परका काळा घोडा

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in काथ्याकूट
20 Feb 2013 - 10:08 pm
गाभा: 

'मला ना, का कोणास ठाउक, इथे येऊन असं एखाद्या परक्या प्रांतात आल्यासारखं वाटलं.', माझी बायको म्हणाली. त्या वेळी, आणि त्या आधी तीन तास मला तेच वाटत होतं पण नेमक्या शब्दात मांडता येत नव्हतं.

दहावी झाल्यानंतरच्या मे महिन्याच्या सुट्टीत मित्रांबरोबर मुंबईला गेलो होतो तेंव्हाही हे असंच 'परक्या प्रांताचं' फीलिंग आलं होतं. पण तेंव्हा कुतुहल, उत्सुकता, या गोष्टी मोठ्या होत्या त्यामुळे ते तसं जाणवलं नाही. तिथली गर्दी परकी वाटली नाही, त्या गर्दीचा उबग आला नाही, गोंगाटाचा त्रास झाला नाही की काही नाही. या वेळी काळा घोडा कला उत्सवाला मात्र असं सगळं वाटलं. मन रमलं नाही.

आम्ही तिथे जायला उत्सवाचा शेवटचा दिवस निवडला होता. एक तर शेवटचा दिवस त्यात रविवार असं समीकरण होतं. मेगा ब्लॉक टाळावा म्हणून आम्ही गाडीने जायचं ठरवलं. मी, माझी बायको आणि माझी बहीण. अपेक्षेपेक्षा कमीच (आश्चर्यच!) वेळात आम्ही त्या इंग्रजांनी बांधलेल्या तरीही आपल्या 'सीएसटी' च्या इमारतीपर्यंत पोचलो. तिथून पुढे हुतात्मा चौकाजवळ एका गल्लीत गाडी पार्क करून आम्ही चालत काळा घोडा कडे निघालो.

एरवीपेक्षा त्या दिवशी तिथले पदपथ आणि त्यावर दुतर्फा असलेले विविध वस्तूंचे स्टॉल अधिक गजबजलेले होते. ‘शॉपर्स’ चा पूर आला होता. मग पुढे काळा घोडा उत्सवाचं मुख्य प्रवेशद्वार आलं. मित्राने फोन करून सांगितलं होतंच की 'तोबा गर्दी आहे'. पण प्रत्यक्ष बघून त्या 'तोबा' मागचा अर्थ कळलां. आणि तिथेच तेंव्हापर्यंत वाढत गेलेली उत्सुकता मावळायला सुरुवात झाली.

KG

लाईनीत उगीचच मागून धक्के देणारी बेशिस्त मंडळी होतीच. लाईन म्हटली आपल्याइथे, की 'घुसे' आलेच. मग 'हम भी लाईन में खडे है बॉस...' असे काहींचे इशारे. एक परदेशी माणूस मेटल डिटेक्टर मधून जाताना त्याच्या खांद्याखालून एक व्यक्ती घुसू पहात होती. 'आर यू स्पेशल??? आर यू स्पेशल???' असं जरा रागाने विचारत त्याने त्याला मागे ढोसलं. आणि मग तो माणूस मागे बघून कुत्सित हसू लागला. एकंदरित आत कसं न्यूसन्स वालं पब्लिक असणार याची कल्पना आली. आत गेल्यावर एक सर्वसाधारण सर्वमान्य नियम म्हणून डावीकडून जायला व उजवीकडून यायला असे दर्शक फलक होते. पण नियम मानू, त्यांचा मान राखू तर आम्ही कसले ! त्यामुळे कुणीही कसंही कुठूनही येत होतं जात होतं. वर बरोबर जाणा-यांकडेच रागाने बघत होतं. आणि आम्हाला कळेना की आम्ही कुठे जावं.

माझ्या बाजूला एक आजोबा उभे होते. कलेचे जाणकार होते हे नक्की; कारण तिथल्या एका शिल्पाकडे ते फार निरखून बघत होते, त्याला अभ्यासत होते. आणि मागून एक मुलगा आला, त्यांना बाजूला लोटत सोबतच्या दोन फॅशनेबल मुलींना जागा करून देत म्हणाला, 'हिलते नही है जगह से; बंदर साले'. प्रचंड तिडीक गेली डोक्यात. ही कोण माणसं, कोणाला शिव्या देतायत? आणि कसल्या ताकदीच्या जोरावर? आणि हीच माणसं आहेत जिकडे तिकडे, मग आपली माणसं कुठं आहेत? मुंबईची माणसं कुठं आहेत? की हीच; मुंबईची माणसं आहेत? असा विचार माझ्या मनात थैमान घालतो तोच लोंढ्याच्या सोबत मी स्टॉल्स कडे पावलं टाकायलां लागलो. सेलिब्रिटी देवस्थानांमधल्या रांगेप्रमाणे 'बेबी स्टेप्स' टाकत पुढे सरकत होतो. एखाद्या स्टॉल वर वाटलं की थांबून जरा बघाव्या तिथे असलेल्या कलाकृती, तर तसं करणं महाकठीण होतं. स्टॉल्स तुडुंब भरलेले होते, आणि लोकांच्या प्रवाहाला थांबायचं नव्हतं. द सिटी दॅट नेव्हर स्टॉप्स ना बाबा.

तिथे एका स्टॉल वर वाया गेलेल्या होर्डिंग्स पासून बनवलेल्या पर्स आणि बॅग विक्रीस ठेवल्या होत्या. 'ए वाव ! ये तेरे पर्पल ड्रेस पे क्या जाएगा !' 'नही रे ये बहोत रॉ लगता है. उसपे लेदर ही चाहिये' तिथे उभ्या दोन मुलीं बोलत होत्या. ते ज्याने बनवलं होतं त्याच्या चेह-यावर हे स्पष्ट लिहिलेलं दिसलं की 'माझी कल्पना, कला, मेहनत याचं काहीच नाही !' प्रत्येक स्टॉलवर काहीसं हेच चित्र होतं. की कला किंवा त्या कलाकृतीमागे लागलेली मेहनत याला किंमत नगण्य होती.

'हां हॅलो कहां है? अरे क्या यार. आय अ‍ॅम अ‍ॅट काला घोडा इट्स ऑसम मॅन' असं मित्राला फोनवर सांगणा-याला काळा घोडा फेस्टिवल म्हणजे काय हे कळलंच नव्हतं. त्याला फक्त उद्या मित्राला, कलीग्स ना, जाउन सांगायचं होतं की मी काळा घोडा ला जाउन आलो. काही मुलं आपल्या ग्रूप बरोबर ‘सहलीला’ आली होती, काही स्त्रीया तिथे लग्नसमारंभासारखे भरजरी कपडे दागिने घालून मिरवायला आल्या होत्या, काहीजण असंच मॉल मधे जाऊन कंटाळा आला म्हणून आले होते. मग तिथे मधेच उभं राहून हातातल्या टिचभर मोबाईलने फोटो काढणं; शूटिंग करणं असे प्रकार चालू होते. एकूणच तिथे आलेल्या गर्दीत बहुतांश मंडळी आपल्या कलासक्ततेचा शो ऑफ करायला आलेली होती. बाकी जण त्या मंडळींच्या गर्दीच्या धक्क्यांना नम्रपणे दुर्लक्षित करून काळा घोडा कला उत्सव अनुभवत होते.

तिथली घुसमट काही वेळातच असह्य झाली. तसंही नीट पणे काही बघता, न्याहाळता येतच नव्हतं. गाडी गाठली आणि आपलं शहर गाठलं. गोष्टी हाईप केल्या ना, की असं होतं. असे उत्सव कमर्शियलाइज झाले, की संपलं समजायचं. त्या उत्सवाचा गाभा, आत्मा हा विरून जातो. मला तरी तसंच वाटलं या वेळी. घरी आल्यावर प्रश्न झाला, ‘कसा होता काळा घोडा?’ मी म्हटलं, ‘खूपच काळा होता.’

प्रतिक्रिया

अँग्री बर्ड's picture

20 Feb 2013 - 10:39 pm | अँग्री बर्ड

आवडेश :)

सूड's picture

20 Feb 2013 - 10:40 pm | सूड

ह्म्म हा दुसरा !!

नाना चेंगट's picture

20 Feb 2013 - 10:43 pm | नाना चेंगट

हम्म..

एका काळ्या घोड्याबद्दल (उगाचच) फार प्रेम असलेल्या एका मिपासदस्याची आठवण आली..
हाय्फाय अन काय्काय...

पैसा's picture

20 Feb 2013 - 11:11 pm | पैसा

चांगलं लिहिलंय

लेखकाच्या चष्म्यातून वाचलं... इतर ठिकाणी बरंच सकारात्मक वाचलं.

ते ज्याने बनवलं होतं त्याच्या चेह-यावर हे स्पष्ट लिहिलेलं दिसलं की 'माझी कल्पना, कला, मेहनत याचं काहीच नाही !'

अगदी अगदी!!!!

टेक्सासमध्ये एका मॉलमध्ये कलाकार गॅलरी भरवतात. तिथे गेले होते. प्रत्येक कलाकार स्थानापन्न झालेली होती व तिच्या समोर तिने बनविलेले इयर रिंग्ज, भेटकार्डे आदि ठेवले होते. खूपशा वस्तू आवडल्या पण परवडत नव्हत्या. पण पायच काढवेना. शेवटी ५ डॉलरची २ की ३ भेटकार्डे घेऊन बाहेर पडले.
पण एक मात्र केले चिकीत्सा करणे टाळले. एवढ्या मिनतवारीने बनविलेल्या वस्तू आणि आपण मारे भाजीबाजारात गेल्यासारखी चिकीत्सा करायची हे रुचले नाही.

दादा कोंडके's picture

21 Feb 2013 - 2:02 am | दादा कोंडके

मी ही हल्ली गर्दीची ठिकाणं टाळतोच. काही ठिकाणी मात्र नाईलाज होतो. स्वच्छता, सौजन्य वगैरेंचे बारा वाजवत माणसातले रानटी प्राण्यांची 'माइट इज राइट' ची प्रचिती येते.

कवितानागेश's picture

21 Feb 2013 - 2:09 am | कवितानागेश

पहिल्या दिवशी यायला हवं होतं.. :)

मग पुढे दिसली नाहिस ति...

अर्धवटराव

घाशीराम कोतवाल १.२'s picture

21 Feb 2013 - 12:30 pm | घाशीराम कोतवाल १.२

अर्धवट राव अहो पहिल्या दिवशी मिपा कट्टा केला होता काळा घोडा फेस्टिव्हलला

अर्धवटराव's picture

22 Feb 2013 - 2:33 am | अर्धवटराव

आणखी एक कट्टा हुकला म्हणायचा :(

अर्धवटराव

:) एकदा का विठु चा 'विठोबा' झाला की भक्त मंदीर बदलतो म्हणतात!

आणि एकदा का गणपतीचा "राजा" झाला की देव उंदीर बदलतो म्हणतात..

नगरीनिरंजन's picture

21 Feb 2013 - 12:03 pm | नगरीनिरंजन

तळमळ पोचली. बर्‍याच जत्रांमध्ये असे अनुभव येतात.
तोबा गर्दी आहे हे माहित असूनही चुकीच्या वेळी गेलात ही एक चूक आणि गेल्यावर कलाकृती निरखण्याऐवजी कोण काय बोलतंय आणि करतंय ते निरखत बसलात ती दुसरी.
असो. गर्दीत अशा घटना घडणारच. पुढच्या वेळी आडनिड्या वेळेला जाऊन बघा, आणि पाहिलेल्या कलाकृतींचे रसग्रहण येऊ द्या.

सहज's picture

21 Feb 2013 - 2:12 pm | सहज

हेच लिहणार होतो.

ऑफ-पीक अवर आयुष्य त्यातल्या त्यात सुखी.

तुमचा अभिषेक's picture

21 Feb 2013 - 3:05 pm | तुमचा अभिषेक

मी देखील हेच लिहिणार होतो,
पोस्ट लिहायची मेहनत वाचली.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

22 Feb 2013 - 12:53 am | विश्वनाथ मेहेंदळे

तोबा गर्दी आहे हे माहित असूनही चुकीच्या वेळी गेलात ही एक चूक

मुंबईच्या एका टोकाला आहे ते काळा घोडा. सर्वांना वीकडे ला जाता येइलच असे नाही. वीकेंड मिळतात मोजून दोन. त्यातल्या एकाला तोबा गर्दी असते.

आणि गेल्यावर कलाकृती निरखण्याऐवजी कोण काय बोलतंय आणि करतंय ते निरखत बसलात ती दुसरी.

नाही हो ननि, दुर्दैवाने तसे करता येत नव्हते. मी शेवटून दुसऱ्या दिवशी गेलो होतो. शनिवारी रात्री. कलाकृती निरखायला उभे तर राहता यायला हवे. प्रचंड गर्दी. दिवाळीला आमच्या लहानपणी रानडे रोड ला असायची त्यापेक्षा जास्त. शिवाय फोटो काढणारे हवशे गवशे मध्ये येत होते. प्रत्येकाला फोटो काढायचा होता, पण तो कलाकृतीचा नव्हे तर त्याच्यासमोर आपण उभे असल्याचा. लगेच रात्री फेसबुकवर टाकायला असणार. कलाकृतीला दाद द्यायला वेळ कुणाकडे असतो हो...

त्यामुळे लेखकाची उद्विग्नता मी समजू शकतो. माझे पण काहीसे असेच झाले होते.

शुचि's picture

22 Feb 2013 - 1:07 am | शुचि

त्यामुळे लेखकाची उद्विग्नता मी समजू शकतो. माझे पण काहीसे असेच झाले होते.

हे वाक्य वाचेस्तोवर असा ग्रह झालेला की विमे=वेल्लाभट आणि विमे चुकून प्रतिसाद पहील्या आय डी ने देताहेत :(

विश्वनाथ मेहेंदळे's picture

22 Feb 2013 - 1:53 am | विश्वनाथ मेहेंदळे

इथे एका आयडीने एकही लेख नाही लिहिला आणि दुसरा काढून ४-५ कुठून लिहू हो ??

मी प्रतिसाद लिहून झाल्यावर मग जर वर खाली चोप्य-पस्ते केले नाहीतर आधी पहिले वाक्य "मी शेवटून दुसऱ्या दिवशी गेलो होतो." हे होते. वेल्लाभट रविवारी गेले होते :-)

प्रसाद१९७१'s picture

21 Feb 2013 - 6:00 pm | प्रसाद१९७१

१२० कोटींचा देश, सगळीकडे गर्दी असणारच.

तुमची बायको जर तुमच्या बरोबर होती तर तुम्हाला घरी आल्यावर कोणी प्रश्न विचारला?"‘कसा होता काळा घोडा?""

परिकथेतील राजकुमार's picture

21 Feb 2013 - 6:13 pm | परिकथेतील राजकुमार

आपल्या मताचा आदरच आहे.

पण एकदा मीमराठी वरचा हा लेख देखील वाचून पहावा.

पहिल्या दिवशी पण असलं पब्लिक कमी नव्हतं.. मिपाकट्ट्याच्या वेळी काळा घोड्याला आतमध्ये फिरत होतो.. एके ठिकाणी मस्त फोटोजेनिक डेकोरेशन केलं होतं बघा, अंधारात फक्त एक बल्ब लावून रंगीबेरंगी पताका दोर्‍याला लावून फार सुंदर ईफेक्ट दिला होता. त्या ठिकाणी सुखाने फोटो काढत होतो, तर एक जोडपं आतमध्ये आलं, काही सेकंद थांबलं, आणि "कसलं बोरींग आहे हे" असली नको असलेली आपल्या मताची पिंक टाकून निघून गेलं... स्वतःची लायकी तर दाखवलीच, पण उगीचच कोणीतरी इतक्या कष्टाने केलेल्या कामावर असली भिकार कॉमेंट करून गेले.. युजलेस साले..

मराठी_माणूस's picture

21 Feb 2013 - 8:34 pm | मराठी_माणूस

हो, खुप हाइप केली आहे असे वाटते. प्रत्यक्षात एव्हढे प्रभावी वाटले नाही.