गुरुजिंचे भावं विश्व! भाग-४

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
11 Sep 2013 - 6:47 pm

मागिल भागः- http://misalpav.com/node/25527 ...पुढे चालू

आणखि एक गमतीदार, चवदार, व लज्जतदार विषय. संपूर्ण विषय ऐकल्यावर, यातल्या गमती कोणत्या? चव कोणती? लज्जत कोणती? आणी या गोष्टी चाखणार्‍यांची नक्की दारं कोणती? हे न कळल्यामुळे तुमचीही अवस्था विधानसभे सारखी त्रिशंकू होइल,यात शंका नाही.............

=============================

जखमे सारखं

चिडचिडं करणारा सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे, रस्त्यावरून येता-जाताना काहि कारणास्तव ब्रेक मारून थांबावं, तर काहि लोकं आंम्हाला नखं ते शिखेचा अंत होईपर्यंत न्याहाळतात. ह्यांच्या चेहेर्‍यावर अस्सा काहि भाव असतो की, आमच्या अंगावरचे कपडे, ते वरच्या खिशातलं मोबॉइल, देहाखालची गाडी, ह्या सर्व वस्तूंमधे भरलेला गुरुजी नामक देह त्या लायकीचाच नाहिये. किंवा हे सर्व आंम्ही चोरुन किंवा भाड्यानी आणून वापरतोय! "त्यापेक्षा जवळ येऊन एक जोडा मारा, पण हा नजरेचा बाण नको...'' असं ओरडावसं वाटतं.

दुसरा नित्यताप म्हणजे पत्ता शोधणे...आणी त्यात आपल्या वाट्याला आलेलं शहर-पुणे! मी(ही) पुणेकर असलो तरी, काहि बाबतीत मी पुण्याला पुण्यपत्तन असं न म्हणता पुण्य पतन.. असच म्हणतो. पुण्यात पत्ता शोधणे म्हणजे स्वतःच अधःपतन करवून घेण्यासारखच आहे! इष्टस्थळी पोहोचल्यावर, यजमान सुद्धा आपल्या चेहेर्‍यावरून त्यांचा वड गाठायला गुरुजिंना किति फेरे घालायला लागलेत ते ओळखतात. पत्ता सांगण्याच्या निरनिराळ्या पद्धती पुण्यात आहेत. त्यातली सर्वात तापदायक पद्धत म्हणजे,सगळा पत्ता आपल्याकडून अस्सा काही काढून घेतात की आपल्यालाही पत्ता लागत नाही! यापेक्षा चोर पाकिट सुद्धा कमी शिताफिनी काढीत असावा. शेवटी आपण विचारवं, "कुठे येते मग ही इमारत?" तर, "अहो,मी सुद्धा या भागात नविन(?) आहे" असं आपल्याला निरित्तर करणारं उत्तर येतं! आपण पुन्हा प्रश्न विचारण्याचा गाढवपणा करावा, "का हो?..तुंम्ही नविन आहात या भागात..हा "भाग" तुमच्या ध्यानात नाही का आला?" तर पुन्हा यांचं उत्तर तयार, "त्याचं काय आहे माहितिये का? की म्हटलं होइल आपल्यालाही या भागाची माहिती!" हे उत्तर ऐकून डोक्याची शकलं झाल्यानंतर कडेनी जाणार्‍या एखाद्या ट्रकमागचं ते संत/महंत/विचारवंत-छाप बोधवचन मला दिसतं-"चित्ती असू द्यावे समाधानं!" ...

अता इतका ताप झाल्यानंतर माझं चित्त त्या तापानीच पूर्ण समाधानी होतं. आणी (एकदाचा) कळस गाठावा या इच्छेनी, मी त्याच दुष्ट ट्रक खाली देह ठेवायची इच्छा धरतो. पण पुण्यातले रस्ते आणी खड्डे पहाता, माझा देह(सरळ) वैकुंठाला न जाता, त्या ट्रक समोरच्या खड्ड्यात पडायचा आणी वरनं तो यमदूत तिथेही हुलकावणी देऊन जायचा! ... थोडक्यात..आमच्या नशिबी मरणाचं सुख ही सुखासुखी लाभायचं नाही!

याच दुसर्‍या तापाचा उपभाग किंवा पत्ता शोध शास्त्रानुभवानुसार वर्णन करायचं झालं तर पश्चात्ताप! तो पश्च्चात्तप कसा होतो पहा.. त्यातुन तुंम्ही धनकवडी सारख्या चक्रव्यूहात गेला असाल तर अभिमन्यूच्या उलट अवस्था वाट्याला आल्याशिवाय रहात नाही! (हा ताप अता मोबॉइलमुळे बराचसा नामशेष झाला आहे, पण जंतू अजुन मेलेले नाहीत! ;) )

आपणः- अहो ते दिग्विजय अपार्मेंट कुठाय हो! ह्या पोस्ट ऑफिस जवळच आहे.आपल्याला माहित आहे का?
टवाळ पोरांचं त्रिकूट:- ए पांग्या तुला म्हैत हे कारे अपारमेंट?
पांग्या:-मला कशाला ** घालायला म्हैत असल? मी अता मुंबईला अस्तो,इसरला का भाड्या!
(त्याच्यावर अता हा पहिला)-रंग्या:- आयच्या गावात...मुंबैला कदी पास्नं?
पांग्या:-तुला म्हैत नाय व्हय आपल्या बापानी फ्लॅट घिऊन दिला आपल्याला..आता तिकडच धंदा!
(इकडून आपण):- अहो म्हाइतीये का पत्ता?
रंग्या:-ओ काका... नक्की कोन्चा चौक सांगितला तुंम्हाला?
आपणः-अहो,हाच चौक सांगितला.पोश्ट ऑफिसचा..
(रंग्याला तोडून तिसरा संग्या चालू होतो) संग्या:- आओ काका, ते हितं नाय तिकडं गावठानातलं जुनं पोश्ट हे ना.. त्येच्या चौकात असल.. थांबा मी तुमाला दाखवतो!
असं म्हणून तो महान संग्या आपल्या गाडीवर बसून येतो.आणी जुन्या ऑफिस जवळ उतरून, "हितं कोन्ला बी इचारा..सांगल तुमाला" असं म्हणून जातो! नंतर पत्ता अजुनच तिसरीकडे सापडल्यावर आपल्याला कळतं की त्या "संग्या"ला वरच्या चौकात यायची हुक्की आली होती,म्हणून त्यानी आज आपल्याला एकंदरीत "चौक" दाखवला!

आणी अखेर मग एखादा टेलिफोन बुथ सापडून,त्या दिवशी मिळणारं धन-कवडी मोल करून,तो खर्‍या अर्थानी धनकवडी'तला पत्ता आपल्याला एकदाचा "मिळतो!"

तिसरा ताप हा कमी प्रमाणात अढळतो... पण तरिही त्याचं एकंदर प्रमाण पहाता तोच सगळ्यात जास्ती म्हणायला हवा. कारण हा मनुष्यरूपी छळवादी ताप आहे. ताप देणार्‍या अश्या,ऐतिहासिक पाषाणांचे भग्नावशेष पुण्यात अजूनही शिल्लक आहेत. यांचा संग्रह केला तर एक संग्रहालय राजा केळकरच्या बाजूला दिमाखात उभं राहिल,याची मला खात्री आहे.

त्याचं होतं असं...
..की,

दिवस-भराचं काम संपवून आपण घरी यावं,आणी वकिलानी काळा कोट उतरवावा,तसं आपण "तो" ड्यूटी'चा ड्रेस बदलून,जं.....रा डेक्कन जिमखान्यावरून फेरफटका मारत जावं, तर अस्सा एखादा नग समोर येतो की विचारू नका! यावेळी फिरायला जाताना..तो गुरुजी धोतरातनं शर्ट-प्यांट मधे शिरून माणसात आलेला असतो. त्यावेळी त्याचं "आयुष्य" हे तीन अंकी प्रायोगिक नाटक जर स्त्री-पात्र विरहीत असेल तर जास्तीचा ताप! जसं, आई/वडीलांच छत्र असेल तर अपत्याचा साडेसातीचा ताप 'निम्म्यानी कमी होतो' -- असं म्हणतात! तसच, शर्टप्यांटीतल्या गुरुजिला बायको हे अर्धांग त्याच्या पूर्णांगाबरोबर असेल..तर..त्या भग्नावशेषांचं त्याच्याकडे लक्ष गेलं तरी, बायकोची "छाया" पडल्यानी तो गुरुजी नामक ग्रह त्याला दिसत नाही. फक्त "याला कुठेतरी पाहिलाय" असा ग्रह करवून घेऊन तो भग्नावशेष नामशेष होतो... इत्यर्थे-टळतो, तेंव्हा ग्रहण सुटतं! स्वतःच्या छोट्या जगाचा गुरुजी नामक स्वामी बायको विना जर श्रीमंत असेल, तर ती श्रीमंती उपभोगताना हे भग्नावशेष त्याला भिकेला लावतात.

(आमचा पक्या नावाचा एरवी शिविलाही न शिवणारा दोस्त या भग्नावशेषांना "जिवंत-शनैश्चर" अशी परिपूर्ण धार्मिक शिवी देतो.. ती या छळामुळेच! ;) )

त्यामुळे आपण बायकोविहिन असलो की मग आली कंबख्ती......

भग्नावशेषः-"अरे..गुरुजी का?..याही कपड्यात फिरता वाटतं?"
आंम्ही:- "आंम्हालाही तसच वाटतं!"

भग्नावशेषः-(कवळी सावरत..) "पण खुरुजिंनी कसं कायम धोत्रात असलं पाहिजे!"
आंम्ही:-" हो का??? बरोबरच आहे तुमचं. डॉक्टरनी देखिल दवाखाना झाल्यावर घरीदारी तो पांढरा कोट/टेथेस्कोप घालूनच फिरलं पाहिजे! नाही का?..त्याशिवाय त्याला काय स्कोप!?"

भग्नावशेषः-(कवळी उडवून-हॅ हॅ हॅ करत..) "अरे व्वा.. टेथेस्कोप/कोटाचं उदाहरण देऊन चांगलच "कोट" केलत की आंम्हाला... हॅ हॅ हॅ भेटू परत!"
आंम्ही:-(मनात.."असेच काय?" असे म्हणत) "ह्हं ह्हं ह्हं .. भेटू हो... या अता!" असे म्हणतो आणी रस्ता धरतो...

अता हाच प्रसंग,जेंव्हा पाठशाळा नावाच्या सर्वार्थानी-अज्ञाताच्या साळेतनं - सुटलेल्या एखाद्या तरुण, म्हणजे हल्लीच्या भाषेत "यं..ग" गुरुजिच्या बाबतीत घडतो तेंव्हा तो प्रसंग समरप्रसंगच! अता, हा धंद्यामधे दोन/चार वर्ष रुळावलेल्या आणी खाद्यधर्माचारशास्त्र याची नीट 'समज' आलेल्या गुरुजीचं मानस कसं व्यक्त होतं ते पहा..

"सारस बाग किंवा तत्सम ठिकाणी आपण आनंदात पावभाजी चाखित असतो. थम्सअप/आईस्क्रीम योग जुळून आलेला असतो. आजुबाजुला सृष्टीसौंदर्य बहरा'ला ऊत आलेला असतो. अश्या सौंदर्याला मी दुरुनच पाहातो, कारण (केवळ निरखण्यासाठी) थोडं जवळ जायचं धाडस केलं, की तो "बहर" बिब्ब्यासारखा उततो! (असा माझ्या मित्राचा अनुभव आहे!) त्याची व माझी कुंडली एकच आहे, म्हणून मी माझ्या कुंडलीवर हा कुंडलिनी प्रयोग करायला जात नाही... तर चाललं होतं काय..की, आजुबाजुला सृष्टीसौंदर्य बहरा'ला ऊत आलेला असतो. कडेनी डोसे/भेळ असे निरनिराळे वास आपला उरला सुरला श्वास रोखीत असतात. आपली पावभाजिही रंगात आलेली असते.

आणी..अश्यावेळी

भग्नावशेष "शेष" होऊन चावायला तिथं येतो! आवाज-रिक्षाच्या फुटक्या सायलेन्सर सारखा...चिरका! वय-(असलच तर!) सत्तरी ओलांडलेलं! हातात एक काठी! जिचा वापर स्वतःला आधार देण्यापेक्षा दुसर्‍याच्या सुखात व्यत्यय आणून, त्याला ढोसण्यासाठी किंवा तीचा धाक दाखवून "ढोस" देण्यापलिकडे नसतो.

ते सुरु होतात..त्यांचं अण्णावंही 'ढेकणे' असं वगैरे अगदी स्वभाव सदृश असतं!

ढेकणे:- आँ... गुरुजी??? या कपड्यात??? इथं!? गुरुजिंच्या भुमिकेतून विचार करता "हे" पटतं का तुंम्हाला?
आंम्ही:-ढेकणे अजोबा...तुंम्हीही माणसाच्या भुमिकेतून विचार करा ना? असं विचारणं तुंम्हाला पटतं का ते!?

ढेकणे:-संपूर्ण पटतं?
आंम्ही:-कसं क्काय?

ढेकणे:-माणूस म्हणून मला तुंम्हाला काहि प्रश्न विचारण्याचा हक्क नाही का? (ह..क्क. वर जोर देऊन!)
आंम्ही:-आंम्हाला माणूस म्हणून जगण्याचाही हक्क नाही का?

ढेकणे:-आहे..पण तरी मी प्रश्न विचारणार
आंम्ही:-(छळ नुस्ता!) विचारा..पण मी प्रश्न पाहुन उत्तरं देणार!

ढेकणे:-असं का बरं?
आंम्ही:-आंम्ही तुमच्या घरी आल्यावर,"काय अजोबा तुंम्ही एव्हढे धार्मिक आणी जानवं नाही का गळ्यात?" असा प्रश्न केल्यावर तुंम्ही, "अहो,गुर्जी काळाप्रमाणे बदललं पाहिजे" (आंम्ही-मनात-"जानवं का?" हा प्रश्न दाबून!) असा नवा वेदांत आंम्हाला शिकवताच ना?

ढेकणे:-श्शूक..श्शूक..हळू बोला.आजुबाजुला लोक ऐकताहेत
आंम्ही:-का? का? अता का? तरी नशिब समजा. तुंम्ही जानवं देण्याबद्दल मला अकरा रुपये लाच दिल्याचं तुमच्या होम-मिनिस्टरना मी सांगितलं नाहिये अजून!

माझं हे वाक्य पूर्ण होइपर्यंत अजोबा गृहमंत्र्यांच्या भितिने सारस बागेतून पेशवे बागेत एका रिकाम्या पिंजर्‍यात जाऊन दडल्याचं नंतर कळलं मला! नशिब अंधारात सिंव्हाच्या पिंजर्‍यात नाही गेले!...... हे सिंव्हाचं नशिब... कारण यांनी त्याला ही ह्यांना खाईपर्यंत "तुला हे शोभतं का?" "चित्रगुप्ताकडे तक्रार करीन मी..की पुढचा जन्म मला रिंगमास्टरचा दे, आणी तुला पुन्हा सर्कशीत माझ्या चाबकाखाली ड्यूटिला पाठव!" असा प्रश्नांचा भडीमार करून त्या सिंव्हाचीही शेळी केली असती

धार्मिक कार्यक्रमाच्या दिवशी, यांच्या घरी केटरर कडून पायात चपला घालून आणलेलं(पार्सल) जेवण सोवळ्यात देवाला नैवेद्य दाखवून आंम्ही(ही) जेवतो.. हा काळानुसार केलेला बदल, ते कसा विसरले ते काही कळलं नाही.....!
=======================================
क्रमशः

संस्कृतीमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

एस's picture

16 Sep 2013 - 12:35 am | एस

तात्त्विकदृष्ट्या आपण विरूद्ध पार्टीचे असलो तरी लेखमालेतील चकल्यांसारख्या खुसखुशीतपणामुळे चवीचवीने वाचतो आहे... अजून भावं येवं द्या.. :)