प्रश्नः तुमच्या अफाट लोकप्रियतेमुळे मुख्य कलाकारांना तुमचा (साथीदाराचा) हेवा तर वाटत नाही?
उ. झाकिर हुसेनः (स्मितहास्य करत) तसं असतं, तर मला इतकं वाजवताच आलं नसतं!
प्रश्नः आपल्या वादनावर बंधन पडू नये यासाठी तुम्ही गायकांची साथ करणं थांबवलं आहे का?
उ. झाकिर हुसेनः गेली १० वर्षे सोडली तर मी गायकांबरोबर भरपूर वाजवलं आहे. पं. ओंकारनाथ ठाकूर ते पं. जसराज या तीन पिढ्यांमधील जवळजवळ प्रत्येक विख्यात गायकाची मी साथ केलेली आहे. कंठसंगीत हाच आपल्या परंपरेचा गाभा आहे. तोच तर आपला खरा खजिना आहे. गायकीची साथ करताना येणार्या स्वाभाविक मर्यादांची मला जाण आहे, आणि संगीतातल्या माझ्या 'योगशिक्षणाचाच' तो एक महत्वाचा भाग आहे. संयम ठेउन, मोजकंच वाजवून मोठा परिणाम साधण्याची ती खुबी आहे. एक कलाकार म्हणून परिपूर्ण होण्यासाठी हा 'योग' साधणे आवश्यकच आहे.
स्वतंत्र तबलावादन करताना किंवा नृत्याची साथ करताना मला प्रत्येक मात्रा 'मोठी' (विस्तृत) दिसते. कंठसंगीतातही हेच होतं. तुम्ही वाजवलेलं प्रत्येक अक्षर शंभरपटीनी मोठं दिसतं (अधिक परिणामकारक ठरतं). मात्र यामुळे अजिबात कष्ट न पडता तुम्ही नेमके काय करत आहात ते तुमच्या सहज लक्षातही येतं. प्रत्येक अक्षरात, बोलात एक प्रकारची 'शान' असते, डौल असतो, श्रीमंती असते आणि 'मेलडी' या एकसंध कलाकृतीची खरी सम्राज्ञी असते. मला यातून वेगळाच आनंद मिळतो. मला अशी 'मेलडी' मनोमन आवडते. माझ्या वादनाविष्कारात जी सौंदर्यदृष्टी मला अभिप्रेत असते ती पुन्हा नव्याने उजळून निघते.
प्रश्नः या सौंदर्यदृष्टीविषयी थोडे विस्ताराने सांगाल?
उ. झाकिर हुसेनः कला मंचावर सादर करताना आपल्या तांत्रिक कौशल्याचा उपयोग करणे आणि तो देखील योग्य प्रमाणात आणि योग्य रीतीने करणे ही गोष्ट साधावी लागते. आपल्यापैकी बर्याचजणांकडे फार उच्च गुणवत्ता असते, पण एक संगतकार या दृष्टीने पाहता आपली 'तयारी' किती दाखवावी याची त्यांना पुरेशी जाणीव नसते. त्यासाठी थोडा विराम घेउन सगळ्या गोष्टींचा यथास्थित विचार करावा लागतो. आपण काय कमावलं आणि काय गमावलं याचा अंदाज घ्यावा लागतो.
आपल्याजवळ असलेल्या विद्वत्तेपैकी समोरच्या श्रोत्यांसमोर आजच किती प्रकट करावी? त्यांना नेमकं काय ऐकायचं आहे? या प्रश्नांची उत्तरं दरवेळी नव्यानं मिळवावी लागतात. तुम्ही वेगवेगळे प्रयोग करून पहा. त्यांचा परिणाम काय होतो, त्यावर प्रतिक्रिया कशा उमटतात हे जोखून पहा. त्यातून आपला अविष्कार घडवत रहा. आपण कुठपर्यंत जायचं, थांबायचं कुठं याचं भान ठेवा ही माझी विचारशैली आहे. फक्त 'हवा' व्हावी म्हणून मी कधीच वाजवत नाही. मला वाटतं कंठसंगीतातून ही दृष्टी सहज मिळते. वाद्यसंगीत समजावून घेतानाही तिचा हमखास उपयोग होतो.
प्रश्नः तुमच्या तबल्यामधे अमाप 'मेलडी' आहे. तुम्ही गायनही करता का?
उ. झाकिर हुसेनः (हसत) ते शक्य होईल असं वाटत नाही. माझी 'तालीम' विधीवत सुरू असल्याने मला गायन शिकवलं गेलं. त्यात रागविज्ञान आणि शेकडो बंदिशींचा समावेश होता. मला शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि लोकसंगीतातल्या गायनामधला भाव लक्षात घ्यावा लागतो. एखाद्या मृदंगवादकाला कृतींची माहिती असते तसंच हे आहे.
प्रश्नः तुम्ही प्रत्येक अक्षरातून एक 'किमया' साधता. प्रत्येक अक्षर स्पष्ट वाजतं, आणि दोन अक्षरांमधला विराम किंवा काही काळाकरताची स्तब्धता प्रभावी ठरते. अतिशय दृत लयीतदेखील तुम्ही गडबड केली किंवा घाईत आहात असं का दिसत नाही?
उ. झाकिर हुसेनः मी (मनातल्या मनात) एक तरल कॅनव्हास वापरतो. त्यामुळेच एखाद्या ठिकाणी एक 'ठिपका' जरी असेल, तरी त्याचा मोठा प्रभाव पडतो. स्तब्धतेत, शांततेत एक विलक्षण शक्ती दडलेली असते. याच विरामांमुळे कलेची अभिव्यक्ती संपन्न होते, परिपूर्ण होते. प्रत्येक आघाताला महत्व येतं. वेगानं धावणार्या गाडीत बसण्याइतकाच आनंद एखाद्या वटवृक्षाखाली स्तब्ध बसून राहण्यातही असतोच ना!
प्रश्नः तुम्हाला तबल्याव्यतिरिक्त इतर तालवाद्ये वाजवता येतात का?
उ. झाकिर हुसेनः माझ्या घरात जगभरातील जवळजवळ शंभरएक तालवाद्ये आहेत. ती वाजवण्याचा आनंद तर मी लुटतोच, त्यातूनच माझं कौशल्य वाढतं आणि त्या वादनशैलीची सांगड घालून मी तबल्यातून वेगवेगळ्या प्रकारची 'नादनिर्मीती' करण्याचा अथक प्रयत्न करत असतो. अर्थात यातून रसहानी होउ नये ही खबरदारी घ्यावी लागतेच. माझा तबला काही कोंगो बोंगो आणि ड्रम्ससारखा वाजत नाही.
प्रश्नः संगीतक्षेत्रातले तुमचे आदर्श कोण आहेत?
उ. झाकिर हुसेनः किती म्हणून सांगू! त्यातल्या बर्याचजणांची लोकांना फारशी माहिती नाही. काहींची नावं मलाही आठवत नाहीत, पण त्यांचं वादन आजही सहीसही लक्षात आहे! मी माझ्या वडिलांचा आदर्श सुरूवातीपासूनच समोर ठेवला होता. त्यांचे कित्येक अविस्मरणीय कार्यक्रम मी जिवाचे कान करून ऐकले आहेत, पाहिले आहेत. माझ्यावर पं. किशन महाराजजी, पं. सामता प्रसादजी आणि उ. निजामुद्दीन खाँ यांचा गहरा प्रभाव पडलेला आहे. त्यांच्या जमान्यात ते अतुलनीयच होते. मलाही तसं व्हावं असं वाटायचं.
कित्येकजणांना मी प्रत्यक्ष पाहिलेलं नाही, पण त्यांच्या ध्वनिफिती ऐकून मी मंत्रमुग्ध होतो. थिरकवा खाँसाहेबांचा तबला मी पुन्हा पुन्हा ऐकतो. वाटतं की या गोष्टी एखाद्या मर्त्य मानवाच्या हातातून इतक्या लाजबाब कशा निघत असतील? आपल्यालाही असं वाजवता यायला पाहिजे. कधी विलायत खाँसाहेबांना सतार वाजवताना पाहिलं की आपण अशीच सतार वाजवावी असंही वाटायचं.
प्रश्नः तुम्ही आपले वडिल आणि भाउ यांच्यासमवेत बरेच कार्यक्रम करता. उ. अल्लारखाँ अजूनही तुम्हाला शिष्यच मानतात का?
उ. झाकिर हुसेनः माझ्यासाठी ते सदैव गुरूच आहेत आणि असतील. मला वाटतं अलीकडे ते मला मित्र मानायला लागले आहेत. अलीकडे ते अगदी माझ्या हातावर टाळी देत देत मला विनोदही ऐकवतात. ते माझ्या चुका दुरूस्त करत नाहीत, पण पुढचा मार्ग दाखवतात. त्यांच्याजवळ देण्यासारखं नेहेमीच काहीतरी असतं. आपली परंपरा ही तशी मौखिक परंपरा आहे. कपाटातून एखाद्या ग्रंथाचा ५० वा खंड काढून ४१० वे पान पहा असला प्रकार यात नसतो. कधी कधी मी माझ्या खोलीत टीव्ही बघत असताना ते अचानक येतात, म्हणतात, "सहज म्हणून सांगतो, आत्ताच एक बोल आठवला" आणि लगेच त्यांची पढंत सुरू होते. मी आपला पटकन ते बोल लिहून घेतो आणि मग तबला घेउन रियाझ सुरू होतो.
प्रश्नः तुम्ही अपयशाला कसे सामोरे जाता?
उ. झाकिर हुसेनः आम्ही करतो त्या प्रत्येक गोष्टीत धोका पत्करावा लागतो. खास करून कलाकारांना या गोष्टीला सामोरे जावेच लागते, निव्वळ शास्त्रार्थ करणार्यांना नाही! कित्येक मैफिली नीरस होतात. त्यामुळे मी हताश मात्र होत नाही. एक माणूस म्हणून आपल्याला काही मर्यादा असतात. आपण प्रत्येक गोष्ट बिनचूक करू शकत नाही, किंवा दरवेळी त्याच उंचीवर पोचू अशी खात्री देउ शकत नाही. अपयशातून मी काहीतरी शिकतो. पुढे जातो. यशापेक्षा अपयशाचाच उपयोग जास्त. त्यातून मुर्दाडपणा येत नाही, तारतम्य येतं आणि पाय सतत जमिनीवर राहतात.
प्रतिक्रिया
15 Feb 2013 - 12:26 am | मोदक
छोटेखानी मुलाखत आवडली..
त्याबरोबर तुमची एखादी आठवण दिली असती तर लेख आणखी खुलला असता असे वाटते.
लेखाबद्दल अनेक धन्यवाद. :-)
15 Feb 2013 - 9:55 am | अक्षया
प्रश्नः तुम्ही अपयशाला कसे सामोरे जाता?
"" उ. झाकिर हुसेनः आम्ही करतो त्या प्रत्येक गोष्टीत धोका पत्करावा लागतो. खास करून कलाकारांना या गोष्टीला सामोरे जावेच लागते, निव्वळ शास्त्रार्थ करणार्यांना नाही! कित्येक मैफिली नीरस होतात. त्यामुळे मी हताश मात्र होत नाही. एक माणूस म्हणून आपल्याला काही मर्यादा असतात. आपण प्रत्येक गोष्ट बिनचूक करू शकत नाही, किंवा दरवेळी त्याच उंचीवर पोचू अशी खात्री देउ शकत नाही. अपयशातून मी काहीतरी शिकतो. पुढे जातो. यशापेक्षा अपयशाचाच उपयोग जास्त. त्यातून मुर्दाडपणा येत नाही, तारतम्य येतं आणि पाय सतत जमिनीवर राहतात.""
हे विशेष आवडले. :)
15 Feb 2013 - 10:50 am | पैसा
उत्तम माहिती आणि व्हिडिओ. खरी मोठी माणसं असा विचार करतात.
15 Feb 2013 - 12:10 pm | कवितानागेश
मी (मनातल्या मनात) एक तरल कॅनव्हास वापरतो. त्यामुळेच एखाद्या ठिकाणी एक 'ठिपका' जरी असेल, तरी त्याचा मोठा प्रभाव पडतो. स्तब्धतेत, शांततेत एक विलक्षण शक्ती दडलेली असते. याच विरामांमुळे कलेची अभिव्यक्ती संपन्न होते, परिपूर्ण होते. प्रत्येक आघाताला महत्व येतं. वेगानं धावणार्या गाडीत बसण्याइतकाच आनंद एखाद्या वटवृक्षाखाली स्तब्ध बसून राहण्यातही असतोच ना!>
यांच्याबद्दल जितकं वाचावं तितके अधिक शिकायला मिळेल. :)