आज पहाटे लवकर उठले
डब्यासाठी खास जिन्नस ठरवले
साजुक तुपात रव्यास भाजले
शिऱ्यात काजू बेदाणे घातले
मऊसूत पराठे भाजले
चमचमीत भरले वांगे केले
आमटी आणि भातही भरले
चवीला चटणी, कोशिंबीर दिले
आणि मनोमन स्वप्न रचले
वाटे आज तरी त्याने म्हणावे
"वा काय बेत होता,
आजचा डबा छानच होता."
ही झाली तिची बाजू
आता जरा त्याच्याकडे पाहू
त्याच्या खास मित्राने
बढती मिळाल्याचे सांगितले
बास ते एक कारणच झाले
त्याच्याकडून पार्टी मागायचे
दुपारचे जेवण बाहेर घ्यावे
मस्तपैकी चिकन हाणावे
पण या डब्याचे काय करावे?
हां! तो एका मित्राला देऊन जावे
संध्याकाळी नवरोबा घरी आले
तिने हसून स्वागत केले
आडून आडून विचारून पाहिले
पण डब्याबद्दल काहीच नाही कळले
बरे आता थांबून रहावे
रात्रीच काय ते बोलून घ्यावे
रात्री गादीवर पडताना
तिने प्रश्न विचारला
"आज डबा कसा होता?
मेनू तुझ्या आवडीचा होता."
त्याचे मन गोंधळले
पण लगेच स्वतःस सावरले
"वा काय डबा होता,
बेसन लाडू तर झकास होता."
आणि विषय बदलायला
तिच्या गळ्याभोवती हात घातला
ती समजून गेली सारा मामला
निमूट चेहरा त्याच्या कुशीत लपवला
- सौ. रोहिणी विक्रम मनसुख
प्रतिक्रिया
5 Feb 2020 - 12:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कभी कभी ऐसा भी होता है. चालायचंच.
पण समस्त पुरुषांनी डबा कसा होता याची प्रतिक्रिया अवश्य दिली पाहिजे.
-दिलीप बिरुटे
5 Feb 2020 - 5:59 pm | चौथा कोनाडा
छान ! रोमॅण्टिक !
बायका सारं जाणून असतात हेच खरं !
5 Feb 2020 - 8:06 pm | श्वेता२४
जातानाच डबा स्पेशल असल्याचे सांगून किंवा इतर मार्गाने निरोप पाठवून कळवायचे होते. शिवाय डबा संपून आला नाही तर उद्या डबा मिळणार नाही अशी तंबी द्यायला हवी होती. काय बिशाद होती मग अशी थाप मारायची? ;)
आमच्या ऑफीसमधले एक सर अशी काही अचानक पार्टी झाली की त्यांचा डबा आम्हा तरुण पोरांच्या गळ्यात अगदी अजीजी करुन मारायचे. एवढे घाबरता का बायकोला असे विचारले तर ते म्हणाले माझी बायको प्रेमाने सकाळी उठून केवळ माझ्या एकट्या साठी डबा बनवते. यात गेली 20 वर्षे कधी खंड पडला नाही अन्नापेक्षा तिच्या प्रेमाचा व मेहनतीचा अपमान करवत नाही.
खूप छान वाटलं होतं ते उत्तर ऐकून
5 Feb 2020 - 8:08 pm | पाषाणभेद
तसे असते तर हे काव्य वाचायला मिळाले असते का!!!
झकास झाले आहे काव्य. मजा आली.
9 Feb 2020 - 10:45 pm | चांदणे संदीप
खरंच छान झालाय!
सं - दी - प
11 Feb 2020 - 7:55 am | विजुभाऊ
सुंदर लिहीलीय कविता
11 Feb 2020 - 2:59 pm | जालिम लोशन
सुरेख