कविता

एका उदास संध्याकाळी

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
5 Feb 2020 - 8:12 pm

एका उदास संध्याकाळी
कोणी गात होती विराणी ||

शब्दांत अशी आस नव्हती
चाल नव्हती अशी कोणती
धारही नव्हती त्या शब्दांना
तरी काळीज जाय चिरूनी ||

संधीप्रकाश निळा जांभळा
खालून गेला वर आभाळा
कुंद हवा अन वारा पडला
हवेत सूर राही भरूनी ||

धिरगंभीर सूर कवळूनी
गीत हृदयीचे आळवूनी
उलगडे आर्त सरगम
भरूनी राहिली कानी ||

- पाषाणभेद
०५/०२/२०२०

प्रेम कविताविराणीशांतरसकविताप्रेमकाव्य

(डबा)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
5 Feb 2020 - 10:09 am

पेरणा अर्थातच

(डबा)

आज पहाटे तो लवकर उठला
डबा उचलून धावत सूटला
लायनीताल्या लोकांना ढकलून दिले
दार जोराने बडवले

आताल्याला लवकर बाहेर बोलावले
जराही वेळ नाही असे सांगितले
आतले प्रकरण कुल वाटले
हालचालीच्या आवाजावरून मंद भासले

मनोमन स्वप्न रचले
वाटे आत गेल्यावर कोणी तरी म्हणावे
"अरे बाबा सावकाश आवर ,
होल वावर इज आवर"

आजची कथा अशी झाली
ज्याची बीजे त्याने कालच पेरली

( flying Kiss )काणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडरौद्ररसबालकथाकविताइंदुरीऔषधोपचारकृष्णमुर्ती

डबा

Rohini Mansukh's picture
Rohini Mansukh in जे न देखे रवी...
5 Feb 2020 - 9:23 am

आज पहाटे लवकर उठले
डब्यासाठी खास जिन्नस ठरवले
साजुक तुपात रव्यास भाजले
शिऱ्यात काजू बेदाणे घातले
मऊसूत पराठे भाजले
चमचमीत भरले वांगे केले
आमटी आणि भातही भरले
चवीला चटणी, कोशिंबीर दिले
आणि मनोमन स्वप्न रचले
वाटे आज तरी त्याने म्हणावे
"वा काय बेत होता,
आजचा डबा छानच होता."
ही झाली तिची बाजू
आता जरा त्याच्याकडे पाहू

हास्यकविता

'इमॅजिन' (कल्पना कर...)

कुमार जावडेकर's picture
कुमार जावडेकर in जे न देखे रवी...
1 Feb 2020 - 6:14 pm

(जॉन लेनन यांच्या 'इमॅजिन' या गीताचा स्वैर अनुवाद)

सहज कल्पना कर, स्वर्गच नसेल तर..
नरकही नसेल अन् होईल आकाश घर!
(कल्पना कर, जगेल जग आजचा प्रहर)

न देश, न देशभक्ती मारण्या-मरण्यासाठी
न धर्मही जीवनी या भरण्यासाठी जहर
(कल्पना कर, शांतता पसरेल दूरवर)

भासेल एकले स्वप्न, येतील ज्यात सकल...
अन् भिंतींविना दिसेल जग नितांत सुंदर!
(कल्पना कर, दृष्टीत येईल उंच शिखर)

लोभ, मोह ना अपेक्षा, उपेक्षाही ना कुणाची
निनादेल दाही दिशा विश्वबंधुत्वाचा स्वर!
(कल्पना कर, होईल हे विश्व बलसागर)

gajhalकविता

अनामिक

Rohini Mansukh's picture
Rohini Mansukh in जे न देखे रवी...
28 Jan 2020 - 10:14 am

भटक्यांना जसं
गाव नसतं
प्रत्येक नात्याला
नाव नसतं

ओळखदेख नसताना
आपण कुणाशीतरी हसतो
तीच तर पहिली पायरी
आपण तिथेच तर फसतो

कधीकधी एकमेकांशी
रंगतात गप्पा
हळूहळू व्यापू लागतो
मनातील कप्पा

बंधु, सखा, प्रियकर
नक्की कोण ते ठरत नसतं
आपल्याच भावनांचं आकलन
आपल्याला होत नसतं

समाजमान्य चौकटीत
ते बसणारं नसतं
म्हणूनच ते जास्त
फुलवायचंही नसतं

अचानक जुळून येतं
आणि अचानकच संपतं
एक आठवण बनून
फक्त मनामध्ये उरतं

मुक्त कविताकविता

एकदा तरी माती व्हावे

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
27 Jan 2020 - 9:57 pm

एकदा तरी माती व्हावे

कधीतरी इतरांच्या पायी जावे
एकदा तरी माती व्हावे

नको राग लोभ कशाचा
मी माझाच नाही आहे सर्वांचा
नको व्यर्थ माझे माझे करावे
एकदा तरी माती व्हावे

दैन्य इतरांचे पाहून
मग कळते मी किती सुखी ते
आपलेच सुख आपल्याला टोचावे
एकदा तरी माती व्हावे

चारी ठाव घरी खातसे
ताटात गरम पक्वाने
कागदावर अन्न केव्हातरी चाखावे
एकदा तरी माती व्हावे

वापरसी अंघोळीस पाणी मुबलक
फासशी साबण अंगास सुवासीक
शरीर सार्वजनीक स्नानास अनुकूल असावे
एकदा तरी माती व्हावे

शांतरसकवितासमाजजीवनमान

"शर"

परशु's picture
परशु in जे न देखे रवी...
24 Jan 2020 - 5:48 pm

माझ्या वडिलांची ५० वर्षांपूर्वीची कवितांची डायरी सांभाळून ठेवली आहे. वडील पत्रकार, कवी, संपादक होते. तरुण असतानाच गेले. त्या डायरीतील कविता खाली टंकत आहे. कवितेतला मला फारसा गंध नाही. मिपाकरांकडून जर काही रसग्रहण झाले वा प्रकाश पडला तर बरे ह्या उद्देशाने मिपावर टाकत आहे.

"शर"

माझ्या संज्ञेचा पारा....
पडलाय तुटून कुठंतरी
रडतय इथे मानवाचे चिरदुःख
हतभागी गुडघ्यात दुर्दैवी मान खुपसून
शतकानुशतके ...!

फ्री स्टाइलकविता

मास्तरा- जाशिल कधि परतून?

Sumant Juvekar's picture
Sumant Juvekar in जे न देखे रवी...
21 Jan 2020 - 11:17 pm

माझी ही एक कविता मी फार पूर्वी लिहिली होती. त्यानंतर काही मास्तर घरी येऊन मला फुकट गणित शिकवू लागले आणि ती संधी साधून या कवितेचा सूड म्हणून त्यांनी मला सडकून चोपले!!!

कविता

वणवा

चांदणशेला's picture
चांदणशेला in जे न देखे रवी...
21 Jan 2020 - 10:10 pm

गाव माझं सारं पेटलं
फुलांचं रान होरपळून गेलं

कुणी घातला हा विषारी विळखा
सोडूनी गेला कुठे दूर सखा
पापण्यांकाठी दु:ख ओलं थरथरलं

सुना झाला हा हिरवा मळा
जाळला कुणी माझा सुर्य कोवळा
डोळ्यांत आभाळ निळं गहिवरलं

केला तुझ्यासाठी प्राणाचा आडोसा
उरात भडकलेला वणवा विझवू कसा
देहात साऱ्या आठवणींचं जहर पांगलं

प्रेम कविताकविता

कुणी स्पेस देता का रे स्पेस?

अबोलघेवडा's picture
अबोलघेवडा in जे न देखे रवी...
21 Jan 2020 - 9:49 am

(वैयक्तिक सुखांपुढे इतर सगळं तुच्छ वाटणाऱ्या जोडप्यांना समर्पित)

सुखांची बिलकुल कमी नाही, मस्तच चाललंय आमचं
स्पेस मात्र मिळत नाही, काय बरं आता करायचं

येता जाता सिनेमे बघून, खुशालचेंडू जिणं जगतोय
महिन्याकाठी पोशाखांवर भरमसाठ खर्च करतोय
चंगळवादी मन झालंय, आयुष्य झालाय बाजार
स्पेस मात्र मिळत नाही, दाखल करू का तक्रार?

स्मार्टफोन हाती नसला की, जीव होतोय कासावीस
विकत घ्यायला जातो तेव्हा, करत नाही घासाघीस
ऐषारामात जगतोय आम्ही, माहीत नाही माघार
स्पेस मात्र मिळत नाही, दाखल करू का तक्रार?

कविताजीवनमान