मैत्रिणीचा नवरा
परवा मैत्रिणीकडे गेलो होतो, तिचं लग्न ठरल्याचं कळलं होतं. तीने भेटायला सहजचं बोलावलं होतं, पण गाठ पडली तिच्या भावी नवऱ्याशी. बऱ्याच गप्पा झाल्या. इकडच्या तिकडच्या. मला फार प्रश्न पडतात बोलताना, की हं, हे झालं; आता काय बोलायचं? त्याला तसले काही प्रश्न पडत नव्हते. मुळात स्वत:बद्दलच फक्त बोलायचं असेल तर असले प्रश्न पडत नाही साधारणपणे.
तिच्या वडिलांना भेटलो नंतर. काका एकदम खुश. माझ्या पाठीवर गुद्दा मारत म्हणाले, “मग? कसा वाटला आमचा जावई?”
जे वाटलं ते सांगण्यासारखं नव्हतं आणि त्या ऐवजी वेगळं काही सांगण्याइतकी प्रतिभा नव्हती. त्याच्याशी झालेलं सगळं संभाषण नजरेसमोरून जायला लागलं.