फेसबुकची वचवच- आणि वचावचा करणारं फेसबुक!

अन्नू's picture
अन्नू in जनातलं, मनातलं
5 Sep 2014 - 3:52 pm

सध्या सोशल नेटवर्किंगची क्रेझ चालू आहे मग ती ट्वीटरवरची टीवटीव असो नाहीतर, फेसबुकवरची गपशप असो. सगळीकडेच अगदी या साईट्स हातपाय पसरत असलेल्या दिसत आहेत. त्यात ट्वीटरचा विचार केला तर तिथे जास्तकरुन सेलिब्रिटीजचीच टीवटीव आपल्याला ऐकायला येते. सामान्य माणुस मात्र जास्त टीवटीवत नाही, त्यामुळेच कदाचित तो फेसबुकवर पडीक असतो!

फेसबुक. म्हणजेच थोडक्यात आपलं- FB !
–यात एक गोष्ट मात्र मला जास्त इंटरेस्टींग वाटते, ती म्हणजे फोटो अपलोडींग आणि टॅगिंग. इथे प्रत्येकजण आपल्या भावना जास्तकरुन वेगवेगळ्या इमेजेसमधून व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. मग कोणी आनंदी असेल, तर त्याप्रमाणे तो इमेज अपलोड करतो- त्यात मित्रांना टॅग करतो.
कोण लव्हर असेल, तर त्याप्रमाणे तो एखादी रोमॅन्टीक एमेज अपलोड करतो- त्यात आवर्जुन फक्त मुलींचीच नावं टॅग करतो. तर कोणी फार दु:खी असेल, तर एखादी सॅड इमेज अपलोड करुन त्यावर एखादं सॅड क्वोट किंवा शायरी लिहून काढतो. जमलंच तर एखाद्या मुलीला धरुन त्यात टॅग करुन टाकतो !

मग असल्या सॅड इमेजेस बघून आपल्यालाही तसंच कसंतरी होतं. डोळ्यांत पाण्याचा ठिपूस जरी आला नाही, तरी आत कुठेतरी गलबलून वगैरे आल्यासारखं वाटतं.

-अह्ं, काळजी करु नका. परत असं कधी झालं तर सरळ त्याच्यावर आलेल्या कमेन्ट वाचून काढा. दुसर्‍याच क्षणी तुंम्हाला यात कोणतं दु:ख दिसलं होतं याचा विसर पडेल! इतक्या विचित्र आणि अतरंगी कमेन्ट असतात त्या! बिचारा इमेज टाकणारा देखील मी विरहाची सोडून, विनोदी इमेज टाकली होती कि काय म्हणुन भंजाळून जातो !
काहीही- म्हणजे काहीही?
कोण-कोण तर अशा कमेन्ट करतं कि त्यावर रिप्लाय काय द्यावा तेच कळत नाही! जसं कि –मराठीच्या एखाद्या ग्रुपवर तो शिवाजी महाराजांचा फोटो डकवतो. ज्यावर लिहिलेलं असतं –‘मी मराठी!’ अरे? लॉजिक काय याचं? तू फोटो दिलायस कोणाचा- शिवाजी महाराजांचा. पोस्ट कुठे केलायस- मराठीच्या ग्रुपवर. मग सगळे मराठीच असतील कि चॅवमॅव करणारे चायनीज असतील? कदाचित म्हणुनच मग यांना कमेन्टसुद्धा तशीच येते..
‘मग काय आंम्ही डोंबारी!’

..असंच एके दिवशी मला एक इमेज दिसली होती. इमेज सॅडच होती, ती पोस्ट करणार्‍याला त्यातून बरंच काही सांगायचं असावं. कारण, त्यात एक तरुणी हताशपणे रेल्वेच्या पटरीमधून चालत होती. समोरुन येणार्‍या रेल्वेकडेही तिचं लक्ष नव्हतं. आपल्याच दु:खात ती एक-एक पाऊल उचलत पुढे जात होती. तिनं आपली मान किंचित तिरकी केली होती. दृश्य होणार्‍या तिच्या अर्धवट गालांवर आसवांची एक रेघ उमटली होती आणि.. उजव्या हातात घेतलेल्या गुलाबांच्या पाकळ्या कशाचीही तमा न बाळगता मागे संपुर्ण पटरीभर विखुरल्या जात होत्या! ते पाहूनच मला वाईट वाटलं. खूप वाईट वाटलं. त्या इमेजवर जवळपास शंभरएक कमेन्ट आल्या होत्या. सहज म्हणुन मी त्या पाहिल्या. पहिलीच कमेन्ट दिसली-
“जा- मर ना गाढवा!” ???????
छे! चुकीनं आपणं दुसर्‍या कमेन्ट तर ओपन नाही ना केल्या? मी कमेन्ट विंडो बंद केली. पुन्हा इमेजच्या खाली नेम धरल्यासारखा अ‍ॅरो नेऊन कमेन्टवर क्लिक केलं आणि त्याची कमेन्ट विंडो ओपन केली तर-
“जा कि बोंSबलत!!”

हे काय होतंय? कमेन्ट विंडो तर बरोबर आहे ना? मग इतक्या चांगल्या क्वोटवर अशा शिव्या कोण देतंय? मला रहावेना, लगेच मी त्याच्या अगोदरच्या कमेन्ट लोड करु लागलो. पाच वेळा बॅक गेल्यानंतर मात्र मी थांबलो, इथे जरा चांगल्या कमेन्ट होत्या. गुड- छान- 100% बरोबर मित्रा- वगैरे.
मी एक-एक करत त्या वाचायला लागलो अन अचानक-
“खारा आहे!”

अ‍ॅ??? काय कमेन्ट आहे कि माश्याची चव आहे! मी कमेन्ट पुन्हा-पुन्हा वाचली.. खारा.. खारं.. झटकन माझ्या डोक्यात ट्युब पेटली! अच्छा-अच्छा, ‘खरं आहे’! गडबडीत याने- के एच नंतर डबल ए टाकला होता तर! (khaara ahe!)

पुढची कमेन्ट कोणालातरी धमकी दिल्यासारखी होती. कोणाला ते समजलं नाही, पण धमकी देणार्‍याने प्रोफाईल फोटो मात्र झ्याकच लावला होता- मन्या सुर्वेचा! अगदी सिगरेट पिणार्‍या पोझमध्ये-
मी पुढे वाचू लागलो..

सुमेधा कापसे :: नाईस लाइन
वाह, याला म्हणतात कमेन्ट. कशी गोग्गोड वाटतेय वाचायला.

निलेश कदम :: सेन्ड मी रिक्वेस्ट सुमेधा
–आणि याला म्हणतात लोचट मुलगा! चाललंय काय आपण बोलतोय काय? दिसली नाही पोरगी कि लागले तिच्या मागं!

दिपाली कानडे :: su nice
सू???? अशी शॉर्टकट मारण्याची पद्धत कधी कधी खुपच भयानक असते, नाही?

अजय गायकवाड:: हाय दिपाली
हे वरच्या कॅटेगरीतले

दिनेश :: heart toching(!!!??)
तरी बरं! कोणी-कोणी तर या टोचिंगचं टुचिंग(tuching) करुन ठेवतं!

संकेत राणे :: हेच तर खरं सुखी जिवन असतं!
एखाद्या सिनेमामध्ये कसं एक गाणं असतं ज्याचं सिनेमाशी काही घेणं-देणंच नसतं, तशी ही कमेन्ट! कोणाला बोललेय, कशाला बोललेय आणि का बोललेय, याचा विचारच इथे जास्त करायचा नसतो. बस्स- बायकोच्या बडबडीसारखीच ही या कानाने ऐकुन त्या कानाने सोडून द्यायची असते!

विकास पाटील:: ... जास्त बोललास!!! मन्या सुर्वेचा फोटो लावला म्हणुन तू भाय नाय झाला.. समजलं!
अच्छा ! तर ती धमकी याला दिली गेली होती तर! चालू द्या- ते मन्या सुर्वे वाले हे सलमानवाले.. या आखाड्यात!
विकास पाटील:: नं वन बोललात तुम्ही!!! (आता हे कोणाला बोललास बाबा तू??)

मनोज :: नाइस
दिपक :: या मुलींना अकला नसतात! आता तरी समजलं का? (मध्येच वरच्या क्वोटवर एक जोरदार टीका होते-)
मंगेश शेले:: ग्रेट लाइन
शितल :: तुला आली वाटतं अक्कल (टीकाकाराची अक्कल लगेच चव्हाट्यावर येते!)
समर :: गुड वन
वैष्णव:: 100% ट्रु
राहुल सुतार:: मुलं शेवटपर्यंत खरं प्रेम करत असतात, मुली नुसत्याच दगड असतात! (वरच्या टीकाकाराची दशा माहीत नसलेला दुसरा टीकाकार आपले कठोर मत व्यक्त करतो)

सागर:: व्हेरी नाइस लाइन्स
धनेश:: अ‍ॅग्री
सविता वाडेकर :: तु काय दिवे लावले आहेस? (दुसर्‍या टीकाकाराला चांगलंच फाट्यावर मारलं जातं!)
शिवानी :: आंधळी आहेस का गं बाई? (एक जागृत नारी, पोस्ट केलेल्या इमेजमधल्या तरुणीला उद्देशून म्हणते.. ती समोरुन येणार्‍या ट्रेनकडे लक्ष न देता पुढेच चाललेली असल्याने, सदर तरुणी ही अंध असावी असा हीचा प्रामाणिक समज होतो)

राहुल सुतार:: हाय सविता- तू मुंबईची का? (याला म्हणतात दुध देणारी गाय- तुझी लाथ लई ग्वाड हाय!)
श्रीकांत:: नीड सम गुड फ्रेन्ड्झ यू’एल अ‍ॅड मी (या हौशी लोकांची ना, जळत्या निखार्‍यावर पाय ठेवण्याची हौस फार दांडगी!)
सविता वाडेकर :: तुला काय करायचं आहे रे माSकडा? (-है शाब्बास! एका दगडात दोन पक्षी- एक राहुल, दुसरा श्रीकांत! उलट-प्रश्न राहुलला असल्याने राहुलला टोला आणि श्रीकांतच्या कमेन्टखालीच ही कमेन्ट आल्याने श्रीकांतच्या इज्जतीचा फालुदा!)

विशाल सुतार:: तिला दुसरा भेटला असेल ना. तु जा घरी.
राहुल सुतार:: अगं बाई..
पुष्पा अनुभुले:: नालायक- हलकट्!!! (वा! या छानशा शिव्या कोणासाठी?)
सविता वाडेकर:: आता गप् बस ना.. (हे कन्वर्सेशन बहुदा सविता आणि राहुलचं चाललेलं असावं)
पण या कन्वर्सेशनमध्ये मध्येच एकाच सॅड साँग येत..

अतुल खरे:: तेSरे ना..म हमने किSया है.. जिवन अपना- सा..रा सनम..!
-कि लगेच त्याला संभाळायला पगडीवाला दादा येतो-
मधुकर दादा:: मग वड् पाचची!!!

राहुल सुतार:: सविता तुला एक विचारु का?
श्रुती :: व्हेरी सॅड

कन्वर्सेशनमध्ये आणखी एक महाभाग येतो त्याला बहुदा पोस्टमधली तरुणी आवडायला लागते. तिला आधार देण्यासाठी वगैरे, तो फिल्मी डायलॉग मारल्यासारखी कमेन्ट पास करतो-
तिरुपती शिंदे :: मै तेरे साथ हूँ डिअर..

-आणि नेमक्या त्याच वेळी सविताचं तिरसटपणे राहुला बोललेलं उत्तर येतं!
सविता वाडेकर:: आई ला विचार तुझ्या!
तिरुपतीची कवटी सरकते तो झट्क्यात सविताला उत्तर देतो-
तिरुपती शिंदे:: आईच्चा घो तुझ्या! तू मुलगा असतीस तर तुला सांगितलं असतं..

सविता वाडेकर:: (तितक्याच शांतपणे) तू गप रे मुर्खा!

एवढ्यात वरच्या श्रुतीला बघुन एकजण जाळं टाकायला बघतो-
राकेश जोशी:: हाय श्रुती
ही श्रुती त्याच्या पुढची असावी.

श्रुती :: हाय राकेश, कसा आहेस तू.
ही कमेन्ट वाचून राकेश मात्र घायाळ वगैरे होतो. पण सलग चार पाच कमेन्ट मध्येच कोणीतरी घुसडवल्यामुळे त्याला काही बोलताच येत नाही. तो कमेन्ट करतो आणि ती अक्षरश: आठव्या नंबरला फेकली जाते!

राकेश :: मला रिक्वेस्ट पाठव ना!
त्याच वेळी सविताची ती कमेन्ट!
सविता वाडेकर:: जा- मर ना गाढवा!! (बहुदा तिचं आणि राहुलचं काहीतरी बिनसलं असावं. पण त्याची झळ बिचार्‍या हौशी राकेशला लागते..)
यापाठोपाठ एका तरुणीची वरच्या पोस्टवर कमेन्ट..
मनोरमा ढवळे :: वा! कित्ती छान!

इतक्यात श्रुती धुर्तपणा करते. ती राकेशचीच शक्कल त्याच्यावरच उलटवते-
श्रुती :: तू पाठव ना, मी एक्सेप्ट करते!

राकेशची गोची होते. अगोदरच सतरा जणींना अननोन फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यामुळे FB ने त्याला समज देऊन तीन महीन्यांची शिक्षा ठोठावलेली असते, आता हीला कशी रिक्वेस्ट पाठवायची? मनात असूनही हीला आपण रिक्वेस्ट पाठवू शकत नाही म्हणुन पाचर बसल्यासारखी त्याची दयनीय स्थिती होते. त्याच वेळी नको त्या जागी नको ते गाणं घुसडवल्यासारखा एक मजनु गाणं गुणगुणायला लागतो.

पोस्टर बॉय :: होSS.. मला वेड लागले- प्रेमाचे..
इथे सविता पुन्हा एकदा उगवते-

सविता वाडेकर:: जा कि बोंबलत!
एका प्रामाणिक वाचकाला वरच्या पोस्टवर, खरं तर दाद द्यायची असते पण नेमक्या त्याच वेळी सविताच्या आलेल्या- या असल्या कमेन्टने त्याचे सगळे मनोव्यापार विस्कळीत होतात. बिचारा सुचेल तशा स्पेलिंगी टायपत राहतो!
सुरज :: waw I laek iti fend kip et op....!!!!

तशी सविता पुन्हा चमकते!
सविता वाडेकर:: ए- डुकराSS! (हे कोणासाठी ते कळत नाही)
सविताच्या कमेन्टकडे न पाहताच एक वाचक बिनदिक्कत वरच्या पोस्टवर आपलं मत प्रदर्शन करतो-
चेतन भगत:: खुप्पच सुंदर आहे
त्यावर एकाचा जळफळाट होतो-

मयुर बितले:: काय घंटा सुंदर आहे??!!
संगीत :: आवडलंस(??)

-इथे मात्र एका तरुणीचा अक्षरश: गैरसमज होतो, हा बाबा आपल्यालाच आवडलीस म्हणाला कि काय असं तिला वाटतं आणि अति संतापाने ती किंचाळते-
मॅडी शिंदे :: परत बोल मेल्याSS!
हीचा सुर वाढवत एक टीकाकारीण पुढे येते-
ज्योति :: लोचट असतात मेली मुलं!

वर काय गोंधळ चाललाय याचं भान नसणारा एकजण पोस्टवर कमेन्ट करतो आणि स्वत:चं कुत्र्यासारखं हाल करुन घेतो!

विक्रम :: मुली फार वाईट असतात, वरुन चांगल्या आणि आतून कपटी
मॅडी शिंदे:: मुलंपण काही कमी नसतात
ज्योति :: मुलं लाळघोटी असतात
यावर मात्र विक्रमला राग येतो-
विक्रम:: मुली बिनडोक असतात- नाटकी असतात.. (तडकून तो म्हणतो)

वाद विकोपाला जातो, तिथं उपस्थित प्रत्येक तरुणी विक्रमला वेगवेगळ्या प्राण्याच्या कॅटॅगरीत टाकते. तो जेरिस येतो आणि मध्येच कुठूनशी एक समजुतदार तरुणी हजर होते!

अश्विनी माने:: कशाला रडत बसायचे? आपल्याला जी मुलगी व्ह्यॅल्यु देत नाही तिला आपण कशाला व्ह्यॅल्यु द्यायची? गेली तर गेली उडत!!!!!
खुद्द मुलीनेच दिलेली ही कमेन्ट मेंदू हालवून टाकते.. ही डुप्लिकेट आयडी तर नाही? Smileyमनात एक शंका उगीच कुरकुरायला लागते.

रणजित:: (चुकचुकत) असला प्रसंग कधी येऊ नये
रामेश्वर भरत:: इतकं प्रेम चांगलं असतं? (याने बहुदा आयुष्यात प्रेमाचं नावच काढलेलं नसावं!)
किशोरी:: मामा अनुभव असावा लागतो त्याला..

एका मुलीनं आपल्याला असं मामा बनवलेलं रामेश्वरला आवडत नाही, तो लगेच त्याचा वचपा घेतो-
रामेश्वर भरत:: हो बरोबर आहे तुझं आक्का!!!

आनंद:: माझंही अस्संच झालं होतं..
एकाला आपल्या प्रेमभंगाची आठवण येते, गदगदून आल्यासारखं तो भावनाविवश होतो. आपण एक मुलगा आहोत हे विसरुन तो सरळ एका रडणार्‍या मुलीचीच चित्रफिती तिथे चिटकवून टाकतो!
-आणि वर काय चित्रफिती टाकलेय याचा कसलाही मागचा-पुढचा विचार न करता एक बहाद्दर त्याच्यापुढे आपली कमेन्ट पास करुन टाकतो..

अक्षय नाईक:: माझं आणि तुझं सेम आहे मित्रा(?????!!!!!) Smiley
तन्मय :: व्हेरी सॅड
वृशाली:: खुप वेदना होत असतील ना रे(!!!)
महेश्वरी:: सगळं सोसायची तयारी ठेव आता!!!

आनंदी:: कध्धी कोणावर प्रेम करु नये!
राहुल सुतार:: हाय आनंदी!
सविताच्या तोंडून भरपुर उद्धार करुन घेतल्यावर हा राहुल आता पुन्हा आनंदीच्या मागे लागतो. मात्र तीही नुसतीच हाय करुन निघून जाते. तो नव्या मुलीला शोधत राहतो. कधीतरी पुन्हा एक मजनु येतो-

विपुल:: मै तुम्हे भुल जाऊ ये हो नही सकता.. और तुम मुझे भुल जाव ये मै- होने नही दुँगा...
त्याला वाटतं हा फिल्मी डायलॉग मारल्यावर मुली इंप्रेस होतील आणि आपल्याशी बोलतील पण दुसर्‍याच क्षणी त्याखाली कमेन्ट येते-

मनोरी:: डोंबल तुझं!!!
विक्रम :: समोर ये बघतो तुला आणि तू तोंड काळं कर ज्योति-
विकास :: मीही असंच प्रेम करत राहणार...!
तुलना देसाई:: मरशील तू आता! (ही टोलेबाजी पोस्टमधल्या मुर्ख मुलीला असते)
अंजली :: nyc lin
शंकर :: अ‍ॅड मी वृशा
मॅडी शिंदे :: ए- जाS डुक्कर तोंड्या!
कल्पेश :: गुड
विकास :: अंजली- मला अ‍ॅड कर ना
ज्योति :: मसणात जा- कुत्र्या !!
साहील :: सुपर्ब
अवि :: ग्रेट
आकाशी :: मस्तच मस्त!!!

या सगळ्यांपासून भिन्न असणारा एक आशिक मात्र आपल्याच विश्वात गुंग असल्यासारखा कमेन्ट करतो. पण याला भुक लागलेली असते कि कसं, काही समजत नाही. तो वाक्यंच इतकी शॉर्ट करुन टाकतो कि त्याचा अर्थ लावण्यातच तास निघून जातो आणि या प्राण्याबद्दल वेगवेगळे पाशवी विचार मनात दाटायला लागतात!

किरण :: fil wry bd, y bz I lov sm1 truely bt tyn dur kel mla tychy lif mdhn so asch hoil mz pn (?????)

एवढी सगळी शोभा झाल्यावर पोस्टकर्ता मात्र आपलंच डोकं धरुन बसतो...
झक् मारली न् पोस्ट टाकली ! असं त्याला होऊन जातं..! Smiley
-तोपर्यंत मग आपल्याही मनातली उदासिनता निघून गेलेली असते आणि यात होतंच काय कि- आपल्याला दु:ख व्हावं, असं आपल्याला वाटायला लागतं!!
एक मात्र खरं- या FB, फेसबुकची सर कशालाच येत नाही.. ना ऑर्कुट, ना वॉट्स अ‍ॅप, आणि नाही ट्वीटर !

बाकी- अलिकडेच ट्वीटरवर एक कविता चर्चेत आली होती. सहज वाचनात आली. वाचून प्रेमभंगासारखं दु:ख वगैरे झालं नाही- मस्त वाटलं.
त्यातल्या प्रत्येक ओळीतलं वास्तव मात्र खोल मनात कुठेतरी कोरलं गेलं...

“गिरना भी अच्छा लगता है
औकात का पता चलता है...
बढते है जब हाथ उठाने को..
अपनों का पता चलता है !

जिन्हे गुस्सा आता है
वो लोग सच्चे होते है,
मैने झुठों को अक्सर
मुस्कुराते हुए देखा है.... !!!

सीख रहा हूँ अब मै भी इंसानों को
पढने का हुनर,
सुना है चेहरे पे
किताबों से ज्यादा लिखा होता है !”

..............—अमिताभ बच्चन

(अति अवांतर=> सध्या ‘जय मल्हार’ सिरिअलमधली म्हाळसा हाय रिसोल्युशनचा टच स्क्रिन मोबाईल (दर्पण) वापरत असल्याचे समजले.. त्यात FB चालतं का हो?)

मांडणीवावरमुक्तकशब्दक्रीडाविनोदसमाजमौजमजाप्रकटनविचारसद्भावनालेखअनुभवमतमाहिती

प्रतिक्रिया

जेपी's picture

5 Sep 2014 - 4:00 pm | जेपी

तेचते,
हायला बर्याच दिवसांनी

मी पयला.
(चेपु बंद केलेला) जेपी

अन्नू's picture

5 Sep 2014 - 4:24 pm | अन्नू

हायला बर्याच दिवसांनी

बिजी होतो, हो! :)

आनन्दा's picture

5 Sep 2014 - 4:08 pm | आनन्दा

आवडला.

सध्या ‘जय मल्हार’ सिरिअलमधली म्हाळसा हाय रिसोल्युशनचा टच स्क्रिन मोबाईल (दर्पण) वापरत असल्याचे समजले..

तो आयपॅड आहे हो.

आनन्दा's picture

5 Sep 2014 - 4:10 pm | आनन्दा

बाकी हे काही पटले नाही

सध्या सोशल नेटवर्किंगची क्रेझ चालू आहे

सोशल नेटवर्किंग आता क्रेझ च्या पलीकडे गेले आहे.

अन्नू's picture

5 Sep 2014 - 4:19 pm | अन्नू

:D :D बरोबर आहे

असंका's picture

5 Sep 2014 - 4:38 pm | असंका

फारच गमतीशीर! मजा आली!!

धन्या's picture

5 Sep 2014 - 4:46 pm | धन्या

कुठल्या ईयरला आहात हो?

अन्नू's picture

7 Sep 2014 - 4:03 pm | अन्नू

का हो?

अविनाशकुलकर्णी's picture

5 Sep 2014 - 9:08 pm | अविनाशकुलकर्णी

फेसबुक उपयोगी आहे,,आता कणेी कसे वापरावे यावर मत/२ मत होऊ शकते...समुह हा पण पोप्युलर प्रकार आहे.

मला मजा येते फेसबुकावर

अविनाशकुलकर्णी's picture

5 Sep 2014 - 9:12 pm | अविनाशकुलकर्णी

एक ओळीचे धागे काढणा~याना फे,बु पर्वणी आहे..आजच शिक्षक दिना निमित्त " पुणेकर हा जन्मजात स्वयंभू शिक्षक असतो......पुणेकराना वंदन करा" अशी पोस्ट २ समुहावर व भिंतिवर टाकली..१५० च्या वर लाईक१५० च्या आसपास कोमेंट...धमाल येते..

एस's picture

5 Sep 2014 - 9:24 pm | एस

इथेपण टाकून पहा की. डब्बल धमाल येईल. :-))

अजया's picture

6 Sep 2014 - 8:48 am | अजया

=))

अन्नू's picture

7 Sep 2014 - 4:04 pm | अन्नू

:D :D स्वागत!

पैसा's picture

5 Sep 2014 - 9:43 pm | पैसा

आवडले. आम्ही पण काही भिंतींवर नित्यनेमाने डोकी आपटत असतो!