फिर काहे दर्द जगाओ
तिच्या राज्ञीपदाच्या आयुष्यातला नेहमीसारखाच आजचाही दिवस.
पण आज सकाळपासूनच जीवात जीव नाही तिच्या. एकच हुरहूर लागून राहिली आहे..
तिच्या नवऱ्याला गोकुळाच्या वाटेचे वेध लागलेत. त्याची गोकुळाच्या आठवणींनी होणारी चलबिचल इतरांच्या नाही तरी तिच्या ध्यानी येते आहे.
आणि ते ध्यानी आल्यानेच ती अस्वस्थ झाली आहे.
हा गेला आणि पुन्हा 'तिचा'च होऊन राहिला तर?
त्याच्या आयुष्याच्या तळापासून भरून असलेला 'तिच्या'साठीचा जिव्हाळा तिला ठाऊक आहे.
पण आता पुन्हा.. इतक्या वर्षांनी..?
कसं रोखावं आता ह्याला? कसं सांगावं, पुन्हा नको त्या वाटांवरून चालूस?


