शुक्रतारा मंदवारा या गाण्याला जन्मून ५० वर्षे झाली. आज ही हे गीत आजच्या तरूण पिढीत लोकप्रिय आहे. आणि आठवण म्हणून म्हातार्या-कोतार्यातही. एक समर्थ भावगीत गायक म्हणून या गीताने अरूण दाते ( खरे अरविन्द दाते ) याना ओळख मिळवून दिली.सुधा मलहोत्रा यांचा मधाळ आवाज मराठी गानससिकाना परिचित झाला तो ही याच गाण्याने. त्यावेळी आकाशवाणी मुंब्ई केंद्रावर जे लोक नोकरीस होते त्यांची सांस्कृतिक चंगळच होती. नीलम प्रभू. प्रभाकर जोशी, बाळासाहेब कुरतडकर, यशवंत देव, पाडगावकर, अभिषेकी बुवा, श्रीनिवास खळे ही सारी रत्नं तिथे वावरायची.
दर शनिवारी सकाळी साडेसात वाजले की रसिक ५४५ अंश पाच या मिडीयम वेव्ह वरच्या आकड्यावर डायल फिरवायचा.
"भा व स र ग म " मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम सादर करीत आहोत. " असे गोड आवाजात निवेदन. मग काव्य वाचन व नंतर प्रत्यक्ष गीत असा क्रम असायचा.अन काय सांगावं मंडळी...... मग परिकथेतील राजकुमारा,,,,,ही वाट दूर जाते... हात तुझा हातात... पहिलीच भेट् झाली.... येथून ते दिवस तुझे फुलायचे येथेपर्यंत ही मैफल कित्येक वर्षे चालू राहिली.
रेकॉर्ड कंपनीने गायक, कवि, संगीतकार गाठायचे व गीते ध्वनिमुद्रित करून तबकड्या विकायच्या असा शिरस्ता त्या पूर्वी होता.पण एखाद्या कार्यक्रमाने इतकी एका सरस भावगीते रसिकाना द्यावीत हे अद्वितीय उदाहरण म्हणावे लागेल. ( पुणे आकाशवाणी तर्फे सादर झालेले गीतरामायण हा सन्मान्य अपवाद ) .
मला वाटते शुक्रतारा हा भावसंगीतात एक मैलाचा दगड ठरावा.कारण त्यापूर्वी चे भावगीतातील ऑर्केस्ट्रेशन हे फार साधे ,मूळ चालच वाद्यावर वाजवायची असे असे. काही प्रमाणात वसंत प्रभू यानी. खळ्यानी, इंटरलूडची प्रथा समर्थपणे चालू केली होती. पण वाद्यवृंद या स्वरूपात सुरूवात ही शुक्रतारा पासून झाली असे म्हणावे लागेल. दुसरे असे की भावसंगीतात
युगलगीत असे नसे. भक्तीगीते, एकल भावगीते असत.नाट्य गीतातही " तुझे नि माझे जमेना ( ज्योत्स्ना भोळे व मा. अविनाश )असे अपवाद होते. पण मुख्यतः युगलगीते ही सिनेमातच असत.
मला नेहमी असे वाटते की मुख्य एखाद्या रागावर आधारित चाल करण्याच्या राजमार्ग पत्करल्यानंतर त्यात इतर स्वरांची
अजोड मिसळ करण्याची दैवजात देणगी मराठीत खळे आण्णांना तर हिंदीत नय्यर साहेबाना मिळालेली होती. खळयांनी तर आपल्या कारकीर्दीत हा खासपणा विशेष जपलेला दिसतो. निरनिराळ्या अंतर्याना बदलून चाल द्यायची तरीही तो पॅच वाटता कामा नये हे ही या दोन संगीतकारात असलेले साम्य. शुक्रताराचे दुसरे कडवे काय किंवा पहिलीच भेट झाली मधे "डोळे मिटून घेता" हे कडवे काय ही याची उदाहरणे आहेत.
अरूण दाते यानी जगभरात आपल्या भावगीतांचे कार्यक्रम करून दिगंत कीर्ति मिळविली. एखाद्या कलावंताची कारकीर्दे तीन तासांचा कार्यक्रम करण्याइतपत यशस्वी व मोठी असावी हे रसिकांचे भाग्य. जवळ जवळ १०० चे वर " सुधा मल्होत्रा" या कार्यक्रमाच्या निमिताने दात्यांबरोबर गायल्या. अमेरिकेत तर तेथील स्थित महिलाच गायिका म्हणून पुढे येत यात खळे काकांची सोपी चाल व गीताची कोण्याही व्यक्तिच्या काळजाला भिडण्याची ताकद याचा सुरेख संगम दिसून येतो.
आणखी ५० वर्षानंतर ही हे गीत असेच ताजे राहील.
प्रतिक्रिया
31 Oct 2012 - 10:10 pm | अत्रुप्त आत्मा
मस्त लेख... आणी अरुण दाते यांना सादर प्रणाम :-)
31 Oct 2012 - 10:15 pm | तर्री
समयोचित व उत्कृष्ट रसग्रहण , स्मरण रंजन !
चौकटराजा - जियो !
31 Oct 2012 - 10:39 pm | हुप्प्या
अरूण दाते हे इंदूर मधे वाढले असल्यामुळे गझल वगैरे हिंदी/उर्दू गाण्यात रमणारे होते. खळ्यांनी त्यांना मराठी गाण्याबद्दल विचारले पण ते म्हणाले की माझे इंदूरी मराठी उच्चार लोकांना आवडणार नाहीत. तुम्ही महाराष्ट्रातील गायक बघा. मग खळ्यांनी त्यांचे वडील रामूभय्या दाते यांना गळ घातली. रामूभय्यांनी खळ्यांना सांगितले की "काळजी करू नका. माझा मुलगा तुमच्यासाठी नक्की गाईल." मग त्यांनी त्यांच्या मुलाला फैलावर घेतले. "इतके मोठे संगीतकार तुला बोलवतायत आणि तू नाही म्हणतोस? " वगैरे. मग अरूण दाते गायले आणि पुढचा सगळा इतिहास सर्वज्ञात आहे. अरूण दात्यांना तमाम मराठी लोकांनी डोक्यावर घेतले. खूपच सुरेल आवाज.
अरूण दाते हे खरे अरविंद दाते. घरी अरु अरु म्हणत असल्यामुळे खळ्यांचा समज झाला की त्यांचे नाव अरूण आणि रेकॉर्डिंगच्या वेळेस त्यांनी तेच नाव सांगितले. आणि मग तेच रूढ झाले. अरूण दात्यांबरोबर खळे आणि रामूभय्यांचेही आभार मानले पाहिजेत.
(जाता जाता: पुलंच्या तुज आहे तुजपाशी मधील काकाजी हे व्यक्तिमत्त्व बरेचसे रामूभय्यांकडून स्फूर्ती घेऊन बनवले आहे असे पुलंनीही मान्य केले आहे)
1 Nov 2012 - 1:16 pm | llपुण्याचे पेशवेll
बादवे हे अरुण हे नामकरण यशवंत देवांनी केले असे वाचल्याचे कुठेतरी आठवते आहे.
2 Nov 2012 - 10:26 am | चौकटराजा
रेकोर्र्डिंग झाल्यावर मानधन देण्याचा प्रश्न आला. त्यावेळी आकाशवाणीतील कर्मचार्याने देवाना विचारले काय नांव त्या दात्यांचे ? तर देव म्हणाले त्याना घरी अरू अरू म्हणतात, बहुदा अरूण नांव असावे त्यांचे. कर्मचार्याने बारसे केले.
1 Nov 2012 - 1:16 pm | llपुण्याचे पेशवेll
आयला खळ्यांची सोपी चाल? खळेकाकांच्या चाली ऐकायला सोप्या पण समजायला आणि गायला भयानक अवघड आहेत असे वाटते. उदा. बगळ्यांची माळ
1 Nov 2012 - 2:55 pm | पाटव
कुठ्ल्याश्या गोष्टीमध्ये
आयला खळ्यांची सोपी चाल? खळेकाकांच्या चाली ऐकायला सोप्या पण समजायला आणि गायला भयानक अवघड आहेत असे वाटते.
याच अर्थाचे वाक्य आहे... बहुतेक "सखी" नक्की आठवत नाही...1 Nov 2012 - 2:57 pm | मी_आहे_ना
अगदी बरोबर, 'सखी'मधली (पहिलीच) गोष्ट.
1 Nov 2012 - 2:43 pm | मी_आहे_ना
छान माहिती! गाणं तर एकदम लाजवाब...
1 Nov 2012 - 7:04 pm | तिमा
लेख आवडला पण,
सुधा मलहोत्रा यांचा मधाळ आवाज मराठी गानससिकाना परिचित झाला तो ही याच गाण्याने.
या वाक्याशी सहमत नाही. सुधा मल्होत्रा यांनी पूर्वीही मराठी भावगीते गायली होती. त्यातील 'विसरशील खास मला' हे गाणे त्यांनी अप्रतिम गायले होते. नंतर आशाजींनी पुन्हा ते गायले.
2 Nov 2012 - 10:22 am | चौकटराजा
लेख लिहितानाही ही माहिती होती पण ती रेकॉर्ड फारशी लागत नाही रेडिओवर ! आशाबाईंचीच लागते.
क्रोनोलॉजिकली आपले म्हणणे बरोबर आहे आभार !
22 May 2018 - 1:43 am | nishapari
एक गाणं फार आवडतं होतं पण सुरुवातीचे बोल आठवत नाहीयेत , इंटरनेटवर खूप शोधलं पण मिळालं नाही ... सीडी खरेदी केली होती ती कधी अडगळीतुन गायब झाली समजलं नाही , गलथानपणा नडला ... खालच्या मधल्याच 4 ओळी आठवत आहेत .... कोणाला पूर्ण गाणं माहीत असेल / संग्रहात असेल तर द्याल का प्लीज ....
हलकेच उडाली धूळ शपथेला रंगही हळवा / हिरवा
मी वळून पाहिले तेव्हा नुसताच लहरला मरवा
हे रान गर्द भवताली डोहात सावल्या जमल्या
गावात नव्या दुःखाच्या ____ कशाला रमल्या
22 May 2018 - 1:55 am | पिवळा डांबिस
पाऊस कधीचा पडतो, झाडांची हिरवी पाने
हलकेच जाग मज आली, दु:ख्खाच्या मंद स्वराने
बाकी शुक्रतारा हे माझं अतिशय आवडतं गाणं...
22 May 2018 - 8:47 am | nishapari
धन्यवाद .. पण हे नाही ... हे सुद्धा माझ्या आवडत्या गाण्यांपैकी आहे पण हे ते नाही ... काल अजून 2 ओळी अर्धवट आठवल्या खूप प्रयत्न केल्यावर ... त्या निळसर वातावरणी _______
वाऱ्यावर सोडुनी वचने सहवास भणंगत होता ..
कदाचित एखादा शब्द चुकला असेल .. चाल आठवते ,सुरुवातीचं म्युजिक आठवतं .. नेमके सुरुवातीचे बोलच आठवत नाहीयेत ....
22 May 2018 - 8:52 am | nishapari
या दोन ओळी वेगवेगळ्या कडव्यां मधल्या आहेत ... एकानंतर दुसरी नाही .... नेटवरचे सगळे अल्बम धुंडाळून झाले ...मला हे गाणं एका mp3 सीडीत सापडलं होतं .... ज्यात 6 - 7 गायकांची प्रत्येकी 30 - 40 तरी भावगीतं होती .... कदाचित जास्तही ... त्यामुळे कुठल्याही प्रसिद्ध अल्बम मधलं नाहीये बहुतेक .... पण गायक अरुण दातेच आहेत .
22 May 2018 - 10:58 am | गवि
https://www.midomi.com
फक्त चाल आठवतेय पण बाकी सर्व हरवलंय अशा गाण्यांबाबत.
वर दिलेल्या वेबसाईटवर तोंडी गुणगुणून प्रत्यक्ष गाणं सापडतं.
कधी कधी चिवटपणे १० -१२ वेळा पुन्हा पुन्हा गाऊन गुनगुणून ट्राय करावा लागू शकतो. पण मिळतं बहुतेक वेळा.
22 May 2018 - 11:07 am | nishapari
गाणं समजलं ... ☺️ या उदास कवितेवरती बघ प्राण तरंगत होता .... आता ऑडिओ शोधत आहे नेटवर ... कुणाकडे असेल तर पाठवाल का कृपया ........
22 May 2018 - 11:22 am | nishapari
या उदास कवितेवरती बघ श्वास तरंगत होता ... असं आहे
22 May 2018 - 6:19 pm | सिरुसेरि
सुरेख आठवणी