(जॉन लेनन यांच्या 'इमॅजिन' या गीताचा स्वैर अनुवाद)
सहज कल्पना कर, स्वर्गच नसेल तर..
नरकही नसेल अन् होईल आकाश घर!
(कल्पना कर, जगेल जग आजचा प्रहर)
न देश, न देशभक्ती मारण्या-मरण्यासाठी
न धर्मही जीवनी या भरण्यासाठी जहर
(कल्पना कर, शांतता पसरेल दूरवर)
भासेल एकले स्वप्न, येतील ज्यात सकल...
अन् भिंतींविना दिसेल जग नितांत सुंदर!
(कल्पना कर, दृष्टीत येईल उंच शिखर)
लोभ, मोह ना अपेक्षा, उपेक्षाही ना कुणाची
निनादेल दाही दिशा विश्वबंधुत्वाचा स्वर!
(कल्पना कर, होईल हे विश्व बलसागर)
भासेल स्वप्न हे माझे, येतील ज्यात इतर...
अन् भिंतींविना दिसेल जग नितांत सुंदर!
(कल्पना कर, दृष्टीत येईल उंच शिखर)
- कुमार जावडेकर
प्रतिक्रिया
1 Feb 2020 - 8:13 pm | Rohini Mansukh
अनुवाद वाटत नाही ... Original वाटते
Original internet वर मिळेल का?
5 Feb 2020 - 12:43 am | एस
वाह! 'इमॅजिन' कानात रुंजी घालू लागलं अनुवाद वाचताना. फार फार छान! बादवे, जॉन लेनन चं स्वप्न खरंच सत्यात आलं तर! निदान जगातील एकूणच तिरस्कार कमी झाला तरी पुष्कळ झालं म्हणायचं. असो.