एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद !
एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला !
एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ !
....मला घरी फोन यायचा "अहो ते साप वाले आहेत का ? आमच्या घरी/बागेत/रस्त्यावर/गच्चीवर/स्वयंपाकघरात इ.भला मोठा साप आहे...तुम्ही ताबडतोब या":- ही अशी वाक्य ते एका दमात बोलायचे. मी तर जे हातात असेल ते सोडून पूर्ण जीव फोन मध्ये लावायचो. एका हातात पेन आणि मानेत फोन आणि माझा प्रश्न असायचा "साप कशात आहे ,मी पोहचेपर्यंत कोणाला पण जवळ जाऊ देऊ नका आणि सापावर लक्ष ठेवा. आत्ता सांगा पत्ता ?"( भाग पहिला)
पत्ता घेऊन मी तडक सुटायचो आणि सापापर्यंत तडक पोहोचायचो.( वाचा: भाग पहिला म्हणजे हे "तडक" प्रकरण समजेल ;)) साप पकडायचा म्हणजे तो पहिल्यांदा दिसला पाहिजे, पण तेच अवघड असायचे. आपल्या एकडे सापा विषयी जेवढी भीती आहे तेवढीच उत्सुकता पण आहे. त्यामुळे एखाद्या घरात साप निघाला तर, त्या घरचे लोक, त्यांचे नातेवाईक, रस्त्यावरून जाणारे लोक, बाजूच्या सोसायटीमधले लोक, मुलांच्या मित्र-मैत्रिणी असे सगळे त्या ठिकाणी पिच्चर चे शुटींग असल्या सारखे जमतात. या गर्दीत मी माझी गाडी घालायचो ( घोडा युद्धात घालतात तसा, कारण पुण्यात लोकं नुसत्या होर्नने बाजूला होत नाहीत !)
माझ्या कडे बघून लोकांचे हजार प्रश्न:काका(वय ४०) तुम्ही नक्की साप पकडता का ? म्हणजे तुम्ही तसे दाढी-मिशीवाले दिसत नाही म्हणून विचारले है ..है; काकू (वय:?): तुमचा चेहरा ओळखीचा वाटतो, बँक ऑफ इंडिया मध्ये तुमचे खाते आहे का ?; पोरगा (एस.पी ते पुणे विद्यार्थी गृह इ.): तो ऑस्टिन स्टीवन डिस्कवरी मध्ये वापरतो तसा 'स्नेक टोंग' (tong) आहे का तुमच्या कडे ?; सुबक ठेंगणी (बृहन्महाराष्ट्र ते सिंहगड इ.):तुमची डिस्कवरी ची कॅमेरा टीम कुठे आहे,; अश्या प्रश्नांतूर लोकांमधून मी 'ज्याच्या घरात साप निघाला आहे किंवा ज्याने साप पहिला आहे' असा योग्य तो माणूस शोधून काढायचो. जेंव्हा कॉल करणे सुरु केले तेंव्हा ही पहिली पायरी पण खूप अवघड होती. हरचन पालवाच्या कपाटाची दुरुस्ती करून येताना साप 'प्रतेक्ष' पहिले लोक खूप असायचे.(पुलं:म्हैस !)आणि ही लोकं वाट्टेल ते वर्णन करायचे: फुल फणावाला नाग आहे,दहाचा आकडा पण दिसला, काळा केसवाला भुजंग आहे इ. शास्त्रोक्त किंवा मुद्देसूद वर्णन फार कमी लोक करतात आणि हीच लोकं माझ्या कामाची असायची.
बागेमध्ये, विटांच्या ढिगाऱ्यात, बाथरूममध्ये , अडगळीच्या खोलीत, पंप हाउस मध्ये, छपरामध्ये, घुशीच्या बिळात, मोरीत, फ्रीज, टी.व्ही. खाली ( आतमध्ये सुद्धां ! : आतला भाग उबदार असतो म्हणून तिकडे साप जाऊन बसतात :)), वेलीच्या जाळीत, कुत्र्याच्या घरात, ट्यूबलाईटच्या मागे,माठाच्या खाली, भाजीच्या पेटाऱ्यात,उशीच्या अभ्र्या मध्ये...अश्या अनेक ठिकाणी निघालेले साप मी पकडले आहेत. योग्य त्या व्यक्ती कडून माहिती घेऊन मी साप शोधायला लागायचो. मी गेलो- साप समोर दिसला-मी पकडला हे फार कमी वेळा व्हायचे. लोकांच्या त्रासामुळे खूपवेळा बाहेर निघालेला साप लपून बसायचा. दुसऱ्यांच्या घरात साप शोधणे ही एक कला आहे.
'होम-मिनिस्टर' मध्ये लोकांना त्यांच्या स्वतः च्या घरातला कुंकवाचा करंडा शोधणे जमत नाही,इकडे मला अनोळखी घरात साप शोधायचा असायचा.
अश्या वेळो मी पहिला विचार करायचो की 'हा साप इकडे कुठून आला असेल? ज्या भागात शेवटी साप पहिला असेल असेल त्या जागेचा अंदाज घ्यायचो, म्हणजे त्यातला पसारा, जमिनीचा प्रकार (फरशी, माती इ.),साप बाहेर पडू शकेल अश्या जागा इ. आणि मग इन्कमटॅक्सवाले घर खाली करतात, तसच पण थोडे सभ्यपणे ती जागा खाली करायला लागायचो. खरं नाही वाटणार पण मी २-३ वेळा तळजाई वस्ती मधील काही घरे पूर्णपणे खाली केली होती. पसारा साफ करताना लोकं का एवढी अडगळ जमवतात असा प्रश्न पडायचा:फुटलेल्या कप-बश्या,मोठी फुटलेली पिंप, मोडक्या खुर्च्या,कपाटे, वाळ्याचे तुटके पडदे, फुलदाण्या, महागडे खेळण्यांची खोकी( जी खेळणी कधी तुटतील म्हणून मुलांच्या हाती पोहोचलीच नाहीत !)आणि असंख्य कपड्यांची गाठोडी. हा अवाढव्य पसारा हलवायला पण खूप वेळा मला कोणी मदत करायला यायचे नाही. आधी डिस्कवरी-डिस्कवरी म्हणणारे आणि मला ऑस्टिन स्टीवनचे सल्ले देणारी लोकं कामाच्यावेळी गुल व्हायचे. बागेत किंवा मैदानात, घुशीच्या बिळात साप असेल तर उन्हातानात अंगमेहनत करून कुदळ-फावडे घेऊन ती बिळे खोदायला लागायची. घुशीची बिळे ही एकमेकाना जोडलेली असतात,त्यामुळे एक बीळ खोदून उपयोग नसतो. कधी कधी साप (धामण) अर्धा बाहेर असेल तर तिची शेपटी एका हाताने पकडून दुसऱ्या हाताने बीळ खोदायला लागायचे. पटांगणात असलेला साप लोकांनी उचकवला म्हणून खूप वेळा बिळात जाऊन बसायचा आणि मग ते १० मिनिटाचे काम लोकांच्या चुकीमुळे ३-४ तासाचे होऊन बसायचे.
मिपाकर आदुबाळ आणि अजून एक माझा मित्र (चिन्मय) यांना घेऊन मी अशीच एक अर्धी बिळात असलेली धामण पकडली होती,साधारण पणे मी कोणाला कॉल ला घेऊन जात नसे पण त्यावेळी पर्याय नव्हता. ५०-६० लोकं जनता वसाहती मध्ये (पार्वती पायथा)त्या धामणीच्या आजूबाजूला कोंडाळ करून उभे होते, मी एका हाताने धामण पकडून दुसऱ्या हाताने खोदत होतो,हे साधारण १५-२० मिनिटे चालू होते..... इतक्यात ती ७-८ फुटी धामण बाहेर निघाली,आणि कबुतरे उडून जातात तसे माझ्या बाजूचे लोकं सैरावैरा पळून गेले. असो.
बिळातला साप ओढून काढता येत नाही, स्क्रू जसा बोल्ट मध्ये घट्ट बसतो त्याप्रमाणे साप बिळात स्वतःला घट्ट (शरीराची जाडी कमी जास्त करून )अडकवून घेतो. त्यामुळे बाहेर येत नसेल तर परिस्थितीचा अंदाज घेऊन (मैदान, टेकडी) बिळातला साप सोडून द्यावा लागायचा.
एकदा साप दिसला की दुसरी पायरी म्हणजे तो ओळखणे. साप ओळखल्या शिवाय मी त्याला हात लावत नसे. बिनविषारी समजून विषारी साप चुकीच्या पद्धतीने पकडल्याने खूप अपघात होतात. पुण्यात चारही मुख्य (नाग, घोणस, फुरसे आणि मण्यार) विषारी साप सापडतात. पूर्ण साप दिसत असेल तर 'दुधात साखर' पण ती वेळ फार कमी वेळा यायची. शेपटी, डोके, डोक्याच्या भाग, पोट, पाठीवरची नक्षी किंवा त्यांचा आवाज या वरून मी हे आधी विषारी साप आहेत का बघायचो. घोणस साप प्रेशर कुकरच्या शिट्टी सारखा दीर्घ आवाज काढतो. बिनविषारी साप साधारण करून जास्त आवाज करत नाहीत.
माझ्या सुरवातीच्या काळात, एका बांधकामाच्या कामचलाऊ गोदामात दोन घोणस असल्याचा कॉल होता. राजाभाऊंनी एक घोणस पकडून पिशवीत टाकला होता आणि मी दुसरा शोधात होतो. प्रेशर कुकर च्या शिट्टी सारखा आवाज येत होता आणि इतक्यात कोणीतरी गोदामाच्या छताचा सांधा हलवला आणि आख्खे छत खाली आले. बेक्कार धुराळा उठला,त्यातच मी टारझन सारखे दोन्ही हाताने छत पकडले. त्या धुराळ्यात तो प्रेशर कुकर चा आवाज येत होता पण मला काहीच दिसत नव्हते. तेंव्हा भीती वाटून पण उपयोग नव्हता, त्यांमुळे त्या आवाजाचा मी आध्यात्मिकपातळीवर ;) आनंद घेतला. नंतर तो आवाज हळू हळू कमी होत गेला, मग माणसे आली, छत उचलले वगैरे. पुढे आयुष्यात असे (घोणस बरोबरचे)एकांतातील क्षण फार कमी आले. ;) असो.
विषारी सापासाठी आम्ही सर्पोद्यान ची माणसे फक्त प्रश्न चिन्ह (?) सारखा आकडा तर बिनविषारीसाठी हात वापरायचो. 'डोळ्याचे पाते लवते न लवते तो पर्यंत साप (नाग, घोरपड, उदमांजर, घार, घुबड, गरुड इ.) पिशवीत गेला पाहिजे' अशी सर्पोद्यान ची शिकवण होती. ३०-४० लोकं आजूबाजूला असताना ही शिकवण खूप महत्वाची होती, त्यामुळे अपघात व्हायचे प्रमाण खूप कमी होते आणि सापाला पण त्रास कमी व्हायचा.
डिस्कवरी प्रेरित सर्पतज्ञ जागोजागी सापडायचे, त्यांच्याकडे मी दुर्लक्ष करायचो कारण यांची फक्त तोंडाने बडबड असते, खरी भीती असायची ती तळीरामांची ! रात्री तळजाई वस्ती, जनता वसाहतीत गेलो तर खूप वेळा हे तळीराम सर्पतज्ञ भेटायचे, २-४ क्वार्टर लावल्यामुळे त्यांची किंग कोब्रा पण पकडायची तयारी असायची, अशा वेळी खूप शांतपणे परिस्थिती सांभाळायला लागायची. विषारी साप रात्री वस्तीच्या ठिकाणी नाग पकडताना खूप मोठी जवाबदारी असायची: तो नाग आधीच या तळीराम लोकांनी दिवचलेला असायचा त्यामुळे बेक्कार फुत्कार टाकत असायचा, खूप वेळा लाईट नसायची, सगळे फुल औट असायचे, बायका- पोर धिंगाणा घालत असायची, अश्या वेळी या लोकांना सांभाळून, आपल्या पण जीवाची काळजी घेउन तो नाग पकडायला लागायचा.
सर्पोद्यान चा अजून एक नियम म्हणजे: 'एकदा पिशवी मध्ये घातलेला साप स्वतः चा बाप आला तरी त्याला दाखवायला बाहेर काढायचा नाही.' खूपवेळा नाग पकडला तर त्याच्या आध्यात्मिक महत्वामुळे (फुकटची अंधश्रद्धा !) लोकं पूजा करायला पुढे यायचे, नागपंचमीला नागाचा कॉल केला तर अजूनच मजा. अशा वेळी मी पिशवीत टाकलेला साप-नाग कधीच बाहेर काढायचो नाही. माझ्या एका मित्राचा, असाच पूजेसाठी बाहेर काढलेला नाग परत पिशवीमध्ये घालताना अपघात झाला होता. कॉल केल्यावर खूपवेळा लोकं अंगाला हात लावून बघायचे, माझ्या अंगावर कुठले आवरण आहे आहे का बघत असायचे, 'तुम्ही काय खाता ? सापासाठी औषध कुठले घेता ? तुम्हाला कुठली सिद्धी प्राप्त आहे का ?' असे अनेक प्रश्न यायचे. ही उत्तरे देताना खूप काळजी घ्यावी लागायची, समाजात अंधश्रद्धा या वणव्या सारख्या पसरतात. सगळ्या लोकांना माझे एकच उत्तर असायचे "मला साप ओळखता येतात आणि त्यांच्या विषयी माझा सखोल अभ्यास आहे म्हणून मी त्यांना पकडू शकतो, जर अपघात झाला तर मी सुद्धा ससूनलाच जाणार आहे."
हे पकडलेले साप मी तडक सर्पोद्यान ला घेऊन जायचो आणि नंतर ते निसर्गात- अभयारण्यात सोडले जायचे. कॉल येण्यापासून- ते साप पकडे पर्यंत दर वेळी नवी आव्हाने असायची, ती पेलण्याची ताकत मला फक्त सर्पोद्यान ने दिली. सर्पोद्यानने दिलेली जवाबदारी मी ४-५ वर्ष एक पण अपघात न होऊ देता पार पाडली आणि थोडेसे का होईना पुण्यातले साप वाचवले.
साप पकडणे हे काम सोपे नाही,जिवावरचा खेळ आहे.. त्यामुळे असे लेख वाचून, डिस्कवरी वर बघून चुकून पण त्याच्या वाटेला जाऊ नका, त्यांच्या बरोबर फोटो काढून घेऊ नका. हे लक्षात ठेवा " जो सापांबरोबर फोटो काढतो तो लवकरच फोटो मध्ये जातो !"
प्रतिक्रिया
11 Aug 2016 - 8:45 am | vikrammadhav
मस्त आणि माहिती पूर्ण लेख !!!
www.youtube.com/watch?v=Nvtq644m-VA
या विडो मध्ये लोकांचा दंगा बघा !!!!
खरंच साप पकडणारा खूप अलर्ट असायला हवा ...
कोब्रा पकडणार्यान किती जाम पकडलाय त्याचा जबडा!!! थोडी जरी पकड सैलावली तर .... बापरे !!!
पोलीस लोक पण हिरोगिरी करतायत
2 Jun 2017 - 1:25 am | रुपी
मस्त.. हा भाग फारच छान झाला आहे. अगदी शहारे आले वाचताना!