माझं करीयर मार्गदर्शन (!)
परवाच एक नात्यातला मुलगा भेटला. त्याने नुकतेच इंजिनियरिंग पूर्ण केले होते. भारतीय परंपरेप्रमाणे इंजिनियर झाल्यावर तो पुढे आयुष्यात आपण काय करायच ह्याचा विचार करत होता. बऱ्याच मुलांना इंजिनियरिंग हे आपलं क्षेत्र नाही ही जाणीव शेवटल्या वर्षपर्यन्त होते. पण इथपर्यन्त आलोच आहे तर शेवट बघूनच घेऊ, या विचाराने ते पदवी पूर्ण करतात. कारण इंजिनियरिंग हे मुंबई लोकलच्या गर्दीसारखं असते. लोकल मध्ये चढणं हेच एक आव्हान आहे. आणि एकदा चढलं की नक्की कुठे उतरायचं हे माहिती नसलं तरी आसपासची गर्दी आपल्याला तिथे उतरवतेच. मग स्टेशनचं नाव वाचल्यावर आपण चुकीच्या ठिकाणी आलो हे लक्षात येते.