेचा काय उपेग ? मंग तो नेनार नाई.
बूट घातलेल्या लोकांचा मोजे काढल्यावर चरणकमलगंधा मुळे डास पळुन जातील का? असा विचार मनात आला असता डास जागेवर रहातात पण माणस पळून जातात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

पाषाणभेद's picture

8 Apr 2009 - 9:54 am | पाषाणभेद

घोडे की धांसु ताकद आहे यात.

अमाला पयले वाटल की "जेंव्हा तुझ्या बटांना " म्हंजे कायतरी गुदगूल्या होनार आमाला.
- पाषाणभेद

बेसनलाडू's picture

9 Apr 2009 - 12:21 am | बेसनलाडू

म्हणूनच शीर्षकही जंएव्हा तुझ्या बुटांना असेच दिले आहे. 'गुदगुल्या' वगैरे व्हायचा चान्सच नाही मुळी!
(सावध)बेसनलाडू

त्या पत्रकाराला गृहमंत्र्यांवर बूट फेकल्याबद्दल २ लाख रुपये मिळाले !!!!!!!!!!!!!!!
सर्व बेकार आणि जागतिक मंदिमुळे नोकरी गमावलेल्यांना सर्वाना त्या पत्रकाराने पैसे कमवंण्याचा सोपा मार्ग दाखवला. चला मग बूट घेउन तयार रहा.

बाटा फ़ॅन अर्चिस

मैत्र's picture

8 Apr 2009 - 11:46 am | मैत्र

सही लिहिले आहे...
'जुळले बुटाबुटाचे नाते तुझे नि माझे'
'जेंव्हा तुझ्या बुटांना उडवी दलेर माझा'
झकास!!

अवांतरः आपल्या लेखात आम्हाला भाईकाका दिसले

बेसनलाडू's picture

8 Apr 2009 - 11:56 am | बेसनलाडू

जुळले बुटाबुटाचे नाडे तुझे नि माझे हवे होते. :D लेखात त्यानुसार बदल करतो ;)
(नातलग)बेसनलाडू

श्रावण मोडक's picture

8 Apr 2009 - 11:59 am | श्रावण मोडक

लेख चांगला. त्या पत्रकाराने निषेध व्यक्त करण्यासाठी तो बूट चक्क 'हा घे कॅच' असं म्हणत टाकला. त्या कृतीला "जोडा फेकून मारला" या स्तरावर नेले पत्रकारांनी. थोरच ते. अतिशयोक्ती अलंकार तो. बाकी काही नाही.
तो पत्रकार अशा ठिकाणी बसला होता की, गृहमंत्र्यांना जोडा मारणे अशक्य नव्हते आणि त्याने तसा मारला असता तर चिदंबरम यांना तो चुकवता आलाही नसता. तीन-चार फुटांमध्ये काही करण्यासाठी लागणारी चपळता व जागरूकता आपल्या गृहमंत्र्यांमध्ये असेल असे वाटत नाही.
बाकी या निमित्ताने इतरही काही प्रश्न निर्माण झाले. हा पत्रकार बदली कामगाराच्या भूमिकेत होता म्हणे. म्हणजे कॉंग्रेस पक्ष हे त्याचे बीट नाही. तरीही तो त्या पत्रकार परिषदेला गेला ते त्यांचा 'कॉंग्रेसमन' गैरहजर असल्याने. दुसरी बाब (अ)ज्ञानाची. सीबीआय गृह खात्याच्या कक्षेत येत नाही. ते येते पंतप्रधानांच्या अखत्यारित. या पत्रकाराचा अनुभव किमान दहा वर्षांचा असावा. त्याला हे ठाऊक नाही असे कसे म्हणता येईल. त्यामुळे तर्कसंगतरित्या त्याने जोडा फेकायचाच असेल तर तो पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर फेकला पाहिजे.
यापुढे पत्रकार परिषदेत जाताना पत्रकारांना चप्पल, बूट बाहेरच काढून ठेवण्यास सांगितले जाईल, असा एक एसएमएस काल घुमत होता.

बेसनलाडू's picture

8 Apr 2009 - 12:06 pm | बेसनलाडू

सीबीआय नि गृहखात्याचा काहीएक संबंध नाही, सीबीआय वर कोणत्याही मंत्रालयाकडून टायटलर यांची पाठराखण करण्याबाबत दबाव आणला गेलेला नाही, हे चिंदबरम यांनी एकदा नाही तर दोनदा सांगितल्याचे अंधुकसे आठवते (कदाचित एकदाच असेल) पण असे असतानाही पत्रकार महाशयांनी आपलेच आरोप/प्रश्न जे काही असेल ते पुढे रेटणे अनाकलनीयच वाटले; आणि अर्थातच यामुळे बूट फेकण्याचा बेत पूर्वनियोजित असावा, या संशयाला जागा उरते. एका बातमीत तर पत्रकार महोदय बुटाची नाडी सैल करूनच बसले असल्याचे वाचण्यात आले. अर्थात अशा मसालेदार बातम्या पुढचे दोन दिवस वाचायला मिळतीलच.
जोडा 'हाणायचाच' होता तर किमान शेवटच्या बेन्च वर बसून कॉलेजातली पोरे कागदी बाणांची जी मारामारी करतात, तसे तरी करायला हवे होते, असे वाटले. हे म्हणजे अगदीच खोटेखोटे, लुटुपुटूचे झाले राव! आणि भारतात असा 'आवाज' उठवायला या स्टन्ट् करायची गरजच काय (आणि तो ही हा असा!), हा प्रश्नही उरतोच. इराक नंतर चीन, आता भारत अशा पद्धतीने पत्रकार समुदायात या नव्या निषेधपद्धतीचा अवलंब होऊ घातला आहे, असे वाटते.
(वार्ताहर)बेसनलाडू

श्रावण मोडक's picture

8 Apr 2009 - 2:59 pm | श्रावण मोडक

असा खुलासा वाचनात आला आहे की, त्या वृत्तपत्राचा कॉंग्रेस बीटवरचा बातमीदारही तेथे उपस्थित होताच. म्हणजे जर्नेलसिंग हे चक्क अवांतर तेथे गेले होते.

पिवळा डांबिस's picture

9 Apr 2009 - 12:40 am | पिवळा डांबिस

बेला, मस्त लेख!!
"पादत्राण" या शब्दाला हसल्याबद्दल लहानपणी आम्हीही शाळेत छडी खाल्लीय!!!:)
बाकी असा फर्मास लेख लिहिल्याबद्दल आमच्या कातड्याचेच जोडे करून तुमच्या पायात घातले पाहिजेत, तुमचा बुटाचा नंबर कळवा!!!
:)

मदनबाण's picture

9 Apr 2009 - 4:35 am | मदनबाण

छान लेख...

(एकदा पायात खडावा घालुन पाहिले पाहिजेत...कसं वाटतं ते तर कळेल)
मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.