आय आय टी रामैय्या

चैतन्य गौरान्गप्रभु's picture
चैतन्य गौरान्गप्रभु in जनातलं, मनातलं
17 Apr 2012 - 3:16 pm

पंचवीस-सव्वीस वर्षांपुर्वीची गोष्ट आहे आपल्या जवळच्याच आंध्रप्रदेशातली. तेलंगणातल्या विविध शाळांमधून विद्यार्थ्यांना गणित शिकवत आयुष्य घालवलेला चुक्का रामैय्या नावाचा एक हाडाचा शिक्षक होता. शिक्षकी पेशा एक व्रत म्हणुन स्विकारण्यापुर्वी स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतलेला, गांधींजींच्या सत्याग्रह आंदोलनात तुरूंगवास भोगलेला एक देशभक्त! वारंगळमधल्या आपल्या गुडुर या मुळगावी अस्पृश्यता विरोधी चळवळ चालवून आपल्याच ब्राम्हण समाजातून वाळीत टाकल्या गेलेला एक पुरोगामी विचाराचा माणुस. नागार्जुनसागरच्या आंध्रप्रदेश रेसिडेंशिअल स्कुलमधून मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाल्यावर सरकारी कागदपत्रांमध्ये त्यांचं निवृत्तीवेतन अडकलं. आयुष्यभर ईमाने ईतबारे शिक्षक म्हणुन नोकरी केलेल्या माणसाजवळ पैसा तो कितीसा असणार? काही महिन्यातच आर्थीक अडचण पुढे दत्त म्हणुन उभी राहिली.

विद्यादानाचं कार्य करत आयुष्य घालवलेल्या या शिक्षकाला आधार वाटला तो माता सरस्वतीचाच! पुढे काय? यावर चिंतन करण्यासाठी 'बसर' मधील ज्ञानसरस्वती मंदिर गाठलं. देशातलं हे एकमेव सरस्वतीचं स्थान. लहान मुलांना या मंदिरात आणुन त्यांच्याकडून 'श्री गणेशा' लिहून घेण्याची पद्धत आहे. असं म्हणतात की या मंदिरात शिक्षणाचा श्रीगणेशा करणा-या मुलांना सरस्वती मातेचा आशिर्वाद मिळतो. रामैय्यांनीही मग तसंच करायचं ठरवलं. आपल्या नव्या जीवनाचा श्रीगणेशा या मंदिरातच त्यांनी गीरवला. परत एकदा शिक्षक म्हणुन काम सुरू केलं. आता शाळेचं बंधन नव्हतं. आणि वैयक्तीक शिकवणी वर्ग घ्यायचे असतील तर हैद्राबादला जाण्याशिवाय पर्याय नव्हता.

आंध्रप्रदेशच्या या राजधानीत त्यांच्या जुन्या विद्यार्थ्यांपैकी काही तेव्हा ईंडियन ईंन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (आय आय टी) च्या प्रवेश परिक्षेची तयारी करत होते. शाळेत रामैय्यांसरांनी शिकविलेल्या गणिताचा प्रभाव त्यांच्या मनावर कायम होता. सरांनी आय आय टी साठी देखील गाणित शिकवावं असा हट्ट या विद्यार्थ्यांनी धरला. आजवर शाळेत गणित शिकवलेल्या रामैय्यांनी हे एक आव्हान म्हणुन स्विकारलं. पहिलं वर्ष आय आय टीचं गणित समजवून घेण्यातच गेलं. मात्र दुसरी दहा जणांची बॅच सुरू झाली आणि यातील सहा विद्यार्थ्यांना आय आय टीत प्रवेश मिळाला. ते वर्ष होतं १९८४. त्यानंतर रामैय्या सरांना मागे वळून पहावं लागलं नाही.

आज भारतातील अग्रगण्य आय आय टी कोचींग सेन्टर्सपैकी सर्वात महत्त्वाचे म्हणुन रामैय्या ईन्स्टीट्युट मानले जाते. भारतातल्या सर्वात प्रतिष्टेच्या प्रवेश परिक्षेची तयारी करवून घेण्या-या या शिकवणी वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी वेगळी प्रवेश परिक्षा द्यावी लागते. रामैय्या स्टडी सर्कलच्या ठरावीक सव्वाशे जागांसाठी देशभरातील १२ हजार विद्यार्थी दरवर्षी ती परिक्षा देतात. ही परिक्षा 'क्रॅक' करण्यासाठी स्वतंत्र कोचिंग सेन्टर्स आंध्रप्रदेशभर निर्माण झाले आहेत आणि जोमाने सुरू आहेत. आजवर एक हजाराहून अधीक आय आय टी ईंजिनिअर्स दिल्यानंतर ८४ वर्षांचे रामैय्या सर सकाळी चार वाजताचा गणिताचा वर्ग आजही तेवढ्याच तडफेने शिकवतात. गणिताच्या एका शिक्षकाचा हा प्रवास कुठल्याही दंतकथेपेक्षा कमी नाही.

मात्र रामैय्यांच्या मते याचं गमक त्यांनी घेतलेल्या पारंपारिक गणिताच्या शिक्षणामध्ये आहे. रामैय्यांचं घर आणि गुडुर हे गाव म्हणजे विद्याभ्यासाचं केन्द्र. मात्र एकिकडे ज्ञानार्जन आणि सरस्वतीसाधनेच्या गोष्टी करायच्या आणि दूसरीकडे अतिशय काटेकोरपणे अस्पृष्य़ता पाळायची हे धोरण काही तरूण रामैय्यांना पटेना. 'कसेल त्याची जमीन' या धोरणाच्या समर्थनार्थ त्यांनी गावात आंदोलन उभारलं. मोठमोठ्या जमिनपट्ट्यांचे मालक आणि सावकार असणा-या त्यांच्याच ब्राम्हण समाजातील धुरिणांना या शाळकरी पोराचं हे धाडस पहावलं नाही. त्यांनी रामैय्यांना जातीबाहेर टाकलं. आठव्या वर्गापर्यंत गावात शिक्षण घेतल्यानंतर कुटुंबाच्या भल्यासाठी त्यांना गावही सोडावं लागलं.

मात्र महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावीत रामैय्यांना त्याने फारसा फरक पडला नाही. ओस्मानिया विद्यापिठात प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यचळवळीतही हिरीरीने भाग घेतला. स्वामी रामानंद तिर्थ यांच्या नेतृत्त्वातल्या रझाकारांच्या विरोधातील चळवळीतही ते आघाडीवर राहिले. त्यामुळे अनेकदा तुरूंगवास भोगावा लागला. अश्यात गणितामध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. शिक्षक होउन पोटापाण्याचा प्रश्नही सुटेल आणि चळवळीतही काही ना काहीतरी करता येइल या उद्देशाने त्यांनी तेलंगणातील जनगाव मधल्या एका शाळेत नोकरी पत्करली. त्यानंतर सुरू झाला तो दंतकथेचा प्रवास. तो आजवर सुरू आहे. अगदी २००७ मध्ये शिक्षक आमदार म्हणुन आंध्र विधानपरिषदेवर निवडून येईपर्यंत!

चळवळीशी असलेलं रामैय्यांचं नातं अतुट आहे. आय आय टीचं नवं केन्द्र हैद्राबादला न उभारता बसरा या सरस्वतीच्या तिर्थस्थळी उभारावं हा त्यांचा आग्रह होता. त्याचा त्यांनी बराच पाठपुरावा केला, परंतू शेवटी आय आय टी आली, ती हैद्राबादलाच! आजही त्यांना या गोष्टीची खंत वाटते.

आपलं म्हणणं नेहमी गणितीय परखडपणे मांडणा-या आणि आंध्रातील युवकांचं श्रद्धास्थान असणा-या रामैय्यांना विरोध करण्यासाठी काहीही प्रभावी हत्यार जवळ नसल्यामुळे त्यांच्या शिकवणीच्या वेळांवरतीच आंध्रातल्या नेत्यांनी हल्ला चढवला. सकाळी चार ही काही शिकवणीची वेळ नव्हे! तसेच पाठांतर ही काही गुण मिळवण्याची पद्धत नव्हे अशी वक्तव्ये आंध्रातील अनेक नेते वरचेवर देत असतात. "मी सकाळी चार वाजता उठूनच गणिताचा अभ्यास केला आहे. आणि माझ्या विद्यार्थ्यांनाही हीच वेळ योग्य वाटते. यामुळे त्यांना दिवस मोकळा मिळतो, शिवाय या वेळी केलेलं मनन कायमचं लक्षात राहतं," असं स्पष्टपणे बोलून रामैय्या सर्व विरोधकांची हवा गुल करतात.

त्यांच्यामते आय आय टी ची परिक्षा म्हणजे ज्ञानापेक्षा कौशल्याची कसोटी आहे. ईतर प्रवेशपरिक्षांमध्ये विद्यार्थी किती वेगाने उत्तरे शोधू शकतो याची कसोटी असते, मात्र आय आय टी मध्ये कमीत कमी पाय-यांमध्ये जास्तीत जास्त कौशल्याचा वापर करून उत्तर शोधण्याला गुण असतात. ही विशेषता लक्षात घेऊन त्यांनी आपल्या शिकवणी वर्गात फक्त आयआयटी-जेईई करिताच शिकवण्याची मर्यादा घालून घेतली आहे. आजवर कधीही आपली जाहिरात त्यांनी केलेली नाही, की कुठे एक साधा फलकही लावलेला नाही. आता रामैय्य्या ईन्स्टीट्युटमध्ये गणिताबरोबरच भौतिक आणि रसायनशास्त्रही शिकवले जातात. यासाठी या विषयातील तज्ञांची निवड रामैय्यांनी स्वतः केलेली असते.

प्रवेशाची पद्धतही मोठी वैषिष्ट्यपुर्ण आहे. आवेदन पत्रे मिळण्याचं एकमेव स्थान आहे, ते म्हणजे नल्लाकुंटामधील त्यांचं ईन्स्टीट्युटचं ऑफीस आणि एकमेव दिवस आहे, तो म्हणजे एक एप्रिल. प्रवेश परिक्षेसाठी पात्र असतात दहावीची परिक्षा दिलेले विद्यार्थी. अगदी नुकताच अकरावीत प्रवेश घेतला असेल, तरीही तुम्ही या प्रवेश परिक्षेसाठी पात्र नाही. तीन पेपर होतात. आणि सर्वाधीक गुण मिळवण्या-या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं. या प्रवेशप्रक्रियेवर अनेक वाद आजवर उठलेत. मात्र रामैय्यांच्या यशाचं हेच गमक आहे, की त्यांनी आपला मार्ग कधीच सोडला नाही. सव्वाशेपैकी जवळपास वीस जागा गरिब हुशार विद्यार्थ्यांसाठी असतात. त्यांच्याकडून एक रूपयाही फि म्हणुन घेतला जात नाही.

या सर्वांबरोबरच रामैय्या हे एक उत्तम लेखकही आहेत. त्यांचे तेलगुमधील लघुनिबंध लोकप्रिय आहेत. गणित या विषयाव्यतिरिक्त ईतर विषयांवर त्यांची एकवीस पुस्तकं आजवर आली आहेत. त्यातील १६ लघुनिबंधांचे संग्रह आहेत तर ईतर पुस्तकांमध्ये आपले शिक्षणविषयक विचार त्यांनी व्यक्त केलेले आहेत. पारंपारिक शिक्षणपद्धतीचा त्यांना अभिमान आहे, मात्र बदलत्या काळानुसार अध्ययन आणि अध्यापन पद्धतीमध्ये काय बदल घडवले पाहिजेत, हे देखील त्यांनी प्रभावीपणे मांडले आहे.

शिक्षक, गणितज्ञ,स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, लेखक यांबरोबरच मुलगा, भाऊ, पती, वडिल, आजोबा आणि आता पणजोबा या भुमीका निभावण्यातही त्यांनी शंभरपैकी शंभर गुण मिळवले आहेत. ज्या वयात लोकांना जगणे असह्य होते त्या वयात रामैय्यासर शेकडो आय आय टी टॉपर्स तयार करण्याच्या मोहिमेत उत्साहाने कार्यरत आहेत ही बसरच्या ज्ञानसरस्वतीची कृपाच नव्हे का?

साहित्यिकसमाजनोकरीजीवनमानतंत्रराहणीविज्ञानराजकारणशिक्षणचित्रपटविचारलेखबातमीमाध्यमवेध

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

17 Apr 2012 - 3:30 pm | कवितानागेश

उत्तम माहिती.
लेख आवडला. :)

Madhavi_Bhave's picture

17 Apr 2012 - 3:39 pm | Madhavi_Bhave

खूपच छान माहिती. अश्या गोष्टींमुळे मनाला उभारी येते. फार सुंदर.

रमताराम's picture

17 Apr 2012 - 3:40 pm | रमताराम

एका बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद..

धन्या's picture

17 Apr 2012 - 3:49 pm | धन्या

छान ओळख करुन दिली आहे रामैय्या सरांची.

धन्यवाद! खूप मस्त माहिती. दंतकथाच वाटावी अशी सत्यकथा.

बाकी उगीच उत्सुकता म्हणन - बसर, बसरा जे गावाचं नाव लिहिलंय ते 'बासर' असं आहे का? बासर नांदेड जिल्ह्यात येतं की आंध्रप्रदेशात?

विसुनाना's picture

17 Apr 2012 - 4:41 pm | विसुनाना

'बासर' हे नाव बरोबर. गोदावरीकाठच्या या ठिकाणी महर्षि व्यास (व्यास ~ बासर) यांनी तपश्चर्या केलेली होती असे म्हणतात. तेथे सरस्वतीचे देऊळ आहे. ते महाराष्ट्र - आंध्रप्रदेश सीमेवर असून अधिकृतपणे आंध्रप्रदेशात आहे.

यकु's picture

17 Apr 2012 - 4:44 pm | यकु

:)
धन्यवाद विसूनाना !

नि३सोलपुरकर's picture

17 Apr 2012 - 3:59 pm | नि३सोलपुरकर

लेख छान लिहीला आहे. उत्तम माहिती.

सदाचारी ,बहुआयामी रामैय्यासरांबद्दल आदर द्विगुणीत झाला.

नि३
( शाळेत असतांना गणित शिकवणार्‍या वर्ग शिक्षकाच्या खाजगी शिकवणीस नकार दिल्याबद्दल "अ" वर्गातुन "ब"वर्गात वर्ग झालेला)

परिकथेतील राजकुमार's picture

17 Apr 2012 - 4:02 pm | परिकथेतील राजकुमार

श्री. रामैय्या ह्यांना भारतरत्न मिळायला हवे.

स्पंदना's picture

17 Apr 2012 - 4:18 pm | स्पंदना

आवडल हो चैगो. रामय्यांच्या बद्दल ऐकुन होते पण अशी पुरेपुर ओळख आज पहिल्यांदाच . धन्यवाद.

विसुनाना's picture

17 Apr 2012 - 4:37 pm | विसुनाना

चुक्का रामैय्यांचा परिचय आवडला. अशा हाडाच्या शिक्षकांची गुणवान विद्यार्थ्यांना आजच्या काळात मोठी गरज आहे.
असो.
अवांतरः
या लेखाच्या लेखकाला रामैय्या इन्स्टिट्यूटबद्दल कुठून माहिती मिळाली?
रामैय्या आयआयटी इन्टिट्यूट माझ्या घराच्या मागेच आहे. शिवाय स्वानुभवाने काही गोष्टी माहित आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून रामैय्या सर स्वतः शिकवत नाहीत. त्यांनी रामैय्या इन्स्टिट्यूटच्या दैनंदिन कारभारातून लक्ष काढून घेतलेले आहे. सध्या ते आंध्रप्रदेश विधान परिषदेचे सदस्य आहेत.
रामैय्यांच्या पावलावर पाऊल टाकत सुरू झालेल्या नारायना (सेंट्रल ऑफिस ब्रँच) आणि श्रीचैतन्या (आयपीएल सी बॅच) (-असेच म्हणायचे असते) या पूर्णपणे व्यावसायिक शैक्षणिक संस्था आयआयटी/ए आय ट्रिपल ई प्रवेश परीक्षांमध्ये आता आघाडीवर आहेत. त्यांचे विद्यार्थी गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणावर निवडले गेले.
यावर्षी रामैय्या इन्स्टिट्यूटचा केमिस्ट्रीचा अभ्यासक्रम पूर्ण व्हायला खूपच उशीर झाला.
रामैय्यांनी स्वतः यात पुन्हा लक्ष घातले पाहिजे. पण आता त्यांचे वय (८४ वर्षे) झालेले आहे.

चैतन्य गौरान्गप्रभु's picture

17 Apr 2012 - 8:18 pm | चैतन्य गौरान्गप्रभु

"या लेखाच्या लेखकाला रामैय्या इन्स्टिट्यूटबद्दल कुठून माहिती मिळाली?"
हा सवाल जो आपण केलात त्याचे उत्तर देतो आहे.
हे लेख मी नागपूरच्या एका वृत्तपत्रासाठी लिहत असतो. श्री मधुसुदनराव सर हे सध्या या ईन्स्टीट्युटचे प्रमुख (प्रिंसिपल) आहेत. त्यांच्याशी या माध्यमातून बोलणे झाले होते. सध्या रामैय्यासर स्वतः शिकवत नसले तरिही अगदी अलिकडे पर्यंत ते दररोजच्या शिकवण्या घ्यायचे असं ते म्हणाले. शिवाय, आताही ईन्स्टीट्य़ुटच्या विद्यार्थ्यांदा ते दैनंदिन शिकवणी देत नसले, तरीही जेव्हा ते शिकवणी घेतात ते सकाळी ४ वाजता घेतात, असंही ते म्हणाले. ते पुर्णवेळ शिकवत नाहीत, असे वृत्तपत्रात आल्यास ईन्स्टीट्युटच्या दृष्टीने ते बरे नाही अशी विनंती त्यांनी केली. त्यामुळे मी सर सकाळी चारचा शिकवणी वर्ग घेतात असे नमुद केले आहे. जे की अत्यंत बरोबर आहे.
राहिला प्रश्न नारायना आणि श्रीचैतन्या चा, तर हा लेख रामैय्यांवर असल्यामुळे या दोन संस्थांबद्दल लिहण्याचे काहीही कारण नाही.
शेवटी केमिस्ट्रीचा यंदाचा अभ्यासक्रम: तर यावरही या लेखात संदर्भ येण्याचे कारण नाही. परंतु अनायसे मधुसुदन राव स्वतःच केमिस्ट्री शिकवत असल्यामुळे त्यांनी हे माझ्याकडे बोलतांना मान्य केलं की यंदा प्रिंसिपलपदाची जबाबदारी सांभाळतांना कोर्स पुर्ण करता करता बरीच वाट लागली.
धन्यवाद!

विसुनाना's picture

18 Apr 2012 - 11:07 am | विसुनाना

चैतन्यजी, खुलाशाबद्दल धन्यवाद...

तरीही वृत्तपत्रीय लेखनाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवून (लेख जितका सत्याशी प्रमाणिक करता येईल तितका करून) तुम्हाला काही स्वतंत्र मते मांडता आली असती. किंबहुना असा लेख म्हणजे केवळ जाहिरात न होता विद्यार्थ्यांना आणि पालकांना रामैय्या इन्स्टिट्यूटकडून नक्की कोणती आणि किती अपेक्षा ठेवायची तेही कळले असते.

विद्यानगर हे आय आय टी जेईई (आता आयसीट ?) तयारीच्या इन्स्टिट्यूटचे माहेरघर आहे. (इन्स्टिट्यूटचे पेव फुटले आहे असे म्हणा. इथे केवळ दीड किलोमिटर परिसरात १५०-२०० इन्स्टिट्यूट / क्लासेस आहेत.) महाराष्ट्रातून तसेच देशाच्या अनेक भागातून अनेक हुशार व होतकरू विद्यार्थी अणि पालक फक्त त्यासाठी दोन वर्षे इथे येऊन राहतात. कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. या सार्‍याच व्यवसायाची (आणि त्यामागच्या 'धंद्यांची') कल्पना कदाचित तुम्हाला नसावी.
त्यावर एखादा नि:पक्षपाती लेख येणे गरजेचे आहे.

नाहीतर रामैय्याच्या एन्ट्रन्स एक्झामच्या तोंडावर आलेला जाहिरातवजा लेख इतकेच याचे स्वरूप राहील. चुक्का रामैयांचे मोठेपण त्यामुळे झाकोळून जात आहे असे मला वाटते.

चैतन्य गौरान्गप्रभु's picture

18 Apr 2012 - 9:17 pm | चैतन्य गौरान्गप्रभु

नानाजी, तुमचं हे म्हणणं अजीबात चुक नाही.

"किंबहुना असा लेख म्हणजे केवळ जाहिरात न होता विद्यार्थ्यांना आणि पालकांना रामैय्या इन्स्टिट्यूटकडून नक्की कोणती आणि किती अपेक्षा ठेवायची तेही कळले असते."
पण या लेखात चुक्का रामैय्यांचा वैयक्तीक परिचय हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यांची शिकवणी ही त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असल्यामुळे त्याशिवाय त्यांचा परिचय अपुर्ण आहे. मात्र शिकवणी, आणि शिकवणी वर्गामागील आर्थिक उलाढाल, फसवणुक, अत्याचार, अन्याय, शिक्षणाचा बाजारबसवेपणा, हे मुद्दे या लेखात येण्याचं काहीही कारण नाही. असे मला वाटते.

"या सार्‍याच व्यवसायाची (आणि त्यामागच्या 'धंद्यांची') कल्पना कदाचित तुम्हाला नसावी."
ह्याच्याशी देखील सहमत. कारण हे वर्ग थेट तुमच्या घराच्या मागेच आहेत, त्यामुळे तुम्हाला सहाजीकच जास्त जवळून आणि चांगली कल्पना असणार. असेही मला वाटते.

"त्यावर एखादा नि:पक्षपाती लेख येणे गरजेचे आहे." माझ्या मते आपल्याकडूनच आला पाहिजे. असे तर खुपच वाटते.

विसुनाना's picture

19 Apr 2012 - 10:38 am | विसुनाना

माझ्या मते आपल्याकडूनच आला पाहिजे.

- हम्म्म.. बघू या.

रामैय्या गुर्जींचा परिचय आवडला.

चैतन्य गौरान्गप्रभु's picture

17 Apr 2012 - 8:20 pm | चैतन्य गौरान्गप्रभु

ईतर सर्व प्रतिक्रियाबद्दल मनापासुन धन्यवाद! ज्या वृत्तपत्रात हे लेख प्रकाशित होतात, त्यावरही ईतक्या प्रतिक्रीया कधीच येत नाहीत. मिपा कुठल्याही पेपरपेक्षा सरस आहे.

अर्धवटराव's picture

17 Apr 2012 - 8:32 pm | अर्धवटराव

एका हाडाच्या शिक्षकाचा उत्तम परिचय.
धन्यवाद.

अर्धवटराव

मूकवाचक's picture

19 Apr 2012 - 1:24 pm | मूकवाचक

+१

मदनबाण's picture

18 Apr 2012 - 7:30 am | मदनबाण

सरांचा परिचय आवडला. :)

एका आदर्श शि़क्षकाची ओळख सुंदर करुन दिलित. धन्यवाद.

--टुकुल.