परवा मैत्रिणीकडे गेलो होतो, तिचं लग्न ठरल्याचं कळलं होतं. तीने भेटायला सहजचं बोलावलं होतं, पण गाठ पडली तिच्या भावी नवऱ्याशी. बऱ्याच गप्पा झाल्या. इकडच्या तिकडच्या. मला फार प्रश्न पडतात बोलताना, की हं, हे झालं; आता काय बोलायचं? त्याला तसले काही प्रश्न पडत नव्हते. मुळात स्वत:बद्दलच फक्त बोलायचं असेल तर असले प्रश्न पडत नाही साधारणपणे.
तिच्या वडिलांना भेटलो नंतर. काका एकदम खुश. माझ्या पाठीवर गुद्दा मारत म्हणाले, “मग? कसा वाटला आमचा जावई?”
जे वाटलं ते सांगण्यासारखं नव्हतं आणि त्या ऐवजी वेगळं काही सांगण्याइतकी प्रतिभा नव्हती. त्याच्याशी झालेलं सगळं संभाषण नजरेसमोरून जायला लागलं.
पूर्णत: unbiased असा त्याला भेटलो. माझ्याशी होणाऱ्या पहिल्याच भेटीत साहेब तिच्या खांद्यावर हात टाकून बसले होते. मला ते जsssssरा खटकलं आणि मी biased झालो.
तो- मी अमुक अमुक ठिकाणी तमुक काम करतो.
मी- अरे वा, छानच. {मग?? विशेष काय त्यात}
तो- मला हे आवडतं, मला ते बनवायला येतं आणि हे फारंच छान जमतं.
मी- वा, अगं भारीचे तुझा मित्र. (त्या क्षणी देखील मी त्याला भावी नवऱ्याचा दर्जा दयायला तय्यार नव्हतो)
{ते बनवायला येत? लग्नानंतर तिलाच करायला लावशील ना पण??, छान जमतं? करून दाखव मग, तोंडची हवा कशाला दवडतोस}
हे आणि असं बरंच काही. शेवटी काकांना मी म्हणालो. “ती आनंदात राहील”. कारण तो कसा आहे हे मी सांगूच शकलो नसतो. का कोण जाणे, तो मला व्यक्ती म्हणून पटलाच नव्हता.
पण तीला हवं ते सगळं देऊ शकेल तो तीला; अशी एक समजूत मी करून घेतली.
त्यानंतरचा पुन्हा एक प्रसंग. दुसरी मैत्रीण. खूप वर्षांनी लग्न ठरलेली. मस्त स्वभाव. हुशार. मनात आणेल तर कुणीही पट्कन लग्नाला तयार होईल असं एकंदर व्यक्तिमत्व. तिच्या होणाऱ्या नवऱ्याला भेटलो.
अरे कसा आहे हा?? दुसरा कुणी मिळाला नाही का हीला इ. उद्गार नंतरच्या चहापानात मित्रांकडून उमटले (म्हणजे फक्त मलाच तो खटकला नव्हता तर).
म्हटलं असं का होतं? मैत्रिणीचा नवरा कायम व्हिलनच राहणार का आपल्या मनात. मी त्याला सहजासहजी accept का करू शकत नाही. त्याच्यातला खाचाखोचा का दिसतायत?
बर ह्या मैत्रिणींशी माझी फक्त मैत्रीच होती, आजही आहे. त्यामुळे “हृदयावर ठेच” सारखा प्रकार नव्हता.
मग मी जोरदारच विचार सुरु केला, ह्या माझ्या वागण्यावर.
अरे बारीक सारीक गोष्टी मला विचारणारी ही, एक दोन भेटीत त्याची झालीय. त्याने सांगितला तो मोबाईल फोन घेतला. मागच्या वेळी माझा फोन लागला नाही तर हीच laptop च्या दुकानात बसून राहिली होती. मी घे म्हणाल्यावरच laptop घेतला. तीच्यासाठी ट्युशन क्लासच्या शोधात मी वेड्यासारखा उन्हात फिरलो होतो. मी आहे म्हणून काकांनी बिन्धास्त लांबच्या ट्रीपला पाठवलं होतं.
आणि ही, रोज संध्याकाळी माझ्याशी गप्पा मारणारी, वेळ प्रसंगी हक्काने माझे कान ओढणारी, आज काल स्वत:हून एकही मेसेज करीत नाही. उपदेशाचे डोस पाजणारी, आयुष्यातील सौंदर्याबद्दल बोलणारी आता फक्त त्याच्याच बद्दल बोलत राहते. भेटूया म्हटल्यावर, त्याची ऑफिसची वेळ पाहून आमची वेळ ठरवते, का तर घरी एकटीने जायला नको. अगं आठव. पाहते ४ वाजता तुला वाट वाकडी करून सोडायला आलोय.
छे, जवळच्या मैत्रिणीच लग्न ठरण हे जेवढं तिच्यासाठी आनंददायी तेवढंच मित्रासाठी क्लेशदायी. एक नकोसं, दुराव्याची जाणीव करून देणारं वलय तिच्याभोवती दिसू लागतं. पूर्वी जिच्यासोबत एका गाडीवरून भटकलो, तिच्याशी हस्तांदोलन करताना पण जरा कचरायला होतं. “त्याला आवडलं नाही तर?”. दुराव्याच्या नियमांची जाणीव करून देणारी घंटा क्षणोक्षणी मनात वाजायला लागते. पूर्वी जिला “ए पळ, मला काही सांगू नकोस, आत्ता भेट मला” असं म्हणायचो, तिला “बघ म्हणजे, भेटावसं वाटतंय, तुला जमलं तर भेटू” असं म्हणावं लागतं.
आता तो पहिल्या प्रसंगातला मुलगा, तो चांगला असेलही पण मनात जो ग्रह झाला तो झालाच. किंवा हा दुसरा टिकोजीराव. त्याच्यासोबत ती सुखात राहीलही, पण माझ्या मैत्रिणीला माझ्यापासून दूर नेणारा व्यक्ती “हा” आहे ही जाणीव कदाचित फार जोर धरते. त्याच्या प्रत्येक बोलण्याचा मनात विपर्यास केला जातो, त्याची प्रत्येक सवय ही चुकीचीच वाटू लागते.
बापरे, माणूस म्हणून विकसित होऊन आपण आपल्या भावभावनांनी सगळं फारच क्लिष्ट करून ठेवलंय. अजून लग्न व्हायचीयत. नंतर किती त्रास करून घेणारे मी कुणास ठाऊक. ह्यावर सोपा उपाय म्हणजे त्या जशा नवरामय झाल्यात तसं मी देखील बायकोमय होऊन जाणं. हे एक बरं आहे मात्र, एक अत्यंत जवळची मैत्रीण माझी बायको होणारे. तेवढाच त्रास कमी.
आता सहज म्हणून त्याच्या दोघांच्या खांद्यावर दोस्तीची थाप मारली असती, एखादा चहा पाजला असता तर क्षणात हा दुरावा थोडा तरी कमी झाला असता की नाही... पण सुचत नाही असलं काही त्यावेळी. च्यायला. आणखी एक मैत्रीण लवकरच तिच्या घरी announcement करणारे. तेव्हा तीही भेटायला बोलवेलच तिच्या भावी नवऱ्याला. तेव्हा हे सगळं मंथन आठवून नीट वागण्याची सुबुद्धी व्हावी.
- (हळवा) केदार पाध्ये
प्रतिक्रिया
12 Nov 2017 - 7:16 am | रेवती
प्रामाणिक लेखन आवडलं. असा विचार असू शकेल हे कधी मनात आलं नव्हतं. म्हणजे आई वडिलांना, भावा बहिणींना वाटलं तर ते साहजिकच आहे असं वाटत होतं. मित्रांची लग्नं झाली तेंव्हा माझे आधीच झाल्याने काही वाटल्याचं आठवत नाहिये. मित्रांना असं काही वाटलं असेल का? माहित नाही.
बापरे! आता हा वेगळाच दृष्टिकोन समजला. क्षणभर अवघडल्यासारखं वाटलं.
12 Nov 2017 - 9:22 am | आगाऊ म्हादया......
ह्या मनापासून लिहिलेल्या प्रतिसादाबद्दल. प्रतिसाद पाहून माझ्यासारख्याला, आपण अगदीच दुर्लक्षिण्यासारखं लिहीत नाही एवढं कळलं तरी छान वाटतं.
मुळात हा लेख नाही, मनातलं द्वंद्व प्रामाणिकपणे कागदावर उतरवलं आहे. जे तुम्ही करेक्ट ओळखलंत.
12 Nov 2017 - 8:09 am | भीमराव
प्रेमापेक्षा मैत्रीच जास्त घट्ट असते, १ वेळ आयटम कि शादी झाल्यावर मनाची समजुत घालता येते,पण मैत्रीणीचा नवरा पचायला आणि समजुन घ्यायला सुद्धा जड गोष्ट आहे, म्हणजे बघायला गेलं तर तिच्यावर आपला काही हक्क नाही, लग्नानंतर ती तीच्या संसारात गुंतुन जानार हे माहित आहे, तरी ती ईतक्या लवकर विसरेल हे मात्र मन मान्य करत नाही.
12 Nov 2017 - 8:55 am | आगाऊ म्हादया......
हेच मांडायचा प्रयत्न आहे. क्षणात परकं होतं सगळं
12 Nov 2017 - 12:56 pm | मराठी कथालेखक
छान लिहिलंय...
पण लग्नापेक्षाही मुलं झाल्यावर मैत्रिणी जास्त दुरावतात असा अनुभव आहे :)
मी नोकरीसाठी दूसर्या शहरात जाणार म्हंटल्यावर माझी मैत्रिण मला आवर्जुन भेटायला आली होती (नवर्यासकट.. पण ठीक आहे)..त्यावेळी तिला मूल नव्हते... तेच एक-दीड वर्षापुर्वी माझा अपघात झाला, शस्त्रक्रिया झाली पण एकाच शहरात असून तिने केवळ फोन केला... भेटायला येणं काही तिला जमलं नाही....वाईट वाटलं , पण काय करणार.. तिच्या मुलीचा जन्म माझ्या वाढदिवसाचा, इतकी सहज खूण असूनही तिला माझा वाढदिवस लक्षात रहात नाही.. मग काय आता मी ही तिचा वाढदिवस ठरवून विसरतो :)
12 Nov 2017 - 7:23 pm | आगाऊ म्हादया......
सोयीने वाढदिवस विसरावा लागणं ह्या सारखंही दु:ख नाही
12 Nov 2017 - 9:22 pm | मराठी कथालेखक
हं.. म्हणजे मी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देवू शकतो.. त्यास काही बंधन नाही.. पण काय होतं ना की मग माझ्याही मनात अपेक्षा, वाढदिवसाच्या दिवशी तिच्या संदेश्/कॉलची वाट पहाणं हे होत आणि अपेक्षाभंगातून दु:ख.. त्यापेक्षा 'जा ...तू माझा वाढदिवस नाही लक्षात ठेवत ना, तर मी पण नाही ठेवत तुझा लक्षात..' असं म्हणत डोक्यातून विषय काढून टाकणं सोपं वाटतं.
12 Nov 2017 - 1:51 pm | पद्मावति
लेखन आवडलं. वर रेवा म्हणतेय तसे आई वडील, भावांना असे वाटते याची मला कल्पना होती पण चांगल्या मित्राच्या सुद्धा अशा भावना असु शकतात हे पहिल्यांदाच कळलं. लग्न हा फार मोठा बदल असतो, संक्रमणाचा काळ. फक्त वर वधु साठीच नव्हे तर त्यांच्या आई, वडील, मित्र मैत्रिणींसाठी सुद्धा. त्यामुळे मैत्रीण आपल्यापासून दूर जातेय असे वाटणे साहजिक आहे.
12 Nov 2017 - 7:25 pm | आगाऊ म्हादया......
ह्या अशा भावना असू शकतात हे माझ्या अनेक मित्रांना मी लिहिल्यानंतरच कळलंय. त्यांना कदाचित शब्दबद्ध करता आलं नसेल, मला आलं इतकंच
12 Nov 2017 - 1:59 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर मनोगत ! मनातिल भावना शब्दांत फार अचूकतेने पकडण्याचे वाखाणण्याजोगे दुर्मिळ कसब तुमच्याकडे आहे !!
जे संबंध खूप जवळ येणार नाहीत / आणायचे नाहीत त्यांच्याबद्दल फार मोठी मानसिक गुंतवणूक करण्याचे टाळले पाहिजे. जसजसे दिवस जातात तसतसे सगळे आपापल्या वेगवेगळ्या वैयक्तिक जीवनात गुंतत जातात आणि मग त्यांचे मार्ग एकमेकापासून दूर जातात... हे नैसर्गिक आणि अटळ सत्य आहे, नाही का ? हे कळल्यावर आपल्या मनाचा मूळ स्वभाव बदलेल असे नव्हे... पण त्याला वस्तूस्थिती पचवून घेण्यास मदत होईल, इतकेच !
12 Nov 2017 - 7:33 pm | आगाऊ म्हादया......
4 हात लांब राहून भावनिक गुंतवणूक टाळणं हे ऑफिस कलीग्स च्या बाबतीत अगदी जमलेलंय. पण ही मैत्री झाली तेव्हा एवढ्या गोष्टी कुठे कळत होत्या.
अनेक आठवणी देऊन माणसं अशी हळू हळू दुरावतील, आपल्याला ते समजत असेल पण आपण काहीही करू शकणार नाही हे कळण्यासाठी वय फारच लहान होतं.
तुम्हाला प्रतिसाद देताना लक्षात आलं, गेल्या 6 वर्षात मला कुणी नवीन जिवाभावाच्या मैत्रिणी मिळाल्याचं नाहीयेत. काहीतरी गोम आहे माझ्यातच. किंवा ह्या जुन्याच मैत्रिणींनी माझं आयुष्य इतकं व्यापलं होतं की बाकी कुणाशी बोलायला सवडच झाली नाही.
12 Nov 2017 - 9:16 pm | मराठी कथालेखक
हं.. माझंही असंच झालंय.. लग्नानंतर मला कुणी नवीन मैत्रीण मिळाली नाही..नाही म्हणायला बायकोची एक चांगली मैत्रीण आहे जिच्याशी मी आता सहज , मोकळेपणाने बोलू लागलोय ...एका मित्राची बायको आहे जिच्याशी अगदी मोकळेपणानं बोलणं अगदी वाद वगैरेसुद्धा मस्त होतात..
पण खरं सांगायचं तर नवीन मित्रही मिळाले नाहीत फारसे.. जसंजसं वय वाढतं तसतसं मैत्री होण्याला जास्त अवधी लागतो असं मला वाटतं. ;लग्नानंतर बरेचदा आपण वेळ देवू शकत नाही, तेच समोरच्या व्यक्तीबद्दलही होतं. लग्नापुर्वी मित्र-मैत्रिणींसाठी सहज वेळ काढता यायचा लग्नानंतर अनेकदा ते खूप कठीण होतं ... अगदी मित्राला भेटायचं म्हंटलं तरी सपत्नीक भेटच होते. मग चौघांचे वेळापत्रक जमल्यासच भेट होते. पण भेटीत खूप आपुलकी असते हे मात्र नक्की.
वयाप्रमाणेच नोकरीतले बदल, नोकरीतला वाढलेला हुद्दा हे पण मुद्दे जवळीकीची मैत्री व्हायला बाधक ठरतात.. मी मॅनेजर असताना माझ्या हाताखाली काम करणार्यांसोबत (खास करुन वयाचा /हुद्द्याचा फरक जास्त असल्यास) मोकळेपणा येत नाहीच. आणि जे बरोबरीचे असतात त्यांच्याशी रोज काम पडत नाही, कामानिमित्ताने होणारा संपर्क कमी असतो म्हणून जवळीक वाढत नाही... असो ही पण एक स्थिती (फेज ) आहे जी मागे पडेल...
12 Nov 2017 - 4:58 pm | पगला गजोधर
छान लिहिलंय...
कन्फ्युजनही कन्फ्युजन है
सोल्युशन कुछ पता नहीं
सोल्युशन जो मिला तो साला
क्वेश्चन क्या था पता नहीं
.
.
होठ घुमा, सीटी बजा,
सीटी बजाके बोल, भैया-
..ऑल इज वेल ..
12 Nov 2017 - 7:35 pm | आगाऊ म्हादया......
12 Nov 2017 - 7:38 pm | आगाऊ म्हादया......
12 Nov 2017 - 6:43 pm | गामा पैलवान
आगाऊ म्हादया,
थोडा आगाऊपणा करून सांगू इच्छितो की लेख बायकी आहे. बायकी लेख म्हणजे बायकांना आवडणारा. मला कोणीच जवळची मैत्रीण नसल्यामुळे मी या अवस्थेतून गेलेलो नाही. म्हणूनंच मी जे सांगतो तो आगाऊपणा वाटेल कदाचित. हे आगाऊच सांगितलेलं बरं नाहीका? ;-)
हां, तर मुद्दा काये की मैत्रिणीचा नवरा हा प्रकार आपल्याला फारसा ठाऊक नाही. पण सगळ्या बायकांचं सारखंच असतं. मग एक मैत्रीण गेली तर दुसरी करता येते की. आता, 'सगळ्या बायकांचं सारखंच असतं' हे विधानसुद्धा माझं नसून एका मैत्रिणीचंच आहे. त्यामुळे उपरोक्त न्यायाने एक मैत्रीण 'गेली' तर दुसरी 'करणं' हे सुद्धा बायकी प्रकरणच झालं नाही का?
जाम गडबडगुंडा झाला आहे. माझ्यासाठी कोणीतरी पुरुषी लेख लिहावा असं वाटतंय.
आ.न.,
-गा.पै.
12 Nov 2017 - 7:20 pm | उपेक्षित
बायकी लेख ? बर मग असला तरी त्यात वाईट काय आहे ?
तुम्ही लिहा मग एखादा खंग्री पुरुषी लेख, (हा आपला माझा न मागता दिलेला आगाऊ सल्ला आहे )
12 Nov 2017 - 7:26 pm | गामा पैलवान
अहो, बायकी लेखांत वाईट काहीच नाही. आणि मला तर लेख लिहिता येणार नाही. कारण मी या अनुभवांतून गेलेलो नाही. कोणीतरी पुरुषी लेख लिहायला पाहिजे. बस, इतकंच.
आ.न.,
-गा.पै.
12 Nov 2017 - 7:50 pm | पगला गजोधर
जाऊ द्या हो आगाऊ महादयाजी, त्यांना बायकी (बायकांना आवडणारे) लेख नसतील आवडत...
त्यांना कदाचित हॅप्पी अँड गे, प्रकारचे लेख आवडत असतील...
12 Nov 2017 - 11:56 pm | गामा पैलवान
प.ग.,
तुम्ही दाखवलेल्या आस्थेबद्दल आभार. हॅप्पी अँड गे प्रकारचे लेख कशाला म्हणतात ते मला माहित नाही. मला पुरुषी दृष्टीकोनातनं लिहिलेला लेख हवाय ही इच्छा वर नोंदवली आहे.
आ.न.,
-गा.पै.
13 Nov 2017 - 7:04 am | आगाऊ म्हादया......
असो, मी माझी भूमिका मांडली ब्वा
13 Nov 2017 - 7:02 am | आगाऊ म्हादया......
पण असं ठरवून मला लिहिता येणार नाही काहीच. जे आहे ते असं आहे, जे वाटलं ते असं आहे.
लेख बायकी असण्याचं कारण नाही, कारण तो एका पुरुषाने लिहिला आहे. हळवं होऊन लिहिलं म्हणजे बायकी झालं असं मला तरी वाटत नाही.
ह्या आधीच माझं लेखन पण असंच "मनातलं कागदावर" ह्या प्रकारातील आहे.
12 Nov 2017 - 7:38 pm | चौथा कोनाडा
छान लिहिलं आहे !
हे त्रिकोण सदृश्य विषय पाहून बऱ्याच सिनेमाच्या कथा आठवल्या. उदा. आपकी कसम
13 Nov 2017 - 7:12 am | आगाऊ म्हादया......
त्रिकोण सदृश पण नाही काहीच. उलट मीच तिचं एके ठिकाणी जुळवायचा प्रयत्न केला होता, अर्थात तिच्याच सांगण्यावरून.
13 Nov 2017 - 9:29 am | पगला गजोधर
शाहरुखचा 'परदेस' ?
12 Nov 2017 - 9:48 pm | पिशी अबोली
छान लिहिलंय तुम्ही...
माझ्या मित्रांच्या बाबतीत मात्र त्यांची लग्नं ठरल्यावर 'याला एवढी चांगली बायको कुठून बुवा मिळाली' असंच वाटलंय बर्याचदा. ;)
पण त्या मुलींशी चांगली मैत्री होऊनही संसाराला लागलेले मित्रही हळूहळू दुरावतात हे खरं आहे. नशीबाने ज्या मित्र-मैत्रिणींचं एकमेकांशी लग्न झालंय, त्यांची घरं अजून दंगा घालायला मोकळी आहेत म्हणून बरं...
13 Nov 2017 - 7:13 am | आगाऊ म्हादया......
नशीबवान आहात
12 Nov 2017 - 9:55 pm | गवि
हं. शुद्ध मैत्रीण.. मस्त मैत्री.. नितळ निखळ स्वच्छ मैत्री..
हं..
गहन आहे विषय.. चालूदेत चर्चा.. ;-)
13 Nov 2017 - 10:51 am | धर्मराजमुटके
गहन विषय आहेही आणि नाहीही.
तुमचं नी माझं वय झालयं (मानसिक म्हणा हवे तर )अस म्हटल्यास वावगे ठरु नये. मागच्या पिढीत मुळात मुला मुलींना एकमेकांशी बोला-चालायचीच मारामार होती त्यामुळे विरुद्धलिंगी व्यक्ती दिसली की मैत्री करण्याऐवजी दुसरे नाते प्रस्थापित करण्याचा हिरिरीने प्रयत्न होत असे. त्यामानाने आताच्या पिढीच्या मुलामुलींत एकमेकांबद्दल मोकळेपणा आहे. त्यामुळे हा विषय एका पिढीसाठी गहन होता. कदाचित नवीन पिढीसाठी नाही.
12 Nov 2017 - 10:57 pm | पगला गजोधर
आमच्या मेक इंजि च्या(पक्षी: दुष्काळी) क्लासमधे, तर मैं प्या कि चा डायलॉग,
"एक लाडका और एक लडकी, कभी "सिर्फ" दोस्त नही हो सकते"....
वारंवार उल्लेखला जायचा...
12 Nov 2017 - 11:16 pm | सुबोध खरे
आमच्या सोसायटीत आम्ही १६ मुलगे आणि १४ मुली असूनही एकही प्रेमविवाह झाला नाही कि कोणीही कुणाला राखीसुद्धा बांधली नाही. सरळ स्वच्छ मैत्री होती त्यामुळे आमच्या शेजारी/ आजूबाजूला राहणाऱ्या समवयस्क मैत्रिणी यांची लग्नं ठरल्यावर सुरुवातीला आम्हाला कुतूहल सोडलं तर फारसं काहीच वाटलं नव्हतं.उलट त्यांच्या नवर्यांना आमच्या मोकळेपणा बद्दलच साशंकता असावी. परंतु जशा जशा ओळखी वाढल्या तसे त्यांना आमच्या सोसायटीत असणाऱ्या निखळ मैत्री बद्दल खात्री पटत गेली आणि नंतर काही वेळा परिस्थिती अशी झाली कि त्या मैत्रिणींपेक्षा नवऱ्यांबरोबर जास्त जवळीक झाली आहे.
एका विशिष्ट वयानंतर मुलींच्या "आया" होतात आणि मग त्यांच्या बरोबर गप्पा मारायचे विषय कमी होतात आणि त्याऐवजी त्यांच्या नवऱ्यांबरोबर वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायला जास्त मजा येते म्हणूनही असू शकेल. परंतु आम्ही आमच्या मैत्रिणींच्या घरी नाशिक पुणे अलिबाग अशा ठिकाणी जेवायलाही जाऊन आलो आहोत आणि त्यात स्वच्छ पारदर्शक जवळीकही आहे. आता त्यांचे नवरे रस्त्यात भेटले कि अर्धा अर्धा तास गप्पाही सहज होऊ शकतात
13 Nov 2017 - 7:17 am | आगाऊ म्हादया......
तिचा नवरा अन आम्ही सहन डिनर ला भेटतो. तिलाच त्रास नको म्हणून बोलावतो कधीतरी. पण तुमच्यासारखी घनिष्ट मैत्री नव्हती तिच्याशी कधीच. त्यामुळे तिच्या लग्नात फार काही वाटायची वेळ आली नाही.
13 Nov 2017 - 12:38 am | फारएन्ड
यावर एक उपाय म्हणजे ग्रूप मधे सर्वात आधी आपणच लग्न करून टाकावे ;) याचे बरेच फायदे आहेत. आपल्या लग्नात इतर सगळे सिंगल्स असतात त्यामुळे ते ही धमाल करतात व आपल्यालाही मजा येते. दुसरे म्हणजे त्या आधी ४-५ वर्षे गाढ जमलेल्या व पूर्ण वेळ एकमेकांसाठी उपलब्ध असलेल्या लोकांचे हळुहळू ग्रूप मधे येणे कमी होत जाणे आपल्याला पाहावे लागत नाही. कारण आपण त्याच्या दुसर्या बाजूला असतो.
जस्ट किडिंग. अगदी मनापासून लिहीलेले आहे हे जाणवते. पण हे प्रत्येक ग्रूप्स मधले लोक जसे सिंगल असण्यावरून लग्न होण्याच्या ट्रान्झिशन मधे असतात त्या बहुतांश ग्रूप्स मधे हे अपरिहार्य असते. मात्र हे फार तात्पुरते फीलिंग असते हे लक्षात घेउन लोड घेउ नका. एक दोन वर्षांत प्रत्येकाच्या प्रायोरिटीज बदलणार आहेत व पूर्वी ज्या ग्रूप रिलेटेड गोष्टींचा तुम्ही खूप विचार करत असाल त्या गोष्टींचा नंतर तुम्ही फारसा विचार करणार नाही. ४-५ वर्षांनंतर हे तुमच्या लक्षातही राहणार नाही.
आणखी एक पोक्त सल्ला म्हणजे हॅव पेशन्स. त्या मुलींना (ग्रूप मधल्या मुलांचेही असेच होते पण मुलांमुलांच्या मैत्रीत अशी चर्चा सहसा होत नाही. त्यात लव्ह मॅरेज असेल तर अलिखित "ब्रो कोड" मधे हे गृहीत धरलेले असते की तिच्याबरोबर असताना तो आपल्या प्रोग्रॅम्स मधे येणार नाही. हे म्युच्युअली पाळले जाते) कोणी नवीन इण्टरेस्टिंग व्यक्ती भेटली आहे. ते फॅसिनेशन काही दिवस इतर सर्व गोष्टींना ओव्हरराइड करते. तुमची मैत्री स्ट्राँग असेल तर ती तुम्हाला पुन्हा नंतर काही काळाने वेळ्/अटेन्शन देइल. कदाचित ते पहिल्याइतके नसेल(आणि तेव्हा तुम्हालाही त्याचे काही वाईट वाटणार नाही). पण जे असेल ते पुढे कायम असेल.
Times change. People change.
13 Nov 2017 - 7:21 am | आगाऊ म्हादया......
13 Nov 2017 - 7:26 am | आगाऊ म्हादया......
13 Nov 2017 - 10:03 am | पाटीलभाऊ
सुंदर लेखन..अशाच परिस्तिथीतून गेलो असल्याने मनाला भिडले.
बाकी लग्नानंतर मैत्रिणी दुरापास्त होतात हे खरेच.
13 Nov 2017 - 10:39 am | नमकिन
प्रथमत: लेखक की लेखिका ओळखायला वेळ लागला,
दुसरे -जास्त मैत्रीणी (च) अवतीभवती असल्याने मनात एक व ओठात एक ही मानसिकता झालेली दिसते,
तिसरे- याला' हळवे पणा' हे गोंडस भ्रामक कोंदण देउन स्वत:बद्दल प्रतिमा बनवून त्यातच गुरफटलेले राहिलेत.
तुमचा वापर झालाय लेखक महादया, एक अंगरक्षक म्हणून.
प्रामाणिकपणा पटला.
बाकी मुलींशी बोल्लो की मुले लहानपणी "अंगुठी" बोटांनी आकार करुन का चिडवतात ते जरा सांगा ना?
पुरुषाचे कौटुंबिक कर्तव्य रक्षकाचे नीट पार पाडाल भावी आयुष्यात ही सदिच्छा!
13 Nov 2017 - 12:29 pm | आगाऊ म्हादया......
फक्त मैत्रिणी आहेत हे ही चुकीचंच. मी फक्त मैत्रिणींबद्दल लिहिलंय हे सत्य.
आणि हा हळवेपणाच आहे. प्रतिमा वगैरे बनवलेली नाही. तुम्हाला ते "असंच" मानायचं असेल तर त्याला मी काहीही करू शकत नाही.
बाकी माझ्यामुळे त्यांचं संरक्षण झालं असेल तर आनंदाचीच गोष्ट आहे कि ती.
14 Nov 2017 - 7:25 pm | नमकिन
वैज्ञानिक असे म्हणतात की विचार केंद्रे व त्याचा उद्दीपित क्रम हा स्त्री व पुरुषाच्या मेंदुत वेगवेगळा असतो व हाच महत्वाचा फरक आहे दोहोंत.
ते अंगुठी चे राहीलंच की?
13 Nov 2017 - 1:02 pm | जागु
प्रामाणीकपणे छान लिहील आहे.
13 Apr 2018 - 3:45 pm | आगाऊ म्हादया......
अनेक महिने इकडे फिरकलो नसल्यामुळे आज प्रतिसाद देतोय. माफी असावी.
13 Nov 2017 - 1:09 pm | गामा पैलवान
लोकहो,
मैत्रिणीपासून दुरावणं किंवा दुरावल्यासारखं वाटणं हे साधारणत: बायकांमध्ये जास्त प्रमाणावर आढळून येत असावं. असं माझं मत. मी या अवस्थेतून गेलो नसल्याने नीटसं सांगता येत नाही मला. अर्थात, त्यामुळेच की काय माझी भूमिका एखाद्या अनुभवाचा विषय होऊ शकंत नाही. तर अशा परिस्थितीतला लेख कोणी लिहील काय? किंवा अगोदर कुठे लिहिला गेला आहे काय? असल्यास वाचायला आवडेल.
आ.न.,
-गा.पै.
13 Nov 2017 - 4:36 pm | सुखीमाणूस
आयुष्यात बदल होणारच.
हे लक्षात ठेवून जगलात की फारसा त्रास होणार नाही.
उलट ह्या बदलांमुळे आयुष्य छान होत.
काही नातेसंबंध चिरंतन असतात. मैत्री हा नातेसंबंध तर बदलतोच.
आत्ता दुरावलेली शाळा व महाविद्यालयीन मित्र मैत्रिणी अचानक उतारवयात परत खूप जवळची होतात.
जो तो आपापल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या मधून मोकळा/मोकळी झाले आणि वाढत्या वयाची जाणीव झाली की परत जुनी मैत्री वाढते.
13 Nov 2017 - 8:36 pm | Naval
आमच्या सोसायटीत आम्ही १६ मुलगे आणि १४ मुली असूनही एकही प्रेमविवाह झाला नाही कि कोणीही कुणाला राखीसुद्धा बांधली नाही. सरळ स्वच्छ मैत्री होती त्यामुळे आमच्या शेजारी/ आजूबाजूला राहणाऱ्या समवयस्क मैत्रिणी यांची लग्नं ठरल्यावर सुरुवातीला आम्हाला कुतूहल सोडलं तर फारसं काहीच वाटलं नव्हतं.उलट त्यांच्या नवर्यांना आमच्या मोकळेपणा बद्दलच साशंकता असावी. परंतु जशा जशा ओळखी वाढल्या तसे त्यांना आमच्या सोसायटीत असणाऱ्या निखळ मैत्री बद्दल खात्री पटत गेली आणि नंतर काही वेळा परिस्थिती अशी झाली कि त्या मैत्रिणींपेक्षा नवऱ्यांबरोबर जास्त जवळीक झाली आहे.
एका विशिष्ट वयानंतर मुलींच्या "आया" होतात आणि मग त्यांच्या बरोबर गप्पा मारायचे विषय कमी होतात आणि त्याऐवजी त्यांच्या नवऱ्यांबरोबर वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायला जास्त मजा येते म्हणूनही असू शकेल. परंतु आम्ही आमच्या मैत्रिणींच्या घरी नाशिक पुणे अलिबाग अशा ठिकाणी जेवायलाही जाऊन आलो आहोत आणि त्यात स्वच्छ पारदर्शक जवळीकही आहे. आता त्यांचे नवरे रस्त्यात भेटले कि अर्धा अर्धा तास गप्पाही सहज होऊ शकतात.
अशाच काहीशा वातावरणात मीही वाढले.आमच्या कॉलनीत आम्ही मुलं फार मोकळेपणाने वाढलो. खरंच भाऊ बहीण होण्याची गरज नाही या सहजतेसाठी. बहुतेक मित्रांच्या बायका आता माझ्या मैत्रिणी आहेत आणि माझे मित्र माझ्या नवऱ्याचे चांगले मित्र.कुठलीही सक्ती नसतानाही असं झालं त्यामुळे मैत्री जपायला अधिक सोप्प होतं. माझ्या मित्रांचं माझ्यापेक्षा नवऱ्याशी बोलण्याचं प्रमाण आपसूक वाढत गेलं जे खूप स्वाभाविक वाटतं. आपण पुरुष किंवा स्त्री असण्याचं सारखं भान न बाळगता अगदी सहजतेने जपू शकलो तर हि मैत्री खूप समृद्ध करते. नाहीतर या मैत्रीतली ती सीमारेषा फार पुसट असते.
14 Nov 2017 - 3:21 pm | sayali
तुम्हाला असं वाटणं साहजिक आहे... खरेच मुलींचं भावविश्व बदलून जातं...त्या स्वतःच जरा भांबावल्या असतात. दुसर्या घरात त्यांना जुळवून घ्यायचं असतं...आणि तेथे नवरा एक जवळचा असतो... त्यामुळे थोडा दुरावा तुम्हाला जाणवणार...पण थोडे स्टेबल झाल्यावर परत निखळ मैत्री आपण अनुभवू शकतो... काही मर्यादा राखून..
मला वाटतं मुलींच्या बाबतीत मित्राची बायको आपली पटकन मैत्रीण होते..दोघीही संसारी झाल्यावर बरेचशे विषय कॉमन असतात. जरा विषयांतर झाले खरे..
पण मैत्रिणीला सगळे सगळे आठवत असते बरे..
14 Nov 2017 - 5:45 pm | आगाऊ म्हादया......
तिघांची तिकडी जमली तरी छानच.
14 Nov 2017 - 5:45 pm | आगाऊ म्हादया......
तिघांची तिकडी जमली तरी छानच.
15 Nov 2017 - 3:33 am | स्मिता.
मुली लग्न ठरल्यावर सर्वच मित्र-मैत्रिणींपासून दूर जातच असतात, त्याचे अनेक कारणं वर आली आहेतच. पण खासकरून मित्रांपासून दूर जाण्याचं कारणही वरच्या एक-दोन प्रतिसादांतून दिसतच आहे.
मुली कितीही पुढारलेल्या आणि मोकळ्या स्वभावाच्या असल्या तरी होणारा नवरा किंवा सासरचे लोक तिच्या मित्रांबद्दल तेवढेच मोकळे असतील असे नाही. काही लोकांना स्त्री आणि पुरुषांत निखळ मैत्री असू शकते हे झेपतच नाही आणि मुलींना त्याची पूर्ण जाणीव असते.
हे एकच कारण मुलींना मित्रांपासून दूर करतं असं नाही पण ते नक्कीच एक महत्त्वाचं कारण आहे.
16 Nov 2017 - 9:08 am | माझिया मना
मनापासून ..मनातलं
13 Apr 2018 - 3:47 pm | आगाऊ म्हादया......
अनेक महिने इकडे फिरकलो नसल्यामुळे आज प्रतिसाद देतोय. माफी असावी.